चितमपल्ली सर, पुढे तुमच्या 'नवेगाव बांधचे दिवस' या पुस्तकानं तर माझ्या मनावर जणू गारूडच केलं होतं. विशेषतः त्यातल्या 'मीनखाई घारीचं घरटं' या प्रकरणानं मला पुरतं पछाडलं. मीनखाई धार/कैकर म्हणजेच ऑस्त्रे या पक्ष्याचं प्रजनन आपल्याकडे होत नाही, मात्र तुम्ही नवेगाव बांधला त्याचं घरटं असल्याचं म्हटलं होतं. हा पक्षी तर माझ्या गावच्या तळ्यावरही दिसायचा. तर त्याचंही घरटं आपल्या गाव परिसरात असलं पाहिजे, या विचारानं मी गावाजवळून गेलेल्या अजिंठा डोंगररांगेचा एक मोठा भाग धुंडाळून काढला. बऱ्याच प्रयत्नांनंतर एका उंच उभ्या कातळाच्या टोकावर मला एक मोठ्या आकाराचं घरटं दिसलं. मी आनंदानं वेडापिसा झालो. मात्र, अनेकदा घरट्याचं निरीक्षण करूनदेखील एकही पक्षी त्यात येत नाही म्हणून मी अजून तसंच घरटं शोधत राहिलो
प्रति,
आदरणीय मारुती चितमपल्ली
पत्रास कारण की,
मागील दोन वर्षांत साधना साप्ताहिकाने मला दोन वेळा युवा अभ्यासवृत्ती दिली. पहिल्यांदा 'ज्वारीच्या शेतातील पक्षी' या विषयावर अभ्यास करण्यासाठी. आणि दुसऱ्यांदा 'शेतात येणारे प्राणी' या विषयावर अभ्यास करण्यासाठी. ते दोन्ही दीर्घ लेख साधनाच्या दोन विशेषांकांत प्रसिद्ध झाले. तोच धागा पुढे जोडून अजून एखाद्या सबंधित विषयावर अभ्यास करून लिहिता येऊ शकेल का, याची चर्चा करण्यासाठी साधनाच्या संपादकांनी मला एप्रिल महिन्यात फोन आला होता. त्या विषयावर बोलून झाल्यावर ते म्हणाले, 'तुझ्या डोक्यात एखादा विषय तयार असेल किंवा कुठल्या विषयावर अभ्यास करून लिहायचे असेल तर बघ, लेखन आगळेवेगळे आणि प्रभावी झाल्यास छापू या', तेव्हा मी लागलीच तुमचं नाव घेतलं, नुकताच तुम्हाला 'पद्मश्री' मिळाल्याचाही संदर्भ दिला. संपादकांनी 'अभ्यास करून दीर्घलेख लिहू शकतोस' असं सुचवलं, तुमची वेळ घेऊन मुलाखत जुलै-ऑगस्ट मध्ये घ्यायची व दिवाळीत दीर्घलेख प्रसिद्ध करायचा असं ठरलं. ज्यांच्यामुळे आपल्याला निसर्गात भटकण्याची, डोळे उघडे ठेवून निसर्ग निरीक्षण करण्याची, अनुभवण्याची,
लेखन करण्याची, तसेच संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली अशा व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून तिच्याकडून अनुभव जाणून घेता येतील, या विचारानं मी आनंदात होतो. परंतु, काल रात्री तुमच्या निधनाची बातमी येऊन धडकली आणि मन सुन्न झालं.
सर, आपली प्रत्यक्ष भेट झालेली नसली, राहून गेली असली आणि ती कधीच होऊ शकणार नसली, तरी तुमचा आणि माझा परिचय गेल्या अठरा वर्षांपासूनचा आहे. तुमच्या लेखनाशी पहिली भेट झाली मी इयत्ता सातवीला असताना, मराठी विषयातल्या 'अडई आणि तिची पिलं' या धड्यापासून, सरताळे बाईंनी हा पाठ्घधडा अतिशय सुंदर पद्धतीनं शिकवला होता. या एकाच धड्यानं मला तुमच्या लेखन शैलीच्या प्रेमात पाडलं, असं मी म्हटल्यावर तुम्हाला अतिशयोक्ती वाटू नये. लेखकाचा परिचय असणाऱ्या चौकटीत, तुमच्या पुस्तकांची नावं व इतर माहिती होती. ती वाचून काढली, शाळा सुटून घरी आल्यावर तुमच्या या धड्याविषयी वडिलांशी बोललो. वडील गावातीलच सार्वजनिक वाचनालयाचे नियमित वाचक होते, त्यांनी वाचनालयात जाण्याचा सल्ला दिला. तसे माझे वडील हुशारच होते, बऱ्याचदा ते बक्षिसाचं आमिष देऊन माझ्याकडून पुस्तकं वाचून घ्यायचे, मी वाचनालयात गेलो, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कासार बाबा ग्रंथपाल होते. त्यांना म्हणालो, "मारुती चितमपल्लींचं पुस्तक द्या."
त्याबर ते म्हणाले, "एक पुस्तक आहे, पण नेमकं कुठल्या कपाटात ठेवलंय ते मला आठवत नाही." असं सांगून त्यांनी पुस्तक लेखकांच्या नावांची सूची समोर ठेवली. तासभर शोधाशोध करून झाल्यावर पुस्तक मिळालं आणि मग तुमची दुसरी भेट झाली 'रानवाटा' या पुस्तकाच्या रूपानं. हे पुस्तक मला प्रचंड आवडून गेलं. तुमची अजून काही पुस्तकं वाचनालयात मिळतात का म्हणून मी सूची धुंडाळली, पण काही केल्या पुस्तक मिळेना. कुणीतरी आमच्याच शाळेतल्या, मात्र मोठ्या वर्गावर शिक्षक असलेल्या पक्षी अभ्यासक विक्रम पाटील सरांना भेटायला सांगितलं. सरांकडे गेलो, 'तुमच्याकडे चितमपल्लींचे पुस्तक असेल तर वाचायला देता का?' असं म्हणालो. 'पुस्तक लिहून कसं वाटलं यावर दोन पानं लिहिणार असशील तरच घे' असं सांगून त्यांनी 'जंगलाचं देणं' हे पुस्तक वाचायला दिलं. मी अधाशासारखं एका बैठकीत ते वाचून संपवलं, ही होती तुमची तिसरी भेट. तुमच्या या पुस्तकांनी मात्र मला पुरतं पछाडलं. तुमच्या लेखनाच्या, पुस्तकांच्या प्रभावानं आणि इतर काही जुळून आलेल्या गोष्टींमुळे मी जंगलात भटकायला लागलो, माझ्या निसर्ग निरीक्षणाला सुरुवात झाली. पुढच्या वर्षी एका परीक्षेत मिळालेल्या बक्षिसाच्या आणि काही खाऊसाठी साठवलेल्या पैशांतून मी तुमची नऊ पुस्तकं विकत घेतली आणि त्यांची अनेक वेळा पारायणं केली. अशा पद्धतीनं आपल्या भेटी आणि परिचय वाढत गेला.
चितमपल्ली सर, पुढे तुमच्या 'नवेगाव बांधचे दिवस' या पुस्तकानं तर माझ्या मनावर जणू गारूडच केलं होतं. विशेषतः त्यातल्या 'मीनखाई घारीचं घरटं' या प्रकरणानं मला पुरतं पछाडलं. मीनखाई घार/कैकर म्हणजेच ऑस्त्रे या पक्ष्याचं प्रजनन आपल्याकडे होत नाही, मात्र तुम्ही नवेगाव बांधला त्याचं घरटं असल्याचं म्हटलं होतं. हा पक्षी तर माझ्या गावच्या तळ्यावरही दिसायचा. तर त्याचंही घरटं आपल्या गाव-परिसरात असलं पाहिजे, या विचारानं मी गावाजवळून गेलेल्या अजिंठा डोंगररांगेचा एक मोठा भाग धुंडाळून काढला. बऱ्याच प्रयत्नांनंतर एका उंच उभ्या कातळाच्या टोकावर मला एक मोठ्या आकाराचं घरटं दिसलं. मी आनंदानं वेडापिसा झालो. मात्र, अनेकदा घरट्याचं निरीक्षण करूनदेखील एकही पक्षी त्यात येत नाही म्हणून मी अजून तसंच घरटं शोघत राहिलो. पुन्हा एक घरटं सापडलं, त्याच दिवशी तिथं एक भल्यामोठ्या आकाराचा पक्षी झाडाच्या दोन छोट्या फांद्या, ज्यांना हिरवी पानं होती, घेऊन आला. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. परंतु, निरीक्षणांती तो पक्षी 'ऑस्त्रे' नसून 'बोनेलीचा गरुड' असल्याचं माझ्या लक्षात आलं. मात्र त्याच्या भल्यामोठ्या आकारानं, त्याच्या ऐटीनं, तीक्ष्ण चोच आणि नजरेनं मला त्याचं निरीक्षण करायला भाग पाडलं. मी नोंदवहीत त्याची निरीक्षणं नोंदवल्याचं मला चांगलंच आठवतंय. मी तेव्हाची नोंदवही आत्ता थोड्या वेळापूर्वी तपासली, त्यात या गरुडाची पहिली नोंद होती 22 फेब्रुवारी 2012 ची, म्हणजे मी इयत्ता अकरावीत असतानाची. वहीतल्या सगळ्या नोंदी या लालित्यपूर्ण भाषेत असल्याचं मला आता लक्षात येतंय. सर, अर्थातच हा सगळा प्रभाव तुमच्या निरीक्षणनोंदी आणि लेखनशैलीचा आहे. माझ्यासह केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर भारतभरासह जगभरातील हजारो-लाखो पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी, पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक संशोधक तयार होण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे, हे कुणीही नाकारणार नाही.
'पक्षी जाय दिगंतरा', 'घरट्या पलीकडे', 'नवेगाव बांधचे दिवस', 'सुवर्ण गरुड', 'रानवाटा', 'रातवा', 'निसर्गवाचन', 'शब्दांचं धन', 'केशराचा पाऊस', 'जंगलाचं देणं', 'चैत्रपालवी', 'जंगलाची दुनिया', 'चकवा चांदणंः एक वनोपनिषद', 'पक्षीकोश' अशी एकाहून एक सरस असलेली, मराठी साहित्याला समृद्ध करणारी दीड डझनाहून अधिक पुस्तकं तुम्ही लिहिलीत, भाषांतरित केलीत. मात्र तेवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत, तर 'वृक्षकोश', 'मत्स्यकोश', 'प्राणीकोश' यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आयुष्याच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहिलात, हे पाहून तुमच्यासमोर आमची मान नम्नपणाने झुकते आणि हात नकळत जोडले जातात.
सर, मला माहिती आहे की, एखादे फील्ड गाईड किंवा माहितीकोश तयार करणे हे विषय तज्ज्ञांच्या समूहाचे काम असते. जगभरात सगळीकडे तशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र तुम्ही अतिशय माहितीपूर्ण असा 'पक्षीकोश' तयार केलात. महाराष्ट्राच्या विविधभागांतील बोलीभाषा आणि इतर भारतीय भाषा अशा 25 भाषांत 554 पक्ष्यांची नावे आणि छायाचित्रांसह विस्तृत माहिती या कोशात दिलीत. एकट्याने एवढा मोठा माहितीकोश तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या पक्षीकोशानं आणि तुमच्या सगळ्या पुस्तकांनी मिळून हजारो नवीन शब्द मराठीला भाषेला दिले आणि अभिजात माय मराठीला अधिकच समृद्ध केले, त्याबद्दल समस्त मराठी जनांच्या वतीनं तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. म्हणूनच की काय तुमच्यावर, तुमच्या लेखनावर बाचकांनी उदंड प्रेम केलं. तुमच्या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला, शासन संस्थांनी दखल घेत अनेक पुरस्कार दिले.
'वानरांची शेकोटी', 'सापानं काढलेला आवाज', 'माश्यांचा रांजण', 'अस्वलाची भाकरी', 'नीलगाईनं खाल्लेलं कासव' यांसारख्या फार थोड्या गोष्टींवर अभ्यासकांनी शंका प्रश्न उपस्थित केले. मात्र शंका घेतलेल्या बाबींवर पुढे कुणीच काम केलं नाही, किंवा तशी अनुभूती कुणाच्या वाट्याला आली नाही, हेही दुर्दैवच म्हणावं लागेल, अलीकडे मात्र जसजशी निरीक्षणं येत आहेत, तशा यातल्या काही गोष्टी मान्य कुणाला फारसा हाताळता न आलेला प्रकार म्हणजे, शास्त्रीय निसर्गज्ञान सुगम्य, लालित्यपूर्ण मराठी भाषेत मांडणे. अर्थात, निसर्गलेखनाला अनेक कांगोरे असले आणि अनेकांनी समर्थपणे ते हाताळलेले असले, तरी तुम्ही निसर्ग विज्ञान आणि ललित लेखन यांची ज्या सुंदर पद्धतीने सांगड घातली तशी फारशी कुणाला जमली नाही, हेही सत्य आहे. अर्थात यामागे प्राचीन व सध्याच्या देश-विदेशातील ग्रंथांचा व भाषांचा सखोल अभ्यास; संशोधन करून, आदिवासी शिकाऱ्यांकडून गोळा केलेल्या आश्चर्यचकित करणाऱ्या माहितीचा साठा; सततची अभ्यासूवृत्ती; कामातली आत्मीयता-चिकाटी; अनुवादाला दिलेला न्याय; आणि हे सगळं अशक्यप्राय प्रवाही ललित भाषेत मांडणं हे तुम्हाला उत्तमरीत्या जमू शकलं. मराठीत निसर्ग आणि पर्यावरण साहित्याला स्वतंत्र साहित्याचा दर्जा खऱ्या अर्थानं तुम्ही मिळवून दिला.
विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पक्षीमित्र किंवा साहित्य संमेलने असोत; विविध पातळ्यांवरच्या पर्यावरणीय कार्यशाळा, निसर्ग शिबिरं असोत; प्रकट होत आहेत. मात्र आपण मिळवलेले, अनुभवलेले ज्ञान आदिवासींशी एकरूप होऊन, त्यांच्या प्रथा-परंपरा-लोककथांचा आदर करत जगासमोर आणले. अनेक ठिकाणी तुम्ही 'अमुक माहिती या आदिवासीने, त्या मासेमाऱ्याने, शिकाऱ्याने, पारध्याने सांगितली' असं म्हटलं, हे एक लेखक म्हणून तुमच्या मनाचे आणि विचारांचे मोठेपण दर्शवते.
जगभरातल्या अनेक भाषांसह मराठीतल्या साहित्यसृष्टीला नवनवीन धुमारे फुटत आहेत. दिवसागणिक अनेक नवीन प्रवाह निर्माण होत आहेत. मात्र मराठी साहित्यातल्या काही प्रवाहांमध्ये प्रचंड सामर्थ्य असूनही त्यांचे मोठ्या नदीत किंवा सागरात रूपांतर होऊ शकले नाही. मराठीत सुरेश भटांनी हाताळलेला गझल हा साहित्यप्रकार असो किंवा डॉ. जयंत नारळीकरांनी भौतिकविज्ञानासारखा वाचनीय कथांच्या माध्यमातून मांडलेला क्लिष्ट विषय असो. या दोन दिग्गजांनी हे साहित्यप्रकार मराठीत रुजवले, वाढवले, मात्र त्या प्रवाहांचे नंतर मोठ्या नदीत रूपांतर करण्यात फारसं कुणाला यश आलं नाही. अगदी यासारखाच, मात्र प्रचंड लोकप्रियता मिळालेला व क्षमता असूनही दुसऱ्याकुणाला फारसा हाताळता न आलेला प्रकार म्हणजे, शास्त्रीय निसर्गज्ञान सुगम्य, लालित्यपूर्ण मराठी भाषेत मांडणे. अर्थात, निसर्गलेखनाला अनेक कांगोरे असले आणि अनेकांनी समर्थपणे ते हाताळलेले असले, तरी तुम्ही निसर्ग विज्ञान आणि ललित लेखन यांची ज्या सुंदर पद्धतीने सांगड घातली तशी फारशी कुणाला जमली नाही, हेही सत्य आहे. अर्थात यामागे प्राचीन व सध्याच्या देश-विदेशातील ग्रंथांचा व भाषांचा सखोल अभ्यास; संशोधन करून, आदिवासी शिकाऱ्यांकडून गोळा केलेल्या आश्चर्यचकित करणाऱ्या माहितीचा साठा; सततची अभ्यासूवृत्ती; कामातली आत्मीयता चिकाटी; अनुवादाला दिलेला न्याय; आणि हे सगळं अशक्यप्राय प्रवाही ललित भाषेत मांडणं हे तुम्हाला उत्तमरीत्या जमू शकलं. मराठीत निसर्ग आणि पर्यावरण साहित्याला स्वतंत्र साहित्याचा दर्जा खऱ्या अर्थानं तुम्ही मिळवून दिला.
विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय पक्षीमित्र किंवा साहित्य संमेलने असोत; विविध पातळ्यांवरच्या पर्यावरणीय कार्यशाळा, निसर्ग शिबिरं असोत; प्रकट मुलाखती, विविध शासकीय कार्यक्रम किंवा पुरस्कारांचे सोहळे असोत या सगळ्या झगमगाटात वावरून, यशाच्या उंच शिखरावर पोहोचूनही तुमची जंगलांशी असलेली नाळ कधी तुटली नाही किंवा त्यात अंतर पडले नाही. शासकीय नोकरीची तीन तपं आणि नंतर दोन तपांहून अधिक असा आयुष्याचा काळ तुम्ही जंगलांच्या आणि पुस्तकांच्या सहवासात घालवला. तुम्ही खऱ्या अर्थानं 'अरण्यऋषी' होतात. मात्र, एवढं असूनही जंगलात राहणं आणि लेखन एवढ्यावर सीमित न राहता तुमचं कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या सर्वांगीण विकासातलं भरीव योगदान आणि तुमच्या अभ्यासामुळे धोरणं आखणाऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झालेली मदत यांसारख्या बाबी तुमच्या कामाची, अभ्यासाची, योगदानाची यादी न संपवणाऱ्या आहेत, याची जाणीव करून देणाऱ्या आहेत.
तुमच्या वेगवेगळ्या पुस्तकांमधल्या 'अरणी', 'हाथी पागडी', 'अडई आणि तिची पिलं', 'तनमोराचे दिवस', 'गुलाबी पिस', 'मीनखाई घारीचं घरटं', 'मोरनाची', 'भिवा ढिवर आणि मासे', 'माधवझरीची चित्तरकथा, 'रानभूल', 'केशराचा पाऊस', 'टेकराज', 'मृत्यूचे संमोहन', 'पानगळ', 'न उमललेल्या कळ्या' यांसारख्या अनेक प्रकरणांनी माझ्यासह असंख्य वाचकांच्या मनावर गारूड केलं आहे, आमचं जगणं समृद्ध केलं आहे. पक्ष्यांचं बोलणं, प्राण्यांचं जगणं, झाडांच्या संवेदना आणि जंगलांचं जंगलपण लोकांसमोर तुम्ही मांडलंत. झाडं, वेली, पानं, फुलं, कीटक, पक्षी, प्राणी, डोंगर, नद्या अशा सगळ्यांना बोलतं केलंत. तुमच्या लेखणीनं अनेक पिढ्यांना निसर्गाशी संवाद साधायला शिकवलं. लोक जंगलात जातात, जंगलं अनुभवतात, तुमच्या पुस्तकातले प्रसंग आठवून रमतात, तुमच्यासारखे लेखन करण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही भाषेत, साहित्यप्रकारात वाचक लेखकाचा अनुनय करू पाहतात यापेक्षा गोष्ट मोठी कुठली असू शकणार नाही. उत्तम लेखक तुम्हाला प्रत्यक्ष न भेटताही तुमच्या आयुष्याला, जगण्याला समृद्ध करत असतो, त्यांच्या जाण्यानं समाजाची हानी होते. तुमचं जाणं ही समाजाची, निसर्ग विज्ञानाची, पर्यावरण चळवळीची, मराठी साहित्याची आणि वाचकांची भरून न निघणारी हानी आहे.
आपली प्रत्यक्ष भेट होणार नाही असं अगोदर म्हटलेलो असलो तरी, ते पूर्णतः खरे नाही. तुम्ही लिहिलेल्या लेखांच्या पुस्तकांच्या रूपानं, जनसामान्यांत पेरलेल्या रुजवलेल्या पर्यावरण प्रेमाच्या रूपानं, घडवलेल्या निसर्गप्रेमी अभ्यासकांच्या व लेखकांच्या रूपानं तुम्ही आम्हाला भेटत राहणारच आहात. तुमच्यासारखा जंगल वन्यजीवांच्या आणि पुस्तकांच्या सान्निध्यात जगलेला, रमलेला अरण्यऋषी माय मराठीत होऊन गेला हे आमचे भाग्य आहे.
सर, मराठीत निसर्ग विज्ञान प्रवाही, लालित्यपूर्ण भाषेत मांडू पाहणाऱ्यांसाठी, जंगल जगू पाहणाऱ्यांसाठी, झाडां-फुलांशी, पशु-पक्ष्यांशी संवाद साधू पाहणाऱ्यांसाठी तुम्ही एक दीपस्तंभ होतात आणि राहाल.
विनम्र अभिवादन !
तुमच्या लेखनावर मनापासून प्रेम करणारा एक वाचक.
Tags: aranyarushi navegav books letter maruti chitampalli vivek waghe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Latika Jadhav- 06 Jul 2025
भावस्पर्शी!
save