डिजिटल अर्काईव्ह

तथाकथित मान्यवर समीक्षकांचे लिखाण कित्येक वेळी हास्यास्पद होऊन बसते. स्वतःचे ऋणानुबंध, मराठी रंगभूमीचा इतिहास, स्वतःचे वाचन, अफाट सामान्य ज्ञान या सगळ्या गोष्टींचा एका परीक्षणात समावेश वाचकांवर (कारण कंटाळवाणी लांबी) तसेच संबंधितांवर (कारण मर्मज्ञ टीकेचा अभाव) अन्याय करणारा ठरतो.

राज्य नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी सुरू होत आहे. शेवटची बाजी मारणारी नाटके हल्ली धंदासुद्धा बऱ्यापैकी करू शकतात! साहजिकच संस्थांना स्थैर्य प्राप्त होते. आवाक्याबाहेरच्या म्हणून सोडून दिलेल्या योजना पुन्हा एकदा आखणे शक्य होते. वरच्या क्रमांकाच्या नाटकांनी कलात्मक दर्जा राखलेला असावा ही रास्त अपेक्षा. यंदाची सर्वांत मोठी आशास्थाने- ‘दंभद्वीपाचा मुकाबला’, ‘ग्रँड रिडक्शन सेल’ आणि ‘वल्लभपुरची दंतकथा’ ही नवी नाटके अजून मुंबईबाहेर पडलेली नाहीत. स्पर्धेत जुनी नाटकेही सादर होत असली तरी ताज्या दमाच्या दिग्दर्शक आणि कलावंताची नव्याने ओळख होते. म्हणूनच स्पर्धांकडे अपेक्षेने पाहायचे.

हौशी रंगभूमीकडून नित्य नव्या प्रयोगाची साहजिक अपेक्षा असते. असे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर होतात तेव्हा कुतूहलाने पाहिले जाते. रंगधाराने ‘गुरु महाराज गुरु' ही एक तरबेज तडजोड सादर करून अपेक्षा उंचावल्या आहेत. अशा हौशी नाटघसंस्था त्यांच्या आर्थिक मर्यादा सांभाळून ही चांगली नाटके देऊ शकतील.

पुण्यात, महाराष्ट्र कलोपासकचे वर्षभर बंद पडलेले उपक्रम यंदा सुरू होतील असा अंदाज आहे. पी. डी. ए. ने अपराधी, देव चालले, स्वप्न मानवाचे, आणि जादूगार हो चार अपयशे लागोपाठ संपादली! या दोन्ही संस्था चांगल्या स्थिरावल्या आहेत. परंतु केवळ 'तंत्र आणि सराईत सफाई यांच्या भांडवलावर उभे राहण्याचा त्यांचा अट्टाहास नव्या दृष्टीची उणीव, नडते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी निराशाच केली. निर्मितीमूल्ये सांभाळली गेली, पण नव्या नाटकांचे लेखन- प्रायोगिक सोडाच-साधे रंजकही नव्हते. नव्या टॅलेंटचा शोध आणि वापर व्हायला हवा. तडजोड- फॉर्म्युल्याच्या शोधात चाचपडणे संपावे. 

सरकारी स्पर्धांमुळे किंवा एकूण उत्साहामुळे म्हणा, गावोगाव सालोसाल अॅक्टिव्हिटी वाढते आहे. ग्रामीण विभागांतून होणाऱ्या नाटकांचा दर्जाही हळूहळू सुधारतो आहे. परंतु अजून खूप मजल गाठायची आहे. खूप मेहेनत, खूप प्रामाणिक प्रयत्न हवे आहेत. दुर्दैवाने, आज तरी लहान गावांतील संस्था कॉलेजमधली 'धडपडणारी मुले’ यांना मार्गदर्शन करू शकेल अशी नाट्यप्रशिक्षण संस्था अस्तित्वात नाही. फिल्म इन्स्टिटयूटच्या धर्तीवर एखादी शाळा यशस्वीपणे चालेल इतपत व्यावसायिक स्थैर्य आहे किंवा नाही हे ठरायचे आहे. तरीही समर कोर्ससारखे उपक्रम नियमितपणे चालवणारी संस्था सुरू होणे अगत्याचे आहे. या बाबतीतही शासनाने पुढाकार घ्यावा ही अपेक्षा.

व्यावसायिक रंगभूमीवरील हालचालींना पूर्वी कधीही नव्हता एवढा वेग आला आहे. धंद्याचा आकार फुगतो आहे आणि ओघानेच 'कमर्शियल’ गोष्टींवर लक्ष केंद्रित झाले आहे. तोच कौटुंबिक मसाला, जोडीला पोरकट किंवा पाणचट विनोद. वयस्कर नटनट्यांचा भडक अभिनय, झकपक सेट्स, अवाढव्य जाहिरात... मद्रासी चित्रसृष्टी अवतरल्याचा भास उत्पन्न करणारी अशी परिस्थिती आहे! मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर आणि वसंत कानेटकर हे आजचे आघाडीचे 'नाटककार'. गुणवत्तेने सरस नाटकांची अपेक्षा आता ठेवायची नाही. प्रेक्षकांचा उत्साह अमाप, आश्रय उदार. फक्त कंपनी चालक आणि ठेकेदार यांच्याकडून थोड्याफार सचोटीची अपेक्षा. निदान, आश्रयदात्यांच्या अनंत गैरसोयींपैकी काहींचे तरी निवारण व्हावे. छानसे कथानक, सुसह्य अभिनय आणि आटोपशीर आकार असलेली संगीत नाटके ही स्वागतार्ह ठरतील. तसा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. नव्या गायक-नट, संगीतकारांनी हे आव्हान पेलायचे आहे. ललित कला दर्शचे नवे नाटक ‘रंगात रंगला श्रीरंग' औत्सुक्य वाढवणारे आहे. 

आकाशवाणीच्या धोरणातही चैतन्य आणणे आवश्यक झाले आहे. रंगभूमीवरील नाटकांच्या आवृत्त्याच नव्हे तर खास रेडिओसाठी नाटके लिहवून घेऊन मोठ्या संख्येने सादर व्हायला हवीत. नव् लेखक, नट, दिग्दर्शक पुरवण्याच्या कामात आकाशवाणीनेही सहभागी व्हायला हवे. आंतर महाविद्यालयीन स्पर्धांत यशस्वी ठरणाऱ्या एकांकिका, नाटके, यांना 'नभोवाणी’ वर संधी दिली गेली पाहिजे. तूर्त, कंटाळवाण्या, चाकोरीबद्ध श्रुतिकांचा साचा बदलण्याची तत्परता आकाशवाणीने दाखवावी.

आणि शेवटी, समीक्षक! ‘राइट अप्'ची रुळलेली प्रथा संपुष्टात यावी, अशी वेडी आकांक्षा मी धरत नाही. तरीही एका वजनदार वृत्तपत्रातली परीक्षणे त्याच वाटेने चालू लागल्याचे पाहताना निश्चितच वाईट वाटते. कम-दर्जाच्या गोष्टींची शिफारस करताना आपलाच दर्जा घसरतो याची जाणीव कटाक्षाने ठेवायला हवी!

तथाकथित मान्यवर समीक्षकांचे लिखाण कित्येक वेळी हास्यास्पद होऊन बसते. स्वतःचे ऋणानुबंध, मराठी रंगभूमीचा इतिहास, स्वतःचे वाचन, अफाट सामान्य ज्ञान या सगळ्या गोष्टींचा एका परीक्षणात समावेश वाचकांवर (कारण कंटाळवाणी लांबी) तसेच संबंधितांवर (कारण मर्मज्ञ टीकेचा अभाव) अन्याय करणारा ठरतो. सुटसुटीत, प्रामाणिक आणि तज्ज्ञ अशा समीक्षणाची अपेक्षा आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जसे नवे संकल्प सोडायचे तशाच आकांक्षाही बाळगायच्या. मराठी रंगभूमीला परंपरा आहे, ती जपण्याची जबाबदारी सर्वांवर आहे; परंतु याचा अर्थ मळलेली पाऊलवाट सोडायचीच नाही असा नव्हे. जनसामान्यांची अभिरुची हा एकच तपमापक नाही. त्याला चिकटून राहण्याने परंपरा जतन होईल, पण संपन्न होणार नाही. त्यासाठी अधिक डोळस प्रयत्न आणि जाणीव हवी.

Tags: समीक्षक नभोवाणी आकाशवाणी ललित कला दर्श वसंत कानेटकर बाळ कोल्हटकर मधुसुदन कालेलकर व्यावसायिक रंगभूमी महाराष्ट्र कलोपासक रंगधारा हौशी रंगभूमी दिग्दर्शक राज्य नाट्य स्पर्धा प्रभाकर करंदीकर reviewer nabhovani aakashvani lalit kala darsh vasant kanetkar bal Kolhatkar Madhusudan kalelkar professional theater Maharashtra kalopasak rangadhara experimental theater director state drama competition Prabhakar karandikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रभाकर करंदीकर ( 9 लेख )

भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत राहिलेले प्रभाकर करंदीकर हे विभागीय आयुक्त, पुणे या पदावरून निवृत्त झाले आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी