डिजिटल अर्काईव्ह

राजधानी दिल्ली : 17 जानेवारी 1970

चौथी पंचवार्षिक योजना पुन्हा असावी; बेकारी निवारणावर जोर द्यावा; रोजगार पुरवण्यासाठी केंद्रात 50 कोटींचा आयोग असावा; राज्यांनी 2 ते 5 कोटी रुपये यासाठी बाजूला काढावेत; हरिजन गिरिजनांच्या निवाऱ्याची सोय असावी; मुलांना आहार, शिक्षण आणि गणवेश मिळावेत; पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात सर्वत्र सोय व्हावी; बँकांच्या शाखा खेडोपाडी उघडाव्यात, शेतकरी व छोटे व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज मिळावे; अभ्यास मंडळे चालवावीत; जनता संपर्क वाढवावा अशा किती तरी मुद्द्यांवर चांगले चिंतन ठरावात आहे.

काँग्रेस सरकार जरी एक असले तरी केंद्रात तरी काँग्रेस संघटना मात्र दोन आहेत! तूर्त जे काही जास्तीचे व विशेष घडत आहे ते संघटनांच्या आघाडीवर आहे. सरकारात व संसदेत 'जैसे थे' परिस्थिती यत्नपूर्वक टिकून राहिली वा धरली आहे असे म्हणावे लागेल. तेव्हा राजकीय जीवनाला जी गती आल्यासारखी वाटत आहे त्यासाठी दोन्ही काँग्रेस संघटना काय करीत आहेत हे पाहणे अगत्याचे होते.

गांधीनगर (अहमदाबाद) आणि मुंबईचे आझाद मैदान येथली जुन्या-नव्या काँग्रेसची अधिवेशने संपवून मंडळी आपापल्या जागांकडे निघून गेली आहेत. जुन्या काँग्रेसच्या कार्यकारिणीची पहिली बैठक 3 व 4 जानेवारीला दिल्लीत झाली. नव्या काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक काँग्रेस अध्यक्ष श्री. जगजीवन राम ह्यांच्या आजारपणामुळे पुढे सरली. ती आता होणार आहे दि. 18 जानेवारीला.

आर्थिक कार्यक्रम
जुन्या काँग्रेसच्या कार्यकारिणीने पास केलेल्या ठरावात नव्या काँग्रेसबद्दल फार न बोलता देशापुढच्या परिस्थितीची सखोल विस्तृत दखल घेतली. चौथी पंचवार्षिक योजना पुन्हा असावी; बेकारी निवारणावर जोर द्यावा; रोजगार पुरवण्यासाठी केंद्रात 50 कोटींचा आयोग असावा; राज्यांनी 2 ते 5 कोटी रुपये यासाठी बाजूला काढावेत; हरिजन गिरिजनांच्या निवाऱ्याची सोय असावी; मुलांना आहार, शिक्षण आणि गणवेश मिळावेत; पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात सर्वत्र सोय व्हावी; बँकांच्या शाखा खेडोपाडी उघडाव्यात, शेतकरी व छोटे व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज मिळावे; अभ्यास मंडळे चालवावीत; जनता संपर्क वाढवावा अशा किती तरी मुद्द्यांवर चांगले चिंतन ठरावात आहे. राजकीय ठरावात नव्या काँग्रेसची उत्तर प्रदेशातील गुप्ता सरकार पाडण्याच्या, साखर धंद्याच्या मतलबी राष्ट्रीयीकरण करण्याच्या, बिहारमध्ये मंत्रिमंडळ न बनवू देण्याच्या कारवायांची निंदा करण्यात आली आहे. जुन्या काँग्रेसच्या हाती गुजरात, म्हैसूर व उत्तर प्रदेश ही तौलनिकदृष्ट्या मजबूत प्रगतिशील राज्ये आहेत. तेव्हा तिचे पुढारी जे बोलतील ते राज्यात करून दाखवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. आजवर सारखे जरी ते तेच बोलत असले तरी त्यांना नव्या परिस्थितीत बोलल्याप्रमाणे करून दाखवण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना इच्छा असेल तर बोलल्याप्रमाणे करणे अवघड नाही. नव्या काँग्रेसच्या वाटचाला महाराष्ट्र, आंध्र सोडून जी राज्ये आली आहेत त्यांत करायचे काम पुष्कळ आहे; साधनांचा अभाव आहे; आंध्रात तेलंगणाची अडचण आहे. तेव्हा कृती करायलाच लागले दोन्ही काँग्रेस पक्ष तर जुनी काँग्रेस लवकर उजवी ठरण्याचा संभव आहे! नव्या काँग्रेसला भक्कम आधार केंद्र सरकारमध्ये तिच्या हाती असलेल्या सत्तेचे आहे. पण तिच्या अडचणीही भरपूर आहेत!

संसोपाला संधी
सबंध देशाचे राजकारण आता उत्तर प्रदेश व बिहार इथली सरकारे कशी पडतात व घडतात यावर अवलंबून आहेसे दिसते. बिहारमध्ये काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाल्यासारखे आहेत. तीच गत उत्तर प्रदेशची. बिहारमध्ये नव्या काँग्रेस पक्षाचे पुढारी म्हणून 11 तारखेला श्री. दरोगाप्रसाद राय यांची निवड झाली. उत्तर प्रदेशातली निवड 15 जानेवारीस होईल. दरम्यान संसोपाच्या सोनपूर अधिवेशनाने संसोपा नेतृत्वाचे हात कुणाशीही मिळवणी करण्यासाठी मोकळे ठेवले आहेत. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये संसोपाचे पक्षी चांगले आहे. येते 15 दिवस या दोन राज्यांतील राजकारणावर दिल्लीचे लक्ष केंद्रित झालेले दिसेल. श्री. बहुगुणा पाटण्यात तळ ठोकून आहेत, आणि श्रीमती गांधी तीन दिवसांचा झंझावाती दौरा उत्तर प्रदेशात करत आहेत! तेव्हा कार्यक्रमाच्या जोरावर सहकार्य देऊ करणाऱ्या संसोपाला जनकल्याणाच्या दिशेने राजकारणाला गती देण्याची मोठी संधी आहे.

संस्थानिकः थैल्याः विशेषाधिकार
संस्थानिकांच्या थैल्या व विशेषाधिकार यावरचे वादळ जरी 2-3 वर्षे घोंघावत असले तरी आता ते शमेलसे दिसते. त्यातला जोम कमी झाला आहे. सर्वांना कळून चुकले आहे की विशेषाधिकार समाप्ती आता लवकर होईल. गृहमंत्री श्री. चव्हाण यांची कंकॉर्डच्या नेत्यांशी जी चर्चा झाली त्यात सरकार पुढे सरल्यासारखे दिसले. संस्थानिकांच्या प्रतिनिधींनीही सर्व मूठ न उघडता जे शक्य होते ते जाणून घेतले. घटनादुरुस्ती होईल आणि त्यात विशेषाधिकार समाप्त होतील. पूर्वीसारखाच प्रत्येकाशी थैलीबद्दल समझोता होईल! मोठे थैलीवाले थोडे आहेत. छोट्या थैल्यांचे धनी पुष्कळ. तेव्हा देवाण-घेवाण करून 20 वर्षांच्या मुदतीच्या हप्त्यांनी हा तपशील ठरेल. 5 कोटींच्याऐवजी काही कमी कोटी देऊन सत्ताधारी पक्षाला प्रश्न बाजूला केल्याचे श्रेय घेता येईल. संस्थानिकांचे भौतिक-नैतिक दडपण भारतीय राजकारणातून लगोलग नाहीसे होईल असे मानायचे मात्र कारण नाही!

चंडिगड: बेळगाव
चंडिगड ही एक वाहती जखम झाली आहे. अंगावर येणाऱ्या मस्त बैलाची शिंगे पकडून त्याला लोळवावे तसे भारतीय प्रश्न नेतृत्वाने कधी हाताळलेच नाहीत. प्रश्नांच्या उकलीसाठी तत्त्वे, वस्तुनिष्ठ माहिती पर्यायांतून निर्माण होणारे कल्याण अकल्याण, देशहितैषी दृष्टी असे काहीही नेत्यांच्या, जनतेच्यासमोर असते असे दिसत नाही. दडपण वाढेतो थांबायचे आणि ते कमी होईल एवढाच अवघडपणाचा परिहार करायचा! स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या उपखंडप्राय देशाच्या विभाजनाचे विष ह्या जनतेने पचवले. त्यांनी पंजाब, हरियाणा अलग झाले तेव्हा चंडिगडच्या फैसल्यासही अनिच्छया मान्यता दिली असती. आता अकालींचा लोकसभेत नव्या काँग्रेसला पाठिंबा हवा आहे; संत फत्तेसिंगांना उपोषण व आत्मदाह ह्यापासून परावृत्त करायचे आहे. हरियाणातील श्री. बन्सिलाल ह्यांचे मंत्रिमंडळ वाचवायचे आहे. उत्तर प्रदेशात श्री. चरणसिंगांचा सहकार्याचा हात हातून निसटू द्यायचा नाही; तेव्हा चंडिगडच्या प्रश्नाची उकल आश्वासन दिले असूनही पुढे तरी ढकलावी लागेल नाही तर 70-30 किवा 60-40 या प्रमाणात वाढणी करवून तो प्रश्न सोडवावा लागेल! ह्या निर्णयाची व्यवहार्यता काहीही असो, राजकारणी मंडळींना अन्य मार्ग नाही! आणि ह्या प्रश्नाच्या उकलीच्या धर्तीवर बेळगाव- कारवारचा प्रश्न सुटणार आहे म्हणतात!

महाराष्ट्रातील कृषि पंडित
शेतकरी जागा झाला आहे. ग्रामीण भागात बदल होत आहे. हा गोष्टींचा पुरावा परवा महाराष्ट्रातून आलेल्या कृषि-पंडितांच्या परिचयाने मिळाला. 1968-69च्या खरीप पिकात भातासाठी सांगली जिल्ह्यातल्या शिराळ तालुक्याचे श्री. नारायण आबा पाटील यांना पहिला नंबर मिळाला. दुसरा नंबर कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. रामजी धोंडी पाटील यांचा आहे. ज्वारीसाठी (रब्बी पीक 1967-68) पंढरपूर तालुक्यातल्या कोठाळी गावचे श्री. सीताराम एकनाथ धुमाळ यांना पहिला नंबर मिळाला. गव्हाच्या पिकाचे पंडितपण बागलाण तालुक्यातले (जि.नासिक) श्री. बाबूराव सुखदेव पाटील यांनी मिळवले. महाराष्ट्राच्या दिल्लीतील संपर्काधिकाऱ्यांनी या मंडळीना खास चहा देऊन त्यांच्या गौरवाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्या प्रसंगी ह्या मंडळींची भेट झाली. त्यांची मुलाखत हा एक अभूतपूर्व योग होता. आजारी म्हणून सांगलीकर येऊ शकले नव्हते. बोलायला मिळाले ते बागलाणच्या पाटलांशी आणि पंढरपूरच्या धुमाळांशी. प्रत्येक पहिल्या आलेल्या स्पर्धकाला ‘कृषि-पंडित’ ही पदवी आणि रु 3,000 नगद मिळातात. दुसऱ्या नंबराला फक्त रु. 1200 चे इनाम मिळते. श्री. पाटील यांची सविस्तर मुलाखत एका स्थानिक इंग्रजी दैनिकाने छापली आणि सर्वांचे फोटो वृत्तपत्रांतून झळकले. श्री. पाटील तसे पांढरपेशांना जवळचे वाटावेत असे आहेत. श्री. धुमाळ मात्र मराठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वाटले. त्यांच्या पेहरण, मुंडासे, धोतर या पेहरावाची छाप पडली. हातातली पिशवी आणि नमस्कार मनावर ठसण्यासारखा होता. तसे ते छोटे शेतकरी म्हणायचे. दोघांनीही प्रश्नांची उत्तरे खुलासेवार दिली आणि आपल्या विषयाबद्दल आणि भोवतीच्या जगाबद्दल ते दोघेही अधिकाराने बोलले.

Tags: बेळगाव चंडीगड इंदिरा गांधी बहुगुणा दरोगाप्रसाद राय पंचवार्षिक योजना माजी काँग्रेस अध्यक्ष जगजीवन राम जुनी काँग्रेस नवी काँग्रेस belgaon chandigad Indira Gandhi bahuguna darogaprasad Ray five-year-plan congress president jagjeevan ram old congress New congress weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी