मौनी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्था लक्ष पुरवतील तर ग्रामीण भारताच्या जीवनपरिवर्तनाला वेग येईल.
भारताच्या सहा लाख मूक खेड्यांपैकी एक सालपेवाडी! 1953 सालपर्यंत तीही अशीच अंधारीत खितपत पडलेली होती. या देशावर मुसलमानांनी राज्य केले, त्यांना पराभूत करून मराठे आले, त्यांच्याकडून इंग्रजांनी या देशाचे राज्य हिसकावून घेतले आणि अखेर जागृत जन शक्तीचा अनुभव येताच इंग्रजांनीही मित्र-भावनेने या देशाचा निरोप घेतला. इतक्या मोठमोठ्या क्रांतिकारक घटना येथे घडल्या, परंतु सालपेवाडीच्या खडतर व मागासलेल्या जीवनावर त्यांचा परिणाम झाला नव्हता. 1953 सालपर्यंत येथे येण्यास रस्ता नव्हता, ग्रामपंचायत नव्हती, शाळा नव्हती, सोसायटी नव्हती की दुकान नव्हते. गारगोटीच्या 2-3 मैलांच्या परिसरातील खेड निवडून तेथे ग्राम-विकासाचे कार्य अंगावर घेण्याचे मौनी विद्यापीठाने ठरविले.
1953 साली विद्यापीठाने आपल्या कार्यासाठी सालपेवाडीची निवड केली. हा गाव गारगोटीपासून अत्यंत जवळ म्हणजे सुमारे एक मैलावर आहे. यामुळे तेथे वारंवार जाणे-येणे सहज शक्य आहे. हा गाव सर्व सुखसोयीपासून वंचित व आवश्यक सुधारणारातून दूर असल्यामुळे सर्वप्रथम त्याच्याकडेच लक्ष देणे योग्य होते या गावाशी संबंध असलेला महारवाडा फार मोठा आहे. गावच्या लोकसंख्येइतकीच संख्या या हरिजनवस्तीची आहे. अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने कार्य करण्यास ही परिस्थिती अनुकूल समजण्यात आली.
गाव आणि गावचे एकमात्र बहिरोबाचे देऊळ यातून एक ओढा वाहत होता. त्यामुळे देवदर्शनाला जाणाऱ्या स्त्री-पुरुषांची व मुलाबाळांची फारच गैरसोय होत होती. विशेषतः पावसाळ्यात तर दर्शनच दुर्लभ होई. शिवाय ओव्याच्या प्रवाहालाली चांगली सुपीक जमीन सापडून तिचीही दरसाल खूप नासाडी होत असे. म्हणून हा नाला वळवावयाचे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम गावच्या दृष्टीने मुळीच निकडीचा नव्हता, आणि जर केवळ त्यांच्यावर तो सोपविण्यात आला असता, तर कदाचित् त्यांनी तो अमलात आणलाही गेला नसता. परंतु युगानुयुगांच्या स्थिरतेमध्ये खळबळ उडवून देणे हेदेखील ग्रामसुधारणेच्या कार्यक्रमातील पहिले पाऊल असू शकते, हे लक्षात घेऊन विद्यापीठाने हा प्रयोग हाती घेतला. शिवाय या योजनेचा परिणामही चटकन दिसून येणार होता.
या कामासाठी मौनी विद्यापीठाने आपल्या 50-60 विद्यार्थ्यांचे 21 दिवसांचे एक श्रमदान शिबिर या गावात घेण्याचे ठरविले. गावच्या इतिहासात ही अत्यंत अभूतपूर्व अशी घटना होती. तिचे वर्णन करताना गावकरी म्हणाले, “आमचा गाव स्थापन झाल्यापासून कुणीही या गावची चौकशी केली नव्हती. साधा सरकारी नोकरही की या गावात आला नव्हता! शे-पाचशे वर्षापासून नव्हे, गाव बसल्यापासून!” आता त्या गावात इतर ग्रामस्थांची व सरकारी अधिकाऱ्यांची रीघ लागली.
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान सुरू केल्याची बातमी कळताच आजूबाजूच्या गावच्या लोकातही-विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी सर्वांमध्ये एक नवचैतन्य संचारले आणि ते अहमहमिकेने श्रमदानात भाग घेऊ लागले. मामलेदार व डी.वाय.एस्.पी यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसह श्रमदानात भाग घेतला. खाकी गणवेशातील पोलिसांना दगडा-मातीच्या टोपल्या उचलताना पाहून गावकऱ्यांना किती धन्य वाटले असेल!
अशा प्रकारे गावच्या ओव्याला 46 फूट लांब, 10 फूट रुंद व 10 फूट उंच असे धरण गावच्या लोकाच्या मदतीने विद्यापीठाने घालून दिले व ओव्याचा प्रवाह बदलण्यासाठी 200 फूट लांब 12 फूट रुंद व 5 फूट खोल असा नवा चर लपला विद्यार्थी आणि गावकरी मंडळी यांनी मिळून सुमारे 2000 रुपये किमतीचे काम श्रमदानाने केले. या पहिल्याच कामाने सालपेवाडीत एक अपूर्व उत्साह संचारला आणि विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाची अनेक कामे घडवून आणण्याचा सालपेवाडीकरांनी चंग बांधला.
बहिरोबाचे मंदिर आणि सालपेवाडी यांच्या मधील ओव्याचा अंतराय नाहीसा झाला आणि ओझ्याखाली असणारी जमीन व्यवस्थित करून लागवडीस आणली गेली. आपल्या गावाला शाळा असावी, असे त्यांना वाटू लागले. परंतु गरीब, डोंगराळ गाव. शाळेच्या इमारतीकरिता एकदम पैसा कोढून गोळा करणार? म्हणून बहिरोबीच्या पुढील पडवी सारखा भाग वाढवून तेथे शाळा सुरू करण्यात आली. आजही त्याच ठिकाणी एकशिक्षकी शाळा चालू असून त्या शाळेत 44 मुले पहिल्या चार इयत्तांतून शिकत असतात. या मुलांमध्ये मुलीची संख्या फक्त 5/6 एवढीच आहे, ही गोष्ट मात्र लटकते. परंतु लवकरच गावाजवळच्या माळावर एक आधुनिक सोयींनी युक्त अशी शाळा बांधण्याचे गावाने ठरविलेले आहे.
गावाजवळ शेती पुरेशी नाही. 39 घरे असलेल्या या गावात खातेदारांची संख्या 143 आहे! यावरून शेतीचे किती लहान-लहान तुकडे झालेले असतील, याची कल्पना येते. गावात कोणाजवळही 5 एकराहून अधिक शेती नाही, अर्थात् दारिद्र्य व कर्ज बाजारीपणा हा लोकांच्या पाचवीला पुजलेलाच होता. लोकांना दारिद्र्यातून झटपट सोडविण्याचा मार्ग जरी शोधून काढता आला नाही, तरी सावकारी पाशांतून त्यांची मुक्तता करण्याचे मौनी विद्यापीठाच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आणि 1953-54 साली येथे एक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी काढण्यात आली. आज या सोसायटीचे भांडवल 24 हजार रुपये झालेले असून सालपेवाडी व हरिजनवाडा येथील 72 लोक या सोसायटीचे सभासद आहेत. सभासदांना देण्यात आलेल्या कर्जाची रक्कम सुमारे 18 हजार रुपये आहे. गावच्या लोकाचेच शेअर भांडवल 5 हजार रुपयांहून अधिक झाले आहे. आता सावकारांकडे जाण्याची पाळी गावातील लोकावर क्वचितच येते.
पावसाळ्यात शेतकऱ्याजवळचे धान्य संपलेले असते आणि त्याच्यावर उपासमारीची पाळी येते. अशा वेळी तो सावकाराकडे जाऊन वाटेल तेवढे व्याज कबूल करून धान्य घेऊन येतो आणि कशीबशी गुजराण चालवतो. पण जेव्हा दिलेले धान्य-कर्ज सावकार वसूल करून नेतो तेव्हा शेतकऱ्याचे डोळे पांढरे होतात आणि तो हताश होतो. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या चक्रात तो असा काही अडकून बसला आहे की, त्यातून आपण कधीकाळी बाहेर पडू अशी त्याला आशाच वाटत नाही. सालपेवाडीच्या जागृत शेतकऱ्यांनी मात्र या चक्रांतून सुटका करून घेण्याचा निश्चय केला आणि त्यांनी-धान्य बँक सुरू केली. आज या धान्य बँकेचे भांडवल 52 मण झालेले असून गावातील कोणाही व्यक्तीला सावकाराकडून भरमसाट व्याजाने धान्य कर्जाऊ घ्यावे लागत नाही.
विद्यापीठ-कार्यकर्त्यांच्या सतत प्रयत्नांमुळे घरादाराच्या स्वच्छतेकडे लोकांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. जुन्या काळच्या सुसंस्कृत घराप्रमाणे येथील बायका आपल्या दारापुढे सडा रांगोळी करतात तेव्हा सालपेवाडीने संस्कृतीचा एक टप्पा गाठला आहे ही गोष्ट स्पष्ट दिसते. 1953-54 सालचे कोल्हापूर जिल्ह्यांतील आदर्श खेडे म्हणून पहिल्या नंबरचे 200 रुपयांचे बक्षीस सालपेवाडीला मिळाले आणि पुढील साली वृक्षारोपणाबद्दलही 200 रुपयांचे बक्षीस या खेड्याने पटकावले.
खेड्या-पाड्यातून पिण्याच्या पाण्याची टंचाई असणे हा जणू भारतीय खेड्यांचा स्थायी भावच आहे. 50-60 इंच पाऊस पडणाऱ्या सालपेवाडींतही स्वच्छ पाण्याची टंचाई होतीच. एका गलिच्छ डबक्यांतील पाणी गावचे लोक भरीत असत. परंतु स्वच्छतेची कल्पना येताच लोकल बोर्डाच्या मदतीने त्यांनी एक पक्की विहीर बांधून काढली आणि तिच्यावर रहाट बसविण्यात आले. सर्व लोकांनी रहाटानेच पाणी काढले पाहिजे असा नियम करण्यात आला आहे. यामुळे पिण्याचे पाणी गढूळ होत नाही व नारूसारख्या रोगापासूनही गावाचा बचाव होतो.
वस्तुतः या विहिरीचे पाणी हरिजनांनाही पुरले असते. परंतु यासाठी त्यांना सबंध गावाची टेकडी ओलांडून यावे लागले असते. म्हणून टेकडीच्या दुसऱ्या बाजूस, हरिजन वाड्याशेजारी आणखी एक पक्की विहीर लोकल बोर्डाच्या मदतीने बांधण्यात आली. अशा प्रकारे या छोट्याशा गावाला दोन सुंदर विहिरी मिळाल्या. आज जरी हरिजनांच्या विहिरीवर सवर्ण लोक पाणी भरीत नसले तरी थोड्याच दिवसांत अस्पृश्यतेची भावना नष्ट होऊन ती विहीर सर्वांच्या वापरात येईल अशी लक्षणे दिसत आहेत.
शतकानुशतकाची जडता जसजशी नष्ट होऊ लागली, तसतशी नवनवीन ज्ञानाची तहान वाढू लागली. आपल्या छोट्या गावाबाहेरचे जग केवढ़े आहे, तेथे काय काय चालते, इतरांच्या माहितीचा व अनुभवाचा फायदा आपल्याला कसा घेता येईल, वगैरे विचारांतून पुस्तकी शिक्षणाबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि साक्षरतेचे वर्ग सुरू झाले. आज या गावातील पुष्कळ पुरुष साक्षर झालेले असून त्यांच्यात वर्तमानपत्रे व पुस्तके वाचण्याची गोष्टी निर्माण झालली आहे. त्यांची ज्ञानपिपासा तृप्त करण्यासाठी मौनी विद्यापीठाच्या मदतीने तेथे एक पुस्तकालयही चालविण्यात येते.
सालपेवाडीशेजारी 80 एकर गुरचराईचे सरकारी रान असून पूर्वी ते लिलावाने देण्यात येत असे. त्या वेळी गावातील किंवा परगावचा कोणी पैसेवाला भरसमाट किंमतीला तो लिलाव घेत असे आणि मग गावच्या लोकांना नाडून त्या रानातील गवत वाटेल तितके महाग विकत असे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी गावकरी मंडळींनी सामुदायिकपणे ते रान मिळविले आणि सोसायटीच्या सभासदांना त्याचे तुकडे पाडून दिले. याचा परिणाम असा झाला की, पूर्वी जेवढ्या गवतासाठी एका माणसाला 20 रुपये द्यावे लागत तेवढेच गवत त्याला आता 2 रुपयांस मिळू लागले.
अशा प्रकारे नवीन नवीन अनुभव घेत आणि शहाणे होत सालपेवाडीकर पुढे जात आहेत. त्यांनी गावचे रस्ते दुरुस्त केले, जोडरस्ते (अॅप्रोच रोड्स्) बांधले, कंपोस्टचे खड्डे भरले, जपानी भातशेती केली, फळझाडे लावली, परंतु त्यांच्या गावाला सार्वजनिक बैठकीची अशी जागा नव्हती. देऊळ गावा बाहेर आणि फार लहान होते. गावात चावडी नव्हती, तालीम नव्हती, सोसायटी, धान्य बँक यांना जागा नव्हती, बाहेरचा कोणी माणूस आला तर त्याला उतरता येईल किंवा निवांतपणे तास दोन तास बसता येईल, असे ठिकाण नव्हते. वयात आलेल्या पण अविवाहित तरुणांना सुखाने झोपता येईल अशी पडवी नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या परिश्रमाने एक ग्राममंदिर बांधण्याचे ठरविले आणि सतत 2 वर्षे धडपड करून यंदाच ते पूर्ण केले. सुमारे 5,000 रुपये किमतीच्या या ग्राममंदिरात एक तालीम व एक अतिथिगृह (एका खोलीचे) असून सोसायटी व धान्य बँक यांना उपयोगी पडेल असा प्रशस्त सोपा आहे. पुढे मागे पैसा जमल्यास या इमारतीवर दुसरा मजला चढवावा असाही ग्रामस्थांचा विचार आहे व त्या बेतानेच पाया व भिंती यांची योजना करण्यात आलेली आहे.
या इमारतीला प्रत्यक्ष खर्च सुमारे 25,00 रुपये आलेला असून अडीच हजार रुपयांचे श्रमदान मिळालेले आहे. गावाने मिळविलेली दोन-दोनशे रुपयांची दोन बक्षिसे या इमारतीसाठीच वापरण्यात आलेली असून गोपुरी संडासासाठी मिळणाऱ्या सरकारी मदतीच्या रकमेतून काही भाग श्रमदानाच्या द्वारे वाचवावा व या इमारतीसाठी तो वापरावा, असे गावकऱ्यांनी ठरविले आहे. जागृत गाव काय करू शकतो हे ज्याला पाहावयाचे असेल त्याने सालपेवाडीचे हे ग्राममंदिर अवश्य पाहावे.
*
ग्राममंदिराचे काम हातावेगळे होते न होते तोच दुसरे एक फार महत्वाचे कार्य हाती घेण्याचे सालपेवाडीने ठरविले आहे. ते म्हणजे गोपुरी संडासांचे!
जोपर्यंत भारतातील खेडूत मलमूत्राच्या उपयुक्ततेवर लक्ष केंद्रित करणार नाही, तोपर्यंत त्याला समृद्धी प्राप्त होऊ शकणार नाही. या बाबतीत सरकारमार्फत प्रत्येक गावात एखाद-दुसराच संडास बांधण्यात येतो. त्याचा परिणाम असा होतो की त्या संडासावर अतोनात ओझे पडून तो कुचकामी बनतो; इतकेच नव्हे, तर गलिच्छता व अनारोग्य यांना कारण बनतो. म्हणून दर 20 माणसांना एक संडास या प्रमाणात गावाच्या वेगवेगळ्या भागात 25 गोपुरी संडास बांधण्याचे सालपेवाडीकरांनी ठरविले आहे. त्यासाठी सरकारकडून 5 हजार रुपयांची मदत मंजूरही झालेली आहे. हे संडास जेव्हा व्यवस्थित चालू होतील तेव्हा दरसाल सुमारे 25 ब्रास सोनखत गावाला मिळेल. त्याचे मिळणारे 1500 रुपयांचे उत्पन्न अनेक लोकोपयोगी कामासाठी वापरता येईल.
या खेरीज गावासभोवार एक गोल रस्ता तयार करून त्याला गावातील सर्व गलपा नेऊन जोडणे आणि गारगोटीपासून पुष्यनगरपर्यंत जाणाऱ्या हमरस्त्यापैकी सालपेवाडीजवळील दीड मैल लांबीचा रस्ता तयार करणे ही दोन मोठी कामे सालपेवाडीकरांनी योजिलेली आहेत. त्यांचा उत्साह व कार्यशक्ती पाहता ते ही कामे यशस्वीपणे पार पाडतील, यात मुळीच शंका नाही.
Tags: Gram Mandir Mauni University Village Development Salpewadi ग्राममंदिर मौनी विद्यापीठ ग्रामविकास सालपेवाडी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या