डिजिटल अर्काईव्ह

6 डिसेंबरचा अंक. त्यातील छत्तीसगडात ‘राष्ट्र सेवा दल' हे प्रवासवर्णन अतिशय आवडले. एकीकडे मागासलेले व जुनाट वाटणारे जीवन केवढे भव्य व उदात्तही आहे याची जाणीव झाली.

1.लोक तसे प्रतिनिधी

सुलोचना वाणी, पुणे 

इंदिरा गांधींनी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यापासून डाव्या विचारसरणीचे लोक अगदी भारावून गेल्यासारखे झाले आहेत. एस. एम. नी तर पत्रकांवर पत्रके काढली ! 'माझा इंदिरा गांधींना पाठिंबा कशासाठी?' याची ते इतकी स्पष्टीकरणे देत आहेत की, असे वाटते की त्यांना स्वत:लाच पाठिंबा देणे पटत नाही, नपेक्षा पुनःपुन्हा स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसता ! खरे सांगायचे म्हणजे हे राष्ट्रीयीकरण इंदिराबाईंनी केले आहे ते गरिबांविषयीच्या आंतरिक कळवळ्याने केले असते तर आपण सुद्धा भारावून गेलो असतो- राष्ट्रीयीकरणामुळे दारिद्र्य नाहीसे होणे अशक्य असले, तरी निदान गरीब, श्रीमंत यांतील अंतर कमी व्हावे, एवढे साध्य करणे. यासाठी बाईंची खटपट सुरू असेल तरीसुद्धा भारावून जाण्याची आपली तयारी आहे. पण राष्ट्रीयीकरण, तेसुद्धा छोट्या मोठ्या बँका सोडून मधल्याच बँकांचे, हे काही इंदिरा गांधींच्या तेजस्वितेचे आणि गरिबांविषयीच्या आंतरिक उमाळ्याचे फळ नाही. सत्तेची बाजी जिंकण्यासाठी टाकलेला तो एक डावपेच आहे. एसेम म्हणतील की काही का असेना राष्ट्रीयीकरण तर झाले आहे ना ! केवळ त्याच्यावरच त्यांना समाधान वाटत असेल तर वाटो, आणि यासाठी सर्व श्रेय इंदिरा गांधींना द्यावयाचे तर ते देवोत बापडे, पण एवढे मात्र खरे की, सिंहासन टिकवण्यासाठी जे डावपेच असतात त्याने कधीही सामान्य जनांचा फायदा होत नसतो. प्रीव्ही पर्सच्या भिजत घोंगड्यावरूनसुद्धा हेच दिसते.

दुसरी गोष्ट अशी की, डावपेच म्हणून का होईना इंदिरा गांधींचा राष्ट्रीयीकरणाचा टाकलेला डाव यशस्वी का झाला? आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकरणासाठी काय केले होते? खरे तर या राष्ट्रीयीकरणासाठी दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे गरिबी आणि श्रीमंती यांतील अंतर कमी व्हावे म्हणून आजपर्यंत इतरेजनांनी जो टाहो फोडला त्याचे फळ मात्र इंदिरा गांधींनी घेतले. डॉ. लोहियांनी तर स्व. नेहरूंनाच आव्हान देऊन सांगितले होते की, या देशातील गरिबांची आवक सरासरीने रोजी चार सहा आणे आहे. एवढे सांगूनच ते थांवले नाहीत तर स्व. नेहरूंचा रोजचा खर्च रु. 25,000 आहे हेही त्यांनी सांगितले. थोडक्यात गरीब लोक आणि श्रीमंत भांडवलदार यांच्यातील मिळकतीचे अंतर कमी झाले नाही तरी किमान सामान्यजन आणि सरकार यांच्यातील सांपत्तिक स्थितीतील अंतर कमी व्हावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु लोहियांच्या या प्रयत्नांना नेहरूद्वेषाचे स्वरूप दिले गेले. लोहियांना एक वेळ बाजूला ठेवले तरी आतापर्यंत एसेमनीसुद्धा समाजवादासाठी कमी यातना भोगल्या आहेत काय?

 स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या व्यक्तिगत सुखदुःखांचा होम करून सुद्धा स्वातंत्र्यानंतर अट्टाहासाने सत्तेपासून दूर राहिले, स्वातंत्र्यानंतरसुद्धा मोर्चे आणि तुरुंगाच्या वाऱ्या त्यांनी केल्या आणि आता तेच म्हणतात की, बाईंना पाठिंबा न देणे हा करंटेपणा आहे! मला तर वाटते की, जे जे समाजवादी विचारसरणीचे लोक आज इंदिरा गांधींना केवळ त्यांनी राष्ट्रीयीकरण केले म्हणून पाठिंबा देतात, ते न्यूनगंडाने पछाडले आहेत. त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडालाय, आणि बाई अनायास सत्तेवर आहेत आणि त्यांनी समाजवादाच्या दिशेने लंगडे का होईना, पण पाऊल उचलले आहे त्याचाच ते आधार घेऊ पाहतात. अरे, तुम्हाला जर सत्तेचा आधारच हवा होता तर यापूर्वी का नाही घेतलात? तेव्हा ते शोभूनही दिसले असते आणि तुमच्या हातून काही भले घडूनही गेले असते.

सत्तेकडून समाजवाद हा एकच मार्ग एसेमना सापडला असेल आणि समाजवादाकडून सत्तेकडे जाण्याचे मार्ग एसेमच हरले असतील तर मग बाकीच्यांची काय कथा! आणि एकटे दुकटे एसेम, गोरे, लोहिया, लिमये तरी काय करणार? गोवर्धन पर्वत उचलायला भगवान कृष्णालासुद्धा गोपाळांची मदत घ्यावी लागली. इथे तर काय, सर्व जणच उदासीन आहेत. साधे थोड्या बँकांचे राष्ट्रीयीकरण व्हायला 20 वर्षे लागली तरी आम्ही भारावून जातो. राष्ट्रीयीकरण झाले नसते तरी त्याची खंत आम्हाला वाटली नसतीच ! जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी !

2. परिटांनी खूप लिहावे 

दत्ता हिवाळे, बुलढाणा 

6 डिसेंबरचा अंक. त्यातील छत्तीसगडात ‘राष्ट्र सेवा दल' हे प्रवासवर्णन अतिशय आवडले. एकीकडे मागासलेले व जुनाट वाटणारे जीवन केवढे भव्य व उदात्तही आहे याची जाणीव झाली. नव्या टूमप्रमाणे मीसुद्धा पुराणातील कथा, देव वगैरे कल्पनांच्या बाबतीत विरुद्ध बोलतो; पण परीट गुरुजींनी लिहिलेले वर्णन वाचून वाटले असे काही तरी पाहिजे. म्हणजे बरे वाटते ! 'असा हा छत्तीसगढ' या मथळ्याखालीच परिटांनी भरपूर लिहावे असे वाटू लागले आहे.

3. दिवाळी अंक उत्तम

गणेश पाठक, मुंबई

उत्तम कथासाहित्याने नटलेला 'साधने’चा दिवाळी अंक वाचून अतिशय आनंद वाटला. इतर नियमित मासिकांच्या तुलनेने एका साप्ताहिकाचा दिवाळी अंक इतका उजवा ठरावा याचे श्रेय संपादकांच्या चोखंदळ दृष्टीसच दिले पाहिजे. प्रदीर्घ असूनही कंटाळवाण्या न होणाऱ्या वेचक दर्जेदार कथांनी, व्यंगचित्रे, चुटके, विनोद व इतर सटरफटर यांची उणीव भासू दिली नाही, हे अधिक महत्त्वाचे. अनुवादित कादंबरीऐवजी दोन उत्तम कथा आणखी वाचायला मिळाल्या असत्या तर बरे झाले असते. मृणालिनी देसाई यांनी कस्तुरबांची कथा फार हृदयंगम शैलीने सांगितली आहे; तर वसुधा पाटील यांच्या कथेने एक वेगळीच उंची गाठली आहे. खानोलकरांची कथासुद्धा शेवटी चटका लावून जाते. ह. मो. मराठ्यांच्या कथेवर काही वाचकांचा आक्षेप का, काही कळत नाही! तिच्यातील काही वर्णने कथेच्या ओघात अशी काही चपखल बसली आहेत की तो वेगळी काढून वाचण्याची उठाठेव करण्याची गरजच नाही. कलात्मक मूल्याच्या दृष्टीने ती कथा सरस आहे. उत्तम अंक काढल्याबद्दल धन्यवाद!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक ( 1337 लेख )

साधना साप्ताहिकाचे वाचक 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी