डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अंधश्रद्धेचा वादग्रस्त कार्यक्रम आणि उद्रेक (उत्तरार्ध)

एकदा मरियेच्या सणाच्या वेळेला धर्मगुरूंनी प्रवचनात रागारागात एक विधान केले होते की, ‘चर्चमधील माउलीची तुम्ही चिंता करू नका; पण तुमच्या घरात ज्या माउल्या आहेत- तुमच्या माता, तुमच्या बहिणी, तुमची पत्नी- त्यांची काळजी तुम्ही घ्या. तेव्हा कुठे या मरियामातेचा खरा सन्मान होईल. फक्त इथे देवळात येऊन तुम्ही फुले वाहता आणि तिथे घरी बायको-मुलींना नोकराप्रमाणे वागवता, हा शुद्ध ढोंगीपणा आहे.’ नेहमी शांत आवाजात बोलणाऱ्या त्या धर्मगुरूंच्या आवाजातील आवेश जाणवून मी फादरांना विचारले की, ‘असे विधान तुम्ही सडेतोडपणे का केलेत? सणाच्या दिवशी तुम्ही शालजोडीतलेही देऊ शकला असता.’ तेव्हा फादरांनी सांगितले होते, ‘अशी छान-छान प्रवचने दिली, असे मंत्रमुग्ध करणारे बोलले; तर ती प्रवचने लोकांना आवडतात. उलट वादग्रस्त विधान केल्याने मात्र घरी गेल्यावर, गावागावात त्यावर चर्चा होतात आणि आपला खरा उद्देश सफल होतो.’ त्यांचे ते उत्तर मला पटले होते.

तो कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्याच रविवारी इस्लामपूरहून अंनिसचे काही कार्यकर्ते ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ या पथनाट्याचा प्रयोग निर्मळ येथे सादर करणार होते. हा कार्यक्रम बाहेर भर नाक्यावर घेण्याचे अगोदरच ठरले होते. त्याप्रमाणे रविवारी या पथनाट्याचे सादरीकरण निर्मळ येथील नाक्यालगतच असलेल्या मंडळाच्या एक जुन्या सदस्याच्या विस्तीर्ण अंगणात झाले. अंनिसच्या युवा कलाकारांनी खूपच जोशपूर्ण आवेशात सॉक्रेटिस, तुकाराम, दाभोलकर, पानसरे यांच्या अविवेकी हत्यांबद्दल या पथनाट्याद्वारे भाष्य केले. या पथनाट्यास बरीच गर्दी जमलेली होती.

गंमत म्हणजे, फादर जोशवांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणारी ती व्यक्तीही मंचाच्या या कार्यक्रमास हजर होती. फादरांचे म्हणणे त्याला प्रथम पचवणे जड गेले असेल, पण कदाचित नंतर त्याला ते पटले असावे का? त्या व्यक्तीची उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यानंतर 10 दिवसांतच मंडळाच्या कार्यकारिणीची सभा होती. हा विषय कार्यकारिणीत नक्कीच चर्चिला जाणार, हे माहीत होते.

मी सभेस आलो. सुनीला, कॅथरिन, ॲड.व्हिन्सेंट, पीटर... जे-जे मंचाचे सदस्य कार्यकारिणीमध्ये होते ते ही या सभेस हजर राहिले होते. डिसोझासरही विश्वस्त समितीचे सदस्य म्हणून उपस्थित    होते. सभेस इतर कार्यकारिणीतील व विश्वस्त मंडळातील जवळपास सर्व जण हजर होते. सभेची सुरुवात शांततेत झाली. अर्थात, ती शांतता वादळापूर्वीची होती. मंडळाचे एक विश्वस्त मॅथ्यू क्रॅस्टो हे पुढे बसलेले होते. सुरुवातीपासून विवेकमंचाला त्यांचा विरोध होता. त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. ‘‘फादर जोशवांचा जो कार्यक्रम झाला, तो सपशेल फेल गेला. एक तर त्यामध्ये प्रोटोकॉल पाळला गेला नाही. आपल्या मंडळाचे काही रीती-रीवाज आहेत. अध्यक्ष आणि प्रमुख विश्वस्त हे स्टेजवर बसले पाहिजेत. सरचिटणीसांना आपण किती मान द्यायचो, या कार्यक्रमात त्यांना कवडीचीही किंमत देण्यात आली नाही. हे जर असेच सुरू राहिले तर आपल्याला हे मंडळ बंद करण्याची वेळ येईल, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे, फादर जोशवांचे भाषण. काय भाषण केले त्यांनी ते! किती धर्मविरोधी बोलले. काय गरज होती त्यांना तसे बोलण्याची? हे जे काही विवेकमंचात चाललेले आहे ते मला बिलकुल पसंत नाही. समाजामध्ये आपल्या मंडळाविषयी चर्चा होत आहेत. आपल्या मंडळाबद्दल अशी कुजबुज कधीच झाली नाही. आपले मंडळ नेहमी लोकांसाठी अभिमानाचा विषय असायचे; आज या विवेकमंचामुळे मंडळाला समाजामध्ये मान खाली घालायला लागली आहे. आजकालचे धर्मगुरू हे मंडळाबद्दल चांगले बोलत नाहीत. जर मंडळातील एखाद्या कार्यक्रमाची चर्चमध्ये सूचना वाचण्यास पाठवली, तर ती धड वाचली जात नाहीत...’’

क्रॅस्टो यांचा खर्जातला आवाज जोरजोरात कानांवर आदळत होता. ‘‘याचा काही तरी निर्णय घ्यावा लागेल. माझे म्हणणे आहे की, विवेकमंच सहा महिने त्वरित बंद करून टाका. मी तर म्हणेन की, कायमचाच बंद करून टाका. आपली पतपेढी आहे, ह्यामुळे पतपेढीवर परीणाम होऊ शकतो. आपले जे गुंतवणूकदार आहेत, ते आपल्या समाजातीलच आहेत आणि त्यांना हे असे धर्मविरोधी कृत्य आपल्या मंडळात चालते हे पटण्यासारखे नाही. ते कसे आपल्या मंडळात गुंतवणूक करतील? मला वाटते की, आपण या सर्वाचा सारासार विचार करून विवेकमंचावर तत्काळ बंदी घालावी.’’

त्या वेळी अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज यांनी मॅथ्यू क्रॅस्टो यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले, ‘‘सर्वांत आधी म्हणजे- कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला गेला नाही, हे तुमचे म्हणणे मला पटते. दुसरी बाजू तुम्ही मांडलीत, विवेकमंचाची. आपण हे लक्षात घेतले पाहिजे, त्या कार्यक्रमात जे वक्तव्य केले गेले ते त्या वक्त्याचे होते, ते विवेकमंचातील कोणी केले नव्हते. त्यात त्यांचा काही दोष नाहीये. आणखी एक मुद्दा तुम्ही जो मांडलात, तो म्हणजे चर्चमध्ये आपल्या कार्यक्रमाच्या सूचना वाचल्या जात नाहीत त्याबद्दल. आत्तापर्यंत चर्चमध्ये नोटिशी वाचल्या जात नव्हत्या का? पण त्याने आपल्या मंडळाला काही फायदा झाला का? गर्दी वाढली का? तर, नाही. जे दर्दी लोक यायचे तेच कार्यक्रमासाठी येतात. आणखी एक गोष्ट म्हणजे- आपल्या पतपेढीत जे लोक गुंतवणूक करतात, ती आपल्या पतपेढीचे कार्य बघून. मंडळात धर्मविरोधी कोण बोलते, धर्माच्या बाजूने कोण बोलते हे बघून ते त्यांचे पैसे आपल्याकडे ठेवत नाहीत; तर आपली पतपेढी त्यांना चांगला परतावा देते म्हणून ते पैसे ठेवतात. त्यामुळे याचा पतपेढीवर काहीही फरक पडेल, असे मला वाटत नाही.’’

अध्यक्ष संजय रॉड्रिग्ज ह्यांचे विशेष कौतुक वाटले. अगोदर काहीसे विवेकमंचाच्या विरोधात असलेले अध्यक्ष संजय ह्यांना हळूहळू विवेकमंचचे वेगळेपण लक्षात येऊ लागले होते. मंचाच्या विविध चर्चांतही ते सहभागी झालेले होते. अध्यक्षांनी विवेकमंचाची बाजू खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्यक्रमामध्ये विवेकमंचाच्या विरोधी बोलणारे खूप लोक होते. त्यानंतर बोलण्यास उभे राहिले ते दालमेत मास्तर. ‘‘विवेकमंचाला माझा विरोध नाही, पण हे जे काही चालले आहे ते बरोबर नाही. हे 10-15 लोक कुठे तरी कोपऱ्यात बसतात आणि आपापसात चर्चा करतात. त्यातून काय निष्पन्न होणार आहे? तोंडाची वाफ वायफळ बडबड करून दवडू नका. बाहेर जाऊन काही तरी कार्य करा.’’

‘‘हे जे काही चालले आहे, ते खूप चुकीचे आहे. मला खूप दिवसांपासून बोलायचे होते, परंतु मी फक्त संधीची वाट पाहत होतो.’’ मंडळाचे आणखी एक चाळिशीतले कार्यकर्ते फ्रँक कुटिन्हो बोलण्यास उभे राहिले होते, ‘‘त्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे एकदम कडेलोट झाला. हे खरोखरच धर्माच्या विरोधात बोलत असतात. ह्यांना बाकीच्या धर्मांत काही त्रुटी दिसत नाहीत का? हिंदू धर्मात काय अंधश्रद्धा कमी आहेत का? ते जे ‘अंनिस’चे सचिन थिटे आले होते, ते हिंदू धर्मातील अंधश्रद्धांबद्दल बोलू  शकले असते, पण नाही बोलले. त्यांना आपल्या ख्रिश्चन धर्मात नाक खुपसण्याचा काय अधिकार? हे आम्ही सहन करणार नाही. हे खूपच अति आणि खूपच चुकीचे चालले आहे. हे कोण जोशवा फादर? ह्यांना शोभे का हे? आपल्या पैशाने हे फादर झाले आहेत. मरियामातेविषयी काय बरळले ते? स्वर्ग-नरक वगैरे सगळे थोतांड आहे? असे हे कसे म्हणू शकतात? फादर दिब्रिटो नाहीत का विद्वान? ते कधी असे बोललेले नाहीत. असे चर्चच्या विरोधी बोलणे या धर्मगुरूंना शोभते का? ही खूपच हलकटगिरी चाललेली आहे आणि हे सर्व बंद झाले पाहिजे.’’

फ्रँक खूपच तावातावात बोलत होते. आमची सभा मंडळातील लायब्ररीच्या बाजूला जे कार्यालय आहे तिथे चालली होती. रविवार सकाळची वेळ असल्याने विवेकमंचात सहभागी होण्यासाठी नेहमीचे इतर सदस्य लायब्ररीत आले होते. जे कार्यकारिणीत नव्हते, ते नेहमीप्रमाणे मंचातील चर्चेसाठी जमले होते. त्या चर्चेसाठी ॲड.अनुप हेही आले होते. त्यांना हा जोरजोरात चाललेला आवाज ऐकू जात होता. त्यांना राहवले नाही. ते सभेत आले. दाराशीच उभे राहून त्यांनी शेवटच्या रांगेत बसलेल्या फ्रँक कुटिन्हो ह्यांना मागून हात लावून म्हटले, ‘‘तुम्ही फादर दिब्रिटोंचा उल्लेख केलात, पण फादर दिब्रिटोंनी ‘जे सुबोध बायबल’ लिहिलेले आहे, ते तुम्ही कधी वाचले आहे का?’’

‘‘त्याचा आणि माझ्या बोलण्याचा काय संबंध?’’ ॲड.अनुप यांच्याकडे मागे वळून पाहत फ्रँक म्हणाले.

‘‘संबंध आहे.’’

‘‘ही आमची कार्यकारिणीची सभा आहे, मंचाची नाही.’’

‘‘एक मिनिट- तुम्ही जे बोलताय, त्याच्याशीच हे संबंधित आहे.’’ ॲड.अनुपचाही पारा चढलेला दिसत होता, ‘‘फादर दिब्रिटोंनी त्यांच्या ललित भाषांतर केलेल्या बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की- स्वर्ग, नरक तसेच बायबलमधील सर्व चमत्कार हे प्रतीकात्मक आहेत. आता हे तुम्ही जर वाचलेलं असतं, तर फादर जोशवांचे म्हणणे तुम्हाला पचवण्यास इतके कठीण पडले नसते.’’ असे बोलत ॲड.अनुप लायब्ररीत जाण्यासाठी माघारी फिरले.

‘‘कोणी काय लिहिलंय ते आम्हाला सवड मिळाल्यावर आम्ही वाचू. आम्हाला सल्ले देऊ नका.’’ फ्रँक ह्यांना असे मधेच कोणी येऊन ऐकवणे आवडले नव्हते. त्यांचा आवाज खूपच वाढला होता, इतरत्र गोंधळ चालला होता.

अर्थात मी विवेकमंचाचा विभागप्रमुख होतो. त्या नात्याने मंचाची बाजू मांडणे मला भाग होते, किंबहुना, ती माझी नैतिक जबाबदारी होती. ‘‘मला बोलायचे आहे. विवेकमंचाचा विभागप्रमुख म्हणून माझे बोलणे ऐकून घ्याल का?’’ मी हात वर केला. अध्यक्षांनी परवानगी दिल्यावर मी माझे बोलणे सुरू केले. ‘‘आजच्या कार्यकारिणी सभेमध्ये विवेकमंचावर बरेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मी माझ्या परीने प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिला आरोप झाला तो म्हणजे- प्रोटोकॉल पाळला गेला नाही. मला इथे सांगावेसे वाटते की, सरचिटणीसांनी स्वतः सांगितले होते की, आपण काहीच प्रोटोकॉल पाळायचा नाहीये. भरगच्च कार्यक्रम असल्याने, चार वक्ते असल्याकारणाने आपण तत्काळ वक्त्यांच्या भाषणाला सुरुवात करून वेळ वाचवू या. पण मीच त्यांना सांगितले की नाही, काही अंशी तरी प्रोटोकॉल पाळला गेलाच पाहिजे. म्हणून मी प्रास्ताविकासाठी अध्यक्षांना विनंती केली आणि सरचिटणीसांना आभार मानायला सांगितले. आता स्टेजवर ते का बसले नव्हते? तर, अध्यक्षच स्टेजवर बसणार होते, ते अगोदरच ठरलेले होते. वक्ते पकडून आपल्याला सहा खुर्च्या लागणार होत्या, आम्ही तशी व्यवस्थाही केली होती. आपले स्टेज लहान आहे. ऐनवेळेवर अध्यक्षांनीच प्रमुख विश्वस्तांना स्टेजवर बसण्यास सांगितले. ‘माझे नाही तरी भाषण आहेच, तर मी स्टेजसमोरील खुर्चीवर खाली बसेन,’ असे त्यांनी सांगितल्याने आपण तसा निर्णय घेतला. तरीही कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’’

‘‘दुसरा आरोप म्हणजे- दालमेत मास्तरांनी सांगितले की, कोपऱ्यात बसतात आणि चर्चा करत असतात. मान्य आहे की, इथे 15-16 जणच येतात; पण इथे गर्दी नाही, तर दर्दी लोक येतात. ह्यामधील काही कवी आहेत, तर काही लेखक; काही राजकारणामध्ये आहेत, काही संशोधक. विद्यार्थ्यांपासून ते रिटायर झालेले, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, पुरुषांपासून ते स्त्रियांपर्यंत, मुले, सर्व वयोगटांतील अशा लोकांचे प्रतिनिधित्व या 15-16 जणांमध्ये इथे आहे, हे तुम्ही पाहिले आहे का? आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगिवीशी  वाटते की, ज्या माणसाने फादर जोशवा यांच्या कार्यक्रमात प्रथम व्यत्यय आणला होता तो, आपण जो लागलीच नंतरच्या रविवारी पथनाट्याचा कार्यक्रम केला होता, त्यासाठी आला होता. कदाचित त्याला फादर जोशवांचे बोलणे पहिल्यांदाच ऐकले तेव्हा ते पटले नसेल, पण नंतर मात्र त्याच्या ते पचनी पडले की नाही ते माहिती नाही; पण तो आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाला आला, त्याला येथे काही तरी वेगळेपण जाणवले. विवेकमंचाचे हे खरे यश आहे.’’

‘‘आता फादर जोशवांना काही आपण पहिल्यांदाच बोलावले नव्हते, ह्याआधीही ते मंडळात आले होते आणि तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळेला काही त्यांनी असे वादग्रस्त विधान केले नव्हते. खूपच सुंदर कार्यक्रम झाला होता. त्यांचे वक्तव्य आपल्याला जरी वादग्रस्त वाटले, तरी त्यांच्यासारख्या धर्मपंडितांच्या सर्कलमध्ये अशा चर्चा होत असतात, फक्त आपणा सामान्य लोकांसमोर त्यांनी प्रथम असे शेअर केले, म्हणून आपल्याला धक्का बसला. ते फादर आहेत, त्यांचे ज्ञान खूप मोठे आहे.’’

मला जे काही सांगायचे होते, ते सर्व मुद्दे मी मांडले. त्यानंतर विवेकमंचाच्या सुनीलाने तर रोखठोक आपले मत मांडताना म्हटले, ‘‘आज सभेत जी आपण चर्चा करत आहोत- सगळ्यांचा आक्षेप असा आहे की फादर जोशवांनी ते वक्तव्य करायला नको होते. पण मला वाटते, त्यात काय चुकीचे आहे? आपण असे मानतो की, मरिया पवित्र आत्म्यांनी गर्भवती राहीली. आज जर कुठली 15- 16 वर्षांची कुमारिका तुमच्याकडे आली आणि तुम्हाला सांगू लागली की, मी पवित्र आत्म्यांनी गर्भवती राहिले आहे, तर तुम्ही ते मानाल का? तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? नाही ना? म्हणजे हा तुमचा दांभिकपणा नाही का? त्यामुळे मला असे वाटते की, फादरांनी जे सांगितले आहे ते अगदी योग्य सांगितले आहे. आपण उगाच त्यावर नाराजी व्यक्त करत आहोत.’’

‘‘अहो मॅडम, तुमचा विवेक आणि शहाणपणा दोन्ही कळला. आता जरा चूप राहा.’’ असे म्हणून तिलाही विरोध केला गेला. खरे तर ‘मातृत्व’ या विषयावर स्वतः दोन मुलांची आई असलेल्या सुनीलाने बोलणे अधिक प्रभावी होते, पण पुरुषांची गर्दी असलेल्या सभेत सगळ्या गोष्टींचा कडेलोट झालेला होता.  

मग ॲड.व्हिन्सेंट फर्नांडिस बोलू लागले, ‘‘मी या विवेकमंचाच्या सभेस येत आहे. धर्माविषयीच नाही, तर वेगवेगळ्या विषयांवर हे सर्व जण चर्चा करत असतात आणि जेव्हा धर्माविषयी चर्चा होते, तेव्हा ती दोन्ही बाजूने करावी लागते. धर्माविषयी काही चांगले मुद्दे चर्चिले जातात, तर काही वाईट मुद्देही. अशा वेळी सर्व मुद्दे मला पटतातच असे नाही, पण म्हणून मी काही या सभेस येणे थांबवलेले नाही. मला ही चर्चा ऐकणे आवडते. त्यामुळे विवेकमंच बंद करणे हा काही तोडगा असू शकत नाही, कारण वैचारिक स्वातंत्र्य हा माणसाचा मूलभूत हक्क आहे, असे आपले भारतीय संविधान सांगते. मला त्यात काही वावगं वाटत नाही आणि त्यामुळे मंच बंद करण्याचे मी समर्थन करत नाही.’’ पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेल्या ॲड.व्हिन्सेंट यांनी मंचाची बाजू आपल्या वजनदार आवाजात पेलून धरली होती.

दहा वर्षांपूर्वी आमच्या चर्चमध्ये जॉनी गोन्साल्विस हे एक धर्मगुरू होते. एकदा मरियेच्या सणाच्या वेळेला त्यांनी प्रवचनात रागारागात एक विधान केले होते की, ‘चर्चमधील माउलीची तुम्ही चिंता करू नका; पण तुमच्या घरात ज्या माऊल्या आहेत- तुमच्या माता, तुमच्या बहिणी, तुमची पत्नी- त्यांची काळजी तुम्ही घ्या. तेव्हा कुठे या मरियामातेचा खरा सन्मान होईल. फक्त इथे देवळात येऊन तुम्ही फुले वाहता आणि तिथे घरी बायको-मुलींना नोकराप्रमाणे वागवता, हा शुद्ध ढोंगीपणा आहे.’’ नेहमी शांत आवाजात बोलणाऱ्या त्या धर्मगुरूंच्या आवाजातील आवेश जाणवून मी फादरांना विचारले की, ‘असे विधान तुम्ही सडेतोडपणे का केलेत? सणाच्या दिवशी तुम्ही शालजोडीतलेही देऊ शकला असता.’ तेव्हा फादरांनी सांगितले होते, ‘अशी छान-छान प्रवचने दिली, असे मंत्रमुग्ध करणारे बोलले; तर ती प्रवचने लोकांना आवडतात पण त्याचा काही फायदा होत नसतो. उलट वादग्रस्त विधान केल्याने मात्र घरी गेल्यावर, गावागावात त्यावर चर्चा होतात आणि आपला खरा उद्देश सफल होतो.’ त्यांचे ते उत्तर मला पटले होते.

इथेही फादर जोशवांनी मरियेच्या गर्भसंभवाविषयी जे वक्तव्य केले होते, ते कितीही वादग्रस्त वाटले, तरी त्यांनी उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले होते. मातृत्व आणि कुमारीपण या दोन्ही फक्त ‘शारीरिक स्थिती’शी संलग्न असलेल्या बाबीच मरियेला देवत्वपण बहाल करतात का? बाळ येशूला मुक्तपणे बहरू देणारं असं संगोपन करणारं तिचं वात्सल्य, त्याच्या प्रत्येक बंडखोर कृत्याला पाठिंबा देऊन त्याच्यावर अमर्याद विश्वास दाखवणारा तिच्यातील आत्मविश्वास, सारा समाज मुलाविरुद्ध जाऊनही क्रूस वाहताना त्याला कालवारी टेकडीपर्यंत साथ देणारा तिच्यातील कणखरपणा आणि शेवटी आपल्या मुलाचं मृत शरीर सन्मानाने पांढऱ्या फडक्यात गुंडाळून धीरोदात्तपणाचं तिने घडवलेलं दर्शन... या ‘आत्मिक’ बाबी मरीयेला देवत्व बहाल करण्यास पुरेशा नसाव्यात का? धर्मसत्तेचं वागणं खुद्द येशूच्या विचारसरणीशी किती विरोधाभासाचं आहे!... मनात विविध प्रश्न उभे राहिले.

तसं पाहिलं तर एका महत्त्वाच्या विषयावर येथील लोकांत चर्चा सुरू करण्यात हा अंधश्रद्धाविषयीचा कार्यक्रम यशस्वीच ठरला, असे म्हणावे लागेल. सभा बरीच लांबली होती. एक तासात जी सभा संपायची होती ती दोन तास चालली होती आणि विषय फक्त विवेकमंच अन्‌ विवेकमंच. मात्र एका अर्थाने बरे झाले. बऱ्याच लोकांच्या मनात विवेकमंचाच्या विरोधात एक भावना खदखदत होती आणि त्यांना ती कुठे तरी ओकायची होती. आज फादर जोशवांच्या निमित्ताने जे काही आत होते, ते सगळे बाहेर आले होते. मंडळाची ही सभा खूपच वादग्रस्त ठरली. मंचाची बाजू मंचातील आमच्यासारख्या नव्या सदस्यांनीच समर्थपणे पेलून धरली होती. एरवी मंचात कधी वादविवाद सुरू झाला की, सर परिस्थितीचा ताबा घ्यायचे व चर्चा नियंत्रित करायचे. आज कार्यकारिणीच्या सभेत मात्र ते शांत बसून होते. त्यांनी एक चकारही शब्द काढला नाही. किंबहुना- मी, सुनीला, ॲड.व्हिन्सेंटच आज सरांची भूमिका निभावत होतो. कदाचित आम्ही आता त्यांच्या भूमिकेत यावं, हेच सरांना अपेक्षित असावं. विवेकाच्या वतीने बोलणारे लोक वाढले पाहिजेत. हा कदाचित त्यांचा हेतू असावा.

मॅथ्यू क्रॅस्टोसारख्या मंडळाच्या स्थापनेमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ विश्वस्ताने मंचावर आसूड ओढले होते. त्यामुळे मंचाच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. ‘‘जर मंडळाने आपल्याला येथे बसण्यास परवानगी दिली नाही, तर मग आपण माझ्या घरी रविवारी भेटू.’’ सर शक्यता बोलून दाखवत होते. ‘पुढे काय?’चे प्रश्नचिन्ह  घेऊन आम्ही सभा संपल्यावर मंडळाबाहेर उभे होतो. ‘‘माझंही घर आपल्या मंचासाठी खुलं आहे.’’ कॅथरिनही पुढे आली. ‘‘वेगळी चूल मांडावी लागली तरी हरकत नाही, पण आपण आता आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. माझ्याही घरी सर्वांचं स्वागत आहे.’’ सुनीला म्हणाली.

त्या दिवशी संध्याकाळी बायकोला मी हे कार्यकारिणीच्या सभेविषयी सांगत होतो, ‘‘त्यामुळे मंच आता मंडळात राहू देतात की नाही, ही शंकाच आहे.’’

‘‘चर्चा करण्यासाठी मंडळचं हवं, असं थोडीच आहे? आपलंही घर आहे म्हटलं!’’ ती चटकन म्हणाली, ‘‘नाही तरी मला घरकामामुळे मंडळात येणं शक्य होत नाही, तेव्हा तुम्हा सर्वांच्या चर्चा इथे ऐकायला मला आवडेल.’’

मंचात जरी ती प्रत्यक्ष हजर राहत नसली, तरी तिथे चालणाऱ्या चर्चेविषयी मी तिला वारंवार माहिती देत असायचो. दोन-तीनदा तीही या सभेस हजर होती. त्यामुळे तीही मंचाच्या विचारांशी एव्हाना एकरूप झाली होती. पण तिचे मंचाला जागा देण्याचे चटकन म्हणणे मला सुखावून गेले. जे होईल ते होईल, असा विचार करत आम्ही पुढच्या कार्यकारिणी सभेची वाट पाहत राहिलो.

दोन आठवड्यांनंतर लगेचच कार्यकारिणीची अजून एक सभा जाहीर झाली. सभेची सुरुवात परत मॅथ्यू क्रॅस्टो यांनी केली. ‘‘मागच्या मीटिंगमध्ये मी सांगितल्याप्रमाणे फादर जोशवांना पाठवण्यासाठी मंडळातर्फे निषेधपत्र तयार केले आहे का? त्यांना ते पत्र लवकरात लवकर पाठवावे. ते विधान त्यांनी करायला नको होते, हे त्यांना मंडळाच्या अधिकृत लेटरहेडवरून कळवा आणि विवेकमंचाच्या सभा इथे मंडळात होऊ देऊ नका.’’

‘‘आपण तसे करणे उचित ठरत नाही, कारण त्यांना आमंत्रण आपण दिले होते आणि काय वक्तव्य करायचे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे हे काही मला पटत नाही. तसेच मत मांडणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपला मंचही बंद करावं, ह्याशी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी सहमत नाही.’’ संजय रॉड्रिग्ज यांनी विश्वस्त मंडळाकडून आपल्याला ह्याची काय किंमत चुकवावी लागेल याचा विचार न करता आश्चर्यकारकरीत्या मंचाची बाजू समर्थपणे घेत म्हटले.

अध्यक्ष आपल्या बाजूला नाहीये आणि कार्यकारिणीतील मंचाचेच काही कार्यकर्ते पाहता, ‘मंच बंद करा’ या त्यांच्या मागणीला बहुसंख्येने पाठिंबा मिळणार नाही, हे कळताच ‘‘हे इथे काय चालले आहे? विवेकमंचाच्या सभा इथे होऊ देऊ नका. खूपच गढूळ वातावरण आहे. वातावरण थोडे निवळू दे. आजूबाजूला खूपच कुजबुज चालू आहे, मंचाच्याविरोधात वातावरण आहे आणि ह्या वेळेस बिशप हाऊसपर्यंत तक्रार गेली आहे. त्यामुळे सहा महिने तरी हा वाद निवळेपर्यंत सभा घेऊ नका. आणखीन एक...’’ अशी काहीशी नरमाईची भूमिका घेत ते म्हणाले, ‘‘मला असे कळले आहे की मंडळाला उद्देशून लिहिलेले एक पत्र आले आहे. कोणी तरी बिशप हाऊसकडे या कार्यक्रमाविरोधात तक्रार केली होती. या संदर्भात ते पत्र आहे. कोणी मला ते पत्र वाचून दाखवेल का?’’ ते पत्र होते विवेकमंचाचे सदस्य मिंगेल डिमेलो यांनी लिहिलेले.

एखाद्या शाळेतील मुलाने, ‘टीचर, तो बघा- तो तिथे मस्ती करतोय, त्याला शिक्षा करा-’ अशी कोणाविरोधात लिखित तक्रार करावी तशाच धर्तीवरचे पत्र मिंगेल यांनी बिशपांना मंचाविरोधात लिहिले होते. सुरुवातीला जरी मंचामध्ये त्यांची फजिती झालेली असली, तरी ते मंचाच्या सभेस वारंवार येत होते आणि हळूहळू तेही मोकळेपणाने व्यक्त होऊ लागले होते. पण त्यांची कृती काही वेगळेच सांगत होती. पत्र वाचल्यानंतर एक ज्येष्ठ सदस्य सॅबी आल्मेडा- जे मागच्या मीटिंगला हजर नव्हते- त्यांनी विवेकमंच हा कसा धर्मविरोधी आहे, समाजविरोधी आहे, कसा मंडळाचे नाव कमी करणारा व नाक कापणारा आहे- असे परत तेच रामायण सुरू केले. क्रॅस्टो मग काही आठवल्यासारखे  परत जोरात म्हणू लागले, ‘‘कार्यकारिणीची जी आपण सभा घेतो, ती कार्यकारिणी सदस्यांची असते. अशा वेळेला विवेकमंचाचेच एक ज्येष्ठ सदस्य सभेचे कामकाज चोरून ऐकतात आणि सभेमध्ये येऊन कार्यकारिणी सदस्यांपैकी एकाचा शर्ट मागून पकडून त्यांना सुनावून सभेत व्यत्यय आणतात, हे कोणते विवेकपणाचे लक्षण आहे? तेव्हा तुमचा विवेकवाद कोठे असतो?’’

अर्थात ते वक्तव्य अनुप डिसोझा यांनी जे मागे फ्रँक कुटिन्हो यांना मागे हात लावून त्यांना फादर दिब्रिटोंसंबंधी पुस्तक वाचण्याविषयी सांगितले होते,  त्यासंबंधी होते. प्रोटोकॉल भंग केल्याचे निमित्त झाले आणि मग परत एकदा खूप जोरजोरात आवाज करून एकाच मुद्याभोवती ती चर्चा परत सुरू झाली. तोच एक तरुण सदस्य एडिसन ह्याने ‘‘जर आपल्याला असे वाटत असेल की- बाहेरच्या लोकांनी सभेत व्यत्यय आणू नये, तर आपण सभा दुसरीकडे हलवावी. आपण सभा वरच्या मजल्यावर पतपेढीच्या मीटिंगरूममध्येही घेऊ शकतो. आणि दरवाजा बंद करावा म्हणजे तो प्रश्न सुटेल.’’ असे सुचविले. काही असे प्रॅक्टिकल बोलणारे होते, तर काही उगीचच लांबवून धरणारेही होते. विषय विवेकमंचाशी निगडित असल्याकारणाने काहींना तो मुद्दा लांबवून धरायचा होता.

सॅबी रॉड्रिग्ज पुन्हा सुरू झाले, ‘‘हे नेहमी चर्च विरुद्ध बोलत असतात आणि यांच्याबद्दल मी खूप काही ऐकले आहे. माझ्या कानांवर काहीबाही पडत असते की- विवेकमंचात हे चालते, ते चालते आणि त्यातील काहीही चांगलं कानांवर येत नाहीये. मी असं ऐकलेलं की, कोणी तरी येथून पोपला टीका करणारं पत्र लिहिलं म्हणून. काय चाललंय काय येथे? आपल्या मंडळाची सगळीकडे बदनामी होत आहे.’’ परत एकदा विवेकमंचाची बाजू मांडणे गरजेचे होते. मी त्यांना उत्तर देत म्हटले, ‘‘परत परत सांगावं लागतंय. पण येथे चर्चविरोधात काहीही बोलले जात नाही. तुम्ही बोलताय की अमुकांकडून ऐकलं; तमुकांकडून ऐकलं. पण तुम्ही स्वतः कधी मंचामध्ये आलेले आहात का? कधी येऊन चर्चा ऐकली आहे का? आपण जे प्रोटोकॉल-प्रोटोकॉल बोलत आहोत की- हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही; माझी अध्यक्षसाहेबांना अशी विनंती आहे की, विवेकमंचामध्ये तीन सभांना हजेरी लावल्याशिवाय कोणीही विवेकमंचाबद्दल ऐकीव माहितीवर बोलू नये, असा प्रोटोकॉल कंपलसरी करावा.

आता सॅबी म्हणाले की, कोणी तरी टीका करणारे पत्र पोपला लिहिले आहे म्हणून. तुम्ही टीका करणारे पत्र असं म्हटलं, पण त्यात काय लिहिले होते हे तुम्ही वाचलेत का? ते मंचाच्या अनुप डिसोझा यांनी लिहिलेले अनावृत पत्र होते. कशासाठी? तर, धर्मभगिनींना चर्चमध्ये पुरुष धर्मगुरूंच्या बरोबरीने वागणूक मिळावी, यासाठी. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण दोन महिन्यांपूर्वीच पोप फ्रान्सिस यांनी चर्चमध्ये धर्मभगिनींनाही पुरुष धर्मगुरूंबरोबर धार्मिक विधी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ते चर्चमध्ये महिलांना फादरांच्या बरोबरीने सामावू इच्छित आहेत आणि हा बदल कुठे तरी अनुप डिसोझा यांच्या या अनावृत का असेना, छोट्याशा प्रयत्नांनी झालेला आहे, हे काही कमी नाही. त्यांनी एक टीकेचे पत्र लिहिले हे तुम्हाला कळाले, पण पोपनी हा जो निर्णय घेतला, त्यावर त्यांचे अभिनंदन करणारेही पत्र त्यांनी लिहिले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही. कृपया अपूर्ण माहितीवर अशी टीका करत जाऊ नका. मंचाच्या सभा येऊन अटेंड करा आणि मगच आपले मत मांडा.’’ मला विवेकमंचाची बाजू एक विभागप्रमुख म्हणून पुन्हा मांडावी लागली.

विवेकमंचासंबंधी मंडळात जणू दोन गट पडले होते. काही जणांनी तर हा वाद इतका वैयक्तिक घेतला की, हितसंबंध विनाकारण दुखावले गेले. कित्येक दिवस मंडळात हा तणाव राहिला. विवेकमंचामध्ये आहे म्हणून ‘विवेकाचे’ मोठे भिंग लावून मंचाच्या प्रत्येक हालचालीवर आता सगळे बारीक नजर ठेवू लागले आहेत. जरासं कुठे खट्टू झालं की, विवेकमंचाविरोधात शंख फुंकणे आणि जर मंडळात मंचाने काही चांगला सहभाग दाखवलाच, तर त्याला अनुल्लेखाने मारणे- असे प्रकार होत होते. खूपच कठीण असे ते दिवस होते. काही सदस्यांचा मात्र विरोध हळूहळू कमी होत होता. त्यांना जे काही विवेकमंचात चालले आहे, ते कळू लागले होते. परंतु अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा होता.

येशू ख्रिस्ताचे एक वक्तव्य आहे, ‘मी इथे शांती आणणार नाही, तर खड्‌ग आणणार आहे. पुरुषाला त्याच्या बापाविरुद्ध, मुलीला आईविरुद्ध...’ (मॅथ्यू 10:34-36). मला नेहमी प्रश्न पडायचा- येशू असं का बोलला असेल? प्रेमाचा पुरस्कार करणारा येशू अशी भांडणं लावून देण्याची भाषा का करत असेल? पण त्या वचनाचा मला बोध हळूहळू होऊ लागला. दुर्गाबाई भागवत म्हणतात, असे वक्तव्य करणारा येशू द्वेषभाव पसरवणारा नव्हता, तर विरोधाचे स्वरूप व संघर्ष ओळखणारा होता. परमोच्च सत्य स्वीकारताना स्वजनांशीही वाकडे पत्करावे लागते, हेच त्याला सांगायचे होते. किती खरे होते ते!

वाचा- अंधश्रद्धेचा वादग्रस्त कार्यक्रम आणि उद्रेक (पूर्वार्ध)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात