डिजिटल अर्काईव्ह

मी जत्रेत पोहोचून एक तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. पण हलधरचा अजून पत्ताच नव्हता... मौलवी साहेबांनी त्याला अजून सुट्टी दिली नाही की तो रस्ता विसरलाय ? मी डोळे फाडून फाडून रस्त्याकडे पाहत होतो. एकट्याने जत्रा पाहण्यात माझं मन लागत नव्हतं. मनात हीदेखील शंका येत होती की, आमची चोरी उघड तर झालेली नाही ना, आणि काका हलधरला पकडून घरी तर घेऊन गेलेले नाहीत ना? शेवटी संध्याकाळ झाली तेव्हा मी काही रेवड्या खाल्या आणि हलधरच्या वाट्याचे पैसे खिशात ठेवून हळूहळू घराच्या दिशेनं निघालो.

 

लहानपणच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. ते मातीचं कच्चं पडकं घर, तो गवताचा बिछाना; ते अनवाणी शेतातून फिरणं, आंब्याच्या झाडावर चढणं सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. जुने फाटके जोडे पायात घालून जितका आनंद होत होता, तितका आनंद आता 'प्फ्लॅक्स'चे बूट पायात घालूनदेखील मिळत नाही. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींत जी मजा होती ती आता महाग गोष्टींनीही येत नाही.

मी माझा चुलत भाऊ हलधरच्या बरोबर दुसऱ्या गावी एका मौलवी साहेबांकडे शिकायला जात होतो. मी तेव्हा आठ वर्षांचा होतो. हलधर (जो आता स्वर्गनिवासी आहे) माझ्यापेक्षा दोन वर्षांने मोठा होता. आम्ही दोघं पहाटे शिळी भाकरी खाऊन, दुपारसाठी मटार आणि तोंडात टाकायला चणे-फुटाणे घेऊन जात असू. मग सगळा दिवस आमचाच असे. मौलवी साहेबांच्या इथे कोणतंही हजेरी रजिस्टर नव्हतं आणि गैरहजर राहिलं तर दंड द्यावा लागत नसे. मग भीती कशाची ! कधी आम्ही पोलीस ठाण्याच्या समोर उभे राहून पोलिसांची कवायत पाहत असू, कधी अस्वलाचा किंवा माकडांचा खेळ करणाऱ्या मदाऱ्याच्या मागे दिवसभर फिरण्यात वेळ घालवत असू, कधी रेल्वे स्टेशनवर जाऊन गाड्या बघण्यात वेळ घालवत असू. गाड्यांच्या वेळेची आम्हाला जितकी माहिती होती, तितकी माहिती कदाचित वेळापत्रकातदेखील नसेल. रस्त्यात गावातील एका जमीनदारानं पेरूची बाग लावायला सुरुवात केली होती. तिथे एक विहीर खोदली जात होती. तेदेखील आमच्यासाठी वेळ घालवायचं एक साधन होतं. तिथे असलेला म्हातारा माळी आम्हाला प्रेमानं त्याच्या झोपडीत बसवत असे, आम्ही त्याच्याशी भांडून भांडून त्याचं काम करत असू. कधी बादलीत पाणी घेऊन झाडांना टाकत असू, कधी खुरपं घेऊन झाडाच्या बुंध्याभोवतीची माती नीट करीत असू, कधी कात्री घेऊन अनावश्यक वाढलेले वेल कापत असू. त्या कामात किती आनंद होता! माळ्याला मुलांच्या मनातलं कळत असावं. तो आमच्याकडून काम करून घेत असे; तेही अशा प्रकारे की, जणू तो आमच्यावर उपकार करतो आहे. जे काम तो दिवसभर करीत असे, ते आम्ही तासाभरात करून टाकीत असू. आता तो माळी नाहीये, पण ती बाग फुललेली आहे. त्या बागेजवळून जाताना असं वाटतं की, त्या झाडांना भेटून यावं. त्यांना म्हणावं की, तुम्ही मला विसरला आहात, पण माझ्या मनात तुमच्या विषयीच्या आठवणी अगदी ताज्या आहेत. त्या तुमच्या पानांइतक्याच हिरव्या आहेत. निःस्वार्थ प्रेमाचं तुम्ही जिवंत प्रतीक आहात.

कधी कधी आम्ही आठवडाभर गैरहजर राहत असू, पण आम्ही मौलवी साहेबांना अशी काही थाप मारीत असू की, त्यांच्या कपाळावरील आठ्या निघून जात. वटारलेल्या डोळ्यातून रागाऐवजी प्रेमाचा वर्षाव सुरू होई. तशी कल्पनाशक्ती आज असती तर एक चांगली कादंबरी लिहून काढता आली असती आणि ती वाचून वाचक चकित झाले असते. आता तर अशी अवस्था आहे की, खूप डोकं फोडल्यावर एखादी कथा सुचते. असो, तर आमचे मौलवी साहेब शिंपी होते. ते मौलवी म्हणून जे काम करीत असत ते केवळ आवड म्हणून. आम्ही दोघं भाऊ गावात त्यांची खूप तारीफ करीत असू. असं समजा की, आम्ही दोघं मौलवी साहेबांचे प्रसिद्धी करणारे दलालच होतो. आमच्या या उद्योगातून मौलवी साहेबांना जेव्हा काही मिळत असे, तेव्हा त्यांना खूप आनंद होत असे. ज्या दिवशी आम्हाला काही चांगली थाप सुचत नसे तेव्हा आम्ही मौलवी साहेबांसाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन जात असू. कधी शेर, अर्धा शेर भाजी घेऊन जात असू, तर कधी गव्हाच्या ओंब्या घेऊन जात असू. ह्या वस्तू बघताच मौलवी साहेबांचा राग शांत होत असे. जेव्हा या वस्तू देता येत नसत, तेव्हा आम्ही शिक्षेतून सुटका मिळावी म्हणून दुसरा काही उपाय शोधत असू. मौलवी साहेबांना पक्षी आवडत असत. त्यांच्या घरात श्यामा, बुलबुल, पोपट असे पक्षी पिंजऱ्यात ठेवलेले होते. आमच्या बरोबरच ते पक्षीदेखील शिकत असत. या पक्षांना खाऊ घालण्यात आम्ही खूप उत्साह दाखवत असू. मौलवी साहेब सगळ्या मुलांना किडे पकडून आणायला सांगत असत. या पक्षांना किडे खायला खूप आवडत असत. त्यांचं बलिदान देऊन आम्ही मौलवी साहेबांना प्रसन्न करून घेत होतो.

एके दिवशी सकाळीच आम्ही दोघं भाऊ तलावावर तोंड धुण्यासाठी गेलो. तेव्हा हलधरने काहीतरी पांढरी वस्तू हातात घेऊन दाखवली आणि मूठ मिटली. मी त्याची मूठ उघडून ती गोष्ट पाहिली. ते रुपयाचं नाणं होतं. मी चकित होऊन विचारलं, "हा रुपया तुला कुठे मिळाला?"

हलधर - "आईने वर फळीवर ठेवला होता. मी खाटेवर चढून तो काढला."

घरात एखादी पेटी किंवा कपाट तर नव्हतं. रुपये-पैसे उंचावर ठेवले जात. एक दिवस आधीच काकांनी माल विकला होता, त्यातून आलेले पैसे त्यांनी जमीनदाराला देण्यासाठी ठेवले होते. हलधरला ते कसं समजलं कुणास ठाऊक. घरातील सगळे कामासाठी बाहेर गेल्यावर त्याने खाटेवर चढून तो रुपया घेतला होता.

तोपर्यंत आम्ही रुपयाच्या नाण्याला कधी स्पर्शदेखील केलेला नव्हता. तो रुपया पाहून माझ्या मनात आनंद आणि भीतीच्या लहरी उठल्या. त्या अजूनही आठवतात. आमच्यासाठी रुपयाचं नाणं ही अतिशय अलभ्य अशी गोष्ट होती. मौलवी साहेबांना आमच्याकडून फक्त 12 आणे मिळत असत. महिन्याच्या शेवटी काका स्वतः जाऊन ते पैसे त्यांना देऊन येत असत. आमच्यावर त्यांचा इतकाही विश्वास नव्हता. पण आज आम्ही एक रुपयाचे राजे होतो. आमच्या गर्वाचा अंदाज कुणाला येणार होता! पण मार बसण्याची भीती त्या आनंदावर विरजण टाकीत होती. घरात खूप रुपये होते असंही नव्हतं. त्यामुळे आम्ही केलेली चोरी उघडकीस येणार होती. काकांच्या रागाचा मला नसला तरी हलधरला प्रत्यक्ष अनुभव होता. खरं म्हणजे त्यांच्याइतका साधा माणूस जगात नव्हता. काकूने त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली होती, नाहीतर कुणाही व्यापाऱ्यानं त्यांना बाजारात विकलं असतं. त्यांना राग येई तेव्हा त्यांना काहीच सुचत नसे. इतकंच नाही तर काकूदेखील त्यांच्या रागाला सामोरं जायला घाबरत असे. आम्ही दोघांनी या गोष्टीवर विचार केला आणि मग असं ठरवलं की, हातात आलेली लक्ष्मी हातातून जाता कामा नये. एक तर आमच्यावर संशय येणारच नाही, आणि आलाच तर आम्ही साफ नकार देऊ, सांगू की, आम्ही रुपया घेऊन काय करणार; आमची झडती घ्या. जर आम्ही यावर अजून विचार केला असता तर आमचा विचार बदललादेखील असता. आणि आमच्या हातून जी चूक झाली ती झाली नसती. पण त्या क्षणी आम्ही शांतपणे विचार करण्याच्या मनःस्थितीतच नव्हतो.

तोंड, हात-पाय धुऊन आम्ही दोघं घरी आलो आणि घाबरत घाबरत घरात पाऊल ठेवलं. या वेळीच आमची झडती घेण्याची वेळ आली असती तर देवच आमचं रक्षण करू शकणार होता. पण घरातील सगळे जण आपापल्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कुणी आमच्याशी बोललंदेखील नाही. आम्ही नाश्तादेखील केला नाही. तोंडात टाकायला काही घेतलं नाही. पुस्तकं काखेत मारली आणि मदरशाला जाण्यासाठी बाहेर पडलो.

पावसाचे दिवस होते. आकाशात ढग होते. आम्ही दोघं आनंदानं चाललो होतो. आज जर आम्हाला कुणी मंत्रिपद बहाल केलं असतं तरी आम्हाला इतका आनंद झाला नसता. आम्ही हजारो मनसुबे केले होते, हवेत किल्ले बांधले होते. पण ही संधी भाग्यानेच मिळाली होती. आयुष्यात ती पुन्हा मिळेल की नाही याबद्दल मनात शंका होती. म्हणून आम्ही रुपया असा खर्च करू इच्छित होतो की, तो खूप दिवस चालला पाहिजे. जरी त्या काळात पाच आणे शेर चांगली मिठाई मिळत होती आणि कदाचित अर्ध्या शेर मिठाईत आम्ही दोघंही तृप्त झालो असतो, पण असा विचार केला की, आपण मिठाई तर खाऊ, पण रुपया आजच संपून जाईल. म्हणून एखादा स्वस्त पदार्थ खाल्ला पाहिजे. ज्यात मजा येईल, पोट भरेल आणि पैसेदेखील कमी खर्च होतील. शेवटी आमची नजर पेरूवर गेली. आम्ही दोघंही यासाठी तयार झालो. दोन पैशाचे पेरू घेतले. स्वस्ताई होती त्यामुळे मोठे मोठे 12 पेरू आले. आम्हा दोघांच्या शर्टाची झोळी भरली. हलधरने पेरू विकणाऱ्याच्या हातात रुपया ठेवला तेव्हा त्याला शंका आली. त्याने विचारलं, "रुपया कुठे मिळाला? चोरला तर नाहीत ना?"

आमचं उत्तर तयारच होतं. जास्त नाही तरी आम्ही दोन-तीन पुस्तकं वाचलेली होतीच. ज्ञानाचा काही ना काही उपयोग होतोच. मी झटकन उत्तर दिलं, "मौलवी साहेबांची फी द्यायची आहे. घरात पैसे नव्हते. तेव्हा काकांनी रुपया काढून दिला."

या उत्तरानं फळविक्रेत्याचं समाधान झालं. आम्ही दोघांनी पुलावर बसून खूप पेरू खाल्ले. पण आता साडे पंधरा आणे कुठे घेऊन जाणार ! एक रुपयाचं नाणं लपवणं अवघड नव्हतं, पण हा पैशाचा ढीग कुठे लपवणार? खोलीत इतकी जागा नव्हती आणि ते खिशातही ठेवता येत नव्हते. ते पैसे आपल्याकडे ठेवणं म्हणजे चोरीचा ढिंडोरा पिटण्यासारखंच होतं. आम्ही खूप विचार केल्यानंतर असा निश्चय केला की, बारा आणे मौलवी साहेबांना देऊन टाकावे, आणि उरलेल्या साडे तीन आण्यांची मिठाई खावी. असा निर्णय घेऊन आम्ही वर्गात पोहोचलो. आज आम्ही कितीतरी दिवसांनंतर मदरशात गेलो होतो. मौलवी साहेबांनी रागावून विचारलं, "इतके दिवस कुठे होतात?"

मी म्हटलं, “घरी मयत झालं होतं."

हे सांगता सांगता मी बारा आणे त्यांच्यासमोर ठेवले. मग काय विचारता. पैसे बघताच मौलवी साहेबांची कळी खुलली. महिना संपायला अजून बरेच दिवस होते. साधारण महिना संपून गेल्यानंतर आणि वारंवार मागितल्यानंतरच पैसे मिळत असत. त्यामुळे इतक्या लवकर पैसे मिळाल्यामुळे त्यांचं खूश होणं अस्वाभाविक नव्हतं. आम्ही इतर मुलांकडे गर्वानं पाहिलं. जणू आम्ही त्यांना म्हणतोय, 'तुम्ही मागितल्यानंतरदेखील पैसे देत नाहीत, पण एक आम्हीच असे आहोत की पैसे आगाऊ देतो.'

आम्ही शिकायला सुरुवात केलीच होती इतक्यात लक्षात आलं की, आज तलावाच्या बाजूला जत्रा आहे. दुपारी सुट्टी दिली जाईल. मौलवी साहेब जत्रेत कोंबडे झुंजवायला जातील. ही गोष्ट लक्षात येताच आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बारा आणे तर आम्ही जमा केले होते. साडे तीन आण्यांत जत्रा बघायची असं आम्ही ठरवलं. खूप मजा येणार होती. मजेत रेवड्या खाऊ, पाणीपुरी खाऊ, झोक्यावर बसू आणि संध्याकाळी घरी जाऊ. पण मौलवी साहेबांनी कडक अट घातली होती की, सगळ्यांनी सुट्टीपूर्वी आपण काय काय अभ्यास केला ते सांगायचं होतं. जो सांगू शकणार नाही त्याला सुट्टी मिळणार नाही. त्याचा परिणाम असा झाला की, मला तर सुट्टी मिळाली, पण हलधरला सुट्टी मिळाली नाही. अजून काही जणांनी केलेला अभ्यास वाचून दाखवला. ते सगळे जत्रा पाहण्यासाठी निघून गेले. मीदेखील त्यांच्या बरोबर गेलो. पैसे माझ्याजवळ होते. त्यामुळे मी हलधरची वाट पाहिली नाही. असं ठरलं की, सुट्टी होताच हलधर जत्रेत येईल. आणि मग आम्ही दोघं बरोबरच जत्रा पाहू. मी वचन दिलं होतं की, जोपर्यंत तो येणार नाही तोपर्यंत मी एक पैसादेखील खर्च करणार नाही. पण दुर्भाग्य काही वेगळीच लीला रचत असतं. मी जत्रेत पोहोचून एक तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. पण हलधरचा अजून पत्ताच नव्हता... मौलवी साहेबांनी त्याला अजून सुट्टी दिली नाही की तो रस्ता विसरलाय ? मी डोळे फाडून फाडून रस्त्याकडे पाहत होतो. एकट्याने जत्रा पाहण्यात माझं मन लागत नव्हतं. मनात हीदेखील शंका येत होती की, आमची चोरी उघड तर झालेली नाही ना, आणि काका हलधरला पकडून घरी तर घेऊन गेलेले नाहीत ना? शेवटी संध्याकाळ झाली तेव्हा मी काही रेवड्या खाल्या आणि हलधरच्या वाट्याचे पैसे खिशात ठेवून हळूहळू घराच्या दिशेनं निघालो. रस्त्यात विचार आला की शाळेकडून जावं. कदाचित अजून हलधर तिथेच असेल. पण तिथे शांतता होती. हो, पण एक मुलगा तिथे खेळताना भेटला. मला बघताच तो मोठ्यानं हसत म्हणाला, "बेटा, तू घरी जा... बघ कसा मार पडतो ते. तुझे काका आले होते. हलधरला मारत मारत घेऊन गेले. त्याला असा फटका मारला की, हलधर तोंडावर पडला. इथून ओढत घेऊन गेले. तू मौलवी साहेबांची फी दिली होती; तीदेखील त्यांनी काढून घेतली. आत्तापासूनच काहीतरी बहाणा शोधून ठेव, नाहीतर तुझं काही खरं नाही."

माझी तारांबळ उडाली. शरीरातील रक्त सुकलं. तेच झालं ज्याची मला शंका होती. पाय जड झाले. घराच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकणं अवघड झालं. देवीदेवतांची जितकी नावं मला माहिती होती त्या सगळ्यांना मी साकडं घातलं. कुणाला लाडू तर कुणाला पेढे अर्पण करीन, असं सांगितलं. मी गावाच्या जवळ पोहोचलो तेव्हा ग्रामदेवतेचं स्मरण केलं. कारण आपल्या कार्यात देवाची इच्छा सर्वप्रथम महत्त्वाची असते.

हे सगळं केलं पण जसा जसा मी घराच्या जवळ जात होतो, तशी तशी माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. ढग जमा होऊ लागले होते. वाटत होतं की, आभाळ फाटून बरसेल. लोक आपली कामं सोडून पळून चालले होते. गुरेदेखील शेपटी वर करून घराच्या दिशेनं निघाली होती. चिमण्या आपल्या घराच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण मी मात्र अतिशय सावकाश चाललो होतो, जणू माझ्या पायात शक्तीच शिल्लक उरलेली नव्हती. मला खूप ताप यावा किंवा काहीतरी जखम व्हावी असंच वाटत होतं. पण कुणी सांगितल्यानं धोबी गाढवावर चढत नाही. बोलावल्यानं मरण येत नाही, आणि आजारपणाबद्दल आपण काय बोलणार?... काहीच झालं नाही आणि चालता चालता मी घराच्या समोर येऊन उभा राहिलो. आता काय होणार? आमच्या घरासमोर चिंचेचं एक झाड होतं. मी त्याच्या आड लपलो. थोडा अंधार झाल्यावर गुपचूप घरात घुसावं आणि आईच्या खोलीत तिच्या खाटेखाली जाऊन लपावं, जेव्हा सगळे झोपतील तेव्हा आईला सगळी कथा सांगावी असं मी मनाशी ठरवलं होतं. आई मला कधीही मारत नसे. जरा तिच्यासमोर खोटं खोटं रडलो की ती पाघळेल. एकदा रात्र उलटली की मग कोण विचारतंय. सकाळपर्यंत सगळ्यांचा राग शांत होईल. जर माझ्या या इच्छा पूर्ण झाल्या असत्या, तर मी यातून सहीसलामत वाचलो असतो. पण हेच विधात्याला मंजूर नव्हतं. त्याच्या मनात काही वेगळंच होतं. एका मुलाने मला पाहिलं आणि तो माझं नाव घेत सरळ माझ्या घराकडे धावला. आता माझ्यासाठी कोणतीही आशा उरली नाही. मी लाचार होऊन घरी गेलो. माझ्या मुखातून एक चित्कार बाहेर पडला. मार खाल्लेला कुत्रा कुणाला आपल्याकडे येताना बघून केकाटतो, तसं माझं झालं. व्हरांड्यातच वडील बसलेले होते. वडिलांची तब्बेत या दिवसांत ठीक राहत नव्हती. ते सुट्टी घेऊन घरी आलेले होते. त्यांना कसला त्रास होता हे मी सांगू शकणार नाही, पण ते मुगाच्या डाळीचं वरण खाऊन राहत होते. आणि संध्याकाळी एका बाटलीतून काचेच्या ग्लासात काहीतरी ओतून ओतून पीत होते. कदाचित हे एखाद्या अनुभवी वैद्यानं सांगितलेलं औषध होतं. औषधं सगळीच कडू असतात. पण हे औषध तितकं वाईट नव्हतं बहुतेक, कारण वडील का कुणास ठाऊक, मजा घेत घेत ते पीत होते. मी जे औषध घेतो ते डोळे बंद करून एकाच घोटात पिऊन टाकतो. पण या औषधाचा परिणाम कदाचित हळूहळू पिण्यानेच होत असावा. वडिलांकडे गावातील चार-पाच लोक आणि चार-पाच रुग्णदेखील येत असत. ते तासन् तास हे औषध पीत असत. ते क्वचितच जेवणासाठी उठत असत. या वेळीदेखील ते औषधच पीत होते. आत्तासुद्धा त्यांच्या भोवती अनेक जणांचा गराडा पडलेला होता. मला बघतच वडिलांनी डोळे लाल करून विचारलं, "आत्तापर्यंत कुठे होतास?"

मी दबलेल्या आवाजात म्हटलं, "कुठेच नाही."
"आता चोऱ्या करायला शिकला आहेस? बोल, तू रुपया चोरला की नाही?"
माझं तोंड मी गप्पच ठेवलं. समोर नंगी तलवार नाचत होती. त्यामुळे तोंडातून शब्द बाहेर काढण्याची मला हिंमत होत नव्हती.
वडील रागावून म्हणाले, "तू बोलत का नाहीस ? तू रुपया चोरलास की नाही?"
मी प्राणावर उदार होऊन म्हटलं, "मी कधी..."

माझ्या तोंडातून शब्द बाहेरच पडत होते इतक्यात वडिलांनी विक्राळ रूप धारण केलं. ते दात खात उठले, हात उचलून माझ्या दिशेनं येऊ लागले. मी जोरात ओरडून रडू लागलो. असा रडू लागलो की वडील घाबरले. त्यांचा उचललेला हात तसाच वर राहिला. त्यांना वाटलं असावं की, जर याची आत्ता ही अवस्था आहे, मग फटका मारल्यावर तर हा प्राणच सोडेल. मी बघितलं की, माझी ही युक्ती कामी आली. मग मी अजूनच गळा काढून रडू लागलो. इतक्यात त्या जमलेल्या माणसांपैकी एकाने त्यांना अडवलं आणि मला पळून जा अशी खूण केली. लहान मुलं अशा प्रसंगी अजूनच गोंधळ घालतात आणि व्यर्थ मार खातात. मी जरा बुद्धी वापरली.

पण आतील दृश्य यापेक्षाही भयानक होतं. ते पाहून माझं तर रक्त गोठलं. हलधरचे दोन्ही हात एका खांबाला बांधले होते आणि तो रडत होता. काकू हलधरला रागावत होती. आणि माझी आई बसून मसाला वाटत होती. सगळ्यात आधी काकूने मला पाहिलं. ती म्हणाली, "घ्या तोदेखील आला. का रे, रुपया तू चोरलास की याने?"

मी निःशंक होऊन म्हटलं, "हलधरने."
आई म्हणाली, "जर त्याने चोरला, तर तू घरी येऊन हे का सांगितलं नाहीस?"

आता खोटं बोलल्याशिवाय भागणार नव्हतं. मला तर वाटतं की, जेव्हा माणसाच्या जिवाला धोका असतो, तेव्हा खोटं बोलणं क्षम्य असतं. हलधरला मार खायची सवय होती. दोन-चार फटके त्याला अजून बसले असते तरी त्याचं काही बिघडलं नसतं. पण माझं तसं नव्हतं. दोन-चार फटक्यांत माझं काम तमाम झालं असतं. आणि हलधरनेदेखील स्वतःला वाचवण्यासाठी मला त्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला होताच. नाहीतर काकूने मला का विचारलं असतं? या कारणानं माझं खोटं बोलणं योग्य होतं. म्हणून मी म्हणालो, "हलधर म्हणाला होता की कुणाला सांगितलंस तर तुला मारून टाकीन."

आई म्हणाली, "मी काय म्हणाले होते? तेच बरोबर निघालं. मी तर म्हणाले होते की, माझ्या मुलाला अशी सवय नाही. तो पैशाला हातदेखील लावणार नाही. पण सगळे मलाच दोष देऊ लागले."
हलधर : मी तुला कधी म्हणालो की, हे जर सांगितलंस तर तुला मारीन म्हणून ?
मी : त्या तलावाच्या काठी तू म्हणाला नाहीस ?
हलधर : अम्मा, तो खोटं सांगतोय.
काकू : खोटं नाही, तो खरंच सांगतोय. खोटारडा तूच आहेस आणि सगळं जग खऱ्याने वागणारं आहे. तुझा बाप नोकरी करतो, बाहेरून रुपये आणतो. चार जण त्याला भला माणूस समजतात, म्हणून तू खरा ठरत नाहीस. आता तूच खोटारडा आहेस. ज्याच्या भाग्यात मिठाई होती ती त्याने खाल्ली. तुझ्या नशिबात तर लाथ खाणंच लिहिलं होतं.

असं म्हणून काकूने हलधरला सोडवलं आणि ती त्याला आत घेऊन गेली. माझ्याविषयी चांगलं बोलून आईनं बाजी पलटवली होती. आईजवळ बसून मी निर्दोष असल्याचा राग आलापला. माझी निर्मळ मनाची आई मला सत्याचा अवतार समजत होती. सगळा अपराध हलधरचा आहे, हे तिला पटलं होतं.

थोड्या वेळाने मी गूळ आणि चणे घेऊन बाहेर पडलो. हलधरदेखील काहीतरी खात बाहेर निघाला. आम्ही दोघं बरोबरच बाहेर पडलो. आणि आपल्यावर कोणता प्रसंग आला ते एकमेकांना सांगू लागलो. माझी हकिगत सुखद होती, तर हलधरची दुःखद होती. शेवट मात्र दोघांचा एकच होता, चणे आणि गूळ खाणे.

अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ

ही कथा 'माधुरी' या हिंदी मासिकात सप्टेंबर 1925 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाली.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मुन्शी प्रेमचंद ( 8 लेख )

मुन्शी प्रेमचंद (जन्म : वाराणसी, 31 जुलै 1880-8 ऑक्टोबर 1936) हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. 1913 ते इ.स. 1931 पर्यंत एकूण 224 कथा, 100 लेख आणि 18 कादंबऱ्या लिहिल्या.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी