डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

1942 च्या चळवळीचे योगदान कोणते यासंबंधी श्री. नानासाहेब गोरे यांनी 24 ऑगस्ट 1991 च्या साधने 'त असे लिहिले होते की, या चळवळीमुळे सत्ताग्रहणाला योग्य अशी मंत्रणा 1947 नंतर मिळाली. या विषयासंबंधी पण अगदी वेगळे असे हे विचार,

(1) 1947 च्या सत्तांतरानंतर मध्यवर्ती व प्रांतीय सत्ता काँग्रेस पक्षाला मिळाली. जे नेते सत्तास्थानावर आले ते प्रामुख्याने 1942 पूर्वीपासून काँग्रेस पक्षात होते. त्यांपैकी बरेच नेते 1942 च्या चळवळीत खऱ्या अर्थाने नव्हतेच. एक तर, ते सुरुवातीलाच पकडले गेले होते; शिवाय त्यांपैकी अनेकांना आंदोलनाचे मार्ग पसंतही नव्हते. चळवळ चालवली ती मुख्यतः समाजवादी व इतर तरुण नेत्यांनी. सत्ताग्रहणाला योग्य असा (काँग्रेस) पक्ष 1947 साली तयार झाला यात 1942 च्या चळवळीचा फारसा संबंध आहे असे वाटत नाही. किंबहुना काँग्रेस पक्ष पूर्वीही सत्तेवर होताच आणि देशातील सर्वाधिक जनतेचे प्रतिनिधित्व तो 1942 पूर्वीही करीत होता.

1942 च्या आंदोलनाची व्याप्ती शहरवासी मध्यमवर्गीय,विशेषतः विद्यार्थिवर्ग यापलीकडे फार नव्हती. या चळवळीकडे आकर्षित झालेल्या अनेकांचा काँग्रेस पक्षाशी, किंबहुना कोणत्याही राजकीय कार्याशी संबंध आलेला नव्हता. आंदोलन संपल्यानंतर त्यांच्यापैकी अनेक नोकरी-व्यवसायाकडे वळले. मला असे आढळून आले आहे की, ज्यांनी 1942 च्या आंदोलनात भाग घेतला होता ते नंतरही आपापल्या कार्यक्षेत्रात नेकीने आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करीत राहिले. आसपास सर्वत्र भ्रष्टाचार आणि खुशामत यांचे साम्राज्य पसरले असतानाही ते मोठ्या प्रमाणात स्वच्छ राहिले. 1942 च्या चळवळीने ताठ मानेने उभा रहाणारा एक माणूस देशाला दिला. 1942 चे योगदान हे असावे असे वाटते.

(2) भारताच्या विभाजनासंबंधी नानासाहेबाचे विवेचन थोडे अपुरे वाटते. राष्ट्रवादी आणि समाजवादी शक्ती फाळणी का टाळू शकल्या नाहीत, आणि ' जातीय त्रिकोणा 'संबंधी तत्कालीन नेत्यांचा दृष्टिकोण, या दोन्ही प्रश्नांचा एकत्र विचार व्हायला हवा. फाळणी टाळता आली नाही, याचे नानासाहेबांचे उत्तर असे की 1942 ची चळवळ किंवा सुभाषचंद्रांचा स्वातंत्र्यसंग्राम यांचा भर 1947 सालीओसरला होता. मला वाटते तो भर ओसरला नसता तरीही फाळणी टाळता आली नसती. (अशा चळवळींचा भर काही महिन्यांत ओसरतोच.) फाळणी अटळ झाली याचे मुख्य कारण असे की मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात राहाण्याची इच्छाच नव्हती. या दृष्टीने वायव्य सरहद्द प्रांताचे उदाहरण मोठे बोलके आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ‘खुदाई-खिदमदगार’ या अहिंसक संघटनेच्या प्रयोगाकडे आम्ही असीम आदराने पाहात असू. खान बंधू हे तेथील अनभिषिक्त राजे मानले जात असत. सत्ताही पूर्वी काँग्रेस पक्षाकडे होती. इतके असूनही ब्रिटिश सत्ता जाणार हे स्पष्ट झाल्यावर तेथील सार्वमत फार मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या बाजूने गेले. फाळणी टाळायची असती तर लखनौ करार झाला तेव्हापासूनच आपली पावले निराळ्या दिशेने पडायला हवी होती. 1942 किंवा 1947 साली फाळणी अपरिहार्यच होती. राजाजी आणि आंबेडकरांनी हे पूर्वीच ओळखले. इतरांना समजायला उशीर झाला इतकेच.

समाजवादी किंवा राष्ट्रवादी शक्ती फाळणी टाळू शकल्पा नाहीत याचे प्रमुख कारण त्यांनी त्या वेळी मान्य केलेल्या 'जातीय त्रिकोणा'च्या सिद्धांतात शोधायला हवे. ब्रिटिशसत्ता गेली की हिंदु-मुस्लिम ऐक्य होईलच, हा या सिद्धांताचा पाया होता. हिंदु-मुस्लिम प्रश्न हा आमचा घरगुती मामला आहे; किंबहुना हा प्रश्न घरातील घुसखोरांनी निर्माण केला आहे. घुसखोराला हाकून दिले की प्रश्न उरणारच नाही, अशी आमची दृष्टी होती आणि घर पुढे नीट नांदावे म्हणून मोठ्या भावाने धाकट्या भावाला मागेल ते देत जावे असा हा सारा अति बाळबोध प्रकार होता. "पाकिस्तान कथी होणारच नाही. अशा प्रकारचे स्वतंत्र राष्ट्र व्हायेबल होणार नाही" वगैरे विचार सेवादल शिबिरात व इतरत्र त्या वेळी व्यक्त केले जात असत. भारतातील जातीय त्रिकोण हे अच्युतरावांचे पुस्तक आम्ही या प्रश्नासंबंधीचे आमचे बायबल समजत असू. अच्युतरावांनी यापूर्वीच कै. नरहर कुरुंदकरांशी बोलताना या सिद्धांतासंबंधीचे आपले विचार चुकीचे होते हे मोकळेपणे मान्य केले आहे. "त्या संबंधीची गृहीतकृत्येच चुकल्यामुळे आमचे निष्कर्षही चुकले हे मान्य करून त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, आता या साऱ्या गोष्टीचा नव्याने विचार करायला हवा.

पूर्वग्रह सोडून, मोकळ्या मनाने जातीय प्रश्नाचा विचार करायला आपण तयार आहोत काय, हाच खरा प्रश्न आहे. इतर अनेक देशांतही विभाजन झाले आहे; तेव्हा फाळणीचे दुःख किती काळ चिवडीत बसावे? हा नानासाहेबांचा विचार अपरिहार्य परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने योग्य आहे. हिंदुत्ववाद्यांनी कितीही ओरड केली तरी हे दोन देश कोणत्याही स्वरूपात एक होणे अशक्य आहे हे अगदी उघड आहे. पण 40 वर्षोंनंतरही फाळणीसंबंधीचा लोकक्षोभ जात नाही, या गोष्टीचीही नेत्यांनी दखल घ्यायला हवी. हा राग केवळ हिंदुत्ववाद्यांच्या मनात आहे, ही आत्मवंचना ठरेल, किंवा यासंबंधी थोडा निराळा विचार कोणी व्यक्त केला की त्याच्यावर हिंदुत्वाचा छाप मारणे योग्य होणार नाही. इतर देशातील विभाजने तेथील जनतेने मान्य केली; आपणच हा जुना इतिहास गरमागरम का ठेवावा? हा उपदेश येथे रुजत नाही एवढे खरे दीडशे वर्षे ज्याने देशाची लूट केली ते इंग्लंड आम्हाला मित्रराष्ट्र वाटते; पण पाकिस्तान वाटत नाही हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. इंग्लंडची क्रिकेट टीम भारतात आली तर खेळाडूंचे येथे स्वागत होते, पण भारत-पाक सामना है मात्र दोन राष्ट्रांतील युद्ध वाटते ही सत्य स्थिती आहे.

याचे एक कारण असे असावे असे वाटते की, विभाजन-पूर्व इतिहासापासून आपले नेते काही शिकले आहेत असे लोकांना वाटत नाही. शाही इमामच्या स्वरूपात महंमदअल्ली जीना अवतरले आहेत की काय अशी लोकांना शंका येते. शहाबानो खटल्यातील अत्यंत स्वच्छ निवाडा असफल करण्यासाठी कायदा बदलण्यात आम्हाला काही गैर वाटत नाही. आणि इतर अनेक गोष्टींची (अकारण?) घाई करणाऱ्या राष्ट्रीय आघाडीच्या सरकारलाही या कायद्याचा पुनर्विचार करावा असे वाटले नाही. अच्युतराव सांगतात त्याप्रमाणे नव्याने विचार करण्याचा प्रयत्न दिसत नाही, ही आमची खंत आहे.

Tags: 1942 ची चळवळ कॉंग्रेस पक्ष नानासाहेब गोरे 1942 Movement Congress Party Nanasaheb Gore weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके