1804 ते 1877 असे आयुष्य लाभलेल्या थॉमस कँडी यांनी 1822 पासून पुढील पन्नास वर्षे मराठी भाषेसाठी शब्दकोश, व्याकरण, लेखन, संपादन, भाषांतर या प्रकारचे काम केले. त्यांनी 'विरामचिन्हांची परिभाषा' ही 16 पानांची पुस्तिका 1850 मध्ये लिहिली आणि प्रकाशित केली. त्या पुस्तिकेतील संपूर्ण मजकूर इथे जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत. ती पुस्तिका छोट्या डायरीच्या आकारात आहे, तिची छपाई कशी होती हे वाचकांना कळावे म्हणून तिच्यातील सुरुवातीची दोन पाने स्कॅन करून सोबत दिली आहेत. ज्यांना कोणाला ती सर्व 16 पानांची पुस्तिका जशीच्या तशी पाहायची आहे, त्यांना तिची pdf साधना कार्यालयाकडून व्हॉट्स अॅप किंवा मेलद्वारे पाठवली जाईल.
प्रस्तावना.
विरामचिन्हें ह्मणजे वाक्याचा विभाग करून लेखांतला अर्थ स्पष्ट समजण्याकरितां ज्या खुणा घालतात त्या.
मराठी भाषेतील ग्रंथांत विरामचिन्हें घालण्याची चाल मागें नव्हती, परंतु, युरोप खंडातील इंग्लिश वगैरे भाषांमध्यें ह्या चिन्हांपासून बहुत उपयोग होतो, हें पाहून मराठी भाषेतही ही चिन्हें घालण्याची चाल पडावी, अशी इच्छा अलीकडे बहुतांस झाली आहे; ह्मणून इंग्लिश भाषेतील जी चिन्हें मराठी भाषेत घ्यावयाजोगीं आहेत, तीं घेऊन, त्यांचें ज्ञान सर्व लोकांस व्हावें ह्या हेतूनें, ही परिभाषा केली आहे.
मराठी भाषेत विरामचिन्हें पांच घेतलीं आहेत, तीं येणें प्रमाणे. स्वल्पविरामचिन्ह (,), अर्धविरामचिन्ह (;), पूर्णविरामचिन्ह (.), प्रश्नचिन्ह (?), आणि उद्गारचिन्ह (!).
स्वल्पविरामचिन्ह घालण्याचे नियम.
1 जें वाक्य सरळ आहे त्याच्या पोटीं विभाग नसतात, ह्मणून त्यांत विरामचिन्हें घालण्याची गरज नाहीं.
उदाहरणे. तरणा माणूस आला होता. मला पांच भाऊ आहेत. तिला मुलगा झाला आहें. तुझें नांव काय ? ईश्वर किती थोर आहे !
हीं वाक्यें सरळ आहेत, यांच्या पोटीं विभाग नाहींत, ह्मणून ह्यांमध्ये विरामचिन्हें घालण्याची गरज नाही. ह्या उदाहरणांपैकी पहिल्या तीन वाक्यांच्या शेवटीं पूर्णविरामचिन्ह मात्र पाहिजे; चवथ्याच्या शेवटीं प्रश्नचिन्ह पाहिजे; आणि पांचव्याच्या शेवटीं उद्गारचिन्ह पाहिजे.
2 सरळ वाक्यांत मध्यें जर दुसरें वाक्य किंवा वाक्यांग आले, तर त्या वाक्याच्या किंवा वाक्यांगाच्या आरंभी व शेवटी स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. एक तरुण कोंबडा, दोन तीन तरुण कोंबड्या संगतीं घेऊन, उकिरडा उकरीत होता.
येथें, एक तरुण कोंबडा उकिरडा उकरी न होता, हे वाक्य सरळ आहे; ह्यामध्यें ह्याच्या संबंधाचे, दोन तीन कोंबड्या संगतीं घेऊन, हें दुसरें वाक्य आले आहे, ह्मणून ह्या वाक्याच्या मागें आणि पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
दुसरें उदाहरण. एक कुतरा, तोंडीं भाकरीचा तुकडा धरून, नदीपलीकडे जात होता.
येथे, कुतरा नदीपलीकडे जात होता, हैं वाक्य सरळ आहे; ह्याच्या मध्यें, ह्याच्या अनुषंगाचें, तोंडी भाकरीचा तुकडा धरून, हें दुसरें वाक्य आलें आहे.
3 जीं दोन तीन सरळ वाक्यें मिळून एक मोठें वाक्य होतें, त्या त्या सरळ वाक्यांच्या मध्यें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. एक कुतरी व्यायाला झाली होती, तिनें दुसऱ्या कुतरीची प्रार्थना केली की, मला राहायास घर दे.
येथें तीन वाक्यें मिळून एक मोठें वाक्य झालें आहे, ह्मणून त्यांच्या त्यांच्या मध्यें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
दुसरें उदाहरण. इतक्यांत, कोल्ही जवळ होती ती धांवत आली, आणि मोठ्या करुण स्वरानें, डोळ्यांत आसवें आणून, ती गरुड पक्षिणीची काकळूत करूं लागली.
4 एकाच प्रकारचे दोहोंपेक्षां अधिक शब्द आले असतां त्या प्रत्येक शब्दापुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. रामा, कृष्णा, केशव, आणि हरि आले आहेत. आमचे घर उंच, रुंद आणि हवाशीर आहे. तो स्पष्ट, सावकाश, आणि मोठ्यानें वाचतो. तो खातो, पितो, आणि निजतो.
5 परंतु कोणत्याही एका प्रकारच्या दोन शब्दांच्यामध्यें उभयान्वयी अव्यय आले असतां, त्या शब्दांच्या मध्यें स्वल्पविरामचिन्ह नको.
उदाहरण. रामा आणि कृष्णा आले आहेत.
येथें, रामा आणि कृष्णा ही दोन नामें आहेत, ह्यांच्या मध्यें आणि हें उभयान्वयी अव्यय आलें आहे; ह्याकरितां ह्या दोन नामांच्या मध्यें स्वल्पविरामचिन्ह नको.
दुसरी उदाहरणें. माझें घर लांब आणि रुंद आहे. तो स्पष्ट आणि सावकाश वाचतो. तो जेवतो आणि निजतो.
6 वाक्याच्या आरंभीं संबोधन असतां, त्याच्या पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे; आणि तें मध्येंच आलें असतां, त्याच्या मागें व पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. महाराज, मी आपल्याकडे आलों आहें.
येथें, महाराज, हें संबोधन आरंभी आहे. ह्मणून ह्याच्या पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
दुसरें उदाहरण. तो ह्मणाला, गड्यांनो, माझी गोष्ट ऐका.
येथें गड्यांनों, हें संबोधन वाक्याच्या मध्यें आलें आहे, ह्मणून त्याच्या मागें व पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
7 असतां, असतांना, इत्यादि शब्द वाक्यांत आले, तर त्यांच्या पुढें कधीं कधीं स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. एक कोल्हा रानांत फिरत असतां, त्यास एक गाढव भेटला.
8 संबंधी सर्वनाम व तें ज्याचा संबंध दाखवितें तें पुरुषवाचक, किंवा दर्शक सर्वनाम, हीं दोन सर्वनामें वाक्यामध्यें आलीं, व त्यांच्यामध्यें दुसरें शब्द आले आहेत, तर पुरुषवाचक सर्वनामामांगें, किंवा दर्शक सर्वनामामागें, स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. जें पुस्तक तुह्मीं मला वाचावयास दिलें होतें, तें मनोरंजक आहे.
9 परंतु जर संबंधी सर्वनाम व पुरुषवाचक सर्वनाम ह्यांच्यामध्यें दुसरे शब्द आले नाहींत, तर पुरुषवाचक सर्वनामामागें स्वल्पविरामचिन्ह नको.
उदाहरणें. जो तो माझी निंदा करितो. ज्याचें त्यास गोड वाटतें. ज्याचे त्याला द्यावें. मी काय इतका नीच आहें, की ज्यांनीं त्यांनी मला बोलावें ?
10 आणि, तर, परंतु, इत्यादि अव्ययें वाक्यांगांच्या मध्यें आली असता, त्या प्रत्येक अव्ययाच्या मागें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरणें. तो उत्तम रीतीनें लिहितो, आणि चांगल्या डौलानें वाचतो. खरें पुसाल, तर तुमची चाल मला आवडत नाहीं. तो वाजविणारा चांगला आहे, परंतु त्यास गाता येत नाहीं.
11 कीं हें अव्यय वाक्यांत आलें असतां, त्याच्या संबंधाप्रमाणें त्याच्या मागें, किंवा पुढें, स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरणें. तो ह्मणाला कीं, मी येणार नाहीं. ह्यांत आश्चर्य नाहीं, कीं तो तुह्यांस सोडून गेला. त्यानें डागिने असे ठेविले, कीं समयास हातीं येतील. त्याला वाटलें कीं, मी मोठा शाहाणा आहें. सर्वांस वाटतें कीं, आपण करितों तें चांगलें.
12 कोणाचें ह्मणणें किंवा लेख वाक्यांत घेतला असतां, त्या ह्मणण्याच्या किंवा त्या लेखाच्या प्रारंभी स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरणें. शिवाजी ह्मणाला कीं, तूं आपल्या देशास जा. तुका ह्मणतो, सत्यबोले मुख, तेथें उचंबळे सुख.
13 एका मनुष्याचीं किंवा वस्तूचीं दोन नामें आली असतां, व त्यांपैकी कोणत्याही नामास दुसरे शब्द जुळले असतां, त्या प्रत्येक नामाच्या पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरण. लक्ष्मीचा भाऊ, रामा, दुखण्यास पडला आहे.
येथें, भाऊ आणि रामा हीं दोन नामें एकाच पुरुषाचीं आहेत, व भाऊ ह्या नामास लक्ष्मीचा हा शब्द जोडला आहे, ह्मणून प्रत्येक नामाच्या पुढें स्वल्पविरामचिन्ह पाहिजे.
दुसरी उदाहरणे. मराठ्यांचा राजा, शिबाजी, फार दिवस वारला आहे. सर्व लोकांच्या प्रीतीतला कवि, तुकाराम, वाणी होता.
14 परंतु एकाही नामास दुसरा शब्द जोडला नाहीं, तर स्वल्पविरामचिन्ह नको.
उदाहरण. शिवाजी राजा वाड्यांत आहे.
येथें, शिवाजी व राजा ह्यांतून कोणत्याही नामास दुसरा शब्द जोडला नाहीं, ह्मणून त्यांच्या पुढें स्वल्पविरामचिन्ह नको.
दुसरी उदाहरणे. नामदेव शिंपी कवि होता, लाला लोहार मरायास टेंकला आहे.
अर्धविरामचिन्ह घालण्याचे नियम.
1 ज्यांचा परस्पर जवळ संबंध नाही अशीं जीं निरनिराळीं वाक्यें किंवा वाक्यांगें एके लांब वाक्यांत येतात, त्या निरनिराळ्या वाक्यांच्या किंवा वाक्यांगांच्या मध्यें अर्धविरामचिन्ह पाहिजे.
उदाहरणे. काड्या पाण्यावर तरतात; परंतु मोत्यें पाण्याच्यातळीं असतात. त्याचे तेजावरून, हें रत्न आहे, असे तो समजला; परंतु त्याचें काय करावें, हैं त्यास ठाऊक नव्हतें. त्या देशांत फार दिवसांपासून राजा नव्हता, सर्व सत्ता लोकांच्याच हातीं होती. फिरून मला पुसू नका, कां तर भी तुह्यांस जाऊं देणार नाहीं.
ह्या चार वाक्यांत जीं निरनिराळीं वाक्यें किंवा वाक्यांगें आहेत, त्यांचा परस्पर संबंध तुटक आहे, ह्मणून त्यांच्या मध्यें अर्धविरामचिन्ह पाहिजे.
2. कधी कधीं लहान लहान स्वतंत्र वाक्यांच्या मध्यें अर्धविरामचिन्ह घालतात, परंतु तसें करण्यास त्या वाक्यांचा परस्परांशीं कांहीं तरी संबंध पाहिजे.
उदाहरण. धनाचा अभिमान धिक्कारास कारण होय; विद्येचा अभिमान खेदास कारण होय; मोठेपण्याचा अभिमान उपहासास कारण होय; परंतु स्वमताचा अभिमान तर दुसऱ्यास सोसवतच नाहीं.
हीं चार वाक्यें स्वतंत्र आहेत खरीं, परंतु ह्या सर्वांमध्ये एकाच विषयाचें, ह्मणजे अभिमानाचें, वर्णन आहे, ह्मणून त्यांचा परस्पर संबंध आहे.
पूर्णविरामचिन्ह घालण्याचें नियम.
1 स्वतंत्र व पूर्ण झालेलें असें जें वाक्य त्याचें शेवटीं हें चिन्ह पाहिजे.
उदाहरणें. अहंमदनगर मुंबईच्या उत्तरेस आहे. परमेश्वर ह्या सृष्टीचा कर्ता आहे. मला वाटेंत तुमचा भाऊ भेटला.
2. कधीं कधीं अशीं वाक्यें येतात कीं, त्यांच्या प्रारंभी उभयान्वयी अव्यय असतें, तेणेंकरून त्यांचा पूर्ववाक्याशी संबंध असतो, तरी पूर्ववाक्याच्या शेवटी पूर्णविरामचिन्ह घालतात.
उदाहरणें. अशी त्यानें त्याची समजूत केली, ती फुकट गेली. कां तर कामक्रोधादिकांच्या आवेशापुढें बुद्धीचें कांहीं चालत नाहीं. एकचित्त आहेत तोंपर्यंत त्यांवर शत्रूचे काहीं चालत नाहीं; एकीचे इतकें माहात्म्य आहे. ह्मणून ती एकी चुगल्या ऐकून, किंवा शत्रूच्या गोष्टींस चित्त देऊन, तोडून टाकितां दूरवर विचार करावा.
प्रश्नचिन्ह घालण्याचे नियम.
1 वाक्यात प्रश्न आला असतां, त्या वाक्याच्या शेवटीं हैं चिन्ह असावें.
उदाहरणें. ती कोठें आहे ? तुह्मी कोणीकडें जातां ? तिचें नांव काय ?
2 वक्ता जेव्हां दुसऱ्याचा प्रश्न सांगतो, पण प्रश्न करणाऱ्याच्या शब्दांचे अनुकरण करीत नाहीं, तेव्हां असल्या प्रश्नाचें शेवटीं हैं चिन्ह नको.
उदाहरणें. मी कोठें राहातों, ह्याविषयीं तिचा प्रश्न होता. तुमचा मुलगा शाळेत जातो कीं नाहीं, ह्याविषयीं तिचा प्रश्न होता.
उद्गारचिन्ह घालण्याचे नियम.
1 ज्या वाक्यांत आश्चर्य, आनंद, खेद इत्यादि मनोधर्मांचा उल्लेख असतो, त्या वाक्याचे शेवटीं, व हटकण्याचे शेवटीं, हें चिन्ह घालावें.
उदाहरणें. काय मौज त्यानें केली! काय चमत्कार हो! माझी गोष्ट ऐका!
2 कधीं कधीं अशीं वाक्ये असतात, कीं शब्द मात्र पाहिले असतां, प्रश्न संभवतो व उद्गारवाक्यही संभवतें, अशा वाक्यापुढें कोणतें चिन्ह घालावें ह्याचा निर्णय वक्त्याच्या अभिप्रायावरून करावा. प्रश्न करावयाचें जर त्याचे मनांत होतें, तर प्रश्नचिन्ह घालावें, मनोधर्म दाखवावयाचे जर त्याचे मनांत होतें, तर उद्गारचिन्ह घालावें.
उदाहरणें. आज मी किती श्रमलों! हैं ऐकून तुला केवढा आनंद झाला! तो केवढा मूर्ख आहे! परोपकार करण्याचे किती प्रसंग येऊन व्यर्थ गेले !
ह्या सर्व वाक्यांत प्रश्न करण्याची विवक्षा नाही, मनोधर्म मात्र दाखविला आहे; ह्मणून उद्गारचिन्ह पाहिजे.
समाप्त.
Marathi Punctuation
विरामचिन्हांची परिभाषा,
मेजर क्यांडीसाहेब ह्यांनीं रचिली;
ती पुणे पाठशाळा एथील छापखान्यांत छापिली.
छापणारा - नारो रामचंद्र ठकार
इसवीसन 1850
शके 1772
1850 मध्ये प्रकाशित झालेली ही पुस्तिका दीर्घकाळ उपलब्ध नव्हती, अभ्यासकांच्याही विस्मरणात गेली होती. 1957 मध्ये अ.का. प्रियोळकर यांनी मराठी भाषा संशोधन मंडळाच्या वतीने ती पुनर्मुद्रित केली. त्या पुनर्मुद्रित आवृत्तीमध्ये, 'बायबल छापताना विरामचिन्हे घालावीत की नाही' यावर 1854 मध्ये झालेली चर्चा समाविष्ट केली होती.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Surendra Chopde- 24 Feb 2026
मेजर थॉमस कँडी यांच्याविषयीचा लेख आवडला. एक ब्रिटिश नागरिक असूनही मराठीसाठीचे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. याला म्हणतात निस्वार्थ सेवा आणि भाषेप्रती समर्पण .
save