श्री दुर्गा भागवत यांनी प्राचीन प्रेमकथांचे संकलन व विशेष अभ्यास केला आहे. पाली भाषेतल्या काही उत्तम प्रेमकथांचा त्यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला असून ‘ Love in Sacred Lore’ हे त्यांचे पुस्तक पाच सात वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. चंद्रकिन्नर व चंद्रा ही त्यातली एक प्रेमकथा.
___________________________________________________________________
“चंद्रा, याच की रे आपल्या डोंगर दऱ्या आणि गुहा. ही सगळी ठिकाणे पानाफुलांनी भरून गेली आहेत. वनचरे इकडून तिकडे फिरताहेत. वसंताचा भर ओसंडतो आहे. पण चंद्रा तू माझ्या बरोबर नसलास तर मी एकटीच इथे कशी राहू? ओढे संथपणे वाहताहेत. पाण्याच्या पृष्ठावर फुले तरंगताहेत. हिमालयाची शिखरे इथून कुठे निळी, तर कुठे पिवळी, कुठे तांबूस तर कुठे पांढरी दिसता हेत. यक्ष किन्नरांचे थवे गंधमादन पर्वतावर हिंडताहेत. पण माझ्या चंद्रा! तू गेल्यावर मला या सगळ्या पसाऱ्यात काय गोडी आहे?”
वाराणशीचा ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता, चंद्र नावाचा एक किन्नर हिमालयातील गंध मादन पर्वताच्या चंद्र नावाच्या रुपेरी शिखरावर वास्तव्य करीत असे. या रजत पर्वतावर बर्फाने आच्छादलेल्या सुंदर झोपडीत चंद्रकिन्नर आपल्या भार्येसह, चंद्रेसह सुखाने राहत असे. किन्नरकिन्नरीचे परस्परांवर विलक्षण प्रेम असे. एकमेकांस सोडून ती क्षणभरही राहात नसत. सुखलोलुपता आणि सौंदर्यासक्ती ही किन्नरांची सर्वात मोठी वैशिष्टये. भोग विलास यांचा वेळ जाई.
चंद्र व चंद्रा ही दोघे उन्हाळ्यात चंद्रपर्वत उतरून खाली येत. आणि पावसाळा लागला की फिरून टेकाडावर वास्तव्य करीत. चंद्रपर्वतावरून एक रजशुभ्र ओढा खाली वहात येत असे. त्या ओढ्याच्या काठाकाठानेच हे किन्नरांचे जोडपे खाली उतरत असे व वर जात असे. जलक्रीडा ही त्यांची अत्यंत आवडती करमणूक होती. उन्हाळ्यात बर्फ वितळले की, पर्वताच्या तळाशी मोठा धबधबा तयार होई. या शुभ्र पाण्याच्या केसात सूर्यकिरणांची प्रभा मिसळली की इंद्रधनुष्याची शोभा दिसत असे. खाली नदीचे पात्र मोठे होऊन ते काही ठिकाणी तळ्यासारखे संथ दिसे. त्यात नाना तऱ्हेची कमळे फुलत.
या वेळीही वसंत ऋतूचा काळ होता. हे किन्नरयुगुल नव्या पर्णांचा व फुलांचा संभार डौलाने धारण करणाऱ्या चित्रविचित्र वनराजीत मनसोक्त विहार करीत होते. किन्नरांच्या लीला काय वर्णन कराव्या? त्यांनी आपल्या शरीरास चंदनाच्या उटीचा लेप द्यावा. वाटेत जाता जाता सुगंधी फुलांचे मधाने भरलेले पराग तोडून खावे. फुलांच्या पाकळ्यांची रंगीबेरंगी वस्त्रे विणून अंगावर घालावी कधी त्यांनी लतांवर बसून झोके घ्यावे. याप्रमाणे नानाविध प्रकारांनी ती दोघे आपले मन रिझवीत. असे करीत करीत ती दोघे त्या ओढ्याच्या विस्तीर्ण डोहाजवळ आली. हे स्थान अत्यंत रमणीय होते. आजूबाजूची वनराजी फळाफुलांनी भरून विलक्षण शोभित दिसत होतो. तिथे या जोडप्याने मुक्काम केला. त्यांनी फुलांच्या पाकळ्या पाण्यात सोडून दिल्या. मग त्यांनी पाण्यात उतरून यथेच्छ जलक्रीडा केली. जलक्रीडा करून झाल्यावर त्यांनी फुलांची वस्त्रे धारण केली व नदीकाठच्या रुपेरी मृदु वाळूत फुलांची रोज तयार केली. त्या शेजेवर बसून चंद्रकिन्नराने एका लव्हाळ्याची सुंदर बासरी तयार करून, तीतून तो मधुर आलाप काढू लागला, आणि त्याच्यासमोर उभी राहून चंद्रा हाताचे सुंदर विक्षेप करीत मनोहर नृत्य करू लागली आणि गाऊ लागली. ती दोघे नृत्य गानात तल्लीन होऊन गेली होती. इतक्यात झाडीतून एक बाण सू सू करीत आला आणि चंद्रकिन्नराच्या कुशीत घुसला. तत्काळ चंद्रकिन्नर खाली पडला.
एक किंकाळी याच्या तोंडून बाहेर पडली. बिचारी चंद्रा एकदम दचकली. घाबऱ्या घाबऱ्या ती मरणोन्मुख पतीजवळ आली आणि त्याचे डोके तिने मांडीवर घेतले. त्याच्या जखमेतील रक्ताने ती रोज तांबडी लाल दिसू लागली. आपले मरण जवळ आले हे चंद्रकिन्नराने ओळखले. चंद्रेला तो क्षीण स्वरात म्हणाला, “मी आता घटकेचा सोबती आहे. मला फार थकवा आला आहे, माझे काळीज पेटल्यासारखे झाले आहे. पण चंद्रा या वेदनांपेक्षाही मी गेल्यावर तू दुःखी होशील हा विचार मला जास्त व्याकुळ करतो. सुकलेल्या गवताच्या काडीप्रमाणे मी निर्जीव झालो आहे. उन्हाळ्यातल्या नदीप्रमाणे माझे जीवन अगदी सुकून गेले आहे. पण लाडके, सगळ्यांपेक्षा मला वाईट अशाकरता वाटते की मी मेलो तर तू दुःखी होशील.” इतके बोलून तो किन्नर निश्चेष्ट होऊन पडला. त्याचे शब्द ऐकून चंद्रेचे अंतःकरण दुभंगून गेले. त्याच्या जखमेतून अजूनही रक्त वहात होते. चंद्रा मोठमोठ्याने रडू लागली. तिने त्याच्या छातीतला बाण पाहिला. कोणाचा असावा बरें हा बाण? इतका दुष्ट कोण असावा?
तो बाण वाराणशीच्या विलासी ब्रम्हदत्त राजाचा होता. राजा आता संन्यासी झाला होता. राज्यकारभार पुत्रावर सोपवून तो हिमालयात वस्ती करून राहण्याच्या उद्देशाने आला होता. त्याने भगवी वस्त्रे परिधान केली होती. पाच आयुधे त्याने बरोबर घेतली ह ती. रजतनदी अतिशय मनोरम. तिच्या काठाकाठाने वर चंद्रपर्वत चढून जावे असा ब्रह्मदत्ताचा विचार होता. तो त्या डोहाजवळ पोचला आणि त्याचे लक्ष नृत्य करणाऱ्या सुंदर चंद्रेकडे गेले. तिच्या लावण्याने त्याला भुरळ पडली. आपण संन्यासदीक्षा घेतली आहे, हे तो विसरला. काय वाटेल ते होवो, किन्नराला मारून मी त्याची बायको मिळवीन. असे मनात म्हणून झाडीत लपून राहून त्याने किन्नरावर बाण सोडला. चंद्रेचा शोक ऐकून किन्नर मेला असला पाहिजे असे त्याला वाटले.
तो झाडीतून बाहेर येऊन तिच्यासमोर उभा राहिला. यानेच आपल्या पतीला मारले असले पाहिजे अशी शंका चंद्रेच्या मनात आली. ती भीतीने कापत उभी राहिली. त्याच्या दुष्ट वासनेबद्दल तिला शंका राहिली नाही. होते नव्हते तेवढे बळ एकवटून ती रडत ओरडत पळत सुटली. ती डोंगराच्या माथ्यावर आली. ब्रह्मदत्तही तिचा पाठलाग करीत होता. पण त्याला तो डोंगर शेवटपर्यंत चढता येईना. आता चंद्रेने आपले लालभडक डोळे त्याच्यावर रोखले व ती म्हणाली, “तूच रे राजा, मेल्या माझ्या चंद्राला मारलेस. तुझ्या आईला माझ्याचसारखा शोक होवो. तुझ्या बायकोच्या वाटणीला पण हेच दुःख येवो.”
राजा म्हणाला “चंद्रा, रडू नको मी तुला माझी पट्टराणी करीन.”
या शब्दांनी अधिकच भडकून चंद्रा त्याला म्हणाली,
“माझ्या लाडक्या किन्नराला मारणाऱ्या तुझ्यासारख्याशी लग्न करण्यापेक्षा मेलेले काय वाईट?” तिचे हे शब्द कानी पडताच ब्रह्मदत्ताला उपरति झाली. आणि खाली मान घालून तो चालता झाला. तो पार दृष्टिआड झालेला पहाताच चंद्रा खाली उतरून पतीजवळ येऊन बसली, ती म्हणाली,
“चंद्रा, याच की रे आपल्या डोंगर दऱ्या आणि गुहा. ही सगळी ठिकाणे पानाफुलांनी भरून गेली आहेत. वनचरे इकडून तिकडे फिरताहेत. वसंताचा भर ओसंडतो आहे. पण चंद्रा तू माझ्या बरोबर नसलास तर मी एकटीच इथे कशी राहू? ओढे संथपणे वाहताहेत. पाण्याच्या पृष्ठावर फुले तरंगताहेत. हिमालयाची शिखरे इथून कुठे निळी, तर कुठे पिवळी, कुठे तांबूस तर कुठे पांढरी दिसता हेत. यक्ष किन्नरांचे थवे गंधमादन पर्वतावर हिंडताहेत. पण माझ्या चंद्रा! तू गेल्यावर मला या सगळ्या पसाऱ्यात काय गोडी आहे?”
रडता रडता तिने त्याच्या छातीला हात लावून पाहिला. तिथे किंचित धुगधुगी होती. तिने हात जोडून देवांची करुणा भाकली. ‘देवांनो, चंद्राला जीवदान द्या’ असे तिने विनविले. तिच्या उष्ण अश्रूंनी इंद्राचे सिंहासन तापले. त्याने चौकशी केली, तो चंद्रकिन्नराला बाग लागल्याचे वृत्त त्याला समजले. त्याला करुणा आली. ब्राह्मणाचे रूप घेऊन तो चंद्रकिन्नरापाशी आला. त्याचे पाय चंद्रेने धरले. इंद्राने थोडेसे पाणी त्याच्या अंगावर शिंपडले. तसा किन्नर सावध होऊन उठून बसला. त्याची जखम भरून आली. त्या दोघांनी इंद्राला नमस्कार केला. इंद्र म्हणाला, ‘जा आता पळा. यापुढे पर्वतावरच रहा. खाली येऊ नका. मनुष्यप्राणी जिथे असेल तिथे मुळीच फिरकू नका’. इंद्र अंतर्धान पावला. आणि चंद्र व चंद्रा यांनी एकमेकास घट्ट आलिंगन दिले. एकमेकांची चुंबने घेतांना ती दोघे म्हणत होती की, आता आपण ओढ्याच्या काठी फिरू, फुलांची वस्त्रे घालू. झाडांची वल्कले नेसू. एकमेकांशी गोड गोड बोलू. आणखी किती म्हणून त्यांच्या आनंदाचे वर्णन करावे?
Tags: इंद्र देव जंगल कथा प्रेमकथा अनुवाद पाली भाषा बाण दुर्गा भागवत Indra God Jungle Story Love Story Translation Pali Language Arrow Durga Bhagwat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या