डिजिटल अर्काईव्ह

समाजप्रबोधनाच्या पुणे येथील आचार्यकुल चर्चासत्राचे चिकित्सक आलोचन

आचार्यकुलाच्या सिद्धांताच्या अनुषंगाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, पण आचार्यकुलाच्या संदर्भाचे सूत्र डोळ्यांसमोर ठेवूनही चर्चा चालू आहे असे जाणवले नाही. आचार्यकुलाचा विषय या चर्चेत अभावानेच अस्तित्वात होता! कित्येक उपस्थितांनी विनोबांची आचार्यकुल ही पुस्तिका कदाचित् वाचलेलीदेखील नसावी. त्यामुळे विषय लोकशाहीकरणाचा होता, पण चौकट आचार्यकुलाची नव्हती, ही वस्तुस्थिती.

पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘आचार्यकुल' या शैक्षणिक उपक्रमाचे चर्चासत्र ता. 27, 28 डिसेंबर रोजी घडून आले. आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून उदयास आलेल्या आचार्यकुलाच्या उपक्रमाला महा- राष्ट्रातही चालना मिळाली पाहिजे, असा निर्णय एक वर्षापूर्वी महाराष्ट्र सर्वोदय संमेलनात घेतला गेला. या कामाचा महाराष्ट्रात प्रसार करण्याचे काम श्री. मामा क्षीरसागर यांनी स्वतःकडे घेतले. या विचाराची पहिली सभा पुण्याला हिंदी हायस्कूलमध्ये झाली. त्या दिवशी आचार्य दादा धर्माधिकारी यांचे व्याख्यान झाले. ( सदर कथेचा वृत्तान्त- साधना 6 सप्टेंबर 1969 या अंकात आला आहे.) या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर वाहण्याचे अभिवचन समाजप्रबोधनने दिले व या अभिवचनाचे पहिले पाऊल म्हणून वरील चर्चासत्र घडून आले.

आचार्यकुलाची तात्त्विक भूमिका
भारतीय संस्कृतीच्या प्राचीन परंपरेला अनुसरून, भारतीय समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा पुन्हा निर्माण व्हावी, समाजाला व राज्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे; त्यांच्या अभिक्रमाने देशात आदर्श नागरिकत्व प्रस्थापित व्हावे; समाजातील शांतिस्थापनेची व अशांती शमनाची जबाबदारी त्यांनी पत्करावी; इतक्या उंचीपर्यंत शिक्षक समाजाने आपली नैतिक व वैचारिक भूमिका उंचवावी; या उदात्तीकरणाला चालना मिळण्यासाठी आचार्यकुल हा संघ निर्माण व्हावा. या आचार्यकुलामार्फत ठिकठिकाणी शिक्षकांचा अभिक्रम जागृत करण्याचे उपक्रम स्वयंप्रेरणेने व स्वयंशासन पद्धतीने सुरू व्हावेत, अशी थोडक्यात आचार्यकुलाची तात्त्विक भूमिका आहे. विनोबा श्रमिकांऐवजी शिक्षकांनाच क्रांतीचा दूत मानतात, याचे कारण शिक्षकांजवळ विचार आहेत. यंत्रांनी व श्रमिकांनी क्रांती घडवण्याचा एक काळ येऊन गेला. पण आता समाजात क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य मुख्यतः विचारांच्या ठायी असते. त्यामुळे शिक्षक हाच क्रांतीचा खरा अग्रदूत ठरतो. या संदर्भात विनोबांचा आणखी एक विचार फार क्रांतिकारक आहे. न्याय खात्याप्रमाणे शिक्षण सरकारी नियंत्रणापासून अलिप्त केले जावे. त्याचे शासन शिक्षकांकडे सोपवावे. सरकार पैसे खर्च करते म्हणून न्यायखात्यावर शासनाचा जसा अंकुश नसतो, तसाच शिक्षणावरदेखील सरकारचा अंकुश नसावा. म्हणूनच आचार्यकुलाच्या संकल्प पत्रकात विनोबांनी शिक्षकांसाठी खालील प्रतिज्ञा अंतर्भूत केल्या आहेत: 

1 - मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद होणार नाही. कोणत्याही पक्षाचा निवडणुकीत प्रचार प्रसार करणार नाही.
2 - सारे राज्य मी शिक्षणाचे कार्यक्षेत्र मानीन. तेथे होणाऱ्या अशांतीचे शमन मी विचारपूर्वक करत राहीन. कोणत्याही प्रकारे दंडशक्तीच्या (पोलिस, न्यायखाते) आधारावर हे अशांतिशमन करावे लागणार नाही अशी मी काळजी घेईन.

शिक्षणाच्या लोकशाहीकरणाचे तीन घटक
आचार्यकुलाच्या प्रारंभिक नेतृत्वाचा भार विनोबांनी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांवर सोपवलेला असल्यामुळे चर्चासत्रात प्राध्यापकांची संख्या अधिक होती. फर्ग्युसनचे प्राचार्य ढवळे यांनी चर्चेत उत्साहाने भाग घेतला. वाडियाचे प्राचार्य भणगे हे समाजप्रबोधनच्या आचार्यकुलाच्या उपक्रमाचे प्रमुख सूत्रधार असल्यामुळे चर्चासत्राची कार्यपद्धती प्रामुख्याने त्यांनीच आखली होती. त्यामुळे चर्चासत्राच्या विचारांना सुरेख वळण मिळाले. माध्यमिक शिक्षकांपैकी डॉ. खैर, श्री ल. नी. छापेकर व नाशिकचे श्री कृ. द. बेदरकर यांनी शालेय शिक्षणातील आपले अनुभव सांगितले. सर्वोदयापैकी श्री. गोविंदराव देशपांडे यांचे या चर्चेला मिळालेले मार्गदर्शन मौलिक होते. शिक्षणसंस्थांच्या कार्यपद्धतीला लोकशाहीकरणाचे वळण कसे लावता येईल, या समस्येभोवती दोन्ही दिवसांच्या चर्चेचे जाळे विणण्यात आले. विद्यार्थ्यांचे लोकशाहीकरण कसे होईल, शिक्षकांच्या कामात व विचारात लोकशाहीकरण कसे येईल आणि संस्थेच्या संचालनाला लोकशाहीपद्धतीचे वळण कसे लावता येईल या विषयावर अनुक्रमे आंबेजोगाईचे प्राचार्य नाडकर्णी व पुण्याचे प्रा. शिवराम काळे, कोल्हापूरच्या अर्थ-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. अ. के. भागवत आणि वाडिया अर्थ-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भणगे यांचे प्रबंध वाचण्यात आले. प्रबंधांच्या आधाराने तिन्ही चर्चा झाल्यामुळे चर्चासत्राला आटोपशीरपणा लाभला. विद्यार्थी, शिक्षक व संचालक यांची उपक्रमशीलता विकसित होऊन शिक्षणाच्या लोकशाहीकरणात या तिन्ही घटकांचा सहभाग कसा वृद्धिंगत होईल या विषयावर या सत्रात सांगोपांग विचार झाला..

लोकशाहीकरणाचा आशावाद ही फलश्रुती
प्रा. काळे, प्रा. नाडकर्णी, प्रा. भागवत व प्रा. भणगे यांनी आपल्या प्रबंधांत लोकशाहीकरणातील उपक्रमशीलतेवर प्रमुख भर दिल्यामुळे शिक्षणाचे लोकशाहीकरण हा अत्यंत विधायक विचार आहे. आजच्या गोंधळलेल्या शिक्षणपद्धतीला लोकशाहीकरण हाच उत्कृष्ट पर्याय आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेने स्वतःचा अभिक्रम जागृत करून विविध उपक्रमांना चालना दिली पाहिजे; परस्परांत उपक्रमांची देवाण-घेवाण केली पाहिजे; लोकशाहीकरणामुळे शिक्षणात स्वयंशासन निर्माण होईल; आणि शिक्षणक्षेत्रात शिस्त व निरोगी वातावरण स्थिर होईल असा विश्वास हे चर्चासत्र निश्चितपणे निर्माण करू शकले. शिक्षणात लोकशाही निर्माण झाल्याशिवाय लोकशाहीचे शिक्षण निर्माण करता येणार नाही, या विचारावर या चर्चासत्रात पुष्कळच एकवाक्यता दिसून आली. शिक्षणक्षेत्रात लोकशाहीकरणाच्या व विद्यार्थी स्वयंशासनाच्या आघाडीवर माध्यमिक शाळा गेल्या कित्येक वर्षांपासून जितक्या गेलेल्या आहेत त्या मानाने कॉलेज संस्था फार मागे आहेत ही गोष्ट डॉ. खैर, श्री छापेकर व श्री बेदरकर यांनी निवेदन केलेल्या अनुभवांमधून स्पष्ट झाली. लोकशाहीकरण हा उपक्रम प्राध्यापकांना अभिनव वाटतो तर शालेय शिक्षकांना नेहमीचा वाटतो.

आचार्यकुलाची दीक्षा व दिशा
आचार्यकुलाच्या सिद्धांताच्या अनुषंगाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, पण आचार्यकुलाच्या संदर्भाचे सूत्र डोळ्यांसमोर ठेवूनही चर्चा चालू आहे असे जाणवले नाही. आचार्यकुलाचा विषय या चर्चेत अभावानेच अस्तित्वात होता! कित्येक उपस्थितांनी विनोबांची आचार्यकुल ही पुस्तिका कदाचित् वाचलेलीदेखील नसावी. त्यामुळे विषय लोकशाहीकरणाचा होता, पण चौकट आचार्यकुलाची नव्हती, ही वस्तुस्थिती. आचार्यकुलावर श्री. गोविंदराव देशपांडे यांचे समारोपाच्या वेळी जे भाषण झाले ते प्रास्ताविक म्हणून झाले असते तर ही चौकट आरंभापासून मिळाली असती. त्यामुळे सगळ्या चर्चेची आगगाडी लोकशाहीच्या एकाच रुळावरूनच धावली. आचार्यकुलाला अभिप्रेत असलेल्या लोकनीतीच्या सावलीजवळसुद्धा हे चर्चासत्र उभे नव्हते! शिक्षणाच्या लोकशाहीकरणात लोकशाहीची कोणती कल्पना या चर्चासत्राला अभिप्रेत आहे हे ठरवा, असे सुरुवातीलाच एका प्रतिनिधीने सुचवले. परंतु रूढार्थाची लोकशाही आचार्यकुलाच्या विचाराशी विसंगत आहे, या विचाराकडे या चर्चासत्राचे फारसे लक्ष गेले नाही. चर्चासत्र संपले, पण विसंगती राहून गेली! ही विसंगती जाणूनबुजून झाली असे मात्र नव्हे. इतःपर ती टळू शकेल. आचार्यकुलाची वैचारिक पार्श्वभूमी प्रत्येक जिज्ञासूने जाणली पाहिजे. विनोबांच्या विचारांचा नित्य डोळस व्यासंग ठेवल्याशिवाय आचार्यकुलाची भूमिका आत्मसात होऊ शकणार नाही. आचार्यकुलाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक व प्राध्यापकांची ठिकठिकाणी अभ्यासमंडळे निर्माण होणे फार आवश्यक आहे. या दिशेने आपल्याला पावले कशी उचलता येतील याचा समाजप्रबोधनने अगत्याने विचार केला पाहिजे. नाही तर शिक्षणाचे उदात्तीकरण करणारा आचार्यकुलाचा हा मौलिक विचार जागच्याजागीच राहून जाईल!

आचार्यकुलापुढील एक समस्या
या चर्चासत्रात एक दोन मतभेद फार तीव्रपणाने उघडकीस आले. विद्यार्थी आणि राजकारण, अथवा शिक्षक आणि राजकारण, या विषयांबाबत मतभेदांची दरी नेहमीच फार मोठी असते. मतभेद विसरून सौजन्याने व सहकार्याने वागण्याची किंवा थोडीशी मुरड घालण्याची शक्यता इतर विषयांत जितकी असते तितकी या विषयात नाही. शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी राजकारणाचा डोळसपणाने विचार करावा, परंतु सक्रिय किंवा पक्षीय राजकारणापासून तत्त्वतः दूर राहावे, याबद्दल सर्व शिक्षणतज्ज्ञांची एकवाक्यता आहे. परंतु शिक्षक आणि विद्यार्थी हे राजकीय पक्षांचे एकमेव माणूसबळ असल्यामुळे शैक्षणिक अलिप्ततेच्या तटबंदीला सुरुंग लावण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सतत उत्सुक असतात. विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेतलाच पाहिजे, या भूमिकेचे एका बिनशिक्षकी वक्त्याने जेव्हा समर्थन केले तेव्हा शिक्षक सदस्यांनी केवळ अनुल्लेखानेच ही चर्चा थोपवून धरली! पक्ष आणि फूट यांचे साहचर्य लक्षात घेता, सर्वस्वी अपक्ष भूमिकेच्या मजबुतीवरच ज्यांची वैचारिक शक्ती आधारलेली असते अशा आचार्यकुलासारख्या अपक्ष उपक्रमात राजकीय पक्षातील सहृदय मित्रांचे स्थान कोणते असावे याचा विचार आचार्यकुलाच्या कार्यकर्त्यांनी नीट केला पाहिजे. 

आणखी एका मतभेदाच्या अवघड मुद्द्यावर या चर्चासत्रात विचारांची बरीच चकमक उडाली. संस्थांच्या लोकशाहीकरणाची चर्चा चालली असताना विवेचनाला प्राचार्य किंवा मुख्याध्यापक विरुद्ध प्राध्यापक किंवा शिक्षक असे स्वरूप मिळू लागले. श्री. भणगे यांनी आपल्या प्रबंधाची कक्षा शाळा-कॉलेजातील नियोजन या विषयापुरतीच मर्यादित ठेवण्याची काटेकोर दक्षता बाळगली होती. परंतु ताकाचे हे भांडे लपण्यासारखे नव्हते. चर्चेच्या प्रवाहात ते उघडकीस आले. हेच बरे झाले, कारण ते लपून राहणे इष्ट नव्हते, हे दोन्ही बाजूंनी खेळीमेळीने मान्य केल्यामुळे चर्चेच्या शेवटी गोडवा निर्माण होऊ शकला. ही खेळीमेळी निर्माण करण्याचे श्रेय मुख्यतः श्री. भागवत, श्री. भणगे यांना दिले पाहिजे. या चर्चेत थोडा वेळ अशी परिस्थिती होती की प्राचार्य आणि प्राध्यापक हे दुसऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची जेवढी उत्सुकता दाखवीत होते, तेवढी त्यांची स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची तयारी नव्हती! नेमके याच वेळी डॉ. खैर, श्री. बेदरकर यांनी दोन्ही बाजूंच्या भूमिकांची तटस्थ मनाने चिकित्सा करून दाखवली. त्यामुळे या चर्चेला उभयमान्य अशो समन्वयवादी पातळी मिळाली. आचार्यकुलाच्या जोपासनेला हीच भूमिका आवश्यक असल्यामुळे चर्चासत्राचा शेवट गोड झाला.
 

Tags: पुणे समाज प्रबोधन मामा क्षीरसागर विनोबा भावे फर्ग्युसन कॉलेज आचार्य कुल कृ. द. बेदरकर Pune Samaj prabodhan mama Kshirsagar Vinoba Bhave Ferguson college Aacharya kul K.D. bedardkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी