महिनाभर जोगांशी गाठभेट नाही. एके दिवशी त्यांचा निरोप आला : 'अक्षयला अभ्यास करायचाय. अर्थशास्त्रावरची दोन पुस्तकं हवीएत. कोर्टानं परवानगी दिलीए.' जोगांनी माझ्याबरोबर आपला ऑर्डर्ली दिला. जवळच्या दुकानातून पुस्तकं विकत घेतली नि ऑर्डर्लीमार्फत जोगांना पाठवली. थोड्या दिवसांनी पुन्हा जोगांचा निरोप 'अक्षयला एखाद-दुसरं पुस्तक वाचायचंय. पाठवू शकाल काय ?' ओ' हेनरी या अमेरिकन लेखकाचा कथासंग्रह मी पाठवला. एकदा जोगांकडे अक्षय भेटला. हसला. बरा दिसत होता. मनात विचार आलाः 'क्राइम अॅण्ड पनिशमेंट'चा नायक रास्कोल्निकोव्ह असाच दिसत असेल काय ?
बातमीदारी करू लागलो तेव्हाच आपल्याशी एक नियम मी ठरवून टाकला की, स्थानिक पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही. अन् तरीही बोरीवली पोलीस स्टेशनचा ऑर्डर्ली माझ्या दारात सकाळी सकाळी उभा. ही 1988 च्या आसपासची गोष्ट.
"जोगसाहेबांनी बोलावलंय."
"कशासाठी?" "काय माहीत नाय. कायतरी मॅटर आहे."
'मॅटर'. मुंबई पोलिसांनी मराठी भाषेला नजर केलेला अनमोल शब्द. अजून टिकून आहे. हल्ली मुंबईच्या अर्बन पुअर वर्गातली तरुण मुलं एखाद्या राजकीय पक्षात घुसतात नि पोलीस स्टेशनात जाऊन मॅटर सेटल करतात.
तर वसंतराव जोग. बोरीवली पोलीस स्टेशनचे सिनियर पी. आय. एक-दोनदा आम्ही भेटलो होतो. इंदिराजींची हत्या झाल्यावर बोरीवली पो.स्टे.ला (ही पोलिसी लघुलिपी!) गेलो होतो. बंदोबस्ताविषयी विचारलं, जोगांनी चहा मागवला. थोडं इकडचं तिकडचं बोलणं झालं. नंतर जोगांशी भेट नाही.
जोग आडदांड अंगाचे. गब्दुल. वरच्या पट्टीत बोलायचे. आवाज भसाडा. पाण्याचा मोठा पंप सुरू आहे असं वाटायचं. ओठांखाली तीन टाके. कुठच्यातरी मॅटरमध्ये जखम झाली होती. बोरीवली पो.स्टे.तच राहायचे. पहिल्या मजल्यावर ऑफिस. एक टेबल, समोर दोन खुर्चा. बाजूला एक कॉट. दुपार भाकड असेल नि डी.सी.पी. येण्याची लाइन नसेल तर जोग गुरगुरीत झोपायचे. नि भरपूर घोरायचे. त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं होतं.
त्या दिवशी दुपारी ऑफिसात जाताना मी बोरीवली पो.स्टे.ला गेलो.
"बसा", जोग म्हणाले.
"एक केस आहे. बी.ए.ला सायकॉलॉजी विषय होता असं तुम्ही मागे मला म्हणाला होतात. तुमच्या पद्धतीनं जरा पाहा." एवढं बोलून त्यांनी 'चहा आण रे...' अशी एक सणसणीत डरकाळी मारली. चहा आला. 'त्या पोराला आण रे...' ही दुसरी डरकाळी.
शिपाई एका लहान पोराला घेऊन आला. वय सतरा-अठरा. पातळ मिसरुड. किरकोळ देहयष्टी. सावळा रंग. अंगात फक्त अंडरवेअर.
"मर्डर केस आहे", इन्स्पेक्टर जोग म्हणाले. "पोरानं आपल्या चुलतभावाचा खून केला. 304 ची केस आहे. पोरानं कन्फेशन दिलंय."
मुलगा निश्चल उभा होता. डोळे तेजस्वी.
"तुम्ही बोला त्याच्याशी. मर्डर केल्याचं कबूल करतो, पण जास्तीचं काहीच सांगत नाही. मोटिव (हेतू) तर कळला पाहिजे. चार-पाच मुस्काटीत दिल्या तर लेकाचा मरेल. किती सुकलकडी आहे पहा. नि
तुम्ही लोक बातम्या कराल. तुम्हाला गुजराती येतं तेव्हा जरा बोला त्याच्याशी." जोगांचा आवाज खर्जात गेला होता.
त्याच रात्री त्या मुलाला जोगांच्या ऑफिसात भेटलो. गुजरातचा होता. अंगात फक्त अंडरवेअर. मुलगा संकोचला होता. 'मुलाला पँट-शर्ट द्या', मी जोगांना सुचवलं.
"तसं नाही करता येणार. पँटच्या टांगा लांब असतात. गळफास लावून घेतला तर काय ?"
मी मुलाला विचारलं.
"नाही. मी गळफास लावणार नाही. एवीतेवी मला फाशी लागणार आहेच." मुलगा थंडगार आवाजात म्हणाला. चेहरा निर्विकार.
पुढचे दोन दिवस मी त्या मुलाशी बोलत होतो. त्याचं इंग्रजी बरं होतं. इंग्रजी शाळेत शिकला होता. मुलाचं नाव आठवत नाहीए. आपण त्याला अक्षय म्हणू. तर अक्षयची कहाणी अशी :
अक्षय मूळचा राजकोट की पोरबंदरचा. संयुक्त नि सधन कुटुंब. मोठे काका बोरीवलीला राहायचे. त्यांचं दुकान होतं. भरपूर उत्पन्न. अक्षयचे वडील गावी एक दुकान चालवायचे. त्यांचंही छान सुरू होतं. अक्षय अधूनमधून मुंबईला यायचा. चुलत भाऊ नीलेश अक्षयहून तीनेक वर्षांनी वरचा. दिसायला रुबाबदार नि गोरापान. बापाचा अमाप पैसा. नीलेशचं सगळं लक्ष छानछोकीकडे. मुलींशी मैत्री हा नीलेशचा विशेष आवडीचा विषय. खा, प्या नि मजा करा हे जीवनसूत्र. नीलेशचा बाप म्हणायचा, 'पोरगं अभ्यास करून काय दिवे लावणारेय ? वर्ष-दोन वर्षांत धंद्यात आला की, वठणीवर येईल. घरी देवपूजा, धार्मिक सण वगैरे वातावरण. त्या कुटुंबाला आधुनिक विचारांचा वारा लागलाच नव्हता. मात्र, सुखसोयी सगळ्या आधुनिक.
खरंतर अक्षय नि नीलेश एकत्र खेळले, वाढले. लहानपणी दोघांचं छान जमायचं. नीलेश कॉलेजात जाऊ लागला नि उद्दाम झाला. तो अक्षयची चेष्टा करू लागला. त्याला आपल्याबरोबर कुठं घेऊन जाईना. 'तू बावळट दिसतोस, किती रे काळा तू', असं सतत हिणवायचा. हा खरंतर सिबलिंग रायवलरीचा भयानक प्रकार होता. अक्षयच्या आई-वडिलांनी त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं होतं. एक-दोनदा अक्षयनं आपल्या बाबांना सांगितलं. तर त्यांनी मनावर घेतलं नाही. 'तू लक्ष देऊ नकोस. तो नीलेश भोगेल आपल्या कर्माची फळं', असं काहीतरी थातुरमातुर सांगत राहिले. नीलेशचे वडील हे मोठे काका. प्रथेप्रमाणे त्यांचा पहिला मान, वगैरे. बुरसटलेल्या समजुतींना कवटाळून बसलेलं कुटुंब.
नवरात्र आली. अक्षय चार दिवसांसाठी मुंबईला आला. बोरीवली-कांदिवली भागांत गरब्याचा पुष्कळ जोश. नीलेश त्याला न बरोबर न घेता संध्याकाळी बाहेर पडायचा. तो रात्री दीडेक वाजता घरी यायचा. मग अक्षयला सगळं इत्थंभूत सांगायचा कुठंकुठं गरबा खेळला, सगळीकडे त्याच्या नृत्यकौशल्याची कशी वाहवा झाली नि किती मुली त्याच्यावर फिदा झाल्या. अगदी रसभरीत वर्णन करायचा. अक्षय मनातल्या मनात चरफडायचा. वर पुन्हा, 'अक्षय, माझं ऐक. हा बावळटपणा सोड. माझ्यासारखं जगायला शीक. नाहीतर पोरी तुला पटणार नाहीत. एकतर तुला रूप नाही, ना रंग....'
अष्टमीची रात्र. गरब्याला विशेष जोर. बाराच्या सुमाराला नीलेश घरी आला. कपडे बदलून तो परत बाहेर पडणार होता. अक्षयनं त्याला 'सरबत घेणार काय?' असं विचारलं. सगळं पूर्वनियोजित होतं. नीलेश 'हो' म्हणाला. सरबतात झोपेच्या भरपूर गोळ्या टाकल्या. नीलेश झेलपांडला. खाली कोसळला. अक्षयनं नीलेशच्या डोक्यात मोठा धोंडा हाणला. पुन्हा पुन्हा. बाहेर गरब्याचा ठणाणा गोंधळ. घरी कुणीच नाही. सगळे गरब्यासाठी कुठं कुठं भटकत होते. नीलेशचा खेळ संपला.
आठेक मिनिटांत अक्षयचं सांगून झालं. अत्यंत शांत, धिम्या स्वरात. नि मोजक्या शब्दांत. तो प्रत्येक शब्द सोलून माझ्यापुढे ठेवत गेला. आपल्या कृत्याबद्दल त्याला अजिबात वाईट वाटलं नव्हतं. 'नीलेश परत भेटला तर त्याचा परत खून करेन', असं तो म्हणाला.
कुटुंबात हाहाकार झाला होता. त्याचं त्याला काहीही वाटत नव्हतं. म्हणाला, 'नीलेश मला छळत होता. मी त्याला ठार मारलं. आता मला खूप बरं वाटतंय.'
अक्षयशी बोलत असताना मला तेंडुलकर आठवले. माणूस हिंसेला प्रवृत्त कसा होतो या विषयावर विजय तेंडुलकरांनी एक विस्तृत शोधनिबंध लिहिलाय; त्यासाठी त्यांना होमी भाभा शिष्यवृत्ती मिळाली होती. दुसरीकडे, जयवंत दळवींच्या कादंबरीतली पात्रं वेडेपणाकडे झुकलेली. ही काय भानगड आहे?
माणसाला आत्मनाशाची ओढ का लागावी ? अचानक का म्हणून माणसाचं जगणं कोसळू लागतं ? ऑथेल्लोनं डेस्डिमोनाची हत्या का करावी? वर्जिनिया वुल्फ, साने गुरुजी, अर्नेस्ट हेमिंग्वे यांना आपलं आयुष्य संपवून टाकण्याची ऊर्मी कशी आली ?
काका कालेलकरांनी मृत्यूवर एक पुस्तक लिहिलंयः 'परमसखा मृत्यू'. मूळ गुजराती पुस्तक चांगलं 272 पानांचं आहे. बौद्ध विचारपरंपरेत दोन तृष्णांची चर्चा आहेः जगण्याची आसुरी इच्छा म्हणजे भवतृष्णा आणि मरणाची आत्यंतिक ओढ म्हणजे विभवतृष्णा. एकेकदा संपूर्ण मानवसमूहाला मरणाची ओढ लागते, असं कालेलकरांनी म्हटलंय. रोमन साम्राज्याच्या काळात एकदा असं घडलं होतं. बौद्ध काळातही असं घडलं होतं. ईशान्य भारतातल्या एका अरण्यात मुंग्या सामूहिक आत्महत्या करतात, असं दुर्गाबाई भागवतांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं. 'परमसखा मृत्यू' या पुस्तकात कालेलकरांनी स्वेच्छामरणाचा पुरस्कार केलाय.
आमच्या एका जुन्या शेजाऱ्यांचं सांगतो. आम्ही चौथ्या मजल्यावर तर मटालिया कुटुंब पहिल्या मजल्यावर राहायचे. आई-वडील नि दोन मुलगे. दोन्ही भाऊ अतिशय साधे. नाकासमोर चालणारे. शाळेला एकही दिवस खाडा न करणारे. नियमित पास होणारे. इतर मुलं मटालिया बंधूंना बावळट समजायची.
त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे दोन्ही बंधूंनी सी.ए. केलं. चांगली नोकरी. दोघांची लग्नं झाली. जागा कमी पडते म्हणून मटालिया कुटुंबानं भाग्यनगर सोडलं. ऐसपैस प्लॅट विकत घेतला नि आम्ही त्यांना आस्ते आस्ते विसरलो.
काही वर्षांपूर्वी ती भयानक बातमी कळली. मटालियाच्या मोठ्या मुलानं एके दिवशी अख्ख्या कुटुंबाला मारून टाकलं आपली बायको, मुलगी; तसंच धाकटा अश्विन, त्याची बायको नि दोन मुलं -आणि आत्महत्या केली.
नीलेशला संपवल्यावर रेल्वेच्या रुळावर आडवं पडावं नि आत्महत्या करावी, असं अक्षयनं ठरवलं होतं; परंतु त्याचा धीर खचला. मला माझं मरण पाहवेना, असं तो म्हणाला.
अक्षयची केस बोर्डावर लागली एवढं मला समजलं. थंडगार रक्तानं खुनाचा पूर्वनियोजित कट आखला, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. अक्षयनं गुन्हा मान्य केला असल्यामुळे केस तशी सोपी होती. आई-वडिलांनी मोठा वकील केला. काकासुद्धा मदतीला आले. आपला मुलगा तर गेला; आता पुतण्याला वाचवलं पाहिजे, असं काकांना वाटलं. 'अक्षयचं वय लहान आहे हा मुद्दा विचारात घेऊन कोर्टानं जन्मठेप दिली तर गोष्ट वेगळी', जोग मला म्हणाले.
महिनाभर जोगांशी गाठभेट नाही. एके दिवशी त्यांचा निरोप आला 'अक्षयला अभ्यास करायचाय. अर्थशास्त्रावरची दोन पुस्तकं हवीएत. कोर्टानं परवानगी दिलीए.' जोगांनी माझ्याबरोबर आपला ऑर्डर्ली दिला. जवळच्या दुकानातून पुस्तकं विकत घेतली नि ऑर्डर्लीमार्फत जोगांना पाठवली.
थोड्या दिवसांनी पुन्हा जोगांचा निरोप : 'अक्षयला एखाद-दुसरं पुस्तक वाचायचंय. पाठवू शकाल काय ?'
ओ' हेनरी या अमेरिकन लेखकाचा कथासंग्रह मी पाठवला. एकदा जोगांकडे अक्षय भेटला. हसला. बरा दिसत होता. मनात विचार आलाः 'क्राइम अॅण्ड पनिशमेंट'चा नायक रास्कोल्निकोव्ह असाच दिसत असेल काय?
अक्षयनं दोन्ही हात जोडून मला नि जोगांना नमस्कार केला नि म्हणाला, 'हेनरीसाहेबांच्या कथेचा शेवट फार चमत्कारिक असतो. वाचकाला मोठा धक्काच देतात ते.'
त्यानंतर अक्षय पुन्हा कधीच भेटला नाही.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या