डिजिटल अर्काईव्ह

एका कंपनीत वापरात असलेली महाग यंत्रे दिवसातील किती तास काम करतात ? किती वेळ बंद असतात ? कोणत्या कारणाने बंद असतात? याचा नीट विचार झाला नव्हता. मी समजावून सांगितले की, महाग मशीन एक तास बंद असण्यापेक्षा एक जादा कामगार नेमणे परवडते. मी प्रत्येक मशीनच्या वापराचा डेटा गोळा केला. या सर्वांचा एकत्रित विचार केला. यंत्राकडून पुरेपूर काम करून घेण्यासाठी काय केले पाहिजे हे ठरवले. आणि आश्चर्य म्हणजे तीन यंत्रे अनावश्यक ठरली. ती अन्य कारखान्यात पाठवून दिली. घसघशीत रक्कम वाचली. यंत्र जितके महाग तितके ते पूर्णवेळ कामामध्ये ठेवण्यासाठी जास्त काळजी घेणे आवश्यक.

माझ्या नव्या मित्राचे नाव यम. तो अभंग लिहितो. मी म्हणालो, "अरे तुझे नाव काय, त्याचा लौकिक काय. माणसांचा जीव घेणे तुझे काम. आणि हे कसले पोचट छंद ? अभंग लिहितो म्हणे".
यम हसला. "माणसांचा जीव घेणे राहू द्या. निर्जीव यंत्राचा जीव जाऊ लागला तरी माझा जीव कासावीस होतो".
"निर्जीव यंत्राचा जीव ही काय भानगड ?"
"अहो यंत्रे मोडली, काम करेना झाली, म्हणजे मृत्यूच ना. कारखाना नीट चालला नाही तर त्याचा जीव गेला असेच म्हणावे. कंपनीला नीट नफा झाला नाही तर जीव गेल्यातच जमा ना."
"खरे आहे तुझे म्हणणे." पण करणार काय ?
"असे म्हणू नका. या सगळ्यांचा मी डॉक्टर आहे. मी तेथे जातो. काय गडबड आहे ते शोधतो. उपाय करतो. हेच तर माझे काम. आणि अभंगसुद्धा त्यावरच. वाटल्यास त्यांना दुरुस्तीचे अभंग असे म्हणा."
"झकास. ऐकव तरी काही."

"ऐका. प्रथम अडचणीची व्याख्या. 
अपेक्षा-वास्तव, फरकाची जाण। 
हाच मूळ गुण, समस्येचा ।।1।।"

"प्रश्न कळला. उत्तर काय ?" 
"समस्येच्या आधी, शोधता कारण। 
तया निर्मूलन, प्रतिबंध।।2।।"

"खरे आहे बाबा. पण सगळी काळजी घेऊनही घोटाळे होतातच ना?"
"समस्या ही येता, लगबग व्हावी. 
व्यवस्था करावी. दुरुस्तीची।।3।।"

"हे तर आम्ही करतोच. त्यात काय विशेष ?" 
"दुरुस्तीने होतो, समस्येचा नाश. 
कारणाचा अंश, तो ना मरे।।4।।"

"यावर उपाय काय ?" 
"दुरुस्तीनंतर, शोधा एकचित्ती 
खोली आणि व्याप्ती, कारणांची।।5।।"

"कारणे सापडली. त्यांचा निचरा केला. आता संपले ना?"
"कारणे मिटता. मोद गगनात 
नको एवढ्यात, समाधान।।6।।"

"आता आणि काय उरले?" 
"समस्या सुटता, नको ते पोवाडे. 
काढी धिंडवडे. परतोनी ।।7।।"

"मग काय करायचे?" 
"मानवी मर्यादा। ध्यानी असू द्यावी। 
वृत्ती बाळगावी । साधकाची ।।8।।" 

"पटले बाबा तुझे तत्त्वज्ञान." 
"यम उकलितो । समस्येचे गूढ । 
गुरुविना मूढ । 'श्याम' शिष्य ।।9।।"

मी टाळ्या वाजवल्या. "कुठे शिकलास रे हे सगळं ? व्ही. जे. टी. आय. कॉलेजात ?"
"अहो, मी ओतूरच्या शेतकऱ्याचा पोर. घरात हरिपाठाचे अभंग, कीर्तन, प्रवचन, वारी, हे वातावरण. यातूनच अभंगाचं वेड. ही बघा माझ्या गळ्यातली माळ."
"मग इंजिनिरिंग कॉलेजातसुद्धा अभंग रचत होतास की काय ?"
"रचतही होतो आणि इतरांना रचायला सांगतही होतो."
"कोणाला जुंपलेस बाबा या उद्योगात ?"
"गोदरेज अँड बॉईस या कंपनीतील कामगारांना."
"तिथे कसा पोहोचलास?"
"आमचा सँडविच कोर्स होता ना. त्यात सहा महिने कारखान्यात काम करायचे असे. आमच्या प्रॉडक्शन इंजिनिअरिंग बॅचमध्ये मला गोदरेज अँड बॉईस या कंपनीत संधी मिळाली."
"बरं. मग ? तिथे तुला कामगारांना अभंग शिकवायला सांगितलं की काय ?"

"नाही हो. निमित्त भलतेच झाले. कोणी जपानी तज्ज्ञ आला होता. आणि. '5 S' नावाच्या तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग देणार होता. कंपनीत कोणालाच रस नाही. म्हणून त्यांनी आमच्यासारख्या चार टाळक्यांना दिले धाडून. मी ठरवले ही संधी आहे. तिचा पूर्ण फायदा घ्यायचा. साधक वृत्तीने वागायचे. आधी तयारी करायची. म्हणून लायब्ररीत गेलो. 'SS' या विषयावरची पुस्तके शोधली. हीरानो नावाच्या लेखकाचे पुस्तक हातात पडले. झपाटल्यासारखे ते वाचून काढले. निश्चय केला की, हीच पद्धत इथेच अमलात आणायची.

ट्रैनिंग च्या शेवटी मॅनेजरकडे गेलो. त्यांना माझी इच्छा सांगितली."
"तुला मी परवानगी देत नाही. पण अडवणार नाही. कुठे गडबड होता कामा नये."
पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी काम सुरू केले. शॉपफ्लोरवरच्या कामगारांशी दोस्ती केली. मग कामगार प्रकल्पात खुशीने सामील झाले. भराभर प्रगती झाली. 5S चे परवलीचे शब्द सांगतो.
मूळ शब्द जपानी. त्याला साहेबाने इंग्रजी पर्याय काढलेला. अखेर आपल्या मायमराठीमधला पर्याय.

  सेइरी नको ते काढा    सैतोन गरजेनुसार मांडा    सैसो स्वच्झता, चमक   सैकेतसु परमाणीकरण    शतिसुके सवय लावा

कचरा हलवला. वस्तू नीट मांडल्या. सफाई केली. रोजच्या रोज हे काम सुरू केले. कोणीही सांगितल्याविना काम. कामगारांची सोय झाली. काम सोपे झाले. कोणी न सांगता 5S चा फायदा दिसू लागला. त्यावर कामगार कवने करू लागले. आम्ही ती छापून कामाच्या जागेवर चिकटविली.

यंत्राची अन् कार्यस्थळाची 
असेल जर सुस्थिती. 
नाहिच भीती अपघाताची
ना कामाची खोटी।।1।। 
सामानाची जागा नीट 
नको शोधणी. वा पायपीट ।।2।। 
नकोच कचरा, नकोच घाण 
आरोग्याचा मंत्र महान ।।3।। 
घरामधे वा ऑफिसमधे 
हाउसकीपिंगविन हो वांधे ।।4।। 
ठेवायचे जर, वेळाचे भान 
वस्तूंना द्या ठरावीक स्थान ।।5।। 
यंत्रावरती अधूनमधून, फिरवा तुमचा हात 
होणार नाही कधीच तुमचा यंत्राकडुनी घात ।।6।। 
काम समय पर यदी हो करना 
हाउसकीपिंग का सहारा लेना ।।7।।

त्या छोट्याशा जगात जणू नवी पहाट आली. हळूहळू अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले की, काहीतरी बदल घडतो आहे. कामाची सफाई, वेग वाढले. तेही जादा खर्चाविना.

आपले कामगार कवने करतात? अधिकारी चकित झाले.

खरे बोलायचे तर कोणी त्यांच्याकडे प्रेमाने बघत नाही. त्यांच्या अडचणी समजावून घेत नाही. संसाराच्या समस्या. मुलीचे लग्न होत नाही. मुलगा नशापाणी करतो. बायकोची आजारपणे फार आहेत. एक ना दोन. विशीतल्या मुलाने त्यांना थोडा जिव्हाळा दिला. मोठा परिणाम झाला.

या सगळ्याचा रिपोर्ट तयार झाला. कॉलेजात परत आल्यावर रिपोर्टवर परीक्षा झाली. परीक्षक चकित झाले. भरपूर मार्क मिळाले. श्याम तळवडेकर एक परीक्षक. त्यांनी नोकरी देऊ केली. मी नाकारली, कारण मला टेल्कोमध्ये आधीच नोकरी मिळाली होती.

हे गृहस्थ म्हणजे प्रसिद्ध काईझन (सतत सुधारणा) कोच. बऱ्याच पुस्तकांचे लेखक. मोठी कीर्ती. यांची ऑफर नाकारली ? टेल्कोमध्ये अधिकारी मला हसले. चूक उमगल्यावर. मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, "सुट्टीच्या दिवशी येऊन काम कर".

त्यांनी दिलेले पहिले काम म्हणजे थरमॅक्स नामक कंपनीमध्ये माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टवर दोन तास व्याख्यान देणे. त्यांच्यामुळे मला अनेक प्रकारच्या समस्यांवर काम करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला त्यांचा शिष्य मानतो.

यथाकाळ मी स्वतंत्रपणे कन्सलटंसी काम सुरू केले.

"वा वा. आता मला वेगवेगळ्या कामांबद्दल थोडक्यात माहिती दे. गणित केलेस. प्रोग्रॅम लिहिलेस. इक्वेशन मांडलेस. हे सगळं सोड. आम्हा अज्ञानी मंडळींना समजेल अशा भाषेत सांग."

"सांगतो ऐका."

कोणाला वाटेल घरोघरी त्याच परी. पण तसे नाही. प्रत्येक कारखान्यात वेगळ्या अडचणी आणि वेगळी उत्तरे.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर्व तांत्रिक तपशील टाळून सांगतो.

1. एका कंपनीमध्ये वस्तू बनवण्यासाठी वेगवेगळी यंत्रे वापरली जात. कदाचित, एका वेळी एक अशी यंत्रांची संख्या वाढत गेल्यामुळे त्यांच्या स्थानांची निवड फार तर्कशुद्ध नव्हती. याचा काय परिणाम ? एका यंत्रावरील काम संपल्यावर ती वस्तू उचलून पुढच्या कामासाठी दुसऱ्या यंत्रापर्यंत पोहोचवावी लागे. यात वेळ आणि कष्ट बराच खर्च होई. याऐवजी त्यांच्यातील अंतरे योग्य रीतीने ठरवली. यामुळे. वेळ आणि कष्ट वाचले. जागा बदलण्याचा खर्च झाला. असे दिसते की तो खर्च परवडला. तुम्ही छोटे कारखानदार असाल तर लक्ष द्या. आपल्या उत्पादनामध्ये Single Piece Flow लागू होत आहे का? नसल्यास यंत्रांच्या जागा बदलणार का ? याला काय खर्च येईल ? यातून काही बचत होईल का? मुद्दा छोटा वाटला तरी दुर्लक्ष करू नये.

2. एका कंपनीत वापरात असलेली महाग यंत्रे दिवसातील किती तास काम करतात? किती वेळ बंद असतात ? कोणत्या कारणाने बंद असतात? याचा नीट विचार झाला नव्हता. मी समजावून सांगितले की, महाग मशीन एक तास बंद असण्यापेक्षा एक जादा कामगार नेमणे परवडते. मी प्रत्येक मशीनच्या वापराचा डेटा गोळा केला. या सर्वांचा एकत्रित विचार केला. यंत्राकडून पुरेपूर काम करून घेण्यासाठी काय केले पाहिजे हे ठरवले. आणि आश्चर्य म्हणजे तीन यंत्रे अनावश्यक ठरली. ती अन्य कारखान्यात पाठवून दिली. घसघशीत रक्कम वाचली. यंत्र जितके महाग तितके ते पूर्णवेळ कामामध्ये ठेवण्यासाठी जास्त काळजी घेणे आवश्यक.

3. आता एक उदाहरण वाहतूक खर्चाबाबत. एका कंपनीमध्ये सहा ट्रक वाहतूक काम करीत. ग्राहकाकडे उत्पादन पोहोचवणे आणि कच्चा माल गोडाउनमधून आणणे ही दोन मुख्य कामे. एकूण 300 ठिकाणांकडे जाणे-येणे होते. ट्रकांच्या वापराचा डेटा मी तपासलेला. काही वेळा ट्रक रिकामे परत येत. काही वेळा अर्धा भरलेले जात. एकूण दिसले की, येथे बचत शक्य आहे. मग ट्रक वापरासाठी नवीन नियम केले. सहाऐवजी चार ट्रकमध्ये काम भागले. दोन ट्रक अन्य कामांसाठी पाठवून दिले.

4. पुढचे उदाहरण ओव्हरटाइमबद्दल. अकाउंट खात्याच्या मते फार लोक ओव्हरटाइम करतात. कामगार साडेपाच वाजता काम बंद करीत तेव्हा त्यांना नेणारी बस सुटे. काही जण साडेसात वाजेपर्यंत थांबत. तेव्हा दुसरी बस मिळे. कोण कोणत्या दिवशी उशिरापर्यंत थांबले हा एक भाग आणि त्या माणसाची व्यक्तिगत माहिती हा दुसरा भाग. दोन्हीचे एकत्र अॅनॅलिसिस केले. असे लक्षात आले की, उशिरापर्यंत थांबणारी मंडळी बहुतेक तरुण, अविवाहित पुरुष होते. त्यांना घरी जाण्याची घाई नसे. ते साडेसहाचा नाश्ता मजेत खात आणि नंतर साडेसातच्या शटल बसने घरी जात. मी एक साधा उपाय सुचवला. जादा थांबण्यासाठी प्रत्येकाने त्याच्या सुपरवायझरकडून सहमती मागितली पाहिजे. एवढ्याने ज्यादा थांबणे 70 टक्के घटले.

5. या कंपनीची समस्या होती कामगार उशिराने कामावर येण्याची. त्यामुळे महागडी यंत्रे खोळंबून राहत. त्यांचा वेळ फार मोलाचा. तो फुकट जाणे म्हणजे मोठा तोटा. हे टाळण्यासाठी वेळेवर येणारांना छोटासा बोनस देऊ केला. उपयोग झाला.

6. पुढचे उदाहरण वीज वाचवण्याचे. सगळ्या वर्कशॉपमध्ये छताला चिकटलेले मोठ्या शक्तीचे महागडे दिवे होते. विजेवरही बराच खर्च होई. कामाच्या टेबलावर अमुक इतका लख्ख उजेड हवा अशी गरज होती. त्यासाठी एवढ्या मोठ्या शक्तीचे दिवे हवेत का? छतापासून टांगून टेबलाच्या थोड्या जवळ दिवा ठेवला तर जमेल ना? एक छोटासा अभ्यास केला. दिवा छतापासून कमी-अधिक उंचीवर ठेवणे. कमी-अधिक शक्तीचा दिवा लावणे. उजेड पुरेसा मिळाला पाहिजे आणि खर्च ही कमी झाला पाहिजे अशी रचना सापडली. या अभ्यासाला म्हणायचे स्टॅटिस्टिकल डिझाइन ऑफ एक्सपेरिमेन्ट.

7. असा एक प्रयोग फाउंड्रीमध्ये केला. इंजिनचा काही भाग ओतकामाने तयार करण्याचा धंदा होता. वितळलेल्या धातूमध्ये थोडे तांबे टाकण्याची पद्धत होती. तांबे फार महाग झाल्यानंतर ही पद्धत अडचणीची ठरली. मी म्हटले, तांबे टाकू नका. फाउंड्री मॅनेजर म्हणाला. ओतकामाने बनवलेल्या वस्तू चांगल्या नसल्या तर कोण जबाबदार? मी म्हणालो, आपण प्रयोग करू या. मोठ्या कष्टाने तो तयार झाला. आम्ही तांब्याचे प्रमाण थोडे थोडे कमी केले. प्रत्येक वेळी उत्पादनाची कसून तपासणी केली. कुठलेच उणेपण दिसले नाही. अखेर तांबे टाकणे थांबवायचे असा निर्णय झाला. चालत आलेली प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे अशी समजूत ठेवू नये. प्रयोग करून पाहावा.

8. आता कामगार आरोग्याकडे वळतो. एका कंपनीमध्ये दरवर्षी आरोग्य तपासणी होत असे. त्या डेटाचे अॅनालिसिस नव्याने केले. लठ्ठपणा आणि पोट सुटणे हा दोष अनेकांमध्ये होता. याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो असा माझा अंदाज होता. यावर उपाय म्हणून फिटनेस कार्यक्रम सुरू केला.

9. दुसऱ्या एका ठिकाणी स्त्रियांच्या आरोग्य आकडेवारीचा अभ्यास केला. 50 टक्के मुली अॅनिमिक होत्या. त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू केले.

10. पुढचे उदाहरण इन्व्हेंटरी. कारखान्यामध्ये जेवढा अधिक माल खरेदी करून ठेवाल तेवढे भांडवल अडकून राहते. त्या काळाचे व्याज फुकट जाते. म्हणून इन्व्हेंटरी कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. एका कंपनीमध्ये कच्चा माल महिन्यातून एकदा ऑर्डर करीत असत. याचा अर्थ त्या वस्तू महिनाभर पडून राहत. एका वेळी एक आठवड्याचा माल का येत नाही, हा प्रश्न मी उपस्थित केला. असे दिसले की, पुरवठा करणाऱ्याला काहीच अडचण नाही. महिन्यातून चार वेळा ट्रक पाठवावा लागेल. वाहतूक खर्च वाढेल. आम्ही हिशोब केला की, भांडवल आणि व्याज यांतील बचत वाहतूक खर्चापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणून दर सोमवारी ऑर्डर देण्याचा परिपाठ सुरू केला. पैसे वाचले. साठवणीची खटपट वाचली.

"पुरे झाली का उदाहरणे?"
"हो, पुष्कळ. झाली. आता सांग की, यातून एकंदर कोणता धडा शिकायचा?"
"सांगतो. धडा असा की, कारखान्यांच्या बऱ्याच प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी इंजिनिअरिंगपेक्षा डेटा अॅनॅलिसिसची गरज जास्त असते. माझ्या हाताखाली असलेल्या 20 लोकांपैकी 10 लोक संख्याशास्त्रज्ञ आहेत."
"या विषयातील कोणत्या गोष्टी विशेष उपयोगी पडतात?"
"रिग्रेशन अॅनॅलिसिस, डिजाइन ऑफ एक्स्पेरिमेंट्स, सॅम्पलिंग, मॉडल बिल्डिंग, सिम्युलेशन. इत्यादी."
"हे तू कोठे शिकलास? इंजिनिअरिंग कॉलेजात का?"
"नाही. त्यासाठी मी सिक्स सिग्मा नावाचा कोर्स केला. हे शिक्षण घ्यावे असा सल्ला मला माझे मार्गदर्शक हेमंत ऊध्र्वरेषे यांनी दिला. ते इन्स्टिटयूट फॉर क्वालिटी ऍण्ड रिलाएबिलिटी नावाची संस्था चालवितात."
"मग त्यांना या मार्गाने जावे अशी बुद्धी का झाली?"
"त्यांचे डॉक्टर ए.डी. धर्माधिकारी नावाचे सल्लागार होते."
'कोठे?'
"कमिन्स कंपनीत. मुळामध्ये डॉक्टर धर्माधिकारी पुणे विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्रोफेसर होते. ते कारखान्यांना कन्सल्टंट म्हणून काम करीत. त्यापैकी एक कमिन्स. ही कामे बरीच वाढली आणि अखेर त्यांनी विद्यापीठ सोडून टेल्कोत जनरल मॅनेजर, रिलायबिलिटी या पदावर नोकरी घेतली."
"अरे वा. म्हणजे तू एका अर्थाने पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभागाचा अप्रत्यक्ष विद्यार्थी आहेस."
"खरे आहे. माझ्यावर त्यांचे ऋण आहे. म्हणून मी संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना इन्टर्नशिपवर घेतो."
"छोटे कारखानदार आणि व्यावसायिक. यांच्याबद्दल तू काय सांगशील?"
"ही मंडळी गांजलेली असतात. ऑर्डर मिळवणे, ती पुरी करणे, सरकारी बंधनांचे पालन करणे, या सगळ्या जबाबदाऱ्यांनी माणसे थकून जातात. आपण वर पाहिले त्या प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नसते. म्हणून माझ्यासारख्या कन्सल्टंटला बोलवावे लागते."
"तुझ्यासारख्या कामाला. मला स्कोप किती ?"
"अशा सल्लागारांची गरज खूप आहे. त्यासाठी थोडी इंटरडिसिप्लिनरी दृष्टी असणे गरजेचे आहे. इंजिनिअर लोकांनी स्टॅटिस्टिक्स शिकले पाहिजे किंवा स्टॅटिस्टिक्सच्या मंडळीनी कारखानदारीचा अनुभव घेतला पाहिजे. नेमके हेच आपल्याकडे घडत नाही.
कदाचित, नव्या शिक्षणाच्या धोरणामुळे यात बदल होईल. छोटी कारखानदारी तरुणांना बराच रोजगार देते. शेती, बांधकाम या दोन क्षेत्रांनंतर रोजगाराची सर्वांत मोठी संधी छोट्या कारखानदारीत आहे. हे उद्योग उत्तम चालले, भरभराटले पाहिजेत.
तुम्ही असे उद्योजक असाल, तुम्हाला अडचणी असतील, तर आमच्या यमासारख्या सल्लागाराचा उपयोग करून घ्या. त्याचे नाव यशवंत महाकाल. टेलीफोन नंबर 9960270692
कंपनीचे नाव इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स, पुणे.
अमेरिकेतील एका परिषदेत आपल्या कामाचे स्वरूप वर्णन करून सांगण्यासाठी यशवंत महाकाल यांनी प्रस्ताव पाठवला. त्या प्रस्तावाचे परिषदेच्या तज्ञानी तोंड भरून गुणवर्णन केले. ते पुढे देत आहे.
'This is an outstanding submission. The proposal presents a deeply insightful and structured approach to overcoming the well-known challenges of lean six sigma adoption in small and medium-sized enterprises.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी