डिजिटल अर्काईव्ह

 

28 जुलै 2026 रोजी मराठीतील नामवंत लेखिका आशा बगे 88 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या दोन्ही वाङ्मय प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या नंतरच्या पिढीच्या कथाकार व कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांच्याशी त्यांचे मैत्र जुळले होते. सुप्रिया अय्यर यांचे निधन डिसेंबर 2024 मध्ये झाले. अखेरच्या काळात त्यांनी आशा बगे यांच्यावर लिहिलेला लेख प्रसिद्ध करायचे राहून गेले होते. तो लेख अगदी अलीकडेच ज्येष्ठ मराठी साहित्यिक भारत सासणे यांच्यामार्फत आमच्याकडे आला. तो इथे प्रसिद्ध करीत आहोत, अर्थातच त्याला निमित्तही तसेच आहे.

 

 

अजूनही आठवतात ते दिवस. नुकतंच फुलू लागलेलं आयुष्य, जगाची नव्यानं होत चाललेली ओळख. 1973 चं वर्ष होतं ते. लग्न होऊन नागपूरसारख्या जिल्ह्याच्या गावातून हिंगणघाटसारख्या तालुक्याच्या गावाला आल्यावर बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. राहायला घर मिळालं ते कापसाच्या जीनजवळ.

तिथंच पलीकडे कोळशाचे, काळ्या कापसाचे ढीग इतस्ततः पडलेले. माझ्या तीन खोल्यांच्या माडीवरच्या छोट्याशा घराच्या खिडकीतून समोर दिसणारं मोठं मोकळं मैदान. अन् त्या मैदानापलीकडे असणारं एक टुमदार क्वार्टर. मी नेहमीच विचार करीत असे, 'कोण बरं राहात असेल त्या क्वार्टरमध्ये?' अन् मग स्वतःशीच म्हणे, 'असेल कुणी बडा ऑफिसर'. हळूहळू मी रुळले त्या गावात. काही ओळखी झाल्या. त्यातलीच एक ओळख डॉ. कावळे आणि त्यांच्या कुटुंबाशी झाली. कन्या शाळेत नोकरी मिळाली. कावळे वहिनी तिथंच नोकरीला असल्यामुळे मैत्री अधिकच घट्ट झाली.

एकदा ग्रंथालयातून घेतलेलं एक मासिक मी वाचत होते. तर त्यात एक छोटीशी कविता होती. बहुधा तीळसंक्रांतीच्या संदर्भात ती होती. खाली नाव होतं, आशा बगे. अन् माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या त्य समोरच्या क्वार्टरचा पत्ता होता. मला त्या क्षणी किती आनंद झाला हे मी शब्दांत नाही सांगू शकत. कथा, कविता, कादंबऱ्या हे एक वेगळंच विश्व होतं माझ्यासाठी. ना मी कधी कुठल्या लेखकाला भेटले होते, ना कोणी कवी माझ्या ओळखीत होता. ही सारी दूरच्या ध्रुवावरची माणसं असंच मला वाटत असे. कविता लिहिणारी एक कवयित्री अगदी माझ्या घराजवळ राहते ह्याचा मला अचानक शोध लागला. तेव्हा वाटलंही नव्हतं की, ही कवयित्री भविष्यातली खूप मोठी लेखिका असणार आहे; जिच्या उंचीकडे पाहताना डोक्यावरची टोपी पडली तरी आपण तिच्या उंचीला नाहीच पोहोचू शकणार. आशा बगे या साहित्यातील ध्रुवताऱ्याला असं मुळातून फुलताना पाहण्याचा अफलातून योग माझ्या आयुष्यात होता असं म्हणायला हरकत नाही.

