डिजिटल अर्काईव्ह

श्री. विजय तेंडुलकर यांच्या या नाटकाला गेल्याच आठवड्यात पाच हजार रुपयांचा कमलादेवी पुरस्कार मिळाला असून त्याचे अनुवाद व प्रयोग चौदाही भारतीय भाषांत होणार आहेत. श्री. तेंडुलकर यांचे या यशाबद्दल अभिनंदन.

ओसरलेला दिवस, रेंगाळणारे क्षण. एका न्यायालयात आणि तेही अभिरूप! आरोपी स्त्री!
फार फार अस्वस्थ!
एका भयानक आरोपात गुरफटलेली! भ्रूणहत्या! नुकत्याच जन्मलेल्या मुलाची हत्या!
भयानक! फारच भयानक!
कोर्ट इज इन सेशन!
न्यायालयावर पसरलेले सावट! एका निरपराध अर्भकाच्या मृत्यूचे! 
तुटून पडणारा सरकारी वकील, त्याला मदत करणारा न्यायाधीश!
खऱ्या साक्षी उभारणारे साक्षीदार
आणि आरोपीच्या पिंजऱ्यात थरथरणारी स्त्री…
ऑर्डर! ऑर्डर !
उसासणारे कोर्ट ! अभिरूप न्यायालय म्हणून उभे.
एका अभिरूप खटल्याची रिहर्सल…

सरपटणारा काळ ! क्षणाक्षणाने !
काळा डगला सावरणारा वकील ! सुखात्मे !
टोप सरकवणारा न्यायाधीश मिस्टर काशीकर ! 
मधूनच साक्ष देणारा ! समोर मिसेस काशीकर ! अधून मधून बडबडणाऱ्या! विटनेस सर !
पिंजरे हालवणारा कोणी रोकडे ! तोही न्यायाधीशाचा आश्रित ! 
आणखी एक साक्षीदार मधून मधून गुरगुरणारा.
सारी परिस्थिती बंदिस्त !
मने. ती पण बंदिस्त !
आरोपीचा वकील सुखात्मे ! तोच सरकारी वकील ! पाइप ओडणारा पोंक्षे ! खोटा शास्त्रज्ञ म्हणून. न्यायालयात वावरणारी माणसे !
भूमिका घेऊन जगणारी, भूमिकेसाठी जगणारी ! 
अभिरूप आयुष्य ! अभिरूप न्यायालय ! आरोपीच्या पिंजऱ्यात उभी मिस बेणारे !
तीच तेंडुलकरांची नायिका. एक शाळामास्तर.
पिंजऱ्याने वेढलेली.
नीतीचे पिंजरे ! अनीतीने वेढलेले !

कोर्ट इज इन सेशन ! एक अस्वस्थ देणारे !
तिला पार करून जाणारे एक वादळ
त्यात थरथरणारे शरीर. मन पण. 
बेणारे. प्रेक्षकांपुढे उभी !
म्हटले तर एक स्त्री म्हणून ! म्हटले तर तिची डमी.
येणारा क्षण जाणारा क्षण.
प्रत्येक क्षण नव्या नवलाईने जगणारी बेणारे बाई !
क्रॉसिंग इज गोइंग ऑन ! 
अस्वस्थ बेणारे. तिचे भेसूर आयुष्य !
त्याचा भेसूर अर्थ !
क्रॉसिंग इज गोइंग ऑन !
नीतीचे क्रॉसिंग ! अनीतीचे ! सारेच अगम्य.
प्रोफेसर दामल्यांच्या आयुष्याएवढे ! 
गर्द ! गंभीर !  प्रतिष्ठित वाह !
गर्भगळित बेणारे !
तिच्या नशिबावर नाचणारे प्रो. दामले !
तिच्या पोराचे बाप !  तिने मारलेल्या.
म्हणून तर ती न्यायालयात उभी. मध्येच कुत्सितपणे हसणाया मिसेस काशीकर !
मध्ये नाचणारे तिच्या आयुष्याचे अर्थ
न्यायालयात लिलावात निघालेले !
झुरळासारखी जबाबदारी झटकणारे प्रो. दामले 
तिच्या नशीबाचा ढळलेला तोल ! 
आयुष्याचा ढळलेला पदर !
ती! मिस बेणारे. अभिरूप न्यायालय | अभिरूप खटला !
न्याय नेहमीचाच !
आरोपी मिस बेणारे! बरोबर तिचे दुदैव !

खऱ्या गोष्टीचे खोटे सेट उभारणारे साक्षीदार.
पैसे घेऊन प्रयोग करणारे तिचे सहकारी !
उलवलेल्या नशिबाची मिस बेणारे !
उलटलेल्या न्यायालयात झगडणारी !
ऑर्डर ! ऑर्डर !
तिच्या चारित्र्यावर चार्ज ठेवणारा सरकारी वकील - हूँ ऽ नैतिकतेची लेक्चर हाणतोय.
संस्कार, समाज, परंपरा, अस्मिता… शी शब्दांचा गाळ उकरतोय !
मिस लीला बेणारे ! तिचे बेवारशी मूल ! ती म्हणे धर्माला सुरुंग लावते
वाऽ कसचा धर्म ?
कोठला माणसांनीच उभारलेला ! माणसांनीच लावाडलेला परंपरेचा चिखली ! सारी फसवणूक मनाशीच आपल्या त्यातच बुडलेली मिस बेणारे ! तेंडुलकरांची नायिका.

तिच्यावर उलटलेले न्यायालय.
काही तरी क्षणाक्षणाला घडणारे. क्षणाक्षणाला मोडणारे !
प्रत्येकाला प्रत्येकाचा अर्थ. आणि तोच पिसाटपणे गर्जून सांगणारी मिस बेणारे.
जगाला हसणारी. हसता हसता थुंकणारी ! 
जगण्याच्या सुखात बुडलेली. 
पण त्यालाच विश्वासघात म्हणणारी.
क्रॉसिंग इज गोइंग ऑन. 

बेणारेच बोंबलतेय. अभागी शिक्षिका.
मिलॉर्ड, जीवन ही महाभयंकर गोष्ट आहे. 
जीवनाला फाशी दिले पाहिजे 
जीवन म्हणजे शरीर.  भावना म्हणजे हळवेपणाच्या गुजगोष्टी. तिचे स्पष्ट स्पष्ट अर्थ, पण चुकलेले. आणि त्यापायी नोकरी गमावणारी मिस  बेणारे.
एका पोराला जन्माला घालून पण प्रेम करून 
आरोपीच्या पिंजऱ्यात बुडलेली बेणारे !
लहानपणी मामावर प्रेम करणारी, मोठेपणी प्रो. दामल्यांवर प्रेम करणारी. मिस बेणारे.
रक्ताची आई, मामा, तुला समजू शकत नाहीत ! तर रक्तापलीकडचे प्रो. दामले काय समजून घेणार ? मिस बेणारे ! तू साफ चुकत आहेस !
माणसे आपल्याला समजून घेत नसतात, ती समजून घ्यावी लागतात !
मिस बेणारे, तू मामावर प्रेम केलेस. मग तुझा भ्याड मामा पळाला 
मिस बेणारे, तुझा मामा शहाणा आहे मिस बेणारे, नैतिकतेची बांडगुळे भावनांच्या वृक्षांवर पोसली जातात मिस बेणारे! तुला एवढे कळत नाही ! काळ बदलतो. शरीरे बदलतात.
रंग बदलतात. अर्थ बदलतात. पण परंपरा तेथेच असतात !

न बदलण्यासाठीच त्या जन्माला येतात मिस बेणारे, 
तुला माहीत नाही परंपरा बदलणारेच नेहमी मूर्ख ठरतात !फूलिश !
मिस बेणारे (लुबाडणारी ) तुझी आई मूर्ख नाही. तुझा मामा मूर्ख नाही ! तूच मूर्ख ठरशील कदाचित ! त्यालाच म्हणतात जग !
फॉसिंग इज गोइंग ऑन !

शरीराची किळस घेऊन जगणारी मिस बेणारे!
तिचा घात करणारे प्रो. दामले ! 
कुत्र्याहून कुत्रा होऊन जगणारे
प्रतारणेतच प्रतिष्ठा मानणारे ! शी
त्यांनी दिलेल्या सुखाच्या कणाला कवटाळणारी मिस लीला बेणारे
आपल्या सुंदर मुलाची बागडती स्वप्ने बघणारी !
त्याला वाचवण्यासाठी पोंक्षे, रोकडे साऱ्यांना शरण जाणारी !

जीवनापुढे अगतिक होणारी ! 
माणसांपुढे लाचार बनणारी !
क्रॉसिंग इज गोइंग ऑन

काळा डगला उगाचच सावरणारे सुखात्मे वकील.
फुलांची वेणी चाचपणाऱ्या मिसेस काशीकर ! 
धूसर प्रकाशात बुडलेले क्षण. 
शरीराची किळस घेऊन जगणारी मिस लीला बेणारे
काँसिग कंटिन्यु !
मिस बेणारे, प्रो. दामल्यांवर प्रेम केलेस ना तू ? निष्पाप, निर्लेप काही म्हण !
तुला या तुझ्या शरीराची फिळस वाटते?
दामल्यांच्या नाही ! 
मग, मिस बेणारे, तू तुलाच फसवले आहेस! तू जगाला फसवत आहेस ! 
दामले तुला देव वाटला, पण मिस बेणारे, तू हे विसरतेयस. या जगात कोणीच कोणाचा देव असू शकत नाही.
हाडामांसाचा तर नाहीच नाही !! 
तो असलाच तर तोदेखील ह्या पिसाट माणसात राहून पिसाट बनून जाईल !
मिस बेणारे! स्वर्गीय सुखाचा क्षण देणारा म्हणून तुला देह हवा आहे !
म्हणूनच तू त्याचा गौरव करतेस
पण मिस बेणारे, ह्याच देहाने उपटलेल्या सुखावर जगणे एवढाच आयुष्याचा अर्थ आहे
त्यासाठीच तर सारा जगण्याचा खटाटोप ! हा अर्थ तुला समजून घ्यायला हवा, मिस बेणारे ! 
ऑर्डर! ऑर्डर !! 

गडबडीने टोप चढवणारा न्यायाधीश
धूसर प्रकाशात बुडलेले कोर्ट !
जीवन ! एक अभिरूप न्यायालय
माणूस ! आरोपी क्रमांक एक ! 
जजमेंट इज गोइंग ऑन !
काळ थांबून राहिला आहे. 
मिस बेणारे ! तुला जिवंत ठेवून तुझ्या गर्भाला मारण्याची शिक्षा फर्माविली जात आहे ! 
तू निरागसच आहेस. पाकळ्यांचे जीवन जगणारी ! 
पण तू अडकली आहेस ! जीवनाच्या खऱ्या खोट्या अर्थात
मिस बेणारे, निरागसतेच्या भिंती तेंडुलकर तुझ्या आयुष्याभोवती सहजतेने उभारत आहेत !
त्यांच्याच सावल्यांत सारे प्रेक्षक बडून गेले आहेत !

जजमेंट संपले आहे!
अर्थ कोसळत आहेत !
त्यांची झिंग चढून, तू आरोपीच्या पिजऱ्यात उभी आहेस, मिस बेणारे तुझ्या अपराधी गर्भाला घेऊन ! मिस बेणारे !
तेंडुलकरांनी नवाच खटला उभारला आहे!
विवेकाच्या न्यायालयात! तुमच्या, माझ्या प्रत्येकाच्या !
मिस बेणारे, तू जिंकलो आहेस !
मिलॉर्ड, खटला संपला आहे ! 
काळ जागीच थबकला आहे !

Tags: अशोक प्रभाकर डांगे कमला देवी पुरस्कार नाटक शांतता कोर्ट चालू आहे विजय तेंडुलकर Ashok Prabhakar Dange Kamla Devi Puraskar shantata Court chalu aahe drama Vijay Tendulkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी