डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पेरूमध्ये सोने, तांबे, लोह, झिंक, रुपे यांच्या खाणी आहेत. याशिवाय तेलाच्या विहिरी आहेत. एवढी नैसर्गिक संपदा असूनही योग्य राजकीय नेतृत्व न लाभल्यामुळे आणि शिक्षण, आरोग्य, संसाधन क्षेत्र यात हवी तेवढी गुंतवणूक न केल्यामुळे हा देश आर्थिक दृष्ट्या मागासलेला राहिला आहे. लिमापासून विमानाने दीड तासाच्या अंतरावर कुझको हे शहर आहे. डोंगरमाथ्यावर सुमारे 10,000 फुटांवर वसलेले हे पुरातन शहर आहे. सहा शतकांपूर्वी स्थानिक इंका साम्राज्याची इथे राजधानी होती. कुझको, तिथून जवळच असलेली सॅक्रेड व्हॅली आणि माचु-पिचु हा सगळा पेरूचा अद्‌भुत प्रदेश आहे. भूत आणि अद्‌भुत, लौकिक आणि अलौकिक यांच्या संधिरेषेवरील हा अनोखा प्रदेश आहे. तो पाहताना आपण विस्मित होतो, अचंबित होतो, चकित होतो आणि गोंधळूनही जातो!

लहान मुलांना आणि पोपटांना आवडणारे गोड पेरू हे अस्सल भारतीय वाटणारे फळ विदेशी आहे आणि ते दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशातून भारतात आले, हे मला हल्ली-हल्लीपर्यंत ठावूक नव्हते. पेरू या शब्दाची उत्पत्ती ‘पिअर’ या शब्दापासून झाली आहे. कारण पेरू आणि पिअर या दोन्ही फळांची जात एकच आहे. पेरू या फळाची भरपूर लागवड होत असल्याने त्या देशाला पेरू हे नाव पडले, असा माझा समज- खरे म्हणजे अपसमज होता. पेरूला भेट दिल्यावर हे केवळ नामसाधर्म्य आहे, हे माझ्या लक्षात आले. ‘बिरू’ नावाच्या स्थानिक राजावरून पेरू देशाला पूर्वी ‘बिरू’ म्हणत असत. स्पॅनिश आक्रमणानंतर बिरूचा उच्चार पेरू असा होऊ लागला आणि पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरचा, विषुववृत्ताजवळचा हा देश पेरू या नावाने ओळखला जाऊ लागला.

पेरूची जमीन फारच सुपीक आहे. त्यामुळे तिथे पेरू, पिअर्स, चेरी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, सीताफळे, ॲवाकाडो, पपई, केळी, लिंबू अशी विविध फळे विपुल प्रमाणात पिकतात. त्याशिवाय ऊस, बटाटा, रताळी, कॉफी, सोयाबिन, मका, गहू, तांदूळ, कडधान्ये आणि कापूस ही पिके हा देश घेतो. समुद्राचे सान्निध्य असल्याने भरपूर मासे उपलब्ध होतात. त्यामुळे पेरूव्हियन लोकांच्या जेवणाचा आस्वाद घेणे, हा एक वेगळा अनुभव असतो.   लिमा ही पेरूची राजधानी. लिमा ही खवय्यांची मक्का, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. लिमाचे रहिवासी जगण्यासाठी खात नाहीत, तर खाण्यासाठी जगतात. लिमा शहराचे वर्णन 'City where life is often planned around next meal' असे करतात. लिमाच्या जेवणात स्थानिक पेरूव्हियन, आफ्रिकन, स्पॅनिश आणि एशियन खाद्यसंस्कृतीचा संगम झाल्याचे दिसून येते.

मानवी संस्कृती प्रगत झाली तसे त्यात जात आणि दर्जा यामुळे भेदाभेद आले. धर्मामुळे स्पृश्यास्पृश्यता आली. मंगळ-अमंगळाची भावना आली. आपल्या सुदैवाने मानवी संस्कृतीच्या कालक्रमणात खाद्यसंस्कृतीत कोणतीही स्पृश्यास्पृश्यता मानली नाही. मंगळ, अमंगळाची भावना बाजूला ठेवली. त्यामुळे खाद्यसंस्कृतीच्या मेल्टिंग पॉटमध्ये सर्व समाज आणि संस्कृतींचे विविध रस मिसळून गेले. विदेशी साबुदाणा हा भारतीय उपवासाचा अविभाज्य भाग बनला. मुसलमानी जिलेबी हिंदू विवाहात मानाचा पाट घेऊन बसली. दाक्षिणात्य इडली-सांबार वैश्विक झाले. भारतीय मसाले आणि पापड युरोप, अमेरिकेत लोकप्रिय झाले. खापरी चिकन काफ्रियाल गोव्याचे बनले. अरेबियन बिर्याणी उत्तर भारतीय बनली.

लिमा शहरात ‘मिस्तूर’ (शब्दशः अर्थ मिश्रण) या समर्पक नावाने स्ट्रीट फूड फेस्टिव्हल सप्टेंबर महिन्यात भरवला जातो. लिमाचे रस्ते शेकडो स्थानिक लोकांनी आणि पर्यटकांनी ओसंडून वाहतात. लिमाच्या वास्तव्यात इथल्या काही रेस्टॉरंट्‌सना आम्ही भेट दिली. इथले पिस्का सोअर नावाचे द्राक्षाच्या रसापासून केलेले कॉकटेल आम्हाला आवडले. ‘आरोस द कामारांव’ म्हणजे कोळंबीचा पुलावही फारच रुचकर होता. पण इथल्या लोकांना फारच आवडणारा ‘सेबिचे’ नावाचा पदार्थ आम्हाला आवडला नाही. मासे आंबवून केलेले हे सॅलड आम्हाला खाववले नाही.

लिमा शहर- किंबहुना पेरूची संस्कृती बहुवचनात विचार करते. उदाहरणार्थ- पिस्का सोअर कॉकटेलचा एकच ग्लास मागवला तर ते कुत्सितपणे हसतात. कारण तुम्ही लगेच दुसरा ग्लास मागवाल याची त्यांना खात्री असते. म्हणून त्यांच्या मते, पदार्थांची ऑर्डर बहुवचनात दिली पाहिजे. स्पेनमध्येही मी हा अनुभव घेतला आहे. तिथे पायेला हा बिर्याणीसारखा पदार्थ लोकप्रिय आहे. पण तेथील रेस्टॉरंट्‌स पायेलाच्या एका डिशची ऑर्डर घेतच नाहीत. त्यांना किमान दोन डिशेसची ऑर्डर द्यावी लागते.

पेरूची खाद्यसंस्कृतीच नव्हे, पेरूची संस्कृती आणि समाजही बहुवचनी आहे. पेरूमधल्या आठवड्याभराच्या वास्तव्यात मी रस्त्यावरून एकटाच फिरणारा माणूस किंवा स्त्री पाहिलेली नाही. माणसे नेहमी घोळक्यांनी फिरतात, थव्यांनी फिरतात. जणू ती शहरात किंवा गावात नसून प्राण्यांप्रमाणे वन्य संस्कृतीतच आहेत, असा त्यांचा समज असावा की काय, कोण जाणे!

पेरूचा प्रदेश अजून देश झालेला नाही. तो प्राचीन इतिहासाच्या साखरझोपेतून अजून जागा झालेला नाही. सर्पाप्रमाणे आपली जुनी कात टाकावी की नाही, या संभ्रमात तो आहे. जुने वस्त्र फेकून नवे वस्त्र नेसावे की नाही, हा पेरूचा निर्णय अजून झालेला नाही. तो संभ्रमित देश आहे, सीमारेषेवरील-संधिरेषेवरील देश आहे. पेरूची राजधानी असलेले लिमा शहर रिमोक नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. त्याच्या जवळच पॅसिफिक महासागर असला, तरी शहराची वस्ती समुद्रसपाटीपासून उंच डोंगराच्या कड्यावर वसली आहे. लिमाची लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या एक-तृतीयांश आहे. पेरूची लोकसंख्या तीन कोटी तीस लाख, तर लिमा शहराची एक कोटी दहा लाख आहे.

