डिजिटल अर्काईव्ह

वि.स. खांडेकरांनी आपल्या अनेक रूपककथांतून खूप सूचकपणे सांगितले. उदाहरणार्थ, 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' या शीर्षकाची एक रूपक कथा त्यांनी लिहिली आहे. कल्पना अशी आहे की, ते तिघं परत पृथ्वीतलावर येतात आणि आपल्या काळातल्या आठवणी घेऊन वर्तमानात वावरतायत. तेव्हाची त्यांची तगमग त्यात दाखवलेली आहे. बुद्ध दुःखी, ख्रिस्त पश्चात्तापी आणि गांधी अस्वस्थ दाखवलेले आहेत. मला वाटते, एवढे तीन शब्दसुद्धा खांडेकरांच्या लेखनाचे सामर्थ्य व्यक्त करायला पुरेसे आहेत.

प्रश्न : वि.स. खांडेकर त्यांच्या हयातीमध्ये 55 वर्षे लोकप्रिय मराठी लेखक होते. त्यांच्या मृत्यूला 2 सप्टेंबर 2026 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत, आजही ते मराठीतील लोकप्रिय लेखक आहेत. म्हणजे 105 वर्षे मराठीमध्ये वि.स खांडेकर वाचले जात आहेत. नुसते वाचले जात नाहीत, प्रत्येक तरुण पिढीवर या ना त्या प्रकारचाप्रभाव टाकून जात आहेत. अर्थातच वाचणाऱ्या लिहिणाऱ्या पिढीवर. अशा या वि. स. खांडेकरांची अगदी सुरुवातीच्या काळातली घडण समजून घेतली पाहिजे, त्यांच्यातील लेखकाचे किंवा साहित्यिकाचे बीजारोपण कसे झाले, हे समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम त्यांचे बालपण, कुमारवय आणि शालेय शिक्षण कुठे व कसे झाले हे समजून घ्यायला हवे. काय सांगाल ?

- आज सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, शंभर वर्षांपूर्वी सांगली हे संस्थानिकांचे गाव होते. एका बाजूला नाटक, दुसऱ्या बाजूला संस्थान, तिसऱ्या बाजूला ग्रंथालय असं वातावरण बालकुमार वयातील खांडेकरांना मिळालं. खांडेकरांचे पूर्वज मूळचे कोकणातील सावंतवाडीचे, खांडेकरांचे वडील तिथून सांगलीला आले. ते सांगली संस्थानामध्ये मुनसफ म्हणजे सबजज होते. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता सुखवस्तू घराण्यात त्यांचा जन्म झाला. पण वडिलांच्या अकाली निधनामुळे घराचे वासे फिरले आणि अगदी अचानक विपन्न स्थिती कुटुंबावर गुजरली. पण घरामध्ये नाटकांचं वातावरण होतं, गणपती देवस्थानाच्या परिसरात त्यांचे घर होते आणि जवळच सार्वजनिक वाचनालय होते. खांडेकर शाळेला जाताना वाचनालयातून एक पुस्तक घ्यायचे, मधल्या सुट्टीत परत पुस्तक बदलायला जायचे आणि संध्याकाळी घरी जाताना तिसरं पुस्तक घ्यायला जायचे. म्हणजे त्यांना वाचनाची विलक्षण ओढ बालवयातच लागली. त्यासंदर्भात त्यांनीच एक आठवण सांगितली, "मी रोज तीन हेलपाटे ग्रंथालयात घालायचो. ते बघून एकदा ग्रंथपाल म्हणाले, तीन हेलपाटे करण्यापेक्षा तू एका वेळी तीन पुस्तकं घेऊन जात जा."

खांडेकरांचं पहिलं पुस्तक 'संगीत रंकाचे राज्य' हे नाटक आहे. पहिलं पुस्तक नाटकाचं असणं यातूनही सांगलीचे बालपण महत्त्वाचं ठरलं हे लक्षात येतं. सांगली गावाला आजही आपण 'नाट्य पंढरी' म्हणून पाहतो. म्हणजे नाटककार गो. ब. देवल तिथे होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा सहवास त्यांना लाभलेला होता. कृ.प्र. खाडिलकरांची नाटकं त्यांनी वाचलेली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांना बालपणीच असं स्वप्न पडायला लागलं की, आपण मोठे झाल्यावर एक नाटक लिहावं. म्हणून त्यांनी 'रमणी रत्न' नावाचं नाटक लिहिलं. त्या वेळचे प्रख्यात समीक्षक वासुदेव खरे शास्त्री मिरजला राहत होते. त्यांच्याकडे रमणी रत्न हे नाटक घेऊन जाणारे खांडेकर पंधरा वर्षांचे होते. शास्त्री म्हणाले, "बाळ, तू हे नाटक कुणाला दाखवू नको, कुणाचाही विश्वास बसणार नाही की हे तू लिहिलेलं आहे." म्हणजे नाटकाची प्रगल्भजाण बालवयातच त्यांना आलेली होती.

'संगीत रंकाचे राज्य' हे खांडेकरांचं पुस्तक 1928 ला प्रकाशित केलं, पण त्याआधीच ते नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यामुळे, त्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये त्या नाटकाच्या सादरीकरणाचे फोटो दिसतील. नाटकामध्ये पूर्वी स्त्रियांची भूमिका पुरुष करत असत. स्त्रियांची भूमिका स्त्रियांनी करण्याचा प्रघात खांडेकरांच्या या नाटकापासून मराठीमध्ये सुरू झालेला दिसेल. उषाची भूमिका कमलाबाईंनी केली होती. म्हणजे खांडेकर मराठी साहित्यामध्ये नाटककार म्हणून आले, पण कोणीही त्यांचा उल्लेख नाटककार म्हणून कधी करत नाही.

प्रश्न : सांगलीतल्या जडणघडणीनंतर ते पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये आले. मात्र मध्येच त्यांनी ते शिक्षण सोडून दिलं आणि कोकणातील शिरोडा या गावामध्ये ते शिक्षक म्हणून गेले. तर पुण्यातून इतक्या लवकर बाहेर पडण्याचं कारण, केवळ व्यक्तिगत कौटुंबिक स्तरावरची परिस्थिती होती की पुढच्या शिक्षणामध्ये त्यांना फारसा रस वाटत नव्हता ? फर्ग्युसन सोडून ते शिरोड्याला गेले, तेव्हा त्यांच्याकडे केशवसुतांच्या कवितेचे एक पुस्तक होते, असा उल्लेख येतोय. तर ती काय प्रक्रिया होती ?

- खांडेकरांचे वडील 11 ऑक्टोबर 1911 ला निवर्तले. त्यामुळे घराची परिस्थिती हलाखीची झाली. 1914 च्या दरम्यान खांडेकर फर्ग्युसनला शिकायला आले. त्यांच्या मामांनी त्यांना तिथे पाठवलं होतं, कारण त्यांचा मोठा भाऊ शंकर हा अगोदरच फर्ग्युसनमध्ये दाखल झालेला होता. पण मामाच्या लक्षात आलं की, आपण दोन मुलांचे शिक्षण करू शकणार नाही. त्यामुळे मामांची तार येते आणि ते सांगतात की, 'तुला दत्तक जायचं आहे, तू ताबडतोब सांगलीला ये.' घरच्या परिस्थितीमुळे त्यांना काकांना दत्तक देण्यात आलं. काकांना 14 अपत्यं झाली होती, पण एकही जिवंत राहिलेलं नव्हतं. त्यांची मोठी सावकारी नाणेलीला होती, सावंतवाडीजवळ एक छोटं गाव. आणि त्यांना आपल्या इस्टेटीला वारस पाहिजे होता. दत्तकीकरणानंतर ते शिकत होते, पण सखाराम पंतांनी म्हणजे दत्तक वडिलांनी त्यांना कधीही शिक्षणासाठी म्हणून पैसे पाठवले नाहीत. त्यांचा होरा असा होता की, आपण पैसे पाठवत राहिलो तर हा शिकत राहील आणि आपल्या इस्टेटीला वारस राहणार नाही. पुढे मामा असं म्हणायला लागला की, तू आता दत्तक गेलेला आहे. माझी परिस्थिती ओढाताणीची आहे. त्यामुळे, अत्यंत नाइलाजाने खांडेकरांना कॉलेजच्या दुसऱ्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून परत सावंतवाडीस दत्तक घरी परतावे लागले.

वर्ष-दीड वर्ष खांडेकर पुण्यात राहिले. त्या काळाने त्यांचे जीवन समृद्ध केले. त्या दीड वर्षात फर्ग्युसनमध्ये खांडेकर काय शिकले, याचे फारसे तपशील सापडत नाहीत. पण या दीड वर्षाच्या काळात राम गणेश गडकरींच्या सहवासात ते किती होते याचे भरपूर तपशील मात्र सापडतात. गडकरींच्या सहवासातून खांडेकरांमधील साहित्यिकाची घडण झाल्याचे दिसते. त्या काळची खांडेकरांची छायाचित्रे पाहिली तर टोपी व कोट असा पोशाख आणि मिशा, चश्मा असे ते दिसतात. इथेही खांडेकर गडकऱ्यांचं अनुकरण करत होते. त्या काळामध्ये गडकरी माडीवर बिडी पीत असायचे आणि त्या धुराच्या वलयात त्यांच्याशी खांडेकर चर्चा करत असायचे. गडकऱ्यांच्या अनेक आठवणीदेखील खांडेकरांनी लिहून ठेवलेल्या आहे. माझं असं प्राथमिक आकलन आहे की, खांडेकर साहित्यिक होण्यामध्ये सुरुवातीला गडकऱ्यांचा, नंतर कोल्हटकरांचा, त्यानंतरच्या काळात नाटककार होण्यात देवलांचा मोठा प्रभाव दिसून येतो. केशवसुतांच्या कवितांचा त्यांच्यावर सुरुवातीला प्रभाव राहिला. पुढे त्यांनी केशवसुतांच्या काव्याचे समीक्षात्मक पुस्तक संपादित केले, त्याला दीर्घ (70-75 पानांची) प्रस्तावना लिहिली आहे. खांडेकरांनी स्वतः कविता लिहिलेल्या आहेत. त्या कवितांचं पुस्तक अविनाश अवलगावकर यांनी संपादित केलंय.

प्रश्न : मात्र खांडेकरांनी कविता लिहिल्यात हे महाराष्ट्राला माहीत नाही, अगदी अलीकडेपर्यंत मलाही माहीत नव्हतं. तर खांडेकरांच्या कविता तुम्ही पाहिल्यात का, नजरेखालून घातल्यात का? त्यांचे काय वेगळेपण किंवा वैशिष्ट्ये आहेत ?

- मराठीमध्ये कवितेचे दोन प्रकार मानले गेलेले आहेत कविता आणि गीत. गीत हा शब्द बहुधा सिनेमाशी जोडलेला असतो. कविता आणि गीत यांच्यामध्ये एक व्यवच्छेदक अंतर असतं. कविता उत्स्फूर्तपणे निर्माण होते, गीत हे रचलं जातं. गीतकाराला आदेशानुसार काव्य लिहायला लागतं, कवीला मात्र कुणाच्या आदेशाने काव्य सुचत नाही. खांडेकरांनी दोन्ही प्रकारचे लेखन केले. माझं आकलन असं आहे की, खांडेकरांमधला गीतकार जितका मोठा आहे तितका त्यांच्यातला कवी मोठा नाहीये. त्यांची कविता यमक प्रधान, छंद पाळणारी आणि अलंकारप्रचुर आहे. शब्दांत अडकलेली कविता असे तिचे स्थूल वर्णन करता येईल. गीतांमध्ये नादमय खांडेकर दिसतात, तशी नादमयता त्यांच्या काव्यामध्ये दिसणार नाही. खांडेकरांनी सिनेमांसाठी गीते रचलेली आहेत, त्या गीतांमध्ये काव्यभाव जितका सशक्त दिसतो तितकाच विचारभावदेखील दिसतो, भावनांची मोठी वलये दिसतात.

प्रश्न : 1920 च्या दरम्यान खांडेकर शिरोड्याला गेले आणि पुढे जवळपास 18 वर्षे तिथे राहिले. त्या काळात एका बाजूला ते शिक्षक म्हणून काम करत होते, दुसऱ्या बाजूला कथाकार आणि कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला माहीत होत होते. आणि तिसऱ्या बाजूला तिथे ते 'वैनतेय' या साप्ताहिकाचे संपादन करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी वैनतेय मध्ये विपुल लेखन केलेलं आहे. मला असं दिसतं की, वैनतेय मधलं खूपच कमी लेखन त्यांच्या हयातीमध्ये पुस्तकरूपाने आलं, अलीकडच्या काळात ते जास्त आलं असावं. बरोबर ?

- वास्तव असं आहे की, 'वैनतेय 'मधील खांडेकरांचं कोणतंच लेखन त्यांच्या हयातीत पुस्तकरूपाने आलेलं नाही. जे काही आलेलं आहे, ते मी 2002 नंतर जी 32 पुस्तकं संपादित केली त्यातील पाच पुस्तकांत आणलं आहे. मला या ठिकाणी एका गोष्टीचा अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायला आवडेल. तो असा की, वैनतेय मधलं कोणतं लेखन खांडेकरांचं आणि कोणतं मेघश्याम शिरोडकरांचं अशी फारकत करण्याचं फार मोठं काम श्री. जया दडकर यांनी करून ठेवलेलं आहे. वि.स. खांडेकर वाङ्गय सूची त्यांनी केली आहे. तिच्या आधारे खांडेकरांची विविध पुस्तके मी साकारली. त्याचे उद्गाते किंवा खरं म्हणजे जनक जया दडकर आहेत. वैनतेयच्या पहिल्या अंकापासून शेवटच्या अंकापर्यंत म्हणजे ऑक्टोबर 1924 पासून ऑक्टोबर 1938 पर्यंत खांडेकर हे वैनतेयचे वाङ्गयीन विभागाचे संपादक होते. वैनतेयचे संपादक मेघश्याम शिरोडकर असले तरी वैनतेय हे नाव खांडेकरांनी ठेवलेलं आहे, गरुड या अर्थाने. त्यांची कल्पनाच अशी होती की, 'हे साप्ताहिक गरुडाच्या उतुंग भरारीप्रमाणे जीवनाच्या सर्व विभागांचे विहंगमावलोकन करेल आणि ते जीवनस्पर्शी असेल.' एक स्वप्नाळू आदर्शवाद वैनतेय स्थापन करताना खांडेकरांच्या मनामध्ये होता.

पूर्वीच्या काळामध्ये साप्ताहिकं, वर्तमानपत्रं यांना बोधवाक्यं किंवा ध्येयवाक्यं असायची. तसं वैनतेयचा जो संस्कृत श्लोक आहे तोदेखील खांडेकरांनी रचलेला आहे. खांडेकरांनी वैनतेयमध्ये विपुल लेखन केलेलं आहे. ते दर शनिवार-रविवारी शिरोड्यातून सावंतवाडीला चालत जायचे, दीड दिवसांत वैनतेयच्या अंकाचे लेखन करायचे आणि परतायचे. त्यामुळे खांडेकरांनी वैनतेयच्या एखाद्या अंकात लिहिलं नाही हा शोधाचा भाग ठरेल.

प्रश्न : तुम्ही ते अंक पाहिलेले असतील, काय स्वरूप होते त्या अंकांचे आणि खांडेकरांनी त्यात काय काय लिहिलं ?

- वैनतेय हे चार पानांचं साप्ताहिक असायचं, टॅबोलाईड आकाराचं. त्याचा पहिला अंक मूळ रूपात कोल्हापूरच्या वस्तु संग्रहालयामध्ये प्रदर्शित आहे. ज्या ज्या अंकांमध्ये खांडेकरांनी लिहिलेलं आहे ते सगळे अंक मी हाताळलेले आहेत. जया दडकरांनी सूचीमध्ये जे जे लिहिलं ते ते मी पाहिले आहे. त्या काळामध्ये झेरॉक्स इतकं प्रचलित नव्हतं, त्यामुळे बरंचसं लेखन मी हाताने लिहून उतरून काढलेलं आहे. त्या लेखनातून खांडेकरांची पाच पुस्तकं संपादित केली आहेत.

प्रश्न : वैनतेय हे साप्ताहिक असल्यामुळे आणि त्याचे अंक चारच पानांचे असल्यामुळे प्रामुख्याने नॉन फिक्शनच मजकूर त्यामध्ये असेल. तर नॉन फिक्शन मजकूर होता म्हणून तो खांडेकरांनी संग्रहित करून पुस्तक रूपाने आणला नव्हता, की ते लेखन त्या दर्जाचं नाहीये (प्रासंगिक आहे) म्हणून संकलित केलेला नव्हता ?

- खांडेकरांनी त्यातलं बरंचसं लेखन टोपण नावाने केलेलं आहे. परिचित, कुमार अशा वेगवेगळ्या टोपण नावांनी केलेले आहे. जया दडकरांनी खांडेकरांशी आणि शिरोडकरांशी चर्चा करून नोंद केले की, हे अग्रलेख यांचे आहेत. अग्रलेखावर लेखकाचं नाव नसतं, पण जया दडकरांनी कोणते अग्रलेख शिरोडकरांचे आणि कोणते खांडेकरांचे ते नोंद करून ठेवले आहे. कधी कधी समग्र अंक खांडेकर लिहायचे. त्यामुळे खांडेकरांनी वैनतेयमध्ये लिहिलेले अग्रलेख दिसतील, विभिन्न सदरे दिसतील, पुस्तक परीक्षण दिसतील, काल्पनिक स्फुटांचं संकलन दिसेल, वेगवेगळ्या राजकीय विषयांवर लेख दिसतील. कधी बातमीपत्रं दिसतील, कधी व्यक्तिचित्रं दिसतील, कधी लघुनिबंध दिसतील, कधी वैचारिक लेख दिसतील.

प्रश्न : विनोदी लेखन, त्यातही 'गाढवाची गीता' आणि 'गाजराची पुंगी' महत्त्वाचं आहे. त्यांचं एक पुस्तकही तुम्ही संपादित केलेय. काय प्रकार आहे तो ?

- गीतेचे 18 अध्याय आहेत. तसं खांडेकरांनी विनोदी शैलीत '18 भागांत गाढवाची गीता' लिहिले. हे सदर लोकांना त्या काळात इतकं आवडलं होतं की, नंतर 'गाढवापुढे गीता' असे तीन भाग त्यांनी लिहिलेले दिसतात. 'गाजराची पुंगी' मध्ये कोटीबाज शैलीने आणि जरा टर उडवत विनोदी लेखन केले आहे. खांडेकरांवर कोल्हटकरांचा जो भाषिक प्रभाव होता, त्याचं वर्तमान रूप म्हणजे गाजराची पुंगी आणि गाढवाची गीता असं सांगता येईल.

प्रश्न : 1938 मध्ये खांडेकर वयाच्या साधारणतः चाळिशीच्या टप्प्यावर शिरोडा सोडून कोल्हापूरला आले. तेव्हा ते लेखक-साहित्यिक म्हणून नावारूपाला आले होते. आणि त्याच काळात त्यांना सिनेमाच्या पटकथा लेखनासाठी आमंत्रित केलं जात होतं. म्हणजे केवळ लेखक म्हणून उपजीविका करू शकू असा आत्मविश्वास त्यांना आला म्हणून त्यांनी नोकरी सोडली? की यापेक्षा वेगळे कारण आहे ?

- 1936 मध्ये ते कोल्हापूरला आले, 1938 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ते चित्रपट सृष्टीमध्ये अपघाताने आले. मास्टर विनायक, बाबुराव पेंढारकर आणि बापूराव नाईक हे तिघे 'कोल्हापूर सिनेटोन' कंपनीत होते. त्यामध्ये मास्टर विनायक हे दिग्दर्शक होते, पेंढारकर हे नट होते आणि नाईक हे कॅमेरामन होते. कोल्हापूर सिनेटोन मध्ये त्यांचे मतभेद झाले. तेव्हा यांनी स्वतःची चित्रपट कंपनी 'हंस पिक्चर्स' नावाने 1936 मध्ये स्थापन केली. पहिल्याच सलामीला महाराष्ट्र जिंकेल अशी पटकथा त्यांना पाहिजे होती. त्यासाठी हास्यरस असलेली कथा हवी होती. कारण त्या काळामध्ये चि. वि. जोशींचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव होता. मास्टर विनायक यांना असं वाटलं की, मराठीत अजून हास्यात्मक चित्रपट आलेला नाही. 'लॉरेल हार्डी'चा आदर्श त्यांच्यापुढे होता. तसा चित्रपट काढावा म्हणून ते आचार्य अत्रेकडे गेले, तेव्हा ते एका नाटकाच्या लेखनात व्यग्र होते. त्यांनी बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायकांना सांगितले की, 'तुम्ही थोडे थांबणार असाल तर मी कथा लिहीन.' पण हे एका कंपनीतून बाहेर पडलेले होते आणि लगेच चित्रपट आल्याशिवाय नवीन कंपनी चालणार नाही, असे त्यांना वाटले. मग अत्रे म्हणाले, 'मी तुम्हाला पर्यायी कथाकार देतो. ते चांगली कथा देतील. ती कथा हास्यात्मक नसेल, गंभीर असेल. पण तो चित्रपट चालेल अशी माझी स्वतःची धारणा आहे.' असे म्हणून त्यांनी खांडेकरांचे नाव सांगितले.

मग पेंढारकर आणि मास्टर विनायक शिरोड्याला गेले. तेव्हा खांडेकरांच्या ध्यानीमनी नव्हतं की, आपण पटकथा लिहू. ते म्हणाले की, हा माझा पिंड नाही. पण पहिल्याच कथेला पाचशे रुपये देणार असं त्यांनी म्हटल्यानंतर खांडेकरांनी होकार दिला. त्या काळात त्यांना 80 रुपये पगार होता, त्यातील निम्माच मिळायचा. 'माझा अनुभव नाही, पण मी प्रयत्न करतो' असे खांडेकर म्हणाले. त्यावर हे तिघे म्हणाले, 'निमंत्रण स्वीकारत असाल तर आता आमच्याबरोबरच चालायचं. कारण आम्हाला रोज दृश्यं लिहून ते शूट करायला लागते. त्यामुळे तुम्ही रजा काढा आणि आमच्याबरोबर चला.' आणि मग 1936 मध्ये खांडेकर 'छाया' नावाच्या पटकथा लेखनासाठी कोल्हापुरात आले. खांडेकरांचं हस्ताक्षर वाचनीय नव्हतं. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना कंपनीने लेखनिक दिला गेला, ते होते ग.दि. माडगूळकर. तो सिनेमा फार चालला नाही, पण 1936 चे भारतीय सिनेसृष्टीचे पटकथा लेखनाचे पहिले सुवर्ण पदक (गोहर मेडल) खांडेकरांना मिळालेले आहे. बंगालच्या पत्रकारांनी चित्रपट सृष्टीसाठी ते पदक सुरू केले होते.

प्रश्न : 1936 मध्ये खांडेकरांनी पहिली पटकथा लिहिली आणि त्यानंतर पुढची जवळपास 25 वर्षे त्यांनी पटकथा लिहिलेल्या आहेत. त्यातून 28 सिनेमे आले, त्यामधले साधारणतः अर्धे मराठीतले आणि अर्धे हिंदी व अन्य भाषांमध्ये आलेले आहेत.

- वस्तुतः ते 12 चित्रपट आहेत. त्या काळामध्येही चित्रपट निर्मितीला मोठा खर्च यायचा, केवळ मराठीतून त्याची भरपाई व्हायची नाही. मराठी चित्रपट डबिंग करून हिंदी व अन्य भाषांमध्ये जायचे. खांडेकरांच्या पटकथा असलेले हिंदी चित्रपटही गाजले. मराठी, हिंदी पटकथांमुळे त्यांना पुढे तमिळ आणि तेलगूमध्येपण मागणी आलेली दिसेल. आणि 'धर्मपत्नी', वगैरे चित्रपट तेलुगू, तमिळ मध्ये निघालेले दिसतील. खांडेकरांच्या चित्रपटांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्या पटकथांच्या नंतर कादंबऱ्या झाल्या. त्या कादंबऱ्यांच्य मध्ये चित्रपटातले फोटो छापले जायचे. पटकथांच्या पुस्तिका आणि त्या कादंबऱ्या चित्रपटांच्या तिकिटांबरोबर विकल्या जायच्या. असा एक रम्य सुवर्णकाळ खांडेकरांनी पटकथा लेखक म्हणून अनुभवलेला आहे.

प्रश्न : खांडेकरांच्या सर्व पटकथांचं संकलन करून, त्याला पार्श्वभूमी देऊन, गरजेनुसार तळटिपा देऊन तुम्ही 'अंतरीचा दिवा' या नावाने जवळपास 600 पानांचं पुस्तक संपादित केलेलं आहे. आणि हे अलीकडे म्हणजे 2012 मध्ये आलेलं दिसतंय. तर सगळ्या पटकथा बघितल्यावर-वाचल्यावर आणि हे सर्व सिनेमे (उपलब्ध नसतील पण) मिळवता आले तर, खांडेकरांविषयी काही एक वेगळं आकलन करून घेता येईल. पण हे पुस्तक तयार करत असताना तुम्हाला खांडेकरांचं काय वेगळं दर्शन घडलं ?

- 1936-63 हा साधारणतः खांडेकरांच्या पटकथा लेखनाचा काळ आहे. शेवटचा चित्रपट 'माणसाला पंख असतात'. तो हृदयनाथ मंगेशकरांचा पहिला चित्रपट. हृदयनाथांना चित्रपट सृष्टीत स्थिर करण्यासाठी केलेली मदत म्हणून त्या पटकथेकडे पाहता येईल. खांडेकरांच्या पटकथांची भाषांतरं व्हायची, त्यांच्या पुस्तिका छापल्या जायच्या. सर्व पटकथांची इंग्रजी, गुजराती, हिंदी अशी भाषांतरं व्हायची. गमतीचा भाग असा की, त्याकाळामध्ये चित्रपट थिएटरच्या शेजारच्या पानपट्टीच्या दुकानात पटकथांची पुस्तकं विकली जायची. लोक पटकथांची पुस्तकं विकत घेऊन चित्रपट पाहिल्यावर पटकथा वाचायचे. खांडेकरांनी पुढे पुढे पटकथांमध्ये एवढी हुकूमत प्राप्त केलेली होती की, 'सोनेरी सावली' या बोलपटाची पटकथा त्यांनी तंत्रकुशल पद्धतीने लिहिलेली आहे. म्हणजे दृश्य लिहायचं आणि कंसात क्लोजअप (म्हणजे हे दृश्य क्लोज अप घ्यायचे आहे), दृश्य लिहायचं पुढे कंसात डिफ्यूज (म्हणजे हे पुसट पुसट दाखवायचं आहे), दृश्य लिहायचे आणि मिक्स (म्हणजे इथे मिक्सिंग वापरायचा आहे) इत्यादी. नंतर कॅमेऱ्याचं तंत्रही खांडेकरांनी इतकं आत्मसात केलं होतं की, खांडेकर भविष्यकाळात दिग्दर्शकांची सुट्टी करतील, असे विनायकांनी लिहून ठेवलेले आहे. बाबुराव पेंढारकरांनी एका ठिकाणी लिहिले आहे, खांडेकर अभिनयात इतके तज्ज्ञ व्हायचे की कंसामध्ये हावभाव काय असावा ते लिहून ठेवायचे.

साहित्यकार पटकथाकार होतो तेव्हा तो किती प्रभावी असतो त्याचे एक उदाहरण सांगतो. बाबुराव पेंढारकर, मास्टर विनायक हे मराठी चित्रपट सृष्टीतील मुरलेले कलाकार होते. निर्माते व दिग्दर्शक म्हणून ते अत्र्यांकडे जायचे आणि म्हणायचे, "अशी पटकथा लिहा की, चित्रपट पाहून लोक बाहेर येतील तेव्हा तोंडाला रुमाल लावून खो खो हसत येतील." आणि ते खांडेकरांकडे जायचे तेव्हा म्हणायचे, "अशी पटकथा लिहा की, चित्रपट पाहिल्यावर लोक डोळ्याला रुमाल लावत बाहेर पडले पाहिजेत." वास्तव भाग असा की, खांडेकरांचे मराठी चित्रपट आर्थिकदृष्ट्या फायद्याचे कधीच झाले नाहीत, त्याची भरपाई हिंदी चित्रपटांनी करून दिलेली आहे. पण अत्र्यांचे चित्रपट मराठीतच फायद्याचे व्हायचे, त्यामुळे त्याची भाषांतरं तितकीशी झाली नाहीत.

आणखी एक छोटा मुद्दा असा की, या दोघांच्या पटकथा आलटून पालटून पडद्यावर यायच्या. एका पडलेल्या चित्रपटाची भरपाई दुसऱ्या चित्रपटाने व्हायची. अत्रे एका बाजूला नाटक लिहीत होते आणि दुसऱ्या बाजूला पटकथा लिहीत होते. नंतर ते पटकथालेखनाकडून सिनेमा दिग्दर्शनाकडे वळले, निर्मातेही झाले. खांडेकरांबद्दल तसं झालं नाही. कारण, त्याच काळात त्यांचं कादंबरी लेखन आणि कथालेखन खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं.

प्रश्न : हे सर्व चालू असताना खांडेकर एका बाजूला कादंबरी, दुसऱ्या बाजूला कथा आणि तिसऱ्या बाजूला लघुनिबंध या तीनही प्रकारचे लेखन खूप सातत्याने करत होते. त्यामुळे, खांडेकरांच्या 18 कादंबऱ्या आहेत. त्यातल्या निम्या कादंबऱ्या सर्वांनाच माहीत असतात. तर या दीड डझन कादंबऱ्यांविषयी काय सांगाल? त्यांचा प्रभाव, त्यांच्या कथानकाविषयी ?

- खांडेकरांच्या हयातीत 15 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि अपूर्ण राहिलेल्या तीन कादंबऱ्या नंतर आल्याः 'नवी स्त्री', 'वृंदावन', 'सोनेरी स्वप्नं भंगलेली'. खांडेकरांच्या पूर्ण झालेल्या कादंबऱ्यांचा अभ्यास केला असता लक्षात येईल, त्या कादंबऱ्यांचे सगळे नायक ध्येयवादी राहिलेले आहेत. तत्कालीन समीक्षक खांडेकर व फडक्यांची संभावना 'मध्यमवर्गीयांचे लेखक' असे करत असत. ते दोघेही मध्यमवर्गीयांचे लेखक होते खरं, पण या दोघांच्या लेखनाच्या भूमिका स्वतंत्र होत्या. खांडेकरांनी रंजनासाठी म्हणूनही कोणतीही कादंबरी लिहिली नाही. पूर्ण झालेल्या त्यांच्या 15 कादंबऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण सांगायचे तर, समाजवादाच्या पेरणीसाठी त्या लिहिलेल्या आहेत, ध्येयवादाच्या समर्थनासाठी त्या लिहिलेल्या आहेत, हक्कांच्या जागृतीसाठी त्या लिहिलेल्या आहेत. 'दोन ध्रुव' आणि 'दोन मने' या कादंबऱ्यांत मध्यमवर्गीयांचं दुःख आणि दैन्य दिसेल. खरं म्हणजे महाराष्ट्राचं द्वैत चरित्र या दोन कादंबऱ्यांमध्ये पाहायला मिळेल. 'पांढरे ढग'मध्ये पांढरपेशा वर्ग कसा आत्मकेंद्रित असतो त्याचं वर्णन वाचायला मिळेल. 'जळलेला मोहर 'मध्ये मध्यमवर्गीयांचं जगणं कसं दुष्कर असतं, ते दिसेल. त्यांच्या चांगल्या व गाजलेल्या कादंबऱ्या तत्त्वप्रधान आहेत, त्यातील माईलस्टोन किंवा दीपस्तंभीय कादंबऱ्या म्हणून 'ययाति' आणि 'अमृतवेल' ही नावे घ्यावी लागतील. खरे म्हणजे अमरवेल. अमरवेल मेंदीवर वाढतो, त्याला पानं नसतात, तो कुठेही टाकला तरी त्याचं पुनरुज्जीवन होतं. एका अर्थानेघोरपडीसारखं त्याचं जीवन असतं. मध्यमवर्गीयांची स्थिती अशी असते, तो इतका परजीवी असतो की, जिथे जाईल तिथे तो अॅडॉप्ट होतो आणि मग त्याचा अमृतवेल होतो. 'ययाति' कादंबरीमध्ये खांडेकरांचे पाश्चात्त्य वाचन आणि पौर्वात्य वाचन यांचा सुंदर संगम झालेला दिसेल. त्यातील तत्त्वज्ञान आधुनिक असलं तरी त्याचे आधार पौराणिक काळातील दिसतात. ययाति हे पात्र निवडताना खांडेकरांनी अत्यंत विचारपूर्वक 1960 च्या काळातील भारतीय माणूस समोर ठेवला होता. समृद्धीकडे निघालेला माणूस चंगळवादाच्या दिशेने जात होता. खांडेकरांसारख्या कथाकाराला त्याची काळजी वाटत होती. आणि म्हणून 'भोगवाद हा आत्मनाशाकडे नेतो, तर कर्मवाद हा विकासाकडे नेतो', हे तत्त्वज्ञान घेऊन खांडेकर 'ययाति' लिहिताना दिसतात.

प्रश्न : खांडेकरांच्या सर्वच कादंबऱ्यांविषयी खूप वेगळं आणि चांगलंही विश्लेषण करता येईल. त्याच्या अधिक तपशिलात इथे जायला नको. परंतु 'ययाति' ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लहान-थोरांनी स्वीकारलेली, डोक्यावर घेतलेली व कमालीची लोकप्रिय कादंबरी आहे. 'अमृतवेल'ला इतकी लोकप्रियता मिळाली नाही, परंतु स्वातंत्र्यलढ्यातील लोक आणि ध्येयवादाबद्दल बोलणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ही खांडेकरांची सर्वोत्तम कादंबरी आहे. आणि खांडेकरांनी त्यांची सगळ्यात आवडती कादंबरी म्हणून 'उल्का'चा उल्लेख केला आहे. तर या उल्काविषयी तुमचे आकलन थोडक्यात सांगा.

-'उल्का' कादंबरीत प्रखर ध्येयवाद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय माणसाच्या पुढे, गुलाम भारताचे रूपांतर स्वराज्य भारतामध्ये करण्याचे आव्हान होते. प्रत्येक माणसामध्ये तो ध्येयवाद होता. उदाहरणार्थ, दांडी यात्रेने प्रत्येक भारतीयाला सत्याग्रही बनवलं. मग ते कृतीने असेल, मनाने असेल वा विचाराने. ग. प्र. प्रधानांचं एक उदाहरण सांगतो. 2003 चा काळ असेल. नव्याने संपादित करून प्रकाशित केलेली खांडेकरांची पहिली चार-पाच पुस्तकं घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. तीन आठवड्यांनी त्यांचं मला पत्र आलं. त्यातलं वाक्य मला अजूनही आठवतं, "खांडेकरांच्या लेखनाची तू संपादित केलेली पुस्तके मी वाचली, माझे वय उलटे झाले. माझे वय 81 वर्षे आहे, पुस्तके वाचताना माझे वय 18 झाले. तुझ्या या पुस्तकांनी मला 'उल्का'ची आठवण करून दिली." ही शक्ती खांडेकरांच्या लेखनाची होती.

प्रश्न : खांडेकरांची सर्वसामान्य वाचकांना ओळख कादंबरीकार म्हणून आहे, तशी कथाकार म्हणूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांनी लिहिलेल्या कथांचा आकडा 200 च्या आसपास असावा आणि त्यातून 18 ते 20 लहान-मोठी पुस्तके आलेली आहेत. तर खांडेकरांच्या कथांचं काय वेगळेपण होतं? जी वैशिष्ट्यं कादंबऱ्यांची आहेत, तीच कथांची आहेत की काही वेगळेपण आहे ?

- कादंबऱ्यांमध्ये लेखकाला फार मोठा विस्ताराचा अवकाश मिळत असतो. त्यामुळे खुलवून सांगण्याचं वैशिष्ट्य त्यांच्या कादंबऱ्यांत दिसतं. खांडेकरांच्या लेखनावर एक मोठा आक्षेप घेतला जातो की, ते पाल्हाळ लिहितात. आणि ते खरं आहे. सगळंच उलगडून सांगतात, त्यात सूचकता कमी असते. पण सूचकता त्यांच्यात प्रखर होती, हे त्यांच्या रूपक कथा वाचताना लक्षात येते. खांडेकरांच्या रूपक कथांना मराठी कथा साहित्यात प्रतिस्पर्धी नाही. मराठीत रूपक कथा लिहिण्याचे मोठे व चांगले प्रयत्न झालेच नाहीत. मात्र मराठी समीक्षेने खांडेकरांच्या रूपक कथाची गंभीर नोंद घेतल्याचे दिसत नाही. रूपक कथेची चण ही अत्यंत छोटी असते. वाक्ये छोटी, विस्तार जवळजवळ नाहीच. सगळं सूचकपणे सांगणं. सगळं प्रतीकांनी सांगणं. याउलट प्रचलित कथांमध्ये मात्र विस्तार असतो. खांडेकरांच्या सुरुवातीच्या काळातील कथा वीस-पंचवीस पानांच्या दिसतील, कादंबरीचे एक प्रकरण होईल अशा विस्ताराने त्या कथा लिहिलेल्या आहेत. त्या कथा वाचून एकदा कोल्हटकरच त्यांना म्हणाले होते, "एवढा शक्ती क्षय करण्याची गरज आहे का?" म्हणजे एवढं पाल्हाळ लिहिण्याची गरज आहे का? सूचकतेने लिहिता आलं पाहिजे. तेव्हापासून खांडेकरांच्या कथेचा आकार छोटा छोटा होत गेलेला दिसेल. विशेषत खांडेकरांनी खलील जिब्रान वाचला, अर्स्ट स्टोलर वाचला, चेखाँव वाचला, तुर्गनेव वाचला, तेव्हा तो विस्तार कमी झाला असावा.

खांडेकरांच्या लेखनाच्या विकासामध्ये भारतीय साहित्यापेक्षा पाश्चात्त्य साहित्यकारांचा प्रभाव फार मोठा आहे, असं माझं प्राथमिक आकलन आहे. अर्न्स्ट स्टोलरची 'तुरुंगातील पत्रे' हे पुस्तक खांडेकरांनी अनुवादित केलं आहे, ते वाचलं की लक्षात येईल, ते एकाधिकारशाहीच्या विरोधात होते. 1975 च्या आणीबाणीत ते कसे अस्वस्थ होते, हे समजून घ्यायचं असेल तर अर्स्ट स्टोलर वाचला पाहिजे. ती तुरुंगातील पत्रे आज वाचाल तर ती वर्तमानालाही तितकीच लागू असलेली दिसतील. हे खांडेकरांचं द्रष्टेपण आहे. खांडेकरांनी आपल्या अनेक रूपककथांतून खूप सूचकपणे सांगितले. उदा. 'बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी' या शीर्षकाची एक रूपक कथा त्यांनी लिहिली आहे. कल्पना अशी आहे की, ते तिघं परत पृथ्वीतलावर येतात आणि आपल्या काळातल्या आठवणी घेऊन वर्तमानात वावरतायत. तेव्हाची त्यांची तगमग त्यात दाखवलेली आहे. बुद्ध दुःखी, ख्रिस्त पश्चात्तापी व गांधी अस्वस्थ दाखवलेले आहेत. मला वाटते, एवढे तीन शब्दसुद्धा खांडेकरांच्या लेखनाचे सामर्थ्य व्यक्त करायला पुरेसे आहेत.

प्रश्न : तुम्ही कथांच्या बरोबरच रूपककथांकडे वळलात. खांडेकरांनी स्वतंत्र लिहिलेल्या रूपककथांचे पाच-सात तरी संग्रह आहेत. मात्र खांडेकरांनी जसा अर्स्ट स्टोलरच्या पुस्तकाचा अनुवाद (तुरुंगातील पत्रे) केला तसा दुसरा अनुवाद केला तो खलील जिब्रानच्या रूपक कथांचा. त्यातून 'वेचलेली फुलं' आणि 'सुवर्णकण' ही दोन पुस्तकं आलीत. या दोनही पुस्तकांमध्ये नुसता अनुवाद नाहीये, त्या अनुवादाच्या बरोबर त्यांनी त्यांचं रसग्रहण किंवा विवेचन केलंय. मूळ रूपककथा छोटी आहे, आणि तिचे विवेचन जास्त आहे. ते विवेचन इतके भारी आहे की, ती दोन पुस्तके खांडेकरांचीच आहेत असं वाटावं. म्हणजे जिब्रानचं मन आणि बुद्धी खांडेकरांनी अचूक उचलली होती, असा त्याचा अर्थ. तर या दोन पुस्तकांच्या अनुवादाविषयी तुमच्याकडे काही वेगळी माहिती आहे ?

- खलील जिब्रानचं समग्र साहित्य हे खांडेकरांच्या जातकुळीचे आहे, अशी माझी अभ्यासानंतरची धारणा आहे. जिब्रानचे 'प्रोफेट' हे पुस्तक खांडेकरांचे विशेष आवडते होते. जिब्रान काय करतो तर जीवनातील प्रसंग घेतो आणि त्यांचं वर्तमान तत्त्वज्ञान सांगतो. खांडेकर काय करतात, तर वर्तमान प्रसंग घेतात आणि भविष्याचं तत्त्वज्ञान सांगतात. हा दोन्हीतला फरक आहे. भविष्याचे तत्त्वज्ञान सांगतात याचा अर्थ, भविष्यात असं होऊ शकेल

या प्रकारचे सूचन खांडेकरांच्या रूपककथांमध्ये दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की, खांडेकरांनी केवळ खलील जिब्रानचे अनुकरण केलेले नाही, तर त्याचे उन्नयन केलेले आहे. तोपर्यंत इतर लोकांनी 'प्रोफेट'चे अनुवाद केलेले होते, म्हणून खांडेकरांनी मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला नाही. 'वेचलेली फुलं' आणि 'सुवर्णकण' ही पुस्तके 'द मॅड मॅन' आणि 'द फोर रनर' या पुस्तकांचे अनुवाद आहेत.

प्रश्न : आपण आता लघुनिबंधांकडे वळू या. साधारणतः 1940 पासून पुढची दोन-तीन दशके मराठीमध्ये लघुनिबंध हा प्रकार कमालीचा लोकप्रिय होता. मराठी लघुनिबंधाचे जनक कोण, या संदर्भात खांडेकर आणि फडके या दोघांची नावं घेतली जातात, त्यावर त्या काळात त्यांच्या चाहत्यांनी वादही केला होता. मात्र मराठीत लघुनिबंध हा प्रकार खूप कमी लोकांनी हाताळला. दहा ते बारा नावे सांगता येतील. फडके व खांडेकर यांच्या व्यतिरिक्त अनंत काणेकर हे नाव घ्यावे लागते. इतर नावे फार प्रसिद्ध नाहीयेत. पण ना.मा.संत, म.ना.अदवंत, गो. रा. दोडके यांनी त्याच काळात छान लघुनिबंध लिहिले. हा प्रकार 1970 च्या दशकानंतर जवळपास लुप्त झाला आणि नंतर त्याला ललितबंध असं स्वरूप प्राप्त झालं. तर खांडेकरांचे लघुनिबंध आणि त्यांच्या समकालीनांचे लघुनिबंध यात काय फरक होता ? लघुनिबंध या वाङ्गय प्रकाराचं वेगळेपण काय होतं आणि त्यातील खांडेकरांचं वेगळेपण काय होतं? आणि लघु निबंध हा प्रकार नंतर वाङ्गयातून लुप्त का झाला?

- खांडेकरांचे लघुनिबंध आणि फडक्यांचे लघुनिबंध अशी अनेक समीक्षकांनी केलेली तुलना मराठीमध्ये आजही उपलब्ध आहे. मी त्या समीक्षेकडे जात नाही. पण एकाच प्रसंगाचं चित्रण व विवेचन हे दोन्ही लघुनिबंधकार कसं वेगवेगळं करतात हे पाहिल्यावर लक्षात येईल लघुनिबंध लिहिण्याची दोघांची दृष्टी वेगळी होती. मराठीमध्ये लघु निबंध आला तो इंग्रजीतून, माँतेन वगैरे लेखकांकडून प्रेरणा घेऊन. पहिल्यांदा ना. सी. फडक्यांनी 'गुजगोष्टी' लिहिल्या, ती मराठी लघुनिबंधाची सुरुवात मानली जाते. आनंद यादव यांनी त्या काळात लिहिलेला प्रबंध होता, 'मराठी लघु निबंधाचे जनक कोण?' त्यात त्यांनी खांडेकरांना जनक ठरवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण खांडेकर इतके वस्तुनिष्ठ होते की, त्यांनी तो प्रबंध किंवा दीर्घ समीक्षात्मक लेख वाचून नम्रपणे सांगितले की, 'इतिहास हा काळाच्या आधारावर उभा असतो आणि त्या दृष्टीने पाहिले तर माझ्या अगोदर ना.सी. फडकेंनी लघुनिबंध लिहिलेले दिसतील. इतिहासाच्या आधारे गुजगोष्टीचे म्हणजेच लघुनिबंधाचे जनक ना.सी. फडकेच आहेत, हे मी अंतर्मनात आणि बाह्य मनात नाकारणार नाही. हे खरं आहे की, एक लेखन प्रकार सुरू झाला की त्याच्या विकासाच्या वाटा माणसाच्या वकुबाप्रमाणे विकसित होत जातात. पण मला माहीत नाही की, माझा वकूब काय होता.' असं म्हणून त्यांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं नाही की, फडक्यांपेक्षा माझे लघुनिबंध श्रेष्ठ आहेत. पण समीक्षकांनी भविष्यकाळामध्ये योग्य ती नोंद व योग्य ते मूल्यमापन केलेले आहे, त्याचा पुनरुच्चार मी करू इच्छित नाही.

प्रश्न : लघुनिबंध हा प्रकार थोडा आत्मनिष्ठ असणं आणि त्यामध्ये लिहिणाऱ्याचं व्यक्तिमत्त्व पूर्णतः प्रतिबिंबित होणं, अशी दोन वैशिष्ट्यं मला दिसतात. दुसरं 1940 ते 70 हा कालखंड, या काळात लघुनिबंध लिहिणारे बहुतेक सर्व लोक कनिष्ठ मध्यम वर्गातून आलेले होते. शिक्षक, प्राध्यापक, वकील इत्यादी. आणि दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींतील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवणं त्यात येत असे. नंतर मध्यम वर्ग जास्त विखुरला गेला, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला समाज जीवनातली गुंतागुंत प्रचंड वाढली. याच कारणामुळे लघुनिबंध हा प्रकार मागे पडला की आणखी काही कारण आहे ?

- खरं म्हणजे लेखकाचा विशिष्ट काळ असतो, तसा साहित्य प्रकारांचादेखील असतो. उदा. एके काळी नाटक हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव होतं, आज नाटकाचा अवकाश आक्रसलेला दिसेल. कारण सशक्त चलमाध्यमे विकसित झाली आहेत. ज्या काळात लघुनिबंध, कथा व कादंबऱ्या प्रकाशित होत होत्या, त्याच काळामध्ये चित्रपटासारखी दृक्-श्राव्य माध्यमे विकसित होत होती. माझे असे आकलन आहे की, कथा, कादंबरी आणि लघुनिबंध यांचा वाचक मूलतः स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतात विकासाची नवी क्षितिजे निर्माण झाली, त्या नव्या क्षितिजांनी नवी माध्यमे व नवे साहित्यही विकसित केले. म्हणजे मूकपटाचे रूपांतर बोलपटात होणे, नंतरच्या काळात दूरदर्शन येणे वगैरे. तंत्रज्ञानाचा विकास आणि भारतीय शिक्षण व पाश्चात्त्य शिक्षण यांचा संगम होणे, यामुळे हे घडले. आणि सांस्कृतिक व आर्थिक स्थित्यंतरही झाले.

प्रश्न : खांडेकरांचे लघुनिबंधाचे किमान सात-आठ तरी संग्रह असावेत आणि प्रत्येकामध्ये दहा-बारा निबंध असतील, तर 100 लघुनिबंध तरी त्यांनी लिहिलेले आहेत. तर खांडेकर नावाचा माणूस, लेखक, समाजचिंतक हे सर्व समजून घ्यायचं असेल तर लघुनिबंध उपयोगी ठरतात. कारण त्यामध्ये स्वतः लेखकच मध्यवर्ती असतो. प्रामुख्याने तो स्वतः जगलेलंच लिहितो, लघुनिबंधाचा खरा नायक लेखक असतो. परंतु खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका समजून घ्यायचा असेल तर त्यांची आत्मकथनं वाचायला हवीत. तशी तीन पुस्तके आहेत. तुम्ही दोन संपादित केलेली आणि एक त्यांनी स्वतः लिहिलेले पण नंतर प्रकाशित झालेले. नंतर त्यांच्या भाषणांचे दोन किंवा तीन संग्रह आलेत आणि मुलाखतींचा एक संग्रह आहे. तर या तीन प्रकारच्या पुस्तकांविषयी तुम्ही आता काय सांगू शकाल ?

- खांडेकरांनी आपली आत्मकथा 'एका पानाची कहाणी' लिहिली, त्यांच्या आयुष्याची पहिली 36 वर्षे त्यामध्ये दिसतायत. पुढे खांडेकरांनी आत्मकथा लिहिली नाही, कारण ती लिहायला ते जगले नाहीत. मी त्यांचे दोन आत्मकथनात्मक संग्रह प्रकाशित केलेत. त्यातलं एक पुस्तक आहे 'पहिली पावलं'. मराठीमधला हा एक नवा साहित्य प्रकार या पुस्तकाच्या रूपाने आलेला आहे. हे आत्मकथनात्मक पुस्तक दुसरं तिसरं काही नसून, त्यांनी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतांत केलेली पहिली मुशाफिरी अशी त्याची रचना आहे. म्हणजे पहिले भाषण, पहिले नाटक, पहिली कादंबरी, पहिली पटकथा, पहिली कथा, पहिला लघुनिबंध असं त्याचं स्वरूप आहे. 'वैखरी' नावाचं एक मासिक कोल्हापूरहून प्रकाशित व्हायचं, त्याच्यामध्ये चालवलेलं हे सदर आहे. ती सगळी पावलं एकत्र केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, हे लेख एकत्रित वाचले तर खांडेकरांचं साहित्यिक आत्मकथनच आहे. याशिवाय खांडेकरांनी स्वतःविषयी लिहिलेल्या काही लेखांचं पुस्तक 'सशाचे सिंहावलोकन' या नावाने आणले आहे, हे त्यांचे तिसरे आत्मकथनात्मक पुस्तक म्हणता येईल.

मी अलीकडच्या काळामध्ये खांडेकरांना मराठीतला एकमेव संपूर्ण लेखक मानतो. म्हणजे मराठी साहित्य प्रकारातला असा कोणताही प्रकार नाही ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं नाही. अगदी नाट्यछटा हा प्रकारसुद्धा 'वैनतेय 'मध्ये त्यांनी लिहिलेला आहे.

प्रश्न : मराठीतला संपूर्ण लेखक आणि भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाचला जाणारादेखील लेखक खांडेकर आहे. खांडेकरांनी तारुण्यात येणं आणि या देशाच्या क्षितिजावर गांधींचा उदय होणं, हे 1920 दरम्यान घडले. गांधीजींवर खांडेकरांनी जे छोटे छोटे लेख लिहिले होते, त्यांचं संकलन करून त्या पुस्तकाला तुम्ही 'दुसरा प्रॉमिथियस' असं नाव दिलं आहे. तर दुसरा प्रॉमिथियस हा काय प्रकार आहे ?

-'दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी' असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. 1969 मध्ये भारतात महात्मा गांधींची जन्मशताब्दी साजरी झाली. त्या वर्षामध्ये महात्मा गांधींबद्दल खांडेकरांनी सातत्याने लिहिलं, त्या वर्षभरातले लेख त्यात आहेत. त्यात एका ठिकाणी महात्मा गांधींना 'प्रॉमिथियस' म्हटले आहे. भारतीय साहित्यात 'ययाति' म्हणजे एका ग्रीडी पर्सनचे मिथक आहे, तसे ग्रीक मायथोलॉजी मध्ये प्रॉमिथियस ही एक देवता आहे. ती मानवी विकासासाठी उच्चतर कार्य करते. ग्रीक मायथॉलॉजी मधला प्रॉमिथियस मानवी विकासासाठी स्वर्गातला अग्नी पृथ्वीतलावर आणतो. माणसाचा पहिला शोध आग आहे, त्यानंतर इतर छोटे-मोठे शोध लागत गेले. त्या प्रॉमिथियसने मानवी विकासासाठी एक पाप केलं, ते पाप काय आहे तर स्वर्गातली आग चोरून पृथ्वीतलावर आणली. आणि त्याची शिक्षा म्हणून त्याचे शरीर गिधाडासाठी खायला टाकण्यात आले. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की, अनेक गिधाडांनी त्याला टोचलं, पण तो काही मेला नाही. 'गांधी मरत का नाही' असा वर्तमानात काही लोकांना पडलेला प्रश्न, त्याचे उत्तर प्रॉमिथियसच्या कथेमध्ये तुम्हाला दिसेल.

प्रश्न : खांडेकरांनी स्वतःविषयी एक असा उल्लेख केलाय की, 'मी काही समाजशास्त्रज्ञ नाही, मी काही तत्त्वचिंतकही नाही, मी मूलतः ललित लेखक आहे.' दुसरा एक संदर्भ असा आहे की, त्यांची स्वतःची वैचारिक भूमिका गांधीवाद आणि समाजवाद या दोन्हींचा समन्वय साधणारी किंवा दोन्हींना पुढे घेऊन जाणारी आहे, असे म्हटले आहे. आणि एका ठिकाणी त्यांनी असेही म्हटलं की, गांधी आणि मार्क्स या दोघांच्याही मुळाशी आपण गेलो तर समता हेच तत्त्वज्ञान दिसेल. तर खांडेकर एक विचारवंत म्हणून वा विचारक म्हणून, एवढेच होते की याच्या बाहेर आणखी काही ?

- खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण समजून घ्यायची असेल आणि ते किती बहुआयामी होते, याचं उदाहरण पाहायचं असेल तर खांडेकरांनी लिहिलेल्या व्यक्तिलेख संग्रहाकडे नजर टाका 'जीवन शिल्पी', 'समाज शिल्पी' आणि 'साहित्य शिल्पी.' त्यातून तुम्हाला खांडेकरांची व्यापक उदारता दिसून येईल. खांडेकरांवर मार्क्सचा जितका प्रभाव आहे, तितकाच गांधींचा आहे. समाजवादाचं फार सुंदर विश्लेषण खांडेकरांनी लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, "मार्क्सवादावर गांधीवादाचे कलम म्हणजे समाजवाद, मार्क्स हा क्रांतिकारी आहे आणि गांधीवाद हा समन्वयवादी आहे. क्रांती आणि समन्वय यांचा विकास म्हणजे समाजवाद."

प्रश्न : आता समारोपाचा प्रश्न. तुम्ही साधारणतः 12 वर्षे खांडेकरांना जवळून पाहिलं, अनुभवलं आणि ते गेल्यानंतर 50 वर्षे त्यांच्या लेखनाच्या सहवासात आहात. म्हणजे 60 वर्षांपेक्षा अधिक काळ खांडेकरांची साथसंगत तुम्हाला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्हाला काय वाटतं, खांडेकरांनी आपल्याला नेमकं काय दिलं?

- मगाशी मी म्हटलं ना, गांधी मरत का नाही? तसाच माझा प्रश्न आहे, खांडेकर मरत का नाही? इतका काळ जाऊनदेखील ते वाचले का जातात, तर आपण वर्तमानातले सगळेच पुरोगामी लोक संविधान प्रमाण मानून जगतो आहोत. आणि वारंवार त्याचा उच्चार करतो आहोत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान निष्ठा अशी वर्तमानातील सर्व आदर्श जीवनमूल्ये खांडेकरांनी नुसती सांगितलेली नाहीत, तर ती आचरलीदेखील आहेत !

संवादक : विनोद शिरसाठ

85 मिनिटांची ही व्हिडिओ मुलाखत साधना साप्ताहिकाच्या यू-ट्यूब चॅनेलवर पाहता येईल.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र ( 20 लेख )

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके