डिजिटल अर्काईव्ह

महात्म्याला धर्मभ्रष्ट ठरवणारे करंटे हिंदुत्ववादी

श्री. गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी यांच्याविषयी चिकित्सा करणारी ही लेखमाला या लेखाने पूर्ण होत आहे. प्रा. कुरुंदकर यांनी पुण्यात याच विषयावर दिलेले हे व्याख्यानच लेखरूपाने प्रसिद्ध झाले आहे. जातिप्रथेसंबंधी एक व्याख्यानमाला गुंफण्याचे व ती व्याख्याने लिहून देण्याचे प्रा. नरहर कुरुंदकर यांनी आश्वासन दिले आहे. त्यांच्या या विषयावरील मूलग्राही विवेचनाची सर्व वाचकांप्रमाणे आम्हीही वाट पाहत राहू.

जनतेचे मन नेहमीच परंपरावादी असते, पण या परंपरावादी मनाला व्यावहारिक वस्तुस्थितीचे प्रश्न त्रस्त करत असतात. परंपरेने मान्य केलेला एखादा मुद्दा जनता जेव्हा सोडते तेव्हा ती केवळ नाइलाज म्हणून सोडीत असते. आजचे प्रश्न आणि परंपरा यांचा सांधा जे जोडू शकतात अशा मंडळींचा पराभव विकासोन्मुख देशात जवळ जवळ अशक्यच असतो. हिंदू जनतेचे काही ज्वलंत प्रश्न होते. इंग्रज राजवटीच्या आगमनानंतर आणि इंग्रजी शाळा सुरू झाल्यानंतर सर्वच गुलामांच्या मनात आपल्या बेड्या तुटाव्या अशी अदम्य इच्छा निर्माण झाली.

अस्पृश्यांच्या तीन अपेक्षा
अस्पृश्यांना आपल्याला मानवतेचे हक्क मिळावेत, समान वागणूक मिळावी असे वाटू लागले. स्त्रियांनाही हक्कांची जाणीव होऊ लागली, सुशिक्षित भारतीयांना इंग्रजांच्या गुलामगिरीचा तिटकारा वाटू लागला. हे सगळेच गुलामगिरीच्या विरुद्धचे झगडे होते. या विविध झगड्यांच्या पैकी इंग्रजी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याकांक्षेने प्रेरित झालेला जो राजकीय लढा होता त्याला जसा धर्माचा पाठिंबा मिळाला तसा इतर लढ्यांना धर्माचा पाठिंबा मिळाला नाही. अस्पृश्यांच्या समोर प्रमुख प्रश्न तीन होते- एक तर त्यांना शिक्षण हवे होते, दुसरे म्हणजे पिढ्यान् पिढ्यांच्या दारिद्र्यातून मुक्तता हवी होती. तिसरे म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील बरोबरीचे हक्क हवे होते, हिंदू धर्मावरच्या बळकट अभिमानामुळे आणि इतर हिंदूच्या बरोबर सहकार्य केल्यामुळे या गुलामगिरीच्या बेड्या लवकर तुटतील, एवढा विश्वास जर अस्पृश्यांना वाटू शकला असता तर मग हिंदुत्ववादी राजकारणाला कोट्यवधी अस्पृश्यांचे पाठबळ मिळाले असते.

बंडाशिवाय मार्ग नव्हता
पण असे कधी घडलेच नाही. ज्या ज्या वेळेला अस्पृश्यांचा प्रश्न उभा राहिला त्या त्या वेळेला धर्म अस्पृश्यांच्या विरोधात उभा राहिला. महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा आपला हक्क बजावण्यासाठी गेलेल्या हरिजनांना समाज आपल्या विरोधी उभा राहणार हे माहीतच होते. कारण समाज परंपरावादी असतो. पण जे हिंदूंचे हिंदू धर्माभिमानी जाणते सुशिक्षित नेते होते तेही जेव्हा बुद्धिवाद सांगत अस्पृश्यांच्या विरोधी उभे राहिले तेव्हा अस्पृश्यांना बंड करण्याशिवाय दुसरा रस्ताच उरला नाही! आंबेडकरांच्या कहाणीपेक्षा फुल्यांची कहाणीही निराळी नाही. भारतरत्न कर्वे यांची कहाणी मूलत: महात्मा फुले यांच्याहून निराळी नाही. धर्माच्या नावाने सर्व प्रकारच्या सामाजिक सुधारणेला जनतेचे जीवनमान उंचावण्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला फक्त विरोधच होत राहिला तेव्हा जीवनाचा संघर्ष धार्मिक राजकारणाच्या बाहेर जाऊन सोडवणे भाग पडले. 

आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर काय दिसेल? महाराष्ट्रातील धार्मिक राजकारण नेहमीच सामाजिक सुधारणाविरोधी असल्यामुळे या राजकारणाच्या कक्षेतून मराठा, साळी, माळी असा बहुजनसमाज बाहेर जाणे भाग होते. सगळा अस्पृश्य समाज बाहेर जाणे भाग होते. आदिवासी समाजाकडे हे राजकारण कधी गेलेच नाही, तो समाजही या राजकारणात आला नाही. सर्व सुशिक्षित स्त्रियांना आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वरिष्ठवर्गीय नेत्यांना धार्मिक राजकारणातून बाहेर पडणेच भाग होते. शेवटी हिंदू धर्मातील राजकारणात पुरोहित, जमीनदार व हितसंबंधीय असे मूठभर लोक सोडल्यास कुणी येणेच शक्य नव्हते. हिंदूंचे प्रश्न हाती घेऊन सोडवल्याशिवाय हिंदुत्ववाद बळकट होणे शक्यच नव्हते. निदान लोकमान्य टिळक होते त्या वेळी हिंदू धर्मवादी राजकीय स्वातंत्र्यासाठी झटत होते, झगडत होते. टिळकांच्या मृत्यूनंतर या धार्मिक राजकारणाने स्वातंत्र्यासाठी झगडा कधीच दिलेला नाही. आपल्याच अवयवांच्या प्रत्येक विकासाला विरोधी असणाऱ्या शरीराप्रमाणे हिंदुत्ववाद्यांची वागणूक राहिली. या राजकारणामागे हिंदू जाणे शक्य नव्हते.

स्वातंत्र्यवीरांनीही लिहूनच समाधान मानले
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामध्ये या परिस्थितीची थोडीफार जाणीव दिसते. त्यांनी मात्र सर्व प्रकारच्या सुधारणांचा पुरस्कार आपल्या भाषणांतून केला. लिखाणातून केला. पण सामाजिक जीवनात अशा पुरस्काराला अर्थ नसतो. स्वातंत्र्यवीरांनी एक नवीनच पतितपावन मंदिर उभे केले ही गोष्ट कौतुकास्पद नसते हेच पुष्कळांना कळत नाही! अशा घटना चिंताजनक असतात. सर्व जातीजमातींना मोकळे असणारे मंदिर शेवटी फक्त अस्पृश्यांचे मंदिर उरते आणि पुढे तेही तिथे येणे सोडून देतात!! स्वातंत्र्यवीरांनीसुद्धा हिंदूंची प्रतिष्ठित मंदिरे हरिजनांच्यासाठी मोकळी करण्याचे लढे दिले नाहीत. सावरकरांच्यावर बंधने होती हे मान्य केले तरी ही सारी बंधने 1937 ते 47 पर्यंत संपलेली होती. या दशकात सार्वजनिक विहिरी व तळी हरिजनांना मोकळी व्हावी, मोठी मंदिरे हरिजनांना मोकळी व्हावीत यासाठी लढण्यास त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही! पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर हिंदू हरिजनांच्याकरिता मोकळे करण्याचे काम शेवटी साने गुरुजींसारखा गांधीनिष्ठ माणूस करतो. श्रेष्ठ हिंदुत्ववाद्यांना, हरिजन बुद्ध झाले तरीही बुद्ध हरिजन म्हणजे हिंदूच होत, असे लेख लिहिण्याने कर्तव्यकर्म केल्याचे समाधान मिळते!

हिंदुत्ववादी व राजर्षी शाहू महाराज
शेतमजुरांचे लढे हे शेवटी दरिद्री हिंदू शेतकऱ्यांना सुरक्षित जीवन देणारे लढे होते. कामगारांचे लढे हे दरिद्री हिंदू मजुरांना किमान जीवन उपलब्ध करून देणारे लढे होते. हिंदु संस्थानिकांच्या विरुद्ध झालेले प्रजेचे लढे हे सरंजामशाहीच्या गुलामीतून मुक्त होऊ पाहणाऱ्या पुन्हा हिंदूचेच लढे होते. हिंदुत्ववाद्यांना यांपैकी कशातच रस नव्हता. निदान हैद्राबाद, भोपाळ, जुनागढ येथील लढे हिंदू जनतेचे मुसलमान विरोधी लढे होते, पण त्यातही या धर्मवाद्यांना रस नव्हता. भारतात विलीन होण्याची टाळाटाळ करणाऱ्या काश्मीरच्या महाराजात यांना रस होता! नेपाळ हे भारतापेक्षा भिन्न असे सार्वभौम राष्ट्र आहे, ही नेपाळ नरेशांची भूमिका होती. एकमेव स्वतंत्र हिंदू राज्य म्हणून हिंदुत्ववाद्यांना नेपाळ नरेशांचे कौतुक होते! ठीक आहे. नेपाळचा राजा हिंदू होता, तसा कोल्हापूरचा राजा हिंदू होता. कोल्हापूरच्या राजाने बहुजन समाजाच्यासाठी वसतिगृहे, शाळा, नोकऱ्या यांची खास सोय केली होती. तसे अस्पृश्यांच्यासाठीही कोल्हापूरचे शाहू महाराज झटत होते. कोल्हापूरचा राजा ब्राह्मणविरोधी असेल (असलाच तर) पण तो हिंदूविरोधी नव्हता, शिवाजीचा वंशज होता. हिंदुत्ववाद्यांना या राजाविषयी प्रेम का वाटले नाही? नोकरी म्हणजे सेवा, ही तर शूद्रांच्यासाठी म्हणून सांगितलेली. ब्राह्मणांच्या नोकऱ्या कमी करणारा कोल्हापूरचा राजा ब्राह्मणांना सुखासुखी शूद्र होऊ देत नाही म्हणून तर हिंदुत्ववाद्यांचा जास्त आवडता व्हावयास पहिजे होता, पण तसे घडलेले दिसत नाही!

लोकशाहीबद्दलचे पूतनाप्रेम!
सनातन्यांचा धर्म आध्यात्मिक असतो व त्यांचा आत्मा सर्वत्र एकच असतो. पण ही आत्म्याची एकता व आध्यात्मिकता बायका पुनर्विवाह करू लागल्या की भंगते! तसेच हिंदुत्ववादी राजकारणाचे! या हिंदुत्ववादी राजकारणाला प्राचीन भारताच्या गौरवशाली महान इतिहासाचे प्रेम असते. या मंडळींना भारतीय संस्कृती जपावयाची असते. या संस्कृतिसंगोपनाच्या कार्यात भांडवलदारांनी यंत्रोद्योगांच्या जोरावर सगळे ग्रामीण जीवन दरिद्री व उद्ध्वस्त केले तरी अडथळा येत नाही. मात्र कुळकायद्याने भारतीय संस्कृतीचा भंग होतो! हरिजनांना शिकण्याच्या सवलती असल्या की संस्कृती दुखावते! बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले की मग तर भारतीय संस्कृतीचा आत्माच लोप पावतो. सगळ्या राजेशाहीचा, जमीनदारशाहीचा गुणगौरव करणाऱ्या या संस्कृतीवाल्यांनी अचानक लोकशाहीप्रेमी व्हावे आणि इंदिरा गांधी देशात हुकूमशाही आणीत आहेत म्हणून ओरडावे, हे हास्यास्पद नाही का? यांचे लोकशाहीप्रेम अचानक इतके उचंबळून का येते?

ही लाजिरवाणी परंपरा
या देशातील हिंदुत्ववाद नेहमीच या देशातील हिंदू जनतेचा द्रोह करत आला आहे, आणि असे घडणे अपरिहार्यच होते. हिंदुत्ववादाला हिंदू धर्माचे प्रेम आहे. हा धर्म ज्या जनतेने सहस्रावधी वर्ष प्रेमाने व निष्ठेने जतन केला त्या जनतेचे प्रेम नाही! कारण सगळेच धर्म राजेशाहीच्या, सरंजामशाहीच्या वातावरणात विकसित होतात, तसे हिंदू धर्माचेही स्वरूप आहे. जगात कुठेही जरी आपण गेलो तरी सरंजामशाही विषमता व माणसाची गुलामगिरी यावरच आधारलेली असते. हिंदुस्थानचेही चित्र यापेक्षा निराळे नव्हते. या देशात इतिहासाचा पुरावा सापडतो तेव्हापासून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत जनावरांचे आठवडी बाजार भरावेत तसे माणसांचे बाजार भरत असत. आणि या बाजारांच्यामधून राजरोस स्त्री-पुरुषांची खरेदी विक्री होत असे. राजे-रजवाडे आणि जमीनदार यांना देव-देवळे आणि धर्म यांची गरज असे. या सर्व सरंजामदारांनी दासी, बटकी, कळावंतिणी, नर्तिका, वेश्या, देवदासी यांचा एक प्रचंड ताफाच्या ताफा, राजवाड्यातील राजे आणि देवळातील देव यांच्या मनोरंजनार्थ निर्माण केला होता! धर्माच्या नावाखाली मध्ययुगीन भारतात केवढा व्यभिचार चालू असे याचे पुरावे मठात जमणाऱ्या वैष्णवी, भैरवी आणि रस्त्यातून भोगभिक्षा मागत हिंडणाऱ्या योगिनींच्या तांड्यांतून वाटेल तितके मिळतात. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी प्राचीन विक्रमशीला विद्यापीठाचा अभ्यासक्रम चाळून पाहावा. रतिक्रीडा शिकवणे हा या विद्यापीठात अभ्यासक्रमाचा भाग होता!
 
नव्वद टक्क्यांच्या गुलामीवर उभी राहिलेलो संस्कृती 
प्राचीन भारतात कालिदास आहे, शंकरराचार्य, कबीर, ज्ञानेश्वर आहेत. चंद्रगुप्त, शिवाजी, राणा प्रताप आहेत. अजिंठा, वेरूळ वाणि मीनाक्षीसुंदरम् आहेत. या सगळ्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आणि अभिमान आहे. कारण ही माझ्याच संस्कृतीची विजयगाथा आहे. पण हा अभिमान असला म्हणजे जे सडके, गलिच्छ आणि गुलामगिरीचे जीवन त्या संस्कृतीने निर्माण केले होते त्याहीविषयी अभिमान वाटावा, याचे मला काहीच कारण दिसत नाही! ज्यांचे हितसंबंध या संस्कृतीने सांभाळले होते त्यांनी ती मेली म्हणून खुशाल आक्रंदन करावे. पण ज्या नव्वद टक्के लोकांच्या दारिद्र्य व गुलामगिरीवर ही संस्कृती उभी होती त्या गुलामांनीही या संस्कृतीविषयी प्रेम व अभिमान बाळगावा असे म्हणण्याचा आपल्याला काय हक्क आहे? माणसांचे बाजार चालू असणाऱ्या मध्ययुगाविषयी अभिमान जर बाळगण्यास आपण कुणब्यांना सांगणार असू तर मग भारताला गुलाम करणाऱ्या, लुटालूट व अत्याचार करणाऱ्या घोरी, खिलजी आणि इंग्रज राजवटीविषयी तेवढाच अभिमान ब्राह्मणांनी बाळगायला काय हरकत आहे? बुटाची लाथ स्वकीयांनी मारली म्हणजे ती मखमली होते आणि परकीयांनी मारली म्हणजे मात्र ती लोखंडी होते, असा फरक लाथ खाणाऱ्याला कसा करता येईल? गुलामांना बेड्या घालणारे आपलेच बंधुजन आहेत याचे समाधान काय म्हणून वाटावे?

राजकीय लढ्यांत सामाजिक समतेचा आशय
म. गांधींनी राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्याला सामाजिक समतेचा आशय दिला आणि या लढ्यांत अस्पृश्यांना, आदिवासींना, बहुजन समाजाला दाखल करून घेतले. या लढ्याला गांधीजींनी सामाजिक समतेचा आशय दिला व या लढ्यात शेतकरी व मजूर दाखल करून घेतले. गांधीजींनी खेड्याखेड्यांतून स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत केली हे खरे आहे. पण हे कार्य करणे त्यांना काय म्हणून जमले? गांधीजी समाजवादी होते की नव्हते याची चर्चा करणे व्यर्थ आहे. गांधींच्या चळवळीत असणाऱ्या चंपारणातील शेतमजुरांनी आणि बार्डोलीच्या शेतकऱ्यांनी या चळवळीत स्वतःच्या उद्धाराची हमी पाहिली. मुंबईच्या, सोलापूर-अहमदाबादच्या मजुरांनी या चळवळीत नवी आशा पाहिली, ही घटना खरी महत्त्वाची आहे.

माणसासाठी पोथ्या पोथ्यांसाठी माणूस नव्हे!
भारतात हिंदूंची प्रचंड बहुसंख्या असल्यामुळे राजकीय स्वातंत्र्यामुळे हिंदू स्वतंत्रच होणार होते. अस्पृश्योद्धाराच्या चळवळीमुळे हिंदूंनाच माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त होणार होता. गांधींनी राजकीय स्वातंत्र्याची जी चळवळ निर्माण केली तिच्या पोटात हिंदूंच्या सर्व सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धाराच्या आकांक्षा सामावलेल्या होत्या. ही भूमिका घेऊनच गांधींना खेड्यांपर्यंत जाणे शक्य होते. ही भूमिका असली तरच कोट्यवधींच्या मनांत स्वातंत्र्याची आकांक्षा जागी करता येत असते. धर्माच्या पोथ्या सांभाळून धरण्यासाठी, ज्यांच्या कल्याणासाठी या पोथ्या आहेत, त्यांच्या चिता पेटवाव्या हा एक मार्ग असतो. हिंदू माणसाच्या संरक्षणासाठी धर्माच्या पोथ्या गुंडाळून ठेवाव्यात हा दुसरा मार्ग असतो. गांधी हिंदू जनतेच्या वतीने उभे राहिले. सगळे हिंदुत्ववादी या हिंदू जनतेच्या कळत न फळत विरोधी उभे राहिले! खरे म्हणजे वरिष्ठ वर्ग धर्माचा नेहमी सोयीस्कर अर्थ लावत असतो. आमच्या धर्माने ब्राह्मणांना इस्टेट ठेवण्याचीही परवानगी दिलेली नाही, नोकरी करण्याचीही परवानगी दिलेली नाही. खोती, सावकारी आणि शासनातील सर्व थरांच्या मिळून ऐंशी टक्के नोकऱ्या ताब्यात ठेवणे हे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे, किंवा हा त्यांचा हक्क आहे, असे कोणत्याही स्मृतीत लिहिलेले दिसत नाही! वरिष्ठ वर्ग आपले हितसंबंध सांभाळताना पोथ्या पायदळी घालतोच, सर्वसामान्य जनतेच्या उद्धाराचे कार्यक्रम हे मात्र पोथ्यांनी मान्य केलेले असावेत अशी या वर्गाची इच्छा असते!! हिंदुत्ववादी राजकारण पोथ्यांच्या बाजूने उभे राहताना वरिष्ठवर्गीय राजकारण झाले.

 जे धर्माचे रक्षण करतात त्यांचे धर्म रक्षण करतो, असे पोथीत लिहिलेले असते. जर राजे आपल्या राज्याचे रक्षण करू शकले तर राजे आणि प्रजा यांचा धर्म सुरक्षित राहतो, हे इतिहासाचे सत्य आहे. हिंदू माणसे जगली तर हिंदू धर्म जगतो. हिंदू माणसांच्या जगण्याला हिंदू धर्माने हातभार लावला तर हिंदू माणसे हिंदू धर्म प्रेमाने जगवतात, हे समाजाचे सत्य आहे. गांधींनी हिंदू जनतेच्या सर्व कार्यक्रमांच्या मागे हिंदू परंपरेचा आशीर्वाद उभा करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माच्या नावे उभे असणाऱ्यांनी हिंदू जनतेच्या जीवनाला विरोध करून हिंदू धर्माचा द्वेष उत्कटतेने करण्याची शिकवण दिली! मुसलमानांच्या तरवारी आणि धार्मिक अत्याचार जे सातशे वर्षांत करू शकले नाहीत, इंग्रजांच्या आधुनिक विद्या जे शंभर वर्षांत करू शकल्या नाहीत, ते कार्य हिंदुत्ववादी शक्तींनी पन्नास वर्षात सफल केले!! हिंदुत्ववाद्यांची इच्छा होती: हिंदूंनी मुसलमानांचा, इंग्रजांचा द्वेष करावा. प्रत्यक्षात घडले ते इतकेच की, या जनताद्रोही राजकारणाच्या परंपरेने हिंदू लोकांना हिंदू धर्माचा द्वेष करण्यास शिकवले!

यांच्याबद्दल आदर कसा वाटावा?
कोणता धर्म सरंजामशाहीशी एकरूप झालेला नव्हता? सगळेच धर्म तसे होते. ख्रिश्चन धर्माने तर ख्रिस्ती जनतेवर जेवढे अत्याचार मध्ययुगात केले तेवढे एकाही धर्माने आपल्या अनुयायांवर केले नसतील. पण आजचा ख्रिश्चन माणूस ख्रिस्ती धर्मद्वेष्टा नाही. तो धर्मश्रद्ध असो की नसो, त्याला धर्म अनावश्यक वाटेल, पण त्याचा द्वेष वाटणार नाही. कारण ख्रिस्ती धर्माने शाळाही चालवल्या, दवाखाने, अनाथालये, जनसेवा यांच्या भव्य परंपराही चालवल्या. हिंदू धर्मात अशी आपल्या जनतेची सेवा करण्याची परंपराच नव्हती. शंकराचार्यांचे मठ संस्कृत पाठशाळाही धड चालवू शकले नाहीत, मग त्यांनी इतर कार्य काय करावे? आमचे धर्मगुरू पारतंत्र्याच्याही विरोधी उठू शकले नाहीत. जे कधी स्वातंत्र्यवादी नव्हते, समतावादी तर नव्हतेच, सेवावादीही नव्हते त्यांच्याविषयी कुणाला आदर वाटावा तरी कसा?

गोळवलकर गुरुजींची भूमिका कोणती?
हिंदुत्ववादी राजकारणाची ही मीमांसा गोळवलकरांना मान्य आहे काय? गांधींना राष्ट्रपिता मानण्याचे खरे कारण हे आहे. त्यांची मते बरोबर किंवा चूक असतील. त्यांनी देशातील जनतेचा स्वार्थ आणि देशाचा स्वार्थ एकजीव करून राष्ट्र उभे करण्यासाठी राष्ट्रातील कोट्यवधी लोक पेटवून जागे केले. पण हे वाक्य खरे असायचे तर स्वातंत्र्यलढा, मुस्लिम प्रश्न, अहिंसावाद, हिंदुत्व या सर्वच प्रश्नांच्या बाबत फेरविचार करावा लागेल. विचार करण्याची गेल्या पंचवीस वर्षांतील दिशाच मुळात चुकली असे समजून नव्या पद्धतीच्या चिंतनाला सामोरे जावे लागेल. गोळवलकर गुरुजी यातील काहीच करू इच्छिणार नाहीत. कारण त्यांचा कार्यक्रम पूर्वी स्वातंत्र्य लढ्याबद्दल उदासीन राहून संघटना बांधण्याचा होता, आता सामाजिक क्रांतीबद्दल उदासीन राहून राष्ट्र बळकट करण्याची त्यांची इच्छा आहे! गांधी मरून वीस वर्षे झाली, पण अजून समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेचे रहस्य गोळवलकरांना पटलेले दिसत नाही. एक वस्तुस्थिती अशी आहे की जलद गतीने समाजपरिवर्तन घडणे ही आज राष्ट्रवादाची गरज बनली आहे. 

जलद गतीने परिवर्तन करण्यात जर आपल्याला यश आले नाही तर इंडोचीनप्रमाणे या देशातील काही भाग कम्युनिस्टांच्या ताब्यात जाईल, उरलेला भाग लष्करी हुकूमशाहीच्या ताब्यात जाईल. छोट्या इंडोचीनचे चार तुकडे उडाले. मद्रास, केरळ, काश्मिर, पंजाब, बंगाल आाणि उरलेला भारत असे राहिलेल्या देशाचे सात-आठ तुकडे उडतील. भारताला राष्ट्र म्हणून टिकावयाचे असेल तर शुद्ध राष्ट्रवादाची गरज म्हणूनसुद्धा मूलगामी समाजपरिवर्तन अत्यावश्यक झालेले आहे. ही बाब ज्यांना अजून पटत नाही त्यांनी महात्मा गांधींना प्रातःस्मरणीय म्हटले काय की सायंविस्मरणीय म्हटले काय, दोन्हीलाही सामाजिक प्रवाहात अर्थ नसतो.

गोळवलकर गुरुजींना कोणते गांधी हवेत?
गांधीजींचे राष्ट्रपितेपण सोडून दिले तरी अजून पुष्फळ गोष्टी शिल्लक राहतात. खादी ग्रामोद्योग, भूदान, ग्रामपंचायती, मोठ्या यंत्रांना विरोध, ब्रह्मचर्य, मौन इ. अनेक बाबी गांधीजींशी संबंधित आहेत. तसे पाहिले तर गांधींपेक्षा विनोबा हिंदुत्ववाद्यांना फार जवळचे वाटावे. वेद, उपनिषदे, गीता, शंकराचार्य या वर्तुळांतूनच विनोबा बोलतात. या सर्व ग्रंथांचा ते भूदानाला पाठिंबा मिळवतात. गोरक्षण हाही गांधीजींचा कार्यक्रम होता. गांधीजींच्या राष्ट्रपितेपणाशी या बाबींचा काही संबंध नाही. या बाबी गांधीजींच्या जीवनात असत्या काय आणि नसत्या काय, गांधींना भारतीयांनी राष्ट्रपिताच मानले असते. यातील गोहत्याबंदी सोडल्यास गोळवलकरांना इतर काही पटलेले दिसत नाही! हिंदू धर्मावरील गाढ विश्वास आणि गोहत्या बंदी एवढाच गोळवलकरांना गांधीजींचा खराखुरा मोठेपणा वाटत असावा असे दिसते. त्यातही पुन्हा दोन बाबी आहेत: गांधीजींची भूमिका गोवंशाच्या विकासातून गोहत्याबंदीकडे जाणारी होती. ते कायद्याच्या गोवधबंदीला विरोधी होते. गोळवलकरांना गोरक्षणावर गांधी अप्रमाण, तो फक्त गोहत्याबंदीवरच प्रमाण आहे! हिंदू धर्म मुळातच अत्यंत उदार आणि व्यापक आहे, म्हणून गांधीजी उदार व व्यापक झाले असे गुरुजींचे म्हणणे आहे. यातील हिंदू धर्माच्या मूलभूत उदार असण्यासंबंधी एकदा पुन्हा विचार केला पाहिजे. सहिष्णुता आणि औदार्य याबद्दल हिंदू धर्माची फार स्तुती केली जाते. इतरांना आपल्या धर्मात घेण्याची हिंदूंची प्रथा नाही. त्यामुळे हिंदू धर्म सहिष्णू वाटतो, इतकेच त्यातील सत्य आहे. हजार-हजार वर्षे उभे गंध लावणारे गंध उभेच लावतात, आडवे गंध लावणारे गंध आडवेच लावतात. अत्यंत कर्मठ, असहिष्णू, परंपरावादी आणि इतरांच्या अस्तित्वाविषयी कमालीचे उदासीन असणारे शे-दीडशे गट असे हिंदू धर्माच्या उदार सहिष्णुतेचे खरे रूप आहे! या हिंदू धर्माच्या श्रद्धेतून गांधी उदार होत नसतो. धर्मश्रद्धा जर माणसाला उदार करती तर सारे हिंदुत्ववादी प्रामुख्याने उदारमतवादी झाले असते. गोळवलकरांच्या विवेचनात सत्याची थोडी उलटापालट झाली आहे! सत्य असे आहे की, गांधी उदारमतवादी होते म्हणून त्यांनी हिंदू धर्म उदार करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्म नेहमीच अनुदार व उदासीन असल्यामुळे हिंदुत्ववादी प्रश्नांच्याविषयी उदासीन राहिले, गांधींविषयी अनुदारपणे बोलले, व त्यांनी या महात्म्याला धर्मभ्रष्ट म्हणून विरोध केला!

उद्बोधक संवाद 
गांधी समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी एक मोठी चांगली गोष्ट गांधींच्या चरित्रात आहे. त्या गोष्टीचा उल्लेख करून हे विवेचन मी संपवतो. गांधीजी रवीन्द्रनाथ टागोरांच्या भेटीसाठी शांतिनिकेतनमध्ये गेले होते. रवीन्द्रनाथांच्या मनात स्वातंत्र्याविषयी आस्था असली तरी खादी ग्रामोद्योगाचे प्रेम फारसे नव्हते. सकाळच्या वेळी गुरुदेव टागोर आणि गांधीजी फिरत होते. वेळ सूर्योदयाची होती. पूर्वेला लाल रंग पसरत होता. पाखरे आनंदाने किलबिलत होती. कवी म्हणाले, "गांधीजी, या सौंदर्याला, या आनंदाला तुमच्या तत्त्वज्ञानात काही जागा आहे काय?" राष्ट्रपित्याने उत्तर दिले, "निश्चितच जागा आहे. सूर्योदयाचे रमणीय रंग पाहून पाखरांनी गाणी गावी यासाठीच तर माझे तत्त्वज्ञान आहे. मात्र तुम्ही सूर्योदयाच्या वेळी गाणारी पाखरे पाहता. मी सूर्योदयाच्या वेळी पाखरांना गाण्याची इच्छा व्हावी म्हणून सायंकाळी ती पोटभर जेवून झोपलेली असावीत याचीही काळजी घेतो.” 

 


वागण्या-करण्यात सारखेपणा असणे म्हणजे सामायिकता असणे नव्हे. इतरांशी सामायिक मालकी प्रस्थापित करायची तर त्यासाठी वाटून उपभोगण्याची वृत्ती असली पाहिजे आणि सर्व घटकांत समनुयोग असला पाहिजे. समाजाचे अस्तित्व घटकांमधील परस्पर समनुयोगावरच अवलंबून असते. समनुयोगाशिवाय समाजाला अस्तित्वच नसते. केवळ इतरांच्यासारखे वागणे समाजाच्या अस्तित्वासाठी पुरेसे नाही. समान्तर राहून समान क्रिया केल्या तरी समाज बांधला जात नसतो. यासाठी आवश्यक आहे तो सहभोग आणि सहक्रिया सहभोग आणि सहक्रिया असेल तर समाजघटकांचे भावजीवन एकरूप घडत जाते आणि ते इतरांमध्येही विस्तार पावते. व्यक्तीला सामायिक कार्यात भागीदार बनवले की त्या कार्याचे यश हे तिला स्वतःचेच यश वाटते, अपयश हे आपलेच अपयश वाटते. यातूनच समाज या संस्थेचा उदय होत असतो. जातिप्रथा अशा सामायिक कार्याला प्रतिबंध करते आणि सामायिक कार्याला ती खो घालीत असल्याने हिंदूंना ती समाज हे रूप घेऊ देत नाही. त्यामुळे एकजीवपणा आणि एकमानस त्यांच्यात अस्तित्वातच येत नाही. त्यामुळे ज्याला आपण हिंदू म्हणतो ती फक्त एक गर्दी असते. जाती-पोटजातींचा तो एक मेळा नसतो, परस्परांवर शस्त्र परजलेल्या गटांचा तो एक समुदाय असतो! प्रत्येक गट स्वतःच्याच पायापुरते पाहतो आणि स्वतः साठीच झटत असतो. 
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
‘अनहिलिशन ऑफ कास्ट’ वरून

 

Tags: वेद-उपनिषदे शंकराचार्य कम्युनिझम विनोबा भावे राजर्षी शाहू महाराज हिंदू हरिजन स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववाद रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक भारतरत्न अध्यात्मिक राजकारण महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर द्रोह अस्पृश्य इंग्रजी राजवट परंपरा नरहर कुरुंदकर महात्मा गांधी गोळवलकर ved-upnishad Shankaracharya communisam Vinoba Bhave rajarshi Shahu Maharaj Hindu Harijan Swatantra Veer Savarkar Hinduism ravindranath tagor Lokmanya Tilak spiritual politics Bharat Ratna Karve Mahatma Phule Babasaheb Ambedkar Rebel Schedule Caste British ruler tradition Mahatma Gandhi Golwalkar narhar kurundkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नरहर कुरुंदकर ( 68 लेख )

1932 - 1982

विचारवंत लेखक, समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी