डिजिटल अर्काईव्ह

या खेपेला सर्व विपरीत घडले. या चढाईला रणगाड्यांनी प्रत्युत्तर देण्याऐवजी आभाळातून एक भिरभिरे आले. हे कोण? काय करणार? याला अडवायचे का ? ते कसे ? एवढ्या ठिपक्यासारख्या वस्तूवर तोफ कशी झाडायची? असा विचार आर्मेनियन सैनिक करतात, तोच थंडरबोल्ट म्हणावे असे काहीतरी शस्त्र एका रणगाड्यावर येऊन आपटले. स्फोट झाला. आग लागली. रणगाडा निकामी झाला. हे पाहून इतर सैनिक अवाक झाले. पण विचाराला आणि चर्चेला फुरसत नव्हती. एकापाठोपाठ एक रणगाडा आभाळातून येणाऱ्या अस्त्राचा बळी झाला. होत्याचे नव्हते झाले. आजपर्यंत अभेद्य वाटणारे रशियन रणगाडे निरुपयोगी ठरले. काय होते हे नवीन हवाई शस्त्र ?

 

अवघ्या 36 तासांत कल्पना मूर्त स्वरूपात आली. पुढची रात्र संपेपर्यंत चार भिरभिरी घेऊन लोक सुएझ पार करून गेलेसुद्धा. उजाडले तोवर एक खेळणे आभाळात उडाले. टेकडीपलीकडे गेले. परत फिरले. आणि ते टेकडीच्या माथ्यावर क्रॅशलँड झाले. पश्चिम उतारावर. म्हणजे तेथे जाऊन आणणे अशक्य. मग दुसरे हेलिकॉप्टर उडवले. टेकडीपल्याड गेले. काम करून परत आले. ठरविलेल्या जागी उतरले. बरोबर पोर्टेबल फिल्म डेव्हलपर आणला होता. डोक्यावर काळे पांघरूण घालून तज्ज्ञाने फिल्म धुतली. कमांडरला दाखवली. त्याचा चेहरा फुलला.

आज जगात अनेक युद्धे चालू आहेत. (म्हणून अध्यक्ष ट्रम्प यांना शांतिदूत होण्यासाठी खूप संधी आहेत.) यांपैकी काही युद्धे दुर्लक्षित आहेत. उदाहरणार्थ, सुदान (बंडाळी) आणि कांगो (बंडाळी). उलट काहींवर प्रसिद्धी माध्यमांचे फार लक्ष आहे. उदाहरणार्थ, इस्रायल (हमास) आणि युक्रेन (रशिया). अशा प्रत्येक युद्धाकडे देशोदेशींच्या अभ्यासकांचे बारीक लक्ष असते. त्या त्या ठिकाणच्या घटनांमधून आपल्या देशाला कोणते धडे घेता येतील, हा प्रश्न प्रत्येकासमोर असतो.

युक्रेन युद्धामध्ये एका लहान देशाने त्याच्या दसपट आकाराच्या देशाविरुद्ध दाखवलेली धडाडी जग बघत आहे. या लढाईमध्ये युद्धशास्त्राचा एक नवा आयाम विकसित होत आहे. तो म्हणजे ड्रोन वॉर फेअर. या नव्या पैलूची अगदी प्राथमिक, पण महत्त्वाची तोंडओळख करून देण्यासाठी हा लेखप्रपंच. या महाभारताचे निदान चार तरी स्वाभाविक अध्याय आहेत. पहिला अध्याय म्हणजे ड्रोन कल्पनेचा जन्म. दुसऱ्या अध्यायात येते ड्रोन वापरून रणगाडा दलाचे केलेले पानिपत. तिसरा अध्याय म्हणजे ड्रोनच्या उपयोगाने हवाई हल्ल्याविरुद्ध रचलेली रडार यंत्रणा मोडीत काढणे. अखेरचा चौथा अध्याय म्हणजे ड्रोन वापरून महान शक्तिशाली हवाई दलाला लगाम घालणे. यांपैकी पहिला आणि चौथा अध्याय कथारूपात सांगत आहे. जागेची मर्यादा ध्यानात घेऊन इतर दोन अध्याय अगदी त्रोटक स्वरूपात सांगत आहे.

पहिला अध्याय

काळ : मार्च 1969. 
स्थळ : सुएझ कालवा उजवा काठ. पूर्व बाजू. 
वेळ : 15 तारखेची मध्यरात्र.

इस्रायली डिफेन्स फोर्स कॅप्टन डेव्हिड लेव्ही नेहमीप्रमाणे मध्यरात्रीच्या फेरफटक्याला बाहेर पडला. बरोबर 2-4 सहकारी. सगळे गप्प गप्प.

गेला आठवडाभर तोफांच्या माऱ्यापासून वाचणे एवढाच एककलमी कार्यक्रम चालू होता. रात्री खंदक खणणे आणि दिवसा आतमध्ये लपणे. स्फोट झाला की, वाळूचा मोठा ढीग हवेत उडून पुन्हा खाली. जवळपास असलात तर केसांत, नाकातोंडात सगळीकडे वाळू. धुंकणार तरी किती वेळा ?

तोफांचा मारा तसा अचूक वगैरे मुळीच नव्हता. दहांतला एक गोळा खंदकाच्या जवळ पडला तर पडला. शंभरांतला एखादा नेमका खंदकात पडणार.

त्या वेळी तुम्ही आत असलात तर गच्छंती. म्हणून रोज नवे खंदक खणायचे. स्फोटांनी पडलेले खड्डे वाढवून सहा फूट लांब आणि चार फूट रुंद खंदक बनवायचा. जागा निवडीची अशी पद्धत का? आमच्या लोकांना अरबांची हालचाल दिसत नव्हती आणि त्यांना आमची. कारण सुएझ कालव्याच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर एक वाळूची नैसर्गिक टेकडी होती. 40 फूट उंच आणि लांबच लांब. तिच्या पल्याड अरबी सेना. मग तोफांचा नेम धरायचा कोणावर? सगळेच भगवान भरोसे. पण तोफा आणि दारूगोळा जसा सोविएत रशियाकडचा तसेच तज्ज्ञ सल्लागारसुद्धा त्यांचेच. ते बहुधा म्हणत की, काहीच ठाऊक नसले तर निदान त्याच त्याच जागी परत परत मारा नको.

काल दुपारी जेवणानंतर उन्हामुळे ग्लानी आली असेल किंवा अन्य कारणाने; पण आयॉक आणि लिओ दोघांना डुलकी लागली. तोफगोळ्याचा हवेत उडताना होणारा आवाज ऐकून तो टाळण्यासाठी त्याचा मार्ग हेरून पळायचे, हे झाले नाही. गोळा त्या खंदकातच पडला. आयॉक जागीच खपला. लिओ जायबंदी झाला. कोवळी तरुण पोरे ही. लिओचे अजून लग्नही झाले नव्हते. आयझंकची नववधू मात्र दुर्दैवी. खरं तर त्याची लष्करातील सक्तीची दोन वर्षांची ड्यूटी संपत आली होती. तेवढ्यात दैवाने घाला घातला.

असं काही झालं की, कॅप्टन लेव्हीला डिप्रेशन यायचं. तो घुम्म व्हायचा. त्याला बोलके करण्याची जबाबदारी जणू प्लाटूनने एझा ससूनवर टाकली होती. आता बोलणार तरी काय अशा वेळी ?
"कॅप्टन, पेनी फॉर योर थॉट. काय विचार चाललाय ?"

"विचार कसला कर्माचा? आपण किती काळ असे लॉसेस सहन करू शकणार? सरळ आक्रमणाची संधी मिळती तर बरे झाले असते. पण हा कॅनाल मध्ये आला. इजिप्तचे लोक फार मोठी सेना आणून हल्ला करणार असतील तर नियोजन करून माघार घेता येईल. ही कुचंबणेची अवस्था मला फार छळते."

"त्यांचा प्लॅन कसा उमजणार आपल्याला ?"
"अरे, त्यांच्या हालचाली बघून अंदाज केला असता. पण ही टेकडी येते ना मध्ये ?"
"मग आपण टेकडीवर गुपचूप चढून टेहळणी करू या का?"
"तुला काय वाटते? आम्ही तो विचार केलेला नाही? अरे, नंबर दोन प्लॅटूनचा एक पूर्ण सेक्शन याच कामावर नेमला होता. टेकडीच्या टोकावर गेलेला आपला माणूस त्यांना दिसतो. त्यांचे शार्प शूटर चांगले दिसतात. आपले तीन जण जखमी झाल्यावर कर्नलने नाद सोडला."
"मग आता?"
"वाट बघायची. काहीतरी घडण्याची किंवा वेगळ्या ऑर्डर्स मिळण्याची."
"मी एक शंका विचारू का कॅप्टन ? फक्त कुतूहल म्हणून बरे का."
"विचार. एझा ससून, मोकळेपणाने विचार."
"हे अरब लोक आपल्या जिवावर का उठले आहेत? आपण तर मिळालेल्या भूमीवर शेती, डेअरी, शिक्षण असले निरुपद्रवी उद्योग करत होतो."
"तू भारतातून कधी एमिग्रेट झाला?"
"गेल्याच वर्षी. सगळे सोपस्कार झाले. हाइफाजवळच्या एका कम्यूनमध्ये जागा मिळाली. गोठे धुण्याचे काम शिकू लागलो. तेवढ्यात, लष्कराची नोटीस आली."
"मग नाराज झाला असशील?"
"छे छे! मुळीच नाही. एक तर गाई सांभाळण्याचे काम मोठे आकर्षक होते असे नाही. दुसरे म्हणजे टळायचे नाही ते टाळायचे कशाला? आमच्याकडे भारतात सगळ्यांना अर्जुनाची कथा ठाऊक असते. वेळ आली तर नातेवाइकांवरसुद्धा शस्त्र उभारावे लागते. कर्तव्य करणे महत्त्वाचे."
"एझा, अरे ज्यू धर्माचा माणूस तू. मग हिंदूचे तत्त्वज्ञान कसे सांगतोस?"
"कोणाचे का असेना. पटतंय का? शिवाय, आमच्या पुण्यात आम्हाला कोणी डावा, उजवा वागवत नव्हते. आमची देवळे वेगळी. संस्कार थोडे वेगळे; पण दुरावा नव्हता. इस्रायल आळीमधल्या सिनेगॉगमध्ये मी हिंदू मित्रांना घेऊन जात असे."
"म्हणजे तू छळ टाळण्यासाठी देश नाही सोडलास तर?"
"म्हणून तर मला कोडे पडते की, अरब आपल्या लोकांवर का उठलेले आहेत?"
"ते म्हणतात की, ज्यू लोकांनी आमची जमीन घेतली."
"ते खरे आहे का?"
"अरे, गेली 50-60 वर्षे ज्यू लोक जेरुसलेमच्या आसपास येऊन घरे करत आहेत. अरब लोकांना हुसकावण्याची कल्पना कुणीच करत नव्हते."
"मग दुश्मनी का ?"
"मला वाटते, इंग्रज आणि फ्रेंच यांनी आम्हाला सगळ्यांनाच फसवले."
"ते कसे?"

"पहिल्या महायुद्धाच्या वेळी सगळी अरब भूमी तुर्की लोकांच्या ताब्यात होती. इंग्रजांनी अरब लोकांना चिथावले की, तुर्की लोकांविरुद्ध लढाईत सामील व्हा, तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. इंग्रजानी TE लॉरेन्स नामक तरुण प्रतिभावंत अधिकारी या कामावर नियुक्त केला. त्याने खूप मोठे यश मिळवले. त्याचे 'Seven Pillars of Wisdom' हे पुस्तक वाच."

"आणि इंग्रजी यशस्वी झाले, होय ना?"
"हो. येथे त्यांची दगाबाजी सुरू झाली. साइक्स आणि पिको या इंग्रज आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी करार केला की, युद्धानंतर अरब भूमी दोघा देशांत वाटून घ्यायची."
"मग काय झाले?"
"लॉरेन्सने हाय खाल्ली."
"हो. पण दगाबाजी कशासाठी केली ?"
"त्यांच्या लक्षात आले की, अरब भूमी म्हणजे सोन्याची खाण."
"इथे सोन्याच्या खाणी आहेत?"
"म्हणजे तेल ! अरे, शेकडो वर्षे तेल म्हणजे अडचण होती. पिता येत नाही आणि पेटण्याचा धोका."
"मग काय बदलले ?"
"जर्मनीमध्ये कार्ल बेन्झ याने तेलावर चालणारे इंजिन बनवले. त्याला एका ज्यू व्यापाऱ्याने भांडवल पुरवले. म्हणून त्याच्या गाडीला 'मर्सिडीज' नाव दिले. व्यापाऱ्याच्या मुलीचेच."
"याचा साइक्स पिको कराराशी संबंध काय?"
"फारच घट्ट संबंध आहे. ही इंजिने मोठी झाली. जहाजांना बळ देऊ लागली. पहिल्या महायुद्धाच्या काळात विन्स्टन चर्चिल यांनी सरकारकडे मागणी केली की, आरमारी जहाजांना तेलाची इंजिने हवी."
"त्याचा काय फायदा?"
"दोन मुख्य फायदे. विश्रांती घेणाऱ्या वाफेच्या जहाजाला मोहिमेवर जाण्याचा हुकूम दिला की, प्रथम भट्टी पेटवायची. पाणी उकळायचे आणि वाफ करायची. याला 8 तास लागत होते. तेल इंजिनाचे काय ? हॅन्डल फिरविले की, क्षणात सुरू होते."
"आता दुसरा फायदा असा वाफेवर चालणारे जहाज धुराड्यातून सतत धूर ओकत असते. धुराचा लोट फार दुरून दिसतो. त्यामुळे आरमारी जहाज येत आहे ही गोष्ट गुप्त राहत नाही."
"फायदा कळला. याचा राजकारणावर परिणाम काय ते तरी सागा."
"सांगतो. इंग्लंडचे नेते हिशोब करू लागले की, एवढी आरमारी जहाजे तेलावर चालणार तर तेलाच्या खाणी आपल्या ताब्यात हव्यात. इंग्लंडकडे तेल नाही, फक्त कोळसा. उलट, अरब जमिनीत सगळीकडे तेल. म्हणून अरब भूमीवर स्वामित्व हवे."
"असे आहे हो?"
"आपल्या कारस्थानांचा एक भाग म्हणून इंग्रजांनी अरब आणि ज्यू यांच्यात वाद पेटवून दिला."
"तो कसा?"
"ज्यू समाजाला वेगळी भूमी देऊन. ज्यू लोकांवर सगळ्या युरोपीय देशांनी अत्याचार केले. हिटलरने त्याची परमावधी गाठली. याची भरपाई करायची होती तर द्यायचा होता युरोपचा एक तुकडा वेगळा काढून ज्यू लोकांना."
"पण यांनी तिसऱ्याची जमीन चौथ्याला देऊन आपली देणी भागवली."
"असे आहे होय? मला वाटले, जेरुसलेम वगैरे जुना भाग हवा होता धार्मिक कारणासाठी."

"अरे, ख्रिश्चन लोकांनासुद्धा या भागाचे तितकेच प्रेम आहे. ख्रिस्ताचा जन्म या भागातला ना. म्हणून त्यांना कोणी त्या जमिनीची मालकी देत नाही. मुस्लीम लोकाना मक्का-मदिना यांचे प्रेम. म्हणून इंडोनेशिया त्या भागाची मालकी मागेल का? चीन आणि जपान या देशांत बौद्ध लोक खूप संख्येने आहेत. म्हणून त्यांना कोणी लुंबिनी आणि बोधगयेची मालकी देईल का?"

"खरे हो. पण कॅप्टन, युरोपात सगळीकडे ज्यूद्वेष का आहे आणि होता? हिटलर आणि नात्सी पक्ष हा अपवाद सोडा. पण बाकी सर्व ठिकाणचे काय?"

"मला वाटते, बरीच कारणे असावीत. येशू ख्रिस्ताच्या काळात ज्यू बहुसंख्य होते ना. काही लोक त्यांना येशूचे मारेकरी समजत. मध्ययुगात युरोपमध्ये फार वाईट साथ आली. इतिहासकार तिला 'ब्लॅक डेथ' म्हणतात. लाखो माणसे मेली. एक अफवा उठली की, हा रोग ज्यू लोकांमुळे होतो. मग काय, अनेकांना जाळून मारले. युरोपात त्यांची संख्या अगदी छोटी. अल्पसंख्य गटावर जुलूम करणे सोपे. धोका नाही. या लोकांकडे स्वसंरक्षण करण्याची क्षमता नाही. जुळवून घेणे ही त्यांची पद्धत. मग काय, मनाला येईल ती बंधने घालावीत. घर विकत घेता येत नाही. शेती विकत घेता येत नाही. असे कितीतरी नियम. पर्याय नाही म्हणून ज्यू व्यापाराकडे वळले. धंदा भरभराटला. लोकांना उधारीवर माल घेण्याची सवय. वसुलीला दुकानदार आला की, तो खलनायक वाटे. राजेलोक कर्जे मागत. परतफेड जमली नाही की, सावकाराला तुरुंगात अडकवणे सोपे."

"मग ज्यू लोक आंतरराष्ट्रीय व्यापारात शिरले. नोहा गॉर्डन या लेखकाची फिजिशिअन ही कादंबरी वाच. दरिद्री इंग्लंडच्या पश्चिम टोकापासून पूर्वेला भरभराटलेल्या इराण देशाच्या राजधानी इस्फहानपर्यंतचा प्रवास. लेखकाने या मध्ययुगीन घटनेचे उत्कृष्ट वर्णन दिले आहे. आणि या वाटेवर प्रवास सोपा व्हावा यासाठी ज्यू मंडळींनी कशी आपसांत साखळी बांधली होती तेही कळते.

चिकाटी आणि कष्ट यांच्या बळावर ज्यू लोकांनी डोलारा उभा करायचा आणि इतर लोकांनी तो पाडून लूट करायची. असा सगळा इतिहास. त्यामुळे सर्वांनी निश्चय केला की, आता सौम्यपणा टाकायचा. अंगचे सगळे गुण स्वसंरक्षणाकरता वापरायचे. अखेर, अरब लोकांशी लढाई नशिबी आली."

"कॅप्टन, अंधारात असे भुतासारखं फिरण्याऐवजी आपण कॉलेजमध्ये असतो, तुम्ही इतिहासाचे प्रोफेसर आणि मी विद्यार्थी, तर काय मजा आली असती ना?"
"आशा सोडू नकोस. हे युद्ध संपेल. आपण जिंकू. लगेच खाकी कपडे उतरायचे आणि आवडीच्या कामाला लागायचे."
"कोणास ठाऊक? जगलो वाचलो तरी मी पुन्हा गोठे धुवायला आणि धारा काढायला जाणार."
इतका वेळ फक्त ऐकून घेणारा इयन स्नायडर हसला.
"बरे झाले इतिहासातून वर्तमानात आलात हे. तुम्हाला एक प्रश्न विचारू का?"
'ऑफकोर्स.'
"कॅप्टन, इजिप्तच्या सैन्याच्या हालचालीची टेहळणी जर इतकी महत्त्वाची आहे तर आपण विमानातून का बघत नाही?"
"खरंच की?"
एज्रा ससूनला वाटले, आपल्या मनात हा प्रश्न का आला नाही ?
तोवर कॅप्टनने स्पष्टीकरण दिले.
"अरे, आपल्यासाठी विमान आणि वैमानिक या गोष्टी फार मोलाच्या आहेत बाबा. या कामासाठी विमान फार कमी उंचीवर उडवावे लागते. मग रशियन सॅम त्यांचा घास घ्यायला बसलेलेच आहेत."
"सॅम म्हणजे कोण?"
"सरफेस टू एअर मिसाइल. हा धोका नाही परवडत आपल्याला."

"इतर सैनिकांच्या मानाने शब्ताई बिल हा त्यातल्या त्यात कविमनाचा. स्वप्नाळू. वेगळ्याच पातळीवर उडणारा. अनवट नवकल्पना सांगणारा."
विनोद केल्यासारखी एक कॉमेंट त्याने केली.
"खरे विमान जमत नसेल तर खेळण्यातले विमान वापरावे."

"त्याला चार वर्षांचा पोरगा होता अब्राहाम. म्हणून घरी रोज नवी खेळणी आणायची हा त्याचा छंद. हे वेड. बायको हेना रागवायची. किती हा खर्च? पण लक्ष कोण देतो? अलीकडे असाच एक महागडा खेळ आणला. सगळे तुकडे जोडून बनविले एक बॅटरीवर उडणारे हेलिकॉप्टर. रिमोट कंट्रोलने त्याला उडवायचे, फिरवायचे, जमिनीवर परत उतरवायचे. या काळात अब्राहाम आणि शब्ताई यांची समाधी लागायची."

"या सगळ्याचा लढाईत उपयोग होईल असे कोणाचा मनात आले असते?"
पण कॅप्टन डेविडने कान टवकारले. 'कोण जाणे ही कल्पना वापरून काम होईलही.'
"तुम्ही सगळे परत जा, मी कर्नलकडे जातो."
"आता या वेळी ?"
"हो या वेळी. ही इमर्जन्सी आहे."

कर्नलच्या आशीर्वादाने एक मोटरसायकल डिव्हिजन हेड क्वॉर्टरकडे तातडीने निघाली. कुणी इंजिनिअर सापडला. हेलिकॉप्टरला कॅमेरा जोडायला हवा ना. पण ते जुगाड सगळे काम करेल का? प्रयत्न करू. चान्स घेऊ.

अवघ्या 36 तासांत कल्पना मूर्त स्वरूपात आली. पुढची रात्र संपेपर्यंत चार भिरभिरी घेऊन लोक सुएझ पार करून गेलेसुद्धा. उजाडले तोवर एक खेळणे आभाळात उडाले. टेकडीपलीकडे गेले. परत फिरले. आणि ते टेकडीच्या माथ्यावर क्रॅशलँड झाले. पश्चिम उतारावर. म्हणजे तेथे जाऊन आणणे अशक्य. मग दुसरे हेलिकॉप्टर उडवले. टेकडीपल्याड गेले. काम करून परत आले. ठरविलेल्या जागी उतरले. बरोबर पोर्टेबल फिल्म डेव्हलपर आणला होता. डोक्यावर काळे पांघरूण घालून तज्ज्ञाने फिल्म धुतली. कमांडरला दाखवली. त्याचा चेहरा फुलला.

कालवा ओलांडण्यासाठी तात्पुरता पूल बांधण्याची सामग्री, लष्करी तुकड्या, तोफखाना. सगळा तपशील लख्ख दिसला.
"आता काय करायचे?"
एझाने काळजीच्या सुरात विचारले.
"आपली चिंता संपली. यापुढचे निर्णय जनरल लोकांनी घ्यायचे. आपण शांत झोपू. पुढच्या ऑर्डर्स येईपर्यंत."
इस्रायली सैनिकांनी त्यांच्या नकळत इतिहासाचा एक नवा अध्याय उघडला होता. त्याचे नाव ड्रोन वॉरफेअर.

अध्याय दुसरा

काळ : सप्टेंबर ते नोव्हेंबर 2020.
जागा : आर्मेनिया आणि अजरबैजान यांची सीमा.
आर्मेनिया 30 लक्ष वस्तीचा, ख्रिस्ती लोकांचा. छोटा देश. त्याला रशियाचे पाठबळ. अझरबैजान हा एक कोटी वस्तीचा, मुस्लीम लोकांचा देश. त्याला तुर्कस्तानाचे पाठबळ.

अर्मेनियाच्या फौजेच्या रणगाडा तुकड्या ठरल्याप्रमाणे निघाल्या. आता तोफांचा भडिमार करायचा. शत्रूची भूमी भाजून टाकायची. शेवटी तिचा ताबा घ्यायचा. असा ठरलेला व्यूव्ह.

या खेपेला सर्व विपरीत घडले.

या चढाईला रणगाड्यांनी प्रत्युत्तर देण्याऐवजी आभाळातून एक भिरभिरे आले. हे कोण? काय करणार? याला अडवायचे का? ते कसे ? एवढ्या ठिपक्यासारख्या वस्तूवर तोफ कशी झाडायची? असा विचार आर्मेनियन सैनिक करतात, तोच थंडरबोल्ट म्हणावे असे काहीतरी शस्त्र एका रणगाड्यावर येऊन आपटले. स्फोट झाला. आग लागली. रणगाडा निकामी झाला. हे पाहून इतर सैनिक अवाक झाले. पण विचाराला आणि चर्चेला फुरसत नव्हती. एकापाठोपाठ एक रणगाडा आभाळातून येणाऱ्या अस्त्राचा बळी झाला. होत्याचे नव्हते झाले. आजपर्यंत अभेद्य वाटणारे रशियन रणगाडे निरुपयोगी ठरले.

काय होते हे नवीन हवाई शस्त्र ?

तुर्कस्तानने पुरवलेले बॉम्बफेके ड्रोन. आर्मेनियाचे लष्कर पराभूत झाले. रशियाच्या मदतीमुळे निदान लाज वाचली. युद्धविराम झाला. या घटनेचा जगभर अभ्यास सुरू झाला.

बॉम्बफेके ड्रोन नावाची नवी शक्ती उदयास आली. तिच्यापुढे रणगाडे निष्प्रभ ठरले. आणि अब्जावधी रुपये खर्च करून उभारलेले रणगाडा दळ आता कचऱ्यात गेले. का?

अध्याय तिसरा 

काळ : जून 2025 
स्थळ : इराण

इस्रायलने लपून छपून इराणमध्ये शेकडो ड्रोन पाठवले. रिमोट कंट्रोल वापरून या ड्रोनकरवी इराणची रडार यंत्रणा नष्ट केली. शत्रूच्या लढाऊ विमानाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास इराण अक्षम ठरले. रशियाकडून घेतलेली S-300 यंत्रणा निरुपयोगी ठरली. जवळपास दोन आठवडे इस्रायल विमान दलाची विमाने मुक्तपणे इराणमध्ये हवा तसा नाच करीत राहिली. निवडलेल्या सर्व लष्करी केंद्रांवर तुफान बॉम्बफेक करून इस्रायलने ती नष्ट केली.

अध्याय चौथा 

काळ : जून 2025 
स्थळ : युक्रेन, रशिया यांची सीमा. 

रशियाने युक्रेनविरुद्ध स्पेशल ऑपरेशन सुरू केले. हा अगदी डेविड गोलाएथ यांचा लढा.
भूमी, लोकसंख्या, लष्कर, शक्ती, प्रत्येक बाबतीत रशिया युक्रेनच्या दसपट मोठा. कसे तोंड द्यावे युक्रेनने ? रशियनांना वाटले, अगदी थोड्या काळात आपण युक्रेनला जिंकून टाकणार.
पुन्हा काहीतरी विपरीत झाले. रशियाची चढाई थांबली. युक्रेनने रशियाच्या अंतर्भागावर मारा सुरू केला. कोणत्या शस्त्राने ? ड्रोन वापरून.

-----

आंद्रे पोपोव उठला. आळस दिला.

उबदार हवा. इकडे तिकडे बर्फ शिल्लक होते. पण किरकोळीत. वसंत ऋतूची लक्षणे सगळीकडे. लख्ख उजेड. थंडी सरली तरी त्या दिवसांमधल्या दिनक्रमाच्या सवयी शिल्लक होत्याच. प्रथम ट्रकची तपासणी. डिझेल किती आहे? टायर प्रेशर? बर्फात प्रवास करताना
उपयोगाच्या साखळ्या टायरवरून काढून टाकल्या होत्या. जाड कोट, बूटमोजे, हातमोजे यांना रामराम.

ट्रकच्या केबिनमध्ये नजर टाकली. रेडिओ तपासला. सायबेरियामध्ये वस्ती इतकी विरळ की, संपर्क फक्त रेडिओवरूनच. स्वतःपुरत्या स्वैपाकासाठीचा स्टोव्ह बघितला. भरपूर तेल होते.

वाहतुकीचा माल आधीच ट्रकवर चढवलेला होता. मोठमोठ्या लाकडी पेट्या. कागदपत्रे सगळे व्यवस्थित होते. कसलातरी मशीन पार्ट होता म्हणे. असल्या मालात पोलीस मंडळींना रस नसतो. दारू, ड्रग्ज, फॅशन कपडे, दागिने असले काही लपवण्याचा संशय आला की बोंब. सगळा माल उलटसुलट तपासणार. वेळ जाणार. सामान पुन्हा भरण्याचा ताप. अशी तपासणी झाली की, मालक गिऱ्हाइकाला जादा आकार लावणार. पण ड्रायव्हरला काय ? नुसताच ताप.

पण ही ट्रिप सोपी होती.
थंडी कमी झाल्यामुळे नद्या रस्ते म्हणून वापरता येत नव्हत्या. गोठलेला बर्फ सैल होत होता. पाणी इकडेतिकडे पसरून दलदल होत होती. आता डास वाढणार. सरकारी सडकेवरून जावे लागणार. त्यांची अवस्था नेहमीच बिकट. पण काय करणार? इलाज नाही.
एकदा इंजिन चालू करावे, मग नाश्ता, मग प्रयाण.
थंडीमध्ये हा भाग नसतो. इंजिन चालूच असते. रात्रीसुद्धा. म्हणजे केबिन गरम राहते. एरवी झोपेत आपण गोठून जाऊ ना. शिवाय, इंजिन बंद केले तर सकाळी ते पुन्हा सुरू होण्याची खात्री कोण देणार?

आता नाश्ता. आंद्रेला खरे तर आवडतात पेलमेनी. म्हणजे आत खिमा भरलेले मोदक. पण ते नेहमी नशिबाला येतात असे नव्हे. मग निदान तळलेली अंडी आणि सॉसेजेस तरी मिळतील का? आज तेही नव्हते नशिबात. मुक्कामावरचा माणूस म्हणाला- "मी फक्त नूडल्स देऊ शकतो. शिवाय काशा. म्हणजे पेज." आंद्रेचा चेहरा पडला. "निदान दुधात तरी करणार का?"

"हो. वर लोणी जॅमसुद्धा आहे."
"बरं द्या तेच. बरोबर न्यायला पोर्क सँडविच करून द्या."
आपल्या राक्षसी उराल ट्रकवर आंद्रेचे प्रेम होते. तो वाटेत दगा देणार नाही अशी आंद्रेची श्रद्धा होती; पण इतरांच्या वागण्यावर त्याचा काय इलाज.

तासभर प्रवास होतो न होतो तोच रस्त्यात अपघात. म्हणजे विशेष काही नाही. क्षणभर ड्रायव्हरला डुलकी लागली किंवा कसल्यातरी विचाराने तंद्री लागली आणि ट्रक रस्ता सोडून उजवीकडे गेला. दुर्दैवाने, या ठिकाणी दलदल होती. चाके रुतली. खरे तर हा all wheel drive प्रकारातला ट्रक. पण ती यंत्रणा बिघडली असावी. म्हणून तो बाहेर निघेना. आता कोणीतरी ओढून काढायला हवे.

चडफडत आंद्रे उतरला. त्याने तो रुतलेला ट्रक आपल्या ट्रकला साखळदंडाने बांधला. स्वतः उलटा जाऊ लागला. थोड्या कष्टाने काम झाले. सुदैवाने, एरवी तो ट्रक ठीकठाक होता. लगेच इंजिन सुरू झाले.

तेवढ्यात मिखाईलचा फोन आला.
"कुठे आहेस? नीट चालले आहे ना सगळे?"
"अरे, वाटेत हा ट्रक आडवा आला. त्याला बाहेर काढत होतो."
"ठीक आहे. झटपट उरक आणि वाटेला लाग."
"पण बेलाया गावी नेमके कुठे जायचे? मला काहीच सांगितले नाहीस."
"अरे, मला तरी कुठे ठाऊक आहे? गिऱ्हाईक म्हणे बेलाया गावाच्या जवळ आलो की सांगतो."
"मग काय ? सांगितलंय का?"
"होय. गावाला पोहोचण्याच्या आधी विमानतळाकडे जाणारा फाटा आहे."
"मला आठवतो हा फाटा. विमानतळावर जायचे आहे का ?"
"नाही. गावाच्या दिशेने जायचे आणि लगेच थांबायचे. गिऱ्हाईक आपला ट्रक घेऊन येईल व माल उचलून नेईल."
"वाऽऽ फारच उत्तम."
"पण पैसे दिल्याशिवाय माल सोडू नकोस. हा माणूस नेहमीच्या बैठकीतला नाही."

आंद्रे त्या फाट्यावर पोहोचला. ट्रक गावाच्या दिशेला वळवला आणि शोल्डरवर थांबवला. आंद्रे खाली उतरला. आळस दिला. सिगरेट शिलगावली. पंचवीस पावले टाकली. पाय मोकळे झाले. मग केबिनमधला रेडिओ लावला. पॉप म्युझिक कानांवर आले. आंद्रेने डोके मागे टेकवले आणि डोळे मिटले.

किती वेळ गेला कोण जाणे. झोप लागली होतीच. मग चकून जाग का आली?
काहीतरी घुरघुर आवाज येत होता. 'गिऱ्हाइकाचा ट्रक माल घ्यायला आला वाटते.' रस्त्यावर कोणीच नाही. पुन्हा आवाज आला.
आता ध्यानात आले की, 'आवाज डोक्यावरून येतो आहे.'
वर बघितले तर फूटभर लांबी आणि फूटभर रुंदी असलेला चार पंखांचा ड्रोन.
'कमाल झाली. हल्ली पोरांना काय काय खेळणी देतात कुणास ठाऊक. आणि हा ड्रोन असा माळरानावर का आला? कुठे चालला ?'
बघता बघता तो भुंगा दिसेनासा झाला. क्षणभर शांतता. मग त्याची जागा दुसऱ्या ड्रोनने घेतली. हे काय विपरीत ? तेवढ्यात तिसरा आला. चौथा आला.
ही काही भुताटकी तर नाही?
धडपडत आंद्रे केबिनचे दार उघडून बाहेर आला. आता ते भीषण सत्य त्याला गवसले.
हे सगळे ड्रोन त्याच्याच ट्रकच्या पोटातून बाहेर येत होते. वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात असे. आणि सगळे विमानतळाच्या दिशेने जात होते.
वीज चमकावी तसा आंद्रेच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याची बोबडी वळली.
हा तर ड्रोनचा स्वार्म. ही टोळी बेलाया गावाला घेऊन येण्याचे पाप त्याने केले होते.
ती आता विमानतळाकडे चालली होती. ती काय प्रवाशांना गुलाबाची फुले वाटण्यासाठी निघाली होती थोडीच ?
त्याने टीव्हीवर अनेकदा बातमी पाहिली होती. रशियन ड्रोन युक्रेनच्या कारखान्यावर, लष्करावर बॉम्ब टाकत होते.
'म्हणजे हा पलटवार दिसतो. याला आपण मदत केली का? देशद्रोह केला का? आता काय सगळ्यांना कळणार. आपल्याला अटक. छळ. खटला. शिक्षा. सुखाचे आयुष्य संपले.
मला चक्कर येत आहे का? गिऱ्हाईक जागेवर भेटणे, त्याच्याकडून पैसे घेणे, सगळाच बकवास.
आता काय करू? कोठे जाऊ? या लफड्यातून कसा बाहेर पडू?'
त्याला सुचले. 'आपणच या घटनेची बातमी पोलिसांना दिली तर? कदाचित खटल्यात आपल्या बाजूने वापरता येईल.'

त्याने 101 क्रमांकावर फोन केला.
"तुम्ही आणीबाणी नंबरला कॉल केला आहे. काय प्रसंग गुदरला आहे तुमच्यावर?"
पलीकडून कोणी कंटाळलेला घोगरा आवाज विचारत होता.
"अहो इथे ड्रोन्स उडत आहेत."
"मग मी काय करू? सांगा त्या पोरांच्या आई बापांना की, अवेळी खेळून आमची झोपमोड करू नका."
"अहो, ते ड्रोन विमानतळाकडे निघाले आहेत."
"कुठे का जाईनात. कोणी जखमी, मेला असे झाले आहे का ?"
"अजून तरी नाही."
"मग गप्प बसा. उगाच ताप देतात."
समोरच्याने फोन ठेवला.
आता काय करायचे? आंद्रेने तिरीमिरीने दोन दगड उचलले आणि शिव्याशाप देत आभाळाकडे भिरकावले.
'आता काय करू? हा ट्रक कोठे नेऊ? त्या मिखाइलने मला खड्यात घातले. मग त्याला का सोडायचे? त्याला ठरवू देत की, काय करायचे या परिस्थितीमध्ये ते. जबाबदारी त्याची आहे. माझी नाही.'
आंद्रेने मिखाइलला फोन लावला. झाला प्रकार सांगितला.
"आता मी काय करू? कुठे जाऊ? पोलीस 101 कॉल मनावर घेत नाहीत. ते गिऱ्हाईक जागेवर येऊन पैसे देणार आहे का खरेच ?"
दुसऱ्या बाजूने धाडकन आवाज झाला. फोन बंद पडला. 'आता हे काय आणखी नवेच ?'
तर फोन वाजला. मिखाइलची बायको ओरडत होती. 'काय सांगितलेस माझ्या नवऱ्याला?' तो चक्कर येऊन पडला.
"मी त्याचा माल घेऊन बेलाया येथे आलो आहे."
"माल गेला मसणात. हे सगळं दे फेकून आणि जा कुठेतरी पळून. पण पुन्हा फोन करू नकोस."
आंद्रे मटकन खाली बसला. तोच रस्त्याने एक ट्रक येताना दिसला. ट्रक थांबला.
आंद्रेला कापरे भरले. 'गुप्त पोलिसांना पत्ता लागला असणार. म्हणून त्यांनी खाजगी ट्रकमधून माणसे धाडली. मला पकडायला. संपला माझा अवतार.'
थांबलेल्या ट्रकमधून एकच माणूस उतरला. मैत्रीच्या सुरात त्याने विचारले "काय अडचण झाली बाबा तुझी ?"
आंद्रेने चिखलात रुतलेला ट्रक बाहेर ओढून काढला होता. तोच तो ट्रक. तोच तो ड्रायव्हर.
'हा देवदूत तर नाही? याला सांगू का माझे संकट ? का गुप्त ठेवू ?'
कोणालातरी सांगितल्याशिवाय डोक्यातले वादळ संपणार नव्हते.
'होऊ दे काय व्हायचे ते. सांगून टाकतो. जरा हलके वाटेल.'
अज्ञात मित्राने सर्व शांतपणे ऐकले.
"मग आता तुझा काय विचार आहे?"
"तेच तर सुचत नाही."
"मी सुचवू?"
'हो.'
"हे पेटारे इथेच टाक. आलास तसा उलट्या दिशेला निघून जा."
"कोणी विचारले तर काय सांगू?"
"तर मिखाइलचा निरोप नीट सांग. विमानतळ फाट्यावर थांबलो. गिऱ्हाईक आले. माल घेतला. मी परत निघालो."
"आणि पैसे ?"
"नाही दिले म्हणावे. ती मिखाइलची जबाबदारी आहे."
"अरे, पण हे पेटारे उतरवू कसे? माझा ट्रक म्हणजे डंपर नाही."
"पण मी आहे ना. साखळदंड घे. एक टोक पेटाऱ्याला दुसरे माझ्या ट्रकला. आता तुझा ट्रक पुढे घे. पेटारा आपोआप खाली."
'आपण हतबुद्ध असताना असा व्यवहारी उपदेश मिळाला कसा?' असे आश्चर्य करीत आंद्रे उठला.
बघता बघता ट्रक रिकामा झाला. आंद्रेने त्या अज्ञात मदतगाराला मिठी मारली.
"एक लक्षात ठेव. मला सांगितलेस ते कोणाला सांगू नकोस. त्यांचे ते शोधतील."
देवदूताने अखेरचा संदेश दिला.

अंधार पडता पडता आंद्रे घरी पोहोचला. उन्हाळ्यात अंधार फार उशिरा पडतो. त्याने रेडिओ लावला. शॉर्ट वेव्हच्या अमुक फ्रिक्वेन्सीवर देशाबाहेरचे एक स्टेशन लागत असे. फ्रीडम का काहीतरी नावाचे. सरकारी रेडिओवर गळणाऱ्या बातम्या या स्टेशनवर कळायच्या. खरखर यायची. पण ढोबळ अर्थ करायचा.

आज चक्क युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे भाषण (रेकॉर्डिंग) लावले होते.

'आज आमच्या सेनेतील वीरांनी Operation Spider Web पूर्ण केले आहे. गेली दीड वर्षे आम्ही या योजनेवर काम करत होतो.

एकाच वेळी रशियाच्या चार हवाईतळांवर युक्रेनच्या ड्रोन्सनी मारा केला आहे. 41 रशियन बॉम्बर विमानांवर त्यांनी बॉम्ब टाकले. काही विमाने पूर्ण नष्ट झाली. काहींची मोठी मोडतोड झाली. A50 ही विमाने इतर विमानाने मार्गदर्शन करतात. ती बळी पडली. TU95 आणि TU22M3 ही अॅटम बॉम्ब टाकू शकणारी महागडी विमानेसुद्धा जागेवरच जळली. त्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने त्यांचा मुक्काम युद्धआघाडीपासून दूर अंतरावर हलवला होता. पण 5000 केएमइतके अंतर कापून सायबेरियामध्ये इरकुत्स्क प्रांतात बेलाया आणि आर्क्टिक समुद्राजवळ मरमान्स्क येथे ओलेण्या हवाईतळ आमच्या ड्रोन्सनी जाळले.

आधुनिक युद्धातील एक चमत्कार मानावा अशी ही घटना आहे. रशियन लोकांना वाटले की, आम्ही युद्धआघाडीच्या जवळपासचे विमानतळ हल्ल्यासाठी निवडू; पण सारा रशिया आमच्या टापूत आहे हे आम्ही सिद्ध केले.

एकंदर 117 ड्रोन वापरले. प्रत्येकासाठी एक पायलट. या ड्रोन्सनी रशियन टेलिफोन व्यवस्था वापरून आम्हाला विध्वंसाचे फोटो पाठविले. (या हल्ल्यामध्ये रशियाचे सुमारे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.)'

यापूर्वी युक्रेनने असे दोन मोठे हल्ले केले होते.

पहिला 2022 मध्ये. युक्रेनचा क्रायमिया हा प्रांत 2016 मध्ये रशियाने ताब्यात घेतला. कर्च ब्रिज हा क्रायमिया या प्रांताचा मुख्य भूमीशी एकमेव संपर्क. एक दिवस बॉम्बने भरलेला ट्रक फुलावर घेऊन उभा राहिला. चालक निघून गेला. रिमोट कंट्रोलने बॉम्बचा स्फोट झाला. पूल पडला. युक्रेनचे अध्यक्ष पुतीन यांच्या वाढदिवसाची ही भेट.

दुसरा हल्ला रशियन आरमाराच्या काळ्या समुद्रातील ध्वज नौकेवर. तिचे नाव मोस्कवा. खरे म्हणजे युक्रेनकडे आरमार नाही. मग काय केले? एका मच्छीमारी बोटीवर सागरी ड्रोन चढवला. बोट वरील नौकेच्या आसपास नेली. पाण्यातून तो ड्रोन सोडला. नौकेवर आपटून स्फोट झाला. इतका मोठा की, नौका सरळ सागरतळाला गेली.

सागरी ड्रोनचे तंत्रज्ञान युक्रेनच्या मंडळींनी स्वतःच्या बुद्धीने निर्माण केले.

या सर्वांवरती कडी म्हणजे 5000 किलोमीटर अंतरावर ठेवलेली बॉम्बफेकी विमाने जाळून टाकली ते operation spiderweb.

हा प्रकार पाहून अनेक देश विचारात पडले आहेत. सगळे जण आपली विमाने काही मोजक्या तळांवर उघड्यावर ठेवतात. खर्च वाचतो. खास सुरक्षित विमान घरे अर्थात हँगर बांधत नाहीत. पैसा वाचतो. आता ध्यानात येते की, पुढील काळात ही कृती विमान दलाला अडचणीत आणील.

युक्रेनने साऱ्या जगाला एक धडा शिकवला आहे. आजच्या आणि उद्याच्या युद्धात सर्वांत महत्त्वाचे हत्यार तुमच्या दोन कानांच्या मध्ये बसलेले आहे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी