खेड्यांमधला जवान जसा आखाड्यात गेल्याशिवाय, नदीत डुंबल्याशिवाय राहावत नाही, तशीच शहरांतील माणसे माफक का होईना व्यायाम केल्याशिवाय राहात नसत. व्यायामच नव्हे तर खेळल्यावाचूनही अजूनही खेड्यापाड्यात रात्री रस्त्यावर हुतुतूचा हमामा घालणारे, आट्यापाट्याचा डाव मांडणारे जवान आढळतात नि सायंकाळी आबादुबी नि विटीदांडू- निदान शिवाशिवीचा खेळ खेळणारी मुले दिसतात.
‘रागिणी'मध्ये श्री. वा. म. जोशी यांनी 'हक्क की कर्तव्य?' असा प्रश्न निर्माण केला आहे. शास्त्रीबुवांनी स्वरचित स्वतःच्या वृत्तान्ताने हक्कांसाठी झगडणाऱ्या व हक्कांचा आग्रह धरणाऱ्या उत्तरेला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. देवीदास बागूल यांचा 'मलाही खेळण्याचा हक्क आहे' हा लेख वाचला ('मनोहर' डिसें. 1969) तेव्हा मला वरील प्रसंगाची आठवण झाली. माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला- 'माणसांना हक्कांची जाणीव करून द्यावीच लागते काय? एखाद्या वस्तूसाठी पैसे मोजले म्हणजे तिचा उपभोग घेण्याचा ‘हक्क' प्राप्त होतो, हे खरे असले तरी 'खेळ, क्रीडा' ही अशी विकत घेण्याची वस्तू आहे काय? आमचे विद्यार्थी खेळत नाहीत याचे कारण तो आपला हक्क आहे याची जाणीव त्यांना नाही म्हणून की अन्य काही कारणाने?
खेळ ही सवय
मला वाटते खेळणे, व्यायाम करणे, हा एक सवयीचा भाग आहे. आणि इतर सवयींप्रमाणेच तीही लावावी लागते व लावून घ्यावी लागते. जुन्या पिढीतल्या लोकांकडे पाहा ना, कित्येकांना स्नान केले नाही, देव- दर्शन घेतले नाही, सूर्यनमस्कार घातले नाहीत, तर लगेच चुकल्याचुकल्यासारखे वाटते! जुन्या पिढीतही तालीम, पोहणे, याप्रमाणेच अलीकडच्या काळात टेनिस, बॅडमिंटन वगैरे खेळणे यांमध्ये रस घेणारी मंडळी आढळतात. त्यात थोडा वेळ घालवल्याशिवाय, हात-पाय मोकळे केल्याशिवाय त्यांना चैन पडायचे नाही. खेड्यांमधला जवान जसा आखाड्यात गेल्याशिवाय, नदीत डुंबल्याशिवाय राहावत नाही, तशीच शहरांतील माणसे माफक का होईना व्यायाम केल्याशिवाय राहात नसत. व्यायामच नव्हे तर खेळल्यावाचूनही अजूनही खेड्यापाड्यात रात्री रस्त्यावर हुतुतूचा हमामा घालणारे, आट्यापाट्याचा डाव मांडणारे जवान आढळतात नि सायंकाळी आबादुबी नि विटीदांडू- निदान शिवाशिवीचा खेळ खेळणारी मुले दिसतात.
एक संशोधन विषय
विद्यार्थ्यातील वाढत्या वयाबरोबर खेळाची आवड कमी का होत चालली आहे, हा मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीयदृष्ट्या संशोधनाचा विषय होऊ शकेल. ते संशोधन होण्याची गरज आहे. कारण त्या त्या वयाला साजेशा व झेपणाऱ्या कसरती, व्यायाम न करणे व खेळ न खेळणे हे काही निकोप प्रकृतीचे लक्षण खास नव्हे. न खेळणारा समाज हा 'विकृत मनोवृत्ती’ चा समाज मानावयाला काहीच हरकत नाही. या विकृतीची मुळे आजच्या शिक्षणपद्धतीत आहेत का? हा प्रश्नही कित्येकांना अपमानास्पद वाटेल. पण प्रत्यक्षात दिसते ते हे की सामान्यतः माध्यमिक शाळांत मुले आली की त्यांच्यातील खेळाची प्रवृती कमी होते.
घातक बघेगिरी
शाळांतून सक्तीच्या शारीरिक शिक्षणाचा जमाना सुरू झाला आणि हळूहळू शाळांतील खेळणारांचे प्रमाण घटू लागले! आमच्या शाळांतील शारीरिक शिक्षण व क्रीडा यांचे गेल्या पंधरा-वीस वर्षांत जे हाल झाले आहेत, जी कुतरओढ चालू आहे त्यासंबंधी लिहावे तितके थोडे आहे. त्याची कारणमीमांसा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी करावी. सर्वसामान्य नागरिकाला व पालकाला दिसते ते एवढेच की, मुले खेळत नाहीत, व्यायाम करत नाहीत. आरोग्याच्या सवयी त्यांना लागत नाहीत. वाढत आहे ती पोशाखी वृत्ती, बघेगिरी.
स्पेशलायझेशनचा हव्यास
क्रिकेटच्या सामन्यांवरील टीका, भाष्ये, 'आंखों देखा हाल' ऐकण्यात मुले व तरुण एवढेच नव्हे तर तरुणीही रस घेतात. काही एका मर्यादेपर्यंत त्यात गैर असे मला काहीच वाटत नाही. पराक्रमाचे कौतुक, विजयश्रीबद्दल आनंद-अभिमान या भावनांचा अनुभव घेण्यात गैर काय? पण केवळ क्रिकेटबाबतच हे घडते असे नाही. शाळातील किंवा गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत जे 'क्रीडामहोत्सव’ होतात मग ते खोखोचे असोत, कबड्डीचे असोत, तेथे तरी काय घडते? हे महोत्सव वा स्पर्धा होऊ नयेत असे कुणीच म्हणणार नाही. पण त्यासाठी खेळाडू जे निवडले जातात ते कसे? नित्यशः दैनंदिन खेळणारे किती? शाळांमध्ये ‘संघटित खेळ' असे किती घेतले जातात? सर्व मुलगे, मुली खेळतात का? खेळांतही फार लवकर स्पेशलायझेशन सुरू होत नाही काय?
चुकीची अपेक्षा
क्रीडांगणाचा अभाव ही मोठ्या शहरातील समस्या आहे. लहान गावांची खास नाही, आणि शालेय वयात जर खेळण्याची सवय लागली नाही व खेळण्याचा आनंद चाखला नाही तर कॉलेजच्या वयात विद्यार्थी खेळतील वा ‘खेळण्याचा हक्क' बजावतील ही अपेक्षाच चुकीची आहे! आजचा जमाना तरी असा दिसतो की, त्या वयात खेळण्याचे प्रेम असण्यापेक्षा प्रेमाचे खेळ खेळण्यात मन अधिक रमते!
पोशाखीपणाचा अडथळा
दहा बारा लोकांनी खेळावे व हजारोंनी मुकाट बसून ते पाहावे, ही गोष्ट लॉर्ड बेडेन पॉवेल यांना फार खटकली. ज्या वयात अंगात चैतन्य सळसळावे, धावावे, खेळावे, उड्या माराव्यात, झाडावर चढावे त्या वयात मुलांनी हातपाय जोडून स्वस्थ बसावे, हे त्यांना पटेना, रुचेना. या विचारमंथनातून बालवीर चळवळीचा जन्म झाला. युवक-प्रौढांपर्यंत तिचा विस्तार झाला. भारतात त्या चळवळीची मुळे जावीत तशी खोल गेलो नाहीत. शाळांतील खेळ-सामने हा जसा एक 'प्रदर्शना'चा भाग होऊन बसला तसेच थोडेसे स्काउंटिंग बाबत झाले आहे. 'संघ', 'दल' इत्यादी युवकांसाठी काम करण्याच्या संघटना आहेत, पण त्यापैकी बहुतेकांचा भर 'बौद्धिका'वर आहे. खेळ हे मुले जमवण्याचे फक्त साधन त्यांना वाटत असावे. या संघटना कुमार युवकांना 'अकाली गंभीर’ तर बनवत नाहीत ना? निदान एकांगी तर खासच बनवतात. नि महाविद्यालयांतील (व माध्यमिक शाळांतीलही) पोशाखप्रेमी कुमार-युवकांना त्यांचे संघटनांचे आकर्षणही कमी.
हक्कांची भाषा कर्म
तेव्हा नुसती हक्काची भाषा बोलून खेळाचे प्रेम वाढणार नाही. विद्यार्थी खेळण्याचा हक्क बजावू लागले तर आजच्या समाजाच्या काही समस्या, डोकेदुखी नक्कीच कमी होतील. पण खेळाचे बाळकडू देणारे भाग आहेत किती? सरकार दरबारी युवक कल्याण योजना निघाल्या आहेत. वेतन, भत्ते इ. सर्व जे व्हायचे ते चालू आहे! काय फळ मिळते पाहू या. पण एक गोष्ट खरी की, शालेय वय हेच खेळाची सवय नि आवड निर्माण होण्याचे वय आहे, आणि एकूण शिक्षणाचाच तो भाग आहे. पण आता शिक्षणखाते आणि क्रीडाखाते यांचीही शासनाने फारकत केली आहे. क्रीडाखाते मंत्र्यांच्या ताब्यात गेले आहे. पैशाने, पैशासाठी आणि पैशाचे खेळ या देशात सुरूच आहेत. या नव्या सुधारणेने खेळाचे प्रेम कसे वृद्धिंगत होते ते बघू या!
Tags: शिक्षण खाते क्रीडाखाते दल संघ देविदास बागुल क्रीडा महोत्सव मनोहर रागिणी खेळण्याचा हक्क प्रा. ग. वि. अकोलकर education department sports department Sports Union Krida Mahotsav DeviDas Bagul Manohar Ragini right of playing pro. G.V. akolkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या