डिजिटल अर्काईव्ह

खरं म्हणजे, 'पिफ'मध्ये 'सायलेन्ट फ्रेंड' हा एकच सिनेमा पाहून तृप्त व्हायला झालं असं म्हणणं योग्य नाही. कारण या वेळी उत्कृष्ट सिनेमांची रेलचेल होती. यांतले काही मी गोव्याला झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बघितलेले असल्याने मला 'इफी'मध्ये नसलेले आणखी वेगळे आणि उत्तम सिनेमे पाहता आले हे मान्य करायला हवं. 'इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडंट', 'सेंटिमेंटल व्हॅल्यू', 'आमरुम', 'फादर, मदर, सिस्टर, ब्रदर', 'नो अदर चॉइस' हे सगळे सिनेमे पाहायला पिफमध्येही प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. 'सिरात 'सारखा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहून थक्क व्हायला झालं. काही डॉक्युमेंटरीज बघता आल्या.

 

24 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) 15 ते 22 जानेवारी 2026 या काळात पार पडला. तरुणांची हजेरी आणि सोबत ज्येष्ठ चित्रपट रसिकांची गर्दी हे या महोत्सवाचं नेहमीचंच वैशिष्ट्य. त्यातील एका सिनेमाविषयी या लेखात...

'जिन्कगो बिलोबा' हे एका झाडाचं नाव आहे. पूर्व आशियामध्ये हे झाड सापडतं. अतिशय प्राचीन. ते दीर्घायुषी आहे, सहसा त्यावर रोग किंवा कीड पडत नाही. कोणे एके काळी जिन्कगो बिलोबाची झाडं जगभरात सर्वत्र पसरलेली होती. कालांतराने, ते नामशेष झालं असं वाटलं; पण आता पूर्व आशियामध्ये ते सर्रास आढळतं. काही झाडं तर हिरोशिमाच्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतरही मातीत पाय रोवून उभी होती, त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. थोडक्यात, आपल्या असंख्य फांद्या अवकाशात फैलावत, मातीशी असलेलं मुळांचं नातं सांभाळत, वर्षानुवर्षं आपल्या भोवतालाकडे पाहत जोमाने वाढणारं हे झाड बघताना दडपून जायला होतं.

नाही, मी प्रत्यक्षात जिन्कगो बिलोबा नावाचं झाड बघितलेलं नाही; पण नुकत्याच पार पडलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ) या झाडाभोवती गुंफलेला 'सायलेंट फ्रेंड' नावाचा सिनेमा पाहिला. जवळजवळ अडीच तासांचा हा सिनेमा आणि त्यातलं जिन्कगो बिलोबा आयुष्यभरासाठी डोक्यात ठाण मांडून बसणार याची जाणीव झाली.

सिनेमाच्या दिग्दर्शक आहेत हंगेरीच्या इल्डिको एन्येदी. 1989 पासून त्या सिनेमे बनवताहेत. 'माय ट्वेन्टीएथ सेंच्युरी' या त्यांच्या पहिल्या सिनेमाला 'कान' चित्रपट महोत्सवामध्ये 'गोल्डन कॅमेरा पुरस्कार' मिळाला होता. 2017 मधल्या 'ऑन बॉडी अँड सोल' या त्यांच्या सिनेमाने बर्लिनाले (बर्लिन) चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन बेअर, तसंच फिप्रेसी या चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं पारितोषिक मिळवलं होतं. 2021च्या 'द स्टोरी ऑफ माय वाइफ'वर मात्र अनेक समीक्षकांनी टीका केली होती. 'सायलेंट फ्रेंड'ने दिग्दर्शक म्हणून इल्डिको एन्येदी यांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडायला झालं.

हा सिनेमा घडतो तीन वेगवेगळ्या काळांमध्ये; पण एकाच ठिकाणी. मारबर्ग विद्यापीठात. जर्मनीमधलं हे अतिशय प्रतिष्ठित मानलं जाणारं विद्यापीठ 1 जुलै 1527 या दिवशी स्थापन झालंय. नॅचरल सायन्सेस, मेडिसिन, ह्युमॅनिटीज या आणि अशासारख्या विषयांवर तिथे संशोधन होत असतं. आजच्या घडीला तिथे वीस हजारांहून अधिक विद्यार्थी शिकताहेत. प्राचीन आणि आधुनिकता यांचा संगम असलेला प्रचंड मोठा कॅम्पस आणि खूप सारी झाडं. यांतलंच एक जिन्कगो बिलोबा. आपल्या सिनेमामधलं हे झाड आहे 1832 मधलं. विद्यापीठाच्या जवळजवळ दोनशे वर्षांच्या इतिहासाचं ते साक्षीदार आहे.

हाँगकाँगमधला नामवंत न्युरोसायंटिस्ट टोनी कामानिमित्त या विद्यापीठात येतो आणि कोविडमुळे लॉकडाउन सुरू होतो. सगळे विद्यार्थी घरी गेलेले. त्या संपूर्ण कॅम्पसमध्ये टोनी आणि त्याच्या बरोबरचा त्याची भाषा न समजणारा एक सहकारी. मूल बोलू लागण्याच्या आधी त्याच्या किंवा तिच्या मेंदूच्या लहरींचा अभ्यास करणं हा टोनीच्या अभ्यासाचा विषय असतो. ते संशोधन तर रखडतंच, पण वेळ कसा घालवावा हा मोठा यक्षप्रश्न टोनीसमोर असतो. अशातच, एक दिवस टीव्हीवर तो अॅलीस नावाच्या एका फ्रेंच शास्त्रज्ञाची मुलाखत पाहतो. ती सांगत असते, 'झाडांचं, वनस्पतींचं जग आपल्याशी खूप गप्पागोष्टी करत असतं. अगदी आपला विश्वास बसणार नाही इतकं. मात्र, हा संवाद ऐकण्याइतका वेळ आपल्यापाशी नसतो'.

टोनीकडे वेळच वेळ असतो. आपल्या प्रयोगशाळेच्या खिडकीतून पसरलेल्या जिन्कगो बिलोबाच्या लहरींवर आपण आपलं संशोधन करावं असा विचार त्याच्या डोक्यात येतो. 'व्हॉट इफ दे ऑब्जर्व्ह अस द सेम वे देंट वुई ऑब्जर्व्ह देम ?' असं म्हणून तो कामाला लागतो. हळूहळू त्याचं आणि त्या झाडाचं एक नातं तयार होऊ लागतं.

याच झाडाशी असंच नातं काही वर्षांपूर्वी, म्हणजे 1972 मध्ये हान्सने निर्माण केलेलं असतं. आणि त्याही आधी 1908 मध्ये ग्रेतेचं या झाडाशी सूत जमलेलं असतं.

जिन्कगो बिलोबा मध्यवर्ती पात्र आणि त्याभोवती गुंफलेल्या तीन कहाण्या म्हणजे, 'सायलेंट फ्रेंड'. पण रूढार्थाने या तीन गोष्टी नाहीत. म्हणजे या गोष्टींना सुरुवात, मध्य, शेवट नाही. त्या एकामागोमाग एक आपल्यासमोर मांडल्या जात नाहीत. त्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत असंही नाही; पण त्या घडतात मारबर्ग विद्यापीठातच.

1908 मध्ये ग्रेते विद्यापीठातअ‍ॅडमिशन घ्यायला येते तेव्हा ती तिथली पहिली विद्यार्थिनी ठरते. त्या वर्षी विद्यापीठाने पहिल्यांदाच मुलींकडून अर्ज मागवलेले असतात. ग्रेते मुलाखत द्यायला येते तेव्हा समोर बसलेल्यांपैकी एकही पुरुष प्राध्यापक तिला फारसं गंभीरपणे घेत नाही. काही थेट अपमान करणारे प्रश्न विचारतात, तर काही लैंगिक अर्थ दडलेले. ग्रेते मात्र त्यांना ठामपणे आणि संयमाने उत्तरं देते. आपल्या हुशारीने त्यांच्यावर मात करते आणि तिला अॅडमिशन देण्याखेरीज दुसरा पर्यायच त्यांच्यासमोर ठेवत नाही.

तरीही, 1908 मधल्या शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, हुशार, कर्तबगार स्त्रियांचं आयुष्य साधं-सोपं थोडंच असणार ? शिक्षणासाठी म्हणून ती ज्या कुटुंबाबरोबर राहत असते तिथून तिला बाहेर काढलं जातं. रस्त्यातून फिरताना तिला एका दुकानाच्या बाहेर पाटी दिसते, 'साहाय्यक पाहिजे. हे दुकान आहे एका म्हाताऱ्या फोटोग्राफरचं. त्याला मदत करता करता ग्रेते फोटोग्राफीमधल्या अंधार आणि उजेडाचा खेळ शिकते आणि कॅमेऱ्यासमोर असलेल्या झाडांकडे, रोपांकडे, फुलांकडे एका वेगळ्या नजरेने बघायलाही. मुळात बॉटनी, वनस्पतिशास्त्र हाच विषय असल्यामुळे ते स्वाभाविकही असतं. आणि विद्यापीठातल्या आवारामधल्या झाडांशी मैत्री होणंही तितकंच साहजिक.

1972 मधल्या हान्सची कहाणी निराळी आहे. तो झाडं, पक्षी, प्राणी यांत फारसा रमणारा नाही. पण त्यात रस असणाऱ्या मुलीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. ही मुलगी जेरेनियमच्या रोपट्यावर संशोधन करतेय. 'झाडं काय अनुभवतात याचा पुरावा मला शोधून काढायचाय', ती सांगते. तिच्या बेडरूमच्या खिडकीमध्ये हे छोटंसं रोपटं तिने लावलेलं असतं. तिच्या निमित्ताने हान्स या वनस्पतींच्या जगात गुरफटला जातो. 'तुला कधी असं नाही वाटत की, ही सगळी झाडं आपल्याभोवती आहेत, आपल्याला न्याहाळताहेत आणि आपल्याविषयी वेगवेगळा विचार करताहेत?' असा प्रश्नही त्याला करते, 2020 मधल्या टोनीसारखाच. हान्स आपोआप विद्यापीठाच्या आवारामध्ये असलेल्या जिन्कगो बिलोबाच्या सहवासात येतो. ही मुलगी आपल्या मित्रांबरोबर काही दिवसांसाठी बाहेर जाते तेव्हा तिच्या जेरेनियमचा सांभाळ हान्स करतो आणि मानवी अस्तित्व, स्पर्श आणि अगदी मूडही झाडांना समजतात हे आपल्या मैत्रिणीचं संशोधन किती खरं आहे हे त्याच्या लक्षात येतं.

या तीन वेगवेगळ्या काळांमध्ये आपण वावरत असतो आणि आपल्याबरोबर जिन्कगो बिलोबाही. झाडांच्या फांद्यांमधून दिसणारं आकाश पाहताना त्यातून होणारा मज्जातंतूंचा भास लक्षात आल्यावाचून राहत नाही. माणसाच्या मेंदूमध्ये आणि झाडांच्या फांद्यांमध्ये असलेली ही गुंतागुंत दिग्दर्शकाने नेमकी पकडली आहे. अनेकदा झाडांची भव्यता पाहताना माणसाचं खुजेपण अधोरेखित होत असल्याचंही कळतं. मुख्य म्हणजे काळ बदलतो, आजूबाजूचं जग बदलतं; पण जिन्कगो बिलोबा तसाच राहतो. तीन वेगवेगळ्या दृश्यांमध्ये आपल्या तीनही मुख्य व्यक्तिरेखा विद्यापीठाच्या एका इमारतीमधल्या एकाच जागेवरच्या ठरावीक पायऱ्यांवर दिसतात. या तिघांना जोडणारा हा आणखी एक दुवा बहुधा.

हा सिनेमा खरं म्हणजे अनुभवण्याचा आहे. तो असा सांगता येत नाही. यातलं झाड आणि माणसाचं नातं शब्दात कसं पकडणार? दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही इल्डिको एन्येदी आणि त्यांचा छायाचित्रकार गर्गली पालोश यांनी ते कॅमेऱ्यात मात्र नेमकं बंदिस्त केलंय. एन्येदीने आणखीही एक गोष्ट केलीये. हे तीनही काळ त्यांनी निरनिराळ्या पद्धतीने चित्रित केलेत. म्हणजे, ग्रेतेची गोष्ट आपण 35 एमएम ब्लॅक अँड व्हाइटमध्ये बघतो, हान्सचा अल्लडपणा 16 एमएममध्ये दिसतो आणि टोनीचा एकटेपणा आजच्या आधुनिक डिजिटल नजरेतून दाखवला जातो.

सिनेमा पाहताना आपल्याला, धकाधकीच्या जीवनातून दोन क्षण झाडांशी गप्पा मारायला काढले पाहिजेत, असं वाटत राहतं. आपल्या एकटेपणाचे कढ काढताना त्यांच्याशी मैत्री करण्याचा विचार का मनात येत नाही असं जाणवत राहतं.

या सिनेमामध्ये गुंतागुंत आहे. यात नेहमीसारखी गोष्ट नाही. नाट्य आहे ते माणसाच्या आणि निसर्गाच्या नात्यामधलं. एक वेगळाच दृष्टीकोन देणारं. आपल्याभोवतीच्या जगाकडे निराळ्या नजरेने पाहायला लावणारं.

'सायलेन्ट फ्रेन्ड'चा अनुभव अधिक समृद्ध करण्यामध्ये यातल्या कलाकारांचाही अर्थातच सहभाग आहे. पहिलं नाव घ्यायला हवं टोनी लऊंग यांचं. प्रसिद्ध दिग्दर्शक वाँग कारवई यांच्या सात सिनेमांमधून लऊंग यांनी काम केलंय आणि अप्रतिम काम केलंय. 'चुंगकिंग एक्स्प्रेस' (1994) असेल किंवा 'हॅपी टुगेदर' (1997), 'इन द मूड फॉर लव्ह' (2000) नाहीतर '2046' (2004) किंवा 'द ग्रँडमास्टर' (2013) असेल, या दिग्दर्शक-नट जोडीने अप्रतिम सिनेमे आपल्याला दिलेले आहेत. 'सायलेन्ट फ्रेन्ड'मध्ये लऊंग यांचा वावर अतिशय सहज आणि संथ आहे. जिन्कगो बिलोबाशी जसे ते बांधले जातात तसंच ते आपल्यालाही बांधून ठेवतात. त्या झाडाशी आणि त्यांच्या व्यक्तिरेखेशीही.

हा एकच सिनेमा बघावा आणि पिफची वारी सुफळ संपूर्ण झाली असं म्हणावं इतका मला तो महान वाटला.

लेखक-दिग्दर्शक : इल्डिको एन्येदी
छायाचित्रण : गर्गली पालोश
संकलन : कार्लोय झलाई
कलाकार : टोनी लऊंग, लुना वेडलर, एन्झो ब्रम, युन हुआंग, सिल्वेस्टर ग्रॉथ, लिआ सेदो

*
खरं म्हणजे, 'पिफ'मध्ये 'सायलेन्ट फ्रेंड' हा एकच सिनेमा पाहून तृप्त व्हायला झालं असं म्हणणं योग्य नाही. कारण या वेळी उत्कृष्ट सिनेमांची रेलचेल होती. यांतले काही मी गोव्याला झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये बघितलेले असल्याने मला 'इफी'मध्ये नसलेले आणखी वेगळे आणि उत्तम सिनेमे पाहता आले हे मान्य करायला हवं. 'इट वॉज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्सिडंट', 'सेंटिमेंटल व्हॅल्यू', 'आमरुम', 'फादर, मदर, सिस्टर, ब्रदर', 'नो अदर चॉइस' हे सगळे सिनेमे पाहायला पिफमध्येही प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केलेली होती. 'सिरात 'सारखा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहून थक्क व्हायला झालं. काही डॉक्युमेंटरीज बघता आल्या.

'पिफ'चं हे 24वं वर्ष. 1994 पासून सुरू झालेला केरळचा महोत्सव, त्याच्या पुढच्या वर्षी सुरू झालेला कोलकाता चित्रपट महोत्सव आणि मग 1996 मध्ये सुरू झालेला बंगळूरू चित्रपट महोत्सव यांसारख्या भारतातल्या मोठ्या चित्रपट महोत्सवांबरोबरच आता 'पिफ'चं नाव घेतलं जातं. डॉ. जब्बार पटेल, समर नखाते, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर यांच्यासारखे रथी-महारथी 'पिफ'चे आधारस्तंभ आहेत. वीस-बावीस वर्षांपूर्वी 'पिफ'मध्ये सिनेमे पाहायला पुण्या-मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मुलं येऊ लागली होती. त्यांपैकी अनेक जण आता स्वतःचे सिनेमे बनवू लागले आहेत. एखाद्या महोत्सवाने अशी पिढी निर्माण करावी यापेक्षा आणखी मोठं यश ते काय म्हणता येईल ?

'पिफ'मधल्या आणखी काही सिनेमांविषयी या पुढच्या लेखात.

'जिन्कगो बिलोबा आणि हान्स 1972 हे छायाचित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई ( 82 लेख )
meenakarnik@gmail.com

पत्रकार, चित्रपट समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी