“आपण आपल्या कार्यात केव्हाही पुढे असलो तरी भावनात्मक ऐक्य वाढवण्याचा नित्यनिरंतर प्रयत्न केला पाहिजे. त्याचीच देशाला अत्यंत आवश्यकता आहे. समग्र भारत हा विविध भाषा, जातीचा असला तरी आपली संस्कृती एक आहे. आपण एक राष्ट्राचे नागरिक आहोत व त्यासाठी प्रामाणिक राहून या देशात स्वतंत्रता, बंधुता व समता नांदवण्याचा भरीव प्रयत्न केला पाहिजे,” असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सांगितले.
यंदाचे बृहन्महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन मुंबईला साने गुरुजी विद्यालयात संपन्न झाले. या अधिवेशनात परिषदेच्या ध्येयधोरणानुसार साकल्याने विचारविनिमय झाला. बृहन्महाराष्ट्रीयांच्या समस्या व त्यावर उपाय, हा चर्चेचा मुख्य विषय होता. त्याबद्दल आपापले विचार, सूचना प्रतिनिधींनी मांडले, विचारवंतांनी मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्री श्री. मधुकरराव चौधरी व अॅड. सुशील कवळेकर यांनी आपल्या भाषणांत प्रतिनिधींना मोठा दिलासा दिला. महाराष्ट्र सरकार बृहन्महाराष्ट्रीयांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा अवश्य प्रयत्न करील, असे शिक्षणमंत्री म्हणाले. मराठी माणसाने जास्तीत जास्त लोकसंपर्क वा अधिकात अधिक मिसळून त्या त्या प्रदेशातील लोकांत भातृत्वाचे जिवंत संबंध जोडावेत, आणि त्यानंतर आपणास कोणत्याही प्रकारची समस्या राहणार नाही, असे श्री. सुशील कवळेकर म्हणाले. आपण समरस झाल्याविना, त्या त्या प्रदेशातील भाषा आत्मसात केल्याशिवाय आपले ध्येय सफल होणार नाही असे उद्गार त्यांनी काढले.
महाराष्ट्रीयांना देशातील राजकीय परिस्थितीमुळे बरेचदा त्रास होतो असा अनुभव काहींनी सांगितला. शिवसेनेच्याबद्दल परप्रांतात जे समज-गैरसमज आहेत त्याबद्दल उल्लेख केला गेला व शिवसेनेच्या आंदो- लनाचा परिणाम बृहन्महाराष्ट्रीयांना भोवल्याशिवाय राहात नाही, असेही काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.
बृहन्महाराष्ट्रीयांनी त्या त्या प्रदेशातील जनतेशी मिसळून, त्यांची भाषा आत्मसात करून सांस्कृतिक संबंध जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. तेथील साहित्यातही त्यांनी स्थान मिळवले आहे, असे डॉ. ह. रा. दिवेकर यांनी सांगितले. आम्ही बुद्धिवादी आहोत, परंतु अधिकारपदांसाठी वा उच्च नोकरी करण्यासाठीच प्रयत्न करणे आजच्या चंद्रयुगात चुकीचे आहे. आपण तंत्र-विज्ञानात प्रगत व्हायला शिकले पाहिजे व निरनिराळे शोधबोध घेऊन त्यांत अग्रेसर व्हायला हवे असे केंद्रीय मंत्री श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी समारोपप्रसंगी उद्गार काढले. उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व बृहन्महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव नाईक यांनी “आपण आपल्या कार्यात केव्हाही पुढे असलो तरी भावनात्मक ऐक्य वाढवण्याचा नित्यनिरंतर प्रयत्न केला पाहिजे. त्याचीच देशाला अत्यंत आवश्यकता आहे. समग्र भारत हा विविध भाषा, जातीचा असला तरी आपली संस्कृती एक आहे. आपण एक राष्ट्राचे नागरिक आहोत व त्यासाठी प्रामाणिक राहून या देशात स्वतंत्रता, बंधुता व समता नांदवण्याचा भरीव प्रयत्न केला पाहिजे,” असे सांगितले. श्री. माडगुळकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी संस्कृतीचे दर्शन घडवून ती किती व्यापक आहे याची अनेक ऐतिहासिक उदाहरणे सांगून आठवण दिली व बृहन्महाराष्ट्रीयांच्या कर्तृत्वाला आवाहन केले. “आपण शिक्षण, साहित्य, कला आदी सांस्कृतिक क्षेत्रांत सदैव अग्रेसर आहोत त्या दृष्टीने आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचा अखंड प्रयत्न केला पाहिजे" असे ते म्हणाले. बृहन्महाराष्ट्रीयांनी यापुढे सतत भावात्मक एकतेच्या राष्ट्रीय धोरणाला अनुसरून आपल्या समस्या आपणच सोडवल्या पाहिजेत, व स्थानिक बंधूचे व सरकारचे साहाय्य घेतले पाहिजे. नव्या वर्षासाठी नवी कार्यकारिणी या परिषदेत निवडण्यात आली व तिची पहिली बैठक पण घेण्यात आली. बालवाङ्मय भरपूर प्रमाणात मिळावे व मुलांना उपयुक्त अशा मराठी साहित्याबरोबर वक्ते- कलाकार आदी महाराष्ट्रातून यावेत असे परिषदेचे सचिटणीस श्री. मुळगुंद यांनी सांगितले.
परिषदेच्या सर्व प्रतिनिधींची सुंदर व्यवस्था डॉ. बी. जे. पाटील, पावसकर, श्री. प्रकाश मोहाडीकर, व श्री. राम मोहाडीकर यांनी ठेवली. त्यामुळे सर्व प्रतिनिधी अत्यंत खुशीत होते.
Tags: संस्कृती माडगूळकर मुख्यमंत्री वसंतराव नाईक शिक्षण मंत्री मधुकर चौधरी साने गुरुजी विद्यालय बृहन महाराष्ट्रीयनांच्या समस्या बृहन महाराष्ट्र परिषद संमेलन प्रभाकर पाटील culture madgulkar chief minister vasantrao Naik sane Guruji education minister madhukar choudhari Problems of Brihan Maharashtrian Brihan Maharashtrian parishad session Prabhakar patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या