डिजिटल अर्काईव्ह

वास्तविक बादशहाखान यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे सात्विक संतापाने उच्चारलेले सावधानतेचे शब्द ऐकण्यासाठी मुंबईची जनता पुन्हा एकदा आझाद मैदानाला भरतीच्या सागराची कळा आणून देईल असे मला वाटले होते. पण हाय! त्यांच्या नागरी सत्काराला जेमतेम दहा हजार मंडळी होती. 'गांधीजींचा रस्ता तुम्ही सोडला आहे' हे त्यांचे उद्गार त्या सभेतील उपस्थितीनेही खरे करून दाखवले!

मुंबई 

चाकावर जगणारा अशी मुंबईच्या माणसाची व्याख्या केली तर ती चुकीची ठरू नये! इथे चाक याचा अर्थ बस, लोकल, टॅक्सी यांतून भटकणारा एवढाच मला अभिप्रेत नाही. सगळ्या मुंबईच्या जनतेला एका राक्षसी चाकावर बसवण्यात आले असून ते फिरत आहे आणि शून्य मनाने त्या जनतेने समोरची दृश्ये फक्त बघायची आहेत हाही अर्थ अभिप्रेत आहे. मधूनच ही जनता उत्साहाच्या लाटेवर असते. मधूनच निरुत्साहाच्या. जनतेलाही भाषणे, परिषदा, स्वागत समारंभ आणि सत्कार यांचे अजीर्ण होत असल्याने ती निरुत्साही अथवा उदास बनत असेल काय? की इंदिरावादी काँग्रेस अधिवेशनाचा अंमल अजून उतरलेलाच नाही?

वास्तविक बादशहाखान यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे सात्विक संतापाने उच्चारलेले सावधानतेचे शब्द ऐकण्यासाठी मुंबईची जनता पुन्हा एकदा आझाद मैदानाला भरतीच्या सागराची कळा आणून देईल असे मला वाटले होते. पण हाय! त्यांच्या नागरी सत्काराला जेमतेम दहा हजार मंडळी होती. 'गांधीजींचा रस्ता तुम्ही सोडला आहे' हे त्यांचे उद्गार त्या सभेतील उपस्थितीनेही खरे करून दाखवले! शिवाजी पार्कवरील मुलामुलींचा मेळावाही मोठासा उत्साहजनक होता असे नाही. शाळाशाळांतून पैसे आधीच जमवण्यात आले होते. म्हणून थैलीला अभिवांछित वजन लाभले होते. पण उपस्थितांचे काय? हायस्कुले आणि महाविद्यालये यांतील किती मुले या मेळाव्यास आली होती? कुणीही नाही! येणारच कशी? अ. भा. विद्यार्थी परिषदेने याच वेळी रिअर अॅडमिरल कामत यांच्या हस्ते ‘लकी नंबर्स'ना बक्षिसे वाटण्याचा कार्यक्रम आखला होता. आणि ही बक्षिसे तरी कशासाठी? तर चंदेरी पडद्यावर व क्रीडांगणावर कोणती बाई अथवा कोणता बुवा श्रेष्ठ यावर मतदान केल्याबद्दल!! माझा या धावत्या मतदानाला विरोध नाही, पण औचित्य सांभाळायला हवे की नको. अ. भा. विद्यार्थी परिषदेला त्याच वेळी हा कार्यक्रम ठेवणे अगदी आवश्यक होतेच तर मग आदल्या दिवशी नागरी सत्काराच्या वेळी तमाम कॉलेज विद्यार्थ्यांनी या महापुरुषाच्या दर्शनासाठी जावे असा फतवा परिषदेने का बरे काढला नाही? पण विद्यार्थी परिषदेला तरी दोष कसा द्यावा? देशाप्रमाणेच तरुण पिढीही आबादीकडून बरबादीकडे चाललेली. खान अब्दुल गफारखान आता जवळपास सर्व देश पाहून आले. त्यांचा अभिप्राय व्यथित मनाच्या खोल निःश्वासासारखा वाटला. मुंबईस ते जिथे जिथे हिंडले तिथे तिथे त्यांनी जवळपास तेच सांगितले. मोठ्या खुबीने सांगितले. शत्रू हसवतो, मित्र रडवतो, मी तुमचा मित्र आहे. भीक मागणारा देश ही उदंड अपकिर्ती गेल्या 22 वर्षांत मिळवलीत! तुम्हीच निवडलेले लोक, त्यांनी राजकीय पक्ष बनवले. प्रत्येक पक्षाच्या दोन दोन फळ्या! सेवेसाठी लोक भांडू शकतातच कसे, हे त्या महात्म्याला उमगले नाही! कसे उमगावे? अन्य कोणत्याही परदेशी पाहुण्यापेक्षा हा अभिप्राय वेगळा. तो कोणी ध्यानात घेणार आहे काय, एवढाच प्रश्न.

विद्यार्थी परिषदेने धावते मतदान घेतल्याचा वर उल्लेख केला. त्यातील एक चांगली बाजू ही की, ताज्या राजकीय प्रश्नांवरही मतदान घेण्यात आले व 3,500 विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका भरून पाठवल्या. केंद्रस्थानी कम्युनिस्ट वगळून राष्ट्रीय सरकार बनवावे. नियोजन, बेकारीनिवारणाच्या प्रधान उद्दिष्टाने तयार करावे. बँक राष्ट्रीयीकरण हे समाजवादाच्या दिशेने योजलेले पाऊल आहे. जातीय दंगली प्रामुख्याने अल्पसंख्य जमातीतील समाजकंटक सुरू करतात व अल्पसंख्य जमात त्याकडे काणाडोळा करते. या उत्तरांना बहुसंख्य तरुणांनी उचलून धरले आहे.

 सिंडिकेट-इंडिकेटच्या गदारोळात शहाण्यासुर्त्यांची तत्त्वचर्चा कथी उपेक्षिली जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राणलाल देवकरण नानजी स्मारक व्याख्यानमालेत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर श्री. एच. व्ही. अय्यंगार यांचे सैद्धांतिक भाषण. मुंबईच्या पत्रांतून त्या भाषणातील एखादा परिच्छेद तोही संदर्भरहित असाच आला. पण मुळातले भाषण एका जाणकाराने लिहिलेल्या प्रबंधासारखे आहे. ‘राजकारण आणि आर्थिक विकास' या विषयावर ते बोलले. रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर श्री. एल्. के. झा यांनी अलीकडेच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी भाषण करताना 'इंडिया इज नाउ पॉउण्ड फॉर ए हाय रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ’ असे विधान केले होते. तेच सूत्र हाती घेऊन त्याची सत्यासत्यता श्री. अय्यंगार यांनी प्रो. रोस्टोव्हच्या 'स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ- ए नॉन कम्युनिस्ट मेनिफेस्टो' या ग्रंथातील विश्लेषणावर घासून पाहिली. प्रो. रोस्टोव्ह यांनी 1960 साली लिहिलेला हा ग्रंथ अनेकांच्या दृष्टीने पूर्वीसारखा फॅशनेबल राहिला नसला तरी अय्यंगारांना अजूनही श्रद्धेय वाटतो. भारताला त्यातील विचारसरणी तंतोतंत लागू पडते असा अय्यंगार यांचा दावा आहे.

प्रो. रोस्टोव्ह यांच्या चौकटीत जे टप्पे सांगितले आहेत त्यांनुसार (1) स्वातंत्र्यपूर्वकालात भारतीय समाज आर्थिक परिभाषेच्या दृष्टीने परंपरावादी होता. (2) स्वातंत्र्यानंतर आर्थिक गुंतवणुकीचा वेग वाढल्याने तो आर्थिक भरारी (टेक ऑफ) घेण्याच्या पायरीपर्यंत आला. (4) ही आर्थिक भरारी घेण्यासाठी जो वेग पकडायला हवा व सातत्याने राखायला हवा त्यात मात्र नेहमीच भारत यशस्वी झाला नाही. (5) ही अवस्था भारतात कदाचित 60 वर्षेही टिकू शकेल, असा रोस्टोव्हचा अंदाज आहे. भारतीय अर्थव्यवस्था 15 वर्षांपूर्वी भरारी घेण्याच्या टप्प्यावर आली; ही अवस्था सातत्याने टिकवू शकू असा विश्वास त्या वेळी बहुतेकांना वाटत होता. पण तिसऱ्या योजनेतच आपली पुच्छ प्रगती झाली! 65-66 साली जेवढी वास्तविक प्रगती व्हायची तेवढी 68-69 साली झाली नसल्याचे दिसून आले. लोकसंख्या वाढीने दरडोई उत्पन्नाचा अंदाजही चुकला. आता राज्यकर्ते (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत ) व जनता यांच्या दरम्यान अशी एक दरी निर्माण झाली आहे की राज्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवर विश्वास न ठेवण्याची, एवढेच नव्हे तर तुच्छतेने उपहास करण्याचीच वाढती प्रवृत्ती जनतेत दिसून येते.

 ही परागती 62 ते 68 या काळातील दोन युद्धांनी व दोन दुष्काळांनी निर्माण केली, असे सांगण्यात येते व काही अंशी ते खरेही आहे. पण महत्त्वाचा मुद्दा सरकारची कार्यक्षमता, जनतेचे सहकार्य आणि वास्तव धोरणे अमलात न आणण्याचा नोकरशाहीचा दुर्गुण, या गोष्टीच परागतीला जबाबदार आहेत, असे अय्यंगार म्हणतात. आपल्या विधानाच्या पुष्टर्थ्य त्यांनी 'गुनार मिर्दाल' या स्वीडिश अर्थशास्त्राच्या 'दि एशियन ड्रामा' या ताज्या पुस्तकातील उतारे दिले आहेत. (या पुस्तकाचे परीक्षण एक लेखमालेच्या रूपात रावसाहेब पटवर्धन यांनी केले असून ‘आशिया खंडातील आधुनिक महाभारत' म्हणून पुस्तकरूपाने प्रकाशितही झाले आहे- साधना प्रकाशन, रु. 2.00)

अय्यंगार म्हणतात "सत्तारुढ काँग्रेस सरकारांनी घोषणांवर जास्त भर दिला. घोषणा केल्या की धोरणाची अंमलबजावणी होते असे गृहीत धरले. पण नियंत्रणांनी समाजवाद आणायचा तर कारभारयंत्रणा चोख काम करणारी नको काय? काँग्रेस सरकारे ही अशी तर संयुक्त आघाडीच्या सरकाराबद्दल काय बोलावे? मुख्यमंत्रीच मुळी आपल्या सरकारला राक्षसी म्हणून उपोषणाला बसल्याचा देखावा आपण बघतो आहोत!! 47 आणि 62 साली राजकीय पेचप्रसंग उद्भवले, पण त्यातून आपण सुखरूप पार झालो. सध्याचा पेचप्रसंग वेगळाच आहे. सध्याचे केंद्र सरकार हे अल्पसंख्य सभासदांचे. त्यामुळे पाठिंब्यासाठी प्रत्येकापुढे त्याला हात पसरावा लागतो. आणि आता दुसरा एखादा पक्ष सत्तेवर आला तरी तोही अल्पसंख्यच असेल. पंतप्रधान कम्युनिस्ट आहेत, असे मला म्हणायचे नाही, पण काँग्रेसची दुफळी कम्युनिष्टांनाच फायद्याची होणार आहे. केरळ आणि बंगालमध्ये घडले त्यापासून काँग्रेसचे दोन्ही गट काहीही धडा घेत नाहीत, हेच दुर्दैव आहे! अशा स्थितीत आर्थिक विकास कसा होणार? हरितक्रांती करूनही चालू स्थितीत- अराजकाच्या स्थितीत- आर्थिक विकास अशक्य आहे?" म्हणजे बादशहाखानांनी ज्या बरबादीचा इशारा दिला तोच इशारा अय्यंगार यांनीही आपल्या प्रबंधात दिला आहे!
 
अशा या बातम्या! 
श्रीमती तारकेश्वरी सिन्हा यांनी या खेपेस मुंबईत येऊन यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरले. एक दिवस पश्चात्तापदग्ध चव्हाण सिंडिकेटच्या कळपात येतील, असा तारकेश्वरींचा होरा आहे! चव्हाणांच्या बाबतीत आता जो तो होरेच सांगून राहिला आहे. त्यांना पर्यायी नेतृत्व उभे करणार असे अॅड. रामराव आदिक यांनी पुण्यास जाऊन जाहीर केले. मुंबईतले एक विधान अंगाशी येते असे पाहताच स्वारी पुण्याला धावलेली दिसते!

 मुंबईस दिलेल्या एका खास मुलाखतीत आदिकमजकुरांनी बाळासाहेब देसाईंबद्दल आपुलकी व्यक्त केली होती. म्हणजे बुद्धिमंन्तांना बाळासाहेब चालतील असा तर्क त्यावरून निघत होता! पुण्यास जाऊन त्यांनी हे अर्धवट कुंकूही पुसून टाकले!! बाळासाहेबांना मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून हे लोक असे बोलतात, आमदारांच्या वेगळ्या बैठकाही होतात असा संशय येण्याजोग्या बातम्या आल्या होत्या. बाळासाहेबांनी तत्परतेने त्या सर्व बातम्या बनावट असल्याचे जाहीर करून आपले हात जगापुढे धरले आहेत! ह्या सर्व हालचाली मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक दिल्लीस जाणारच असे धरून चालल्या आहेत काय? तर मग हालचाली करणारे बरेच पाताळयंत्री म्हटले पाहिजेत. जे अजून खुद्द वसंतरावजींनाही ठाऊक नाही ते या मंडळींना समजले! वसंतराव नाईक दिल्लीस जाणार नाहीत. आपली मुदत संपेपर्यंत ते महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री राहणार आहेत व पुढे राजकारणातून निवृत्त होणार आहेत, अशी अगदी आतली बातमी ऐकू आली आहे. अशा बातम्यांबाबत म्हणूनच निर्धाराने अमुकच रूपात प्रकट होतील असे सांगणे कठीण असते 

Tags: श्रीमती तारकेश्वरी सिन्हा वसंतराव नाईक द एशियन ड्रामा गुनार मिर्दाल एच. व्ही. अय्यंगार प्रो. रोस्टोव्ह सिंडिकेट इंडिकेट राज्यांची हालहवाल मुंबईचे जीवन Shrimati tarkeshwari Sinha Vasantrao Naik the Asian drama gunar mirthal H.V. Iyengar professor rostow Syndicate indicate life of Mumbai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी