Diwali_4 नुकत्याच संपलेल्या निवडणुका : एक वेगळा दृष्टिकोन
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

नुकत्याच संपलेल्या निवडणुका : एक वेगळा दृष्टिकोन

कडवा मुसलमानद्वेष आणि ‘इस्रायल फक्त ज्यूंचे’ हा विचार घेऊन इस्रायल उभे आहे. नानाजी पालकरांनी इस्रायलला भेट देऊन ‘छळापासून बळाकडे’ हे पुस्तक लिहिलंय- गुजरातच्या अमानुष दंगलीच्या नंतर जगातील साऱ्या देशांनी मोदींना परवाने नाकारले असताना, मोदी त्यावेळी अनेकदा फक्त इस्रायलला जाऊन आलेत. गुजरात ही आमची प्रयोगशाळा आहे म्हणून परिवारातील लोक अभिमानाने सांगत. भारतातील सर्वधर्मसमभाव धुळीला मिळवायचा असेल तर मोदींनी या देशाचे एकहाती नेतृत्व केले पाहिजे असे वाटून इस्रायलने त्याची कार्यवाही करणे अगदी स्वाभाविक होते. त्यावेळी व नंतरही जगात काही ठिकाणी जे म्हटले गेले ते असे होते- Israel is everthing the RSS wants India to be, Modi is Making it happen. इस्रायलकडे असलेले अद्‌भुत तंत्रज्ञान आणि अद्‌भुत मोसाद याच्या मदतीने ईव्हीएम मशीनशी खेळणे आणि अभिनव अशा त्यांच्या आभासी दुनियेतून जनमानसाला संमोहित करणे सहज शक्य आहे

1.अटीतटीचा सामना संपलाय. एका संघाला (अचानकपणे? अनपेक्षितपणे?) फार मोठा एकतर्फी विजय मिळालाय. अशा वेळी सामना हरलेल्या संघाने ‘पंच पूर्णपणे पक्षपाती होता’, त्यामुळे असे झाले, हे म्हणणे चुकीचे (हास्यास्पद?) आहे, त्याचप्रमाणे हा सामना संपल्यावर ‘हा निकाल असाच लागणार होता, त्यामागची ही कारणेही आम्ही आम्ही आधीच ओळखली होती,’ असे सांगणारे समीक्षक आपण विचारात घ्यावेत का घेऊ नयेत?

2. मात्र अशा वेळी या सामन्याचा निकाल असाच लागेल; कारण ‘पंच पूर्णपणे पक्षपाती आहेत, ते बदलले पाहिजेत’ असे सातत्याने सांगणारे लोक अल्पमतात असले तरी ते अनेक काळ असे का सांगताहेत, त्यांचे म्हणणे काय आहे यावरही विचार व्हावयास हवा.

3. तो विचार करणे फार गरजेचे आहे, कारण निवडणुकीपूर्वी भाजपचे चाणक्यही गांगरले होते. अपमानास्पद अटी मान्य करून त्यांना रामविलास पासवान यांची मनधरणी करावी लागली होती. ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे (आणि संजय राऊतसुद्धा!) जे सांगतील ते ऐकून त्यांच्या मनाप्रमाणे तडजोड करावी लागली होती.

4. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निवडणुकीचा पहिला टप्पा संपल्यावर पायाखालची वाळू सरकली आहे, असे समजून बिथरल्याप्रमाणे पंतप्रधान त्या पदाला न शोभणाऱ्या भाषेत राजीव गांधींवर तुटून पडले होते; नोटाबंदीचे पाप काय होणार ते स्पष्ट करीत होते.

5. त्यामुळे निवडणुकीनंतर ‘नवा काळ’ने अग्रलेखाला दिलेले शीर्षक ‘इतना सन्नाटा क्यूँ भाई?’ हे बरोबर होते. निकालानंतर ‘हे काय झाले?’ म्हणून हरलेलेच नव्हे, तर जिंकलेलेसुद्धा बधिर होते!

आज भाजपच्या विजयाचे श्रेय संघ-भाजपच्या अनेक संस्थांना आणि पुलवामाचा हल्ला यांना देणारे विश्लेषक विसरतात की, संघ भाजपच्या या अनेक संस्था देवरसांपासून नव्हे तर त्यापूर्वीही अस्तित्वात होत्या. पुलवामा हे तर सरकारचे उघड उघड फार मोठे अपयश होते, अतिसुरक्षित विभागात एक ट्रकभर स्फोटके भरून तो ट्रक जवानांच्या ताफ्यात घुसतो. अनेक जवान शहीद होतात. हा सरळ सरळ गलथान कारभार होता हे सरकार किती अकार्यक्षम आहे हे दाखवणारे.

राहुल गांधींच्या संघटनाकौशल्यावर आणि प्रतिमेवर आज आघात करणारे एक गोष्ट विसरतात. 2014 मध्ये काँग्रेसचे पानीपत झाले होते, काँग्रेत आता कायमची संपली असे समजत होते, अशावेळी राहुल गांधींनी 2018 मध्ये भाजपचे राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश हे बालेकिल्ले जिंकले होते. मराठी मनाला पटेल असे उदाहरण द्यायचे तर पानीपतच्या लढाईनंतर माधवरावांनी पेशवाई (हिंदवी स्वराज्य?) पुन्हा उभे करावे असा हा पराक्रम होता. मात्र त्यामुळेच, राजस्थान, छत्तीसगढ व मध्यप्रदेशचा निकाल लागल्यावर ‘पंच पक्षपाती आहे, पंच बदला’ असे सांगणारे लोक काय म्हणाले होते, तेही लक्षात घ्यावयास हवे. या निकालानंतर ‘दिव्य मराठीत’ लिहिलेल्या लेखात मी म्हटले होते... ‘आता आपण जिंकलोय, ‘ईव्हीएम’ मशीनवर आरोप करणे बरोबर नाही असे वाटून विरोधी पक्ष गाफील राहतील. हा कात्रजचा घाट असेल. कारण या मशीनबरोबर खिलवाड करणे, निकाल हवे तसे बदलणे खूप खूप कठीण असले तरी आजच्या तंत्रज्ञाला अशक्य नाही. अमेरिकेच्या इ-मेल रशिया हॅक करू शकतो, इतर मार्गांनी. (म्हणजे जनमत आभासी दुनियेतून) जनमत बदलवू शकतो. ईव्हीएम मशीनबाबत हे होणार नाही असे समजणे भोळसटपणाचे आहे. ईव्हीएम मशीनमध्ये थोडा बदल हवा. आपण बटण दाबतो त्यावेळी आपले मत तेथे नोंदवले जाईलच, पण त्यावेळी त्या यंत्रातून एक कोरी मतपत्रिका बाहेर येईल. त्यावर आपण शिक्का मारू. ती मतपत्रिका जवळच्या पेटीत टाकली जाईल. मोजणी यंत्रातील व मतपेटीतील मतांची संख्या समान  हवी. माझे हे म्हणणे हास्यास्पद आहे असे म्हणणारे मित्र त्यावेळी होते, आजही आहेत. मी शास्त्रज्ञ असलो (मी चाळीस वर्षे या देशात राहून फक्त शास्त्रज्ञ म्हणून काम केलंय. दिल्लीमधील एका जागतिक किर्तीच्या संशोधन संस्थेचा संचालक होतो.) तरीही मला ‘इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयातील काही ज्ञान नाही. मी त्यावर बोलू नये असे त्यांचे म्हणणे होते. ते काही प्रमाणात बरोबर आहे. मात्र माझा मित्र निरंजन टकले हा आज फक्त शोधपत्रिकारिता करीत असला तरी, या विषयातील सुवर्णपदक विजेता आहे आणि राजीव गांधींच्या काळात सॅम पित्रोदांनी भारताचे संगणकीकरण करण्यासाठी जो संच निवडला होता, त्यातील प्रमुख सदस्य होता. तो पण हे माझे मत अगदी ठामपणे मांडतो, त्यासाठी सादरीकरणही करतो.

या देशात असे काही होईल हे सांगणारा हा छोटा गट 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर नव्हे तर 2012 च्या मध्यापासून कार्यरत आहे. कारण याची सुरुवात झाली आहे, 2012 च्या मध्यावर भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत झाले तेव्हा. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी शेवटच्या दिवसापर्यंत अधिवेशनात नव्हते. नरेंद्र मोदींचे शत्रू समजले जाणारे संजय जोशी सर्वत्र होते. संघस्वयंसेवक नरेंद्र मोदी लोकप्रिय होते, पण त्याहून थोडे अधिक लोकप्रिय होते संजय जोशी. या अधिवेशनात शेवटच्या दिवशी एक आक्रित घडले. संजय जोशी अधिवेशन सोडून गेले, मोदी आले आणि सरळ व्यासपीठावर गेले!

त्या दिवशी संध्याकाळी निखिल वागळे यांनी ‘आजचा सवाल’मध्ये हा मुद्दा घेतला. साताऱ्याहून मला त्यात सामील करून घेतले. वागळेंनी विचारलेला शेवटचा प्रश्न होता- ‘या सर्वाचा नक्की अर्थ काय?’ मी सांगितले याचा अर्थ एवढाच की, ‘अडवाणी आता बाहेर फेकले जातील आणि मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.’ माझे हे मत त्यावेळी अनेकांना हास्यास्पद वाटले. कारण अडवाणी हे भाजपचे सर्वेसर्वा होते. संजय जोशी, मोदी यांना गुजरातमधूनच पायउतार कसे करता  येईल याची व्यूहरचना करत होते. माझा हा विचार त्यावेळी पूर्णपणे पटला तो कुमार केतकरांना. आजवर संघ ही भाजपची ‘पॉलिट ब्यूरो’ होती. त्या पॉलिट ब्यूरोला हवे असलेले भाजपमध्ये या वा त्या भूमिकेत येत होते वा जात होते. मौळीचंद्र शर्मा, वसंतराव ओक, बलराज मधोक अगदी गोविंदाचार्यांपर्यंत!

भारतातील कम्युनिस्ट पक्षातही पॉलिट ब्यूरो होती, पण त्या पॉलिट ब्यूरोवरही रशिया होता. रशिया त्यांचा थोरला भाऊ होता. ज्या विचाराने भारतात कम्युनिस्ट झपाटलेले होते, त्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होते, तोच विचार बरोबर घेऊन एक देश ताब्यात घेऊन तो विचार जागतिक पातळीवर व्यवहारात आणण्यात रशिया मग्न होता- रशिया सांगेल ते पॉलिट ब्युरो ऐकत असे.

संघ, जनसंघ, भाजप याबाबत अशी एक गोष्ट होती- कडवा मुसलमानद्वेष आणि ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ हा एककलमी कार्यक्रम घेऊन हा परिवार उभा होता. आहे. गुरुजींनी आपल्या ‘विचारधन’मध्ये सांगितलंय. फाळणीनंतर या देशात राहिलेले सारे मुसलमान पंचमस्तंभी आहे आणि लालबहादूर शास्त्रींना भेटून त्यांनी सांगितले होते, ‘मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढून घ्या’. संघ ही सांस्कृतक संघटना आहे असे पटेलांना लिखित वचन दिल्यामुळे बलराज मधोक म्हणालेत त्याप्रमाणे, पटेलांना कात्रजचा घाट दाखवत त्यांनी संघाची एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला. जनसंघ स्थापन झाला त्यावेळी मधोक हे शामाप्रसाद मुखर्जींचे प्रमुख सहकारी होते. त्यावेळी अडवाणी त्यांचे सेक्रेटरी होते. मधोक जनसंघाचे खासदार, पक्षाचे अध्यक्ष वगैरे होते. त्यांनी आपल्या ‘हिंदू स्टेट’ या पुस्तकात लिहिलंय- ‘‘आम्हाला पक्षाच्या घटनेत ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द घालावयाचा होता, पण पटेलांनी निर्माण केलेली दहशत एवढी मोठी होती की, आम्ही तो शब्द गाळला. मात्र डिसेंबर 1952 मध्ये कानपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणात उपनिषदे, भवगद्‌गीता, रामायण यांचा समावेश व्हावा आणि संस्कृत ही अनिवार्य भाषा म्हणून शाळांमध्ये शिकवली जावी असे दोन ठराव पारीत केले.’’

संघ, जनसंघ असा वाढत होता. देवरस हे संघाचे सर्वात उदारमतवादी सरसंघचालक. दामूअण्णा दाते हे संघाचे महाराष्ट्रविभाग प्रमुख होते. त्यांचे ‘स्मरणशिल्पे’ नावाचे पुस्तक आहे, त्यात त्यांनी लिहिलंय- ‘‘संघ शिक्षावर्गातील चर्चा प्रवर्तकांच्या बैठकीत एका ज्येष्ठ स्वयंसेवकाने विचारले. ‘संघाची तीन तत्त्वे आपण सोडली का?’ देवरस हसून म्हणाले, ‘कोणती तीन तत्त्वे?’ त्याने सांगितले, ‘हिंदूंचा हिंदुस्थान, भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज व एकचालकानुर्तित्व’. देवरस म्हणाले, ‘अरे संघाचे एक तत्त्व आहे- ‘हिंदूंचे हिंदुस्थान.’ ते झाले की भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आणि एकचालकानुर्तित्व हे आपोआप येते.’’

कडवा मुसलमानद्वेष आणि ‘इस्रायल फक्त ज्यूंचे’ हा विचार घेऊन इस्रायल उभे आहे. नानाजी पालकरांनी इस्रायलला भेट देऊन ‘छळापासून बळाकडे’ हे पुस्तक लिहिलंय- गुजरातच्या अमानुष दंगलीच्या नंतर जगातील साऱ्या देशांनी मोदींना परवाने नाकारले असताना, मोदी त्यावेळी अनेकदा फक्त इस्रायलला जाऊन आलेत.

गुजरात ही आमची प्रयोगशाळा आहे म्हणून परिवारातील लोक अभिमानाने सांगत. भारतातील सर्वधर्मसमभाव धुळीला मिळवायचा असेल तर मोदींनी या देशाचे एकहाती नेतृत्व केले पाहिजे असे वाटून इस्रायलने त्याची कार्यवाही करणे अगदी स्वाभाविक होते. भारतात कम्युनिस्ट पक्षाचे राज्य असावे असे मनापासून वाटून त्यासाठी रशियाने सर्व प्रकारचे प्रयत्न करणे हे जेवढे स्वाभाविक होते, तेवढेच हे स्वाभाविक आहे. कारण आपापले देशप्रेम मनापासून जपत असतानाच जागतिक पातळीवर आपणाला ज्या विचारधारेचे सार्वभौमत्व हवे आहे, त्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे असते. त्यावेळी व नंतरही जगात काही ठिकाणी जे म्हटले गेले ते असे होते- Israel is everthing the RSS wants India to be, Modi is Making it happen.

इस्रायलकडे असलेले अद्‌भुत तंत्रज्ञान आणि अद्‌भुत मोसाद याच्या मदतीने ईव्हीएम मशीनशी खेळणे आणि अभिनव अशा त्यांच्या आभासी दुनियेतून जनमानसाला संमोहित करणे सहज शक्य आहे. तंत्रज्ञान वापरून, आभासी दुनिया उपयोगात आणून रशिया अगदी अमेरिकेतील ई-मेल पळवू शकते आणि जनमानस संमोहित करते असं आज अमेरिकेत जाणते लोक मानतात. आज सर्वप्रथम सर्वपक्षीय जनआंदोलन हवे ते ‘ईव्हीएम मशीनवर बंदी घाला आणि आभासी दुनियेला  नियंत्रित करा’ म्हणून.

या देशातील सर्वधर्म सद्‌भाव कायमचा नाहीसा करून, एका अघोषित आणीबाणीत हा देश आज उभा केलाय. 15 ऑगस्ट 1947 नंतर लगेच पंडितजींनी राजेंद्रप्रसादांना पत्र लिहून कळवले होते, ‘गोहत्याबंदीचा कायदा हा या देशाला पाकिस्तानच्या मार्गाने नेईल’ आणि नेहरू याबाबत फार सजग होते. 1955 मध्ये असा कायदा भारतात असावा अशी चर्चा लोकसभेत झाली त्यावेळी त्यांनी सांगितले होते. ‘असा काही कायदा पारीत झाला तर मी या देशाचा पंतप्रधान नसेन.’

मोदींच्या पहिल्या कालखंडात केवळ भारताला पाकिस्तानच्या मार्गाने नेणारा गोवंशहत्याबंदी कायदा मोठ्या प्रमाणात देशभर लागू झाला नाही तर, गोमांस जवळ आहे या केवळ कल्पनेवरून शेकडो निरपराध माणसांना रस्त्यात ठेचून मारण्यात आले. त्याची चौकशी काय, त्यावर फारशी चर्चाही झाली नाही. आणि आज तर अघोषित आणीबाणी आहे- या निवडणुकीनंतर कोणत्याही वृत्तपत्राने वा वाहिनेने राफेलमधील ‘र’सुद्धा उच्चारलेला नाही!

या देशात सर्वधर्मसद्‌भाव हवा, सशक्त लोकशाही हवी असे वाटणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन नव्या रचना शोधाव्या लागतील. ईव्हीएम मशीनवर बंदी, आभासी दुनियेचे नियंत्रण यांची कार्यवाही करत असतानाच नवी आंदोलने हातात घ्यावी लागतील. उदा. प्रत्येक राम मंदिरात शंबुकाचेही मंदिर हवे, आपण ‘भारत माता की जय’ असे म्हणतो, ‘हिंदुस्थान माताकी जय’ म्हणत नाही. म्हणजे आपण ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ याऐवजी ‘गर्वसे कहो हम भारतीय है’ असे म्हणावयास हवे. अनेक मार्गांनी विचार करावयास हवा.

Tags: evm machine loksabha election bjp rafel dattprasad dabholkar exit poll सॅम पित्रोदा राजीव गांधीं ज्यू मुसलमानद्वेष आणि ‘इस्रायल ईव्हीएम मशीन लोकसभा निवडणुक लोकसभा सार्वत्रिक निवडणुका भाजप विजय राफेल एक्झिट पोल दत्तप्रसाद दाभोळकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात