फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एक गाव होते. त्या गावात एक मुलगा व त्याची आई राहात असे. त्या मुलाचे नाव होते विजय. त्यांच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य नांदत होते. विजय हा जंगलात जाई आणि लाकडे तोडून आणी व ती विकून पैसे मिळवी. अशा तऱ्हेने तो आपल्या आईसह कष्टमय जीवन जगत होता. विजय हा शूर व उमदा होता. एक दिवस विजय आईला म्हणाला, "आई, इथे असे कष्टात दिवस काढण्यापेक्षा मी कोठे तरी दूर जाऊन काम धंदा करीन व पुष्कळ संपत्ती मिळवून आणीन." पण त्याच्या आईला ते पसंत पडले नाही. विजय म्हणजे त्याच्या आईचा जीव की प्राण होता. विजयशिवाय तिला कोणीही नव्हते.
सकाळची धांदल
कु. संध्या गोखले
सी. पी. ॲन्ड बेरार हायस्कूल, अमरावती
अण्णा एक मोठ्ठी जांभई देत उठले. उठले कसले? त्यांच्या पत्नीच्या कॉमेंट्रीसारख्या एकाच सुरात एकदम येऊन धडकलेल्या हाकांना ओ देत देत एकदाचे उठले! अस्सा संताप आला त्यांना आपल्या पत्नीचा, पण करतात काय? एकदा का त्यांची तोफ सुरू झाली की त्यांच्या ऑफिसच्या वेळेपर्यंत काही थांबली नसती. अण्णांना नेहमी वाटायचे, आपल्या भार्येला सरळ लढाईला पाठवून द्यावे, असे गारद पडतील शत्रू तिच्या तोफेला पाहून! ही कल्पना मनाशी घोळवत एक मोठ्ठी जांभई देण्यासाठी त्यांनी हात वर केले अन् अहो, ते वर जायच्याऐवजी सरळ कानावर गेले अन् तोंडातली जांभई तिथल्या तिथे गुप्त होऊन एक मोठा आश्चर्यकारक आवाज त्यांच्या तोंडातून बाहेर पडला!! त्यांनी आपल्या सुकन्येला विचारले, "का ग निमे, आज रविवार की काय? मिलचा पोंगा ऐकू येतोय म्हणून विचारलं." त्यावर निमानं सांगितलं, “अगदीच आहात अण्णा तुम्ही. अहो, आज रविवारदेखील नाही आणि हा मिलचा पोंगादेखील नाही. आई गाण्याची प्रॅक्टिस करतेय म्हटलं!” येवढे 50 वर्षांचे अण्णा ताड्कन उडी मारून पलंगावरून खाली उतरले आणि मग इन्क्वायरी ऑफिसरच्या थाटात (पण हळू) आपल्या कन्यकेला विचारले, "काग, आई गाणं कधीपासून शिकतेय?" "अहो, कालच क्लास जॉइन केलाय न आईने." निमा उत्तरली. सकाळी 5 वाजताच तयार झालेला चहा त्यांनी, “ वाः वाः काय सुंदर चहा! याच्या समोर तर "दार्जिलिंग टी "सुद्धा फिक्का पडेल. असं म्हणत संपवला. पण त्यांचा हा ‘जोफ’ ऐकून निमाच काय ती हसली. पार्वतीबाईंनी लक्षच दिलं नाही. (पण खरे सांगायचे तर त्यांना तो ‘जोक’ कळलाच नव्हता) अण्णा आपले मोठे चिरंजीव कुमार यांना म्हणाले, "बरं का कुमार, आता तुमची बरोबर बुधवारी हसेल." त्यांना वाटलं अरे, हासुद्धा जोक काय सुरेख जमला आपल्याला! आणि ते एकटेच जोरजोरात हसू लागले.
अण्णा स्वतःचं सर्व आटपून एका कोपऱ्यात बसून पार्वतीबाईंची धावपळ पाहात बसले. त्यांचा म्हणे 9 ला क्लास होता. दोन तास खर्ची घातले तरी सुद्धा त्यांना ‘सरोजबाला’ सारखी ‘हेअर स्टाइल’ जमत नव्हती. शेवटी दोनच वेण्या घातल्या गेल्या. का तर म्हणे दोन वेण्यांतच त्या यंग वाटतात. अजून सारे मेक अप व्हायचे होते. पण त्यांनी ते कसेबसे अर्ध्या तासात आटोपले आणि बरोबर साडेनऊला त्या घराबाहेर पडल्या. अण्णांनी एक सुटकेचा निःश्वास टाकला, अन् जेवायला आले. पत्नीच्या क्लासला जायच्या गडबडीत बिचारा भात पार ‘जळगाव’ला गेला होता आणि वरणाचे सुंदर ‘गंध' झाले होते. शेवटी शिळी पोळी आणि लोणचे खाऊन ते ऑफिसमध्ये गेले. केवळ योगायोगच म्हणायला हवा. कारण मोठे साहेब आले नव्हते. एवढी दहा वर्षे झालीत पण बिचारा साहेब कधी गैरहजर राहिला नव्हता. त्यामुळे आज सर्वच स्टाफला अतिशय आश्चर्य वाटत होते. मनाला विलक्षण आनंद झाला होता. गोष्ट तशी काही फार महत्त्वाची नव्हती. तेव्हा खरे पाहिले तर इतका आनंद होऊ नये, पण होतो. बुडीत खाती टाकलेले येणे न मागता अचानक घरी आणून दिले म्हणजे होतो तसाच आनंद अण्णांनाच काय साऱ्यांनाच झाला होता.
दिवाळीची किंवा उन्हाळ्याची अथवा नाताळची मोठी सुट्टी होण्याच्या आधीचा किंवा तो संपल्यानंतरचा पहिला दिवस नसूनही हे झालं होतं. त्यामुळे ते कुणालाच खरे वाटत नव्हते, आणि मनात साचत आलेल्या आनंदावर आता विरजण येऊन सारे जण साहेबांची वाट पाहात बसले होते. सुमारे अर्धा-एक तास झाल्यावर सारेच निश्चिंत झाले आणि मग ‘अ’ ‘सकाळ’चा फडशा पाडू लागले, ‘ब’ सकाळीच ऐकलेल्या एका गाण्याची ओळ गुणगुणू लागले, ‘क’ महाशयांनी एक झकास जांभई देऊन ताणून दिली. आणि ‘ड’ महाशय सिगरेट ओढत तोंडातून बाहेर पडणाऱ्या धुम्रवलयांना दृष्टिक्षेपांनी कुरवाळत गुदगुल्या करू लागले आणि अण्णा सकाळी अर्धवट झालेल्या झोपेला आळवू लागले.
यत्न हाच परमेश्वर
कु. विद्या वसंत ग्रामोपाध्ये
मुलीचे आगरकर हायस्कूल, पुणे
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। उद्योगानेच आपली कामे पूर्ण होतात. नुसते मनोरथ केल्यामुळे कधीही पूर्ण होत नाहीत. तेनसिंगाला गौरीशिखरावर चढून जावयाचे होते. त्या कामी त्याला अनेकदा अपयश आले. अपयशाने तो खचून गेला नाही. परत परत प्रयत्न केले व शेवटी तो गौरीशिखरावर चढून गेलाच ना? त्याने सर्वात पहिला आपल्या भारताचा ध्वज तिथे फडकवलाच ना? त्याकरिता त्याने किती तरी कष्ट घेतले! म्हणूनच कोणी एकाने म्हटले आहे. प्रयत्नान्ती परमेश्वर!
प्रयत्न हाच परमेश्वर असे म्हणतात ते काही खोटे नाही. प्रयत्नांनी आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करता येते. आता आपणच पूर्वी 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत पडलो होतो. पण गांधीजींनी सत्याग्रह केले. लोकमान्यांनी आपल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून अन्यायाविरुद्ध झोड उठवली. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. मग आपली ही भारत-भू स्वतंत्र झाली ना.
म्हणूनच म्हणतात की, “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे " आता आपल्यातील नेपोलियनचं उदाहरण आपण घेऊ. तो प्रथम अगदी साधा शिपायी होता. पण तो आपल्या कर्तृत्वामुळे जगज्जेता झालाच ना? तो म्हणत असे "There is no impossible word in my dictionary." त्याच्या मते शक्य हा शब्द त्याच्या कोशात होता. आणि तो म्हणत असे “Circumstances! I make circumstances!” हे त्याचे उज्ज्वल उद्गार म्हणजेच त्याच्या यशाची गुरु किल्ली आहे.
जगामधील कोणतीही महान अशी व्यक्ती घ्या. तिच्या महान चरित्राचा अभ्यास करा आणि तुम्हाला त्या व्यक्तीने आपल्या ध्येयप्राप्तीकरिता घेतलेले महान कष्ट तिच्या यशामागे लपलेले दिसतील. टाकीचे घाव सोसल्याशिवाय कधी देवाला देवपण येत नाही.
"यत्नानेच मनुष्या
आले श्रेष्ठत्व या जगामाजी।
न दिसे एकहि वस्तु यत्नाविना असाध्य आहे जी॥ "
प्रयत्नामुळेच माणसाला जगात मोठेपण आले आहे. प्रयत्नाने जे काही असाध्य आहे ते सर्व मिळू शकते.
“असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे॥"
ध्येयप्राप्तीकरता कष्ट मात्र केले पाहिजेत. जर पहिला नंबर यायला पाहिजे असेल तर अभ्यास हा केलाच पाहिजे. 'चराति चरतो भगः ' असे म्हणतात ते काही खोटे नाही. जर आपल्याला यशाच्या सोनेरी रथात बसायचे असेल तर प्रयत्नांचा लगाम हा सतत हात ठेवला पाहिजे. उच्चपदी दिमाखाने राहावयाचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा ही केलीच पाहिजे.
चणे खावे लोखंडाचे। तेव्हा ब्रह्मपदी नाचे॥ कोलंबस जेव्हा हिंदुस्थान शोधायला निघाला तेव्हा त्याला हिंदुस्थान तर दिसेनाच; पण साधी जमीनसुद्धा दिसेना. तेव्हा त्याच्या बरोबरचे लोक त्याला दोष द्यायला लागले; परंतु त्याने त्यांना धीर दिला व शेवटी अमेरिका ही शोधून काढलीच ना?
आज जगात सगळीकडे उपग्रह सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाचे तर अनेक उपग्रह कोसळले. केलेले प्रयत्न फुकट गेले. पण त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. परत परत उलट जास्त नेटाने प्रयत्न केले. म्हणूनच तर रशियाला आपल्या ‘स्वप्न’ या उपग्रहाचा दुसरा वाढदिवस साजरा करता आला.
आपण नेहमी प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्याला यशाचे शिखर जर गाठायचे असेल तर प्रयत्न हा केलाच पाहिजे. यशाचे शिखर हे खचितच कठीण! जर आपण प्रयत्न केला तर मग अवघड काहीच नाही.
जादूची थाळी व जादूचा मणी
गजानन भिडे
श्री वर्धमान विद्यालय, वालचंदनगर
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एक गाव होते. त्या गावात एक मुलगा व त्याची आई राहात असे. त्या मुलाचे नाव होते विजय. त्यांच्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य नांदत होते. विजय हा जंगलात जाई आणि लाकडे तोडून आणी व ती विकून पैसे मिळवी. अशा तऱ्हेने तो आपल्या आईसह कष्टमय जीवन जगत होता. विजय हा शूर व उमदा होता. एक दिवस विजय आईला म्हणाला, "आई, इथे असे कष्टात दिवस काढण्यापेक्षा मी कोठे तरी दूर जाऊन काम धंदा करीन व पुष्कळ संपत्ती मिळवून आणीन." पण त्याच्या आईला ते पसंत पडले नाही. विजय म्हणजे त्याच्या आईचा जीव की प्राण होता. विजयशिवाय तिला कोणीही नव्हते. तिने त्याला जाऊ दिले नाही. विजय काही हट्ट सोडोना. अखेरीस विजयला जाण्यास त्याच्या आईने परवानगी दिली. विजयला तिने जड अंतःकरणाने निरोप दिला.
त्या गावाशेजारी आनंदपूर नावाचे एक छोटेसे राज्य होते. त्या गावात विजय येऊन पोचला. नाव आनंदपूर. पण त्या राज्यात आज दुःखाचे साम्राज्य पसरले होते. सर्व लोकांचे चेहेरे दुःखी दिसत होते. काय झाले होते ते विजयला कळेना. इतक्यात त्याला दवंडीचा आवाज ऐकू आला. आनंदपूरची राजकन्या रूपवती ही बेपत्ता झाली आहे. तिचा जो शोध करून आणील त्याला अर्धे राज्य मिळेल व राजकन्येशी विवाह होईल." ती दवंडी ऐकून त्याने निश्चय केला की मी राज्यकन्येला शोधून आणीनच. असे म्हणून तो राजवाड्यात गेला. राजा उदास दिसत होता. तेथून जे तरुण गेले ते परत आलेच नाहीत. त्यामुळे राजा बेचैन झाला होता.
विजय राजाला मुजरा करून म्हणाला, "महाराज, मी राजकन्येच्या शोधार्थ जात आहे, तरी आपला मला आशीर्वाद असावा." राजा म्हणाला, "तरुणा, तू आपले सोन्यासारखे प्राण का संकटात घालतोस? तू जाऊ नकोस." पण विजय हट्ट सोडीना. शेवटी राजाने परवानगी दिली. विजय घोड्यावरून निघाला. मजल दर- मजल करत तो एका जंगलात येऊन पोचला तोच त्याला एक झोपडी दिसली. तो घोड्यावरून खाली उतरला व झोपडीत डोकावून पाहिले. त्याला एक साधूमहाराज झोपडीत ध्यानस्थ बसलेले दिसले. विजय तेथेच बांबून राहिला. नंतर साधूमहाराज उठले व त्यांचे लक्ष विजयकडे गले. ते म्हणाले, "बाळ, तू इकडे कोठे चालला आहेस? तुला काही पाहिजे का?" नंतर विजय म्हणाला, “साधूमहाराज, मी आनंदपूरच्या राजाच्या कन्येच्या शोधासाठी जात आहे तरी आपण मला मदत करावी.” ते म्हणाले, "ते अत्यंत कठीण आहे. तुला जर जायचेच असेल तर मी सांगतो तसे कर. येथून पूर्वेकडे पाच मैल जा. नंतर तुला दोन डोंगर दिसतील ते ओलांड. त्यावर तेथे विक्राळसिंह नावाचा राक्षस राहात आहे. त्याने राजकन्या रूपवतीला पळवून नेले आहे. तरी मी तुला दोन गोष्टी देतो. त्यांच्या मदतीने तू राक्षसाला ठार मारू शकाल. एक जादूची थाळी व दुसरा जादूचा मणी. थाळीमुळे तू हवेतून उडत जाशील व मण्यामुळे तू अदृश्य होशील. जा. विजयी हो." विजय निघाला. तो थाळीवर उभा राहिला. डोंगर ओलांडून एकदम राक्षसाच्या महालात गेला. तो आत गेल्यावर त्याला राजकन्या एका बंदिस्त खोलीत दिसली. रूपवती नावाप्रमाणे रूपवान होती. तो खिडकीजवळ गेला व रुपवतीला म्हणाला, "रूपवती, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. भिऊ नकोस.” ती म्हणाली, "तू येथून निघून जा. थांबू नकोस. विक्राळसिंह फार दुष्ट आहे. तो तुला ठार करील." इतक्यात गडगडाट ऐकू येऊ लागला. तो बंद झाल्यावर राक्षस आत आला, व मोठ्याने हसून म्हणाला, "अरे पोरा, बरा तावडीत सापडला आहेस. तुझ्यासारखे हजार येऊन गेले आहेत. आणि तू राज्यकन्येला नेणार! शक्य नाही. थांब, आताच्या आता तुझी चटणी करून टाकतो." असे बोलून राक्षस त्याच्या अंगावर आला तोच त्याने मणी तोंडात टाकला व अदृश्य झाला. राक्षस मागे वळून पाहतो तोच त्याला पुन्हा विजय दिसला. पुन्हा त्याने त्याच्या अंगावर झेप घेतली. तोच विजय पुन्हा अदृश्य झाला व राक्षसाच्या मानेवर एक तरवारीचा वार केला. तोच राक्षस मरून पडला. त्याची सर्व जादू नष्ट झाली. त्याने रूपवतीला मुक्त केले व ती दोघेजण थाळीच्या साह्याने आनंदपूरमध्ये आली. तेथे विजयचे व रूपवतीचे लग्न झाले. विजयने आपल्या आईला तेथे आणले, व सर्व सुखात राहू लागली.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या