डिजिटल अर्काईव्ह

युवकांच्या या मनःस्थितीचा अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टीने ज्या ठिकाणी युवक मोकळ्या मनाने एकत्र येतील अशी संपर्कस्थाने निर्माण झाली पाहिजेत. युवक मनोवृत्तीचा नीट मागोवा घेऊ शकतील आणि त्यांच्याशी समनुयोग साधू शकतील असे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षण संस्थांतील अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागेल. विधायक कार्याद्वारे गरजवंत लोकांच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो, अशी अनुभूती युवकांना येईल अशा प्रकल्पांची योजना व संयोजन याची व्यवस्था झाली पाहिजे.

तरुण पिढी म्हटली म्हणजे नव्या क्षितिजाकडे झेप घेण्याची प्रवृत्ती ही निसर्गतः आलीच. हे अनादिकालापासून चालत आले आहे. आणि असे आहे म्हणूनच समाज प्रगतिशील आहे. नव्या पिढीच्या या क्रांतीच्या आकांक्षा समाजाच्या स्थैर्याला नेहमीच सुरुंग लावत आल्या आहेत. प्रौढ आणि विशेषतः वृद्ध यांना या विषयाने नेहमीच काळजी निर्माण केली आहे. परंतु गेल्या तपामध्ये युवक असंतोषाने जे उग्र रूप जगभर धारण केले आहे त्याला इतिहासात तोड नाही. तरुण पिढी हट्टी व आग्रही होती, पण ती आजच्याइतकी आक्रमक कधीही नव्हती.

जुन्या पिढीचे वैगुण्य 
याचे मूलभूत कारण असे की, समाजाने काही श्रद्धा निर्माण केल्या होत्या; आणि जुन्या पिढीचे मार्ग नव्या पिढीला मान्य नसले तरी ह्या श्रद्धांबाबत तिच्या मनात सरसकट तिरस्कार कधीही नव्हता. स्थानिक परिस्थितीप्रमाणे बंडखोरीचा अतिरेक कितीही झाला तरी जगभर या बंडाची लागण सहजासहजी होत नसे. अभिसरणाची साधने आजच्या इतकी सुलभ नव्हती. आणखीही एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे जुनी पिढी आजच्या इतकी कधीच हतबल झाली नव्हती. तिचा स्वतःवर विश्वास होता. आज जुन्या पिढीत, आपण फार मोठी चूक केली आहे, असा एक न्यूनगंड निर्माण झाला आहे. यामुळे आत्मश्रद्धेच्या बळावर कणखरपणे उभी दिसणारी जुनी पिढी संपूर्णपणे लयाला गेली आहे. 

स्वकेन्द्रित तरुण पिढी 
तरुण पिढीच्या बंडामागे निश्चित असे उद्देश नाहीत. केवळ सध्याच्या परिस्थितीबाबत असमाधान आहे. त्यामुळे या बंडाला काही दिशा मिळालेली नाही. म्हणूनच बंडखोरीनंतरही एक प्रकारची उद्विग्नता, पोकळपणा तरुण पिढीत आढळतो. असे पूर्वी घडले नव्हते. काही अपेक्षा घेऊन तरुण पिढी पुढे येत होती. ती अपेक्षापूर्ती करण्यात एक प्रकारचे समाधान होते. आजपर्यंत झालेल्या बंडात कुणावर तरी झालेला अन्याय दूर करण्याची धडपड होती. परंतु आज स्वतःवर अन्याय होतो आहे आणि त्यातून बाहेर पडावयाचे आहे, असा स्वकेंद्रित दृष्टिकोन आहे. खरे म्हणजे स्वतःकरिता धडपडणे हा तरुण मनाचा स्वभाव नाही. कुणाकरिता तरी जगावे आणि आपले जीवन दोन्ही हातांनी उधळून द्यावे, असा उमदा स्वभाव हे तरुण पिढीचे वैशिष्ट्य आहे. आपले काही तरी चुकले आहे, आपण अतिशय स्वकेंद्रित झालो आहोत असा न्यूनगंड असणारी जुनी पिढी नवीन पिढीला काही मार्ग दाखवण्यास असमर्थ ठरत आहे. आणि निश्चित मार्ग न दिसल्यामुळे पुराच्या लोंढपाप्रमाणे नव्या पिढीचा आवेश सारे काही उद्ध्वस्त करत चालला आहे. म्हणून तरुणांच्या आवेशात अर्थ भरणे हा आजचा यक्ष प्रश्न आहे.

उद्दिष्टे 
युवकांच्या या मनःस्थितीचा अभ्यास झाला पाहिजे. या दृष्टीने ज्या ठिकाणी युवक मोकळ्या मनाने एकत्र येतील अशी संपर्कस्थाने निर्माण झाली पाहिजेत. युवक मनोवृत्तीचा नीट मागोवा घेऊ शकतील आणि त्यांच्याशी समनुयोग साधू शकतील असे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षण संस्थांतील अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागेल. विधायक कार्याद्वारे गरजवंत लोकांच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकतो, अशी अनुभूती युवकांना येईल अशा प्रकल्पांची योजना व संयोजन याची व्यवस्था झाली पाहिजे. तरुण पिढीची परिभाषा वापरून तिच्याशी समनुयोग साधता येईल अशा तऱ्हेचे साधन निर्माण केले गेले पाहिजे. स्वतःच्या स्वार्थाकरिता कुणी आपला वापर करत आहे अशी भावना तरुणात कधीही निर्माण होणार नाही याची काळजी बाळगली गेली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यक्रमाच्या संयोजनाची व योजनेची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर युवकांकडेच सोपवली गेली पाहिजे. 

वरील उद्दिष्टांच्या दृष्टीने एक तत्त्वज्ञान प्रतिपादिले गेले पाहिजे व या तत्त्वज्ञानाच्या प्रतिपादनातून परिणामकारक व उपयुक्त कार्य उभे राहात आहे, याची प्रत्यक्ष अनुभूती नव्या पिढीला मिळाली पाहिजे. वरील सर्व उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी यूथ अकॅडमी नावाची स्वतंत्र संस्था निर्माण केली गेली पाहिजे. तिच्याद्वारे संशोधन, नियोजन व प्रशिक्षण याची व्यवस्था झाली पाहिजे. ही संस्था एक स्वतंत्र स्वरूपात कार्य करणारे केंद्र बनावयास हवी आणि ज्याप्रमाणे विविध शास्त्रांमध्ये संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय प्रयोगशाळा निर्माण झाल्या आहेत त्याच प्रमाणे ही संस्था कार्य करू शकली पाहिजे.

स्थान व विस्तार
राग, भव्य, परंतु भपका नसणारे असे एक स्वतंत्र स्थान असावे. त्याला विस्तीर्ण असा परिसर असावा. या संस्थेत मर्यादित लोकांच्या प्रशिक्षणाची सोय असावी व यासाठी आधुनिक शास्त्रांची व शास्त्रीय उपकरणांची व्यवस्था असावी. युवकांच्या परिषदा घेण्यासाठी व्यवस्था असावी. अल्पमुदतीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याची व्यवस्था असावी. युवक संघटनांशी संपर्क साधणारे आणि या संघटनांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणारे असे एक संपर्ककेंद्र असावे. या संपर्ककेंद्रातर्फे एक पत्रिका निघावी. ज्यात विविध ठिकाणी युवकांनी चालवलेल्या विधायक कार्याची माहिती यावी. युवकांचे मनोगत प्रकट व्हावे व युवक शक्तीला नव्या क्षितिजांची ओळख व्हावी. सामान्य व असामान्य अशा दोन प्रकारच्या सिद्धीसाठी शिक्षणाची व्यवस्था असावी. विशेषतः क्रीडा विभागात.

प्रशिक्षणाचे विषय
युवक चळवळीचा इतिहास, मानवाच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास, भारताची मानवतावादी परंपरा व तिच्यासमोर असणारे आव्हान, युवक चळवळीचे तंत्र व्यवस्थापन व पद्धती, युवक मंडळे, युवकांच्यातर्फे असणाऱ्या विविध चळवळी आणि त्यांचे संयोजन विशेषतः शिबिर संचलन, आधुनिक अभिसरण साधनांची ओळख व त्यांच्या वापराचे कौशल्य, समाजाच्या गरजांची निवड व ओळख, लोकजीवन व करमणुकीचे माध्यम, दृकश्राव्य-यंत्रे, विस्तारतंत्र, कार्यक्रमाची आखणी, मूल्यांकन, पैसा उभारणे, जमाखर्च, अंदाजपत्रक, लोकशाही नेतृत्वाची तयारी, व प्रत्यक्ष प्रश्न घेऊन करावयाचे कार्य अशा काही विषयांचे शिक्षण अॅकॅडमीत मिळाले पाहिजे. 

व्यवस्थापन 
या केंद्रात एक संचालक असावा. त्याच्या मार्गदर्शनाखाली ही अकॅडमो चालावी. प्रत्येक विभागावर एक प्रमुख असावा व त्याला योग्य तो स्टाफ द्यावा. ह्या संस्थेत काम करणाऱ्या सर्व लोकांचे आधी प्रशिक्षण व्हावे. संस्थेत एकदम मोठ्या प्रमाणावर सुरुवात करू नये. हलके हलके गरज प़डेल त्याप्रमाणे तिचा विस्तार वाढवावा. इतर विभागांतून योग्य अशी माणसे अल्पकालाकरिता या संस्थेमध्ये घ्यावीत आणि त्यांचे कार्य समाधानकारक आढळले तर त्यांना संस्थेत ठेवावे. अन्यथा त्यांना आपल्या विभागाकडे परत पाठवावे. संस्थेच्या कार्यावर देखरेख ठेवून कामाचे मूल्यांकन करणारी एक स्वतंत्र यंत्रणा असावी. यात शिक्षण विभागात विशेष कामगिरी केलेले असे अधिकारी व न्यायखात्यात उच्च पदावर काम केलेल्या अशा व्यक्ती यांचा समावेश असावा. या समितीने यूथ अकॅडमीने चालवलेल्या कार्याबाबत सरकारला मूल्यांकन करून द्यावे. या समितीव्यतिरिक्त इतर सरकारी यंत्रणेची पकड यूथ अकॅडमीवर असू नये.

विविध खात्यांमार्फत चाललेल्या विकासकार्याशी ॲकॅडमीचा संपर्क राखण्याची व्यवस्था असावी म्हणजे युवकांसाठी विधायक प्रकल्प घेणे सोईचे जाईल. उदा.- धरणाचे बांधकाम, भूसंरक्षण सुधारित बियाणांचे उत्पादन, वनविकास वगैरे. यूथ अॅकॅडमीला दिलेल्या साधनापासून (उदा. शेती) स्वतःच्या खर्चाचा काही भाग संस्थेस मिळवता आला पाहिजे. केवळ सरकारी अनुदानावर संस्था चालू नये. प्रशिक्षणासाठी आणि परिषदांसाठी येणाऱ्या लोकांच्या फक्त किमान गरजा ( तृतीय श्रेणीचे किंवा एस. टी.चे भाडे आणि दोन वेळेस अगदी साधे भोजन.) भागवण्याची व्यवस्था असावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत यूथ अकॅडमीला स्वयंप्रेरित केंद्रे काढता यावीत. या केंद्रांना कोणत्याही प्रकारचे अनुदान देऊ नये. या केंद्रांमार्फत त्या जिल्ह्यांतील विधायक कार्याचा उठाव युवक शक्तीचा वापर करून केला जावा. 

Tags: नवी पिढी जुनी पिढी व्यवस्थापन युवकांना प्रशिक्षण युथ अकॅडमी योजना दिवाकर आगाशे new generation old generation youth training management Youth Academy scheme Diwakar Aagashe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी