डिजिटल अर्काईव्ह

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपर फुटीनंतर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेने विद्यार्थी पालक हवालदिल झाले. त्यातच सरन्यायाधीशांनी या तरुणांना 'कॉक्रोच' संबोधलं आणि तरुणांचा एक झंझावात निर्माण झाला. अभिजीत दिपके या तरुणाने पुढाकार घेतला. सोनम वांगचुक यांच्यासारखा स्कॉलर सोबत आला आणि जंतर-मंतर पुन्हा एकदा संसदेला धडका देऊ लागलं. तीन दिवस दिल्लीत जे घडलं ते या देशातल्या हुकूमशाहीला सुरुंग लावणारं आहे. त्याचाच हा रिपोर्ताज.

19 जुलै 2026

जंतर-मंतरवरील तरुणाईचा ओघ वाढत होता, तेवढाच तणावही वाढत होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलैला संसदेवर मोर्चा जाहीर झाला होता. तरुण-तरूणींमध्ये उत्साह होता. जथ्या जथ्याने लोक घोषणा देत येत होते. आत जायलाही जागा नव्हती. स्थिती अशी उद्भवली होती की, जराशी चूक भयानक ठरली असती.

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणाच्या 22 व्या दिवशी जबरदस्तीने उचलून नेलं. वांगचुक यांच्या उपोषणाने या आंदोलनाला एक अधिष्ठान मिळालं होतं ही गोष्ट सत्य आहे. त्यामुळे त्यांना इथून बाजूला केल्यास या आंदोलनातील हवा जाईल, 'झुरळं' नंतर ठेचता येईल, असा सरकार आणि पोलीस यांचा कयास होता. 18 जुलैला सकाळी पोलिसांनी कारवाई केली. आंदोलक नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी इतरत्र पांगले होते. स्वतः अभिजीत स्टेजवरून खाली उतरला होता. तीच वेळ साधत साध्या वेशातील पोलीस (की गुंडे?) धडाधड स्टेजवर चढले. पांढऱ्या चादरींनी सोनम वांगचुक यांना घेरलं. वांगचुक झोपले होते त्याच चादरीची झोळी करत त्यांना उचलून घेऊन गेले. 22 दिवस उपोषण करणारे सोनम गलितगात्र अवस्थेत होते. त्यांना सफदरजंग सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जबरदस्तीने दाखल, नव्हे बंदिवान केलं गेलं.

जंतर-मंतर काही काळ या धक्क्यात होतं. आता पुढे काय ? असा आंदोलनासमोर प्रश्न होता, एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी 'आंदोलन सुरूच राहील' असं जाहीर केलं. या आंदोलनाचा प्रणेता अभिजीत दिपके याच्या पाठीशी त्या ठाम उभ्या राहिल्या. सोनम वांगचुक ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते, त्याच्याच बाजूला गादी टाकत अभिजीत दिपके याने उपोषण सुरू केलं. शीतल आणि सौरव हे दोघेही साथी उपोषण करत होते. जंतर-मंतरच नव्हे तर देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं.

संसदेवरील मोर्चाबाबत वातावरण अधिक उत्साही बनलं. वांगचुक यांच्यावरील कारवाई फसली होती. दुपारपासून गर्दीचा ओघ सुरू झाला. पोलिसांनी अर्थात बॅरिकेट्स लावली होती. जंतर-मंतर रोडवर पोलिसांची कुमक वाढली होती. त्यांनी गाड्या आणून तैनात केल्या होत्या. कमालीचं दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र तरुणांचे जथ्थे थांबत नव्हते. स्टेजवर गर्दी होतीच, पण समोर दूरवर खचाखच माणसं जमत होती.

त्वेषाने घोषणाबाजी सुरू होती. डफ वाजवत कुणी गाणी म्हणत होते. हातात वेगवेगळे बॅनर, पोस्टर घेऊन लोक तासंतास उभे होते. योगेंद्र यादव आणि इतरांनी सतत आवाहन केल्यानंतर लोक कसेबसे खाली बसले. रात्री उशिरापर्यंत हा माहौल होता.

बाहेर रस्त्यावर पोलीस, राखीव दल, दंगल नियंत्रण पथक, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, इतर दलं, पाण्याचे फवारे मारणारं वाहन, असा सगळा जामानिमा होता. यातच अभिजीत दिपके याने एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला. जंतर-मंतरच्या रस्त्यावर दगड आणि विटांचे तुकडे भरलेला एक डम्पर पोलिसांनी आणून ठेवला होता. सकाळी काय होणार याचं भयाण चित्र दिसत होतं. मात्र सर्व मुला-मुलींच्या चेहऱ्यावर निर्भयता दिसत होती. जणू येईल त्या आव्हानाला तोंड द्यायला ते सज्ज झाले होते.

20 जुलै 2026

आजचा दिवस आंदोलनाच्या कसोटीचा होता. भल्या सकाळी मी, ज्येष्ठ संपादक निखिल वागळे, व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव आम्ही जंतर-मंतरवर पोहोचलो. त्या तीन-चार किलोमीटरच्या परिसरात आंदोलन स्थळी चालत निघालेले तरुण-तरुणी दिसत होते. आंदोलन स्थळापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. मात्र गर्दी थांबत नव्हती. शबाना आझमी, प्रकाश राज ही मंडळी स्टेजवर आली. गीतांजली आल्या. विविध पक्षांची अनेक नेते मंडळी होती. भाषणं सुरू होती. तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आमदार आतिशी, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग, कम्युनिस्ट नेते अशी रेलचेल सुरू झाली. यातच खासदार चंद्रशेखर आझाद यांची एंट्री झाली तेव्हा तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला.

संसदेवर मोर्चा सकाळी 9 वाजता निघणार होता. पण मोर्चा कधी निघणार हे स्पष्ट होत नव्हतं, काहीशी अनिश्चिती पसरली होती. तरुणांचा लोंढा काही थांबत नव्हता. सरकारने रस्ते बंद करायला घेतले. येणारे लोक बाहेरच्या अडचणी सांगत होते. सरकारने दिल्लीत येणाऱ्या ट्रेन दिल्लीच्या बाहेरच थांबवल्या, पाच-सहा तास उशिरा केल्या. एवढंच नव्हे तर मेट्रो जंतर-मंतरच्या जवळपासच्या स्टेशनवर थांबत नव्हत्या. तरीही चालत चालत लोक आंदोलन स्थळी पोहोचत होते. वेळ वाढत होता तसे अनेक लोक संसद मार्गावर थांबून मोर्चाची वाट बघत होते.

रात्री अनेकांनी तिथेच मुक्काम केला होता, तर काही पहाटेपासून येत होते. गर्दी एवढी होती की, घामाने अंग थबथबून गेलं होतं. मोर्चा निघाला तर पोलिसांनी काय काय बंदोबस्त केलाय याची माहिती येत होती. त्यामुळे सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं होतं. पण या जमावाला थांबवायचं कसं हा प्रश्न होता. स्टेजसमोर आणि मागे साधारण वीस-वीस हजारांचा जमाव होता. चर्चा-मीटिंग सुरू होत्या. 10 वाजून गेले आणि जमावाचे नारे बुलंद होऊ लागले...

यातच सायरन वाजवत एक अ‍ॅम्ब्युलन्स त्या प्रचंड जमावामधून स्टेजकडे येऊ लागली. त्या रेटारेटीत लोकांनी रस्ता करून दिला. सगळ्यांना वाटलं सोनम वांगचुक यांना आणलं गेलं. उत्साही वातावरण पसरलं. अ‍ॅम्ब्युलन्स अगदी स्टेजसमोर आणून पुन्हा माघारी फिरवण्यात आली. त्यात दोघे जण बसले होते, ते फिदीफिदी हसत होते. सगळे भडकले होते. मात्र अ‍ॅम्ब्युलन्सला परत जाऊ द्या, कुणी काही करू नका, असं आवाहन करण्यात आलं. आंदोलकांचा संयम वाखाणण्याजोगा होता. चेंगराचेंगरी करण्याचा हा पोलिसांचा डावही उधळला गेला होता.

अखेर अभिजीतने माईक घेत लोकांना परिस्थिती काय आहे हे सांगितलं. मग सगळ्यांना विचारलं की, मोर्चा काढायचा का? बस्स... एकमुखी घोषणा सुरू झाली... संसद संसद संसद...

'मोर्चा काढायचा पण कुणीही कायदा मोडायचा नाही', असं आवाहन गीतांजली यांनी केलं. भोंगा लावलेला एक ट्रक मागच्या बाजूला संसदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर तयार होता. त्यावर अभिजीत, गीतांजली, शबाना आजमी, प्रकाश राज आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासहित कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते बसले. साधारण 11 वाजता जल्लोषात मोर्चा सुरू झाला. मात्र अर्धा किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी बॅरिकेट लावले होते. आता काय होणार हा प्रश्न उभा राहिला. पोलिसांनी मोठी कुमक उभी केली होती. काही वेळाने बॅरिकेट्स जवळ त्यांनी लाठीचार्ज सुरू केला. अचानक हल्ला सुरू झाला. डोक्यात काठ्या मारल्याने अनेक मुलं-मुली रक्तबंबाळ झाली. 'मुलांवर हल्ला करू नका, हे योग्य नाही...' असं माइकवरून आवाहन केलं जात होतं. पण ऐकतील ते पोलीस कसले ?

यातच महिला पोलिसांची मोठी फौज पुढे आली. प्रसंग बाका होता. 'मुलींनो पुढे या' असं माइकवर सांगितलं गेलं. पण पोलीस एवढे आक्रमक होते की समोर लहान मुली आहेत याचं भान उरलं नाही. संतापलेल्या तरुणांनी बॅरिकेट्स पाडली. लोक पुढे सरकले. ट्रक थोडा पुढे निघाला. पण दुसरं बॅरिकेट उभारलेलं होतं, तिथले पोलीस काठ्या सरसावत जमावावर तुटून पडले.

आंदोलक जखमी होत असतानाच पोलिसांची एक तुकडी ट्रकवर हल्ला करू लागली. 'हल्ला करू नका', शबाना आजमी ओरडून सांगत होत्या. पण त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न झाला. प्रकाश राज यांनाही काठीने मारण्यात आलं. गीतांजली यांचे केस धरून त्यांना खेचण्यात आलं. मग पोलिसांनी ड्रायव्हरला खाली खेचलं. काही पोलीस ट्रकवर चढून अभिजीतसहित सगळ्यांना खेचून खेचून खाली ढकलू लागले. पोलिसांनी ट्रकच्या टायरची हवा काढली. ध्वनिक्षेपक यंत्रणा काढून टाकली. प्रसंग मोठाच अडचणीचा होता. मात्र तिथल्या तरुणींनी धैर्याने पुढे होत या सगळ्या मान्यवरांभोवती कडं केलं. तरुणांनी पोलिसांना मागे रेटत नेलं. कुणाचं डोकं फुटलं होतं, कुणाचे हात-पाय फॅक्चर झाले होते, रक्तबंबाळ होऊन रक्त सांडलं होतं. मुलींवर काठ्या पडू नयेत यासाठी पुढे आलेल्या नागपूरच्या भरत बाणाईत या तरुणाला पोलिसांनी घेरलं. 'मारो, मार डालो हमको...' असं तो ओरडला. मध्य प्रदेशातील अनिल सिंग यांचं डोकं फुटून रक्त वाहत होतं. पण तो डगमगला नाही. 'गद्दारों मेरे सीने पे गोली चलाव... डरेंगे नाही...' असं पोलिसांना ओरडून सांगत होता. अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली. पोलिसांच्या तुकड्या मागे सरकल्या.

कार्यकर्त्यांना जायबंदी करत पोलिसांनी मोर्चा अडवून धरला. यानंतर सरकारने आंदोलकांना चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे, असा निरोप आला. प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलीस संसदेत घेऊन गेले. आता ते आल्यावरच पुढील निर्णय होणार होता.

तिकडे संसद परिसरात रण माजलं होतं. जी मुलं मोर्चापर्यंत पोहोचली नव्हती ती संसद मार्गावर वाट पाहत होती. पोलीस त्यांना हटवायला लागले. अखेर ही मुलं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे निघाली. साधारण तीन-चार हजार तरुण-तरुणींचा तो मॉब होता. संसदेच्या अगदी काही अंतरावर बॅरिकेट्सपर्यंत ते पोहोचले तेव्हा पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांसोबत बहुदा बजरंग दल, विहिंपचे गुंड काठ्या घेऊन आंदोलकांवर तुटून पडले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या हल्ल्यात जखमी झालेली एक मुलगी वेंटिलेटरवर आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बंदुकीतून छऱ्यांचा मारा सुरू केला. यात अनेक लोक जखमी झालेत. इर्षाद अंसारी या तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन शरीराची चाळणी झाली आहे.

दुसऱ्या बाजूला कॅननॉट प्लेस या ठिकाणीही अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना घेरून घायाळ करण्यात आलं. सुमारे 180 विद्यार्थी यात जखमी झाले. तरुण-तरुणींवरील या अमानुष हल्लयाचे देशभर नव्हे तर जगभर पडसाद उमटले.

21 जुलै 2026

दिवस उजाडला तोच मोदी सरकारवरील संतापाचा पारा चढवत. विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने हल्ला झाला हे जगाला कळलं होतं. सोशल मीडियावर हा एकच विषय ट्रेंडिंगला होता. सरकारने हे आंदोलन चिरडून तरुणांना धडा शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र झालं ते विपरीतच. महिनाभर आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा बेदकारपणा अंगलट आला. आता दोन्ही ठिकाणी वेगाने घटना घडल्या. एक म्हणजे जंतर-मंतर आणि दुसरं म्हणजे संसद.

पोलिसांनी आंदोलन स्थळी सगळी नासधूस केली होती. पण त्या स्थितीतही तरुण-तरुणींनी रात्र काढली. सकाळी पुन्हा ओघ सुरू झाला. आणखी त्वेषाने लोक येत होते. सोनम वांगचुक यांनी इस्पितळात उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र अभिजीत दिपके यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय गीतांजली यांनी जाहीर केला. सकाळपासून घोषणा देत लोक येत होते. जखमी झालेली मुलं दिसत होती. डोक्याला बँडेज, हाता-पायाला पट्ट्या लावलेली, नीट चालता न येणारी मुलं दिसत होती. वांगचुक यांना पोलिसांनी उचलून नेल्यानंतर जसे लोक आले, तसेच पोलिसांच्या अत्याचारानंतर अधिक मोठ्या संख्येने लोक येत होते.

काही मुलांना मी याबाबत विचारलं, तर त्यांचं म्हणणं होतं की, 'आमच्या मागण्यांसाठी जर आमचे साथी घायाळ होत असतील तर आम्ही घरी बसणं हा गुन्हा आहे... आता काही होवो आम्ही इथेच यांच्यासोबत राहणार...' ही मुलं पोलिसांना फुलं देत होती, पाणी देत होती. या पिढीचं किती कौतुक करावं? कॉम्प्युटर, गॅझेट मध्ये डोकं खुपसून बसणाऱ्या य पिढीला आपण आत्मकेंद्री म्हणत असतो. पण त्यांची प्रगल्भता आणि संवेदनशीलता पाहताना डोळ्यात पाणी येत होतं.

जंतर-मंतरवर आता धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. युवकांच्या हातातल्या पोस्टरवर मोदीही झळकू लागले. त्या तणावातही पोस्टर्स आणि त्या एकेक घोषणा पाहून हसू येत होतं.

तिकडे संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले होते. लोकसभेत या विषयावर चर्चा करण्यास, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हतबलता दाखवल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांनी थेट 7 रेसकोर्स हे पंतप्रधानांचं निवासस्थान गाठलं.

मे 2013 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अशाच पद्धतीने पंतप्रधान निवासावर चाल करून आले होते. तोच अनुभव आता नरेंद्र मोदी यांना घ्यावा लागत होता. मोदींच्या अहंकाराला तिथेच सुरुंग लागला होता. रस्त्यावरच राहुल, प्रियंका आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठिय्या दिला. विरोधकांचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होतं. मात्र त्याचा आवाज मोदी सरकारच्या कानठळ्या बसवणारा होता. पोलिसांनी मग राहुल, प्रियंका यांना कशा पद्धतीने ताब्यात घेतलं तो थरार अख्ख्या देशाने अनुभवला.

दुसऱ्या दिवशीची राहुल गांधीची पत्रकार परिषद मोदी सरकारचे वाभाडे काढणारी आणि बोलती बंद करणारी होती. मीडिया बदललेला पाहायला मिळाला. आता हे वादळ सहजी थांबणारं नाही.

"जब सडके खामोश हो जाती है, तो संसद आवारा हो जाती है..." असं लोहिया म्हणत होते.

साने गुरुजी म्हणाले होते... "इथून तिथून सारा पेटू दे देश...
सुरुवात झालीय ! सामील व्हा !

ताजा कलम :

हा अंक छापायला जात असताना (24 जुलै) सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवलं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल आदर आहे. उपोषण संपवणं हे प्रकृतीसाठी योग्यच ! पण हा निर्णय घेताना त्यांनी अभिजीत दिपके आणि इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं होतं का हा प्रश्नच आहे.

राहुल गांधी यांचं पंतप्रधान निवासाबाहेरील आंदोलन हे प्रामाणिक नव्हतं, असं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली म्हणाल्या. आता मध्यरात्री जे.पी. नड्डा या मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडवणं ही पारदर्शकता आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. हे अतार्किक आहे.

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आंदोलकांनी नड्डा यांच्यासोबत चर्चा केलीय. अभिजीत आणि सहकाऱ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं जाहीर केलंय.

सरकार कात्रीत सापडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. मध्यरात्री ते व्हिडिओ बनवू लागलेत. आतापर्यंत आपल्याच मस्तीत राहणारे सेन्सॉरशिप झुगारणाऱ्या जनरेशनच्या तावडीत सापडलेत. पुढचे काही दिवस कसोटीचे आहेत.

या आंदोलनाचं लोण आता देशात पसरलंय. ते आता कॉक्रोच पार्टीच्याही हातात राहिलेलं नाही, ते जनआंदोलन झालंय. यंत्रणेत परिवर्तनासाठी तरुण रस्त्यावर उतरलेत. पुढे काय होणार याबाबत उत्सुकता आहेच.

लोहिया म्हणाले होते की...


पोलीस इतके क्रूर का ?

पोलिसांनी संसद रोडवर मोर्चा अडवला, लाठीमार केला. सगळं अनिश्चित होतं. मग सरकारशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधींना घेऊन गेले. लोक हळूहळू दुसऱ्या मार्गाने जाऊ लागले. गर्दी विरळ झाली. नेटवर्क नव्हतं. निखिल वागळे, मी आणि व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव तिथेच लोकांशी बोलत होतो. पोलीस पथकं येऊन जात होती. एवढ्यात एक पथक तिथे आलं आणि उभ्या असलेल्या मुलांवर लाठीचार्ज सुरू केला. आम्हालाही धक्का मारू लागले. मुलांना मारतायत हे बघून निखिल वागळे अधिकाऱ्यावर ओरडले. “तुम्ही मुलांना का मारताय", असं विचारताच पोलिसांनी आम्हाला धरलं. एक अधिकारी धक्का मारत असताना वागळेंनी सांगितलं की, मी पत्रकार आहे. तो म्हणाला, "आयकार्ड दिखाव." वागळे म्हणाले, “तुमची नेमप्लेट कुठाय?" मग त्याने अंगावरचं चिलखत काढलं. त्याचं नाव सचिन शर्मा होतं. वरिष्ठ अधिकारी होता. त्याच्या चेहऱ्यावर खुनशीपणा दिसत होता. वागळे आणि आमचा एकूण पवित्रा पाहून, माफी मागत तो तिथून निघून गेला. वागळेंनी हस्तक्षेप केला नसता तर अनेकांना त्याने जायबंदी केलं असतं.

पंतप्रधान निवासाबाहेर राहुल गांधी आणि विरोधकांचा सत्याग्रह सुरू असताना तिथेही खुमखुमी असलेला हाच सचिन शर्मा होता. राहुल गांधींना उचलताना चेहऱ्यावर बहुदा त्यानेच पंच मारला असावा. नाकातून रक्त येत असताना राहुलना त्यांनी जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबलं. हा खुन्नस कसला म्हणावा ?


दोन पिढ्यांतील संघर्ष

जंतर-मंतरवर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे अनेक मुलं घरच्यांचा विरोध डावलून तिथे आली होती. विशेषतः मुली. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या मुली तिथे होत्या. एका मुलीच्या आई-वडिलांना कळलं तेव्हा ते तिला म्हणाले, "तू मुस्लीम लोगोंका साथ देने गयी है क्या? हम रिश्ता तोड देंगे..." ही मुलगी रडत म्हणाली, "मेरे पापा बीजेपी के चमचे है..."

मुंबईची एक मुलगी दिल्लीत शिकायला आलीय. ती आंदोलनात आली म्हणून घरच्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलंय. "मी शिकतेय, पण आता इथेच नोकरी शोधेन. मी व्हिडिओ एडिटिंग करते, तसं काम शोधेन." ज्यांच्या घरात धार्मिक उन्माद आहे त्यांची मुलं आता त्यात फसायला तयार नाहीत.


सत्य उमगतं तेव्हा...

इथे असंख्य मुलं अशी आहेत त्यांनी पहिलं मत भाजपला दिलंय. एका मुलाचा हात फॅक्चर झालाय. तो सांगतो, "ज्या बोटाने मी यांना मत दिलं तेच बोट त्यांनी मोडलं. हा मला धडा आहे." असंख्य मुलांची हीच कहाणी आहे.

तिथे एक माणूस आला होता. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने त्याचा मुलगा अस्वस्थ झालाय, याची त्याला काळजी आहे. पाच लाखांचं कर्ज काढलं होतं. हा माणूस भाजपचा पदाधिकारी आहे. तो म्हणतो, 'हे सरकार घालवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.'


जंतर-मंतरवरचा वांगडू

एवढी गर्दी झाली होती की लघवीला कुठे जायचं असा प्रश्न होता. सरकारी शौचालयाची अवस्था बिकट होती. महिलांचे तर हाल होत होते. मी तर कमी पाणी पीत होतो.

या समस्येवर एका तरुणाने पर्याय शोधून काढला होता. त्याने एक टेंट लावून 'रिलीफ पॉइंट' तयार केला होता. त्याने टेंटमध्ये पॉलिमरच्या अनेक छोट्या बॅग केल्या होत्या. त्यात लघवी केल्यास पॉलिमर सगळं शोषून घेतं. वास नाही की दुर्गंधी नाही. जंतर-मंतरवरचा फुंसुक वांगडू म्हणून त्याचं कौतुक होत होतं.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके