डिजिटल अर्काईव्ह

पाच हजार वर्षांतील विवेकयात्री

हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विवेकवादाच्या प्रवासाचा धांडोळा घेताना 'विवेकाच्या प्रकाशाची परीक्षा' अद्याप संपलेली नाही, याची जाणीव लेखकास आहे. त्या बाबतचे त्यांचे चिंतन अतिशय मूलगामी आहे. ते म्हणतात, "खऱ्या विवेकवादी समाजाची निर्मिती कशी होईल, हा प्राचीन काळापासून माणसाला भेडसावणारा पहिला प्रश्न आहे. विवेकवाद हे एक निश्चित साध्य आहे की ती एक चिरंतन चालू राहणारी प्रवाही प्रक्रिया आहे, हा दुसरा प्रश्न आहे. उदारमतवादी, पुरोगामी किंवा डावी विचारसरणी हे त्यावर उत्तर असेल का, हा तिसरा प्रश्न आहे.

विवेकवादाच्या इतिहासाची चर्चा करणारी इंग्रजीप्रमाणे मराठीतही काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. परंतु सॉक्रेटीसपूर्व काळापासून म्हणजे प्लाहोटेप (इ.स.पूर्व 2375) ते माजीद नवाझ (इ.स. 1977-हयात) पर्यंत. इतक्या प्रदीर्घ कालखंडातील 150 पेक्षा अधिक विवेकवाद्यांचा धांडोळा प्रथमच एकत्रितपणे डॉ. अभिजित वैद्य यांनी त्यांच्या 'विवेकयात्री' या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात घेतला आहे. डॉ. अभिजित वैद्य हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत. परंतु, आपले वडील भाई वैद्य यांचा विवेकवादाचा आणि परिवर्तनवादी चळवळीचा समर्थ वारसा मागे असल्यामुळे ते माणसाच्या शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्याचे भान ठेवून कार्यरत आहेत. मग ती त्यांची आरोग्य सेना असो, 'पुरोगामी जनगर्जना' या मासिकाचे संपादन असो किंवा अन्य उपक्रम असो. त्या व्यापात अतिशय समग्र असतानाही त्यांनी आजच्या सामाजिक पर्यावरणातील निकड म्हणून हा विवेकामृतकोश उपलब्ध केलेला दिसतो. 'राजहंस' सारख्या प्रतिष्ठित संस्थेने तो प्रकाशित केला आहे.

विवेकाचा पश्चिमपूर्व रंग, पश्चिम रंग, पूर्व रंग, स्त्री रंग, कृष्ण रंग व नास्तिक तत्त्वज्ञ असे विभाग पाडून त्यामधून ग्रीक, भारतीय, पाश्चात्त्य, मुस्लीम, चीन, इस्लाम अशा विविध संस्कृतींचा वेध घेतला आहे. या विवेकयात्रींचा धांडोळा घेताना त्यांनी त्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण, त्यांनी मांडलेले सिद्धान्त, त्यांचा पुढील कालखंडावरचा प्रभाव किंवा त्यांतील चुकीचा निष्कर्ष, विसंगती आणि मर्यादा आणि त्या सर्वांवर लेखकाचे थोडक्यात मार्मिक भाष्य हे सर्व शक्य तितक्या कमी शब्दांत, सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात आवश्यक त्यामहत्त्वाच्या (एकूणचविवेकवादावर आणि विज्ञानवादावर प्रभाव पाडणाऱ्या) व्यक्तिमत्त्वाचा विस्तृतपणे विचार केला आहे. या विवेकवादाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात कित्येकांना बलिदान द्यावे लागले, शिक्षा भोगाव्या लागल्या, दंड भरावे लागले, नजरकैदेत राहावे लागले. हा सर्व प्रवास जितका रोमांचकारी आहे, तितकाच तो अंतर्मुख करणारा आहे.

लेखकाने म्हटल्याप्रमाणे होमोइरेक्टस ते होमोसेपियन्स हा माणसाच्या शारीरिक उत्क्रांतीचा चढत्या क्रमांकाचा आलेख आहे. आणि माणूस नजीकच्या भविष्यात कदाचित युवाल नोवा हरारीने म्हटल्याप्रमाणे होमोड्युस होण्याकडे, म्हणजे अत्याधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने तो कल्पनातीत अशी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता मिळवेल. (AI चा माणसाच्या जीवनातील वाढता प्रवेश हे त्याचेच लक्षण आहे) पण माणसाच्या वैचारिक उत्क्रांतीचा आलेख मात्र अनेक चढ-उतारांचा आहे. याचे प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येते. ह्युमॅनिझमच्या चळवळीने धर्माच्या कर्मठ भिंतींना धक्का दिला. रिफॉर्मेशनच्या चळवळीने धर्मातील भ्रष्टाचाराला आणि अनैतिकतेला आव्हान देऊन हे नाकारणाऱ्या दुसऱ्या पंथाचा मार्ग दाखवला. पण रेनेसन्स म्हणजे प्रबोधनाच्या चळवळीमुळे युरोपात नवयुग अवतरले. या क्रांतीने सतराव्या शतकात युरोपने कला, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रांत जी अभूतपूर्व उंची गाठली, तिचा पाया घातला. वैचारिक स्वातंत्र्य आणि माणूस केंद्रस्थानी मानला गेल्याने वैज्ञानिक दृष्टीकोन आणि व्यक्तिगत प्रतिभा बहरू लागली. या विज्ञानयुगाचे लेखकाने म्हटल्याप्रमाणे तळपते सूर्य होते कोपर्निकस, केपलर, गॅलेलिओ आणि न्यूटन.

वैज्ञानिक शोधामध्ये प्रामुख्याने पाश्चात्त्य शास्त्रज्ञांचे योगदान अधिक दिसते. उदाहरणार्थ, पायथागोरस, कोपर्निकस, गॅलेलिओ, न्यूटन इत्यादी. अगोदर लागलेल्या शोधाचा फायदा पुढील शोधांत झालेला दिसतो. विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य आहे, पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. या कोपर्निकसच्या शोधाच्या पुढे जाऊन केपलरने म्हटले की, ग्रहांच्या फिरण्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबगोलाकार असते. गॅलेलिओने त्याच्या पुढे जाऊन स्थितिस्थापकतेच्या नियमाचे कोडे सोडवले व तापमानमापक, थर्मामीटर, दूरदर्शन, दुर्बीण आणि टेलीस्कोपचा शोध लावला. न्यूटनने त्यावर कळस चढवून गुरुत्वाकर्षणाचे नियम मांडले.

इस्लामला विवेकवाद वर्ज्य आहे अशा भ्रमात आपण असतो, परंतु 'इस्लाम आणि विवेकवाद' या प्रकरणात त्यांनी 25 पेक्षा अधिक विवेकवादी विचारांचा परामर्श घेतला आहे. त्यात इस्लामिक शास्त्रज्ञांच्या नावावरही बरेच शोध दिसतात. जबीर इब्न हयान याने धातूंची भूशास्त्रीय निर्मिती प्रक्रिया आणि सल्फर मर्क्युरी याचा शोध लावला. अबू मशर याने अरब खगोलशास्त्राचा पाया घातला, तर अल क्वारीझमी याने बीजगणिताला जन्म दिला. वैद्यक शास्त्रात तर मुस्लीम अरबांनी उंच झेप घेतली. देवी, कॉलरा, गोवर, प्लेग अशा रोगांवर संशोधन करून हे आजार सांसर्गिक असल्याचे त्यांनी प्रथम मांडले. तसेच आजारांना नैसर्गिक कारणे जबाबदार असतात हे मांडले. इब्न रश्द उर्फ ऑव्हरेझ हा दृष्टीपटलाचे महत्त्व मांडणारा जगातील पहिला वैद्य. तसेच अर्धांगवायूचा झटका हा मेंदूत रक्त पुरवठा खंडित झाल्याने येतो हेही त्याने सांगितले. तसेच 'विवेकाचा स्त्री रंग' या प्रकरणात अशाच वीसएक स्त्री यात्रींचा धांडोळा घेतला आहे. अर्थात यामध्ये मैत्रेयी, गार्गी इत्यादी प्राचीन भारतीय स्त्री यात्रींचाही समावेश आहे.

'विवेकाच्या पूर्वरंगा'मध्ये वेदानुकूल विचारप्रवाहाप्रमाणेच लोकायत, चार्वाक, जैन, बौद्ध या वेदविरोधी संत परंपरेतील बसवेश्वर, चक्रधरस्वामी, कबीर आणि सर्वसमावेशक संस्कृतीचे वारकरी पंथातील ज्ञानदेव, तुकाराम यांचाही समावेश आहे. भारतीय प्रबोधन युगात राजाराम मोहन रॉय पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भविष्यवेधी विवेकवाद्यांचा विस्तृतपणे परामर्श घेतलेला आहे. लेखकाने म्हटल्याप्रमाणे काही व्यक्ती वगळणे साहजिक असले, तरी तामिळनाडूचे पेरियार रामस्वामी रायकर या प्रखर बुद्धिवाद्याचा, सत्यशोधक समाजाच्या चळवळीसंदर्भात फक्त केलेला नामोल्लेख फारच अपुरा वाटतो. आणि चळवळीच्या स्वरूपात प्रबोधन करताना प्राणाची बाजी लावणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा समावेश राहून जाणे मनाला चटका लावून जाते. 'विवेकाचा कृष्णरंग' या प्रकरणात आपल्याला माहिती असलेल्या मार्टिन ल्युथर किंग ज्यू. यांच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या कृष्णवर्णीय तत्त्वज्ञांची दखल घेतली आहे. तर रिचई डॉकिंस सारख्या एकविसाव्या शतकातील नास्तिक तत्त्वज्ञांचा आवर्जून उल्लेख आहे.

डॉ. अभिजित वैद्य यांना सर्वच विषयांत असलेला रस आणि त्या संबंधीचे त्यांचे अफाट वाचन यांमुळे तत्त्वज्ञानासारख्या विषयाचा वेध घेताना त्यांचे विंदा करंदीकरांच्या 'अष्टदर्शनाकडे' लक्ष जाणे साहजिकच होते. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी 1. देकार्त 2. स्पिनोझ 3. कान्ट 4. हेगेल 5. शोपेनहैएर 6. नित्शे 7. बर्गसॉ हे पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते आणि चार्वाक हा भारतीय विवेकयात्री यांच्या तत्त्वज्ञानाचे सार अतिशय थोड्या शब्दात काव्य रूपाने मांडले आहे. डॉ. अभिजित वैद्य यांनी या ग्रंथात पाश्चात्त्य तत्ववेत्त्यांच्या विचारांची चर्चा करताना करंदीकरांच्या अष्टदर्शनासंबंधित काव्यपंक्ती उद्धृत करून मोठे औचित्य साधले आहे. त्यामुळे माझ्या अष्टदर्शनाच्या आकलनाला अधिक स्पष्टता आली आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला. या तत्त्ववेत्त्यांच्या दर्शनाचे सार इतक्या कमी शब्दांत सांगणे किती अवघड होते याची जाणीव झाली आणि विंदा करंदीकरांना या लेखनामुळे मिळालेल्या 'ज्ञानपीठ' पुरस्काराचे महत्त्व लक्षात आले.

या विवेकवादाच्या प्रवासात अनेक विवेकयात्रींनी ईश्वरावर आणि धर्मावर श्रद्धा ठेवूनही विवेकवादाची आणि बुद्धिवादाची भलावण करण्याची कसरत केली. तर काहींच्या मते, अशा श्रद्धा याच मुळी मानवाच्या प्रगतीच्या आड येणारी धोंड आहेत. या संदर्भात उत्तर आधुनिकतावाद आणि विरचनावाद याचा प्रवक्ता जॅक्स देरिदा यांचे मर्मग्राही चिंतन पाहणे उद्बोधक आहे. ते म्हणतात, “धर्म हा मानवी जीवनाचा स्पष्ट अर्थ, हेतू आणि निश्चितता यांच्यासाठी भक्कम पाया निर्माण करू शकत नाही, उलट सर्व धर्मांना याबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे वावडे आहे. ज्या श्रद्धेत चिकित्सेला जागा नाही ती श्रद्धा धोकादायक रूप धारण करते. जागतिकीकरण आणि संपर्क यंत्रणेच्या आधुनिकीकरणामुळे जग जसे जवळ येत आहे, तसा जगाला साधेपणा, स्पष्टता आणि निश्चितता यांचा ध्यास लागलेला आहे. पण यातूनच सांस्कृतिक कर्मठपणा आणि धार्मिक मूलतत्त्ववाद वाढत आहे. यामुळे जगातील मोठ्या धर्माचे दुराग्रही धर्माभिमानी, अनुयायी या जगाची लक्तरे करण्याचा धोका निर्माण होतो. अंधश्रद्धेवर उपाय श्रद्धाहीन बनणे हा नसून, अशा श्रद्धा स्वीकारणे की ज्या अनिश्चितता स्वीकारतात, दुसऱ्या श्रद्धांना समजून घेतात, त्यांचा आदर करतात. या गुंतागुंतीच्या जगात जे ज्ञात नाही, ते ज्ञात करून घेण्यास शहाणपण आहे. यामुळे भविष्याच्या वाटचालीचे रस्ते उघडले जातील."

हजारो वर्षांपासून चालत आलेल्या विवेकवादाच्या प्रवासाचा धांडोळा घेताना 'विवेकाच्या प्रकाशाची परीक्षा' अद्याप संपलेली नाही, याची जाणीव लेखकास आहे. त्या बाबतचे त्यांचे चिंतन अतिशय मूलगामी आहे. ते म्हणतात, "खऱ्या विवेकवादी समाजाची निर्मिती कशी होईल, हा प्राचीन काळापासून माणसाला भेडसावणारा पहिला प्रश्न आहे. विवेकवाद हे एक निश्चित साध्य आहे की ती एक चिरंतन चालू राहणारी प्रवाही प्रक्रिया आहे, हा दुसरा प्रश्न आहे. उदारमतवादी, पुरोगामी किंवा डावी विचारसरणी हे त्यावर उत्तर असेल का, हा तिसरा प्रश्न आहे. या साऱ्याचा शोध घेत जगातील तत्त्ववेत्ते आणि विवेकवादी पुढे जात राहतात. आणि जगापुढे नवी आव्हाने उभी राहतात किंवा जग उलट्या दिशेला घसरू लागते." या परिस्थितीला ते ग्रीक पुराणामधील 'सिसिफसची' उपमा देतात. ज्या प्रमाणे सारे आयुष्य सिसिफस ती शिळा डोंगराच्या माथ्याकडे ढकलत राहतो, एकाच दुर्दम्य आशेने की कधीतरी डोंगरमाथा गाठता येईल. डॉ. वैद्य अशी आशा करतात की, विवेकवाद ही सिसिफसची शिळा ठरू नये यासाठी विवेकवादाला चिरंतन मूल्यांच्या पायावर उभे करावे लागेल, इतिहासाचे भान ठेवून व भविष्याचा वेध घेत ते म्हणतात, "त्यासाठी धर्म नाकारावा लागेल, देव नाकारावा लागेल."

डॉ. वैद्य यांच्या या ग्रंथ निर्मितीने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. पाच हजार वर्षांच्या कालखंडातील बहुतांश विवेकवाद्यांचा एकत्रित धांडोळा पाहता अशा ग्रंथाचे इंग्रजीत व इतर भाषांत भाषांतर होणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षणक्रमात अभ्यासक्रमाखेरीज वाचावयाच्या पुस्तकांमध्ये अशा पुस्तकाचा समावेश होणे हे लोकशाही प्रणाली अधिकाधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असणारा हा ग्रंथ तर त्यांच्या दृष्टीने निश्चितच संग्राह्य आहे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके