मागील वीस वर्षांपासून गडचिरोली येथील "सर्च" संस्थेमार्फत "निर्माण" हा उपक्रम युवा नेतृत्वाच्या विकासासाठी राबवला जातो. त्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या अनेक युवकांनी विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण काम चालू ठेवले आहे. त्या उपक्रमाच्या वाटचालीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या अमृत बंग यांची मुलाखत, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे, नानासाहेब अर्थात स्व.य. गो. हरताळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 7 डिसेंबर 2025 रोजी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात झाली. "युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण" या थीमभोवती झालेली ही मुलाखत अद्वैत दंडवते यांनी घेतली. (एक तासाच्या या मुलाखतीचा व्हिडिओ युट्यूबवर पाहता येईल.) त्या मुलाखतीचे हे शब्दांकन आहे.
प्रश्न: आजचा विषय आहे, 'युवानिर्माण हेच राष्ट्रनिर्माण'. मुळात, युवानिर्माण का करावं? त्याची गरज काय ? आणि त्याच्यामुळे घडणारं राष्ट्रनिर्माण कसं दिसतं ? मला वाटतं, या प्रश्नापासून आपण सुरुवात करू या आणि नंतर हळूहळू पुढे जाऊ या.
- थैंक्स ! आजची थीम अनेक कारणांसाठी फार महत्त्वाची आहे. 'युवा' हा शब्द खूप वेगवेगळ्या पद्धतींनी वापरता येईल. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या साधारणतः 18ते 29 या वयोगटामधल्या ग्रुपला युथ, युवा, टेक्निकल भाषेत 'इमर्जिंग अॅडल्ट' असं नाव आहे. भारताच्या साधारणतः 140 कोटी लोकसंख्येमध्ये 18 ते 29 या वयोगटामध्ये असलेल्या मुलामुलींचं प्रमाण 22 टक्के आहे. म्हणजे 26 कोटी लोक भारतामध्ये 18 ते 29 वयोगटामध्ये आहेत. सगळ्या जगामधली सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या भारतात आहे. त्याच्यामुळे साहजिकपणे इतक्या मोठ्या युवा लोकसंख्येची डेव्हलपमेंट चांगली होणं, म्हणजे राष्ट्राची डेव्हलपमेंट चांगली होणं आहे.
मात्र, अजून एक-दोन घटक आहेत. हा 'युथ' असादेखील ग्रुप आहे, ज्याला राष्ट्रनिर्माणामध्ये कदाचित सगळ्यात जास्त स्टेक आहे; पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये युथकडे एक 'रिसोर्स' म्हणून पाहिलं जात नाही. यांच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे आणि यांना बहरायला मदत केली पाहिजे, अशा दृष्टीने सहसा कोणी बघत नाही. सरकारचा युवकांकडे बघण्याचा दृष्टीकोन प्राथमिक पातळीवर एक 'मतदार' म्हणून तरी आहे किंवा 'लाभार्थी' म्हणून तरी आहे. एखादी योजना काढायची, तिचं त्यांना लाभार्थी बनवायचं आणि युवा कायम वंचिताच्या भूमिकेत कसा असेल, हे बघायचं. प्रायव्हेट सेक्टरचा युवक-युवतींकडे बघण्याचा प्रामुख्याने दृष्टीकोन म्हणजे, 'आम्ही जे उत्पादन किंवा सेवा देतो, त्याचा युथने कंझ्युमर किंवा कस्टमर किंवा ग्राहक बनावं आणि आम्हाला पैसे द्यावेत'; पण याच्या पलीकडे जाऊन 'यंग पीपल आर वर्दी ऑफ लव्ह, अटेन्शन, केअर अॅन्ड फुल्ली ब्लॉसमिंग इन्टू अ ब्यूटीफुल ह्यूमन बीईंग.' त्याच्यासाठी त्याला किंवा तिला समजून घेतलं पाहिजे, त्याला किंवा तिला वाढायला मदत केली पाहिजे. या दृष्टीने बहुतेक कोणी युवक-युवतींकडे बघतच नाही आणि ही आम्हाला खूप मोठी शोकांतिका वाटते. म्हणूनच खरं तर निर्माणाचं काम आम्ही करतोय. याही दृष्टीने युवानिर्माण हे राष्ट्रनिर्माण आहे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा : 'युवानिर्माण हे राष्ट्रनिर्माण आहे' हे युवकांसोबत काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसांना, शिक्षकांना, पालकांना तर वाटलंच पाहिजे; पण युवकांची स्वतःची समज मात्र 'युवानिर्माण हेच राष्ट्रनिर्माण' एवढ्यापुती मर्यादित राहता कामा नये. कारण युवकांनीदेखील हेच म्हटलं, तर युवक फक्त घेणारा बनेल. म्हणून युवकांनी मात्र उलटं मानलं पाहिजे. 'राष्ट्रनिर्माण हेच युवानिर्माण'. त्यामुळे युवकांनी 'रिसीव्हर' बनण्याच्या ऐवजी 'गिव्हर' बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 'मी राष्ट्रनिर्माणाला कसं कॉन्ट्रिब्यूट करू... मी राष्ट्रनिर्माणाला जितकं कॉन्ट्रिब्यूट करीन, माझं युवानिर्माण आपोआप होऊन जाईल', हा युवकांनी बघण्याचा दृष्टीकोन. असं दोघांनी पाहिलं, तर त्या विषयाचं गांभीर्य आणि त्याची त्या त्या ग्रुपसाठी असलेली अॅप्लिकेबिलिटी योग्य पद्धतीने ठसेल.
प्रश्न - खूपच छान ! 'युवानिर्माण म्हणजे राष्ट्रनिर्माण' किंवा 'राष्ट्रनिर्माण म्हणजे युवानिर्माण' म्हटलं, तर ह्याचा अर्थ सगळ्या युवकांनी किंवा सगळ्या तरुणांनी सामाजिक कामच करायला पाहिजे का? म्हणजे 'युवानिर्माण' या टर्मची व्याख्या करायची झाली, तर तू कशी करशील ?
- सगळ्या युवकांनी सामाजिक क्षेत्रातच काम करायला पाहिजे का? मुळीच नाही! पण सगळ्या युवकांनी काम करायला पाहिजे का? तर नक्कीच ! सामाजिक क्षेत्राची गरज अतिशय आहे; पण आपल्या देशामध्ये सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र यांमध्येदेखील अतिशय चांगल्या कामाची गरज आहे; त्याच्यातपण चांगलं काम करण्याची खूप आवश्यकता आहे.
मग 'युवानिर्माण' म्हणजे काय? त्याला व्याख्येच्या रूपात कसं आणायचं ? हा अतिशय कळीचा प्रश्न आहे. आम्हाला जवळजवळ 10 वर्ष याच प्रश्नाने छळलं. 'आपण युथ डेव्हलपमेंटचं काम करायचं, युवानिर्माणाचं काम करायचं' असा सगळा सुरुवातीचा विचार होता आणि प्रयत्न होता; पण 'युवानिर्माण किंवा युथ डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आणि ते मोजणार कसं?' हा प्रश्न होता. लहान मूल जन्माला येतं आणि वयाने वाढतं, तेव्हा त्याची किंवा तिची वाढ योग्य रीतीने होते की नाही, हे तपासण्यासाठी ग्रोथ माइलस्टोन्स असतात. त्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी काही फ्रेमवर्क आहे, चौकटआहे; पण 18 ते 29 या वयोगटातला एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आपल्याला भेटले, तर त्याचं चांगलं चालू आहे की नाही, हे आपण कसं ठरवायचं ?
'युवानिर्माण' किंवा 'युथ डेव्हलपमेंट' यालाच टेक्निकल, सायकॉलॉजीच्या परिभाषेतला शब्द आहे, 'युथ फ्लरिशिंग'. मग तुमच्यापुढे 22 वर्षांचा, 24 वर्षांचा, 28 वर्षांचा, 19 वर्षांचा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आले, तर ते 'फ्लरिश' होताहेत की नाही, हे कसं शोधायचं? याचं कुठलंही फ्रेमवर्क आपल्याकडे नव्हतं. मग आपल्याला माहितच नसलेल्या गोष्टींचे आपण अंदाजे ठोकताळे बांधतो. आपले ठोकताळे काय आहेत ? - कुठच्या डिग्रीला गेला, कुठच्या कॉलेजला गेला, तुझं पॅकेज किती आहे, लग्न झालं का, तुझ्याकडे गाडी आहे का, तुझ्याकडे फ्लॅट आहे का?... हे निकष वाईट आहेत, असं मला म्हणायचं नाहीये. यांचीही कदाचित गरज आहे; पण एका युथचं जीवन किंवा एका युथचा विकास, म्हणजे निव्वळ हे आहे का ?
आमच्या असं लक्षात आलं की, हे पुरेसं नाहीये. म्हणून आम्ही जवळजवळ पाच-सहा वर्ष खपून हजारो युवक-युवतींसोबत 'निर्माण'मध्ये काम केलं. तसंच या विषयाचं वैज्ञानिक साहित्य दुर्दैवाने भारतात नव्हतं; पण मी पाश्चिमात्य देशात शिकलो होतो, तिथलं काही साहित्य मला मिळालं. ते घेऊन आम्ही युथ फ्लरिशिंग, युवानिर्माण याचं एक फ्रेमवर्क तयार केलं. आम्ही त्याला नाव दिलेलं आहे, 'निर्माण युथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क' हे वेबसाइटवर उपलब्ध आहे. याच्यामध्ये आम्ही सात डोमेन्स केलेत. या सात डोमेन्समध्ये 50 फीचर्स आहेत. त्यामुळे एखाद्या तरुण मुलाची किंवा मुलीची वाढ निकोपपणे होत आहे की नाही, हे आज आपण सात वेगवेगळ्या डोमेन्समधल्या 50 फीचर्सवर मोजू शकतो.
मी सात डोमेन्स तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं, फिजिकल हेल्थ (शारीरिक आरोग्य). दुसरं, सायकॉलॉजिकल वेलबीईंग (मानसिक आरोग्य). तिसरं, कॅरेक्टर डेव्हलपमेंट. सध्या बोलबाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे 'बाहरी पोताई'... कॅरेक्टर अंदरूनी बात ! चौथं, रिलेशनशिप्स (नाती). पाचवं, प्रोफेशनल डेव्हलपमेंट (व्यावसायिक मूल्यविकास). सहावं, लाइफ स्किल्स (जीवनकौशल्यं) आणि सातवं, सोशल कॉन्ट्रिब्यूशन (सामाजिक योगदान).
हे युथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क बनवल्यानंतर याच्या माध्यमातून आम्ही पाच हजार तरुण-तरुणींचा अभ्यास केला. मी तुम्हाला म्हणालो की, सात डोमेन्स आहेत आणि 50 फीचर्स आहेत. आम्ही असं मानलं की, सातही डोमेन्समध्ये किमान 66 टक्के मार्क असतील, म्हणजे त्या त्या डोमेनच्या प्रश्नामधला स्कोअर 66 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर त्याला आपण चांगलं मानू या. 66 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर आपण वाईट मानू या. याच्यातही आम्ही 66 टक्के एवढंच घेतलेलं आहे. म्हणजे आपण जर थोडंसं पुढे नेलं, तर अजून गंभीर चित्र दिसेल; पण आम्ही 66 टक्क्यांचा कटऑफ मानला आणि प्रत्येक डोमेननुसार स्कोअर काढला, तर आमच्या लक्षात असं आलं की, केवळ 17 टक्के युवांना सातही डोमेन्समध्ये 66 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क होते. 83 टक्के युवांचं एका किंवा जास्त डोमेनमध्ये मेजर गंडलंय. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं युथ मालन्यूट्रिशन किती लोकांमध्ये आहे? -83 टक्के; पण जास्त गडबडीचा भाग हा की, सातपैकी चार किंवा चारहून जास्त डोमेन्समध्ये अतिशय वाट लागलेल्यांचं प्रमाण 45 टक्के आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की, भारताचं सीव्हिअर युथ माल नरिशमेंट (तरुणाईचं धोकादायक अनारोग्याचं प्रमाण) 45 टक्के आहे आणि एनी फॉर्म ऑफ युथ माल नरिशमेंट (एकूण अनारोग्याचं प्रमाण) 83 टक्के आहे.
मी तुम्हाला म्हणालो की, त्याच्यामध्ये 50 प्रश्न होते. दुर्दैवाने, केवळ एक टक्का तरुण-तरुणी 50 च्या 50 फीचर्समध्ये चांगलं करत आहेत, असं निदर्शनास आलं. म्हणजे भारताचं खरं युथ माल नरिशमेंट (तरुणाईचं अनारोग्य) वास्तविक 99 टक्के आहे; पण आम्ही 66 टक्के स्कोअरचा कटऑफ ठेवल्यामुळे ते 99 टक्के इतकं भीषण न दिसता 83 टक्के दिसतं; पण दुर्दैवाने ही आज आपल्या देशातली युथ माल नरिशमेंटची स्थिती आहे आणि याच्यातून बाहेर पडणं प्रत्येक युवासाठी तर अर्थातच आवश्यक आहे; पण युवक-युवतींसोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी... पालक, शिक्षक, नोकरदार, भाऊ, बहीण... प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे.
प्रश्न - 'निर्माण' 2006 मध्ये सुरू झालं; पण तू 2008 मध्ये त्याच्यासोबत जोडला गेलास. 2005 ते 2008 च्या दरम्यानच्या तुझ्याही आयुष्याच्या याच टप्प्यात तुलाही कुठेतरी 'या जीवनाचं काय करू' असा प्रश्न पडला होताच. तू प्रश्नांची उत्तर शोधत असलेला तुझ्या आयुष्यातला तो काळ आणि त्याला जोडून मग आताचं काम सुरू झालं, वाढत गेलं. हा काळ... यांना कसं बघतोस ? यात त्या काळाचं योगदान किती ?
- थैंक्स फॉर द ट्रिप बॅक इन्टू मेमरी लेन ! मी 2006 मध्ये कम्प्यूटर इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला पुण्याला शिकत होतो. तेव्हा 'निर्माण'च्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याच्या पहिल्या बॅचचा मीदेखील विद्यार्थी! आमची बॅच संपत आली, त्याच वेळेला माझं तिकडे शेवटचं वर्ष झालं. मी सिमेंटेक कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. त्याच्यामुळे तू म्हणत होतास ते प्रश्न सोबत जात होते. पुण्याला पीआयसीटी नावाचं एक कॉलेज आहे... कम्प्यूटर इंजिनिअरिंगला वाहिलेलं कॉलेज आहे. तिथे मी शिकलो. चार वर्षं संपत आली आणि कॉलेजमध्ये प्लेसमेंटचा बोलबाला सुरू झाला, तेव्हा मला एका कंपनीकडून ऑफर मिळाली. हे दुसऱ्या कंपनीला कळलं. मी पहिल्या कंपनीकडे न जाता दुसऱ्या कंपनीकडे जावं, अशी दुसऱ्या कंपनीची इच्छा होती. म्हणून त्या कंपनीच्या एका सीनिअर मॅनेजरने मला चर्चेसाठी बोलावलं. ते मला खूप पटवण्याचा प्रयत्न करत होते... 'आम्ही तुला अमुक पगार देऊ... आम्ही असं करू... आम्ही तसं करू...' ते वयाने मोठे होते, त्यामुळे आदराने बोलताना मी त्यांना दोन-तीनदा विचारायचा प्रयत्न केला की, 'कॅन वुई डिस्कस... व्हॉट प्रोजेक्ट आय विल बी वर्किंग ऑन ?' किंवा 'नेमका कुठला प्रॉब्लेम आपली कंपनी सॉल्व्ह करते? आपल्याला त्याच्याविषयी जरा बोलता येईल का?' तर त्यांनी ते एकदम झटकून टाकलं... 'देंट ऑल विल कम लेटर ! लेट्स डिस्कस युअर पॅकेज फिगर्स फर्स्ट' आणि अशी जवळजवळ 40 मिनिटं ही सगळी चर्चा झाली. मी त्यांना म्हटलं, "मी तुम्हाला नंतर सांगतो काय ते!"
मी परत येत होतो... बाइकवर होतो. पुण्याच्या ट्रॅफिकमुळे वाटेत विचार करायला भरपूर वेळ मिळाला. आणि मला अचानक जाणवलं की, 'बेसिकली काय सांगितलं जातंय ? - 'बघ, आम्ही तुला भरपूर पैसे देतो... प्रश्न नको विचारूस... सोमवार सकाळ ते शुक्रवार संध्याकाळ तुझं जीवन आमच्या हवाली कर'. मला एकदम वाटलं, 'अॅम आय बीईंग बॉट? मला विकत घेतलं जातंय का?'...
शिक्षणाची संधी मिळालेले, किमान आर्थिक स्थैर्य असलेले तुझ्या-माझ्यासारखे आणि प्रेक्षकांमधल्या अनेक मुलामुलींसारखे भरपूर जण या देशात आहेत. मिळेल ते पत्करायला ते विवश नाहीयेत. मग आमच्यासोबतची चर्चा केवळ अशी का व्हावी? मी काही बाजारात विकली जाणारी वस्तू नाही! आपण सगळ्यांनी आपल्या आजोबांच्या-पणजोबांच्या कहाण्या ऐकल्या, तर त्यांच्यामध्ये अत्यंत हालअपेष्टाच होत्या आणि आपल्या आधीच्या तीन-तीन पिढ्यांमधल्या लोकांनी खस्ता खाऊन खाऊन घरं सेट केलेली आहेत; त्यांचे व्यवसाय सेट केलेले आहेत. त्यांच्या मेहनतीची समृद्धी तुझ्या-माझ्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला प्राप्त झाली आहे. 'मी नेमकं करू काय माझ्या जगण्याचं? त्याचा उपयोग नेमका कशासाठी करू?' हा प्रश्न विचारला पाहिजे. हा प्रश्न न विचारणं किंवा न विचारू देणं हा तरुण पिढीचा किंवा तरुण पिढीसोबतचा द्रोह आहे; आणि 'निर्माण'मध्येही नेमकी तीच चर्चा होत होती.
'निर्माण'च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्यामुळे तिथे शिकलेल्या गोष्टींचा माझ्यावर प्रचंड परिणाम झाला आणि 'निर्माण'चं काम करण्यासाठी पाऊल टाकण्याचं धैर्य माझ्यात निर्माण झालं. आपल्याला मिळालंय, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची एक जबाबदारी मला वाटायला लागली. त्याच्यामुळे खरं तर मी 'निर्माण'च्या कामामध्ये ओढला गेलो.
म्हणून भारतातल्या तरुण मुलामुलींना खऱ्या अर्थाने विकसित व्हायची संधी मिळणं आणि 'माझ्या जीवनाचा 'पर्पज' काय, मी नेमकं कशासाठी जगायचं' हे उत्तर शोधायला त्यांनी धडपड करणं, हे फार आवश्यक आहे. आता 'पर्पज (ध्येय) म्हणजे काय?' अमेरिकेमध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठ आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर विल्यम डेमन नावाचे सायकॉलॉजीचे भीष्म पितामह आहेत. एखादी गोष्ट तुमचा 'पर्पज' आहे की नाही, हे ओळखण्यासाठीचे तीन फीचर्स त्यांनी सांगितले आहेत. एक फार होरायझनएम (क्षितिज लांघणारं ध्येय). पर्पज (ध्येय) लांब पल्ल्याचे असले पाहिजे. विनीत हरताळकर यांचा मुलगा मानस केईएमला पहिल्या वर्षाला गेलेला आहे. पण त्याला जर विचारलं, 'काय रे, तुझ्या डॉक्टर होण्याचा 'पर्पज' काय?' तो म्हणाला, "मला पीजी करायचंय". 'पीजी करायचंय’ हे पर्पज नाही असू शकत. 'पीजी करायचंय' हे उपयुक्त गोल असू शकतं आणि ते गोल पाच-सात-आठ वर्षांत पूर्ण होऊन जाईल. म्हणजे क्षितिजापर्यंत असलेलं. तुम्ही मरून जाल; पण कदाचित तुमचा 'पर्पज' पूर्ण होणार नाही... हा पहिला भाग.
दुसरा भाग, पर्सनली मीनिंगफुल (व्यक्तिगत अर्थपूर्णता). माझा पर्पज मला अर्थपूर्ण वाटला पाहिजे; दुसऱ्याला अर्थपूर्ण वाटून काय उपयोग! बाकीचे लोक काय म्हणतात किंवा त्यांना काय भलं वाटतं, याच्यावर माझा 'पर्पज' ठरणार नाही.
तिसरी बाब, इट हॅज टू बी बियाँड द सेल्फ. माझा पर्पज हा निव्वळ माझ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. तसं असेल, तर ती माझी 'हॉबी' होऊ शकते.
उदाहरणार्थ, मला पुस्तकं वाचायला आवडतात; पण मी असं म्हटलं की, 'आयुष्यामध्ये एक लक्ष पुस्तकं वाचलेली असावीत. तर हे फार होरायझन आहे... भरपूर वर्षं लागतील... पर्सनली मीनिंगफुलपण आहे; पण 'आयुष्यामध्ये मी एक लक्ष पुस्तकं वाचलेली असावीत' हा माझा पर्पज नाही होऊ शकत. ती माझी हॉबी होऊ शकते, माझा छंद होऊ शकतो आणि चांगला छंद जोपासण्यामध्ये काही गैर नाहीये; पण मी जर हॉबी आणि पर्पज समजून घेण्यात गोंधळ घातला, तर ते अडचणीचं ठरू शकतं.
त्याच्यामुळे हे तीन घटक शोधायला तरुण मुलामुलींना कशी मदत करायची, हे खरं तर 'निर्माण' या आमच्या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. 18 ते 29 वयोगटातली, भारतातली, जवळजवळ 23 राज्यातून येणारी तरुण मुलंमुली आता याच्यामध्ये सहभागी होतात. गडचिरोलीला आम्ही राहतो... आमचा कॅम्पस सुंदर आहे. तिथे सहा-सहा दिवसांची शिबिरं प्रत्येक महिन्यामध्ये आयोजित केलेली असतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून आणि भारतातून मुलंमुली येतात.
प्रश्न : 'निर्माण'मध्ये दरवर्षी या प्रक्रियेतून जात असलेले आणि या देशाच्या उभारणीमध्ये योगदान देणारे साधारणतः 600 तरुण-तरुणी दिसतात. मी त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेन की, एक समाज म्हणून उन्नत होण्याकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून 'निर्माण' काम करतंय. तर मग अशा तरुण-तरुणींसोबत काम करतानाचा तुझा अनुभव काय? 'स्व'च्या पलीकडे जाऊन जगत असलेली, 'निर्माण'च्या प्रक्रियेतून गेलेली काही उदाहरणं तू सांगू शकलास, तर खूपच छान होईल.
- माझा अनुभव तर अर्थातच अतिशय आनंददायी आणि आशादायी आहे. म्हणूनच कदाचित मी 18 वर्षं हे करतोय आणि शेवटपर्यंत करत राहीन. 'निर्माण' मधल्या तरुण मुलामुलींनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग निव्वळ 'मी पैसे कमवणं' याच्यापुरता मर्यादित न ठेवता, पुढे जाऊन समाजाच्या उपयोगासाठी केलेला आहे. अशी अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला दिसतील. आमचा एक मित्र आहे, आकाश बडवे. हा नाशिकचा आहे आणि बीट्स पिलानीला शिकला. बार्कलेस नावाची युकेची एक अतिशय प्रसिद्ध बँक आहे. तिच्यामध्ये हा होता. याने ठरवलं की, 'हे नाही करायचं. छत्तीसगडमध्ये 'दंतेवाडा' नावाचा भाग आहे. तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलं असेल. नक्षलवादासाठी आमचा गडचिरोली बऱ्यापैकी बदनाम आहे. गडचिरोली कुछ नाही, असा खरं तर दंतेवाडा आहे. म्हणजे गडचिरोलीच्या माणसालाही जिथे जायला विचार करावा लागतो, असा दंतेवाडा आहे ! तर हा नाशिकचा पठ्ठया बार्कलेसची नोकरी सोडून दंतेवाड्यामध्ये गेला. बारा वर्षं झाली, तो दंतेवाड्यात राहून काम करतो आहे !
दंतेवाड्यामधल्या जवळजवळ चार हजार आदिवासी शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं. त्यांची 'भूम गादी' नावाची कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन (सहकारी संस्था) आकाशने सुरू केली. या 'भूमगादी' कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या द्वारे त्या चार हजार शेतकऱ्यांना ऑरगॅनिक फार्मिंग (सेंद्रिय शेती) शिकवणं, त्यांच्या मालाला मार्केट लिंकेज (बाजारपेठ) उपलब्ध करून देणं हे सगळं त्याने केलं. त्यांच्या भाताचा 'आदिम' नावाचा ब्रँड त्याने तयार केला. त्याच्यामुळे आपण दंतेवाड्याच्या सुपर मार्केटमध्ये गेलो, तर तुम्हाला शेल्फमध्ये भाताची वेगवेगळी पाकिटं दिसतील. त्यांच्यामध्ये तुम्हाला आदिमचा ब्रँड दिसेल.
दुसरं एक उदाहरण सांगतो. अमित पाटीदार नावाचा आमचा एक मित्र आहे. मध्य प्रदेशामध्ये 'मनसोर' नावाची जागा आहे. अमित तिथला आहे. याच्या आईवडिलांचं फार्मसीचं छोटंसं दुकान आहे. अमित अत्यंत हुशार आहे. त्याने एम्स ऋषिकेशला एमबीबीएसचं प्रशिक्षण घेतलं, पीजीसाठी सर्जरीसाठी त्याची एम्स दिल्लीला निवड झाली. ते भारतातलं सर्वोत्तम कॉलेज मानलं जातं. एम्स दिल्लीला सर्जरीच्या वर्गात तो टॉपर होता. हा मुलगा भारतामध्ये कुठेही जाऊ शकला असता. एम्सची परंपरा बघता, हा भारताबाहेर जाऊ शकला असता. हा दिल्लीमध्ये कुठल्यातरी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या साखळीसोबत काम करू शकला असता. अगदी गेला बाजार हा एम्समध्ये फॅकल्टी होऊ शकला असता. याच्यातलं काहीही त्याला अगदी सहज शक्य होतं.
आमच्या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीला एक हॉस्पिटल चालवतो. अमित त्याच्या शिबिरांसाठी आमच्याकडे गडचिरोलीला आला होता, तेव्हा आमच्या संस्थेत, आमच्या अख्ख्या तालुक्यात एकही सर्जन नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. याने ठरवलं की, 'मी इथे जाऊन प्रॅक्टिस करीन' म्हणून एम्स दिल्लीचा सर्जरीचा टॉपर, दुसरी कुठलीही ऑफर न घेता गेल्या दोन वर्षांपासून आमच्यासोबत काम करतो आहे. तो आता आमच्याकडे पूर्णवेळ सर्जन म्हणून काम करतो.
गेल्या वर्षी एका वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी रुग्णांसाठी आम्ही बाराशे शस्त्रक्रिया केल्या. मला हे सांगायला फार अभिमान वाटतो. हा आपल्या 'निर्माण'च्या अकराव्या बॅचचा आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील.
प्रश्न : 'निर्माण' मध्ये तरुणांसोबत काम करणं हे जसं तुझं एक पॅशन आहे, त्याचसोबत आणखी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचा गेली अनेक वर्षं तू सातत्याने पाठपुरावा करतोयस. तो म्हणजे, तरुणांमधली दारू आणि व्यसनं. याच्याबद्दल जर तू बोलू शकलास, तर खूपच छान !
- थैंक्स अद्वैत! मी सहा महिन्यांचा असताना, 1986 मध्ये आईबाबा गडचिरोली जिल्ह्यात जाऊन स्थायिक झाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू भरपूर प्रमाणात होती आणि 'ही दारू बंद करावी' असं तिथल्या अनेक लोकांना वाटलं. म्हणून 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती'ची एक चळवळ सुरू झाली. 'शासन करेल तेव्हा करेल; पण आपण जनतेची दारूबंदी घोषित करू या' म्हणून जनतेची दारूबंदी घोषित करण्यासाठीचा एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला. माझ्या आजोबांपासून माझ्यापर्यंत सगळं कुटुंब त्यात सामील होतं. अखेरीस, अनेक खटपटी होऊन आम्ही गडचिरोलीची दारूबंदी करू शकलो. म्हणून 1994 पासून आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये अधिकृतरीत्या दारूबंदी आहे. लोकांनी मिळून पहिल्यांदा दारूबंदी लागू केलेला महाराष्ट्रातला तर निश्चित पहिला, कदाचित आम्ही देशातला पहिला जिल्हा आहोत.
आमच्याकडची दारूबंदी 80 टक्के यशस्वी आहे, आणि तरीदेखील काही बेकायदा दारू आमच्याकडे चालते. त्याच्यामुळे अजून 100 टक्के यश आलेलं नाही; पण त्यावर काम सुरू आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटींच्या महाराष्ट्रात मागच्याच्या मागच्या वर्षी 50 हजार कोटी रुपयांची दारू खपली. देंट इज द स्केल ऑफ अल्कोहोल इकॉनॉमी ऑफ धिस स्टेट ! आणि सरकारला दारूच्या टॅक्सचं व्यसन का आहे, हे आता मी पुनश्च सांगायची गरज नाही. पण 12 कोटींच्या महाराष्ट्रात जर 50 हजार कोटींची दारू खपते, तर 12 लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात त्याच प्रमाणात बघितलं, तर 500 कोटींची दारू खपायला पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये खपलेल्या दारूचं प्रमाण होतं, 60 कोटी रुपये. त्यामुळे आम्हाला अजून काम करायला भरपूर वाव आहे; पण दारूबंदी नसती आणि गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांसारखा असता, तर आमच्या जिल्ह्यामध्ये 500 कोटींची दारू खपली असती. म्हणजे 440 कोटींची दारू आमच्या जिल्ह्यात खपली नाही. हे गडचिरोलीच्या दारूबंदीचं यश !
आता ही झाली पार्श्वभूमी; पण व्यसन. विशेषतः 'दारूचं व्यसन, दारूचा उपभोग आणि तरुण वर्ग' हे सध्या भारतापुढच्या एका मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. 18 वर्षांच्या पुढच्या भारतातल्या अॅडल्ट्सपैकी जवळजवळ 28 टक्के अॅडल्ट्स हेवी एपिसोडिक ड्रिंकिंग करतात. पाश्चिमात्य जगामध्ये खरं तर आता दारूचं प्रमाण हळूहळू कमी होतंय; पण दुर्दैवाने आपल्या देशात मात्र ते वाढतंय. याचं कारण याबाबतीत असलेले प्रचंड गैरसमज ! विशेषतः तरुण पिढीमध्ये 'अरे दारू पिणं कूल आहे रे!' असं मानलं जातं किंवा अनेक लोक सांगतात, 'अहो, डॉक्टरच म्हणतात की, थोडीशी दारू प्या... तेच पितात.' एक गैरसमज आपल्या डोक्यामध्ये असाही भरवलेला आहे की, 'थोडीशी प्यायली, तर बरी असते... हृदयासाठी चांगलं असतं, असं आम्ही ऐकलेलं आहे'.
याबाबतीतलं सत्य काय, हे आपण पहिले समजून घेऊ या. मानवी इतिहासातला सार्वजनिक आरोग्याचा सगळ्यात मोठा अभ्यास झालाय. त्याचं नाव आहे 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी' या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडीने आता निर्विवादपणे असं सांगितलेलं आहे की, 'द सेफेस्ट लिमिट टू कन्झ्युम अल्कोहोल इज झिरो'. दारू पिण्याची सुरक्षित पातळी शून्य आहे. मेडिकलच्या टेक्स्टबुकमध्ये जर दुसरं लिहिलं असेल, तर ते टेक्स्टबुक चूक आहेत. कारण ती आउटडेटेड आहेत.
दारूच्या बाबतीतलं हे विज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून अल्कोहोल कंपन्या प्राणपणाने प्रयत्न करतात. जगातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी दारूची एक कंपनी आहे, डीआयजीओ. त्यांच्या सीईओची मुलाखत मी वाचली. त्याने असं लिहिलं की, 'वेस्टर्न देशांमधली इकॉनॉमी सॅच्युरेट झालीये...
थिजलीआहे... पिऊन पिऊन किती पितील ! उलट तिकडे आता खरं तर लोकांना हे विज्ञान लवकर कळत असल्यामुळे दारू पिण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतंय. त्यामुळे आपल्याला दारूची इकॉनॉमी वाढवायची असेल, खप वाढवायचा असेल, तर कुठे लक्ष केंद्रित करा. विकसनशील देशांवर केंद्रित करा. त्याच्यात भारतासारख्या देशावर केंद्रित करा... कारण खूप खूप जनता आहे.'
दुसरा मुद्दा, भारतात कोणावर लक्ष केंद्रित करा ? तर 'ज्यांचं वय 80 झालं आहे, त्यांनी आता ग्राहक बनून काय अर्थ आहे? आपल्याला लांब पल्ल्याचं गिऱ्हाईक पाहिजे. म्हणून तरुणांवर फोकस करा'. आणि अजूनही पुढचं, हे विशेषतः मुलींसाठी... तो म्हणाला की, 'मुलं तशी मूर्खच असतात. ती पितीलच. या भारतीय बाया ही अडचण आहे! या काही पटकन पीत नाहीत. तर आपण भारतीय तरुण मुलींच्या मागे लागलं पाहिजे. म्हणजे यांना जर आपण दारू प्यायला प्रवृत्त करू शकलो, तर लांब पल्ल्याचा बकरा आपल्याला मिळेल.' म्हणजे भारतासारख्या अर्थव्यवस्थेवर फोकस करणं, त्यातल्या तरुणांवर फोकस करणं आणि त्याच्यातही शक्य असेल तर मुलींवर फोकस करणं, ही अल्कोहोल कंपन्यांची प्लॅन्ड मार्केटिंग नीती (नियोजित रणनीती) आहे; आणि याचा बळीचा बकरा आपण सगळे जण बनतो !
प्रश्न - 'युवानिर्माण हेच राष्ट्रनिर्माण आहे' तर त्या युवानिर्माणाची जबाबदारी केवळ एकट्या अमृत बंगची किंवा 'निर्माण'ची किंवा मोजक्या लोकांची नाहीये. तर एक समाज म्हणून ती आपल्या सगळ्यांची आहे. मग मी माझ्या पातळीवर - एक शिक्षक म्हणून, पालक म्हणून, विद्यार्थ्यांचा मेंटर म्हणून मी आहे तिथे ती जबाबदारी कशी पार पाडू शकतो ?
- फारच सुंदर प्रश्न आहे! तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. धिस इज सच अ बिग चॅलेंज अॅन्ड सच अ बिग अपॉर्च्यूनिटी देंट नो वन पर्सन अॅन्ड वन ऑर्गनायझेशन कॅन डू इट! आपण सगळे काय काय करू शकतो? तर 'काय करू शकतो' आणि 'काय करायला नको' याचा मी जरा ऊहापोह करेन.
पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून सगळ्यात पहिली, एक महत्त्वाची गोष्ट आपण करता कामा नये. ती म्हणजे, तरुण मुलांना सतत कवचाखाली ठेवणं, अतिशय प्रोटेक्टिव्ह पद्धतीने त्यांना वाढवणं. लहान मूल म्हणून त्याला किंवा तिला वागवणं... आता चोपडा हे वेगळं गाव आहे आणि त्यामुळे इथे कदाचित लागू नाही होणार, पण शहरामधल्या अनेक मुलामुलींनी लाल डब्याने आयुष्यात कधी प्रवास केला नाहीये. मी काही मुलांना चक्क ही असाइनमेंट दिली आहे... 'बस स्टॉपवर जा... लाल डब्याचं तिकीट काढ... कुठेही जा... चार तास एक साइड जा... उतर... काहीतरी खा... परत ये' हीच तुझी असाइनमेंट. म्हणजे या पातळीचं शील्डिंग चालू आहे. पालकांना दुर्दैवाने असं काहीतरी वाटतंय की, 'मी माझ्या मुलाला किंवा मुलीला फुलासारखं जपलं, तर तो काहीतरी फार भलं करेल' असं नाही होणार. युवक जेव्हा बाह्य समाजातल्या परिस्थितीला सामोरे जातील, चार चुका करतील... करू द्या; उलट पालक किंवा शिक्षक म्हणून त्याला प्रोत्साहन देणं आपलं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्याच्यातून आपण युवानिर्माणाला हातभार लावू.
दुसरा एक भाग मला वाटतो. तो म्हणजे, आर्थिक स्वयंपूर्णता. तरुण मुलं लवकरात लवकर आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर कशी उभी राहतील. ही जबाबदारी आपण त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आजकाल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशी अनेक उदाहरणं सापडतील, जिथे तरुण मुलाचं किंवा मुलीचं वय 26 झालं आहे, 28 झालं आहे... 'काय करतोय रे?'... 'नाही मी पीजीची तयारी करतोय' किंवा 'मी यूपीएससी-एमपीएससीची तयारी करतोय'... आणि तो घरीच राहतोय की अजून कुठंतरी राहतोय; पण आईबाबांच्या पैशांवरच जगून राहिलाय ! त्याने आयुष्यात काही कामही नाही केलंय. आय थिंक देंट इज राँग. आपण त्याच्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलीला सक्षम मानण्याच्या ऐवजी उलट त्याला कुबड्या देतोय. हे करू नये. काय वाटेल ते काम केलं तरी चालेल; पण घरून पैसे न घेता स्वतः काम करायला पाहिजे. त्याच्याशिवाय 'आटे दाल का भाव' ही कळत नाही आणि त्याच्याशिवाय स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायची धमकपण येत नाही. पुन्हा या अनभिज्ञतेमुळे तरुण मुला-मुलींच्या जगाकडून अतार्किक अपेक्षापण तयार होतात. वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. कारण त्यांना आपण जीवनाच्या आर्थिक जबाबदारीपासून दूर ठेवलंय.
एका गोष्टीसाठी आपण तरुण मुला-मुलींना जरूर प्रोत्साहन द्यावं... ती म्हणजे, वाचन. 'चांगली पुस्तकं म्हणजे काय?' असा जर कोणाला प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर मी सहज देऊन देतो. आमच्या 'निर्माण'च्या वेबसाइटवर तुम्ही गेलात, तर तिथे शिफारस केलेली 200 पुस्तकं आहेत. तरुण मुलामुलींनी ती वाचलीच पाहिजेत. त्यांची यादी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने दिली आहे.
'पुस्तक' ही अशी सुंदर गोष्ट आहे, जिच्यामुळे आपण मानवी इतिहासामधल्या उत्तुंग लोकांसोबत संवाद करू शकतो. अनेक थोर लोक थोर होते, पण मरून गेले... चार्ल्स डार्विन मरून गेला... शेक्सपिअर मरून गेला... महात्मा गांधी मरून गेले... आता यांना भेटणं कधी जमणार नाही; मग आता मी काय करायचं ? तसंच अनेक लोक महान आहेत; पण मला त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. अमर्त्य सेन, मायकल सँडल... महान लोक आहेत; पण मला नाही रोज भेटतायेत त्यांना... ते दहा हजार किलोमीटर दूर आहेत ! इफ आय रीड देअर बुक्स, आय कॅन ट्रान्सेन्ड द बाउंड्री ऑफ स्पेस अॅन्ड मीट देम.
सगळ्यात शेवटचा मुद्दा. मी तो मघाशी सांगितलेला आहेच. तरुण मुलांच्या जीवनाच्या यशस्वितेचा सगळ्यात मोठा घटक म्हणजे, पर्पज शोधता येणं. सायकॉलॉजीमध्ये आता असं भरपूर संशोधन झालेलं आहे. 20 ते 30 या वयोगटामध्ये जर एखाद्या तरुण-तरुणीला त्याचा किंवा तिचा पर्पज शोधायला मदत झाली आणि ते खरंच पर्पज शोधू शकले, देन देंट इज द बेस्ट प्रेडिक्टर ऑफ देअर लाँग टर्म वेलबीईंग. त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्ही करू शकता. आपण एक प्रश्न त्याला सारखा विचारावा आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्याला मोकळीक द्यावी; प्रोत्साहन द्यावं. 'तुझा पर्पज काय ?' त्याच्यामुळे निव्वळ आर्थिक जीवन न जगता अर्थपूर्ण जीवन जगता येण्यासाठी सर्व तरुण-तरुणींना आपण मदत करू शकलो, तर 'युवानिर्माण' आणि 'राष्ट्रनिर्माण' या दोन्ही गोष्टी साध्य करता येतील.
संवादक : अद्वैत दंडवते
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या