बाबूराव सत्याग्रही लढ्यात सामील होण्यासाठी बाहेर पडले. 1930-32 पासून 1942 च्या चलेजाव लढ्यापर्यंत सर्व लढ्यांत ते होते. गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या प्रांतांत ह्यापैकी त्यांचा बराचसा काळ गेला. कानडी मराठीबरोबर गुजराती आणि हिंदी भाषा त्यांनी अवगत करून घेतल्या. लोकभाषांची महती त्यांच्या मनावर याच काळात ठसली. म. गांधींनीही या लोकभाषांना देशनिर्माणाच्या दृष्टीने जे अनन्य महत्त्व आहे ते ओळखून त्यांच्याकडे लक्ष पुरवले होते.
परवा अचानकच श्री. बाबूराव कुमठेकर भेटले. अर्थात नेहमीच ते असे अचानक भेटतात! हातांत एक जाडजूड ग्रंथ होता. सहज विचारले, “हा काय नवा उद्योग?" बाबूरावांनी ग्रंथ हातात ठेवला. ग्रंथ पूर्णत्वाची वाटचाल करत होता. ज्ञानेश्वरीचा समछंद हिंदी अनुवाद तो होता. पाहून चकित झालो! मुद्दाम पसायदानाच्या ओव्या काढल्या. त्यांचा समछंद हिंदी अनुवाद गुणगुणून पाहिला. कानांना तसाच गोड लागला. संत साहित्यातील अर्थसौंदर्याइतकेच ध्वनिसौंदर्यही मोहक असते. ध्वनिसौंदर्याची किंवा गेयतेची ही महती जाणूनच विनोबांनी प्रचंड अट्टाहास करून गीतेचा समछंद अनुवाद केला आणि तो गीतेइतकाच किंबहुना अधिकच लोकप्रिय ठरला. बाबूरावांची ही हिंमत पाहून आश्चर्य वाटले! बाबूरावांनी साठी ओलांडली आहे, जरेने त्यांना काहीसे जर्जरही केले आहे, पण त्यांच्या अंतरंगीचा उत्साह दुर्दम्य आहे. या हिंदी अनुवादाच्या छपाईचे काम कर्नाटकात ते करवून घेत आहेत, ही आणखी एक कडी. आठशेवर पृष्ठे छापून झाली आहेत. आणखी दोनेकशे पृष्ठे छापून व्हायची आहेत. साठी ओलांडल्यानंतर त्यांचा उत्साह विस्मयजनक आहे. आजही भारतीय भावनिक एकात्मतेचा आधार संतसाहित्यच बनू शकेल अशी त्यांची श्रद्धा आहे. संतसाहित्यात अपार समनुयोग क्षमता आहे, असे त्यांना वाटते. आन्तर भारतीची जोपासना करायची तर संत साहित्याचे विविध भाषांत समछंद अनुवाद झाले, ते त्याच तालासुरांवर म्हटले गेले तर ते फार लाभदायक ठरेल, असे त्यांना वाटते. आणि म्हणूनच त्यांनी हा प्रचंड खटाटोप मांडला आहे. त्यांच्या मनात याच प्रकारच्या किती तरी योजना घोळत आहेत आणि त्या लोकाश्रयावर शक्य तो पार पाडायच्या अशी त्यांची कल्पना आहे.
बाबूराव कुमठेकर कारवार जिल्ह्यातल्या कुमठ्याचे. त्यामुळे कानडी-मराठीचा स्वाभाविकच संस्कार त्यांच्यावर झाला. पुरंदरविठ्ठल महाराष्ट्र-कर्नाटकला एकत्र गुंफणारे दैवत आहे. कानडा विठ्ठल मराठी मनांनी मनोभावे पूजला आणि त्याला आपल्याच प्रेमपाशांत कायमचा डांबून ठेवला. लाखो वारकऱ्यांचा तो सखा. भाषिक भांडणे जोमाने चालू असताही हा कानडा विठ्ठल प्रेमाची साद घालीत कटीवर कर ठेवून उभा आहे. बाबूरावांचे प्रारंभिक शिक्षण अशा वातावरणात झाले. पुढे गोव्यातल्या पर्तगाल मठात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले. पण पारतंत्र्यात जगणारांना कुठला धर्म नि काय, अशी उत्कट भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि बाबूराव सत्याग्रही लढ्यात सामील होण्यासाठी बाहेर पडले. 1930-32 पासून 1942 च्या चलेजाव लढ्यापर्यंत सर्व लढ्यांत ते होते. गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या प्रांतांत ह्यापैकी त्यांचा बराचसा काळ गेला. कानडी मराठीबरोबर गुजराती आणि हिंदी भाषा त्यांनी अवगत करून घेतल्या. लोकभाषांची महती त्यांच्या मनावर याच काळात ठसली. म. गांधींनीही या लोकभाषांना देशनिर्माणाच्या दृष्टीने जे अनन्य महत्त्व आहे ते ओळखून त्यांच्याकडे लक्ष पुरवले होते. कोट्यवधी लोकांना वंचित राखणाऱ्या इंग्रजी भाषेचे स्तोम त्यांनी मोडून काढले होते. गांधीजींच्या आश्रमात आणि त्या वेळच्या राष्ट्रीय विद्यापीठात अखिल भारतीयता स्वाभाविकपणेच जोपासली जात होती. सर्व भाषांतील मंडळी तेथे जमत होती, स्वातंत्र्याकांक्षेच्या एका सूत्रात गुंफली जात होती. गांधी हेच सर्वसामान्यांचे पहिले खरे अखिल भारतीय नेते होते! हिंदी प्रचाराला त्यांनी आपल्या विधायक कार्यात महत्वाचे स्थान दिले होते. बाबूराव कुमठेकरांना हे कार्य आपल्या स्वभावानुकूल वाटले आणि दक्षिणेत हिंदी प्रचारक म्हणून त्यांनी कार्य आरंभले. किती तरी लहान पोरांना त्यांनी हिंदी शिकवले. दक्षिणेत त्या काळी हिंदी प्रचाराला केवढे महत्त्व होते ते एका उदाहरणावरून ध्यानी येईल.
1968 सालची ही गोष्ट. श्रीनिवास अय्यंगार बाबूरावांकडे हिंदी शिकायला येत. त्यांचे वय 66-67 तेव्हा होते. बाबूरावांपेक्षा ते तीन तपांनी वडील. पण स्वतः चालत त्यांच्याकडे नियमाने पावणेसातला बरोबर हजर होत. बाबूरावांना संकोच वाटायचा. ते एकदा म्हणाले, "मीच उद्यापासून तुमच्याकडे येत जाईन शिकवायला." अय्यंगार घाईने म्हणाले, "नको, नको. मीच आले पाहिजे. माझ्या विद्यार्थी वृत्तीला तुम्ही येणे शोभून दिसणार नाही. विद्याध्ययनासाठी विद्यार्थ्यांनीच गुरुगृही गेले पाहिजे! " त्यानंतर 16 वर्षांनी या गुरु-शिष्यांची गाठ पडली. अय्यंगारांची ऐंशी वर्षे होऊन चुकली होती. ते मद्रासमध्ये आपल्या नातीकडे राहात होते. बाबूराव अगत्याने त्यांना भेटायला गेले. सहजच हिंदीच्या गोष्टी निघाल्या. ते म्हणाले, "पंडितजी, काय करू, आता मी वृद्ध झालो आहे. हात कापतो. त्यामुळे लिहिणे होत नाही. आता या जन्मी शक्य नाही, पण पुढच्या जन्मी हिंदी साहित्यात तमिळ साहित्यातील निवडक साहित्याची मी भर घालीन व प्रादेशिक झालेल्या हिंदीला खऱ्या अर्थाने अखिल भारतीयतेची पोषक-परिचायक बनवण्याचा प्रयत्न करीन. आता एवढीच एक आकांक्षा उरली आहे. तमिळमध्ये तीन हजार वर्षांचे अनुपम साहित्यभांडार आहे. पण हिंदीला त्याची पुरेशी दखल आहे कुठे? हिंदी उदार असली तरच अखिल भारतीय समनुयोगाची वाहक बनू शकेल." बाबूरावजींच्या हिंदी प्रचारामागील विचाराच्या कक्षा अशा प्रसंगाप्रसंगाने रुंदावत होत्या. स्वातंत्र्यलढ्याच्या तयारीचा एक भाग ही भूमिका संपवून भावनिक एकात्मतेचे एक साधन म्हणून तिच्याकडे ते पाहू लागले होते.
साने गुरुजींशी संबंध
1942 च्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात साने गुरुजींशी त्यांचा संबंध आला. बाबूराव परागंदा होऊन इतर प्रांतात राहात होते. आजारी होते. साने गुरुजी अनेक सत्याग्रहींना मदत करत. त्यांत बाबूरावही होते. साने गुरुजी आपली पुस्तके विकून अशा मंडळींसाठी मदत पाठवीत. बाबूरावांना 9146 साली त्यांनी लिहिले, "माझ्या पुस्तकांचे 4500 रुपये आले, ते सर्व गरजेनुसार कार्यकर्त्यांना पाठवले. तुमचीही आठवण होती. आता एखादे पुस्तक लिहून पैसे पाठवीन. बाबूरावांना वाटले, साने गुरुजींना किती जणांनी सतवायचे. त्यांनी साने गुरुजींची अनुमती घेऊन 'सती' आणि 'विश्राम' ही पुस्तके हिंदीत भाषांतरित करून प्रकाशित केली. गुरुजींवरचा भार हलका करावा ही कल्पना. एवढ्यात स्वातंत्र्य आले. देशाचा सर्वच नूर पालटला! बाबूराव स्वातंत्र्यलढ्यात पडले ते सांस्कृतिक दासता दूर करण्यासाठी. त्यांना सत्तेच्या राजकारणात गोडी नव्हती त्यामुळे साहित्य संस्कृती या क्षेत्रातच ते काही ना काही धडपड करत राहिले.
शैव साहित्याचा अनुवाद
या काळात राहुल सांकृत्यायन यांच्याशी त्यांचा संबंध आला. ते एकदा म्हणाले, "भारतीय संस्कृतीमध्ये शैव साहित्याचे स्वतःचे असे एक स्थान आहे. तमिळ आणि कन्नडमधील या साहित्याची ओळख नसेल तर भारतीय संस्कृतीची पुरेशी ओळख झाली असे काही म्हणता येणार नाही. पण त्या भाषा न जाणणारांना ओळख करून घेण्याची काहीच सोय नाही. हे कार्य कोणी तरी अंगावर घेतले पाहिजे." बाबूरावांच्या मनात आले, आपल्याला तरी कन्नड साहित्याची पुरेशी ओळख कुठे आहे? आणि त्यांनी कन्नड साहित्याचे अध्ययन सुरू केले. त्यात ते रमले. पण प्रकृती साथ देईना. ते विश्रांतीसाठी नैनीतालला गेले. तेथे स्वामी विद्यानंदांची भेट झाली. स्वामीजी म्हणाले, "पुरंदरदासांची चार पाच भजने हिंदीत करून द्याल तर पाहा." बाबूरावांना वाटले, पुरंदरदासांची भजने गाण्यात एक वेगळी गोडी आहे. ती गेयता गेली तर भजनांचे सत्वच गेल्यासारखे होईल. पण कन्नड भजनांचा समछंद हिंदी अनुवाद जमेल अशी त्यांना खात्री नव्हती. त्यांनी प्रयोग करायचे ठरवले. त्यांनी केलेला हिंदी अनुवाद कन्नड पद्धतीने गायला जाऊ शकला बाबूरावांना आनंद झाला. पुरंदरदासांच्या तीनएकशे भजनांचा हिंदी अनुवाद त्यांनी करून टाकला. वचनसाहित्याचा हिंदी अनुवाद केला, त्यातला निम्माअर्धा भाग प्रकाशितही झाला आहे.
भारतीय एकात्मतेचे दोन मुख्य आधार आहेत अशी बाबूरावांची श्रद्धा आहे. एक संतसाहित्य. अंधश्रद्ध, रुढीग्रस्त, जड, अमंगळ भेदाभेद कवटाळून बसलेल्या समाजाला संत साहित्यच अंधश्रद्धा, रूढिग्रस्तता, जडता आणि भेदाभेद-भ्रम यांतून बाहेर काढून समता, सुबुद्धता, निर्मळ चरित्र आणि व्यापक बंधुता यांची दीक्षा देईल असे त्यांना वाटते. हिंदी भाषा जर सर्व भाषांतील संतसाहित्याने संपन्न झाली तर राष्ट्रभाषापदी आरूढ होण्याची तिची पात्रता वाढेल असे त्यांना वाटते आणि म्हणून ते कार्य त्यांनी अंगावर घेतले आहे. दुसरा आधार लोकभाषा हा आहे, असे त्यांचे मत. आज तथाकथित प्रतिष्ठितांच्या कोठडीतून ज्ञानाला मुक्त करायचे तर लोकभाषांचा आश्रय करणे क्रमप्राप्तच आहे. आधी संस्कृत, नंतर पर्शियन आणि आता इंग्रजी यांची ज्ञानशक्ती मोठी असा भ्रम फैलावून सामान्य जनांची वंचना केली जात आहे, असे त्यांना वाटते; आणि म्हणून लोकभाषांना प्रतिष्ठा आणून देण्याची त्यांना तळमळ वाटते. बाबूरावांची ही दोन्ही कामे फार महत्त्वाची आहेत. शेवटी सामान्य माणसाला देशाचे भवितव्य घडवण्याची क्षमता आली तरच लोकशाही यथार्थ होऊ शकते. आपले कार्य लोकाश्रयावर चालवावे अशी बाबूरावांची कल्पना आहे. तो लोकाश्रय त्यांना भरपूर मिळावा आणि हे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते आयुरारोग्य त्यांना मिळावे, ही सदिच्छा.
पसायदान : समछंद हिंदी अनुवाद
मुझको दें अब विश्वात्मक देव। इस वाग्यज्ञसे तुष्ट हो सदैव।
संतुष्ट होकर दे यह वैभव | पसायदानका
मिटे इससे खलकी खलता। उनमें बढे सत्कर्मत्रियता।
प्राणियों में परस्पर मित्रता। हो जीवभावकी ||
मिटे दुरितका तिमिर । विश्व देखें स्वधर्मभास्कर ।
जो जो चाहे सो पावे वर । प्राणिमात्र।
बरसत रहे सकल मंगल। बने सदा ईशनिष्ठोंके मंडल।
अनवरत जीव यह सकल । पाये भूमंडलको ॥
कल्पतरुके हो चलते उपवन। गांव हो चैतन्य चिंतामणिके खान।
सतत अमृतसिंधुसम वचन। मिले परस्पर ।
चंद्रमा हो यहां अलांछन। तथा मार्तंड तापहीन ।
सदा प्रिय हो सभी सज्जन। सबसे आप्त॥
अथवा पाये सभी सुख। पूर्ण होकर तीनों लोक।
और भजे आदिपुरुष। अखंडित!!
Tags: vernacular ज्ञानेश्वरी हिंदी अनुवाद बाबुराव कुमठेकर पसायदान कानडी पोर्तुगाल महात्मा गांधी लोक भाषा Rahul Sanskritayan Sane Guruji Mahatma Gandhi Portugal Kannadi pasaydan Baburao Kumthekar Hindi translation dhyneswari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या