डिजिटल अर्काईव्ह

भारतीय प्रजासत्ताकाची पायाभरणी करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंत्या सार्वजनिकरीत्या आणि समाजमाध्यमांवर साजऱ्या होत असतात. परंतु, तुलनेने कमी प्रसिद्ध, पण तितकंच आदरणीय कार्य केलेल्या देशसेवकांच्या जयंत्या मात्र दुर्लक्षिल्या जातात. प्रस्तुत लेख असेच एक देशभक्त हरमंदर सिंग यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिला आहे. सिंग यांचा जन्म 27 जून 1926 रोजी झाला. भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवेमधील एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. 'भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवा', अर्थात 'इंडियन फ्रंटियर अॅडमिनिस्ट्रिटिव्ह सर्व्हिसेस' (आय.एफ.ए.एस.) हा राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेतील एक धाडसी प्रयोग होता.

मी 1990 च्या दशकारंभी मानवशास्त्रज्ञ वेरिअर एल्विन यांच्या चरित्रावर काम करत असताना आय.एफ.ए.एस. बद्दल पहिल्यांदा ऐकलं. एल्विन मूळचे ब्रिटिश होते, पण त्यांनी अडीच दशकं मध्य भारतातील आदिवासींसोबत राहून त्यांच्यावर लेखन केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी याच देशाचं नागरिकत्व घेतलं, आणि 1954 मध्ये त्यांना 'नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी'चे ('नेफा' हे संबोधन प्रचलित) मानवशास्त्रीय सल्लागार म्हणून नेमण्यात आलं. आजचं अरुणाचल प्रदेश हे राज्य त्या वेळी 'नेफा' म्हणून ओळखलं जात होतं. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी 'आदिवासींच्या विषयांमधील मान्यताप्राप्त अधिकारी व्यक्ती' म्हणून एल्विन यांची खास निवड केली. या विषयात 'सर्वांत आवश्यक असणारी, पण अगदीच क्वचित आढळणारी सहानुभूती आणि समजूत' एल्विन यांच्या निमित्ताने उपयोगात येईल, असा विश्वास नेहरूंना वाटला.

नेहरू आणि एल्विन यांच्या पुढाकाराने आय.एफ.ए.एस.ची स्थापना झाली. या सेवेत सुरुवातीला लष्कराची व हवाई दलाची पार्श्वभूमी असणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली. त्यांना सैन्यदलांतील सेवेमुळे कठोर शारीरिक श्रमाची सवय होती, निरनिराळ्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये ते मिसळू शकत आणि संघटित कामासाठी आवश्यक एकजुटीची भावनाही त्यांना निर्माण करता येत होती. एल्विन यांनी आय.एफ.ए.एस.च्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मिशमी आदिवासी समुदायातील एका शिक्षित व्यक्तीने सांगितलेलं तत्त्व लक्षात ठेवलं "आमची संस्कृती किंवा अगदी वंशसुद्धा भारतीय नाही, हे लक्षात ठेवा. आमच्या संस्कृतीकडे आणि धर्माकडे तुच्छतेने पाहणारे, त्याहून महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे माणूस म्हणूनच तुच्छतेने पाहणारे अधिकारी तुम्ही आमच्या परिसरात काम करायला पाठवत राहिलात तर काहीच वर्षांमध्ये आम्ही तुमच्या विरोधात जाऊ."

स्वतः पंतप्रधान नेहरूंनी आय.एफ.ए.एस. मध्ये विशेष रस घेतला. या सेवेतील एका अधिकाऱ्याने नेहरूंनी केलेली सूचना नोंदवली, ती अशी : "कर्मचाऱ्यांनी झेंडा घेऊन पुढे जावं, टाइपरायटर नंतर मागून येतील"; म्हणजे अधिकाऱ्यांनी आधी माणसांशी संपर्क करून गावकऱ्यांशी मैत्री करावी, त्यानंतर औपचारिक राज्ययंत्रणेची साधनसामग्री तिथे नेली जाईल. 

बेरेनाइस ग्यूअट-रिचर्ड या अभ्यासिकेने 'शॅडो स्टेट्स इंडिया, चीन अँड हिमालयाज्, 1910-1962' या पुस्तकात म्हटल्यानुसार, राज्यसंस्थेची या परिसरातील उपस्थिती परोपकारी स्वरूपाची आहे, हे मांडण्यावर सीमावर्ती भागातील प्रशासकांचा भर असायचा. आय.एफ.ए.एस.चे अधिकारी सशस्त्र सुरक्षा दिमतीला न घेता दुर्गम भागांतील गावांमध्ये जात, अनेकदा त्यांची पत्नी व उर्वरित कुटुंब त्यांच्यासोबत असायचं, त्यामुळे स्थानिक लोकांशी चांगले संबंध निर्माण करणं त्यांना शक्य होत असे. याआधी तिथे गेलेले ब्रिटिश अधिकारी असं वागत नव्हते.

मी एल्विन यांच्या संदर्भात संशोधन करत असताना आय.एफ.ए.एस. मधील सुमारे सहाएक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातील हरमंदर सिंग हे पहिले, आणि त्यांच्या व्यतिरिक्त रशिद युसुफ अली, आर. एन. हल्दीपूर, टी. एस. मूर्ती व एन. डी. जयाल यांच्याही मुलाखती मी घेतल्या. तोवर त्यांना निवृत्त होऊन बरीच वर्षं झाली होती, पण नेफामधील सुरुवातीच्या वर्षांमधील आठवणी त्यांनी उत्साहाने सांगितल्या. दुर्गम भागातील गावांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आणि बाहेरच्या जगाला फारशा ज्ञात नसणाऱ्या आदिवासी जमातींच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले, हे त्यांनी मुलाखतींदरम्यान सांगितलं. इतिहासातील अपघाताचा भाग म्हणून हे समुदाय भारतीय प्रजासत्ताकाच्या औपचारिक राज्यक्षेत्राअंतर्गत आले.

आय.एफ.ए.एस.च्या कामगिरीवर अजूनही एखादं पुस्तक किंवा अगदी पीएच.डी.चा प्रबंधही लिहिला गेलेला नाही (माझ्या माहितीत तरी). पण मूळ फ्रान्समधले असले तरी बऱ्याच काळापासून भारतातच राहणारे, भारत-तिबेट सीमाभागाचे अभ्यासक क्लॉड आर्पी यांनी आय.एफ.ए.एस. वर एक माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. आर्पी यांच्या संकेतस्थळावर नेफाशी /अरुणाचल प्रदेशाशी संबंधित इतरही अनेक उपयुक्त दस्तऐवज आहेत.

आय.एफ.ए.एस.मधील आरंभिक अधिकाऱ्यांच्या फळीत रनेन्नलाव 'बॉब' काथिंग होते. त्यांनी तवांग हे प्राचीन बौद्ध मठ असणारं शहर भारतीय नियंत्रणाखाली आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर एस. एम. कृष्णात्रीसुद्धा याच काळात या सेवेमध्ये रुजू झाले. भारत-तिबेट सीमेवरील सुबानसिरी खोऱ्याच्या वरच्या भागात राहणाऱ्या तैगिन समुदायाशी पहिल्यांदा संपर्क साधणारे अधिकारी कृष्णात्री हे होते. 'ब्रिटिश मोहिमांनी आपल्याच लोकांविरोधात सशस्त्र कारवाई करून रक्तरंजित संस्कृतीचा वारसा मागे ठेवला', त्या जागी 'प्रेम, हास्यविनोद आणि संयम यांचा आधार असणारा मानवाधिकाराचा दृष्टीकोन आणणं', हे आपलं उद्दिष्ट असल्याचं कृष्णात्री यांनी लिहिलं आहे. आय.एफ.ए.एस.च्या अधिकाऱ्यांनी हा दृष्टीकोन स्वीकारला, हे खरंच आहे. एल्विन आणि नेहरू यांनी अर्थातच हा दृष्टीकोन मांडून त्याला चालना दिली.

दलाई लामा चीनव्याप्त तिबेटमधून बाहेर पडून भारताच्या आश्रयाला आले, त्या पलायनासंदर्भात 'अॅन ऑफिसर अँड हिज होलिनेस' हे पुस्तक राणी सिंग यांनी लिहिलं. सदर पुस्तकामध्ये हरमंदर सिंग यांनाही प्रमुख स्थान आहे. दलाई लामांनी 1959 मध्ये तिबेटमधून बाहेर पडायचं ठरवलं तेव्हा त्यांनी आधी करमेंग फ्रंटियर डिव्हिजनच्या भागात प्रवेश केला. तिथे हरमंदर राजकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांचं मुख्यालय बोमडिलामध्ये होतं. दलाई लामांना सीमेवर सहायक राजकीय अधिकारी टी. एस. मूर्ती भेटले. हरमंदर बोमडिलाहून तवांगमधल्या मठात गेले. हे सुमारे 140 मैलांचं अंतर पार करण्यासाठी घोडेस्वारी करत संथपणे जावं लागत असे, कारण त्या वेळी तिथे गाड्या जाऊ शकतील असा रस्ता नव्हता. दरम्यान, सिंग यांनी एक डॉक्टर, तिबेटी बोलणारे अधिकारी आणि सशस्त्र जवानांचं पथक पाठवून दलाई लामांना तवांग इथे आणलं. तिथे ते काही दिवस थांबले.

पंतप्रधान नेहरूंनी दलाई लामांना पाठवलेला संदेश हरमंदर यांनी 6 एप्रिल 1959 रोजी तवांगमध्येच वाचून दाखवला. त्यात म्हटलं होतं की "तुम्ही सुरक्षितरीत्या भारतात आलात, याचा आनंद आहे. माझे सहकारी आणि मी तुमचं स्वागत करतो. तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना व सहकाऱ्यांना भारतात राहण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यास आम्हाला आनंदच वाटेल. भारतीय लोकांच्या मनात तुमच्याविषयी अत्यंत आदराची भावना आहे, त्यामुळे तुम्हाला ते सन्मानाने वागवतील यात काही शंका नाही."

तवांगहून ही मंडळी बोमडिलाला आली. दरम्यान, जेमतेम विशीत असणारे दलाई लामा आणि तिशीत प्रवेश केलेले हरमंदर सिंग यांनी दुभाषाच्या मदतीने संवाद साधला. दलाई लामांना स्वतःच्या मायभूमीतून हद्दपार व्हावं लागलं, स्वतःच्या लोकांपासून विभक्त व्हावं लागलं, तरीही त्यांच्यात निश्चल आशावाद होता, या संदर्भात हरमंदर यांनी भावुकपणे आठवण लिहिली आहे. यानंतर दोघांमध्ये परस्परांविषयी उत्कट ममत्व निर्माण झालं आणि त्यांची मैत्री आयुष्यभर टिकली.

भारतीय सीमावर्ती प्रशासकीय सेवा 1968 मध्ये औपचारिकरीत्या बंद करण्यात आली. या सेवेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रउभारणीच्या इतर प्रयत्नांमध्ये योगदान दिलं. हरमंदर अंदमान-निकोबारचे मुख्य आयुक्त झाले; बॉब काथिंग यांना म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमण्यात आलं; आर. एन. हल्दीपूर हे पाँडिचेरीचे उपराज्यपाल झाले; के. सी. जोहोरी यांची गोव्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली; मुरकोट राममुनी नेपाळ व बांग्लादेश इथे भारतीय राजनैतिक अधिकारी म्हणून कार्यरत राहिले आणि त्यांनी नागांवर एक खास पुस्तकही लिहिलं.

मी वेरिअल एल्विन यांच्या चरित्रात आय.एफ.ए.एस. संबंधी लिहिलं आहे या सेवेत "सक्षम आणि प्रचंड बांधिलकी असणाऱ्या तरुणांची भरती झाली. त्यांना भारतीय शासनाचा विस्तार ज्या लोकसमूहांमध्ये करायचा होता, त्या लोकांसोबत राहायला आणि त्यांच्यासारखा विचार करायला ते सज्ज होते. भारतीय राजकीय इतिहासात असे अधिकारी अत्यंत दुर्मीळ आहेत." याला मी क्लॉड आर्णी यांनी नोंदवलेल्या मताची जोड देईन. त्या लिहितात : "या अधिकाऱ्यांनी आय.एफ.ए.एसमध्ये रुजू होताना स्वतःची कारकिर्द वाया जाईल याची तयारी ठेवली, ही वस्तुस्थिती आहे. आता ही सेवा अस्तित्वात नसली तरी विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे हे अधिकारी आजही तरुण आय.ए.एस. व आय.पी.एस. अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत ठरायला हवेत."

आज अरुणाचल प्रदेशमध्ये सरकारी भ्रष्टाचार बोकाळला आहे, राजकारणी कंत्राटदार यांच्या संगनमताने धोरणांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने सुरू आहे. पण ईशान्य भारतातील इतर राज्यांसारखी सशस्त्र बंडखोरी मात्र अरुणाचल प्रदेशात नाही याचं श्रेय नेहरू व एल्विन यांच्या दूरदर्शी धोरणांना आणि आय.एफ.ए.एस. मधील अधिकाऱ्यांच्या निःस्वार्थी कार्याला जातं.

भाषांतर - प्रभाकर पानवलकर

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक ( 295 लेख )

भारतीय इतिहासकार व लेखक. समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन. 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके