14 जानेवारी 1896 ते 2 ऑक्टोबर 1982 असे 86 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ सी.डी. देशमुख यांची ठळक ओळख भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि 1950 ते 56 या काळात भारताचे अर्थमंत्री अशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही राहिले. 'द कोर्स ऑफ माय लाईफ' हे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक 1976 मध्ये प्रकाशित झाले. तो मराठी अनुवाद 1977 मध्ये ओरिएंट लाँगमन प्रकाशनाकडून "माझा जीवन प्रवाह" या नावाने आले, तो अनुवाद वि.वा. पत्की यांनी केला. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ते पुस्तक दीर्घकाळ आउट ऑफ प्रिंट होते, त्याची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून मार्च 2026 मध्ये येत आहे. त्या पुस्तकातील तिसरे प्रकरण (अंशतः संपादित करून) येथे देत आहोत.
अखेर सर्व तयारी झाली आणि राजाध्यक्ष व मी 15 मे 1915 रोजी कॅलेडोनिया या पी. अॅड ओ. च्या बोटीने इंग्लंडला जायला निघालो. बोटीच्या तळभागात आम्हा दोघांना एक केबिन मिळाली होती. तेथे भयानक उष्णता होती. पावसाळा जवळ आल्यामुळे अरबी समुद्र खवळलेला होता. त्यामुळे हा प्रवास मोठा कष्टदायक वाटला, पण राजाध्यक्षांपेक्षा मला या समुद्रप्रवासाचा थोडा कमीच त्रास झाला.
बोटीवर कोणीही भारतीय प्रवासी भेटल्याचे मला काही आता आठवत नाही. बोटीवरच्या एका खलाशाशी आमची थोडी ओळख झाली, तरी त्याचे उच्चार काही नीट समजत नव्हते. मे महिन्याच्या अखेरीस आम्ही मार्सेलिसला उतरलो आणि एका वाटाड्याच्या बरोबर गावात गेलो. तो आम्हाला प्रथम टेकडीवरच्या एका प्रार्थनामंदिरात घेऊन गेला आणि इतरही काही ठिकाणे त्याने आम्हाला दाखविली; पण आम्हाला आपल्या एका मैत्रिणीकडे घेऊन जायचे जेव्हा तो सांगू लागला आणि तेथे आमचे आगत स्वागत फार चांगले होईल असे म्हणू लागला, तेव्हा आम्ही अननुभवी असलो तरीही जरा साशंक झालो आणि आम्हाला आमच्या गाडीवर घेऊन चल असे त्याला सांगितले. कॅलेपर्यंतचा प्रवास मग निर्वेध झाला. बरोबरचे फ्रेंच सहप्रवासी मोठे मनमिळाऊ होते. जेवणानंतर त्यांनी आम्हाला मद्यही देऊ केले. आम्ही ते आभारपूर्वक नाकारले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि आम्ही 'आम्हांला पाणी हवे' असे म्हटले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. 'काय ? पाणी हवे? आम्ही तर फक्त अंघोळीसाठी पाणी वापरतो!' असे त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. पाणी शुद्ध असेलच अशी खात्री देता येत नाही आणि ते पिणे निर्धोकही नाही, असेही ते म्हणाले. त्यांच्याच सल्लल्यावरून मग आम्ही खनिज जल घेतले. अजूनही फान्समध्ये जे लोक मद्याला शिवत नाहीत ते लोक हेच पाणी वापरतात.
आम्ही टिलबरीला 1 जून 1915 रोजी उतरलो तेव्हा आम्ही ज्यांच्याकडे उतरणार होतो ती मंडळी आम्हाला उतरवून घ्यायला आली होती. लेफ्टनंट कर्नल बखलेंची आणि राजाध्यक्ष कुटुंबाची ओळख होती. लेफ्टनंट कर्नल बखले लढाईवर गेले होते. त्यांच्या पत्नी आणि तीन मुलगे डलविच येथे राहात होते. मुले डलविचच्या शाळेत जाणारी होती. त्यांचा सर्वांत मोठा मुलगा नाना आमच्यापेक्षा थोडा लहान होता, दुसरा मुलगा भैय्या पंधरा वर्षांचा होता आणि तिसरा मुलगा बाबा अकरा वर्षांचा होता. यांतल्या बाबाने अत्यंत बुद्धिमान आणि चांगला विद्यार्थी म्हणून शाळेत नाव मिळविले होते. तो पुढे आय.सी.एस. झाला होता. पंजाबमध्ये नोकरीला लागला होता, पण त्याचे लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसांत अकाली निधन झाले. नाना आणि भैय्या हेही नोकरीला लागले होते. पुढे ते दिल्लीला भेटतही असत. अलीकडे मात्र बऱ्याच वर्षांत ते मला भेटलेले नाहीत. भैय्या अनेक विनोदी चुटके सांगत असे आणि त्यांतले काही अगदी अश्लील असत.
राजाध्यक्ष आणि माझी अशा रितीने इंग्लंडमधील वास्तव्यास सुरुवात झाली. आम्ही दोघेही आपापल्या घरापासून फार दूर गेलो होतो, पण मिसेस बखलेंच्या आदरातिथ्याचा अधिक फायदा घेणे आम्हांला इष्ट वाटले नाही. आम्ही दुसरीकडे राहावयास गेलो. जुलै ऑगस्ट महिन्यांतल्या एका रविवारी केंब्रिजला गेलो. क्लोकरूममध्ये आम्ही आमचे सामान ठेवून स्टेशनच्या बाहेर पडलो, पण कोठे जायचे हे माहीत नसल्यामुळे किंग्ज कॉलेजच्या समोरच्या रस्त्यावर जाऊन चौकशी करू लागलो. तेव्हा पलीकडच्या बाजूने एक भारतीय तरुण जात असलेला आम्हाला दिसला. आम्ही त्याला थांबविले आणि आम्ही कोण तेही त्याला सांगितले. तो म्हणाला, मी अमरावतीचा रामराव देशमुख. येथे सेंट कॅथरीन कॉलेजात शिकतो. त्याच्या या सांगण्याचा आम्हाला तिहेरी फायदा झाला. एक तर राजाध्यक्षांना सेंट कॅथरीन कॉलेजातच प्रवेश मिळाला होता. दुसरे असे की, देशमुख भेटल्यामुळे कोणीतरी आपला माणूस भेटल्याचा आनंद झाला होता. आणि तिसरे म्हणजे देशमुखने असेही सांगितले की, राज्याध्यक्ष आणि मी येणार असल्याचे अमरावतीच्या डॉक्टर नागूताई जोशी यांनी आपणाला कळविले होते आणि करता येईल तेवढी मदत करण्याबद्दलही लिहिले होते. या प्रसंगानंतर साहजिकच राहायच्या जागा शोधून काढणे, तेथे येऊन राहाणे आणि इतर काही भारतीयांच्या ओळखी होणे या गोष्टी अगदी सहज घडल्या.
या वेळी आय.सी.एस. साठी पदार्थविज्ञान हा एक विषय घेण्याची कल्पना माझ्या डोक्यात होती. जीझस कॉलेजात नाव घातल्यानंतर मी पदार्थविज्ञानाच्या प्रयोगशाळेत जाऊ लागलो आणि 'सायन्स ट्रॉयपॉज' च्या विद्यार्थ्यांचे प्रमुख अॅबट यांना भेटलो. या शास्त्रशाखेचे प्रमुख डॉक्टर सर्ल हे होते. त्यांची तांबडीलाल दाढी होती. एके दिवशी मी एका प्रयोगाची जुळवाजुळव करीत असताना डॉक्टर सर्ल माझ्या टेबलाजवळ आले आणि प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहत म्हणाले, "तू मोठा बुद्धिमान दिसतोस. तुझ्या डोळ्यांत बुद्धीची चमक आहे. मग हा प्रयोग तुला का लावता येत नाही?" माझ्या आयुष्यात माझ्या कोणत्याही शिक्षकाने माझी अशी खरडपट्टी काढलेली नव्हती आणि त्यामुळे मी तत्क्षणीच ठरवले की, पदार्थविज्ञान हा आपला विषयच नव्हे. मी पदार्थविज्ञानाची प्रयोगशाळा सोडली आणि पुन्हा तिकडे फिरकलोही नाही.
जीझस कॉलेजच्या वसतिगृहात मला पी. के. चारी नावाचा एक भारतीय विद्यार्थी आधीच भेटला होता. तोही माझ्याप्रमाणेच सायन्स ट्रायपॉज आणि आय.सी.एस. परीक्षा यांसाठी माझ्याआधी एक वर्ष आलेला होता. त्याचा सल्ला घ्यावा असे मला वाटले. पदार्थविज्ञानाच्या प्रयोगशाळेत जे घडले होते ते मी चारीला सांगितले आणि म्हणालो, "पदार्थविज्ञानाऐवजी वनस्पतिशास्त्र घेण्याचा माझा विचार आहे. रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे आणखी विषय." चारी हा सालेमच्या सुप्रसिद्ध विजयराघवाचारी यांचा नातू. माझे म्हणणे ऐकून जरा विचार करीत तो म्हणाला, "तुला चित्रे काढता येतात ?" मी म्हणालो, "नाही. ड्रॉइंगमध्ये मी काही फारशी प्रगती केलेली नाही." माझे हे म्हणणे ऐकून तो एकदम म्हणाला, "तर मग तुला वनस्पतिशास्त्रात कधीच पास होता येणार नाही. त्या विषयासाठी कितीतरी चित्रे काढावी लागतात." हे ऐकून मला धक्काच बसला. मला ज्यांतून निवड करता येईल असे विषय अगदी मर्यादित होते. प्राण्यांची चिरफाड करण्याची कल्पनाच मला आवडत नसल्यामुळे प्राणिशास्त्राचा तर मला विचारसुद्धा करता येत नव्हता. म्हणून फारशी खात्री वाटत नसताना आणि चारीने मित्रत्वाची सूचना दिली असतानाही मी वनस्पतिशास्त्र आणि भूगर्भशास्त्र हे विषय नॅचरल सायन्सेस ट्रायपॉजसाठी घेण्याचे ठरविले. पुढे वनस्पतिशास्त्रातील प्रावीण्याबद्दल फ्रैंक स्मार्ट प्राइझ मी मिळवीन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.
रामराव देशमुख यांनी माझी व राजाध्यक्षांची तेथे राहणाऱ्या भारतीयांशी लगेच ओळख करून दिली. यांच्यापैकी काही जण आय.सी.एस. पास झालेले होते आणि परीक्षेनंतरचा त्यांचा उमेदवारीचा अभ्यासक्रमही त्यांनी केंब्रिजला पुरा केला होता. ते सारे नोव्हेंबर महिन्यात भारतात परत जाणार होते आणि आपल्या नोकरीवर रुजू होणार होते. या लोकांत एस.पी.देसाई, बी. के. गोखले, आणि व्ही. एस. भिडे हे होते. या प्रारंभीच्या काळातच ज्यांच्याशी आमची ओळख झाली त्यांत व्ही. जी. दाणी आणि चुनीलाल अढिया हेही होते.
ईस्टबोर्न येथे मजेत सुटी घालवीत असतानाच रामराव देशमुखांनी आणि गायकवाड घराण्यातील मुलांनी मला धूम्रपानाचे पहिले धडे दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी पहिली सिगरेट ओढली. धूम्रपानाचे पहिले झुरके घेणाऱ्या प्रत्येक माणसाप्रमाणेच मीही मला हे आवडत नसल्याचे व कधी धूम्रपान केलेच तर ते केवळ इतरांना 'कंपनी' देण्यासाठी आपण करीत आहो असे भासविले. केंब्रिजला परत आल्यानंतर मी सिगरेटींचा टिन विकत घेतला आणि फळीवर ठेवून दिला तो केवळ पाहुण्यांसाठी म्हणून! पण सिगरेटींचा टिन अर्धवट फोडून ठेवला की आतल्या सिगरेटी सुकून जातात हेही बघवेना. म्हणून त्यांतल्या काही ओढणे आणि पाहुण्यांसाठी ताज्या आणून ठेवणे हे क्रमप्राप्तच झाले! पण सिगरेट ओढू नये हा लहानपणापासून मनात असलेला विचारच बळावत गेला आणि दिवसातून सात-आठपेक्षा अधिक सिगरेटी मी ओढीनासा झालो. त्यानंतर तर सिगरेटीच्या जोडीला पाइप आल्यामुळे सिगरेट ओढणे मर्यादेतच राहिले.
आम्हा (राजाध्यक्ष आणि मी) दोघांच्याही शिरावर अभ्यासाचा भार सतत असल्यामुळे यानंतरचे आमचे सुटीतले दिवस पहिल्यासारखे मजेत घालविता आले नाहीत. पण नॅचरल सायन्सेस ट्रायपॉजची (पहिला भाग) परीक्षा पास झाल्यानंतर थोडी उसंत मिळाली. अभ्यासासाठी तीन-चार तास रोज राखून ठेवायचे आणि मग उरलेला वेळ आम्ही क्रोमर, बक्सटन, शंकलिन आणि लिटन या ठिकाणी घालविला. लिटन येथील नाताळातली सुटी तर संस्मरणीय झाली. त्या वर्षी पाऊस पडला नव्हता आणि थंडीने गोठलेल्या बर्फामुळे सारे रस्ते आरस्पानी झाले होते. शेजारीच लोर्ना डूनचा प्रदेश होता. आम्ही समुद्रकिनाऱ्यावरून हल्फाकोंबकडे चालत जात असू तर कधी लिनमाउथकडे. लोर्ना डूनमधील विविध स्थळे कोठे कोठे आहेत हे पाहण्यासाठी पायपीट करीत फिरणे मोठे आल्हाददायक असे. थंडगार हवा आणि भरपूर फिरणे यामुळे सपाटून भूक लागत असे आणि लँडलेडीने सढळ हाताने वाढलेली डेव्हनशायरमधील प्रसिद्ध मलई कारणी लागत असे !
सप्टेंबर महिन्यात नवी टर्म सुरू झाली तेव्हा पुन्हा अभ्यासाला गंभीरपणे सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरू असल्यामुळे केंब्रिज रोडावले होते. ज्यांनी शास्त्रीय विषय घेतलेले होते किंवा जे व्यावसायिक शिक्षण घेत होते ते विद्यार्थी सोडून बाकीच्या साऱ्या विद्यार्थ्यांना लष्करी नोकरीत जावे लागले होते. कॉलेजातली विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ एकतृतीयांशावर आली होती. मी ज्या कॉलेजात शिकत होतो त्या जीझस कॉलेजात नेहमी सुमारे सातशे विद्यार्थी असत, पण आता ती संख्या अडीचशेवर आली होती आणि त्यामुळेच मला स्वत्रंत्र खोली मिळणे शक्य झाले होते. त्या वेळी केंब्रिजला परदेशांहून आलेले सुमारे दीडशे विद्यार्थी होते. त्यांतले बहुतेक भारतीय होते, पण काही सिलोनहून व काही वेस्ट इंडीजहूनही आलेले होते.
मॅट्रिकच्या वेळी खगोलशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि इंटरच्या वेळी पदार्थविज्ञान या विषयांशी माझी जरी थोडी तोंडओळख झाली होती, तरी 1917 च्या मे महिन्यात म्हणजे केंब्रिजचा कोर्स सुरू झाल्यानंतर वीस महिन्यांनी मला वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र या विषयांना बसायचे होते, म्हणून चांगली तयारी करावी लागलीच. सकाळी लेक्चर्स आणि दुपारी प्रॅक्टिकल्स. यामुळे फारसा मोकळा वेळ मिळत नसे. तरीही जो वेळ मिळे त्याचा उपयोग 1918 च्या ऑगस्टमध्ये आय.सी.एस.ला बसण्यासाठी मला ज्या जादा विषयांचा अभ्यास करायचा होता, त्या विषयांच्या अभ्यासासाठी केला. मी भूगोल या विषयातील पदविका घेण्याचे ठरविले शाणि बॅरिस्टरीच्या परीक्षेसाठी रोमन लॉ, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, हिंदू आणि मुस्लीम लॉ व क्रिमिनल लॉ यांचा अभ्यास करण्याचे ठरविले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, संस्कृत भाषा आणि साहित्य हे विषय मी आय.सी.एस.ला घेणार होतो. पण त्यांच्या अभ्यासाची एवढ्यातच काळजी करण्याचे कारण नव्हते. पण वैदिक व्याकरण, ऋग्वेदातील काही भाग, आणि संस्कृत साहित्याचा इतिहास हे विषय नवीन होते आणि त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक होते. आधुनिक इतिहास या विषयाची तशी काळजी करण्याचे कारण नव्हते. अर्थशास्त्र हा विषय नवीन होता आणि फारसा सोपाही नव्हता, पण त्यासाठी प्राध्यापक पिगू यांच्या लेक्चर्सना व त्यांच्या काही परिसंवादांना हजर राहणे यापलीकडे मी अधिक काही करू शकत नव्हतो. मुंबई विद्यापीठाची इंटरची परीक्षा अभिजात (क्लासिकल) भाषा घेऊन मी पहिल्या वर्गात पास झालेलो असल्यामुळे मला एक वर्षाची सूट मिळाली होती. दुसऱ्या वर्षाची नॅचरल सायन्सेस ट्रायपॉजची परीक्षा मे 1916 मध्ये झाली. मला पहिला वर्ग मिळाला आणि कॉलेजची वार्षिक चाळीस पौंडांची शिष्यवृत्तीही मिळाली. या बाबतीत केंब्रिज विद्यापीठातील आंतरकॉलेज कमिटीचे सेक्रेटरी बेनिअन्स यांनी माझ्या वडिलांना पत्र लिहिले होते. पण 1940 मध्ये ते आमच्या घरातल्या कागदांत सापडेपर्यंत मला हे माहीतही नव्हते.
लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स मला फार आवडत असत. भूगोलाची लेक्चर्सही मला आवडत. मला जो काही थोडा मोकळा वेळ मिळे त्याचा उपयोग मी भूगर्भशास्त्रावरील पुस्तके वाचण्यासाठी करीत असे. अशा रितीने अभ्यास करीत मी योग्य वेळी ट्रायपॉजच्या परीक्षेला बसलो.
या परीक्षेत मी चांगले यश मिळवीन अशी माझी अपेक्षा होती, पण परीक्षेच्या निकालाची मी काही मोठ्या अधीरतेने वाट पाहत नव्हतो. एके दिवशी जीझस कॉलेजमधील माझा मित्र पार्स माझ्याकडे आला आणि बाहेर खिडकीखालूनच त्याने मला विचारले, "आपला रिझल्ट लागला. तुला कळले का? तुला पहिला वर्ग मिळाला आहे." हे ऐकताच विद्यापीठाच्या सिनेट हाउसकडे निकाल पाहण्यासाठी गेलो. मला वनस्पतिशास्त्रातले फेंक स्मार्ट प्राइझही मिळाले होते. प्रत्येक विषयात किती मार्क मिळाले आहेत ही जिज्ञासाही होतीच. त्या काळी केंब्रिज विद्यापीठ मार्क प्रसिद्ध करीत नसे. पण मला वाटले, माझ्या ट्यूटरकडे किंवा प्राध्यापकाकडे मी गेलो तर ते मला मार्क सांगतील. मी जीझस कॉलेजमधील माझे सायन्स ट्यूटर आणि रसायनशास्त्र विभागाचे एक सदस्य डॉक्टर मिल्स यांच्याकडे गेलो आणि मला किती मार्क मिळाले आहेत ते विचारले. सगळ्या मार्काचा तक्ता त्यांच्यासमोर होता. तरीही ते म्हणाले, "मार्क सांगता येत नाहीत याबद्दल मला वाईट वाटते. पण वनस्पतिशास्त्रात तुम्ही पहिले आलेले आहात हे तुम्हाला माहीत आहेच." त्यांनी पुढ्यातली आणखी काही पाने चाळली आणि ते मला म्हणाले, "मी तुम्हाला एवढेच सांगतो की, तुम्ही रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र यांतही पहिले आले आहात." मी त्यांचे आभार मानले आणि प्रोफेसर मार्स यांच्याकडे गेलो. मी त्यांना भूगर्भशास्त्रातील मार्काबद्दल विचारले तसे ते म्हणाले, "देशमुख, मला तुम्हाला मार्क सांगता येणार नाहीत, पण मी तुम्हाला एवढे सांगू शकतो की ज्या पद्धतीने तुम्ही आपले पेपर लिहिले आहेत ती पद्धत आम्हाला फार फार आवडली." दोघांचीही उत्तरे ऐकून मी थोडा निरुत्साही झालो. त्यानंतर प्रोफेसर सिवॉर्ड यांच्याकडे जाण्याचा मला धीरच झाला नाही. पण मी राजाध्यक्षांना त्यांच्याकडे जाऊन किती मार्क मिळाले आहेत हे पाहावयास सांगितले. राजाध्यक्षांना प्रोफेसर सिवॉर्ड म्हणाले, "मार्क सांगण्याची परवानगी नाही." गंमत अशी की, तिघांनीही आपापल्या विषयाचा अभ्यास करून मी ट्रायपॉज मिळवावा असे सांगितले. ट्रायपॉजच्या परीक्षेत पहिल्या विभागात पहिला क्रमांक मिळवून वनस्पतिशास्त्रातले फेंक स्मार्ट प्राइझ मिळविणारे जे थोडे विद्यार्थी होते, त्यांपैकी मी एक आहे. हे पारितोषिक ट्रायपॉजच्या दुसऱ्या विभागात जो विद्यार्थी पहिला येतो त्याला देण्यात येत असते, आणि ज्या वेळी असा विद्यार्थी नसतो तेव्हाच वनस्पतिशास्त्रात पहिल्या विभागात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याला ते देण्यात येते. त्या वर्षी या विषयाला बसलेले काही चांगले विद्यार्थी होते. त्यांत पुढे बनारस हिंदू विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक झालेले आर.एस. इनामदार हेही होते, पण नशिबाने मला हात दिला होता.
माझ्या आवडीच्या विषयाचा अधिक खोल अभ्यास करण्याची जर मला सवड असती तर मी ट्रायपॉजच्या दुसऱ्या विभागासाठी वनस्पतिशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र हा विषय घेतला असता. पण आय.सी.एस.ची परीक्षा इतकी जवळ आली असताना असा विचार करायला आता सवडच नव्हती. मी माझा पुढील अभ्यास लंडन येथे करायचे ठरविले आणि 1917 च्या अखेरीस केंब्रिज सोडले.
अनुवाद : वि. वा. पत्की
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या