पॉम्पे शहर खूप उंचावर आहे. सारे रस्ते दगडांचे. पंढरपूरच्या विठोबा भोंवतालच्या रस्त्यांची आठवण होते. ज्युपिटर व डायना यांचे मोठे देवालय आहे. फोरम येवढा मोठा आहे की त्यांत दहा हजार लोक सहज जमूं शकतील. संगमरवरी दगडांवरील विविध रंगांची चित्रे पाहून अजंठ्याची आठवण होते. पब्लिक बाथची योजना अतिशय कौशल्यपूर्ण आहे. तीन हजार वर्षापूर्वीची इतकी चोख व्यवस्था पाहून आपण खरोखरच काही प्रगती करीत आहोत का अशी जबर शंका जशी माझ्या मनात आली तशी ती माझ्या बरोबरीच्या एका अमेरिकन माणसाच्या मनात आली.
इटलीत मी थोडे दिवस राहाणार असल्यामुळे निदान दक्षिण इटलीतील भाग आता पाहावा व उत्तरेकडील भाग नंतर पश्चिम युरोपमधून उतरतांना पाहता येईल असे मला वाटत होते. नेपल्स, पॉम्पे, केंप्री अशी दोन दिवसांची एक टूर आहे. चारशे मैलांच्या या प्रवासाचा खर्च दहा पौंड असल्यामुळे हा प्रवास करणे माझ्या जिवावर येत होते. सिलोनेबाईनी टूरमधेच जाण्याचा आग्रह केला व मी ता. 31 रोजी सकाळी 7 वाजता टूरींग बसने हॉटेलमधून निघालो. रोम शहराचा विस्तार पूर्वीसुद्धा खूपच मोठा असला पाहिजे. पंधरावीस मैलांपर्यंत जुन्या 'अॅक्वेडक्ट्स' चे (पाण्याचे पाट) पाहावयास मिळत होते. बाजूची दृष्टिपथांतील सर्व जमीन पिकांमुळे हिरवीगार दिसत होती. कोठे पीक नसेल तर जमिनीची मशागत चालू होती. टेराचीना हे लहानसे बंदर रोमपासून पन्नास मैल असेल. येथून पुढे कालवा नव्हता तरीही जमीन पिकांनी हिरवीगार. इटलीचा शेतकरी निश्चितच अतिशय कष्टाळू, दक्ष व बागाईती कामात वाकबगार असला पाहिजे. उंच, सखल, डोंगरकपारी काही असो, नेपल्सपर्यंत साठसत्तर मैलांच्या अंतरांत कोठे चुकून सुद्धा दहा हात जमीन पडीत दिसली. नाही...... वाटेंत सिसेरोची दफनभूमी लागली.
नेपल्सला आम्ही 12 वाजता पोहोंचलो. अगदी बंदरावरच एका श्रीमंती हॉटेलात आमची जेवणाची व्यवस्था झाली होती. नेपल्सची वस्ती 11 लाख आहे. येथील बँकांची देवघेव फार प्रचंड आहे. खिसेकापू व चोरबाजार यांचे प्रस्थ फार (उपसिद्धांतच आहे तो) असे मला रोममधे बजावण्यात आले होते. म्हणून अगदी किरकोळ पैसे आणले होते. नेपल्सच्या बंदरावरून व्हेसूव्हीयसचा ज्वालामुखी व पॉम्पे शहर दिसते. पॉग्पेच्या वाटेवर एक कोरल फॅक्टरी आहे. मोठमोठ्या शंखांवर व शिंपल्यांवर अतिशय सुंदर कलाकुसरीची कामे होतात. आंगठ्यांवर सुबक चित्रे कोरलेली होती. कोरलच्या व इतर अनेक इयरिंग्ज पाहिल्या, पण किमान किंमत पंचवीस रुपये.
पॉम्पे शहर खूप उंचावर आहे. सारे रस्ते दगडांचे. पंढरपूरच्या विठोबा भोंवतालच्या रस्त्यांची आठवण होते. ज्युपिटर व डायना यांचे मोठे देवालय आहे. फोरम येवढा मोठा आहे की त्यांत दहा हजार लोक सहज जमूं शकतील. संगमरवरी दगडांवरील विविध रंगांची चित्रे पाहून अजंठ्याची आठवण होते. पब्लिक बाथची योजना अतिशय कौशल्यपूर्ण आहे. तीन हजार वर्षापूर्वीची इतकी चोख व्यवस्था पाहून आपण खरोखरच काही प्रगती करीत आहोत का अशी जबर शंका जशी माझ्या मनात आली तशी ती माझ्या बरोबरीच्या एका अमेरिकन माणसाच्या मनात आली.
पॉम्पेहून सॉरेन्टो सुमारे वीस मैल आहे. तिथे उतरण्याची व्यवस्था एका अतिशय श्रीमंती थाटाच्या हॉटेलमध्ये होती. त्याखेरीज दोन दिवसात आणि सुमारे चारशे मैलांच्या प्रवासात दहा पौंड कसे खर्च होणार? आत शिरताना लहानशीच बाग पण अतिशय विविध रंगांच्या नाजुक फुलांनी बहरलेली आहे. सॉरेन्टोहून कॅप्री आठ दहा मैल असेल. कॅप्री बेट एकेकाळी सॉरेन्टोशी संलग्न असावे अशी मी कल्पना करीत आहे. कॅप्रीचे प्रचंड कडे बोटींतूनच दिसू लागले. सुमारे हजार फूट उंच व दोन तीन मैल लांब पायथ्याशी कॅप्रीचा किनारा आहे. सॉरेन्टोहून केंप्री पाहाण्यास आमच्या बोटींत चार-पाचशे लोक असतील. व असे लोक सारखेच येत असतात. आम्ही लाँचने केंद्रीच्या टोंकाला आलो. या ठिकाणी बहुदा पाण्याच्या लाटा आदळून अगर निसर्गाच्या पराक्रमामुळे एक कपारी निर्माण झाली आहे. ही कपारी शंभर फूट लांबी-रुंदीची आहे. लाँचसुद्धा यांत जाऊ शकत नाही. दोन तीन माणसे बसू शकणाऱ्या कॅनोमधून आत जाता येते. या कपारीच्या आतील टोकास अगदी अंधार आहे. तेथून कपारीच्या तोंडाजवळचा दहा-पंधरा फुटांचा पाण्याचा देखावा असा काही मनोहारी दिसतो की मी सबंध जन्मात विसरणार नाही. सॉरेन्टो ते कॅप्री सबंध पाणी निळेभोर आहे. बायरनच्या, "Roll on, thou deep blue ocean, roll on" या ओळीची आठवण अगोदरच होऊ लागली होती. कॅप्रीवर पठार आहे ते उंच सखल आहे. वस्ती बहुतेक पाचशे फुटांपासून हजार फुटांचे उंची वर. प्रशस्त आणि टोलेजंगी इमारती पाहून आश्चर्य वाटले. येथील लोकांना उद्योग एकच. टूरीस्ट लोकांना लुबाडणे राजरोस त्यांच्या गळ्यात नाना तऱ्हेच्या चिजा बांधून.
मिस् लॅरसी हिच्याबरोबर एका गरीब भागात फिरल्याचे वर्णन मागील पत्रांत दिलेच आहे. आज पुन्हा रोम शहराच्या अगदी एका टोकाला असलेल्या टॉर मॅरॅचीया या गरीब भागात गेलो. हा भाग वीस पंचवीस फूट खलाटीत आहे. सुमारे शंभर घरे असतील. सारी लाकडी घरे. वर कौलार व बाजूस फळकुट्या अगर पत्र्यांचे तुकडे. कुणाच्या तरी घरात शिरावे अशी माझी इच्छा पण भाषेची अडचण. लॅरसीला कुणाशी बोलण्याची लाज वाटू लागली. एक बाई आमच्याकडे पहात आहे असे मला दिसताच लॅरसीला मी डिवचले व मग तिने बोलण्यास सुरवात तर केली. आम्ही तिच्या घरात जाऊन बसलो. एका खोलीचे घर. तिचा नवरा आजारी असल्याने बराच काळ हॉस्पिटलमध्ये आहे. चार मुले. सर्वात धाकटे दोनअडीच वर्षाचे. मी बरोबर काहीतरी गोड पदार्थ न्यावयास पाहिजे होता. मग मी दोन्ही मुलांच्या हातात एकेक नाणे दिले. बाईंनी राग मानला नाही. त्या झोपडीच्या आसपासची जागा आपल्या खेड्यांतल्या सारखी असली तरी खोलीतील व्यवस्थत मात्र जमीन अस्मानाचा फरक होता. दोन कपाटे, दोन टेबले. त्यांत व त्यावर सारे सामान व्यवस्थित मांडलेले. कपडे सारे खुंटाळ्यावर. स्वयंपाकाची भांडी बहुतेक भिंतीवर लटकावलेली. दोन बिछाने गरिबीचेच, पण व्यवस्थित. एक लहान घड्याळ. स्वयंपाक गॅसबत्तीवर. मुलांना जवळच खलाटीवर एक शाळा व टुमदार चर्च.
ऑथेलो ऑपेराची तीन तिकिटं दोन दिवसांपूर्वीच काढून ठेवली होती. आम्ही दोघेजण जेवण आटोपून थिएटरवर गेलो. थिएटरचे नावच ऑपेरा. रोमच्या पूर्वीच्या वैभवाला साजेसे हे थिएटर आहे. एकूण मजले चार. सुमारे दोन हजार प्रेक्षक सहज बसूं शकत असावेत. एवढ्या मोठ्या इमारतीत कोठेही खांब नाही. स्टेज निदान 400 x 60' तरी असावे. नाटकांतले मूळ कथानक कायम ठेऊन बाकी बदल ऑपेराच्या सोईनुरूप केला होता. सर्व प्रकार पद्यमय. नेपथ्य खूपच. स्टेजवर एका वेळी एकूण शंभर जणांनी तरी प्रवेश केला असावा. स्टेजलगत आपल्या थिएटरात पाच-सहा वादक बसलेले असतात, त्या जागी 50 हून अधिक लोकांचा ऑर्केस्ट्रा होता. सारी मदार गाण्यावर, त्यामुळे अभिनयाला वाव नाही.
माझे तिकिट बाईनी काढ़ल होते. चार्ज विचारला तर सांगेनातच. मी ज्यावेळी टिप्पणे घेतलेली त्यांनी पाहिली तेव्हा माहितीसाठी म्हणून त्यांनी चार्ज सांगितला. दोन हजार लीरा म्हणजे 17-18 रुपये. तरी हा मध्यमच चार्ज होता. बाई काही श्रीमंत नाहीत. नाटकास स्त्रीपुरुषांची संख्या जवळजवळ सारखीच होती. बहुतेक सारे प्रेक्षक नाटक सुरू होण्यापूर्वीच आले होते. एकदा नाटक सुरू झाले की प्रेक्षक येण्यास बंदी. पाहिजे असल्यास दुसऱ्या अंकाचे सुरवातीस यावे. ही व्यवस्था अतिशक अभिनंदनीय आहे. उशिरां येऊन आपल्या शिष्टाईचे प्रदर्शन करणाऱ्यास त्यामुळे आपोआपच आळा बसतो.
एखाद्या खेड्यात जाऊन इकडील शेतकऱ्याचे जीवन पाहण्याची माझी इच्छा होती. येथील सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्या गेब्रीला मेयर म्हणून बाई आहेत. त्यांनी मनावर घेऊन हा योग घडवून आणला. कॉम्रेड कार्बोने हे गृहस्थही आमच्याबरोबर होते. ते पूर्वी लष्करात होते. नंतर मेकॅनिक म्हणून भोपाळला पाच वर्षे होते. पण त्यांना हिंदीचे पाच शब्द काही बोलता येत नाहीत. इंग्लिश मोडके तोडके. ग्रेबीला, कार्बोने आणि मी मोटारींतून सकाळी 9 वाजता आजच्या सफरीला बाहेर पडलो. रोमपासून वीस मैल आम्ही गेलो नसू तोच आमची मोटर पोलिसांनी अडवली. कारण त्याच रस्त्याने मोटरसायकल रेस जाणार होती. रेस पाहावयास मिळणार म्हणून मला आनंद झाला. आम्ही थांबल्यापासून सुमारे अर्धा तास झाल्यानंतर शर्यतीतील पहिला मोटरसायकलिस्ट आला. मी औत्सुक्याने नंबर मोजीत राहिलो. तीनशे नंबर मी मोजले तरी शर्यत चालूच. पहिल्या व तीनशे नंबरवाल्यांत एक तासाची तफावत पडली. तरीही शयतीतील सायकली येतच होत्या. शेवटी माझ्या औत्सुक्याचा अंत झाला. आम्हाला दोन तासांहून अधिक वेळ थांबावे लागले होते. वाटेत आमची जेवणाची व्यवस्था एका मध्यम शहराच्या हॉटेलात केली होती. मला हे पसंत पडले नाही. मी म्हटले आपण शेतकऱ्याच्या घरी का जेवलो नाही? ते गरीब असणार, आपण त्यांचेवर आपला भार घालू नये. मुलांच्या हातावर खाऊला म्हणून रक्कम ठेवावी. तर गेब्रीला बाई म्हणाल्या कर्की शेतकरी गरीब आहे. पण त्यांना अशा रीतीने दिलेले ते काही स्वीकारणार नाहीत. त्यांना ते अपमानास्पद वाटेल.
मला दाखविण्यासाठी त्यांनी जे खेडे पसंत केले होते, त्याचे नाव सुर्ती. येथील वस्ती सुमारे चार हजार आहे. येथे इटुस्कन अॅम्पीथिएटर आहे. रोमन उदयकालाच्या थोडे पूर्वीचे आहे. थोड्या अंतरावर एक इटुस्कन विहार आहे. तो अगदी थेट आपल्या लेण्याचा नमुना. काहीही फरक नाही. ही इदूस्कन संस्कृती हिंदुस्थानांतून आली आहे असे त्यांचे म्हणणे. मी सारखा तगादा लावला होता की शेतकाच्या घरांत, गोठ्यत, शेतात जाऊ या. जेव्हा मला ते लांबून शेतकऱ्यांची घरे दाखवू लागले तेव्हा मी थोडा उखडलोच. मग आम्ही दोन तीन शेतात शिरलो. इथे वडिलांच्या पश्चात मुला इतके जमिनीचे तुकडे होत नाहीत. निम्मी जमीन वडील मुलाच्या नावे राहाते व वडिलांची जर काही इतर इस्टेट असेल तर ती इतर मुलांना देऊन उरलेल्या जमिनीचे तुकडे न होण्याचा प्रयत्न करतात. शेतकरी आपले उत्पन्न विक्रीसाठी शहरात को-ऑपरेटीव्ह मार्फत पाठवतो. गावान को-ऑपरेटीव्ह मार्फत ट्रॅक्टर खरीदला आहे. आजचा दिवस रविवारचा असल्यामुळे कुणीच शेतकरी शेतात सापडला नाही.
एका शेतकऱ्याचे घरात मग मला नेले. तेथे गोठ्यात तीस पस्तीस गाई बांधल्या होत्या. प्रत्येक गाय सुमारे वीस ते तीस पाड वेळेला दूध देते. मी गलो तेव्हा गोठ्यात धारा चालू होत्या. गाय गरीब असेल तर मी पिळून पाहू का असे विचारले. त्यांनी संमती दिली. गायी पिळण्यास काही फारशा कठीण दिसल्या नाहीत. निदान आपल्या म्हशीसारख्या तर खासच नव्हेत. या सर्व गाईंना किंमत काय पडली असेल, आणि येवढे भांडवल या शेतकऱ्यांनी कसे काय गुंतवले असेल असा प्रश्न मी त्यांना विचारला. तेव्हा कुठे ते सांगू लागले की या जमिनीचा व डेअरीचा मालक रोमला असतो. त्यांचे म्हणणे असे की आज सारी जमीन शेतकऱ्यांची व कामकऱ्यांची व्हावी म्हटले तर ती जोपासून चांगली राखून जास्तीत जास्त किफायतशीर करून दाखविण्याची पात्रता शेतकऱ्यात कुठे आहे? ही अडचण खरी होती. ती पात्रता आणण्याचा, त्यांच्यांत सामुदायिक सहकार्याची दृष्टी आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोंत, असे कॉम्रेड कार्बोनी म्हणाले. इटलीतील बऱ्याचशा सहकारी सोसायट्या कम्युनिस्टांच्या ताब्यात आहेत. त्या आपल्या हाती आणण्याचा सोशलिस्टांचा प्रयत्न चालू आहे व सध्या इटलीतील सोशलिस्ट पार्टीचा हाच प्रमुख कार्यक्रम आहे. सुर्तीतील एका शेतकऱ्याच्या घरात गेलो. आपल्याकडील मध्यमवर्गीय प्रोफेसराच्या घरापेक्षा त्याचे घर व आतील व्यवस्था अधिक चांगली होती. मुंबईच्या ट्रॅममध्ये माझ्या खिशांतील पाकीट चोरीला गेल्यापासून मी अद्याप नवे पाकीट विकत घेतले नव्हते. कागदाच्या पाकीटांतच मी नोटा ठेवीत असे. आज सिलोने बाईंनी पैशाचे पाकिट त्यांचे स्मरण म्हणून मला नजर केले. उद्या रोमला रामराम करणार. अच्युत आपटे यांचे पत्र काल रात्री मिळाले. त्यांच्या सूचनेनुरूप उद्या सकाळी इथून निघून पाच मैलांवरील स्वीस सरहद्दीवर जाणार आहे. दुपारी दोन वाजता विमानाने झ्यूरीक मागे म्यूनिकला जाईन. कळावे.
तुझा, भाऊ
Tags: साधना रोम पॉम्पे शहर झ्यूरीक मुंबई युरोप इटली भाऊसाहेब रानडे Sadhana Rome Pompeii City Zurich Mumbai Europe Italy Bhausaheb Ranade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या