ख्रिसमसच्या वेळी आप्तेष्टांची चुंबने घेण्याची पाश्चात्त्यांत प्रथा आहे. ती सुरू होऊन शतके छोटली. त्यात काही गैर आहे, असे तेथे कुणालाही वाटले नाही. परंतु विसाव्या शतकांतील शास्त्रज्ञांनी अचानक सांगितले, "सावधान! चुंबन घ्यायचेच असेल तर गालाचे किंवा अन्यत्र घ्या. ओठांचे घेऊ नका!
खोसला कमिशनने भारतीय चित्रपटात चुंबनाला परवानगी देण्याची शिफारस केली आाणि चित्रपट रसिक थरारून गेले! सिनेमा पाहणारी रसिक व्यक्ती नायकाच्या अथवा नायिकेच्या जागी स्वतःला कल्पित असते. त्यामुळेच हे थरारून जाणे सयुक्तिक होते. कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संस्कृतिरक्षकांनी आणि महिला मंडळांनी निषेधपर भाषणे केली, ठराव केले. वर्तमानपत्रांतून उलट सुलट चर्चा झाली. पण या सर्वांतून झाले एकच ते म्हणजे, चुंबनाची गोडी आणखीनच वाढली! चित्रपटांत चुंबन असावे या गोष्टीला काही चित्रतारकांनीही अनुमती दाखवली तेव्हा तर रसिकांत विशेषतः तरुणांमध्ये वेडाची एक लहरच सळसळून गेली पण अमेरिकेच्या आरोग्यखात्याचा अगदी पलीकडचा फतवा पाहिला तेव्हा आपले हे तरुण नाराज होतील असे वाटून गेले. ख्रिसमसच्या वेळी आप्तेष्टांची चुंबने घेण्याची पाश्चात्त्यांत प्रथा आहे. ती सुरू होऊन शतके छोटली. त्यात काही गैर आहे, असे तेथे कुणालाही वाटले नाही. परंतु विसाव्या शतकांतील शास्त्रज्ञांनी अचानक सांगितले, "सावधान! चुंबन घ्यायचेच असेल तर गालाचे किंवा अन्यत्र घ्या. ओठांचे घेऊ नका! एका ओठांतून दुसऱ्या ओठांत आरोग्यविघातक जंतू जाऊ शकतात. रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या!" झाला की नाही हिरमोड? म्हणजे, गोऱ्या साहेबांकडून आम्ही ‘चांगल्या चांगल्या’ गोष्टी शिकायच्या आणि नंतर यांनीच सांगायचे, “अहो, ते वाईट आहे बरे का. जरा जपूनच.” पाश्चात्यांइतके आम्ही 'जर्म कॉन्शस' नाही. तिकडे फ्ल्यूची लागण झाली अशी कुणकुण लागायचा अवकाश, लगेच कचेऱ्या ओस पडतात. बाहेर वावरताना नर्सप्रमाणे नाकावर पट्टी बांधून लोक हिंडू लागतात. याउलट आम्ही इतके निष्काळजी की रस्त्यावरचे, घरातले किंवा कचेरीतले लक्षावधी जंतू आमच्या नाकातोंडांतून शरीरात जात असतात; रस्त्यावर थुंकायला आम्हाला काहीच वाटत नाही, तसेच हॉटेलमधल्या वेटरने ग्लासात बोटे घालून पाणी आणून दिले तरी आम्ही ते निर्विकारपणे पीत असतो. पण साहेबांची तऱ्हाच निराळी!
ओठांतून कोणत्या रोगांचे जंतू जातात, हे कळू शकले नाही. पण तिकडच्या आरोग्य खात्याचे पत्रक असल्याने यात गांभीर्य आहे हे निश्चित. तरीसुद्धा धूम्रपानाने कॅन्सर होतो हे जसे जाहीर करण्यात आले तसे चुंबनामुळे अमुक एक रोग होतो याची जनतेला माहिती व्हायला पाहिजे. कारण चुंबन घेण्याची वेळ यायच्या आधीच त्याच्या (आणि तिच्याही) हृदयाला रोग जडलेला असतो! या रोगावर उतारा म्हणून जी गोष्ट करायची तीच आरोग्यविधातक असल्याचे सांगून अमेरिकन लोकांनी विनाकारण घबराट उडवून दिली आहे. प्रीतीचा ज्वर झालेल्यांचे हृदय खलास झालेले असते, कलिजा खतम झालेला असतो, डोळे आंधळे झालेले असतात, हितचिंतकांचा सल्ला न ऐकण्याइतपत कान बहिरे झालेले असतात. शब्द मुके झालेले असतात. अशा वेळी 'मुक्या' कारभारावर जगत असताना या रोग्यांना मोक्याची गोष्ट करण्यास प्रतिबंध करावा यासारखा निष्ठूरपणा नाही!
एक मिशाळ कथा
चुंबनाविषयी चर्चा करत असताना ओठ आणि गाल यांव्यतिरिक्त मिशीचा उल्लेख निघणे विसंगत नाही. पुरुषाची मिशी सर्वांनाच आवडते असे नाही. काहींना तो पौरुषाचा भाग वाटतो तर काहींना तिची अडचण वाटते. खरे म्हणजे स्त्रियांच्या असल्या मतांची पर्वा करण्यावरून पुरुषाच्या पौरुषाची खरी कल्पना यावी. तिला आवडते म्हणून मी मिशी राखतो किंवा आवडत नाही म्हणून काढून टाकतो, यावरून तो पुरुष किती 'बायका'ळलेला आहे हे ठरवता येईल.
मिशांचे प्रकारही खूप आहेत. स्टालिन कट, हिटलर कट, तलवार कट, ढेकूण कट इथपासून झुबकेदार मिशांपर्यंत पल्ला आहे. मिशीमुळे व्यक्तिमत्त्वाला भारदस्तपणा किंवा कोमलपणा येतो, असे ती राखणारे मानतात. अमुक एक गोष्ट खरी झाली नाही अथवा ती करून दाखवली नाही तर मिशी उतरवून ठेवीन अशी प्रतिज्ञा करण्यात येते, यातच तिचे (म्हणजे मिशीचे) अनन्यसाधारण महत्त्व सामावले आहे. मिशीवरून आपल्या श्रीमंतीचा बडेजाव करता येतो हेही कित्येकांना माहीत असेल. जमीनदारी गेली, बड्या घरचे वासे पोकळ झाले तरी खानदानाची अब्रू कायम राहावी म्हणून हे बडे लोक उपाशीपोटी असले तरी घराबाहेर पडताना आपल्या सुबकेदार मिशीला साजूक तूप लावून व शिजवलेल्या उंची तांदुळाची काही शिते अडकवून येत. उद्देश असा की लोकांना वाटावे, श्रीमंती थाट अजून आहे तसा आहे बरे का!
इतर देशांच्या मानाने आपण बऱ्याच गोष्टींत मागे असलो तरी काही वेळा जबरदस्त डॅश मारून पुढे निघून जातो. उत्तर प्रदेशातील मसुरिया टिन नावाच्या सद्गृहस्थाने असेच रेकॉर्ड करून इतरांना धक्का दिला आहे. या माणसाची मिशी तब्बल साडेआठ फूट आहे! लांबसडक केस असलेल्या युवती- तरुण हृदयास भुरळ पाडतात, 'शकुंतले'चे कौतुक कालिदासासकट सर्व संस्कृत कवींनी केले बाहे, मराठी, हिंदी किंवा उर्दू शायरही या लांबसडक नागिणी दिल घायाळ करत असल्याची गोड शिकायत करतात.
हे सगळे ठीक आहे, पण साडेआठ फूट मिशीचा केशकलाप या गृहस्थाने कशासाठी ठेवला? तो पाहून कोणी आकर्षित व्हावे असाही त्याचा हेतू दिसत नाही. कारण तो आता आजोबा झाला आहे. मिशी ठेवण्याचा त्याचा अट्टाहास मात्र दांडगा आहे. स्वारी वर्षाला थोडे थोडके नाही तर मोजून 275 रु. खर्च करते, मिशीची निगा राखायला! सलूनमध्ये जाऊन रोज दाढी केली तरी एका वेळी तीस पैसे याप्रमाणे माणसाला वार्षिक 108 रु. खर्च येत असे, पण उच्चांक प्रस्थापित करायचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवल्यानंतर आजोबांनी ओठावरली आपली मिशी चांगले खतपाणी करून वाढवलेली दिसते. केशवर्धक तेलाच्या निर्मात्यांनी या मिशीचा उपयोग जाहिरातीसाठी करून घेतला तर?
मिशीवरून एक विनोद आठवला. बायकी चेहऱ्याच्या त्या माणसाकडे एक सद्गुहस्थ टक लावून पाहात होता. म्हणून त्याने गोंधळून विचारले, "काहो, असे काय बघता?"
तो म्हणाला, "एक मिशी सोडली तर तुमच्या आणि माझ्या बायकोच्या चेहऱ्यात किती साम्य आहे!" आपल्या ओठावरच्या गुळगुळीत भागावर हात ठेवून तो बायकी पुरुष गांगरून म्हणाला,
“पण मला मिशी कुठे आहे?”
सद्गृहस्थ उत्तरला, "तुम्हाला नाही, माझ्या बायकोला आहे ना!"
Tags: ख्रिसमस किरण ठाकूर कालिदास शकुंतला चुंबन भारतीय चित्रपट Christmas खोसला कमिशन Kiran Thakur Kalidas Shakuntala kiss Indian movie Khosla Commission weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या