सत्तेकडे मुख ठेवून समाजवादाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या हाती सत्ता लागली तरी समाजवाद स्थापन होत नसतो, त्यासाठी जनशक्ती उभी करावी लागते. ही जनशक्ती किंवा हा लोकसंग्रह लोकसभेतील टाळ्याखाऊ भाषणांनी, वृत्तपत्रांतील झगझगीत प्रकाशाने साधत नसतो.
बिहारमध्ये संसोपाचे खास अधिवेशन सोनपूर येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनात समाजवादी ऐक्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करण्यात आला. परंतु संसोपा-प्रपोसातून सोपा उभी करणे हे कार्य सोपे नाही. सोशलिस्ट पार्टीची उभारणी करायची तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नांतून वास्तवात येण्याची नेत्यांची तयारी हवी. त्यासाठी आत्मपरीक्षणाची निर्भय वृत्ती अंगी असावी लागते, अन्यथा ऐक्याचे प्रयत्न म्हणजे इतरांना धोपटण्याचे एक साधनच बनते! पूर्वग्रह, व्यक्तिगत रागलोभ, अहंता बाजूला सारून उदार, समजूतदार, सहिष्णू असे धोरण बाळगले पाहिजे. पण एवढ्यानेही भागणार नाही. सत्तेकडे मुख ठेवून समाजवादाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या हाती सत्ता लागली तरी समाजवाद स्थापन होत नसतो, त्यासाठी जनशक्ती उभी करावी लागते. ही जनशक्ती किंवा हा लोकसंग्रह लोकसभेतील टाळ्याखाऊ भाषणांनी, वृत्तपत्रांतील झगझगीत प्रकाशाने साधत नसतो. काँग्रेस पक्षाची निंदा करता करता देशातील सर्वच पक्षांना संसदीय कार्याचे व्यसन जडले असून संघटनेला निवडणूक यंत्रणेचे स्वरूप आले आहे. पटावरील प्यादी इकडे तिकडे करण्यातच राजकीय कार्यकर्त्यांची सर्व बौद्धिक कुवत खर्ची पडत आहे. पक्षांजवळ मोहक घोषणा आहेत, पण संघटना नाहीत! संघटित बळ म्हणून जर नोकरशाहीवरच सर्वस्वी विसंबून राहावे लागणार असेल तर पं. नेहरूंच्या समाजवादापेक्षा काही वेगळे घडण्याची शक्यता नाही. बरेचसे संघर्षही आज लटकेच झाले आहेत. कारण विधायक कार्यातून लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय लढ्यांना खरे कटोकटीचे स्वरूप येऊच शकत नाही. समाजवादी चळवळीचे हे दुर्दैव आहे की संघटनेचे नीटसे भान तिला कधी झाले नाही. संसोपा-प्रसोपा ऐक्याचे कागदी ठराव करण्याऐवजी विधायक कार्य व संघर्ष यांना प्राधान्य देऊन समाजवादी शीलाची जनशक्ती उभारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
संसोपाच्या नेत्यांनी परिस्थितीचे केलेले मूल्यमापनही वास्तव वाटत नाही. काँग्रेसच्या एकाधिकारशाहीचा धोंडा जनतेच्या छाताडावरून उतरला हे स्वच्छ दिसत असताना त्यातील कोणता धोंडा छोटा किंवा मोठा वा कोणत्या समाजवादी गटाचा हे ठरवण्याचा प्रयत्न म्हणजे काही परिस्थितीचे मूल्यमापन नव्हे. इंदिराबाईंच्या समाजवादी कार्यक्रमासंबंधी संशयी वृत्ती दाखवल्यानंतर चंद्रभानु गुप्तांसारख्या सिंडिकेटवाद्याच्या परिस्थितीच्या दडपणाखाली सारामाफीसारख्या घेतलेल्या निर्णयाबद्दलही तसाच संयम दाखवणे क्रमप्राप्तच होते. प्रतिपक्षाला कार्यक्रमाबाबत संधीही न देता तुच्छता दाखवण्याची खोड़ राजकीय प्रगल्भतेची द्योतक म्हणता येणार नाही! जनशक्तीतून काही घडवून आणण्याची कोणाची हिंमत आणि तयारी दिसत नाही. चळवळीची जागा विधानसभा व संसद यांच्या मंचावरील भाषणांनी घेतल्यासारखी दिसते. संसोपाच्या नेत्यांवरील परिभाषेची भुरळ दूर झाल्याशिवाय वास्तवात त्यांची पावले पडू शकणार नाहीत. सोनपूरला ही एकांतिकता काढून टाकण्याचा आणि सत्तेच्या भागीदारीपेक्षा सत्तेवर अंकुश ठेवू शकणाऱ्या संघटित जनशक्यीचीची उपासना करण्याचा निश्चय झाला असता तर समाजवादी ऐक्याची वाट मोकळी झाली असती. समाजवादी ऐक्य हे नेत्यांच्या मेजाशी बसून केलेल्या वाटाघाटीतून निर्माण होत नसते, संघटित जनशक्तीतूनच ते आकाराला येऊ शकते. समाजवादी चळवळीला याचे जेवढे भान होईल तेवढ्याच प्रमाणात ते आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडू शकतील.
काँग्रेसची स्थिती काहीशी अशीच आहे. काँग्रेस किती या प्रश्नाला तोंडाने उच्चारायचे दोन, डोळा मिटायचा एक, आणि बोटे दाखवायची पाच असे उत्तर द्यावे लागेल.
एका माणसाला विचारले की बाबा रे, बाजेचे पाय किती? तो मनुष्य नामी होता. त्याने उत्तर मोठ्या चाणाक्षपणे दिले. त्याने बोटे दाखवली दोन, डोळा मिटला एक, तोंडाने सांगितले तीन! काँग्रेसची स्थिती काहीशी अशीच आहे. काँग्रेस किती या प्रश्नाला तोंडाने उच्चारायचे दोन, डोळा मिटायचा एक, आणि बोटे दाखवायची पाच असे उत्तर द्यावे लागेल. इंडिकेट आणि सिंडिकेट हे दोन जाहीर गट आहेत. त्याशिवाय एक आहे व्हिंडिकेट. पण त्यानेही भागले नाही तेव्हा एक गट झाला अब्डीकेट. पण तरीही अद्याप काही काँग्रेसबाह्य काँग्रेसजन ऐक्याची आशा राहून आहेत. अशांचे अग्रणी आहेत रत्नागिरीचे श्री. अप्पा पटवर्धन. त्यांना वाटते की, वर्ध्यासारख्या एखाद्या ठिकाणी या सर्व गटांनी एकत्र यावे आणि आपले मतभेद विसरून एक डेडिकेट काँग्रेस स्थापन करावी, आणि काँग्रेसला लोकसेवा संघाचे रूप देण्याचे महात्मा गांधीचे अखेरचे स्वप्न साकार करावे.
ही डेडिकेट काँग्रेस स्थापन केली तर तिचे डेडिकेशन कशाला असेल, असा प्रश्न स्वाभाविकच निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधण्यासाठी फार खटाटोप करायला नको. आजचे दोन्ही काँग्रेसगट डेडिकेटेडच आहेत, फक्त त्यांचे डेडिकेशन पॉवरला- सत्तेला आहे. तसे नसते तर प्रकरण या थरावर आलेच नसते. आता गांधीजींच्या कल्पनेतील डेडिकेट काँग्रेस अस्तित्वात यावी कशी? अप्पांच्या इच्छामात्रेण ती अस्तित्वात येईल काय?
Tags: बिहार सोनपूर अधिवेशन समाजवादी पार्टी लोकसभेतील भाषणे पंडित नेहरू इंदिरा गांधी चंद्रभानु गुप्ता सिंडिकेट syndicate chandrabhanu Gupta Indira Gandhi Pandit nehru speeches in Parliament socialist party session sonpur Bihar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या