नेहरूंना भारतातले नेहरूप्रेमी विसरले. पण नेहरूविरोधक त्यांना विसरत नाहीत. याचे इंगित काय असावे? ते इंगित नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात आहे. नेहरू केवळ व्यक्ती नाहीत, ती 'आयडिया ऑफ इंडिया' आहे. हे नेहरूविरोधक चांगले जाणतात. म्हणून त्यांना नेहरूंचा राग, द्वेष आहे. नेहरू यांचा जिवंतपणी खून करू शकलो नाही याबद्दल त्यांना आता वाईट वाटत असावे. नेहरूंचा प्रभाव पुसल्याशिवाय आपण आपल्या पद्धतीचा देश साकारू शकत नाही. हे नेहरूविरोधकांना माहीत आहे. आजचा भारत हा गांधी, नेहरू, आंबेडकरांचा भारत आहे. तो नेहरूविरोधकांना मोडून काढायचाय. त्याऐवजी वेगळा भारत तयार करायचा आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू हे तीन व्यक्तींचे मिश्रण होते. वडील मोतीलाल नेहरू, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या त्या तीन व्यक्ती. मोतीलाल यांच्यापासून जवाहरलाल यांनी थाटमाट शानयुक्त जीवनशैली घेतली. राजबिंडे व्यक्तिमत्त्व घेतलं. गांधींपासून राजकारणाचे धडे, अहिंसेचे मूल्य घेतले. टागोर यांच्यापासून जीवनाचा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन अंगीकारला. नेहरूंचे सारे जीवन बघितले की, या तीन लोकांच्या प्रभावाचा परिचय येतो. त्यातून नेहरू विकसित झाले. त्यांचा प्रभाव जगभर पसरला.
नेहरू गेले तेव्हा विनोबा भावे यांनी त्यांचे वर्णन 'लोकदेव नेहरू' असे केले. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी नेहरूंना 'लाइट ऑफ एशिया' म्हटलं. 'लाइट ऑफ एशिया' ही ख्यातनाम इंग्रजी कवी सर एडविन अर्नाल्ड यांची बुद्धावरची कविता आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झालं 1889 मध्ये. बुद्धाचे जीवन कवितारूपात युरोपला सांगणारे हे बुद्धावरचे इंग्रजीतील पहिले पुस्तक. म्हणजे चर्चिल यांनी एक प्रकारे नेहरूंना 'आशियाचा उजेड' म्हणून बुद्धाच्या रांगेत नेऊन बसवलं.
नेहरूंचा जिवंतपणीच जगावर प्रभाव निर्माण झाला होता. गांधीनंतर ते भारतावर सर्वांत जास्त प्रभाव निर्माण करणारे नेते होते. भारत-पाक फाळणी झाली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधी 78 वर्षांचे होते. सरदार वल्लभभाई पटेल 72 वर्षांचे होते आणि जवाहरलाल नेहरू होते 58 वर्षांचे. सर्वांत कमी वय तरीही गांधींनंतर लोक नेहरूंचे ऐकत होते. नेहरू तरुणपणी युवक-हृदयसम्राट होते. प्रौढ झाले तेव्हा जनता-हृदयसम्राट झाले. लहान मुलांचे 'चाचा नेहरू' बनले.
नेहरू त्यांच्या विरोधकांचे कायम टार्गेट राहिले. नेहरू यांच्याविषयी नफरत वाढत राहील असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. आज बाजारात सर्व महापुरुषांचे फोटो, पुतळे, मूर्ती दिसतात. पण नेहरू दिसत नाहीत. नेहरूंवर पुस्तकं खूप आहेत; पण त्यांच्यावर चर्चा होऊ दिली जात नाही. आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियातील विविध साइट्सवर तर नेहरूंची यथेच्छ बदनामी सुरू असते. नेहरू यांच्यावर गैरसमज वाढवणारी खोटी माहिती प्रसिद्ध केली जात असते.
अनेक व्हिडिओ आहेत. त्यांतला एक व्हिडिओ राजीव दीक्षित यांचा आहे. त्यात म्हटलंय की, नेहरू, एडविना माउंटबॅटन आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना हे लंडनमध्ये हारिश कॉलेजात एकत्र शिकत होते तेव्हापासून त्यांचे तिघांचे मेतकूट होते. पुढे एडविना हिने या दोघांचा वापर करून भारत-पाक फाळणी केली.
ही कथा धादांत खोटी आहे. वास्तविक, इंग्लंडमध्ये हारिश नावाचे कुठलेही कॉलेज नाही. आणि हे तिघे कधीही एकत्र शिकायला नव्हते. पण हा व्हिडिओ पाहणारे-ऐकणारे विचार करत नाहीत. सांगणारा खोटे चलाखीने सांगतो आणि हे खोटं लोकांना खरं वाटतं. नेहरू केंब्रिजमध्ये शिकले आहेत हे माहीत असून या व्हिडिओत खोटी कथा रंगवून चलाखीने पेश केली गेली. अनेक तरुण ती खरी मानताना दिसतात.
खोटा इतिहास सांगून स्वतःचे म्हणणे रेटण्याचा हा काळ आहे. या काळात नेहरू पुरून उरणारे आहेत. नेहरूंचा कुठलाही फोटो तुम्ही बघा. त्यांच्या चेहऱ्यावर राग नाही. आक्रोश नाही. संताप नाही. घृणा नाही. कुणाविषयी क्रोध नाही. अहंकार नाही. एक प्रांजळ, सभ्य माणूस त्या फोटोत दिसतो. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात आशा दिसते. आशेशिवाय जीवन नाही. नेहरू देशाचे प्रधानमंत्री अतिशय खडतर काळात झाले. त्याही काळात त्यांनी देशाला दिशा दिली. आशेचा मार्ग दाखवला. तो रस्ता आता बदलवण्याचा मोठा प्रयत्न गेल्या अकरा वर्षांत झाला. आजही सुरू आहे. नेहरू भारताच्या कुटुंब प्रमुखासारखे वागले.
नेहरू म्हणजे लोकशाही समाजवाद. नेहरू म्हणजे हुकूमशाहीला विरोध. नेहरू म्हणजे धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, विवेकनिष्ठा. नेहरू म्हणजे गरिबांशी बांधिलकी आणि लोककल्याणकारी भूमिका. थोर विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी मानवकेंद्रित राष्ट्रवाद सांगितला. नेहरू हे मानवकेंद्रित राष्ट्रवादी देशभक्त होते.
हुकूमशाहीला नेहरूंना किती विरोध होता? ऐन तारुण्यात ते युरोपात दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीची भेट नाकारली. हिटलर जर्मनीत प्रसिद्धीच्या, लोकप्रियतेच्या शिखरावर होते. पण नेहरूंनी त्यांनाही भेटणं टाळलं.
'मूर्खाची ताकद कधी दुर्लक्षित करू नका. विशेषतः जेव्हा ते समूहात असतात.' जॉर्ज कोलिन यांनी म्हटलंय ते खरं आहे. नेहरूविरोधक त्यांना बदनाम करत आहेत. आणि त्याचा जनमानसावर प्रभाव पडतोय. अशा वेळी नेहरूंचे खरे चरित्र लोकांना सांगायला हवे. नेहरूंचे पूजक न बनता त्यांच्या जीवनाचे मर्म समजून घेतलं पाहिजे.
नेहरू पूर्व संस्कृती आणि पश्चिम संस्कृती यांचा संगम होते. ते स्वतः म्हणत, 'मी सगळीकडचा. पण माझे कोणतेही घर नाही.' गौतम बुद्धाची वाट त्यांना आकर्षित करत होती. विश्वबंधुत्व, आधुनिकता या मूल्यांचे त्यांना भान होते. देशाच्या मनोव्यापारात नेहरू कुठे आहेत? नेहरूंची स्मृती लोप तर पावत नाही ना? असं बोललं जात आहे. नेहरूंना लोक विसरणार तर नाहीत, असं बोललं जातंय.
गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी लहान-थोरांना आकर्षण आहे. हे महापुरुष भारतीयांना स्वप्नवत वाटतात. या नेत्यांना त्यांचे विचार व्यवहारात उतरवण्याची संधी मिळाली नाही. स्वातंत्र्य मिळालं आणि गांधींचा खून केला गेला. भगतसिंग फासावर गेले, शहीद झाले. सुभाषबाबू यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. सरदार पटेल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच वृद्धापकाळाने मृत्यू पावले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्माण करता आले. पण तेही अकाली गेले. त्यांचे अनेक विचार भारतीयांच्या दृष्टीने स्वप्नवत राहिले. आपले विचार व्यवहारात आणण्याची पुरेपूर संधी काळाने नेहरूंना दिली. 1947 ते 1964 या प्रदीर्घ काळात नेहरू प्रधानमंत्री होते. जवळपास 16 ते 17 वर्षे. हृदयविकाराने मृत्यू होईपर्यंत ते कार्यरत होते.
नेहरूंनी गांधीविचारांची लाइन घेतली. भारतात लोकशाही समाजवादाचा, मिश्र अर्थव्यवस्थेचा महान प्रयोग साकारण्याचा आटोकाट खटाटोप केला. त्याला जगाने 'नेहरू पर्व, नेहरू प्रयोग, नेहरू युग, नेहरू धोरण' असं म्हटलं. पूर्णपणे भारतीय दृष्टीकोनातून त्यांनी लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा प्रयोग केला.
हे सर्व पाहता, नेहरू हे या देशातलं वास्तव आहे. नेहरू 'दुरून डोंगर साजरे' नाहीत. त्यांना लोकांनी काम करताना, आपले विचार, स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना पाहिलेलं आहे. त्यामुळे 'हातच्या काकणाला आरसा कशाला?' म्हणून नेहरूंना फक्त लोकांना कनेक्ट ठेवावं लागेल. त्यांनी केलेलं काम लोकांना सांगावं लागेल. लोक खरं-खोटं ओळखतीलच.
सध्याचा जमाना गोडसेला महात्मा ठरवण्याचा आणि त्याची मंदिरं बांधण्याचा आहे. नेहरूंचे राक्षसीकरण करण्याचा काळ आहे. लोकशिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या उलट्या प्रबोधनकाळात नेहरूंविषयी बोलत राहावं लागेल. बुद्धिविरोध हा आताच्या काळात झपाट्याने वाढतोय. तर्क, भावना, संवाद, विवेक यांच्या कमजोरीचा जमाना आहे. सध्याच्या संभ्रमकाळातून बाहेर पडावे लागेल. अज्ञानाचे उत्सव सुरू आहेत. त्यांना उत्तर द्यावे लागेल.
देशाचे शिक्षण धोरण उलटे झाले आहे. त्यात माणसांना माणूस बनायला सांगणाऱ्या विद्यांना ओझे मानलं जातंय. विचार करणाऱ्यांची हेळसांड केली जातेय. जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन त्यांच्या न्यू यॉर्क टाइम्सच्या लेखात म्हणाले, "भारतात नरेंद्र मोदींनी सत्ता प्राप्ती केली, पण वैचारिक संघर्षात अजून विजय मिळवलेला नाही. हुकूमशाही, एकसत्तावाद, तर्क-विवेकाची लढाई ते कधीच जिंकू शकत नाहीत. चलाखी, चतुराई हे आकर्षक वाटतात; पण ते काही सद्गुण नाहीत. सत्तेने कितीही डांगोरा पिटला तरी गांधी, नेहरू खलनायक आणि गोडसे, सावरकर नायक बनू शकत नाहीत."
गेल्या काही वर्षांत गांधी, नेहरू यांच्यावर अनैतिकतेने गरळ ओकली गेली. त्याविरोधात काही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. काँग्रेसच्या काळातही अशी गरळ ओकली जात होती. काँग्रेसी सत्तेने काही बंदोबस्त केला नाही. नेहरूवादी लोक हे स्वाभिमानी भारतीय राष्ट्रवादाच्या विरुद्ध आहेत असा भ्रम पसरवला गेला. ते जाणीवपूर्वक बिंबवले गेले. बहुतांशी हिंदू समाजाच्या मनात गांधी-नेहरू यांच्याविषयी विष कालवण्यात संकुचित विचारांच्या लोकांना यश मिळाल्याचे पाहायला मिळतेय. समाजात एकूणच घृणा वाढत आहे. बाभळीचे झाड लावून आंबे कसे मिळतील?
राजकीय हिंदुत्व या विचाराची अंमलबजावणी करण्याचे प्रभावी काम भारतीय जनता पक्ष करत आहे. भाजपच्या राज्यात निवडक दोन-चार भांडवलदारांचे भले होत आहे. बाकी सामान्यांचे मरण चाललेय. हा नुसताच आर्थिक दारिद्र्याचा काळ नाही. वैचारिक दारिद्र्याचाही काळ आहे. लोक गरिबीत राहत आहेत. त्यांना कट्टर विचारांचे आकर्षण आहे, ते आवडतंय असं दिसतंय. हा काळाचा महिमा आहे. पोटाच्या प्रश्नांवर लोक आता राजकीय मते, धोरणे ठरवत नाहीत हे आता दिसू लागलंय. बुद्धिजीवी वर्गाच्या हे अजून लक्षात येत नाही.
'भाकरी की देशभक्ती?' हा प्रश्न विद्वानांना पडतो. सामान्य माणूस दोन्हींना महत्त्व देतो. गरीब माणूस भाकरीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व धर्मश्रद्धा, सांस्कृतिक संवेदना, राजकीय विचार यांना महत्त्व देतो. आताच्या काळात गांधी, नेहरू यांनी मांडलेल्या भारताची संकल्पना नष्ट होत आहे की काय ? की ती शेवटचे आचके देत आहे?
खुद्द नेहरूंनी म्हटले आहे, 'देशासमोर संकट आले की, राष्ट्रीयत्व डंका पिटते. लोक प्राचीन परंपरांकडे पळ काढतात. त्या परंपरांमध्ये शक्ती शोधतात. तिथे आसरा शोधतात. तिथे त्यांना आरामाचा फिल येतो. निवांतपणा वाटतो. अशा वेळी लोक भूतकाळात गुंगून जातात. आणखी भूतकाळ खोदतात. कामगार, कष्टकरीही प्राचीन परंपरा धुंडाळतात. त्यातून संकुचित राष्ट्रवाद बळकट होतो. मग झगडा सुरू होतो, मानवकेंद्रित भारतीयता विरुद्ध संकुचित राष्ट्रवाद. आज तो झगडा सुरू आहे.'
संकुचित राष्ट्रवाद तर्क, विज्ञान, विवेक यांना मानत नाही. सांस्कृतिक अस्मिताना महत्त्व देतो. मानवी मूल्य, सामाईक ज्ञान, पद्धती, परंपरा यांना हा विचार नकार देतो. संवेदनेचे तुकडीकरण करतो. मागास वर्गाचे चेहरे सत्तास्थानी, उच्च जागी, पण मागास समूहाला मात्र न्याय नाही, ही चलाखीची व्यूहरचना संकुचित राष्ट्रवाद खेळते. आत्मसंतुस्ट हुकूमशहाच्या कृतींना उचित ठरवण्याचा खटाटोप सतत सुरू ठेवतो. हा हुकूमशहा बुद्धिभ्रमाची शिकार झालेला असतो.
नेहरू अज्ञेयवादी हिंदू होते असे त्यांचे चरित्रकार गोपाल यांनी म्हटले आहे. अशक्य गोष्टींत समन्वय साधण्याची दुर्मीळ कला नेहरूंजवळ होती. ते अंतर्बाह्य लोकशाही मानणारे लोकशाह होते. 'देश की सीमा रोती है, बेशर्म हुकूमत सोती है।' अशी प्रत्यक्ष प्रधानमंत्र्यावर हल्ला करणारी घोषणा त्यांच्या राज्यात दिली जाऊ शकत होती. नेहरू यांची कॉलर कुणी सामान्य शेतकरी पकडून जाब मागू शकत होता. संसद परिसरात कुणी सामान्य महिला नेहरूंना खडसावून जाब विचारू शकत होती. लोकशाहीने मला काय दिले, या एका रागावलेल्या महिलेच्या उत्तरावर नेहरू म्हणाले होते, "माझी शर्टाची कॉलर पकडण्याची शक्ती तुम्हाला लोकशाहीने दिलीय. ही मोठी गोष्ट नाही काय?" त्यावर सामान्य माणसालाही दिलासा मिळत असे.
नेहरू शांततेचे पुजारी होते. क्रांतीचे अग्रदूत होते. अहिंसेचे उपासक होते. स्वातंत्र्याचे सन्मानक होते. रक्षक होते. आर्थिक समानतेचे कैवारी होते.
नेहरूंना अनुभव आणि अभ्यासातून कळलं होतं की, जहाल, टोकाच्या गोष्टींना भारतीय समाज टाळतो. सुवर्णमध्य साधणे आणि सम्यक भूमिका घेणे हा भारतीयांचा सांस्कृतिक अनुभव आहे. आपल्याला कळलेलं सत्य म्हणजे संपूर्ण सत्य असेलच असे नाही. असा भारतीयांचा अनुभव आहे. त्यानुसार तो भूमिका घेतो. हे भारतीय सामान्य माणसांचे शहाणपण आहे. याची जाणीव नेहरूंना होती.
नेहरू सामान्य माणसांना सांगत, 'मी तुमचा प्रधानमंत्री आहे. राजा नाही. मालक नाही. राज्यकर्ताही नाही. तुमचा मुख्य सेवक आहे. कर्तव्यात चुकलो तर माझा कान पकडा. पदावरून दूर करा.' नेहरूंचे हे आश्वासन सामान्य माणसांना लोकशाहीचा अनुभव देत असे.
महात्मा गांधी वारंवार म्हणत, "जवाहर माझे वारस आहेत". गांधींच्या विश्वासाला नेहरू पुरे पडले. नेहरूंनी गांधींच्या वारशाला जिवंत ठेवलं. पण नेहरूंचा वारसा कोण पुढे जिवंत ठेवील ?
रमण महर्षी यांचे गांधीबद्दलचे वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, 'अहिंसेची शांती माझ्याजवळही आहे. पण अहिंसेची शक्ती गांधींजवळ आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यावर आणि साऱ्या देशावर अहिंसेच्या शक्तीचा प्रभाव पडला'.
नेहरूंचा वारसा फक्त चर्चा करणारे ज्ञानी लोक पुढे घेऊन जाऊ शकत नाही. वायफळ चर्चासत्राचा जमाना गेला. छटाकभर कृती टणभर चिंतन, चर्चेपेक्षा श्रेष्ठ असते. कर्मवान लोक नेहरूंचा वारसा पुढे नेऊ शकतील. सध्याच्या काळाला उत्तर द्यायचे असेल तर 'ज्ञान बने कर्मशील, कर्म ज्ञानवान' असं काही झालं पाहिजे.
आज उलट झालंय. कर्म गौण, चिंतन प्रधान. फक्त राजकीय कृती करून मोठी उद्दिष्टे साध्य करता येऊ शकत नाहीत. कर्म गौण झाल्याने अल्लड, उत्तेजित, हावशे, नवसे, गवसे स्वतःला नेहरूवादी म्हणवून घेऊ लागले आहेत. पण त्यांचा समाजावर प्रभाव पडत नाही. म्हणून नेहरू सांगतात तेही लोकांपर्यंत पोहोचत नाही.
1928 मध्ये सुभाषबाबू यांनी युवकांना आवाहन केलं होतं, 'युवकों, साबरमती के खिलाफ विद्रोह करो।' पण असं आवाहन करणारे सुभाषबाबू गांधीविरोधी नव्हते. काही भूमिकांचा तो मामला होता. आणि विरोध करणाऱ्या या तरुण मुलांबद्दल गांधींच्या मनात बापाची करुणा होती. ते म्हणत होते, 'बेट्यानों करा विद्रोह, मोडा चाकोऱ्या. शोधा तुमचे रस्ते तुम्हीच'.
आज नेहरू असते तर त्यांनी सर्व नेहरूवाद्यांना कदाचित 'जुन्या चाकोऱ्या मोडा', असं आवाहन केलं असतं. राजनीतीला सामजिक परिवर्तनामध्ये एकरूप करून टाका. मग बघा मोठी उद्दिष्टे साध्य होतील, असा कानमंत्र त्यांनी दिला असता.
गांधी का दिमाग आणि जवाहरलाल यांची भाषा आपण समजून घेतली तर आजच्या परिस्थितीचा सामना करता येऊ शकेल. गांधींनी 'यंग इंडिया'मध्ये म्हटलं होतं, 'जवाहर चिंतन करण्यात अतिवादी आहे. पण विनम्र आणि व्यावहारिक आहे. दोरी तुटेपर्यंत तो ताणत नाही. हिऱ्यासारखा स्वच्छ. सत्यवादी. राष्ट्र त्याच्या हातात सुरक्षित राहील'.
गांधींनी दिलेलं राष्ट्र जवाहरलाल यांनी खरोखर सुरक्षित ठेवलं. गांधींचं नेहरू का ऐकत ? नेहरूंना माहीत होतं, इतर नेते गरिबीवर चर्चा करतात. गरिबांची बाजू घेतात. गांधी गरिबांच्या बाजूने बोलत होते. अभ्यासू भाषणं करत होते. गांधी मात्र स्वतः गरीब झाले होते. म्हणून गरीब गांधींबरोबर होते. गांधींजवळ नैतिक बळ होतं. पुस्तकी पांडित्य लोकांना आकर्षित करत नाही. म्हणून सारा भारत गांधींचे शब्द ऐकत होता. नेहरू हे ओळखून होते.
नेहरूंच्या चरित्रकारांनी सर्वांनीच म्हटलंय की, 'नेहरू नेता कमी होते. त्यांच्यात संत, कवी, भाष्यकार, द्रष्टा विचारवंत लपलेला होता. पूर्व आणि पश्चिम या दोन संस्कृतींत ते दुभाष्याचे काम करत होते. हे लेखकाचे काम होते. म्हणून नेहरू गेले तेव्हा जगातल्या चिंतकांना आपल्यातला माणूस मेल्याचे दुःख झालं.
रोजा लक्झेंबर्ग ही विदुषी नेहरूंची टीकाकार होती. ती म्हणाली होती, 'नेहरू, गांधी, हिटलर आणि स्टालिन यांचा समन्वय आहे.' लोकांना ते पटलं नाही कारण खुद्द नेहरूंनी स्वतःवर 1937च्या मॉडर्न रिव्ह्यूमध्ये 'चाणक्य' या टोपणनावाने लेख लिहिला होता. लेखाचे शीर्षक होते 'जवाहरलालचे सारे रंग ढंग हुकूमशहाचे आहेत. या लेखात हा चाणक्य देशातील जनतेला जागे करत होता. नेहरूंपासून सावध रहा, असे आवाहन करत होता. हुकूमशाहीला आणि हुकूमशहाला विरोध करायला सांगत होता.
नेहरू सत्तेचे लोभी नव्हते. एप्रिल 1958 मध्ये नेहरूंनी स्वतः खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतला होता. आराम करायचा विचार केला होता. पण त्यांना सहकाऱ्यांनी तसं करू दिलं नाही. नेहरू मनाने समाजवादी, हृदयाने गांधीवादी होते. लोकशाही मार्गाने समाजवाद आणण्याचा त्यांचा संकल्प होता. काँग्रेसमध्ये समाजवादी आणि गांधीवादी यांचा समन्वय त्यांनी नेहमी ठेवला. गांधी समाजवादी आहेत हे नेहरूंनी ओळखले होते. नेहरू 4 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1929मध्ये चाळिशीत पहिल्यांदा. 'नॅशनल हेराल्ड'चे संपादकही होते ते. असा गाढा अनुभव होता त्यांच्याजवळ. प्रधानमंत्री होण्याअगोदर जगात ते विचारी लेखक म्हणून प्रसिद्ध होते.
विरोधकमुक्त लोकशाही म्हणजे फॅसिझम. विरोधकयुक्त शाही म्हणजे लोकशाही. नेहरू गुलामीच्या विरोधात होते. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या एकाही देशात आज लोकशाही नाही. भारत हे लोकशाहीचे एकमेव उदाहरण आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही दोन मूल्ये आपल्याला गांधी, नेहरू आणि आंबेडकरांनी दिली आहेत.
नेहरू खरे स्टेट्समन होते. आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी म्हणून त्यांची ख्याती होती. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ते कुठल्याही पदावर नसताना, एका पारतंत्र्यात असलेल्या देशातील एक नागरिक असताना जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांचे वैयक्तिक पातळीवर संबंध होते.
इंग्लंडमध्येच त्यांचे प्रचंड चाहते होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा इंग्लंडमध्ये प्रचंड खप झालेला होता. युरोपातील इतर देशांतही त्यांना मानणारे लोक होते. साहित्यिक, विचारवंत आणि इतर वर्गांत त्यांना मान होता.
त्यांना 1942 मध्ये अटक झाली त्या वेळी त्यांची सुटका व्हावी म्हणून इंग्लंडमध्ये निदर्शने झाली. संपूर्ण लंडनमध्ये पत्रकं वाटली गेली.
एकदा ते इंग्लंडला गेले असताना त्यांच्यासाठी स्वागतसभा आयोजित केली गेली होती. असा नेहरूंचा प्रभाव होता.
नेहरूंना भारतातले नेहरूप्रेमी विसरले. पण नेहरूविरोधक त्यांना विसरत नाहीत. याचे इंगित काय असावे? ते इंगित नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात आहे. नेहरू केवळ व्यक्ती नाहीत, ती 'आयडिया ऑफ इंडिया' आहे. हे नेहरूविरोधक चांगले जाणतात. म्हणून त्यांना नेहरूंचा राग आहे, द्वेष आहे. नेहरू यांचा जिवंतपणी खून करू शकलो नाही याबद्दल त्यांना आता वाईट वाटत असावे. म्हणून ते नेहरूंचे दररोज राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न करतात. नेहरूंचा प्रभाव पुसल्याशिवाय आपण आपल्या पद्धतीचा देश साकारू शकत नाही. हे नेहरूविरोधकांना माहीत आहे. आजचा भारत हा गांधी, नेहरू, आंबेडकरांचा भारत आहे. तो नेहरूविरोधकांना मोडून काढायचाय. त्याऐवजी वेगळा भारत तयार करायचा आहे.
अर्थात, नेहरूविरोधकांचा हा उपद्व्याप वेगळ्या संघर्षाला जन्म देईल. हा संघर्ष सिव्हिल वॉर म्हणजे गृहयुद्धाच्या रूपात पुढे येऊ शकतो. जगभरचे अनेक विचारवंत सिव्हिल वॉर होण्याचे भाकीत मांडत आहेत. हे वॉर जगातले आजपर्यंतचे सर्वांत मोठे, जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त काळ चालू शकेल असे असेल, असंही भाकीत केलं जात आहे.
भारतात मणिपूरच्या दंगली झाल्या. ते दोन जमातींमधील एक सिव्हिल वॉरच होतं. त्याने सारा देश हादरला होता. भारतात देशव्यापी सिव्हिल वॉर झालं तर किती भयानक रूप घेईल याची झलक मणिपूरमध्ये दिसली आहे.
भारतातले अनेक विचारवंत असं मांडत आहेत की, आपला देश फाळणीच्या वेळी होता तशा परिस्थितीत आज आहे. फाळणीच्या वेळी होता तसा सामाजिक तणाव आज आहे. 1947 मध्ये फाळणी झाली तेव्हा जवळपास 5 लाख लोक मारले गेले होते. 80 लाख लोक निर्वासित झाले होते. लढाई हिंदू-मुस्लीम अशी होती. मुस्लीम पाकिस्तान झाला. आता हिंदू भारत व्हावा असा काही शक्तींचा रेटा होता. त्या स्फोटक वातावरणात भारत सर्वांचा होईल असा विचार नेहरूंनी मांडून त्या दिशेने देश नेला. भारत सर्वांचा देश झाला. 1951 मध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात एकूण मतदानापैकी काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांना 94 टक्के मतं मिळाली होती. याचा अर्थ, भारताचे जनमत गांधी-नेहरूंच्या बाजूने होते. एकधर्मीय राष्ट्राला लोकांनी बहुमताने नकार दिला होता.
आज द्वेष की एकता, प्रेम यांपैकी काय निवडायचे असा भारतीयांसमोर प्रश्न आहे. नेहरू एकता आणि प्रेमाच्या बाजूचे होते. म्हणून नेहरूंचा विरोधकांना अडथळा वाटतो.
बुद्ध, शंकराचार्य, संत चिश्ती, संत कबीर, तुलसीदास, गुरू गोविंद सिंग, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, रमण महर्षी, गांधी यांना भारतीयांनी सन्मान, प्रेम धर्माच्या कारणाने दिले. जवाहरलाल नेहरू हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना सेक्युलर गुणांसाठी भारतीयांनी प्रेम, मान दिला.
गांधी म्हणत, 'जवाहरलाल पुजाऱ्यापेक्षा देवाच्या जास्त जवळ आहे. म्हणून ते खरे धार्मिक'. अशा नेहरूंना म्हणूनच विरोधक घाबरतात. नेहरू म्हणजे पंचशील. ती जागवली की नेहरू उजेड होतात. सर्वत्र पसरतात. त्या उजेडाचा वारसा लोक जपतील. पुढे नेतील.
'त्यांना नेहरू का नको?' हे राजा कांदळकर लिखित पुस्तक मधुश्री पब्लिकेशन, पुणे या संस्थेने प्रकाशित केले आहे. पुण्यात 28 डिसेंबर 2025 रोजी त्याचे प्रकाशन होत आहे. त्या पुस्तकातले एक प्रकरण.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या