रोममधील काही रस्ते बरेच अरुंद आहेत. रस्ता ओलांडताना त्या माझा हात धरीत; पण त्यांचे त्यांनाच काय वाटले व म्हणाल्या, 'तुम्ही सध्या माझ्या चार्जमध्ये आहात. वाक्याच्या सुरवातीला 'इफ यू डोन्ट माईंड' तुमची हरकत नसेल तर असे म्हणून काही सूचना करीत तेव्हा मी म्हटले, 'आपण वाक्प्रचारांत किती औपचारिकपणा आणला आहे नाही का? या प्रश्नास त्यांनी विरोध दर्शविला नाही, पण पुन्हा पुढील खेपेस 'इफ यू डोन्ट माईड' म्हणताच 'आय अॅम सॉरी' असे म्हणाल्या. माझ्या धार्मिकतेबद्दलच्या कल्पनांची त्यांनी पृच्छा केली. मी म्हटले मला एके काळी धार्मिक आचार विचारांबद्दल तीव्रता होती; पण गेल्या पंधरावीस वर्षात समाजवादी विचारसरणीने ती खूपच कमी झाली आहे.
प्रिय * *
ता. 28 मार्च रोजी आमचे विमान 3 वाजता निघाले, हे तुला माहीतच आहे. कराचीला 1 तास व कैरोला 1 तास थांबून आम्ही 20 तासांनंतर रोमला पोहोचलो. निघते वेळी अनेक हात व हातरुमाल फडफडत होते. त्या अनेक व्यक्तींच्या चेहऱ्यावरील चलचित्रपटावर दृष्टी रेगाळत राहिली त्यामुळे व विमानाच्या घरघरीमुळे जेमतेम अर्धा पाऊण तास साऱ्या रात्रींत झोंप लागली असेल. रोमच्या घड्याळात 7 वाजता विमानतळावर उतरलो व बसने विमानतळापासून 5/6 मैल अंतरावरील एअर टर्मिनलच्या रोम शहरांतील कचेरीत आम्ही आलो. आम्ही 12/ 13 लोक असू. 15 मिनिटांचे आत माझ्याखेरीज सर्व लोक जिकडे तिकडे निघून गेले. रोममध्ये इंग्लिश भाषा दहातील एका माणससुद्धा येत नाही. काय करावे म्हणून विचारात पडलो. डिरेक्टरीत बऱ्याच शोधाअंती पत्रपरिचितापैकी एकाचे नाव शोधून काढून फोन केला. तेही घरात नाहीत असे त्यांच्या पत्नी म्हणाल्या. पण मी त्यांच्याशी बोलण्याचे ठरविले. मी त्यांना विचारले 'मसानी' साहेबांचा व तुमचा परिचय आहे का? त्या होय म्हणाल्यावर थोडा धीर आला. त्यांचेकडून मी ओळखीचे पत्र आणले आहे. तुमच्याकडे येऊ शकतो का? त्या म्हणाल्या आमचे घर फार लहान आहे, येथे की पाहुणा उतरत नाही. मी म्हणालो माझे रहाणे मिजाशीचे नाही (fastidious). मी आमच्या दरिद्री खेड्यांत राहून काम करणारा मनुष्य आहे. त्यांनी आमच्या अधिकाऱ्याकडून मी कोठून बोलत आहे ते विचारून घेतले. त्या म्हणाल्या, "मी अर्ध्या तासात तुमच्याकडे येत्ये. अर्ध्या तासाचा तास सव्वातास झाला तरी बाई आल्या नाहीत, म्हणून मी अधिकाऱ्यांना म्हटले, मघाचा फोन नंबर द्या. मी पुन्हा फोन करून पहातो." ते म्हणाले, अहो बायांना असा उशीर व्हायचाच. मी मनात म्हटले हा स्त्रीजातीचा आदर. कोठेही जा पळसाला पाने तीनच. त्यांना म्हणालो, "अहो त्यांच्या घरातील कामातून सवड होईल त्याप्रमाणे येतील." पाच मिनिटात त्या बाई आल्याच. उशीराबद्दल त्यांनी माफी मागितली. त्यांचा आनंदी चेहरा पाहून बरे वाटले.
मी त्यांना माझे व दल संघटनेचे परिचय पत्र दिले. त्यावर त्यांनी नजर टाकली. नास्ता कोठे घ्यावा ह्या विचांरात त्या होत्या. मला उघड्यावर आवडेल का आत हे त्यांनी विचारले. माझी कोठेही संमती होती. जवळच रोमचे मोठे स्टेशन आहे, तेथे आम्ही गेलो. शेदीडशे यार्डाची चौरस प्रचंड शेड स्टेशनची आहे. तेथेच सर्व लोक खात पीत बसले होते. माझ्या इच्छेनुरूप त्यांनी कोको, पाव, जॅम मागवला. माझ्यापुढे सिगारेट केली. मी नको म्हटले. आमच्या गप्पा चालूच होत्या. थोड्या वेळाने मी त्यांना म्हटले 'आमच्याकडे स्त्रिया मुळीच सिगारेट ओढीत नाहीत;' त्या म्हणाल्या, 'मी, काही स्त्रियांना ओढतांना पाहिले आहे.' 'मध्यम कुटुंबांतील स्त्रिया ओढीत नाहीत,' मी म्हटले. 'काही श्रीमंत स्त्रिया ओढतात; त्यांना आम्ही सोसायटी गर्ल्स म्हणतो.' 'माझे ओढणे तुम्हाला "शॉकिंग वाटते का?" असे त्या म्हणाल्या,'मी फक्त चालीरीतीतील फरक नमूद केला.' मी म्हणालो. त्यांना लहानपणापासून हिंदुस्थानाबद्दल औत्सुक्य वाटत आहे असे सांगताच कोणत्या प्रसंगामुळे, तुमचे मुळचे ठिकाण कोणते असे मी त्यांना विचारले. 'आयरिश' म्हटल्यावर मी म्हटले 'मग साहजिकच आहे.' आम्हांलाही आयरिश चळवळीबद्दल आपुलकी वाटत आली आहे; आपणा उभयताना इंग्रजांच्या अमला खालून स्वातंत्र्य मिळवावयाचे होते. 'सिनफेन', 'ब्लॅक अॅन्ड टॅन' वगैरेबद्दल आम्ही आधाशीपणाने वाचीत असूं. पण त्यांना बॉबिंग चळवळीबद्दल उबग आल्यासारखे दिसले. सुदैवाने आमच्या देशाला महात्माजींचे पुढारीपण लाभल्याने राजकारणाला पावित्र्य लाभत चालले ही गोष्ट त्यांनाही समाधानाची वाटली.
रोममधील काही रस्ते बरेच अरुंद आहेत. रस्ता ओलांडताना त्या माझा हात धरीत; पण त्यांचे त्यांनाच काय वाटले व म्हणाल्या, 'तुम्ही सध्या माझ्या चार्जमध्ये आहात. वाक्याच्या सुरवातीला 'इफ यू डोन्ट माईंड' तुमची हरकत नसेल तर असे म्हणून काही सूचना करीत तेव्हा मी म्हटले, 'आपण वाक्प्रचारांत किती औपचारिकपणा आणला आहे नाही का? या प्रश्नास त्यांनी विरोध दर्शविला नाही, पण पुन्हा पुढील खेपेस 'इफ यू डोन्ट माईड' म्हणताच 'आय अॅम सॉरी' असे म्हणाल्या. माझ्या धार्मिकतेबद्दलच्या कल्पनांची त्यांनी पृच्छा केली. मी म्हटले मला एके काळी धार्मिक आचार विचारांबद्दल तीव्रता होती; पण गेल्या पंधरावीस वर्षात समाजवादी विचारसरणीने ती खूपच कमी झाली आहे. मध्येच एके ठिकाणी आम्ही समोरासमोर बसलो असता त्यांनी भेदक नव्हे पण खोल दृष्टीने माझ्याकडे पाहिले. तेव्हा मी म्हटले 'हा काय चमत्कारिक प्राणी आहे असे तुम्हाला वाटत आहे ना? त्या नुसत्या हसल्या. युरोपच्या भूमीवर पहिला मदतीचा हात त्यांनी दिला. चवथ्या शतकातील रोममधील जुन्यांत जुन्या चर्चमध्ये आम्ही गेलो. सेट मेरीच्या आख्यायिका या देवळाबद्दल बऱ्याच आहेत. मध्यभागात आठव्या शतकातील कलाकुसरीची कामे आहेत. ऐलच्या बाजून बराच मोठा भाग आहे. तेथील चित्रे मात्र त्या मानाने अलिकडची काटली म्हणून मी म्हटले ग्यूऑर्डनो ब्रूनो नंतरची ही चित्रकला असावी. त्यावरून तेराव्या शतकापासूनच्या रेनेसान्सच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्या इतिहास व राजकारण विषय घेऊन एम. ए. झाल्या. पुढे Anthropology हा पीएच. डी. चा थिसीस लिहीत असताना युद्धाच्या धामधुमीमुळे व पुढे वेळ न मिळाल्याकारणाने ते तसेच राहून गेले.
माझी कोणाच्या घरात सोय होऊ शकते का हे पाहाण्यासाठी त्यांनी दोन तीन ठिकाणी फोन करून पाहिला; पण जमू शकले नाही. अखेर एका हॉटेलात खोली ठरवून टाकली. एअर टर्मिनलच्या ऑफिसमधील सामान घेऊन आम्ही हॉटेलमध्ये गलो. थोड्या सवलतीने मला खोली मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ही खोली पार्लमेंट हाऊसच्या अगदी समोर आहे. खोलीतून हाऊसवरील मोठे घड्याळ दिसते. दोन मिनिटांचे अंतरावर सोशलिस्ट पार्टीचे ऑफिस आहे. खोलीत सामान ठेऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. जवळच्याच एका हॉटेलमध्ये माझ्या सल्ल्याने भोजनाचा बेत ठरवला. त्यांना घरी जाणे भाग होते. सकाळचा नाश्ता, हॉटेलमध्ये सामान आणण्यास टॅक्सी खर्च व लंच या सर्वांचे पैसे मी, नको म्हणत असताना त्यांनीच दिले. त्यांनी देण्यापूर्वीच मी देऊन टाकावे म्हटले तर येथील नाण्यांच्या घोटाळ्यामुळे काय द्यावे हे समजेना. माझ्या मुंबईतील निरोपाचे सभेचे वेळी मी म्हटले होते की, मी शक्यतो कोणाच्या तरी घरी रहाण्याचा प्रयत्न करणार. घरातील माणसे हॉटेलमध्ये जेवणास गेली तर मलाही जावे लागेल. त्यावेळी मला एका मुलीने विचारले होते की अशा वेळी हॉटेलचे पैसे त्यांनी देण्याची पद्धत आहे की तुम्ही द्यायच? त्यावळी मी म्हटले होते ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. माझा पैसे वाचवण्याचा प्रयत्न राहाणार नाही.
खोलीत साऱ्या सोयी आहेत. भोजनोत्तर मी झोंपण्याचा प्रयत्न केला पण झोंप येईना. बॉश बेसिनला गरम व थंड पाण्याच्या दोन तोट्या आहेत. स्नान केले व कपडे धुतले. खादीचा गंजीफ्रॉक व पायजमा. मला सवानी काय भीती घातली होती की तुम्हाला स्नान करता येणार नाही, कपडे धुण्याचे तर नावच नको! बेसिनमध्येच साबण लावून पाणी तुंचबवून कपडे धुतले; फक्त खळबळता आले नाहीत. अर्धा पाऊण तास लिहिले असेल इतक्यात चार वाजता मिसेस सिलोनी यांनी पूर्व योजना केल्याप्रमाणे त्यांच्या भगिनी माझ्याकडे आल्या. सायंकाळी सातपर्यंत त्यांच्या बरोबर भटकलो. तरुण; पदवीधर बी. ए. झाल्या आहेत व एम. ए. चा अभ्यास करीत आहेत. जरा पोरसवदा प्रकार आहे. उंची पांच फूट आठ इंच. वडील बहिणीपेक्षा एक फूट अधिक. वडील सहा फूट सहा इंच आहेत. आर्यलंडमध्येच रहातात. आयरिश सिव्हिल सर्व्हिसमध्ये अकौंटंट होते. आता पेन्शनर.
मी उंचीबद्दल कौतुक व्यक्त केले पण ती उलट म्हणाली मला उंचीमुळे न्यूनगंड वाटतो. (Inferiority Complex) मला आश्चर्य वाटले. मी म्हटले आमच्याकडे ज्याप्रमाणे एखाद्या सशक्त मुलीस वाईट वाटून आपण छेलकाट्या कशा होऊ असा रोग लागलेला असतो. त्यापैकीच तुझी अवस्था झालेली दिसते. ती म्हणाली असे आहे खरे. इटलीत सामान्यतः उंची बरीच कमी दिसते. जाडेपणा मात्र बराच. नाकाडोळ्याने व रूपाने बऱ्याच मुली चांगल्यापैकी दिसतात.
मी तिला म्हटले आपण शहरातील अगदी गरीब भागात जाऊया. तिला येथे येऊन आठ दहा महिनेच झाले आहेत. त्यामुळे नक्की (Slum Area) गरीब भाग असा दाखवता येणार नाही म्हणाली. तथापी काही भागातून गेलो. अरुंद गल्ल्या होत्या, थोडी-बहुत घाण मारत होती. बहुतेकांच्या अंगावर सुती कपडे व तेही काही ठिकाणी ठिगळे असलेले. वाळत घातलेल्या काही कपड्यांत अगदी लक्तरे होती. तिच्या बरोबर तिच्या खोलीवर गेलो. एका कुटुंबाच्या फ्लॅटमधील एक खोली तिला मिळालेली आहे. तो भाग अगदी शांत दिसला. अभ्यासाला तिला चांगला निवातपणा लाभू शकतो. खोलीत टेबलावर तीन चार दारूच्या बाटल्या होत्या. ती म्हणाली, 'मी निशाबाज नाही. थोडी पिते; पण आजच येथे काही मुले आली होती.' दुसरे दिवशी सकाळी 11 वाजता बाई आल्या. त्यांच्याबरोबर फिरलो. कीट्स ज्या खोलीत रहात होता व जेथे त्याचा अंत झाला ती खोली बाहेरून पाहिली. 9 ते 12 च ती खोली उघडी असल्याचे लिहिले होते. बायरन किंवा शेलेपेक्षा ही मला कीट्सविषयी जास्त आदर वाटत आला आहे. पुन्हा केव्हातरी ती खोली आंतून पहाण्याचे ठरविले. शेलेचा अंतही जहाजावर जवळपास झाला. उभयतांची एका जागी सिमेटरी आहे. ती केव्हातरी पाहीनच. दुपारी बाईना वेळ नव्हता. टूरिस्ट बसची योजना आहे. त्यांतून 2 ते 6 फिरलो. रोमच्या आर्ट गॅलरीचे वर्णन काय करावे. There is no city in the world like Rome. रोमसारखे शहर जगात नाही, असे गटेर्ने म्हटले असल्याचे स्मरते. मोझेईक आर्ट, रॅफेल व मायकेल अँजेलो यांनी चित्रकलेत व शिल्पकलेत वास्तववाद आणिलेल्या स्वरूपाचे बहारीचे नमुने आणि अलिकडल्या काळातील बर्निनि यांच्या कालकृतींनी आर्ट गॅलरी नटलेली आहे.
मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या म्यूझियमच्या चित्रांचा यापुढे काय पाड. जगात कोठे नसेल असे दृश्य एके ठिकाणी दिसले. चार हजार मानवी सांगाडे एकत्र करून त्यांतून भिंतीवर सजावट केली आहे. शंकराच्या रुंडमाळांची आपणास कल्पना आहे; पण हे चित्रकार शंकराचे खरे उपासक म्हटले पाहिजेत. सांगाड्याच्या वेगवेगळ्या भागानी भिंती सजवल्या आहेत. सांगाड्याचे हे अवशेष आहेत. असे सांगितल्यावाचून कल्पना येणार नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी तेथील चित्रकारांनी रोमचा आश्रय घेतला व त्यांची ही कर्तबगारी आहे असे वाटाड्याने सांगितले. बायरनने चाईल्ड हॅरोल्डमध्ये जागोजाग वर्णन केलेल्या अनेक गोष्टींचे रोममध्ये प्रत्यक्ष दर्शन होते. जॅनिक्युलमच्या टेकडीवरून सबंध रोम शहराचे (पॅनोरमिक व्हयू) दृश्य येथून साकल्याने दिसू शकते. जगातील श्रेष्ठ सेट पीटर्सचे चर्च पाहिले. न्यूयॉर्कमधील सर्वात मोठे चर्च व्हीम्स, सेटपॉल वगैरे मंदिरांची लांबी कोठवर आहे ती यात नेमकी दाखविली आहे. आर्ट गॅलरीचे खालोखाल येथे अनेक कलाकृतींचे नमुने आहेत. एके जागी कपड्याला जशा दृश्य संगमरवरी दगडांतून घड्या पडल्या तसे दाखविले आहे. कलेचा अभ्यास करणाऱ्यांना रोममध्ये जन्मोजन्म घ्यावेसे वाटतील. मात्र आपल्या वेरूळ व अजिंठ्याचा रोममध्ये थांग नाही. रोममध्ये बार्निनि यांच्या नावाने बार्निनि चौक स्क्वेअर आहे. टूरिस्ट मोटारीतून व काही भाग आगबोटीतून, बुधवार ते गुरुवार रात्री 12 पर्यंत, नेपल्स पोंपे, सोरेटो कॅप्री हा सुमारे चारशे मैलांचा प्रवास करून आलो. त्याचे वर्णन पुढील खेपेस.
तुझा,
भाऊ
ता. 2।4।54
Tags: साधना वेरूळ अजिंठा मुंबई कराची रोम भाऊसाहेब रानडे Sadhana Verul Ajantha Mumbai Karachi Rome Bhausaheb Ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या