एकदा कावळे वहिनींनी विचारलं, 'निला, आनंदवनला चलतेस का आनंद मेळाव्याला ?' माझ्यासाठी तेही विश्व नवीनच. मी त्यांच्याबरोबर गेले. बाबा आमटे, साधनाताई, राम शेवाळकर, पु.ल., सुनिताबाई, यदुनाथ थत्ते... माइया कल्पनेतली सगळी आगळीवेगळी माणसं हारीनं माझ्यासमोर उभी. शोकेसमधली सुंदर सुंदर खेळणी दुरून न्याहाळावी तसंच मी त्यांच्याकडे पाहात होते, त्यांना ऐकत होते. आणि हो, तिथेच माझी आशाताईंशी पहिली ओळख झाली. त्या आमच्याबरोबर होत्या. गोरा रंग, लहानशी चण, कुरळे केस अन् डोळ्यात एक वेगळंच तेज. माझ्या मनानं पहिल्या भेटीत टिपलेली ही त्यांची मूर्ती. आज इतके दिवस झाले, खूप सहवास घडला आशाताईंचा. पण 'प्रथम तुज पाहता' जी मी त्यांच्या प्रेमात पडले ते अजूनही कायम आहे.

आशाताईंचा जन्म 28 जुलै 1939 ला नागपूर येथे देशपांडे या समृद्ध कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव आशा वामन देशपांडे. आईचे नाव कुसुम. शालेय शिक्षण नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण (एम.ए. मराठी, एम.ए. संगीत) लेडी अमृताबाई डागा महाविद्यालय येथे झाले. देशपांड्यांच्या घरी नाटक, कीर्तन, संगीत, सणवार, कुळकुळाचार, पाहुणा-राहुणा असे सगळे वातावरण होते. त्यामुळे याच साऱ्या गोष्टी ताईंना वारसा हक्काने मिळाल्या. आणि नकळत त्या तिथं रुजल्या. त्या स्वतः नाटकात काम करीत असत. एकांकिकांचं सादरीकरण, आकाशवाणीसाठी लिहिणं, संत वाङ्गयाचा अभ्यास यांमधून आशाताईंच्या लेखनाची, कथेची शैली घडत गेली असावी. शिक्षण झाल्यानंतर रितीप्रमाणे लग्न होऊन आशा वामन देशपांडे नावाची ही सुकुमार मुलगी आशा अरविंद बगे झाली. माहेरच्या वैभवाची शाल पांघरून सासरी आलेल्या या मुलीला सासरी रुळताना काही तडजोडी तर नक्कीच कराव्या लागल्या असतील. संसाराची घडी बसली. अन् कवितेपासून सुरुवात करून या लेखिकेनं साहित्य क्षेत्रात शिरकाव केला. तेव्हाच कधीतरी मी त्यांची ती छोटीशी कविता वाचली.

हिंगणघाटसारख्या लहान गावात त्यांना नाटकं बसवताना, नाटकात काम करताना पाहिलं. सहज गुणगुणण्यातून त्यांच्या सुरेल आवाजाची ओळख झाली. याच सुमारास त्यांची कथा बहरू लागली. त्यांच्या कथेचं वाचन त्यांच्या तोंडून ऐकण्याचा दुर्दम्य योग मला लाभला. सारं स्वप्नवत् वाटतं. साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकात त्यांच्या कथा वाचकांमध्ये चर्चिल्या जाऊ लागल्या. त्यांच्या कथांमधली नायिका किंवा कुठलीही स्त्री ही भारतीय परंपरेचं समृद्ध दर्शन घडविणारी होती/आहे. स्वतः संगीताच्या जाणकार असणाऱ्या ताईंच्या कथेत संगीत असणं अगदीच अपरिहार्य होतं.

या आगळ्यावेगळ्या शैलीसह आशाताईंचं कथालेखन हळूहळू बहरात येऊ लागलं आणि माझ्यासारख्या वाचकांना त्यांनी वेड लावलं. गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे 'मौज' मधून लिहू लागल्या. प्रत्येकीची लेखनशैली निराळी. अनुभवविश्वही भिन्न. गौरी देशपांडेच्या लेखनातून सहज येणारे स्त्री-पुरुष, नात्यांचे मोकळेढाकळे संदर्भ, सानिया यांचे मानवी मनाचा अंतस्थ तळ शोधणारे एक स्वतंत्र जग आणि त्याच वेळी विदर्भातील मातीशी, इथल्या संस्कृतीशी, कर्मकांड, कीर्तन, व्रतवैकल्ये, सण, उत्सव या साऱ्यांशी नाळेनं जोडलं गेलेलं आशाताईंचं लेखन, असा तो एकूणच कथेसाठी बहराचा काळ होता. त्यांच्या कथांमध्ये सहसा कीर्तन, नाटक, संगीत, माहेरी असणारी नोकरमाणसं, भारतीय परंपरेतील सणवार, वाड्यातील माणसं, त्यांचे परस्परसंबंध, ताणेबाणे असे सारे आसपास घडलेले, अनुभवलेले आढळते. लेखन शैली अत्यंत ओघवती, भाषा रसाळ अन् सुबोध, अनुभवांचे क्षेत्र मध्यमवर्गीय असल्यामुळेही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेऊ लागली. समकालीन लेखकांपेक्षा आशा बगे यांचे लेखन निराळे होते / आहे. आशय, अभिव्यक्ती, संगीत ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.

आशाताईंची कथामूल्ये सर्वसाधारण कथाकारांपेक्षा निराळी वाटतात. त्यांचे लेखन संवादी आहे. हे संवाद वाचकांच्या मनात खोलवर उतरतात. 'दर्पण' या कथासंग्रहातील 'अज्ञात' ही कथा एका शाळामास्तराची, त्याच्या तीन लग्नाच्या मुलींची गोष्ट सांगते. कथाबीज तसे वेगळे नाही. पण त्यांची फुलवण्याची ताकद इथे प्रामुख्याने लक्षात येते. जबलपूर, धमतेरी अशा मध्यप्रदेशातील गावांमध्ये साध्या सरकारी बसनं उन्हं अंगावर झेलत वरसंशोधनासाठी बापूंनी केलेला प्रवास, आणि त्याचं लेखिकेनं केलेलं यथार्थ वर्णन -

"दुपारी दोन वाजता बस जबलपूरला पोहोचली तेव्हा मात्र बापू थकले होते. डोळ्यांची, तळपायांची आग आग होत होती. कानाला बांधलेल्या रुमालातून झळा कानाच्या तळापर्यंत पोहोचत होत्या. कानात घातलेले कापसाचे बोळे निघूनच गेले होते. बसमधून उतरताना बापूंना चक्करल्यासारखं झालं. बसचा दांडा धरून ते बसच्या पायरीवर उभेच राहिले. पण मागून माणसांचा रेटा आला. बसमध्ये सात-आठ तास बसून उबलेली, कावलेली माणसं 'उतरा हो उतरो भाई ! बीच मे काहि को खडे हो! इथं माणूस शिजून निघतंय!' असं ओरडू लागली.

उन्हं आता हजार डोळ्यांनी आग ओतायला लागलं नि त्या गर्भार राऊताईणीला भडभडून उलटी झाली समोरच्या माणसाच्या अंगावर."

हे सारं वाचताना उन्हानं आपल्याच अंगाची काहिली होतेय, त्या बसमधून आपणच जणू काय प्रवास करतोय असं वाटतं.

"ती गर्भार राऊताईण, तिचं बाळंतपण, मध्यान्हीचं रसरसतं उन्हं, बस कंडक्टर, ड्रायव्हर, उतरलेली माणसं, कळा देणारी राऊताईण सारं काही उन्हातच मिसळून गेलं असं बापूंना वाटलं. तेही त्या उन्हाचाच अंश होते का?"

वाचक या साऱ्या प्रवासाशी बापूंइतकाच समरस होतो. जणू काय त्या प्रवासाचा अंश बनतो.

'लडका हुआ जी लडका', दुसरी राऊताईण सांगते. बापू जमिनीला खिळलेच. जन्म ! तोही मुलाचा ! इतक्या सहज होऊ शकतो? कुठलाही गाजावाजा न करता ! फक्त एका उन्हाच्या साक्षीनं ! विश्वास बसत नव्हता एक प्रवास, एक उन्हं, एक बापू, एक राऊताईण अन् अनेक प्रवासी... अन् त्या साऱ्यांची परस्परांशी त्या क्षणी जुळलेली नाळ .. तो प्रवास फक्त प्रवास राहात नाही. एका जन्माचं रहस्य तो सहज उलगडतो."

कथा पुढं जात राहते. अन् प्रकर्षानं जाणवतं की आशाताईंची कथात्म मूल्यं सर्वसाधारण इतर कथांपेक्षा वेगळी वाटतात. त्यांचं लेखन संवादी, सुबोध आहे.

'मारवा', 'दर्पण', 'चंदन' हे त्यांचे कथासंग्रह, 'सेतू', 'त्रिदल' या कादंबऱ्या, 'धर्मक्षेत्रे-कुरुक्षेत्रे' या दोन दीर्घ कथांचा संग्रह यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. बहुतांशी मध्यमवर्गीय जीवनाचं दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते. विदर्भात घडणाऱ्या या कथांमध्ये भाषिक गोडवा, पात्रांच्या लकबी, रितीरिवाज सारे सहज उतरते. त्यातून त्यांचे प्रतिभागुण प्रामुख्याने प्रगटतात.

आशाताई कथाकार म्हणून प्रकर्षाने समोर आल्या त्या 'मारवा' कथासंग्रहातील 'रुक्मिणी' या कथेमुळे. प्रसिद्ध समीक्षक धों. वि. देशपांडे एका खाजगी बैठकीत या कथेसंदर्भात बोलताना म्हणाले, "आशाताईंनी 'रुक्मिणी' ही एकच कथा लिहिली असती तरी त्यांचे नाव कथावाङ्गयात अमर झाले असते." अतिशय संवेदनात्मक मन असणाऱ्या वाचकापर्यंतच या कथा खऱ्या अर्थानं पोहोचू शकतात.

आशाताईंची लेखणी असं कसदार लेखन करून वाचकांच्या नजरेत भरू लागली होती, तेव्हाचा एक हृद्य प्रसंग इथे लिहिल्याशिवाय राहवत नाही.

श्री अरविंदराव बगे हिंगणघाट सोडून अकोल्याच्या सावताराम मिलमध्ये रुजू झाले. त्यानंतर लगेचच अकोला येथे लेखिका साहित्य संमेलन होते. अर्थातच आशाताईंची तिथे उपस्थिती होती. पण विशेष असे की, या साहित्य संमेलनाला आदरणीय गो.नी. दांडेकर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरात आशाताईंनी त्यांना घरी चलण्याची विनंती केली. अन् ते 'हो' म्हणाले. त्या त्यांना घरी घेऊन आल्या. पण मनात जरा रुखरुख होती की, अजून क्वार्टरमध्ये पुरं सामानही लागलेलं नाहीये. जराशी गैरसोयही आहेच. त्यांना क्वार्टर दाखवताना संकोचून म्हणाल्या, "अजून सारी गाठोडी सुटायचीच आहेत." त्यावर गो. नी. दां. म्हणाले, "जी सुटायला हवी ती तर केव्हाच सुटली आहेत."

आशाताईंची कथा/कादंबरी कुटुंब, समाज, विवाह, पारंपरिक जीवनपद्धती असे अनेक पापुद्रे हळुवार उलगडत जाते. जाणीवपूर्वक स्त्रीवादी लेखन करण्याचा त्यांचा अट्टाहास नसला, तरी तिच्या अस्मिता, आत्मसन्मान अशा अनेक मुद्यांना ती स्पर्श करते किंवा समर्थपणे त्यांना भिडते. जगण्याच्या प्रवासात तळाशी दडलेले दुःख अथवा बोच यांचा शोध घेणे हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. त्यांच्या नायिका तशा पाहू जाता जराशा सौम्य प्रकृतीच्या, नवीन जाणिवांसह आत्मभान जागृत झालेल्या असल्या, तरी स्त्री मुक्तीच्या अवास्तव कल्पनांच्या आहारी गेलेल्या दिसत नाहीत. श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1975 चे दशक स्त्री स्वातंत्र्याचे दशक म्हणून घोषित केले, तेव्हा आपल्याकडे नुकतीच ही संकल्पना रुजू लागली होती. टी. व्ही किंवा इतर माध्यमांचे स्तोम फारसे वाढले नव्हते. एकीकडील विचार, संकल्पना दुसरीकडे पोहोचून रुजण्यास बराचसा कालावधी लागत होता. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ बराच मागे होता. स्त्री मुक्ती आंदोलनाने खूप जोर पकडला नव्हता, तरी त्याचे वारे वाहू लागले होते. आणि याच टप्प्यावर आशाताईंचे लेखन प्रवाही झाले होते. त्यातून स्त्रियांची सीमित का होईना पण बंडखोरी, आत्मभान उमटू लागले होते. स्त्री-पुरुष संबंधातील मोकळाढाकळा व्यवहार तर त्यात अभावानेच असावा. पण त्यांच्या कथा/कादंबऱ्यांमधली स्त्री कधीच बावळट, दुबळी अथवा सामान्य अशी नव्हती.

'निवडुंग' या कथेतून गायत्रीच्या रूपाने एक वेगळीच धैर्यवान स्त्री उभी राहते. निराधार गायत्रीला गावच्या जहागिरदाराकडे आणून ठेवले आहे. ती परिस्थितीशरण आहे. जहागिरदाराचा विवाहित दारूडा मुलगा विश्वास तिच्याच गुंतत जातो. लांबसडक केस न्हाऊन उन्हात वाळवणाऱ्या गायत्रीच्या पाठमोऱ्या छबीवर विश्वासची नजर खिळलेली. विश्वासच्या बायकोच्या हे ध्यानात येतं. साऱ्या परिस्थितीचं आकलन होऊन गायत्री गावी परत जाण्याचा निर्णय घेते. गावाकडचं भविष्य काटेरीच असतं. पण तरीही स्वाभिमानी ती तो काटेरी मार्ग निवडते. विश्वाससाठी ती एक निरोप ठेवते की, "आपल्याला भोवतालची ओळख होत नसते तर सवय होत असते. तुम्ही टाकलेल्या तुकड्यावर पोसलेले आम्ही. आम्हाला राग कसा येऊ शकतो? बायकांची जातच निवडुंगाची, कुठेही, कशीही रुजून जाते." अशा गायत्रीच्या जगण्याचा आलेखच यातून मांडला आहे.

कधीकधी असेही जाणवते की, त्यांच्या लेखनाला काही बंधने आहेत. जसे की, लेखिकेचे अनुभवक्षेत्र केवळ मध्यमवर्गापुरतेच मर्यादित आहे. त्यातील कौटुंबिक वातावरण थोड्याफार फरकाने सारखे आहे. संवादाची जातकुळी तशीच आहे. पण हे नाकारताच येणार नाही की, हे अनुभव साकारण्याची त्यांची अति तरल, मनोविश्लेषणात्मक, अनेक पदरी शैली त्यांच्या कथेला/कादंबरीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवते. बघता बघता ती वाचकांच्या मनातील सगळ्या शक्यता बाजूला सारून अनपेक्षित वळण घेते. त्या वळणावर वाचक मात्र भारावून गेलेला दिसतो. त्याच्या आकलनापलीकडील काही त्याला गवसल्यासारखे वाटते. अन् हेच त्यांच्या कथेचे/कादंबरीचे यश आहे. त्यांच्या कथेतील नायक कधी डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, मास्तर, दागिन्यांच्या दुकानाचा मालक, तर कधी एखादा मनोरुग्ण मुलगाही आहे. सणवारांच्या उल्लेखात गौरी-गणपती, दसरा दिवाळी आहेत तसे वर्षश्राद्धासारखे विधीही आहेत. धो धो कोसळणारा, रिमझिम बरसणारा पाऊस आहे, तर एक वैदर्भीय वाडा अन् तिथली पिढीजात संस्कृती आहे. हा वाडा, हा पाऊस तर जणू त्यांच्या कथांमधून पात्र म्हणूनच अवतरले आहेत. असं वाटतं हा पाऊस नसता तर हे मरण नसतं. अन् हे मरण नसतं तर ही कथाही नसती. मध्यमवर्गीयांच्या जगण्यातील एकही अनुभव त्यांच्या नजरेतून आणि लेखणीतून सुटला नसावा. कथेतील/कादंबरीतील पात्रांचे मनोविश्लेषण हे त्यांच्या लेखनाचे बलस्थान आहे.

आशाताईंच्या अनेक कादंबऱ्या वाचकांच्या मनावर सर्वकाळ राज्य करतात. कथा लिहिता लिहिता त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या. तिथेही त्यांच्या लेखनाचा कस लागला. 'मनस्विनी' ही त्यांची पहिली कादंबरी.

'दर्पण', 'मारवा', 'सेतू', 'भूमिका' आणि 'उत्सव', 'त्रिदल' अशा त्यांच्या एकाहून एक सरस कादंबऱ्या. या कादंबऱ्यांतील वर्णने अतिशय सजीव. बनारसच्या एका घराच्या आत तर भलामोठा वटवृक्षच वाढलेला. नव्हे त्या वटवृक्षाच्या आधारानंच जणू काय हे घर उभं झालेलं.

आशाताईंच्या कादंबरीतील मृत्यूसुद्धा सजीव झाल्यासारखा वाटतो. मृत्यूचं स्वागत आणि स्वीकार अपरिहार्य असला तरी त्या स्वीकाराला लाभलेली उदात्तता अद्भुत आहे. मृत्यू इथं भयप्रद वाटत नाही, तर मांगल्याचं रूप घेऊन अवतरतो.

आशाताईंच्या कादंबऱ्यांमधून नव्या-जुन्या पिढ्यांतील माणसांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन रंगवताना मानवी नातेबंधाची उत्कट रूपे रेखली जातात. त्यांची जीवनाबद्दलची खोल चिंतनशीलता त्यातून जाणवते. मानवी जीवनाचे, नातेसंबंधाचे विभ्रम कादंबरीतून पुरेशा अलिप्तपणे साकारणारी त्यांची शैली व्यक्तिरेखांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या आयुष्यासकट वाचकांसमोर जिवंत उभी करत जाते. त्यातले चिंतन वाचकांना विचार करण्याचा अवकाश पुरवत राहते. त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील वेगळेपणावर भाष्य करता येईल. परंतु विस्तारभयास्तव सरळ 'भूमी' या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकडे वळते.

एक महाराष्ट्रीयन डॉक्टर आणि तमिळ ख्रिश्चन सिस्टर यांचं अपत्य म्हणजे भूमीची नायिका 'मैथिली'. वडिलांचा मृत्यू तिच्या नकळत्या वयात झालेला. दूरदूरपर्यंत वडिलांच्या काहीही आठवणी नाहीत. आईचाही मृत्यू अकाली म्हणावा असा. मग सुरू होते चिमुकल्या मैथिलीची फरफट. जवळचे नातेवाईक कुणीच नाहीत. फक्त आईची एक बहीण, वडिलांची एक बहीण आणि वडिलांचे एक डॉक्टर मित्र. मृत्यूपूर्वी मैथिलीची अम्मा तिघांनाही पत्र पाठवून मैथिलीची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल विनंती करते. मैथिलीची मावशी अन् डॉक्टर काका सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मैथिलीची आत्या तेवढी येते. आपल्याच भावाची पोर म्हणून तिला स्वतःसह मुंबईला नेते. तमिळ ख्रिश्चन आईच्या संस्कारात वाढलेली, समुद्रकिनारी वसलेल्या लहानशा गावात वाढलेली ही मुलगी... आत्याकडे लहानाची मोठी होताना बालपण मागेच सारलं जातं अन् एक वेगळीच मैथिली घडत जाते. हा संपूर्ण प्रवास मुळातच वाचण्यासारखा आहे. एक अत्यंत हुशार अन् स्वाभिमानी मुलगी, तिच्या आयुष्यात घडलेलं हे स्थित्यंतर, आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकणारं वादळ अन् आयुष्यभर घडत गेलेली मेटामॉर्फसिस्ची प्रोसेस. अनेक अनुभव तिला समृद्ध करतात किंवा आयुष्याशी सामना करण्याचं बळ देतात. एक अनाथ, हट्टी मुलगी, कालांतरानं तिचं एका सुबुद्ध, समंजस आणि प्रगल्भ स्त्रीत झालेलं रूपांतर, स्वतःतल्या स्वत्वाला ओळखून स्वतःशीच केलेला संघर्ष... अन् जमिनीवर घट्ट पाय रोवून उभी राहण्याची तिची विजिगीषा म्हणजेच 'भूमी'.

वाल्मिकी रामायणातली मैथिली अन् ही मैथिली यात काही साम्य शोधायचा प्रयत्न केला तर हाती काय लागतं ? मला वाटतं, दोघीही बंडखोर आणि समंजस आहेत. दोघींची पारंपरिकतेशी नाळ जुळलेली आहे. श्रीरामाने त्याग केल्यावर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहून लव-कुशाला जन्म देणारी मैथिली. राम भानावर येऊन तिचा स्वीकार करू म्हणतो, तेव्हा ती अलगद भूमीच्या उदरात शिरते. कुठल्या भावनेनं ? 'तुला हवं तेव्हा तू माझा स्वीकार करशील, तुला हवं तेव्हा तू मला दूर लोटशील. मी एक खेळणं फक्त तुझ्या दृष्टीनं. नकोच मला आता हा स्वीकार नकाराचा खेळ.' याच भावनेनं तर नव्हे ? असं असेल तर वाल्मिकींची मैथिली ही स्त्री स्वातंत्र्याची पहिली पुरस्कर्ती ठरते.

आणि 'भूमी' मधली मैथिली एका मर्यादेत अडकून न राहणारी अशी. पारंपरिकतेची नाळ न तोडताही आधुनिक विचारसरणीला सामोरं जाता येतं हेच सिद्ध करणारी. स्वत्व जपतानाच आयुष्याचा तोलही समर्थपणे सांभाळणारी, अनेकांना मदतीचा हात देणारी, अनेकांच्या समस्या समजून घेणारी. ललीच्या मरणप्रसंगी सुधीरला साथ देणारी खंबीर मैथिली आणि ज्याच्याशी जन्माचं नातं जुळलेलं त्या शंतनूलाही समजून घेणारी एक परिपक्व मैथिली. त्याच्याबद्दल मनात करुणा दाटून येणारी अन् घराकडे परतणारी मैथिली.

"ती पोचली तेव्हा आवारातला दिवा होता. आतही होता. शंतनूच उठला असेल. तीनपासून त्याला झोप नसते. तिनं बेल दाबली. जरा वेळानं पावलं वाजली ती शंतनूची. नीरजा तर साखरझोपेत असेल! पावलं जवळ आली. तिनं खोल श्वास भरून घेतला. वर आकाशाकडे पाहिलं. ते निळं फिट निळं पसरलेलं. अद्याप एखाद-दुसरी चांदणी होतीच. त्याखाली आवारातली झाडं मंद सळसळत होती."

इती भूमी.

'भूमी' नंतर आलेल्या आशाताईंच्या दोन कादंबऱ्या 'चक्रवर्ती' (2014) आणि 'मुद्रा' (2015). त्यांचा समग्र कादंबरी लेखन प्रवास पाहिला तर 'चक्रवर्ती' ही कादंबरी त्यात कुठेही न बसणारी. त्यांनी मनोगतात लिहिल्याप्रमाणे ही त्यांना गुरूस्थानी असणाऱ्या प.पू. मामांच्या जीवनकहाणीचा पट. एका अर्थी चरित्रात्मक कादंबरी. अतिशय वेगळ्या धाटणीची. लेखनाचा बाज मात्र नेहमीप्रमाणे ताकदीचाच. म्हणूनच हे चरित्रात्मक लेखन यातील नायकाला समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवते.

'चक्रवर्ती' नंतरची आशाताईंची कादंबरी 'मुद्रा'. पायाने अधू असलेल्या निरंजनीची ही कथा. नीरूचे वडील गायक. वडिलांकडून मिळालेला सुरांचा वारसा तिची खरी ओळख बनतो. सुरांच्या दुनियेत रमलेली नीरू स्वतःच्या अपंगत्वावर मात करते. संगीत आणि माणसाचं जगणं यांचा हा सुंदर मिलाफ सारं आयुष्यच देखणं करून जातो. नीरूनं आपल्या आयुष्यावर कोरलेली तिची मुद्रा वाचकांनाही सात्विक आनंद बहाल करते. संगीत हा आशाताईंचा आत्मा. अन् उत्कटतेनं त्याचं प्रगटीकरण हे सारंच त्यांच्या कलाकृतीला सर्जनशील, अभिजात पातळीवर पोहोचवतं.

आशाताईं जेवढ्या उत्कटतेनं लेखन करतात, तेवढ्याच उत्कटतेनं माणसांमध्ये मिसळतात. त्यांची एखाद्या कार्यक्रमातील उपस्थिती, त्यांचं अस्तित्व अतिशय चैतन्यमयी असतं. शांत आणि हसतमुख चेहऱ्याच्या आशाताई अत्यंत आश्वासक वाटतात. माणसावर प्रेम करण्याची त्यांची पद्धत सांगण्यासाठी म्हणून हा किस्सा नमूद करते. त्यात आत्मप्रौढीचा उद्देश नाही. पण तशी ती वाटत असल्यास सुरुवातीलाच वाचकांची क्षमा मागते. त्यांचा एकदा मला फोन आला.

"सुप्रिया, तुला एक आठवण सांगते. दुर्गाबाईंना माझी एक कथा खूप आवडली अन् त्यांचा मला फोन आला, 'अगं मुली, तुझी ही कथा मला फार आवडली. मला स्वतः स्वयंपाक करून तुला जेवायला घालावंसं वाटतंय.' मला किती आनंद झाला असेल तू कल्पना कर. पण काही कारणानं ते जेवण मात्र राहूनच गेलं. आता तुला फोन करायचं कारण असं की, मी आत्ताच तुझी 'माहेर' दिवाळी अंकातली कथा वाचून संपवली. ती मला इतकी आवडली की मलाही तुला काहीतरी करून खाऊ घालावंसं वाटतंय. तर तू आज संध्याकाळी नक्की माझ्या घरी ये. मी तुला कांद्याच्या चकल्या करून खाऊ घालणार आहे."

मला त्या क्षणी जाणवलं की, अजूनपर्यंत मला एकही इतका मोठा पुरस्कार मिळालेला नाही. मी लगेचच संध्याकाळी जाऊन आशाताईंच्या हातच्या कांद्याच्या गरम गरम चकल्या खाऊन आले.

चराचरावर नितांत प्रेम करणाऱ्या आशाताईंना मराठी साहित्य अकादमी पुरस्कार, मानाचा जनस्थान पुरस्कार, गुजराथी साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, असे अगणित प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माझ्यासारख्या सच्च्या वाचकांची इच्छा हीच आहे की, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री किताबासह जगातील सारेच प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बहरून आलेलं त्यांचं लेखन याही वळणावर असंच बहरत राहो. अशा अभिजात साहित्यकृतीच्या निर्मितीकरता ईश्वर उदंड आयुष्य त्यांना बहाल करो, हीच प्रार्थना.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके