गांधीजींच्या संदर्भात संघ पुरेसा बदनाम झाला आहे. त्या बदनामीवर सफेदी देण्याचाही हा प्रकार असू शकेल. स्वतःच्या अनुयायांच्या लेखी स्वतः नेहमी अद्वितीय ठरलेच पाहिजे, ही सरसंघचालकांची एक मनुष्यस्वभावसुलभ स्वाभाविक गरज आहे. आपण कितीही विसंगत बोललो वागलो तरी आपल्या अनुयायांपैकी कोणीही शंका घेऊ नये, इतपत त्या सर्वांची विचारशक्ती बधिर करून ठेवण्याचा कार्यक्रम केव्हाच पार पडला आहे.
सरसंघचालकांच्या सांगली येथील अतर्क्य भाषणाची प्रा. कुरुंदकर यांनी पुण्यास हजेरी घेतली व त्यांचे समग्र भाषण ‘साधने’त क्रमशः प्रसिद्ध झाले आहे. हे म्हणताना, ‘सो फार ऍज इट गोज' इतपतच इष्ट मानता येईल. ऑर्गनायझरमधील लेख व सांगलीतील भाषणासारखी भाषणे जी होत आहेत ती आमच्याकरिता मुळी नव्हेतच. या खटपटीने आज- शुद्धीवर असलेला कोणीच बुचकळ्यात पडणार नाही. या भाषणांचे बी अक्रोडागत पुढे साठ वर्षांनी फळ देणार आहे त्या दृष्टीने ते पेरण्यात येत आहे. तीन पिढ्यांनंतरच्या मुलांना काहीच समजू नये- निदान त्यांचा गोंधळ व्हावा आणि निदान त्यांना तरी संघाची भूमिका निर्दोष आणि तर्कशुद्ध असल्याची खात्री पटावी या आशेने हा खटाटोप करण्यात येत आहे. यश मिळण्याचा संभव नाकारता येत नाही, पण खुद्द सरसंघचालक या चालीला गाजराच्या पुंगीपेक्षा जास्त महत्त्व देत असतील असे वाटत नाही!
हा धूळ फेकण्याचा प्रकार
हा सर्व तुमच्या आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार आहे, हे स्पष्ट आहे. गांधीजींच्या संदर्भात संघ पुरेसा बदनाम झाला आहे. त्या बदनामीवर सफेदी देण्याचाही हा प्रकार असू शकेल. स्वतःच्या अनुयायांच्या लेखी स्वतः नेहमी अद्वितीय ठरलेच पाहिजे, ही सरसंघचालकांची एक मनुष्यस्वभावसुलभ स्वाभाविक गरज आहे. आपण कितीही विसंगत बोललो वागलो तरी आपल्या अनुयायांपैकी कोणीही शंका घेऊ नये, इतपत त्या सर्वांची विचारशक्ती बधिर करून ठेवण्याचा कार्यक्रम केव्हाच पार पडला आहे. तेव्हा त्या दिशेने सरसंघचालक अगदी निःशंक आहेत. यामुळे आणि ठराविक ठशाची भाषणे कदाचित संपली असतील म्हणून त्यांनी नवा प्रकार म्हणून सांगलीचे भाषण केले असावे. गांधी-शिष्यांपैकी चुकून जर कोणी गाफील असले तर अशा रीतीने तरी बहकतात की काय, हे पाहावे असा उद्देश नसेलच असे म्हणता येत नाही.
अहो! गांधीजींच्या बाबतीत हवा तो हवे ते बोलू- लिहू लागला आहे. कोणी तरी 'रामराम गांधीजी' (गुडबाय गांधी) असे लिहिले आहे. त्याच्या उलट ‘अपरिहार्य गांधीजी' (द इन्एव्हिटेबल गांधी) अशीही एक पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे. हा उलट सुलट मजकूरही गोंधळालाच नाही का कारण ठरणार? मग त्यात आणखी भर म्हणून सरसंघचालकांच्या सांगलीच्या भाषणाची भर पडली म्हणून अधिक ते काय होणार आहे?
निश्चयात्मक बुद्धी ही सुटका
मग आमचे काय व्हायचे? ‘त्रयाणाम् धूर्तानाम्' ही गोष्ट माहीत आहे ना? तीनच नव्हे तर असे तीनशे धूर्त जरी एकामागून एक भेटले तरी स्वतःची निश्चयात्मक बुद्धी जागेवर ठेवणे ही एकमेव सुटका आम्हाला उपलब्ध आहे. या दृष्टीने विचार करता आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे हे मित्र आमच्यावर एकापरी उपकारच करत आहेत!
ही आगाऊ योजना
महात्मा गांधींच्या शिकवणीचे महत्त्व त्यांच्या अनुयायांच्या संख्येवर मुळीच अवलंबून नाही. ज्याला व्यक्तिश: आणि समाजशः कल्याण अभिप्रेत असेल त्याने इच्छा असेल तर तिचा उपयोग करावा, नसेल तर करू नये. भारतापेक्षाही पाश्चात्त्यांची समस्या अधिक तीव्र आहे व गांधीजीच्या शिकवणीत एखादा सुटकेचा मार्ग सापडतो काय याचा त्यांनी फार कसोशीने शोध चालवला आहे. मला तर जवळपास खात्री वाटू लागली आहे की आचरणात्मक गांधीवादाची प्रचंड लाट पश्चिमेकडूनच येईल आणि आमच्यातील परप्रत्ययनेय बुद्धीचे लोक नंतर गांधीजींचे म्हणणे ऐकतील! ही निकटतम भविष्यात घडणारी गोष्ट आहे. आणि या वावटळीत ‘ऑर्गनायझर’चा प्रचार आणि सांगलीचे भाषण कोठे वाहून जाईल याचा सरसंघचालकांनाच पत्ता लागणार नाही! सत्यावर धूळ बसू शकते, ते तात्पुरते झाकोळले जाऊ शकते, पण ते मुळासकट नष्ट झाले असे जगाच्या इतिहासात अजून घडलेले नाही. ज्या प्रमाणात जे सत्य गांधीजींनी सांगितले आहे ते आम्ही कितीही टाळले तरी आमच्या पुढे पुनःपुन्हा दत्त म्हणून उभे राहणारच. तसे जेव्हा होईल तेव्हा तरी आपले तोंड उजळ असावे याचीही कदाचित ही आगाऊ योजना असेल.
दखल प्रमाणातच हवी
‘संघटनेकरिता संघटना’ या अद्वितीय आणि अतर्क्य शिकवणीला तरुण मंडळी फार दिवस कवटाळून बसतील असे वाटत नाही. 'गांधींची शिकवण नष्ट होईल, पण आमचावरील खाक्या तग धरील’ अशा भ्रमापायी जे जे होत आहे ते अनायासेच कोलमडेल. नव्या पिढीत तर्काचा उदय अपरिहार्यत्वे झाल्या शिवाय राहणार नाही आणि तर्काची पहिली टाचणी टोचली गेली की निव्वळ संघटनेकरिताच संघटनेत जी निष्कारण हवा भरली जात आहे ती आपोआप ओसरेल. हे सर्व क्रमप्राप्त आणि अटळ असल्यामुळे आम्ही सरसंघचालकांच्या अगर ऑर्गनायझरच्या प्रचारांची जी दखल घेतो ती प्रमाणातच असावी असे मला वाटते.
Tags: ऑर्गनायझर द इनएव्हिटेबल गांधी महात्मा गांधी सरसंघचालक नरहर कुरुंदकर मा. ज. कानेटकर organiser the inevitable Gandhi Mahatma Gandhi Sarsanghchalak narhar kurundkar M.Z. Kanetkar Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या