दि.6 जानेवारी या फेस्टिव्हल ऑफ किंग्जच्या दिवशी लिमा शहराची पायाभरणी झाली, म्हणून या शहराला ‘सिटी ऑफ किंग्ज’ असेही म्हणतात. 1746 मध्ये झालेला भयंकर भूकंप आणि 1880 वर्षी चिलीने केलेले आक्रमण यामुळे लिमा शहर दोन वेळा उद्‌ध्वस्त झाले होते, पण त्यातून ते सावरले आहे. एल निनोमुळे येणाऱ्या अवर्षणाचा लिमा शहराला आणि एकूण पेरू देशाला शाप आहे. लिमा शहरात युरोपप्रमाणे विस्तृत चौक आहेत. त्याच्या मधोमध कारंजी किंवा पुतळे आहेत आणि सभोवती सुरेख इमारती आहेत. त्यामुळे लिमा शहर युरोपमधल्या कुठल्याही शहराशी स्पर्धा करेल एवढे सुंदर आहे. लिमा शहराचे पुनरुज्जीवन करताना शहराच्या नगराध्यक्षांनी स्पेनमधल्या बार्सिलोना शहराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आणि त्या शहराची- विशेषतः या शहरातील विख्यात वास्तुशिल्पज्ञ अंतोनी गावडी यांनी केलेल्या शिल्पांची नक्कल करण्याचे ठरवले. त्यामुळे लिमा शहरात जागोजागी सुंदर शिल्पे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

लिमा शहरातील ला कॅथेड्रल दी लिमा आणि मॉनेस्ट्री  दी सॅन फ्रान्सिस्को या दोन्ही वास्तू पाहण्यासारख्या आहेत. त्याचे वास्तुशिल्प बोरोक पद्धतीचे आहे. मॉनेस्ट्रीत ऐसपैस अंगण आहे. या वास्तूवरचा मुरीश (मुसलमानी) प्रभाव तत्काळ लक्षात येतो. लिमा शहराच्या मधोमध हुका युल्लाना रुयन्स नावाची 1500 वर्षांपूर्वीची उत्खनन केलेली जागा आहे. इथे विटांनी बांधलेल्या भिंती आपल्याला दिसतात.  लिमा शहरातल्या केनडी पार्क या बागेला भेट दिलीच पाहिजे. या बागेत 60 वेगवेगळ्या जातीची मांजरे आहेत.  ही मांजरे या बागेत कुठून आली, हे कुणालाच माहीत नाही; पण दिवस-रात्र स्वच्छंद बागडणाऱ्या या 60 माजरांचे या बागेत वास्तव्य असते. लिमाच्या रहिवाशांना घोड्यांच्या रेसेस, बुलफाइट्‌स, कोकफाइट्‌स, पोलो हे खेळ आवडतात.

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेन्टिना या देशांप्रमाणे फुटबॉलही इथे लोकप्रिय आहे. पण पेरूचा संघ कधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचू शकला नाही. मिंगेल गुला याने 1960 मध्ये स्थापन केलेले शस्त्रास्त्रांचे आणि सुवर्णालंकारांचे म्युझियम हे लिमाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या म्युझियममध्ये 7000 दर्शनीय वस्तू आहेत. पेरूमध्ये सोने, तांबे, लोह, झिंक, रुपे यांच्या खाणी आहेत. याशिवाय तेलाच्या विहिरी आहेत. एवढी नैसर्गिक संपदा असूनही राजकीय अभावामुळे व शिक्षण, आरोग्य, संसाधन क्षेत्र यात हवी तेवढी गुंतवणूक न केल्यामुळे हा देश आर्थिक दृष्ट्या मागासलेला राहिला आहे.

लिमापासून विमानाने दीड तासाच्या अंतरावर कुझको हे शहर आहे. डोंगरमाथ्यावर सुमारे 10,000 फुटांवर वसलेले हे पुरातन शहर आहे. सहा शतकांपूर्वी स्थानिक इंका साम्राज्याची इथे राजधानी होती. कुझको, तिथून जवळच असलेली सॅक्रेड व्हॅली आणि माचु-पिचु हा सगळा पेरूचा अद्‌भुत प्रदेश आहे. भूत आणि अद्‌भुत, लौकिक आणि अलौकिक यांच्या संधिरेषेवरील हा अनोखा प्रदेश आहे. तो पाहताना आपण विस्मित होतो, अचंबित होतो, चकित होतो आणि गोंधळूनही जातो!

कुझको शहर हे तर ओपन म्युझियमच आहे. इंका साम्राज्याच्या पाऊलखुणा या शहराने जागोजागी सांभाळून ठेवल्या आहेत. इंका साम्राज्याचा बहर 1436 ते 1533 या कालावधीत होता आणि त्या कालखंडात इंका राजे सुमारे दीड कोटी लोकांवर राज्य करत असावेत, असा इतिहास संशोधकांचा दावा आहे. इंका संस्कृती सूर्याला देव मानत होती आणि राजाला सूर्याचा अवतार मानत होती. चंद्र ही सूर्याची पत्नी आणि आकाशाची आई आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. दक्षिण गोलार्धातल्या सर्वांत छोट्या दिवशी म्हणजे 21 जूनला त्याचे नवे वर्ष सुरू होत होते. कारण त्या दिवसापासून तिथले दिवस मोठे होणार याचे खगोलशास्त्रीय ज्ञान त्यांना होते. 1532 मध्ये स्पॅनिश सरदार फ्रान्सिस्को पिझेरो याने पेरूचा अन्य भाग पादाक्रांत करत कुझकांवर स्वारी केली. इंका राजे लढवय्ये होते, शूर होते; पण स्पॅनिश सैन्य घोड्यावर बसून आले होते. घोडे इंका सैनिकांना अपरिचित होते. विशेषतः जनावरांवर माणूस बसू शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यामुळे घोडदलावर बसून आलेल्या स्पॅनिश सैन्याने इंका सैनिकांचा सहज पराभव केला. कुझको शहराची लुटालूट केली. शहरांतले सोने आणि रुपे लुटले. इंका लोकांची प्रार्थनामंदिरे उद्‌ध्वस्त केली.

यथावकाश त्या वास्तूवर ख्रिश्चन चर्चेस बांधण्यात आल्या. स्थानिक लोकांवर ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याची बळजबरी करण्यात आली. ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही जे इंका लोक पूर्वीचेच सण, उत्सव साजरे करीत, चालीरीती पाळत- त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी इन्क्विझिशनची स्थापना केली. पण प्रत्येक संस्कृतीत काही ना काही चिवट रासायनिक मूलद्रव्ये असली पाहिजेत. आक्रमकांना ती मुळापासून नष्ट करता येत नाहीत. त्याचमुळे स्पॅनिश आक्रमकांना इंका संस्कृतीची निशाणी पूर्णपणे पुसून टाकता आली नाही. तीच पाहायला तर आम्ही कुझको, सॅक्रेड व्हॅली आणि माचु- पिचुच्या प्रदेशात आलो होतो. सर्व देशांत हेच घडलेले आहे. वैदिक सनातन धर्मीयांना लोकायतांचे आणि चार्वाकांचे जडवादी नास्तिक तत्त्वज्ञान पूर्णपणे नामशेष करता आले नाही. हिंदू धर्माला बौद्ध धर्म हिंदुस्तानातून हद्दपार करता आला नाही. मुसलमान आक्रमकांना युरोपमधल्या काही देशांप्रमाणे भारतवर्षाला मुस्लिम करता आले नाही. उलट, मुसलमान इथल्या मातीत मिसळून गेले. इथलेच झाले. पोर्तुगीजांना गोव्याची हिंदू संस्कृती नष्ट करता आली नाही. ब्रिटिशांना ऑस्ट्रेलियातील ॲबऑरिजिनल मावरी लोकांना संपवता आले नाही.

इतिहास म्हणजे जुन्या जखमांचे कातडीने सांभाळून ठेवलेले व्रण. ते पुसले गेले नाहीत. काळाच्या गोल घुमटाने जे त्यांच्या ललकाऱ्यांबरोबर जित्यांच्या किंकाळ्याही सांभाळून ठेवल्या, हे मानवी संस्कृतीचे सुदैवच म्हटले  पाहिजे. ‘प्लाझा दी आर्माज’ हा विस्तृत चौक कुझको शहराचा गुरुत्वमध्य आहे. त्याला ‘स्क्वेअर ऑफ वॉरियर्स’ असेही नाव आहे. याच चौकात स्पॅनिश सरदार फ्रान्सिस्को पिझेरो आणि इंका राजे यांचे युद्ध 1532 मध्ये झाले होते. या युद्धाला ‘बॅटल ऑफ काझमार्का’ असे म्हणतात. प्लाझा दी आर्माज चौकातच ला कॅथेड्रल आहे. हे कॅथेड्रल पुरातन इंका प्रार्थना मंदिरावर बांधले आहे, हे पदोपदी जाणवते. कॅथेड्रल थोडे उंचावर असल्यामुळे त्याच्या आवारातून कुझका शहराचे विहंगम दृश्य दिसते. कुझका शहर डोंगर उतारावर वसले आहे. येथील रस्ते चढावाचे, उताराचे आणि अरुंद आहेत. शहरात स्थानिक स्त्रिया रंगीत घोळदार स्कर्टवजा वेष घालून फळे, मोमेन्टोज विकत असतात. रंगीत बाहुल्या आणि लाकडी मुखवटे हे इथल्या सोव्हिनिरचे वैशिष्ट्य आहे. तिन्हीसांजेला कुझको शहरातील मंद दिवे पेटू लागतात. शहरातील पर्यटक आपापल्या हॉटेलांत आणि रहिवासी आपापल्या घरांत परततात.

शिशिराचे आगमन झालेले आहे. उत्तर रात्री बरीच थंडी आहे. आकाश काळोखे आहे, पण तारांकित आहे. नक्षत्रांकित आहे. आमचे हॉटेल प्लाझा दी आर्माजच्या जवळच होते. खोलीची खिडकी उघडून मी प्लाझा दी आर्माजकडे नजर टाकली. सगळीकडे निरव शांतता होती. नि:स्तब्धता होती. एक प्रकारची गूढता होती. त्या गूढतेत इंका संस्कृतीची किती तरी रहस्ये दडली असावीत. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही कुझको शहरातून सॅक्रेड व्हॅलीकडे निघालो. वाटेत आम्हाला एक मोकळे मैदान दिसले. या मैदानाच्या पश्चिम दिशेला दगडांची प्रचंड भिंत बांधलेली होती. पाच-सहा शतकांपूर्वी बांधलेल्या या दगडाच्या भिंतीत अर्थात सिमेंटचा उपयोग केलेला नव्हता. ही भिंत बांधताना इंटरलॉकिंग टाइल्सचे तत्त्व वापरण्यात आले होते. एक दगड अणुकुचीदार खिळ्याप्रमाणे तासून तो दुसऱ्या खोलगट तासलेल्या दगडात बसवला होता.

दि.21 जून हा इंका संस्कृतीतला उत्सवाचा दिवस होता. या दिवशी या मैदानात शेकडो इंका लोक जमत आणि नववर्षाचा उत्सव साजरा करत. सॅक्रेड व्हॅली ही युरुबाम्बा नदीकिनारी चोहीबाजूच्या डोंगरांच्या दरीत बहरलेली कृषिसंस्कृती आहे. तिला अजून नागरी स्पर्श झालेला नाही. त्यामुळे तिचे ग्रामीण कौमार्य- व्हर्जिनिटी अजून ताजी-टवटवीत आहे. या जमिनीत सारी फळे, भाज्या भरपूर पिकतात. वेगवेगळ्या प्रकारची अळंबी हे या भूमीचे वैशिष्ट्य आहे. आम्ही सॅक्रेड व्हॅलीत पोचलो, तो रविवारचा बाजाराचा दिवस होता. योगायोगाने त्या दिवशी अळंब्याचे फेस्त (जत्रा) होती. गोव्यात पिपऱ्याचे (काकड्यांचे) फेस्त, उंड्यांचे (पावांचे) फेस्त वगैरे खाद्य पदार्थांशी निगडित जत्रा असतात, तसाच हा प्रकार होता. तिथे स्थानिक लोकांनी अळंब्यांपासून केलेले अनेक प्रकार आम्हाला चाखायला मिळाले. त्याशिवाय मक्याचे ताजे कणीस उकडून त्याला मस्टर्ड सॉस लावून खाणे, हा खास अनुभव होता. सॅक्रेड व्हॅलीतील पोदेर (बेकर्स) खोर्नातून (भट्टीतून) एम्पनाडस नावाचा पॅटिससारखा पदार्थ करताना आम्हाला आढळले. हा पदार्थ फार रुचकर होता. त्यात मटणाचे स्टफिंग होते. त्याशिवाय इथे आम्ही खोर्नात बेक केलेल्या इटालियन पिझ्झाचा वाईनसमवेत आस्वाद घेतला.  

सॅक्रेड व्हॅलीत ल्हामा नावाचा उंटाच्या जातीतला पाळीव प्राणी आहे. त्याच्या केसांपासून स्थानिक लोक दोर व बॅगा करतात. त्याशिवाय इथे हातमागावर केलेली वस्त्रे, वॉल हँगिंग्ज, मुखवटे अशा अनेक गोष्टी आम्हाला दिसल्या. सॅक्रेड व्हॅलीच्या बाजारात आम्ही मनसोक्त खरेदी केली. बाजारात संगीत, नाचगाणी असा सगळा माहोल होता. एका आठवड्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या, त्यामुळे उमेदवारांनी हे सगळे आयोजित केले होते. सॅक्रेड व्हॅलीत आम्ही स्थानिक लोकांची टेरेस फार्मिंगची पद्धत पाहिली. पाण्याचे जतन करण्यासाठी या प्रकारची शेती सुयोग्य आहे, असे अनुभवाअंती इथल्या लोकांचे मत आहे. आक्रमकांनी धान्य लुटू नये, म्हणून इंका लोकांनी धान्य साठवण्यासाठी उंच डोंगरकपारीवर बांधलेली घरे आम्हाला दाखवण्यात आली. सॅक्रेड व्हॅलीच्या दक्षिणेला आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेली प्रचंड दगडी भिंत आम्ही पाहिली. भूकंपात ही भिंत कोसळू नये म्हणून ही भिंतही सलग न बांधता पायऱ्या पायऱ्यांनी टेरेसपद्धतीने बांधली होती. सॅक्रेड व्हॅलीतल्याच एका बुटिक हॉटेलमध्ये आम्ही रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही माचु पिचुकडे प्रयाण केले. माचु पिचुला जाण्यासाठी सॅक्रेड व्हॅलीपासून दीड तासांच्या अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर आम्ही आलो. तिथून दोन तासांच्या मिनी ट्रेनचा प्रवास होता. ही ट्रेन आलिशान होती. तिचे तिकीट महाग होते. पण प्रवासात नाश्ता, कॉफी देण्यात येत होती.

ट्रेनच्या प्रवासानंतर आम्ही माचु पिचु डोंगराच्या पायथ्याशी आलो. तिथून व्होल्वो बसने सुमारे पाऊण तासाचा प्रवास करून आम्ही माचु पिचुचा डोंगर अर्धाअधिक चढून गेलो. मग मात्र उरलेला डोंगर चालत चढण्याशिवाय तरणोपाय नव्हता. तो चढायला अर्धा-पाऊण तास लागला. माचु पिचु डोंगराच्या पठारावर आल्यावर आमच्या श्रमांचे सार्थक झाले. ते अद्‌भुत दृश्य होते. स्वप्नवत्‌ होते. अमेरिकन इतिहास संशोधक हिरम बिंगम यांनी हे स्थळ 1911 मध्ये शोधून काढले नसते, तर आपण या सौंदर्यस्थळाला मुकलो असतो. इंकाची लॉस्ट सिटी शोधण्याच्या नादात हिरम बिंगम इथे पोहोचला.

माचु पिचु पठारावर काय आहे? उद्‌ध्वस्त, उजाड शहराच्या भग्न वास्तू आहेत. या बहुतेक वास्तू दगडी आहेत. यातली मुख्य वास्तू आहे ती सूर्यदेवतेच्या देवळाची आणि दुसरी आहे तीन खिडक्यांची खोली. तीन खिडक्यांच्या खोलीला काही तरी खगोलशास्त्रीय संदर्भ असावा, असा संशोधकांचा कयास आहे. पठाराच्या पूर्वेला 12 एकरांच्या जमिनीत टेरेसपद्धतीने शेती केली जाई. माचु पिचुला 72 इंच पाऊस पडत होता, त्यामुळे पाण्याचा तुटवडा नव्हता. बटाटा, मका व कडधान्ये पिकवली जात. युरुबाम्बा नदीतून मासे आणले जात. जवळच्या डोंगरामधील झऱ्याच्या पाण्यातून पिण्याच्या पाण्याची सोय होई. पश्चिम दिशेला घरांची सोय होती. ही घरे अजूनही पठारावर आहेत. माचु पिचु शहरात सुमारे 250 लोक राहत असावेत. 1438 मध्ये इंका राजा पचाकुटी याने हे शहर वसवले असावे आणि 1438 ते 1532 या इंका साम्राज्याच्या बहराच्या काळात किमान 50 वर्षे इथे लोकांनी वास्तव्य केले असावे.

या शहराचा हेतू काय असावा? एक तर ते राजाचे उन्हाळी निवासस्थान असावे किंवा आध्यात्मिक स्थळ असावे किंवा औद्योगिक शहर असावे. संशोधकांना त्याचा नेमका अंदाज करता येत नाही. हे शहर इंका राजांनी का सोडून दिले, त्याचे कारणही अज्ञात आहे. स्पॅनिश आक्रमक इथपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांनी हे शहर उद्‌ध्वस्त केले नाही, हे निश्चित. एक तर देवीच्या साथीने येथील रहिवाशांना मरण आले असावे किंवा स्पॅनिश आक्रमणानंतर इंका राजांनी हे शहर सोडून अन्यत्र स्थलांतर केले असावे. काही का असेना, माचु-पिचु हे त्या काळाच्या संदर्भात अभियांत्रिकीचा चमत्कारच म्हटले पाहिजे. हे शहर बांधायला त्यांना किमान 100 वर्षे तरी लागली असावीत.

 दैवदुर्विलास असा की, इंका लोक तिथे 100 वर्षेही राहू शकले नाहीत! माचु पिचु म्हणजे म्हातारा डोंगर. त्याच्यासमोर एक डोंगर आहे. त्याचे नाव हयान पिचु. हयान पिचु म्हणजे तरुण डोंगर. पेरू हा म्हातारा देश आहे. तरुण बनायचे की नाही या संभ्रमात तो आहे. माचु पिचु बनून राहायचे की हयान पिचु बनायचे, याविषयी पेरूचा निर्णय अजून झालेला नाही!

Tags: प्रवासवर्णन सफरनामा माचु-पिचु सॅक्रेड व्हॅली दत्ता दामोदर नायक Travelogue macho-pichu sacred vally lima pear peru safarnama datta damodar nayak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके