डिजिटल अर्काईव्ह

आजचा दिवस खरोखर भाग्याचा! पोस्टमन आल्यापासून आक्काचा चेहरा समाधानी दिसत होता. मी शाळेतून आल्यावर आक्कानं एक पत्र मजजवळ दिलं. दादाचं होतं ते. मी उघडलं पत्र “आक्का, तुला काय लिहूं? आज पर्यंत मी वेगळ्या धुंदीत होतो. पण तुझ्या पत्रानं डोळे उघडलेत. “आक्का, खरोखर तुमचा सगळ्यांचा फार फार अपराधी आहे मी. आक्का, तुझा मला कसा गं राग येईल? छे!


13 ऑगस्ट
खरंच, मलाही आश्चर्य वाटलं ते पत्र वाचून! हे काय? आक्का इतके पैसे पाठवते पण दादाचं आपलं नेहमींचंच : ‘आक्का आणखी पैसे पाठव!’
आक्का तरी काय करणार? दादाचं पत्र आलं म्हणजे बिचारी काळजीने चूर होते. अन् खरंच आहे, त्याला पाठवायला नेहमी पैसे आणाव्याचे कोठून?
अवघ्या पंचाहत्तर रुपयात मी, सरू व आक्का अन् दादाचा कॉलेजचा खर्च! कसं शक्य आहे, दादाची धुळ्यासारख्या शहराची राहणी! तेवढ्यांतल्या तेवढ्यांत भागवून आक्का दादाला पैसे पाठविते. वाटतं, दादानं खूप खूप शिकावं! आम्हाला चांगले दिवस यावेत. मग मी अन् सरू पण खूप शिकूं-
दादाचा खर्च आमच्यांनं भागेल का? अगोदर दादाला थोडे पैसे पुरत. नंतर पैशांची मागणी वाढू लागली. आता काय कपडे नंतर काय ट्रिपच. आणखी एक ना दोन. त्याला सारखे पैसेच हवेत. मी लहान. आताशी आठवीत आहे. सरू सातवीत. आमचाही आक्काला खर्च आहेच-
अशा वेळी...!
दादाला का समजत नाही? आक्का म्हणते मोठ्या माणसांना नावे ठेवू नयेत! पण-
14 ऑगस्ट
आज सरू शाळेतून आली ती रडतच! मी चेष्टेनं म्हटलं-
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या? 
“का ग! गंगा-यमुनाही या मिळाल्या?” 
पण ती जास्तच मुसुमुसू लागली. विचारल्यावर समजलं की, तिच्या वर्गातील सर्व मुली उद्या वनभोजनाला जाणार आहेत. प्रवेश फी आहे एक रुपया. सरूला फार वाटतं, वनभोजनाला जावं-जावंसं. पण प्रवेश फी द्यायची कुठून? 
आपल्याला जाता येणार नाही ह्या कल्पनेनं तिला रडूं येत होतं. मलासुद्धा खूप वाईट वाटलंय! पण गरिबांच्या आशाआकांक्षा खरंच का पूर्ण होऊ शकत नाहीत! असं का! असं का...!
15 ऑगस्ट
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. बाहेर सर्वत्र दिव्यांचा झगझगाट-रोषणाईचा लखलखाट आहे. आनंद, उत्साह आहे. 
रात्री मी अन् सरोज रोषणाई पाहून आलो. घरात सामसूम होती. सरोज झोपावयास गेली. मी आतल्या घरात गेलो. तेथे टेबलापाशी आक्का होती. समोर पत्र पडलं होतं. पण.... आक्काला लिहिता लिहिता झोप लागली होती.
मी पत्र पाहिलं.... ‘अवी दादास…’
मी न विचारता की कुणाची पत्रे वाचत नाही. पण आता एक-दोन दिवसांपासून आक्काच्या काळजीने काळवंडलेल्या चेहऱ्यामुळे मलाही कसेसेच वाटू लागले आहे.
खरं म्हणजे मी का फार मोठा आहे असा विचार करायला! पग परिस्थिती सारं हळूहळू शिकविते. मी पत्र वाचू लागलो-
“अवीदादा, तुला कधी मी असं काही लिहीत नाही. पण आता लिहावे लागत आहे. अवी, तू आधीपासूनच माई-नानांचा लाडका. कधीही तुला दुखवलं नसेल व्यांनी. अन् मी पण माझ्या परीनं तुला यथाशक्ती मदत करीत आले.
“अवी, आपली परिस्थिती तुला सांगायला हवी असं नाही. मग अवी, असा वेडेपणा का रे करतोस! पस पाठविण्याबद्दल माझी ना नाही रे. पण....
पैसे कपड्यांना हवेत, काश्मीरच्या सफरीला हवे, अशा तुझ्या सबबी वाचल्या म्हणजे मनाला अत्यंत यातना होतात. तुला जाणीव नाही, असं का म्हणू!
“अवी, येथे सुधा-सरू यांचे किती हाल होतात! मला होणाऱ्या त्रासाचं सोड रे.... लहानग्या भांवडांसाठी झिजताना एक प्रकारे आत्मिक समाधान लाभते.
“अवी, मजवर रागवू नकोस. हे लिहिताना मलाही अत्यंत वाईट वाटतंय पण...”
मला पुढे पत्र वाचवेना. माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. खरंच, आक्का आमच्यासाठी किती कष्ट सहन करते, पण आम्ही .... मला मागील प्रसंग आठवू लागले.
माई कधी गेली हे मला अन् सरोजला आठवत नाही. माईनंतर चार महिन्यांनी नाना गेले. अन् सारी जबाबदारी आक्कावर आली. आमच्यात आक्का सगळ्यात मोठी. अवीदादा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान, शेवटी नाना म्हणाले होते, ‘आपल्या अवीला शिकव!’ अन् आमच्यासाठी आक्का आपल्या शरीराचा कणन् कण झिजवीत आली. पैसे पुरविण्यासाठी फावल्या वेळात शिकवण्या केल्या. आक्काला दिवसभर कष्ट पडत. तिनं अवीला कधी कमी पडू दिलं नाही.
पण आताशा अवीदादा उधळ्या झाला असे मला वाटे. आक्का कधीही त्याबद्दल बोलत नसे. तिने स्वतःच्या गरजा अत्यल्प केल्या नि दादाला पैसे पुरवलेत.
माझी नजर पत्राकडे गेली... “अवी, तू खूप शिकून मोठे व्हावे ही माई-नानांची इच्छा! नानांना मी तसं वचन दिलंय. ते पूर्ण करण्यासाठी मी अविश्रांत खपेन, पण तू सुधा-सरूचा विचार करीत जा!”
खरंच आक्काचं मन किती घोर! जन्मोजन्मी ही भगिनी लाभावी अशी प्रार्थना देवाजवळ आक्काबद्दल करावी....
16 ऑगस्ट
एक सुंदर गोष्ट मी वाचली आज. साने गुरुजींची आहे ती. ‘मोलकरीण’ हे तिथं नाव. गरीब परिस्थितीत, जन्मलेला एक मुलगा उच्च शिक्षण घेतो. त्याचे आई-वडील कष्ट सहन करून त्याला शिकवितात पण पुढे तो आई-वडिलांना विसरतो.”
खरंच, आमचा अवीदादा पण आम्हाला विसरेल का? त्याचा खर्च....
पण जाऊ द्या.... भगवंताची इच्छा.
17 ऑगस्ट
आजचा दिवस खरोखर भाग्याचा! पोस्टमन आल्यापासून आक्काचा चेहरा समाधानी दिसत होता. मी शाळेतून आल्यावर आक्कानं एक पत्र मजजवळ दिलं. दादाचं होतं ते. मी उघडलं पत्र “आक्का, तुला काय लिहूं? आज पर्यंत मी वेगळ्या धुंदीत होतो. पण तुझ्या पत्रानं डोळे उघडलेत.
“आक्का, खरोखर तुमचा सगळ्यांचा फार फार अपराधी आहे मी. आक्का, तुझा मला कसा गं राग येईल? छे!
आक्का, क्षमा कर उलट तूच मला. थोड्या पैशात मी माझा कॉलेज खर्च चालवू शकेन ग, पण तुझे व सुधासरूचे हाल नकोत आता.”
मी पत्र मिटता मिटता ‘शेवटची ओळ वाचली.” उद्या मी घरी येतो. भेटू दे मला एकदा तुम्हा सर्वांना.”
मी एकदम उद्गारलो “येणार दादा आज घराला.”
रामानुजमची गोष्ट 
हजारेक वर्षांपूर्वीची गोष्ट. रामानुजम् आपल्या गुरूंकडे गेले. म्हणाले: “मला मंत्र द्या.”
रामानुजमच्या गुरुजींनी त्यांना मंत्र दिला. सांगितले : “हा मंत्र तुला तारील. पण हा मंत्र इतरांना सांगू नकोस.”
रामानुजम् सामान्यतः गुरुजींची आज्ञा पाळणारे. पण ते इतरांना तो मंत्र सांगू लागले. गुरुजींच्या कानी ही गोष्ट आली. त्यांना राग आला. त्यांनी रामानुजमला बोलावले. म्हणाले : “तू माझी आज्ञा मोडलीस. मी दिलेला मंत्र तू इतरांना सांगितलास. या आज्ञाभंगामुळे तू नरकात जाशील.”
रामानुजम् खाली मान घालून गुरुजींना म्हणाले : “पण गुरुजी ज्यांना मी मंत्र दिला त्या लोकांचे काय होईल! तेही का नरकात जातील”
गुरुजी म्हणाले: “नाही. ते नरकात जाणार नाहीत. त्यांचा त्या मंत्राने उद्धार होईल.”
रामानुजम् म्हणाले : “त्या शेकडो लोकांचा जर उद्धार होणार असेल तर बेहत्तर आहे मला नरकात जावे लागले तरी!”
रामानुजमची लोकांच्या उद्धाराची कणव पाहून गुरुजी खूष झाले. त्यांचा राग मावळला.
रामानुजम् यांनी संबंध देशभर फिरून ज्ञानप्रसार केला. लोकांच्या उ‌द्धारासाठी ते वाटेल ते दिव्य करायला तयार होते.
 

Tags: Parables Children's Tales Ambadas Vagh बोधकथा बालकथा अंबादास वाघ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी