डच साम्राज्याचे इंडोनेशियातील उरले-सुरले आर्थिक पाश तोडून संपूर्ण स्वातंत्र्याचा व प्रभुत्वसंपन्नतेचा उपभोग घेता येण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल तेथील जनतेने उचलले आहे. ह्या घटना शुभ आहेत, पण त्यामुळे एक दुसराही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या साधनांनी व वृत्तीने हे सगळे घडले त्यात दुसऱ्याही एका संभाव्य संकटाची बीजी लपलेली आहेत. कम्युनिस्टांचा प्रयत्न या भागात आपले वर्चस्व स्थापन करण्याचा आहे आणि त्यामुळेच हा भाग जागतिक सत्तास्पर्धेचा एखादा अड्डा बनण्याचीही शक्यता आहे.
नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर आग्नेय आशियात एका नव्या संघर्षाने पेट घेतला असून ‘पश्चिम इरियन’च्या प्रश्नावर इंडोनेशियाही आंतरराष्ट्रीय शीत युद्धातील एक प्यादे बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात इंडोनेशियात इतक्या झपाट्याने घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत की, त्या घटनासंबंधी काही निदान करावे तर नव्या घटनांच्या प्रकाशात पुन्हा ते पडताळून पहावे लागते. या संघर्षामुळे एक सत्य स्पष्ट झाले आहे: इंडोनेशियन जनता आता एक क्षणभरही उच्च साम्राज्यशाही आपल्या भूमीवर सहन करायला तयार नाही. ‘पश्चिम इरियन’ हे केवळ निमित्त झाले आहे; परंतु इंडोनेशियन जनतेचा खरा निर्धार डच आर्थिक हितसंबंधांची कोंडी करून त्यांचे इंडोनेशियन अर्थव्यवस्थेवरील वर्चस्व नष्ट करणे हा आहे.
इरियन प्रश्नाचे स्वरूप
ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस आणि जावाच्या ईशान्येस असलेल्या भूप्रदेशाला उच्च न्यू गिनीला-इंडोनेशियन लोक ‘इरियन’ या नावाने ओळखतात. इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रदेश महत्त्वाचा असून नैसर्गिक संपत्तीने संपन्न आहे. तेल ही तेथील मोठी संपत्ती आहे. ‘इरियन’चा पश्चिम भाग डचांच्या वासाहतिक आधिपत्याखाली आहे आणि ऑस्ट्रेलिया हा पूर्व भागाचा विश्वस्त आहे. पश्चिम इरियनचे भूक्षेत्र इंडोनेशियाच्या क्षेत्रफळाच्या 22 टक्के असून ऐतिहासिक दृष्ट्या ती आपली मायभूमी आहे, त्यावर सार्वभौम हक्क गाजविण्याचा अधिकार इंडोनेशियन जनतेचा आहे, असा दावा गेली कित्येक वर्षे इंडोनेशिया करीत आहे. 1949 साली इंडोनेशिया स्वतंत्र झाला. त्या वेळी भरलेल्या गोलमेज परिषदेत डचांनी कबूल केले की, नजीकच्या भविष्यकाळात ते पश्चिम इरियनबाबत वाटाघाटी करतील; तोपर्यंत तेथे जैसे थे परिस्थिती राहील. परंतु 1952 साली पश्चिम इरियनचा राज्यघटनेत समावेश करून (आणि याबाबत इंडोनेशियाशी कोणत्याही वाटाघाटी न करता...) डचांनी या कराराचा भंग केला.
अपयशी खटपट
हा प्रश्न सामोपचाराने सुटावा म्हणून इंडोनेशियाने युनोमार्फत अनेकदा खटपट केली. परंतु युनोतील सत्तास्पर्धेच्या खेळात पश्चिम इरियनचे ‘काश्मीर’ झाले आणि इंडोनेशियाच्या रास्त मागणीची तेथे दाद लागली नाही. म्हणून 1956च्या एप्रिल महिन्यात इंडोनेशियानेही 1949चा करार रद्द ठरवून पश्चिम इरियन हा इंडोनेशियाचा अविभाज्य घटक आहे, असे जाहीर केले. अर्थात् ही नुसती घोषणा होती; कारण तेथे अधिपत्य होते डचांचे. गेल्या नोव्हेंबरात युनोच्या जनरल असेंब्लीत त्यांनी पुन्हा हा प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश मिळाले नाही.
मर्माघात
अशा तऱ्हेने सामोपचाराचे सर्व प्रयत्न केल्यानंतरही डच नमते घेत नाहीत, हे पाहिल्यावर इंडोनेशियन जनतेने डचांच्या आर्थिक हितसंबंधांवर कब्जा करून आग्रेय आशियात नवीन आणीबाणी निर्माण केली. ही प्रत्यक्ष कृती म्हणजे डचांच्या मर्मावरच पाय होता. व्यापारी कंपन्या, बँका, तेल-खाणी, आगबोट व विमान कंपन्या, हॉटेले इत्यादी क्षेत्रात डचांचे सुमारे हजार कोटी रुपये भांडवल गुंतले असून प्रतिवर्षी नफ्याच्या रूपाने 500 कोटी रुपयांची संपत्ती ते इंडोनेशियांतून नेतात! इंडोनेशियाची ही एका परीने आर्थिक पिळवणूकच आहे.
सुमारे 45 हजार डच लोक इंडोनेशियात निरनिराळे उद्योगधंदे चालवतात; किंबहुना इंडोनेशियाच्या संपत्तीचा ओघ युरोपकडे वळविण्याचे कार्य यांच्यामार्फत चालते. डॉ. मसादिकने आबादानची तेलखाण कंपनी ताब्यात घेऊन आणि नासेरने सुएझ कालवा हस्तगत करून ब्रिटिश साम्राज्यशाहीला धक्के दिले; आता इंडोनेशियन जनतेने राष्ट्राध्यक्ष डॉ. सोकानो यांच्या नेतृत्वाखाली डच साम्राज्यशाही जेरीस आणण्याचे ठरविलेले आहे.
युरोपीय वर्चस्वाला घरघर
आशिया खंडात युरोपीय वर्चस्वाचे दिवस आता संपूर्णपणे भरले आहेत, याचीच इंडोनेशियातील घटना साक्ष देत आहेत. आज ना उद्या आपले आर्थिक वर्चस्व नष्ट होणार ही वस्तुस्थिती डच ओळखून होते; परंतु आपल्या हितसंबंधांना एकदम एवढा तडाखा बसेल, याची त्यांना कल्पना नव्हती. पाच वर्षांच्या काळात पुरेशी नुकसानभरपाई पदरात पाडून घेऊन क्रमाक्रमाने घुमजाव करण्याचा त्यांचा बेत होता. परंतु आता वातावरण इतके तापले आहे आणि इंडोनेशियन सरकार इतके कडक उपाय अवलंबीत आहे की, डचांचे मनसुबे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पार पडतील अशी चिन्हे दिसत नाहीत.
घटनांचे क्रांतिकारी स्वरूप
इंडोनेशियात घडलेल्या घटनांचे केवळ एक छोटे बंड वा उलथापालथ असे स्वरूप नाही. घडलेल्या घटना क्रांतिकारक आहेत. कामगारांनी सर्व उच्च कंपन्यात संप घडवून बऱ्याच ठिकाणी डचांचे कारखाने ताब्यात घेतले आहेत. सरकारने जनतेच्या या उठावात कोणताही अडथळा आणला नसून सर्व तऱ्हेचे साहाय्य जनतेला केले आहे आज इंडोनेशियात डचांवर लष्करी अंमलच आहे, असे म्हटले पाहिजे. सरकारने वॉर अॅडमिनिस्ट्रेटर नेमला असून जकार्तामधील 49 कंपन्या त्याने ताब्यात घेतल्या आहेत. गॅस व वीज कंपन्या, फिलिप्स रेडिओ कंपनीचे कारखाने वगैरे सर्व डच कंपन्यावर पश्चिम जावातील लष्करी सत्तेचे नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले आहे.
उत्तर सुमात्रातील तेलखाणी राष्ट्रीय मालकीच्या आहेत, असे इंडोनेशियाच्या सर सेनापतीने जाहीर केले असून त्यांच्या व्यवस्थापनासाठी सेनाधिकाऱ्यांचे एक संचालक मंडळ त्यांनी नेमले आहे. इतकेच नव्हे तर इंडोनेशियन अर्थव्यवस्थेचे गाडे खिळखिळे होऊ नये म्हणून सरकारने डच तज्ज्ञावर आणि तंत्रविशारदावर इंडोनेशिया सोडून न जाण्याचा बंदी हुकुम बजावला आहे.
अंतर्गत संभाव्य धोका
या सर्व घटना इतक्या थोड्या अवकाशात आणि इतक्या क्रांतिकारक पद्धतीने घडल्यामुळे त्यावर विश्वास बसत नाही. इंडोनेशियाची अंतर्गत राजकीय परिस्थिती अतिशय अस्थिर आहे; गेल्या सात-आठ वर्षात तेथे आठ-दहा मंत्रिमंडळे झाली असून सैन्यातील बंडाळी, जातीयवादी मुस्लिम संघटनांचे हिंसक उठाव, कम्युनिस्टांचे राजकीय कट आणि राष्ट्रीय आघाडीवर पक्षापक्षातील वैमनस्य यामुळे इंडोनेशियातील राजकीय जीवन अतिशय अनिश्चित व अशाश्वत झाले आहे. डचांचे आर्थिक प्राबल्य नष्ट करण्याबाबत डॉ. सोकानो यांच्या नेतृत्वाखाली अवघे राष्ट्र एकवटल्यासारखे दिसत असले तरी राष्ट्रातर्गत अनेक कलह आहेत.
लष्करी सत्तेचे अधिकार सध्या डचांशी भांडण असल्यामुळे वाढले आहेत; किंबहुना वरचष्मा आहे तो लष्करी सत्तेचा. याचा परिणाम म्हणून इंडोनेशियात संपूर्ण अनियंत्रित सत्तेचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. किंवा सध्या संघर्ष आहे, आणीबाणी आहे, त्याचा फायदा घेऊन मुस्लिम जातीयवादी बंडखोर व कम्युनिस्ट अराजक माजवण्याचाही प्रयत्न करतील. या संभाव्यतेचा विचार करण्यासाठी इंडोनेशियाच्या राजकीय परिस्थितीकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे.
तीन प्रमुख राजकीय प्रवाह
इंडोनेशियाच्या राजकीय जीवनात तीन प्रमुख प्रवाह आहेत : (1) जातीयवादी मुस्लिम संघटनांचा: इंडोनेशियात इस्लामी धार्मिक राज्याची स्थापना व्हावी यासाठी सनदशीर मार्गापासून हिंसेपर्यंत सर्व मार्गाचा अवलंब करणारे ‘दारुल इस्लाम’ यासारखे पंथ आहेत. प्रतिष्ठितपणे जातीयवादी राजकारण खेळणारा मस्जुसी पक्ष याच इस्लामी राज्याच्या कल्पनेने भारावून गेला आहे. (2) दुसरा प्रवाह हा राष्ट्रीय प्रवृत्तीचा आहे; परंतु तो दुभागला आहे. डॉ. सोकानो डॉ. हाटा आणि शारियर हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंपादनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. परंतु त्यांच्यात अनेक प्रश्नात तीव्र स्वरूपाचे मतभेद आहेत. डॉ. हाटा व शारियर हे कम्युनिस्टांशी कोणत्याही प्रकारे सहकार्य करायला तयार नाहीत; उलट डॉ. सोकानो यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सर्वपक्षीय मंत्रिमंडळाने कम्युनिस्टांचे सहकार्य घेतले पाहिजे, असे सोकानो यांचे मत आहे. त्यांचा गायडेड डेमोक्रसीचा मार्गदर्शित लोकशाहीचा प्रयोग अशा प्रकारच्या सर्वपक्षीय पाठिंब्यावर आधारलेला आहे. परंतु डॉ. हाटा, डॉ. शारियर हे निर्भेळ लोकशाहीवादी आहेत. त्यांना कम्युनिस्टांबरोबर संयुक्त मंत्रिमंडळात प्रवेश करण्याचे धोरण तत्त्वतः व मूलतः चूक वाटते. डॉ. हाटा व डॉ. सोकानो यांच्यांतील मतभेद ही एक राष्ट्रीय आपत्तीच होय. डॉ. सोकानोंवर राष्ट्रनेते म्हणून जनतेची अव्यभिचारी निष्ठा असली तरी राजकीय व लष्करी गटांचा असंतोष राष्ट्रीय नेतृत्वाच्या कार्यात अडथळे निर्माण करीत आहे. नुकताच डॉ. सोकानो यांचा खून करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. देशातील राजकीय अशांतता कोणत्या थराला गेली आहे याचा तो प्रयत्न ही साक्ष आहे. (3) तिसरा प्रवाह हा कम्युनिस्टांचा आग्रेय आशियातील असंतोषाचा फायदा घेऊन ते सत्तारूढ होण्यासाठी दबा धरून बसले आहेत. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा त्यांना पाठिंबा आहे. देशातील अराजकाचे शक्य तेवढे भांडवल करण्याची त्यांची खटपट आहे. डच साम्राज्यशाहीविरुद्ध नुकत्याच झालेल्या उठावात कामगारांचे नेते म्हणून ते तळपले आहेत. या संघर्षांमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीचा फायदा घेऊन सत्ताग्रहण करण्याचा ते जरूर प्रयत्न करतील. जावामध्ये त्यांची संघटना प्रबल आहे; किंबहुना नजीकच्या भविष्यकाळात जावात कम्युनिझम यशस्वी होईल अशी भीती ब्रिटिश मजूर पक्षाचे नेते श्री. गेटस्केल यांनी नुकतीच व्यक्त केली आहे.
सोकानोच्या दौऱ्याचे गूढ
या सर्व परिस्थितीचा विचार करतो डॉ. सोकानी यांच्या सहा आठवडे परदेश दौऱ्यावर जाण्याच्या हेतूचे आश्चर्य वाटते. त्यांचा आजार खरा आहे की राजकीय आहे, हे समजत नाही. ते परदेशात इंडोनेशियाची बाजू बळकट करण्याच्या दृष्टीने जात आहेत हे उघड आहे. परंतु सहा आठवड्यांची मुदत ही सध्यांच्या अस्थिर व आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वास्थ्याच्या दृष्टीने दीर्घ नाही का? आज इंडोनेशियात साम्राज्यशाहीचे उरलेसुरले अवशेष खिळखिळे झाले आहेत ही आनंदाची घटना होय; परंतु त्यांची जागा घेण्यासाठी त्या देशात जी लोकशाही राजकीय स्थैर्य आणि ऐक्य असावयास हवे ते नाही. वरवरच्या दिखाऊ ऐक्यामागे अनेक गट दबा धरून बसले आहेत. त्यामुळे कम्युनिझमचे संकट आज इंडोनेशियात निर्माण झाले आहे.
कम्युनिझम ही विसाव्या शतकातील नवी साम्राज्यशाही आहे. ती किती निर्पूण आणि निर्दय असते याचा पुरावा हंगेरीच्या प्रकरणी रशियाने दिलाच आहे. म्हणून उच्च साम्राज्यशाही जाऊन त्या जागी कम्युनिस्ट साम्राज्यशाही येणार असेल तर आग्नेय आशियातील अशांततेचे संकट वाटेल; तणातणी वाढेल. इंडोनेशियाचे एक मिशन पूर्व युरोपात शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी गेल्याचे जे वृत्त आहे आहे ते कशाचे द्योतक आहे. आज जगात अनेक राष्ट्र दोन सत्तास्पर्धी राजकीय गटांच्या खेळातील प्यादी बनली आहेत; त्यात इंडोनेशियाची भर पडणार आहे की काय?
भारताने 1949 साली इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावर पुढाकार घेतला होता. दबाव आणि विचारप्रचार या दोन्ही मार्गाचा अवलंब करून भारताने इंडोनेशियन स्वातंत्र्य साकार करण्यात बहुमोल कामगिरी बजावली. आज इंडोनेशियावर कम्युनिझमचे संकट असताना भारत तसा पुढाकार घेईल का? कारण प्रश्न केवळ पश्चिम इरियन डचांकडून हस्तगत करण्याचा नाही. डचांशी असलेला वाद समाधानकारक रीतीने सोडवून इंडोनेशियात स्थिर लोकशाही निर्माण करण्याचा आहे. डचांनी पश्चिम इरियन खाली केले पाहिजे यासाठी भारत जितके प्रयत्न करील तितकेच प्रयत्न भारताने आग्नेय आशियांतील कम्युनिझमचा विस्तार थांबविण्यासाठी केले पाहिजेत. दुर्दैवाने भारताचे धोरण जितके प्रखर साम्राज्यविरोधी आहे तितके कम्युनिझमविरोधी नाही. कम्युनिझमशी सहजीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा भारत आग्नेय आशियांतील या अतिशय आणीबाणीच्या वेळी आपली जबाबदारी पार पाडू शकेल का?
इंडोनेशियात नुकत्याच घडलेल्या घटनांची जबाबदारी अंतिम दृष्ट्या डचांवर, त्यांच्या आडमुठेपणावर आहे हे खरे असले तरी या घटनात जो लोकशाही मार्गाचा संपूर्ण अव्हेर केलेला दिसतो तो धोक्याचा आहे. इंडोनेशियन जनतेने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले आहे. यापुढे अधिक संयमाची, सामोपचारी वृत्तीची आवश्यकता आहे. सर्वच गोष्टी तडकाफडकी सैन्यबलावर होऊ लागल्या तर इंडोनेशियातील लोकशाहीचे भवितव्य धोक्यात येईल. म्हणून इंडोनेशियाची मागणी न्याय्य आहे, हे शंभर वेळा मान्य करूनही आम्हास सांगावेसे वाटते की, आग्नेय आशियातील लोकशाहीचे भवितव्य लक्षात घेऊन इंडोनेशियाने आता जरा सबुरीने घेतले पाहिजे; इतर राष्ट्राच्या सहकार्याने हा प्रश्न सोडविला पाहिजे. भारताने आपली तटस्थ वृत्ती क्रियाशील करून या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेत इंडोनेशिया बड्या दोघांचे आलटून-पालटून प्यादे होणार नाही, यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. मध्यपूर्वेतील अपयशी प्रयत्नांपासून योग्य तो धडा घेऊन भारत या बाबतीत अधिक दक्षतापूर्वक पावले टाकील काय?
Tags: Imperialism Communism West Irian साम्राज्यशाही कम्युनिझम पश्चिम इरीयन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या