डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपण सर्वांनी 'फेमिनिस्ट' असले पाहिजे...

आमच्या ‘फेमिनिझम’ या विषयावरअनेकदा चर्चा व्हायच्या आणि तो मला नेहमी म्हणायचा की, ‘तू जे नेहमी म्हणत असतेस तसे स्त्रियांसाठी पुढे जाणे, मोठी पदे मिळवणे, समाजात वावरणे या गोष्टी वेगळ्या किंवा अधिक कठीण आहेत म्हणजे काय, हे माझ्या लक्षातच येत नाही. कदाचित आपल्या पूर्वीच्या काळात तसे असू शकेल, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.’आणि मला हे कळायचेच नाही की ज्या गोष्टी सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ आहेत, त्या लुईला कशा दिसत नाहीत? 

ओकोलोमा मादुवेसी या माझ्या एका अतिशय जिवलग मित्राची गोष्ट सांगून, मी आज माझ्या भाषणाची सुरुवात करणार आहे. ओकोलोमा माझ्या घराजवळच राहत असे. एखादा मोठा भाऊ आपल्या लहान बहिणीची जशी काळजी घेईल, तसा तो माझी काळजी घेत असे.जर मला एखादा मुलगा आवडला, तर त्या मुलाविषयी मी ओकोलोमाचा सल्ला घेत असे.

डिसेंबर 2005 मध्ये नायजेरियात सोसोलिसो विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. ओकोलोमा बरोबर मी वाद घालू शकत असे, हसू शकत असे. खऱ्या अर्थाने ज्याला ‘संवाद’ म्हणतात, तसे आमचे बोलणे होत असे. त्यानेच पहिल्यांदा मी ‘फेमिनिस्ट’ आहे, असे म्हटले होते.

मी तेव्हा चौदा वर्षांची होते. त्याच्या घरी आम्ही नेहमीप्रमाणे कशावर तरी वाद घालत होतो. वाचलेल्या पुस्तकांमधून मिळालेले अर्धे-कच्चे ज्ञान वापरून, आमचा वाद चालला होता. तो वाद नेमका कशावरून होता, हे मला आता आठवत नाही. पण मला हे नक्की आठवते की, जसजशी मी त्याच्याशी भांडत गेले तसे त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला उद्देशून म्हणाला, ‘तू फेमिनिस्ट आहेस!’ त्याचे हे उद्‌गार माझी प्रशंसा करणारे नक्कीच नव्हते. एखाद्याला ‘तू दहशतवादाचा समर्थक आहेस’ असे म्हणताना जसा आपला आवाज असतो, त्या आवाजात तो हे वाक्य म्हणाला होता. तेव्हा मला ‘फेमिनिस्ट’ या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. मात्र मला तो माहीत नाही, हे ओकोलोमाला जाणवू द्यायचेसुद्धा नव्हते. त्यामुळे मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून, पुन्हा त्याच्याशी वाद घालत राहिले. मात्र घरी परत येताच पहिली गोष्ट कोणती करायची, तर डिक्शनरी उघडून तिच्यात ‘फेमिनिस्ट’ या शब्दाचा अर्थ पाहायचा, असे मी असे ठरवले होते.

पुढे काही वर्षांनी मी(2003 मध्ये)माझी पहिली कादंबरी लिहिली. त्या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र एका पुरुषाचे असून, तो त्याच्या बायकोला नियमितपणे मारहाण करत असे. त्याचा शेवट काही चांगला होत नाही. या कादंबरीच्या प्रचारासाठी मी नायजेरियात फिरत असताना एक चांगला, सरळमार्गी वाटणारा पत्रकार मला भेटला. त्याने मला सांगितले की- माझी कादंबरी ‘फेमिनिस्ट’ आहे, असे लोक म्हणताहेत. त्याने मला असाही सल्ला दिला की, मी स्वतःला कधीही ‘फेमिनिस्ट’म्हणवू नये. कारण ज्यांना ‘फेमिनिस्ट’ म्हटले जाते, त्या स्त्रिया नवरा न मिळाल्याने नेहमी दु:खी असतात. त्यामुळे मी ठरवले की, आपण स्वतःला ‘आनंदी फेमिनिस्ट’ म्हणावे.

त्यानंतर एकदा एक नायजेरियन स्त्री-अभ्यासक मला म्हणाली की, ‘फेमिनिझम’ ही आपली संस्कृती नाही, तसेच ‘फेमिनिझम’ ही आफ्रिकेतील संकल्पना नाही. तिचे म्हणणे असे होते की, मी स्वतःला ‘फेमिनिस्ट’ म्हणवते, याचे कारण पाश्चात्त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तिच्या या बोलण्याचे मला आश्चर्य वाटले. कारण मी सुरुवातीच्या काळात वाचलेल्या पुस्तकांचा ‘फेमिनिझम’शी काहीही संबंध नव्हता; उलट ‘मिल्स आणि बून’ या ठरावीक साच्यातल्या व अतिशय लोकप्रिय प्रेमकथांची सर्व पुस्तके सोळा वर्षांची होण्यापूर्वीच वाचलेली होती.(या मिल्स आणि बून मालिकेतील पुस्तकांमध्ये स्त्री-पुरुषांचे जे चित्रण केले जाते, त्यावर फेमिनिस्टांनी बरीच टीकाही केली आहे.)याउलट, ज्या पुस्तकांना फेमिनिस्ट लिखाणातील ‘क्लासिक्स’ मानले जाते, ती पुस्तके वाचायचा जेव्हा जेव्हा मी प्रयत्न केला; तेव्हा मला अतिशय कंटाळा आला. ती पुस्तके वाचून संपवण्यासाठी मला बरेच कष्ट घ्यावे लागले. असो. त्यामुळे जर त्या बार्इंच्या म्हणण्यानुसार, फेमिनिझम ही आफ्रिकेत बाहेरून आलेली संकल्पना असेल, तर मी स्वतःबाबतची व्याख्या आणखी थोडी वाढवली. मी स्वतःला ‘आनंदी आफ्रिकन फेमिनिस्ट’ म्हणू लागले. त्यामुळे एक काळ असा आला, जेव्हा मी एक आनंदी असलेली आफ्रिकन फेमिनिस्ट होते. म्हणजे फेमिनिस्ट स्त्रिया(मानले जाते)प्रमाणे मी पुरुषांचा तिरस्कार करत नव्हते. तसेच पुरुषांना आकर्षित करण्यासाठी नव्हे, तर स्वतःला आवडते म्हणून ओठांना लिपस्टिक लावत होते, पायांत उंच टाचेचे सँडल्स घालत होते.

अर्थात माझ्या या वागण्यात गंमत करण्याचा, आनंद घेण्याचा हेतू नक्कीच होता. पण ‘फेमिनिस्ट असणे’ या संकल्पनेला इतके नकारात्मक अर्थ दिलेले आहेत, आणि त्या ओझ्यासकटच ती संकल्पना वापरली जाते. उदा.-फेमिनिस्ट स्त्रिया पुरुषांचा तिरस्कार करतात. त्यांना ब्रेसियर घालायला आवडत नाही. त्यांना आफ्रिकन संस्कृतीबद्दल राग आहे.

माझा मुद्दा आणखी स्पष्ट करण्यासाठी बालपणीची एक गोष्ट सांगते. मी प्राथमिक शाळेत असताना शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांनी आम्हाला असे सांगितले होते की, सर्वांची एक परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेत ज्याला सगळ्यात जास्त गुण मिळतील, तो वर्गाचा मॉनिटर बनेल. वर्गाचा मॉनिटर होणे ही आमच्यासाठी तेव्हा मोठी गोष्ट होती. कारण वर्गाचे मॉनिटर असाल, तर तुम्हाला वर्गात मस्ती करणाऱ्यांची नावे फळ्यावर लिहिता येतात! या प्रकारच्या अधिकारांची एक ताकद असते.आणि माझ्या शिक्षिका तर एक छडीसुद्धा देत असत. मॉनिटरला ही छडी हातात घेऊन वर्गातील रांगांतून फिरता येत असे. अर्थात, मॉनिटरला ती छडी वापरण्याचा अधिकार नव्हता. पण माझ्यासारख्या नऊ वर्षांच्या मुलीला या कारणांमुळे मॉनिटर होणे, ही गोष्ट फारच आकर्षक वाटत होती. मला माझ्या वर्गाची मॉनिटर बनण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे मी खूप मेहनत केली आणि बार्इंनी घेतलेल्या परीक्षेत वर्गात पहिली आले. मात्र त्यानंतर बार्इंनी असे जाहीर केले की, वर्गाचा मॉनिटर हा एक मुलगा असला पाहिजे. परीक्षा घेण्याआधी त्या हे सांगायला विसरून गेल्या असाव्यात कदाचित! कारण त्यांनी असे गृहीत धरले होते की, एखादा मुलगाच वर्गात पहिला येईल. वर्गातील एका मुलाला त्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळाला होता. बार्इंनी त्यालाच मॉनिटर केले. आता गंमत अशी की- तो मुलगा अतिशय साधा-सरळ, गोड असा होता. त्याला हातात छडी घेऊन वर्गावर लक्ष ठेवण्यात रस नव्हता. याउलट, मला नेमके तेच करायचे होते; परंतु तो एक मुलगा होता आणि मी एक मुलगी.त्यामुळे त्याला वर्गाचा मॉनिटर बनवले गेले. मला मिळालेल्या या वागणुकीमुळे मी हा प्रसंग अजूनही विसरलेले नाही.

ज्या गोष्टी मला सहजपणे लक्षात येतात, त्या इतरांच्यासुद्धा तशाच लक्षात येत असाव्यात असे समजण्याची चूक मी बऱ्याचदा करते. माझ्या लुई नावाच्या एका मित्राचे उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करते. लुई हा अतिशय हुशार आणि पुरोगामी असा पुरुष आहे. आमच्या ‘फेमिनिझम’ या विषयावर अनेकदा चर्चा व्हायच्या आणि तो मला नेहमी म्हणायचा की, ‘तू जे नेहमी म्हणत असतेस तसे स्त्रियांसाठी पुढे जाणे, मोठी पदे मिळवणे, समाजात वावरणे या गोष्टी वेगळ्या किंवा अधिक कठीण आहेत म्हणजे काय, हे माझ्या लक्षातच येत नाही. कदाचित आपल्या पूर्वीच्या काळात तसे असू शकेल, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.’आणि मला हे कळायचेच नाही की- ज्या गोष्टी सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ आहेत, त्या लुईला कशा दिसत नाहीत?

एका संध्याकाळी लुई आणि मी आमच्या इतर मित्रांबरोबर लागोस (नायजेरियातील सर्वांत मोठे शहर)शहरामध्ये फिरायला बाहेर पडलो होतो. भाषण ऐकण्यासाठी इथे जमलेल्या आणि लागोस शहराची ओळख नसलेल्या लोकांसाठी म्हणून सांगते- लागोस शहराचे एक वैशिष्ट्य आहे. त्या शहरात हॉटेल्स, मोठ्या इमारती इत्यादींच्या समोरच्या भागात तरुण मुले घुटमळत असतात. ते तुम्हाला तुमची कार पार्क करण्यासाठी मदत करतात. तर आम्ही फिरायला गेलो होतो त्या संध्याकाळी, अशाच एका माणसाने फारच कौशल्याने आम्हाला आमच्या कारसाठी जागा मिळवून दिली. त्यामुळे मी त्याच्यावर खूश झाले होते. परत जाताना त्या माणसाला टिप म्हणून काही पैसे द्यायचे, असे मी ठरवले होते. जाताना मी माझी पर्स उघडली आणि त्या माणसाला देण्यासाठी म्हणून काही पैसे बाहेर काढले. ते पैसे मी माझ्या कामातून कष्टाने कमावलेले होते. ते पैसे त्या माणसाला देताच, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञता दोन्ही दाटून आले. त्याने माझ्याकडून पैसे घेतले आणि बाजूला उभ्या असलेल्या लुईकडे वळून तो म्हणाला, ‘धन्यवाद, सर!’

लुईने आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहिले आणि विचारले, ‘तो मला धन्यवाद का म्हणतो आहे? मी काही त्याला पैसे दिलेले नाहीत.’ आणि मग माझा स्त्री-पुरुष यांना मिळणाऱ्या वागणुकीतील ‘भेदभावाचा मुद्दा’ लुईला पटला असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसले. आम्हाला पार्किंगसाठी मदत करणाऱ्या त्या माणसाला असे वाटले होते की- जे पैसे मी त्याला दिले, ते लुईने मला दिलेले असणार, कारण लुई हा पुरुष आहे!

स्त्री आणि पुरुष एकमेकांपासून वेगळे असतात.त्यांच्या शरीरातील हार्मोन्स(संप्रेरके)वेगळी असतात. त्यांचे लैंगिक अवयव वेगळे असतात. त्यांच्या जैवशास्त्रीय क्षमता वेगवेगळ्या असतात. स्त्रिया संततीधारणा करू शकतात; अद्याप तरी पुरुष तसे करू शकत नाहीत! पुरुषांच्या शरीरातून टेस्टोस्टेरॉन नावाचे संप्रेरक स्रवत असते. या टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांची शरीर क्षमता खूपच वाढते. पुरुषांचे बळ स्त्रियांपेक्षा सर्वसामान्यपणे जास्त असते. जगात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण किंचितरीत्या जास्त आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येत 52 टक्के स्त्रिया आहेत, परंतु सत्ता आणि प्रतिष्ठेच्या जागांवर पुरुष आहेत. केनियातील नोबेल पारितोषिकविजेत्या ‘वंगारी मथाई’ यांनी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे आणि सोप्या भाषेत सांगितला होता.

