डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंधश्रद्धेचा वादग्रस्त कार्यक्रम आणि उद्रेक (पूर्वार्ध)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिन थिटे यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ यातील फरक पहिल्यांदा स्पष्ट केला. ‘‘चमत्कार होत नसतात, चमत्कारासारख्या नैसर्गिक घटनांमागे शास्त्रीय व मानसशास्त्रीय कारण असते आणि ते शोधले की सापडते, असे ‘अंनिस’ ठामपणे मानते.’’ सचिन आपले मत मांडत होते. शासनाने पारित केलेला ‘जादूटोणाविरोधी कायदा’ डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या 18 वर्षांच्या प्रयत्नाला मिळालेले यश आहे, असेही त्यांनी नमूद केले. लोकांमध्ये ‘अंनिस’बद्दल असलेले गैरसमजही दूर केले. वसईमध्ये वादग्रस्त ठरलेले व्हिक्टर मर्ती यांच्या ‘आशीर्वाद’ केंद्राचाही त्यांनी या प्रसंगी उल्लेख केला. या केंद्राविरोधात अंनिसने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिथे येशूची शिकवण देण्यास आणि त्याची भक्ती करण्यास ‘अंनिस’चा विरोध नसून, ‘मी एड्‌स, किडनीसारखे दुर्धर आजार बरे करतो’ असे थोतांड पसरवून भाबड्या जनतेस मानसिक गुलाम बनवून फसवणारे मर्ती यांच्या वृत्तीस विरोध आहे; असे ते म्हणाले

विवेकमंचाचा तिसरा वर्धापनदिन जवळ येत होता आणि त्यानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. नेमक्या त्याच वेळेस महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला होता. तेव्हा ‘धर्म आणि अंधश्रद्धा’ या विषयाशी संबंधित विविध पैलूंवर प्रकाश टाकू शकतील अशा वक्त्यांना या कार्यक्रमात एकत्र बोलवून त्यांचा परिसंवाद घेण्याचे ठरविले गेले.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी किंवा त्याअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येतात, ह्याविषयी बोलण्यासाठी विवेकमंचाचेच मेंबर ॲडव्होकेट व्हिन्सेंट फर्नांडिस ह्यांना पाचारण करण्याचे ठरले. त्याचबरोबर ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, मुंबईचे सचिव सचिन थिटे हेसुद्धा विवेकमंचाशी संलग्न होते. चमत्काराच्या नावाखाली विविध लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्याचे कार्य ते करत होते. परिसरातीलच ‘व्हिक्टर मर्ती’ या ख्रिस्ती भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्याचे काम त्यांनी केले होते आणि त्या अनुषंगाने ते दोन-तीन वेळेला विवेकमंचातही आले होते. त्यामुळे त्यांनाही या कार्यक्रमास निमंत्रित करून त्यांचेही अनुभव ऐकण्याचे ठरले. तिसरे वक्ते म्हणजे फादर डेनिसजी. फादर डेनिसजी ह्यांना विवेकमंचाच्या या अभिनव प्रयोगाविषयी ॲड.अनुप यांच्याकडून कळले होते व त्यांनी त्यात रस दाखवला होता. मंचाच्या अशा सभेत येण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. योगायोगाने त्यांनी ‘ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा’ ह्यावर एक पुस्तक लिहिले होते. त्यामुळे त्यांनाही आम्ही वक्ते म्हणून निमंत्रण पाठवले.

चौथे वक्ते आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणा ख्रिस्ती धर्मगुरूंनाच बोलवायचे ठरले. अर्थात विवेकी व चिकित्सात्मक बोलू शकतील असे फादर वसईत जवळजवळ नव्हतेच. खरे तर आम्हाला फादर हॅरोल्ड फर्नांडिस ह्यांना बोलवायचे होते. पण ते काही कामानिमित्ताने बाहेरगावी होते. त्यामुळे फादर जोशवा डिमेलो ह्यांना परत एकदा आमंत्रित करण्याचे ठरले.

मंचाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला त्यांना वक्ता म्हणून बोलावले होते. फादर असूनही हे रसायन काही वेगळेच आहे, हे आम्हाला तेव्हा दोन वर्षांपूर्वीच जाणवले होते. जेव्हा जेव्हा फादर जोशवांचा उल्लेख मंचात व्हायचा, तेव्हा तेव्हा ‘असे उघडपणे विवेकी बोलणारे व वागणारे धर्मगुरू जास्त झाले, तर किती चांगले होईल’ असा आशादायी सूर चर्चेतून निघायचा. धर्मव्यवस्थे- विषयी अतिशय बिनधास्त, रोखठोक बोलणाऱ्या या फादरांना तिसऱ्या वर्धापनदिनीही बोलवायचे ठरले.

सर्व वक्ते फायनल झाल्यानंतर मग समाज विकास मंडळाची जी कार्यकारणी सभा होते, तिच्यापुढे हा कार्यक्रम मंजूर करण्यासाठी विषय मांडला गेला. एरवी मंडळात नवी कार्यकारिणी आलेली होती. अध्यक्ष म्हणून संजय रॉड्रिग्ज- जे अगोदर लायब्ररीचे प्रमुख होते- त्यांची वर्णी लागली होती. सरचिटणीस म्हणून ‘खित’ हा कादोडी अंक व कुपारी अड्डापासून एकत्र काम करत असलेल्या माझा मित्र निकोलस रिबेलो ह्याची नियुक्ती झाली होती. विवेकमंचाचे विभागीय प्रमुख म्हणून माझी, तर महिला विभागाची प्रमुख म्हणून विवेकमंचाचीच सुनीला हिची निवड झाली होती. मेडिकल फंडवर कॅथरिन, अशा विवेकमंचातील बऱ्याच सदस्यांची मंडळाच्या विविध उपक्रमांवर निवड झाली होती.

चार वक्ते तर त्या कार्यक्रमाचे होतेच. ह्याच कार्यक्रमामध्ये डिसोझासर यांनी टॉलस्टॉय लिखित, ‘द गॉस्पेल इन ब्रीफ’ या पुस्तकाचे जे मराठी भाषांतर केले होते त्या डिजिटल पुस्तकाचेही आम्ही प्रकाशन करण्याचे ठरविले होते. त्यामुळे सरचिटणीसांचे मत असे होते की, जास्त प्रोटोकॉल न पाळता लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करावा.

प्रास्ताविकही छोटेसेच करावे, जेणेकरून कार्यक्रम वेळेत आटोपेल. तरीही मंडळाच्या प्रोटोकॉलचा आदर करण्यासाठी आम्ही सरचिटणीसांना असे सांगितले की, ‘अध्यक्ष प्रास्ताविक करतील तसेच आभारप्रदर्शन सरचिटणीसांनी करावे.’ असे करून कार्यकारणीतील सदस्यांनाही आम्ही कार्यक्रमात सामील करून घेतले. अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला. स्टेजवर मंडळाचे अध्यक्ष, परिसंवादात भाग घेणारे चार वक्ते तसेच डिसोझा सर असे सहा जण बसतील, हे अध्यक्षाबरोबर अगोदर चर्चा करून ठरले होते.

कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर मंडळाच्या अध्यक्षांना अचानक जाणवले की, मंडळाचे प्रमुख विश्वस्त हेदेखील कार्यक्रमास उपस्थित आहेत; तेव्हा त्यांनी प्रमुख विश्वस्तांना स्टेजवर बसवण्यास मला सांगितले. स्टेजवर अगोदरच खुर्च्या मांडलेल्या होत्या. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सभागृहात पोहोचले होते. निवेदन करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे गडबडीत मी प्रमुख चार वक्ते, डिसोझासर आणि अध्यक्षांच्या विनंतीनुसार प्रमुख विश्वस्त ह्यांना स्टेजवर बसण्यास निमंत्रित केले आणि अध्यक्ष स्टेजखाली समोरच खुर्चीवर बसले.

स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक मंडळाचे नवोदित अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज यांनी केले. त्यांच्याविषयी मला कौतुक वाटते, कारण सुरुवातीला ते विवेकमंचाच्या काहीसे विरोधात होते. आम्ही त्यांना मंचाच्या एक-दोन सभांना बोलावले, ते सभेत बसले आणि हळूहळू त्यांचा सूर पालटू लागला. त्यांना कळू लागले की, हे धर्माच्या विरोधात नाही आहेत, धर्म अधिक चांगला व्हावा म्हणून ते चर्चा करत आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन करत आहेत. विवेकमंचाप्रति त्यांची आपुलकी त्यांच्या भाषणातून दिसून आली.

ते म्हणाले, ‘‘आपण विवेकमंचासारखा पुरोगामी, काळाच्या पुढे असणारा उपक्रम येथे सुरू केला होता याचा समाज विकास मंडळाला 25 वर्षांनंतर खूप अभिमान वाटेल...’’ मला ते ऐकून खूपच छान वाटेल. अध्यक्षांनंतर जे प्रमुख वक्ते होते, त्यांनी एकेक करून बोलायला सुरुवात केली. परिसंवादाची सुरुवात, ॲडव्होकेट व्हिन्सेंट फर्नांडिस यांनी जादूटोणाविरोधी  कायद्यासंबंधी माहिती देऊन केली. यात त्यांनी या कायद्याचे स्वरूप विशद केले, तसेच कायद्यापासून वाचण्यासाठी विविध भोंदूबाबा कायद्याचा कसा गैरफायदा उठवतात, हेही सांगितले. अठरापगड रूढीपरंपरा असणाऱ्या विविध धर्मांना सामावू शकेल असा सर्वसमावेशक कायदा पारित करण्याचे शासनाचे धोरण स्तुत्य असले, तरी तो कायदा फारच मिळमिळीत झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर दुसरे वक्ते बोलण्यास उभे राहिले फादर डेनिसजी. त्यांनी ‘धर्मातील चमत्कार हा कळीचा मुद्दा असून विश्व निर्माण करणारी शक्ती म्हणजेच परमेश्वर’ असे मत व्यक्त केले. बायबलमध्ये नमूद केलेले चमत्कार या सर्व निसर्गनियमाने घडलेल्या घटना असून त्या विशिष्ट समयी घडल्याने त्यांना चमत्कार समजले गेले, तसेच चमत्कार हे शब्दशः न घेता त्याकडे प्रतीकात्मक दृष्टीने पाहावे, असेही ते पुढे म्हणाले. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिन थिटे यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘श्रद्धा’ आणि ‘अंधश्रद्धा’ यातील फरक पहिल्यांदा उपस्थितांपुढे स्पष्ट केला. ‘‘चमत्कार होत नसतात, चमत्कारासारख्या नैसर्गिक घटनांमागे शास्त्रीय व मानसशास्त्रीय कारण असते आणि ते शोधले की सापडते, असे ‘अंनिस’ ठामपणे मानते.’’ तरुण असलेले सचिन आपले मत मांडत होते.

शासनाने पारित केलेला ‘जादूटोणाविरोधी कायदा’ डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या 18 वर्षांच्या प्रयत्नाला मिळालेले यश आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी ‘अंनिस’ची कार्यपद्धती सांगितली व सामान्य लोकांमध्ये ‘अंनिस’बद्दल असलेले गैरसमजही दूर केले. वसईमध्ये वादग्रस्त ठरलेले व्हिक्टर मर्ती यांच्या ‘आशीर्वाद’ केंद्राचाही त्यांनी या प्रसंगी उल्लेख केला. या केंद्राविरोधात अंनिसने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तिथे येशूची शिकवण देण्यास आणि त्याची भक्ती करण्यास ‘अंनिस’चा विरोध नसून, ‘मी एड्‌स, किडनीसारखे दुर्धर आजार बरे करतो’ असे थोतांड पसरवून भाबड्या जनतेस मानसिक गुलाम बनवून फसवणारे मर्ती यांच्या वृत्तीस विरोध आहे; असे बोलून ते पुढे बहुतांशी ख्रिस्ती श्रोते असलेल्यांना धीटपणे संबोधून म्हणाले की, व्हिक्टर मर्ती यांनी आम्ही घेऊन येणाऱ्या एड्‌स किंवा तत्सम आजारांनी त्रस्त रुग्णांना बरे करून दाखवावे, असे आवाहन ‘अंनिस’ने त्यांना केले आहे.

मर्तींना महाराष्ट्र सरकारने तूर्तास केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी अंधश्रद्धा परत न पसरवण्याची ताकीद दिलेली आहे. त्यांनी जर असे कृत्य केले, तर अंनिस पुन्हा कारवाई करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रम खूपच सुंदर चालला होता आणि रंगलेला होता. अंधश्रद्धा, चमत्कार व धर्म ह्याविषयी वक्ते जे विविध मुद्दे मांडत होते, ते उपस्थित श्रोते अगदी मन लावून ऐकत होते.

शेवटी फादर जोशवा डिमेलो- कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष- हे बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण सुरू केले, ‘‘आज बायबल पुढच्या पिढीला कळेल अशा भाषेत पुनर्लिखित करण्याची गरज आहे. विज्ञान प्रगत होत आहे. जगाच्या, विश्वाच्या निर्मितीबाबत नवनवीन संशोधन होत आहे. त्यामुळे बायबलमधील चमत्कारापेक्षा नैतिकतेचे धडे जास्त ठळक करण्याची गरज आहे.’’ असे परखड विचार त्यांनी व्यक्त केले. त्या संदर्भात ‘कुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव’ या प्रसंगाचा त्यांनी उल्लेख केला, ‘‘मरियेचा गर्भसंभव हा पवित्र आत्म्यातर्फे झाला’ असे जे बायबलमध्ये लिहिले आहे; हे जेव्हा पुढची पिढी वाचेल; तेव्हा तिला ते खरे वाटेल का? त्यांना हे पटणार नाही. ते नंतर विचारतील की, हे कसे शक्य आहे?..’’

त्यांनी असे बोलताच श्रोत्यांतून एक व्यक्ती उभी राहिली आणि त्यांचे भाषण मध्येच तोडत म्हणाली, ‘‘अहो, काय बोलताय फादर तुम्ही? काय चालवलं आहे हे?’’ त्यांच्याबरोबर आलेली दुसरी व्यक्तीही उठली आणि ‘‘तुम्ही फादरकीचे कपडे काढून बोला. तुम्ही फादरकी सोडून द्या.’’ असे म्हणू लागली.

त्या दोघांनी सभागृहात गोंधळ घातला. तोच शेवटच्या रांगेत बसलेले आमचे विवेकमंचाचे सदस्य मिंगेल डिमेलो हेही त्यांच्यात सामील झाले. ते उठून मोठ्याने रागारागात म्हणायला लागले की- ‘‘फादर तोंड बंद करा, नाही तर आम्हाला तुमच्या तोंडाला काळे फासावे लागेल! हे तुम्हाला शोभत नाही.’’ आता काय करायचे? काही सुचेना. ‘हे चाललंय तरी काय’ अशी उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे होते. शेवटी निवेदक म्हणून मी आणि सोनल आम्ही दोघांनी त्या तिघांना सभागृहाची शिस्त पाळण्याचे आवाहन केले. वक्त्याला जे मत मांडायचे आहे ते प्रथम मांडू द्यावे आणि शेवटी  प्रश्नोत्तराचा जो तास आहे, त्यात प्रश्न उपस्थित करून त्याचे निरसन करून घ्यावे, असे मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. या कार्यक्रमासाठी परिसरातून बरेच जुने-जाणते लोक आले होते. मग शेवटी त्यापैकी काही ज्येष्ठ लोकांनी जेव्हा त्यांना समजावले, तेव्हा ते काहीसे शांत झाले आणि फादरांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. फादरांनी भाषण सुरू केले तर खरे, परंतु सर्वांचे लक्ष फादरांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या वादग्रस्त विधानाकडेच खिळलेले होते, तिथेच सर्वांचे मन केंद्रित झाले होते. फादरांचे भाषण संपले आणि मग प्रश्नोत्तराचा तास सुरू केला गेला. सुरुवातीलाच ज्या व्यक्तीने प्रथम आवाज उठवला होता, ती व्यक्ती उभी राहिली.

पन्नाशीत असलेली, सावळा वर्ण व हेअर डायमुळे वयोमानाने काहीसे अनैसर्गिक वाटणारे असे काळेभोर केस व मिशी असलेली ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मला बोलायचे आहे.’’ जर प्रश्न विचारण्यास माईक हातामध्ये दिला तर खूपच चर्चा वाढू शकते, म्हणून आपापले प्रश्न कागदावर लिहून स्वयंसेवकाकडे द्यावेत, असे आम्ही ठरविले होते. नंतर मग ते प्रश्न वाचून फादर त्यांना उत्तर देणार होते. पण ते काही ह्यासाठी तयार दिसत नव्हते. त्यांना माईकचा ताबाच घ्यायचा होता. शेवटी आम्ही त्यांच्या हातात माईक दिला. मग ते म्हणू लागले, ‘‘मी कधी कार्यक्रमात विघ्न आणत नाही. मी कधी असा बोलत नाही. मी खूप शांत आहे. विवेक, विज्ञान वगैरे काय ते सगळं मान्य; पण कोणा श्रद्धावंताच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणालाच नाही...’’ ते माईक काही सोडण्यास तयार दिसत नव्हते.

तोच मिंगेल डिमेलो हेही मग स्टेजच्या पुढे आले व जोरजोरात ‘‘तुमच्यासारखे फादर आपल्या धर्मावरील कलंक आहेत. तुमची बिशपांकडे तक्रार केली पाहिजे. तुमच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्ही जो फादरांचा अंगरखा घातला आहे, तो पहिल्यांदा काढा आणि मग अशी वक्तव्ये करा’’ असे ओरडू लागले. पुन्हा गोंधळ सुरू झाला होता. सभागृहात 150 लोक हजर होते. ह्यापैकी किती जणांना फादरांचे विचार स्फोटक जाणवले होते ते काही कळण्यास मार्ग नव्हता; पण हे तिघे सोडले, तर इतर कोणीच जाहीरपणे भर सभेमध्ये विरोध केला नाही. शेवटी काही लोकांनी त्यांना आवाहन केले की, तुम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे तो विचारा; उगाच मोठ्याने आवाज करू नका.. परंतु त्या तिघांपैकी कोणाकडे काहीच प्रश्न नव्हता, ते गोंधळलेले होते. त्यांच्या परंपरागत विचारांना धक्का बसलेला होता. फादरांनी असे वक्तव्य करावे, हे त्यांच्या पचनी पडले नव्हते. एव्हाना संध्याकाळचे 7.15 वाजले होते. कार्यक्रम खूपच लांबला होता. जो कार्यक्रम चारला सुरू झाला होता, तो तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालला होता. कार्यक्रम आटोपता घेणे भाग होते आणि चिघळलेला वाद पाहता, तर ते आवश्यकच होते. त्यामुळे आम्ही सारवा-सारव करून उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.

होय, कार्यक्रम वादग्रस्त झाला होता. समाज विकास मंडळात विवेकमंचाच्या विरोधात असलेले बरेच सदस्य होते. तेही या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्याकडे एक आयतीच संधी या कार्यक्रमामुळे चालून आली होती. एका मोठ्या वादळाला तोंड फुटले होते, ज्याला आम्हाला लवकरच सामोरे जायचे होते. फादर जोशवांनी जे वक्तव्य केले होते, ते खूपच स्फोटक ठरले होते.

Tags: daniel mascarenhas vivek Manch manch डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस मंच विवेक मंच weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात