अरब-ज्यू संघर्ष कित्येक वर्षांची चरत-चिळपत जाणारी जखम. दोन्हीकडील नेते महासत्तांचे बाहुले बनले होते. या पार्श्वभूमीवर इस्रायल ही अप्रिय वास्तवता ठरली. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांनी ही वास्तवता स्वीकारली आणि त्यांनी जागतिक इतिहासाला कलाटणी देणारे पाऊल उचलले...
अरब-ज्यू संघर्ष ही एक चरत-चिपळत जाणारी जखम गेली कित्येक वर्षं बनली होती.
आपल्या जागतिक वर्चस्वाच्या लालसेसाठी महासत्ता ही जखम तशीच कायम ठेवण्याचा सतत उद्योग करीत होत्या आणि मतांध अरब आणि ज्यू नेते हातची बाहुली म्हणून स्वतःला वापरू देत होते. सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरिकांच्या जिवावर निखारे ठेवून हे उद्योग नेतेमंडळी सुखनैव चालवीत होती.
हा न परवडणारा खेळ सतत चालू ठेवण्यात कोणाचेच हित नव्हते; पण कळूनही त्याप्रमाणे पावले टाकण्याची हिंमत अरब किंवा ज्यू नेते करीत नव्हते.
त्यासाठी जी निर्भयता आणि सहृदयता लागते, तिचा सर्वस्वी अभाव आहे की काय, अशी शंका यावी, अशी स्थिती सतत या भागात राहिली.
इस्राएल ही एक अप्रिय वाटली तरी वास्तवता आहे, हे समजले तरी तिला उघड मान्यता देण्यासाठी जी नैतिक हिंमत लागते, ती दाखवण्याचा वकुब एकाही अरब नेत्यात नव्हता.
खाजगीत ही वास्तवता मान्य करणारे नेतेही लोकप्रक्षोभाच्या भयाने प्रकटपणे तसे म्हणायला तयार नव्हते आणि त्यामुळे द्वेषाग्नी सतत धुमसत राहिला होता.
इस्राएलच्या बाजूने आवश्यक तो समंजसपणा दाखवला जात होता, असेही म्हणता येत नाही.
जीवनाच्या अन्य क्षेत्रांत अत्यंत आधुनिक विचार ग्रहण करणारा हा देश धर्माच्या बाबतीत इतका अंध आणि अविवेकी कसा, हा प्रश्न नेहमीच पडे.
धर्माधिष्ठित राष्ट्राची कल्पना कालबाह्य झाली असून जाति-धर्म-वंशनिरपेक्ष भौगोलिक राष्ट्राच्या कल्पना स्वीकारल्यावाचून आता गत्यंतर नाही, ही साधी गोष्ट इस्राएलच्या बुद्धिमान नेत्यांना समजत नव्हती, असे कसे म्हणावे?
आधुनिक विज्ञानाने राष्ट्राच्या सीमादेखील पुसट केल्या असून आता सहअस्तित्व तर हवेच, पण सहकार्याचे क्षेत्रही वाढवीत नेण्यात हित आहे, ही गोष्ट उमजणे बरे म्हणजे तितकेसे अवघड नाही, पण पूर्वग्रह, भीती, संशय, अविश्वास यांच्या फेऱ्यातून बाहेर पडल्यावाचून ते होत नाही.
धर्म ही वैयक्तिक अनुभवाची व श्रद्धेची बाब म्हणून यापुढे राहील आणि मानवी संबंधांचा प्रश्न हा बुद्धिनिष्ठ निकषांवर सोडवावा लागेल, अशी नवी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
त्यातून इस्लामने त्या भागातील ज्ञात अशा सर्व पूर्वप्रेषितांचा स्वीकार केलेला असल्याने धर्माच्या मुद्द्यावरून रणकंदन माजविण्याचे वस्तुतः काहीच कारण नाही.
ही चरत-चिपळत जाणारी जीवघेणी जखम बरी व्हायची तर त्यासाठी निर्भयपणे वास्तवाला सामोरे आणे आवश्यक होते.
इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांनी अप्रिय, पण पथ्यकर असे हे वास्तव स्वीकारण्याचे ठरवले आणि जागतिक इतिहासाला कलाटणी मिळू शकेल, असे एक पाऊल उचलले.
सादत यांच्या इस्राएल भेटीने सद्भावाचे जे प्रदर्शन झाले, त्या सद्भावना समूर्त आणि चिरस्थायी व्हाव्यात, यासाठी सर्वांनी मदत करण्याची गरज आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी सादत यांनी महात्मा गांधींचे स्मरण केले आणि निरोपप्रसंगी त्यांनी मातांना भावपूर्ण मनाने आश्वासन दिले की, यापुढे आपल्या संतानांचे अकाली मरण पाहण्याची पाळी येऊ नये, यासाठी मी प्रयत्न करीन. त्यांच्या या सदिच्छेला प्रतिसाद मिळाला पाहिजे.
इस्राएलचे अस्तित्व एक वास्तवता म्हणून सर्वांनी मान्य करावे. इस्राएलला असे अभय मिळाल्यानंतर त्याने नवा प्रदेश पादाक्रांत करण्याची हाव तर सोडूनच द्यावी, पण अलिकडे ताबा मिळवलेल्या प्रदेशावरचे स्वामित्वही सोडून द्यावे. धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करण्याची कालबाह्य कल्पना सोडून देऊन समान नागरिकत्व देणारे बहुवंशीय व बहुधर्मीय राष्ट्र म्हणून अस्तित्वात राहण्याची कल्पना सर्व संबंधितांनी करावी.
विज्ञानयुग हे समनुयोगाचे, सहभोगाचे नियोजनाचे व सामुदायिक पुरुषार्थाचे युग आहे, हे जाणून राष्ट्रांच्या सीमावार या जाणिवा जोपासण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.
अन्य अरब राष्ट्रांनी आता प्रक्षोभ माजवण्याचा उद्योग न करता समंजसपणे वास्तवता मनोमन मान्य करावी आणि भयाचे, अविश्वासाचे आणि संशयाचे वातावरण नष्ट करून परस्परसहकार्याचे नवे वातावरण निर्माण करावे.
इष्ट दिशेने पडलेल्या या पहिल्या पावलाचे जयप्रकाशजींनी स्वागत केले. त्यात जगाच्या भल्याची चिंता वाहणाऱ्या सर्व नागरिकांचे हृद्गत प्रतिबिंबित झाले आहे.
Tags: महात्मा गांधी अन्वर सादत इस्राएल संघर्ष अरब-ज्यू Mahatma Gandhi Anwar Sadat Israel conflict Arab-Jew weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या