त्या असे म्हणाल्या होत्या की, जसजसे तुम्ही वरच्या पदांकडे जाता तसतशी स्त्रियांची संख्या कमी कमी होत जाते. 2012 मधील अमेरिकी निवडणुकांत ‘लिली लेडबेटर कायद्याचा’ उल्लेख सतत होत राहिला. हा कायदा काय आहे याचा शोध घेतला, तर असे दिसते की- एखादे काम करायला सारख्याच क्षमतेचे स्त्री आणि पुरुष असतील, तर पुरुषाला जास्त मोबदला दिला जाईल. त्यामुळे आजच्या जगावर पुरुषांचीच सत्ता आहे. हजार वर्षांपूर्वी असे असणे हे साहजिक होते, कारण त्या काळात जगण्यासाठी शारीरिक क्षमता हाच निकष सर्वांत महत्त्वाचा होता. शारीरिक दृष्ट्या सामर्थ्यवान व्यक्ती इतरांचे नेतृत्व करण्याची शक्यता जास्त होती आणि तसेही पुरुषांचे शारीरबळ स्त्रियांपेक्षा जास्त असते. अर्थात, याला अनेक अपवादसुद्धा आहेत.

पण आज आपण त्या काळापेक्षा फार वेगळ्या जगात राहतो. आज आपले नेतृत्व करणारी व्यक्ती ही शरीरबळाबाबत सामर्थ्यवान असण्याची गरज उरलेली नाही. प्रतिभाशाली, हुशार, नावीन्यपूर्ण शोधण्याची क्षमता इत्यादी गुण जिच्याकडे जास्त असेल, अशी व्यक्ती आपले नेतृत्व करण्याची शक्यता जास्त आहे. हे असे गुण आहेत, ज्यासाठी कोणत्याही संप्रेरकाची गरज नाही. एखादा पुरुष हा एखाद्या स्त्रीइतकाच हुशार आणि प्रतिभाशाली असू शकेल. मात्र आपण जरी उत्क्रांत झालेलो असलो, तरी आपल्या ‘जेन्डर’ बाबतच्या कल्पना अजूनही पुरेशा उत्क्रांत झालेल्या नाहीत.

काही आठवड्यांपूवी मी नायजेरियात उत्तम मानल्या जाणाऱ्या एका हॉटेलच्या लॉबीमध्ये गेले होते. त्या हॉटेलचे नाव इथे घ्यावे, असा विचार मी आधी केला होता. पण नंतर वाटले की जाऊ दे, असे करायला नको. तर हॉटेलच्या दारापाशीच मला एका सुरक्षारक्षकाने अडवले आणि अतिशय त्रासदायक प्रश्न विचारायला सुरुवात केली. कारण या सुरक्षारक्षकांची समजूत अशी की, हॉटेलात एकट्याने जाणारी स्त्री ही वेश्याच असणार!आणि मला एक सांगा की- ही हॉटेल्स या वेश्याव्यवसायातील मागणीच्या बाजूकडे(पुरुषांकडे)लक्ष न देता पुरवठ्याच्या बाजूकडेच(स्त्रियांकडे)कायम का लक्ष देतात बरे?

लागोस शहरात मी अनेक ‘प्रतिष्ठित’ बार्स आणि क्लब्जमध्ये आजही जाऊ शकत नाही. तिथे एकट्या स्त्रीला आत सोडले जात नाही. तुम्ही कायम एखाद्या पुरुषासोबतच जायला हवे, असा तिथला नियम आहे. प्रत्येक वेळी मी एखाद्या पुरुषाबरोबर नायजेरियातील हॉटेलात जाते, तेव्हा वेटर्स त्या पुरुषाला अभिवादन करतात आणि माझ्याकडे दुर्लक्ष करतात.म्हणजे पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत, असे शिकवले जाते. त्याच सामाजिक परिस्थितीतून वेटर्स तयार झालेले आहेत. मला हे माहीत आहे की, वेटर्सच्या अशा वागण्यामागे काही वाईट हेतू नसतो. पण वैचारिक पातळीवर हे माहीत असणे वेगळे आणि मानसिकरीत्या त्याचा अनुभव घेणे वेगळे. तर प्रत्येक वेळी हॉटेलात माझ्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा मला असे वाटते की-मी अस्तित्वातच नाही. मला याचा त्रास होतो. आणि त्यांना सांगावेसे वाटते की, जसा एखादा पुरुष असतो तितकीच मीसुद्धा माणूस आहे. माझीही त्याच्याप्रमाणेच दखल घ्यावी, या योग्यतेची मी निश्चितच आहे. या खरंतर छोट्या गोष्टी आहेत, मात्र अनेकदा आपल्याला अशा छोट्या गोष्टींचाच जास्त त्रास होतो.

काही दिवसांपूर्वी लागोस शहरात एखादी व्यक्ती तरुण आणि स्त्री असल्याने काय प्रकारचे अनुभव येतात, या विषयावर मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाच्या प्रकाशकांनी मला सांगितले की, या लेखातून आत्यंतिक ‘चीड’ व्यक्त होत आहे. मी त्यांना म्हटले की, अर्थातच मी चिडलेली आहे, माझ्या मनात राग साठलेला आहे!कारण आज ‘जेन्डर’ ही संकल्पना अतिशय अन्यायकारक पद्धतीने अस्तित्वात आहे. आणि रागातून सकारात्मक बदल घडले आहेत, यालासुद्धा इतिहास साक्षी आहे. अर्थात, रागाबरोबरच माझ्या मनात आशावादसुद्धा आहे. म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याच्या मानवाच्या क्षमतेवर माझा दृढ विश्वास आहे.

जगात सर्वत्र जेन्डर ही संकल्पना महत्त्वाची आहे. मात्र, मी नायजेरिया आणि आफ्रिका यांवर लक्ष केंद्रित करणार आहे; कारण या दोन्हींची मला चांगली माहिती आहे आणि माझे मनसुद्धा त्यात गुंतलेले आहे. आजच्या दिवसापासून माझी अशी इच्छा आहे की- आपण एकावेगळ्या जगाची स्वप्ने पाहू या, त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी नियोजन करू या. हे असे जग असेल जे अधिक न्याय्य असेल, हे असे जग असेल जिथे स्त्री आणि पुरुष आनंदी असतील आणि स्वतःशी प्रामाणिक राहतील. याची सुरुवात कुठून करायची ते सांगते. आपण आपल्या मुलींना व मुलांनाही वेगळ्या तऱ्हेने वाढवले पाहिजे. आपण आपल्या मुलांना सध्या ज्या प्रकारे वाढवतो, त्यामुळे एका प्रकारे आपण त्यांच्यावर अन्यायच करत असतो. त्यांच्यातील मानवतेचा हळुवारपणाचा अंश संपवून टाकतो. आपण पुरुषत्वाची व्याख्या अतिशय संकुचित पद्धतीने करतो. ‘पुरुष असणे म्हणजे काय’ याचा आपण एक छोटा पण असह्य असा पिंजरा तयार करतो आणि त्यात आपल्या मुलांना टाकून देतो. मुलांना भीती वाटता कामा नये, असे सांगतो. पण त्यांना असुरक्षितपणा, दुबळेपणा यांची भीती घालतो. आणि त्यांना स्वतःचे- आतले खरे असे जे रूप असते, ते लपवून ठेवायला शिकवतो. कारण आपण नायजेरियात असे मानतो की, मुलांनी ‘कणखर’ असायला हवे.

माध्यमिक शाळेत शिकत असताना आणि वयाच्या टीनएजमध्ये असताना (म्हणजे वय वर्षे तेरा ते एकोणीस या काळात) मुला-मुलींना मिळणारी पॉकेटमनीची रक्कम साधारणतः सारखीच असते. पण ते फिरायला बाहेर गेले, तर कायम अशीच अपेक्षा असते की, मुलांनीच आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी पैसे द्यावेत. आणि तरीही आपल्याला याचे आश्चर्य वाटते की, मुलांमध्येच आई-वडिलांच्या पैशांची चोरी करण्याचे प्रमाण जास्त का असते? म्हणजे आपण मुलगा आणि मुलगी या दोघांनाही पौरुषत्व आणि पैसे यांचा काहीही संबंध नाही, असे शिकवले तर? केवळ मुलगा आहे म्हणून त्याने पैसे द्यावेत, यापेक्षा ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत तो/ती पैसे देईल, असा दृष्टिकोन विकसित केला तर?

आता हे उघडच आहे की, ऐतिहासिक कारणांमुळे आज तरी स्त्रियांपेक्षा पुरुषांकडेच जास्त पैसे आहेत. पण जर आज आपल्या मुलांना वेगळ्या तऱ्हेने वाढवायला सुरुवात केली, तर पन्नास-शंभर वर्षांत मुलांवर त्यांचे पौरुषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी राहणार नाही. आणखी एक सांगते. पुरुषांनी ‘कणखर’ असायला हवे, अशी अपेक्षा बाळगून आपण त्यांना अतिशय नाजूक अशा मन:स्थितीत आणून ठेवतो. कोणत्याही पुरुषाबाबत असे होणे अतिशय वाईट आहे. पुरुषाला ‘कणखर’ होण्याची गरज जितक्या जास्त प्रमाणात जाणवते, तितके ते नाजूक मनःस्थितीकडे अधिकाधिक ढकलले जातात. आणि आपण अशा पुरुषांचे मन सांभाळण्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकून, स्त्रियांवर आणखीच अन्याय करत असतो.

एवढेच नाही तर आपण मुलींना असे शिकवतो की, तुम्ही आपले पंख फार विस्तारू नयेत. तुम्ही फार महत्त्वाकांक्षी असू नये, थोडी-फार महत्त्वाकांक्षा ठीक आहे! तुम्ही यशस्वी होण्याची स्वप्ने पाहायला हरकत नाही, मात्र खूप यशस्वी होऊ नये; नाही तर तुम्हाला पुरुष घाबरतील! तुमच्या एखाद्या पुरुषाबरोबरील नात्यात जरी तुम्ही आर्थिक दृष्ट्या कर्त्या भूमिकेत असाल, तरी तुम्ही तसे दाखवू नये. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी तर नाहीच नाही. जर तुम्ही असे केलेत, तर त्या पुरुषाचे खच्चीकरण होईल. त्याच्याकडून त्याचे पौरुषत्व हिरावून घेतले जात आहे, असे त्याला वाटेल.

आता आपण या साऱ्या चर्चेचा मूळ रोख ज्या गृहीतकावर अवलंबून आहे, त्याच्यावरच प्रश्न उपस्थित केले तर? एखादी यशस्वी स्त्री ही एखाद्या पुरुषाला धोकादायक का वाटावी? जर आपण ‘पौरुषत्व खच्ची होणे’ (Emasculation)ही संज्ञा टाकूनच द्यायचे ठरवले तर? मला Emasculation या शब्दाचा जितका राग आहे, तितक्या तीव्र भावना इंग्रजी भाषेतील इतर कोणत्याच शब्दाबद्दल नाहीत. माझ्या ओळखीच्या नायजेरियन व्यक्तीने मला एकदा विचारले होते की, पुरुषांना आपली भीती वाटेल याची काळजी तुला वाटते का? मला त्याची अजिबात काळजी वाटत नव्हती; उलट, अशी काही काळजी वाटायला हवी, अशी कल्पनाच माझ्या डोक्यात आलेली नव्हती. कारण ज्या पुरुषांना माझी भीती वाटेल, त्यांच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारे कधीही रस असणार नाही.पण तरीही त्या प्रश्नाचे मला आश्चर्य वाटले. म्हणजे मी स्त्री आहे म्हणून माझे लग्न व्हायलाच हवे! माझे लग्न ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, असे गृहीत धरूनच मी माझ्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत, अशी समाजाची अपेक्षा असते. लग्न ही चांगली गोष्ट असू शकते. ती व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम घेऊन येऊ शकते. एकमेकांसाठी आधार देऊ शकते. पण आपण फक्त मुलींनाच त्यांनी लग्न करायला हवे, अशी स्वप्ने का पाहायला लावतो? मुलांनाही तशीच शिकवण का देऊ नये?

मला एक अशी स्त्री माहीत आहे, जिने आपल्या नवऱ्याला आपली भीती वाटू नये म्हणून स्वतःचे घर विकून टाकले. मला अशीही एक अविवाहित स्त्री माहीत आहे, जी वेगवेगळ्या परिषदांना जाताना बोटात लग्नाची अंगठी घालून जाते. कारण परिषदेतील इतर सहभागी लोकांनी तिला आदराने वागवावे, असे तिला वाटते. तिचे लग्न झालेले आहे असे दाखवले, तर तिला तो(आदर)मिळेल याची तिला खात्री आहे! आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मंडळी आणि अगदी कामाच्या ठिकाणचे सहकारी यांच्याकडूनही तरुण मुलींनी लग्न करावे यासाठी इतका दबाव टाकला जातो की, त्या मुली अगतिक होऊन जी निवड करतात ती पाहून वाईट वाटते.लग्नास योग्य वय ओलांडून गेलेल्या मुलीचे जर लग्न झालेले नसेल तर त्याकडे फार मोठे अपयश या अर्थाने आपल्या समाजात पाहिले जाते. मात्र तशाच वयातील पुरुष अविवाहित असेल, तर त्याला त्याच्या आवडीनुसार स्त्री अजून शोधता आलेली नाही, एवढाच अर्थ घेतला जातो. मुलींनी या साऱ्या दबावाला, ‘सामाजिक वागणुकीला नकार द्यायला हवा’, असे म्हणणे खूप सोपे आहे; मात्र प्रत्यक्षातील परिस्थिती जास्त गुंतागुंतीची आणि अधिक खडतर आहे. कारण आपण समाजात राहतो. आणि सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीमधून जगण्याच्या संकल्पना आत्मसात करतो. रिलेशनशिप (लग्न अथवा प्रेम)याविषयी बोलताना आपण जी भाषा वापरतो, त्यातसुद्धा याचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. म्हणजे लग्नासाठी वापरली जाणारी भाषा बऱ्याचदा भागीदारीची नाही, तर मालकी हक्काची असते! ‘आदर’ हा शब्दसुद्धा स्त्रीने पुरुषाप्रति व्यक्त करायची भावना- याच अर्थाने वापरला जातो. याच्या उलट अर्थाने आपण हा शब्द सहसा वापरत नाही. माझे लग्न टिकावे, घरात शांतता राहावी म्हणून मी हे केले- हा नायजेरियात सतत वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही हा वाक्प्रचार वापरतात. मात्र सर्वसामान्यपणे पुरुष असे बोलतात, तेव्हा ते अशा गोष्टींविषयी बोलत असतात, ज्या त्यांनी करणे तसेही योग्य नसतेच. उदा. कधी-कधी ते त्यांच्या मित्रांना सांगत असतात की, माझी बायको म्हणाली, ‘मी क्लबमध्ये रोज रात्री जाऊ नये. त्यामुळे घरात शांतता राहावी म्हणून मी फक्त शनिवार-रविवारीच क्लबमध्ये जातो.’ हे सांगताना पुरुषांचा आविर्भाव असा असतो की, बायकोचे हे म्हणणे ऐकून ते थोडेसे वैतागलेले आहेत. मात्र तरीही त्यांनी तिचे हे म्हणणे ऐकून घेऊनसुद्धा पुरुषत्व कसे सिद्ध केले आहे!

याउलट जेव्हा एखादी स्त्री असे म्हणते की- घरात शांतता राहावी, घरदार टिकावे यासाठी तिने काही गोष्टी सोडून दिल्या; तेव्हा ती एखादी नोकरी, एखादे उत्तम करिअर यांचा त्याग करणे या अर्थाने बोलत असते. सामान्यत: आपण मुलींना असे शिकवतो की, स्त्री-पुरुष संबंधात तडजोड करण्याची जबाबदारी केवळ स्त्रियांचीच आहे. आपण मुलींना असे वाढवतो की, ज्यामुळे त्या एकमेकींकडे स्पर्धक म्हणून पाहायला लागतात. परंतु ही स्पर्धा करिअर, नोकरी यांच्यासाठीची नसते. तशा स्वरूपाची स्पर्धा असेल, तर ते चांगलेच असते. मात्र इथे आपण बोलत आहोत ती स्पर्धा असते- पुरुषांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची. आपण मुलांना लैंगिक मोकळेपणा, स्वातंत्र्य देतो तसे आपल्या मुलींना देत नाही. आपल्या मुलांच्या गर्लफ्रेंड्‌स कोण आहेत, हे जाणून घ्यायला आपली काहीही हरकत नसते. मात्र आपण तीच वागणूक आपल्या मुलींच्या बॉयफ्रेंड्‌सबाबत देतो का? अजिबात नाही!

आणि तरीही आपली अशीही अपेक्षा असते की-अशा बंधनात ठेवलेल्या, स्वातंत्र्य हिरावून घेतलेल्या मुलींनी योग्य वेळ येताच परिपूर्ण मुलगा आपला नवरा म्हणून निवडावा. आपण आपल्या मुलींवर लक्ष ठेवतो.त्या व्हर्जिन राहाव्यात (म्हणजे त्यांनी सेक्स न करता आपले कौमार्य टिकवून ठेवावे)यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देतो. मात्र मुलांनी आपले कौमार्य टिकवावे, अशी अपेक्षा तितकीशी बाळगत नाही. त्यामुळे मला याचे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे की, असे कसे शक्य आहे? कारण ‘कौमार्यभंग होणे’ या प्रक्रियेत स्त्रीपुरुष दोघेही सहभागी असतात.

काही दिवसांपूर्वीच एका नायजेरियन मुलीवर एका विद्यापीठात बलात्कार झाला. या घटनेवर नायजेरियातील लोकांची- स्त्री आणि पुरुष दोहोंचीही- प्रतिक्रिया साधारणतः अशा स्वरूपाची होती- ‘हो, बलात्कार करणे चूकच आहे. मात्र एक मुलगी एका खोलीत चार मुलांबरोबर काय करत होती?’ या प्रतिक्रियेतील क्रौर्य बाजूला ठेवले तरी असे लक्षात येते की, सर्व लोकांना असे शिकवण्यात आलेले आहे की- अशा प्रकरणात दोष मुलींचाच असतो. तसेच, पुरुष हे असेच असतात, त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते आणि ते इतके नीच स्तरावर जाऊ शकतात- हेसुद्धा आपण स्वीकारलेले आहे. आपण मुलींना ‘लाज वाटणे म्हणजे काय’ हे शिकवतो. त्यांना ती वाटायला हवी, हेही शिकवतो. पाय उघडे करून बसू नका, शरीराला पूर्ण झाकणारे कपडे घाला- असेही त्यांना शिकवतो. आणि त्यांना अशी वागणूक देतो की, ज्यामुळे ‘स्त्री’ म्हणून जन्माला येणे हाच एक अपराध आहे, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे मुली वयाने वाढतात, तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या काही इच्छा-आशा-आकांक्षा आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला कायम शांत ठेवत, समोर येईल त्याचा स्वीकार करत त्या जगायला शिकतात. स्वतःला काय वाटते, हे फारसे व्यक्त करत नाहीत. आणि सर्वांत वाईट म्हणजे, त्या मुली ‘ढोंगीपणाने जगणे’ याचे रूपांतर एखाद्या कलाप्रकारात करावे आणि तो कलाप्रकार आत्मसात करावा तशा पद्धतीने जगत राहतात.

मला एक अशी स्त्री माहीत आहे, जिला घरकाम अजिबात आवडत नाही. तिला त्याचा तिरस्कार आहे.पण तरीही ते काम आवडते, असा बहाणा ती करते. कारण तिला असे शिकवले गेले आहे की, चांगली पत्नी व्हायची असेल तर तिच्यात ‘गृहिणी’चे गुण असायला हवेत. त्यामुळे लग्नानंतर काही काळाने सासरच्या लोकांनी तिच्याविषयी तक्रार करायला सुरुवात केली. ती आता बदलली आहे, असे त्यांना वाटत होते. वस्तुत: ती बदलली नव्हती. तिला सतत ढोंगीपणाने जगण्याचा आणि ‘घरकाम करायला आवडते,’ हे दाखवण्याचा कंटाळा आला होता. ‘जेन्डर’ या संकल्पनेतील दोष असा आहे की- आपण कसे असायला हवे, हेच ती सांगते.त्यामुळे आपण नेमके कसे आहोत, याविषयी ती संकल्पना काहीच बोलत नाही.आपल्यावर आपण स्त्री किंवा पुरुष असण्यातून येणाऱ्या अपेक्षांचे, ठरावीक वर्तनाचे ओझे नसेल; तर आपण किती मोकळे, आनंदी आयुष्य जगू शकू याची कल्पना करा. 

जैवशास्त्रीय दृष्टीने पाहता, मुले आणि मुली या नक्कीच वेगळ्या आहेत. पण आपल्या आजूबाजूच्या सामाजिक वातावरणामुळे ते फरक आणखी वाढवले जातात. आता एक उदाहरण पाहू या- स्वयंपाक करणे. कोणत्याही घरातील स्त्रियाच स्वयंपाक आणि साफसफाईही कामे करण्याची शक्यता जास्त असते. पुरुष अगदीक्वचित हातभार लावतील. पण असे का असावे बरे? स्त्रिया काय जन्माला येतानाच स्वयंपाकाचे गुण घेऊन येतात का? की, स्त्रियांना स्वयंपाक करणे हे तुमचे काम आहे, असे वर्षानुवर्षे शिकवण्यात आले आहे? खरं तर मी असे म्हणणार होते की, स्वयंपाक करणे हा गुण घेऊनच स्त्रिया जन्माला येतात. पण मला आठवले की, जगातील बहुसंख्य प्रसिद्ध आचारी- ज्यांना आपण ‘शेफ’ असे आकर्षक नाव देतो- पुरुष आहेत!

मी माझ्या अतिशय हुशार अशा आजीकडे पाहत असे आणि विचार करत असे की, तिच्या वाढीच्या काळात पुरुषांना उपलब्ध आहेत तशा संधी तिला मिळाल्या असत्या तर? माझ्या आजीच्या काळात होती त्यापेक्षा आज (सरकारी धोरणे, कायदे यामुळे) परिस्थिती खूपच बदललेली आहे. तसे बदल होणे हे महत्त्वाचेच आहे. मात्र त्याहीपेक्षा आपल्या दृष्टिकोनातील, मनोव्यवस्थेतील बदल जास्त महत्त्वाचे आहेत.

‘जेन्डर’विषयी विचार करताना आपण कशावर विश्वास ठेवतो आणि कशाला महत्त्व देतो, हे पाहायला हवे.आपण मुलांना वाढवताना त्यांच्या ‘जेन्डर’कडे म्हणजे पुरुष वा स्त्री असण्याकडे लक्ष न देता, त्यांच्या क्षमतांवर व त्यांच्या आवडीनिवडींवर लक्ष केंद्रित केले तर?  मला एक कुटुंब माहीत आहे. त्या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन्ही मुले अतिशय हुशार आणि गोड आहेत. पण जेव्हा त्या दोघांपैकी मुलाला भूक लागते, तेव्हा आई-वडील मुलीला सांगतात की- ‘जा आणि आपल्या भावासाठी इंडोमी नूडल्स तयार करून आण.’ आता गंमत अशी की, त्या मुलीला नूडल्स बनवणे फारसे आवडत नाही. पण मुलगी असल्याने तिला ते काम करावेच लागते. आता विचार करा की, आई-वडिलांनी जर दोन्ही मुलांना नूडल्स बनवायला शिकवले असते तर? स्वयंपाक करणे हे मुलांसाठी फार उपयुक्त असे कौशल्य आहे. स्वतःचे जेवण स्वत: बनवून पोषण करणे, हे महत्त्वाचे काम आहे, ते इतरांवर सोपवावे, असे मला कधीच वाटले नाही.

आणखी एक उदाहरण देते. मला एक स्त्री माहीत आहे, ती तिच्या नवऱ्याइतकीच शिकलेली आहे आणि तो करतो त्याच प्रकारची नोकरी करते. पण जेव्हा ते कामावरून घरी येतात, तेव्हा ती घरातील बहुतांश कामे करते. मला वाटते, इतर अनेक जोडप्यांबाबतसुद्धा हे खरे असावे. मला हे दोघे खास लक्षात राहिले, त्याचे कारण तुम्हाला सांगते. जेव्हा-जेव्हा त्या स्त्रीचा नवरा त्यांच्या बाळाचे डायपर बदलत असे, त्या प्रत्येक वेळी ती ‘धन्यवाद’ म्हणत असे. आता जरा विचार करा की-आपल्या बाळाची काळजी घेणे हे दोघांचेही काम आहे, असा विचार करून तिने नवऱ्याचे वागणे(डायपरबदलणे)हे अगदीच सर्वसाधारण आणि नैसर्गिक आहे, असे मानले असते तर?

आज मी माझ्या वाढीच्या काळात ‘जेन्डर’विषयी मला जे-जे धडे दिले गेले, ते विसरण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला कधी-कधी माझ्याकडून ‘जेन्डर’मुळे (मी स्त्री असल्याने)ज्या अपेक्षा केल्या जातात, त्यामुळे खूपच असुरक्षित वाटायला लागते. एक उदाहरण देते, म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल. जेव्हा मला पहिल्यांदाच एका लेखनाच्या कार्यशाळेत शिकवण्यासाठी जायचे होते, तेव्हा मी चिंतेत होते. मी काय शिकवणार आहे, याविषयी मला चिंता वाटत नव्हती, कारण माझी तयारी नीट झालेली होती आणि मी मला जे करायला आवडते (म्हणजे लेखन)तेच शिकवणार होते. पण मला चिंता वाटत होती, आपण कोणते कपडे घालून शिकवायला जावे, याची. ज्यांना मी शिकवणार होते, त्या मुलांनी मला गांभीर्याने घ्यावे, असे वाटत होते. मला हे माहीत होते की, मी स्त्री असल्याने मला स्वतःला सिद्ध करावे लागेल; तरच माझी किंमत केली जाईल, मान राखला जाईल. आणि मला भीती वाटत होती की, आपण फारच ‘स्त्रैण’ तर दिसणार नाही ना? जर मी तशी दिसले, तर लोक मला गांभीर्याने घेणार नाहीत. मला त्या दिवशी माझा ‘स्त्रैण’ स्कर्ट घालून आणि ओठांवर लिपस्टिक लावून जायचे होते, पण मी तसे केले नाही. मी एक अतिशय ओंगळवाणा दिसणारा असा पुरुषी सूट घालून गेले.

कारण आजच्या जगातील दुर्दैवी सत्य असे आहे की- जेव्हा आपण कपड्यांचा विचार करतो, तेव्हा पुरुषी कपडे हे मापदंड असतात. त्याला आधाराला घेऊन आपण इतरांच्या कपड्यांची किंमत करतो. जर एखाद्या पुरुषाला एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचे असेल, तर आपण फारच ‘पुरुषी’ दिसत असल्याने आपल्याला कोणी गांभीर्याने घेणार नाही, अशी चिंता त्याला सतावत नाही. पण जर एखाद्या स्त्रीला अशा मीटिंगसाठी तयार व्हायचे असेल, तर तिला आपण फार ‘स्त्रैण’ दिसणार नाही याची काळजी घ्यावी लागते.

मला आजही असे वाटते की, त्या वर्गावर जाताना मी तो सूट घालायला नको होता. मी तो सूट माझ्या घरातसुद्धा ठेवलेला नाही. आज मला माझ्या ‘असण्या’बद्दल जो आत्मविश्वास आहे, तो तेव्हा असता तर माझ्या विद्यार्थ्यांचा आणखी फायदा झाला असता.कारण मग मी जास्त मनमोकळेपणे शिकवू शकले असते.आता मी असे ठरवले आहे की, माझे स्त्री असणे आणि माझ्यातील स्त्रीत्व या दोन्हींबद्दल स्वतःला अपराधी मानायचे काही कारण नाही. आणि मी जी काही आहे, जशी आहे तशी असण्याबद्दल मला आदर मिळायला हवा असे वाटते; कारण तो माझा हक्क आहे.

‘जेन्डर’विषयी बोलणे सोपे नाही. स्त्री अथवा पुरुष या दोघांपैकी कोणाशीही बोलताना ‘जेन्डर’चा विषय काढणे म्हणजे अप्रिय विषय काढल्यासारखे आहे.तुम्हाला लगेचच विरोधाला तोंड द्यावे लागते. इथे उपस्थित असलेल्यांना असे वाटू शकेल की, स्त्रियासुद्धा या विषयावर बोलायला तयार नसतात? किंवा काही पुरुषांना असे वाटू शकेल की- ओके; हे सर्व इंटरेस्टिंग आहे, मात्र मी याच्याशी सहमत ‘नाही’. पण असा विचार करणे हेसुद्धा आपण चर्चेला घेतलेल्या मूळ प्रश्नाचा एक भाग आहे. अनेक पुरुषांना ‘जेन्डर’विषयी विचार करावासा वाटत नाही किंवा (आपल्या वर्तनातील) तसे मुद्देच त्यांच्या लक्षात येत नाहीत, हा ‘जेन्डर’विषयक प्रश्नाचाच एक भाग आहे.

आपण वर पाहिले माझा मित्र लुई जसा विचार करत असे, त्याच्याप्रमाणेच अनेक पुरुषांना असे वाटते की, आज सगळे व्यवस्थित आहे. आणि त्यामुळेही परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पुरुष काहीच करतनाहीत. बघा ना, जर तुम्ही पुरुष असाल व एखाद्या स्त्रीबरोबर हॉटेलात गेलात आणि तिथे वेटरने फक्त तुम्हालाच अभिवादन केले; तर ‘तू माझ्याबरोबर आलेल्या स्त्रीला का अभिवादन केले नाही?’ असे त्या वेटरला विचारावेसे तुम्हाला वाटते का? खरे तर हेच भाषण आणखी एकदा आणि जास्त विस्तारित स्वरूपात करता येईल. कारण ‘जेन्डर’विषयक चर्चा ही अशी लोकांना अप्रिय वाटणारी, त्रासदायक प्रश्न उभे करणारी असल्यामुळे ती बाजूला टाकणे अगदी सोपे आहे. त्यामुळे काही लोक याच संदर्भात बोलताना जैविक उत्क्रांती आणि माकडे यांची उदाहरणे देतील. ते आपल्याला सांगतील की- माकडीण ही माकडासमोर कशी झुकते आणि तशाच स्वरूपाची इतर काही माहिती देतील. पण आपण माकड नसून माणूस आहोत, हा मुख्य मुद्दा आहे. माकडे झाडांवर राहतात आणि नाश्त्याला किडे खातात. आपण तसे करत नाही. आणखी काही लोक याच जेन्डरविषयक चर्चेच्या संदर्भात म्हणतील की,‘गरीब लोकांचे आयुष्य खडतर असते.’ त्यांचे हे म्हणणे खरे आहे. पण आपला मूळ मुद्दा हा गरिबांच्या आयुष्याविषयीचा नाहीये, आपण ‘जेन्डर’वर बोलत आहोत!

‘जेन्डर’मुळे होणारे शोषण आणि समाजातील आर्थिक आधारावर होणारे वर्गीय शोषण हे दोन वेगळे प्रकार आहेत. कृष्णवर्णीय पुरुषांशी बोलून मला शोषणाचे विविध प्रकार आणि त्या विविध स्वरूपांतल्या शोषणाचा कसा एकमेकांशी संबंध नसतो, याविषयी बरीच माहिती समजली आहे. मी एकदा एका कृष्णवर्णीय पुरुषाशी बोलत होते आणि त्याने मला विचारले की- ‘एक स्त्री म्हणून असलेले माझे अनुभव’ असा शब्दप्रयोग तू सतत का करत आहेस? ‘एक माणूस म्हणून असलेले माझे अनुभव’ असा शब्दप्रयोग तू का करत नाहीस? आता गंमत अशी की- हीच व्यक्ती त्याच्या स्वतःच्या अनुभवांविषयी बोलताना कायम ‘माझे एक कृष्णवर्णीय पुरुष म्हणून असलेले अनुभव’ असा शब्दप्रयोग करत असे!‘जेन्डर’कडे लक्ष दिलेच पाहिजे, याचे कारण स्त्री आणि पुरुष यांना जगाचा येणारा अनुभव वेगवेगळा असतो.

आपण जगाकडे कोणत्या चष्म्यातून पाहतो. हे आपल्या ‘जेन्डर’वर अवलंबून असते. अर्थात आपण ते बदलू शकतो. आता काही लोक म्हणतील की- खरी सत्ता, ज्याला ‘बॉटम पॉवर’ म्हटले जाते ती तर ‘स्त्रियांकडेच असते’. इथे जे लोक नायजेरियातील नाहीत त्यांना ‘बॉटम पॉवर’चा अर्थ समजावून सांगते. स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाचा, पुरुषांना त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचा वापर करून आपल्याला हवे तसे घडवून आणतात; याला ‘बॉटम पॉवर’ म्हणतात. परंतु मला असे वाटते की ‘बॉटम पॉवर’ ही काही खरी सत्ता नाही. ‘बॉटमपॉवर’चा साधा अर्थ इतकाच की, स्त्रियांना इतरांच्या (म्हणजे अर्थातच पुरुषांच्या)सामर्थ्याचा वापर स्वतःसाठी करून घेता येतो. पण आपण याचासुद्धा विचार करायला हवा की- ती व्यक्ती जर आजारी असेल, चांगल्या मूडमध्ये नसेल अथवा तिच्यात मानसिक-नैतिक सामर्थ्य नसेल तर मग काय होईल?

काही लोक असे म्हणतील की स्त्रीवर पुरुषांनी सत्ता गाजवावी, हीच आपली संस्कृती आहे. पण संस्कृती सतत बदलत असते. मला आज पंधरा वर्षांच्या असलेल्या, सुंदर दिसणाऱ्या अशा जुळ्या भाच्या आहेत. त्या दोघीही लागोसमध्ये राहतात. जर त्यांचा जन्म शंभर वर्षांपूर्वी झाला असता, तर त्यांना त्या काळाच्या प्रथेप्रमाणे मारून टाकले असते. जुळ्यांना मारणे, ही तेव्हा आपली संस्कृती होती. आपण संस्कृती कशाला म्हणतो? संस्कृतीचे दाखवण्याचे, साजरे करावेत असे काही घटक असतात. पण संस्कृती म्हणजे त्या-त्या समाजातील लोकांचे सातत्य कायम ठेवणे, त्यांना जपणे, त्यांचा विकास करणे. आपल्या कुटुंबाच्या परंपरा काय आहेत, आपले पूर्वज कुठून आले वगैरेंमध्ये मला सगळ्यात जास्त रस आहे. माझ्या भावांना इतका रस नाही. पण मी आमच्या कुटुंबातील, मूळ गावातील पारंपरिक सांस्कृतिक उपक्रमांत भाग घेऊ शकत नाही. त्यांच्या बैठकांना जाऊ शकत नाही. माझे म्हणणे त्यांच्याकडे मांडू शकत नाही. कारण मी स्त्री आहे. खरे तर लोकसंस्कृतीसाठी नसतात, तर संस्कृती लोकांसाठी असते.त्यामुळे जर आपल्या संस्कृतीत स्त्रीला तिचे महत्त्व मिळत नसेल, तर आपण ते दिले पाहिजे. तीच आपली संस्कृती बनायला हवी.

मी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला, त्या ओकोलोमा मादुवेसी या माझ्या मित्राचा विचार अनेकदा माझ्या मनात येतो. त्या सोसोलिसोच्या विमान अपघातात तो आणित्याच्यासकट मरण पावलेल्या इतर सर्वांच्या आत्म्याला शांती मिळू दे. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्यांच्या मनात त्याची स्मृती कायम राहील.आणि तो त्या दिवशी जेव्हा मला ‘फेमिनिस्ट’ म्हणाला, तेव्हा तो योग्य तेच बोलला होता, असे आज जाणवते.

होय, मी ‘फेमिनिस्ट’ आहे! त्या दिवशी जेव्हा ओकोलोमाने मला ‘फेमिनिस्ट’ म्हटले, तेव्हा घरी गेल्यावर मी डिक्शनरीमध्ये जाऊन त्या शब्दाचा अर्थ पाहिला; तेव्हा तिथे ‘फेमिनिस्ट’ या शब्दाचा अर्थ असा होता- स्त्री आणि पुरुष असा फरक न करता सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेवर जिचा विश्वास आहे, अशी व्यक्ती. मी ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्यावरून मला असे वाटते की, माझी पणजीसुद्धा फेमिनिस्ट होती. तिचे लग्न मनाविरुद्ध केले जाणार होते, म्हणून ती घरातून पळून गेली आणि तिने तिच्या पसंतीच्या माणसासोबत लग्न केले. जिथे-जिथे आणि जेव्हा-जेव्हा शक्य होते, तेव्हा तिने विरोध केला; आपला निषेध नोंदवला. आपल्यावर अन्याय होत आहे असे वाटले, तेव्हा तिने आपले मत स्पष्टपणे मांडले होते.‘फेमिनिस्ट’ हा शब्द तिला माहीत नव्हता, मात्र विचारांनी ती ‘फेमिनिस्ट’ होती. आपल्यापैकी अधिकाधिक जणांनी त्या शब्दाला (आणि मुख्य म्हणजे त्याच्या अर्थाला) आपलेसे करायला हवे.

माझ्या दृष्टीने ‘फेमिनिस्ट’ शब्दाची व्याख्या काय आहे, हे सांगून मी थांबणार आहे. जे स्त्री आणि पुरुष असे म्हणतात की,‘जेन्डर’ ही संकल्पना आज जशी अस्तित्वात आहे तिच्यामध्ये मूलभूत दोष आहेत आणि आपण ते सुधारायला हवेत; आपण हे जग आहे त्याहून अधिक चांगले करायला हवे, त्यांना फेमिनिस्ट म्हणावे. माझा भाऊ केने हा माझ्या माहितीतला सर्वोत्तम ‘फेमिनिस्ट’ आहे. तो वागायला दयाळू, दिसायला चांगला, स्वभावात गोडवा असलेला आणि अतिशय पुरुषी असा आहे!

(नायजेरियन लेखिका चिमामांडा एन्गोझी हिने2013 मध्ये ‘टेड टॉक’मध्ये हे भाषण केले होते.)

अनुवाद : संकल्प गुर्जर, नवी दिल्ली

Tags: जेन्डर इक्वॅलिटी लिंग समभाव स्त्रीवाद फेमिनिझम संकल्प गुर्जर चिमामांडा एन्गोझी ted talk feminism sankalp gurjar chimamanda ngozi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

चिमामांडा एन्गोझी

नायजेरियन लेखिका 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके