डिजिटल अर्काईव्ह

वाराणसी हे एक चेटूक आहे. ते तुम्हाला परत परत आपल्याकडे आकर्षित करते. नदी नव्हे नद म्हणावे एवढे इथले गंगेचे पात्र विशाल आहे. गंगा ही फेमिनीन नदी आहे. तिच्यात रमणीची रमणीयता, कामिनीची कमनीयता दिसते. पाणी नव्हे हे! हे आहे वाहते चैतन्य ! पाणी नव्हे हे! प्राणवायूचे हे वस्त्र-ओले रूप ! कोंबाची लवलव घेऊन येणाऱ्या मातीचे मार्दव ह्या पाण्यात आहे. पाणी नव्हे हे! भूमीचे वत्सल रूपच जणू हे ! पाणी नव्हे हे! वितळलेल्या आभाळाचा रूपकार हा!

 

वाराणसी ही 'सा रम्या नगरी' आहे. वाराणसी हे केवळ शहर नाही. केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नाही, तर एका सांस्कृतिक संकल्पनेचा तो दृश्यावतार आहे.
वाराणसी हे प्रियदर्शनी शहर. पण प्रथमदर्शनी कोणीच वाराणसीच्या प्रेमात पडत नाही. प्रथमदर्शनी वाराणसी विद्रूप, कुरूप, गलिच्छ आहे असा भास होतो.
'एखादी कुरूप गोष्ट सुंदर दिसेपर्यंत तिच्याकडे पाहत राहावे', असे खलील जिब्रान म्हणाला.
द्वितीयदर्शनात, तृतीयदर्शनात वाराणसी सुंदर दिसते. 'जी गोष्ट जिवंत आहे, वाहती आहे ती गोष्ट कधीच कुरूप नसते', असे माझा स्मृतिशेष मित्र व कवी रमेश भगवंत वेळुस्कर एकदा मला म्हणाला.
वाराणसी जिवंत आहे. वाहती आहे, सेंद्रिय आहे. त्यामुळेच ती सुंदर आहे.

वाराणसीला भेट दिल्यावर प्रख्यात अमेरिकन लेखक मार्क ट्रेन म्हणाला, 'वाराणसी ही इतिहासापेक्षा पुरातन आहे. परंपरेहून जुनी आहे. दंतकथेहून पुरातन आहे आणि इतिहास, परंपरा व दंतकथा ह्यांच्या बेरजेपेक्षा दुपटीने जुनी आहे.' (Varanasi is older than history, older than tradition, older than legend and is twice as old as all of them put together.)

पहाटेपूर्वी, ब्राह्ममुहूर्तावर व दिवेलागणीच्या गोरज मुहूर्तावर वाराणसीला गंगामैयाची आरती होते. प्रथम गंगा संकल्प होतो, मग गंगा आरती. सात पुजारी रंगीत वेशात समईचे पेटते झाड घेऊन गंगेची आरती करतात. संस्कृत मंत्रघोष चालू असतो. तो सगळा खराच अप्रूप असा अनुभव आहे.

कार्तिकी पौर्णिमेला वाराणसीला देवदिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. देवदिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. उजेडाचे पर्व.

यंदा देवदिवाळीला मी वाराणसीला होतो. गंगेचे घाट मंद, संथ पेटणाऱ्या पणत्यांनी उजळून गेले होते. घाटावरील वास्तूंवर रोषणाई होती. आभाळात दारूकामाची आतषबाजी चालू होती. काही भक्त द्रोणांत तुपाचे दिवे लावून हे दिवे गंगेच्या पात्रात सोडत होते. हे द्रोणदीप दूरवर वाहत जायचे.

गंगेचे पात्र विशाल आहे. सखोल आहे.
पहाटेच्या केशरी उन्हात होडीत बसून गंगेच्या पात्रातून निवांत सैर करावी.
दशाश्वमेध घाट, मनकर्णिका घाट, नमो घाट, हरिश्चंद्र घाट, तुलसी घाट, अघोरी साधू घाट, महानिर्वाही घाट ह्या घाटांचे दर्शन घ्यावे.
दुपारी गंगेत गगन वितळते. गर्भवतीच्या पावलांनी गंगा वाहते.
सायंकाळी गंगा तृप्त, संतृप्त दिसते.
गंगेच्या घाटावर अहोरात्र प्रेते जळत असतात.
वाराणसी हे धर्मस्थळ आहे तसेच ते महास्मशानही आहे. वास्तविक सूर्यास्तानंतर दहन होत नाही. पण वाराणसी हा नियम झुगारून लावते. इथे रोज 500 प्रेतांचे दहन होते.
Death is auspicious here. इथे येणारा मृत्यू भाग्यवान असतो.
वाराणसीतले सर्व सण पावसानंतर येतात. पावसाच्या पाण्यात गंगेतील प्रदूषित पाणी वाहून जाते.

गंगेच्या किनाऱ्यावर काशीविश्वनाथाचे देऊळ आहे. औरंगजेबाने मूळ देऊळ उद्ध्वस्त केल्यावर राणी अहिल्याबाई होळकरांनी ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला. पंजाबचे राजे रणजित सिंग ह्यांनी देवळाला 1000 किलो सोने दिले. त्यातून मंदिरावर सोन्याचा कळस बांधला गेला.

वाराणसीला अनेक देवळे आहेत. काशीविश्वेश्वर मंदिरानंतर संकटमोचन मंदिर प्रख्यात आहे.
काशीविश्वेश्वराच्या देवळाचा प्राकार हे विविध वासांचे मोहोळ आहे. फुलांचा वास, निर्माल्याचा वास, दिव्यांच्या तेलाचा वास, धुपाचा वास, नैवेद्याचा वास हे सगळे वास संमिश्र झालेले आहेत.
देवळाच्या प्राकारात कोलाहल आहे. 'ॐ शांतिः शांतिः शांतिः' ही आपली सनातन प्रार्थना कोणीच पाळत नाही.
वाराणसीला खवय्यांची चंगळ आहे. वाराणसीची मलईदार लस्सी प्यावी. इथल्या खमंग कचोऱ्या व सामोसे खावेत. गोड, मधुर ताजी जिलेबी व इमरती चाखावी. चाट, छोले-भटुरे ह्यांवर ताव मारावा व शेवटी तोंडात विरघळणारे बनारसी गोड पान खावे.
रामू भैय्याचे पान दुकान प्रख्यात आहे. लाल, हिरव्या रंगात दर्शनी भाग रंगवलेल्या ह्या दुकानातून 'गंगामैया की जय' असे ठळक अक्षरांत लिहिले आहे. 
पांढरे शुभ्र धोतर नेसलेला व लाल मुंडासे घातलेला रामू भैय्या मोठ्या नजाकतीने पान बनवतो.
"बहनजी, भैय्याजी, मीठा बनारसी पान खावोगे न आप?" असे तो नम्रपणे तुम्हाला विचारतो व तुमच्या उत्तराची वाट न पाहता पान बनवण्यात दंग होतो.

सर्वप्रथम रामूभैय्या हिरवेगार पान घेतो. पानाला दुखणार नाही अशा प्रकारे हळुवार पानाचा देठ तोडतो. पानावर थंड पाणी शिंपडून पान तजेलदार करतो. मग आपल्या दोन बोटांनी पानाला ओला चुना लावतो. त्यावर किसलेल्या खोबऱ्याचा कीस शिंपडतो. सुपारीचे तुकडे, छोट्या डाळीचे दाणे, त्यावर लाल, हिरवी टुटीफ्रूटी घालतो. मग छोट्या स्टेनलेस स्टीलच्या डब्यातून चमच्याने गोड, गुलाबी गुलकंद पानात मिसळतो. पान दुमडून त्यावर ताजी, जर्द लाल चेरी लावतो व पान रुपेरी वर्खात बुडवून त्याला काळी लवंग लावतो व आत्मीयतेने हे पान स्वतः तुमच्या तोंडात घालतो. क्षणार्धात हे मिठास पान जिभेवर विरघळून जाते.

बनारसमध्ये कलाकंद, मालपुआ, मखनी मलई ही मिठाई, दम बिर्याणी, बिहारी कुल्चा, फ्रेग्नंट बिर्याणी, उल्टे पराठे, दाल बुराटी, रुमाली रोटी, पनीर पसंदा, ककोरी कबाब अशी मेजवानी असते.

Varanasi doesn't merely serve food. It stages a cultural performance around it.' असे म्हणतात. अवधी खाद्यसंस्कृतीचे विशेषतः 'दम पक्त' व 'बुखारी' जेवणाचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल शेफ इम्तियाज कुरेशी ह्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मांस marinate करणे, काही वेळा विशेषतः कबाब करताना मांस homogenic करणे व मांस slow cooking करून शिजवणे ही अवधी खाद्यसंस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. मांस मऊ होण्यासाठी त्यात पपईची पेस्टही मिसळली जाते. तुंडे कबाब व गलौना कबाब हे अतिशय लोकप्रिय अवधी खाद्यपदार्थ आहेत.

वाराणसीला हातमागावर रेशमी वस्त्रे बनवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. इथले बहुतेक सर्व विणकर मुसलमान आहेत. एकेक बनारसी सिल्क साडी बनवायला अनेक महिने लागतात. त्यामुळे ह्या साड्या महाग असतात.

बनारसी सिल्क साड्या पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या, जांभळ्या, काळ्या अशा सर्व आकर्षक रंगांत विणलेल्या असतात.

मुंगा सिल्क, बटर सिल्क, रॉ मँगो सिल्क, मशरूम सिल्क, जॉर्जेट सिल्क अशा अनेक प्रकारच्या साड्या इथे मिळतात. साड्यांना जरीची नक्षीदार किनार असते. पदरावर मोर, पोपट ह्यांचे डिझाइन्स असतात. वाराणसी हे असे बहुरंगी, बहुआयामी शहर आहे. वाराणसीला एकदा जाऊन कोणीच तृप्त होत नाही. वाराणसी हे एक चेटूक आहे. ते तुम्हाला परत परत आपल्याकडे आकर्षित करते.

नदी नव्हे नद म्हणावे एवढे इथले गंगेचे पात्र विशाल आहे. गंगा ही फेमिनीन नदी आहे. तिच्यात रमणीची रमणीयता, कामिनीची कमनीयता दिसते.

पाणी नव्हे हे! हे आहे वाहते चैतन्य ! पाणी नव्हे हे! प्राणवायूचे हे वस्त्र-ओले रूप ! कोंबाची लवलव घेऊन येणाऱ्या मातीचे मार्दव ह्या पाण्यात आहे. पाणी नव्हे हे! भूमीचे वत्सल रूपच जणू हे ! पाणी नव्हे हे ! वितळलेल्या आभाळाचा रूपकार हा !

जवाहरलाल नेहरूंचे सर्व बालपण गंगेच्या काठावर गेले. जवाहरलाल नेहरू अतीव आदराने, आत्मीयतेने गंगेबद्दल बोलताना म्हणाले, 'गंगा ही भारताच्या संस्कृतीचे संगम आहे. गंगा सतत बदलत असते; पण तिचे मूळ रूप, स्वरूप कायम राहते.' गंगेने भारतीय इतिहासात स्मृती जतन करून ठेवल्या आहेत. गंगेचे पात्र पाहिले की, मला हिमालयातील हिमशिखरे आठवतात.

आपल्या मृत्यूनंतर आपली रक्षा गंगेच्या पात्रात विसर्जित करावी, अशी इच्छा नेहरूंनी आपल्या इच्छापत्रात लिहून ठेवली होती.

इथे गंगेला 'गंगा' ह्या एकेरी नावाने कोणीच संबोधत नाही. तिला गंगाजी म्हणतात. गंगा मैय्या म्हणतात.

बनारसपासून जवळच सारनाथ आहे. सारनाथचे मूळ नाव सारंगनाथ. इथेच गौतम बुद्धाने साक्षात्कार झाल्यावर पाच शिष्यांना उपदेश केला. आनंद, सारीपुत्र, कौशल, महामैत्रेय व महामाया हे ते बुद्धाचे पाच शिष्य.

बुद्धाने केलेल्या उपदेशाचे साररूप असे आहे : 'संसारात दुःख आहे हे पहिले आर्यसत्य. संसारातल्या दुःखाला कारण आहे हे दुसरे आर्यसत्य. संसारातले दुःख दूर करता येते हे तिसरे आर्यसत्य. संसारातले दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे, हे चौथे आर्यसत्य.'

मुदिता, मैत्री, करुणा, उपेक्षा ह्यांच्या चौरंगी पाटावर बसून दुःख हरण होऊ शकते. मुदिता म्हणजे समाधान, करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने आपणही दुःखी होणे व दुसऱ्याचे दुःख नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणे. मैत्री म्हणजे सर्व भूतांविषयी मैत्र भाव आणि उपेक्षा म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखांत विचलित न होणे.

बुद्धाने पंचशील व अष्टांगमार्ग सांगितला. पंचशील म्हणजे खोटे न बोलणे, चोरी न करणे, कोणाची हत्या न करणे, व्यभिचार न करणे, कोणत्याच व्यसनात न गुंतणे. अष्टांग मार्ग म्हणजे समा वाचा, समा करणे, समा जोड, समा संकल्प, समा यत्न, समा स्मृती, समा विचार व समा समाधी.

बौद्ध साधकाने प्रज्ञावान व शीलवान झाले पाहिजे.
हे जीवन सतत बदलत असते. प्रत्येकाला ही अनित्यबोधाची जाणीव असावी.
ईश्वर संदर्भहीन आहे. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी किंवा अनस्तित्वाविषयी चर्चा करण्यात वेळ व्यर्थ घालवू नये.
जीवनातले आपले व इतरांचे दुःख नाहीसे करण्याच्या प्रयत्नवादाचा प्रत्यक्षात अंगीकार करावा.
बनारसला धम्मक स्तूप आहे. त्याची उंची 103 फूट व 93 फुटांचा घेर (परीघ) व 30 फूट त्रिज्या आहे. वाराणसीच्या तुलनेत सारनाथ फारच स्वच्छ आहे. शांत आहे.
सारनाथच्या म्युझिअममध्ये अशोकस्तंभ जतन करून ठेवला आहे.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर अशोकस्तंभ, चक्र ही बौद्ध प्रतीके राष्ट्रीय चिन्हे म्हणून स्वीकारण्यात आली.
वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांचा संगम होत असल्याने ह्या शहराला वाराणसी हे नाव पडले. काशी व बनारस ही वाराणसीची अन्य नावे आहेत.

बनारसमध्ये 1915 मध्ये पंडित मदन मोहन मालवियांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची स्थापना केली. ह्या निवासी विद्यापीठाचा प्राकार विस्तृत आहे. ह्या विद्यापीठात 10,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रख्यात गणितज्ञ जयंत नारळीकर ह्यांनी ह्या विद्यापीठात शिक्षण घेतले आहे.

बनारसला भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा आहे. सतारवादक रविशंकर, शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान, गिरिजा देवी, किशन महाराज, ख्याल गाणारे राजन, साजन मिश्रा व कथ्थक नृत्यपटू बिरजू महाराज ह्यांनी बनारसीची ललित कला समृद्ध केली आहे.

गंगेच्या किनाऱ्यावर बसून ऋषी-मुनींनी ध्यान केले, मनन केले, चिंतन केले, लेखन केले. प्रवचन केले.
हिंदू धर्माचा उपदेश साररूपाने सांगण्यासाठी हे महर्षी झटले.
पूर्ण आहे. ब्रह्माला आदी व अंत नाही. हिंदू धर्म ब्रह्म म्हणजे चैतन्य हे सत्य मानते. ब्रह्म हे ईश्वर हे ब्रह्माचेच एक रूप आहे. ज्ञानमार्गाने, भक्तिमार्गाने व कर्ममार्गाने ईश्वराला प्रसन्न करता येते.
जीवनात सदाचाराने वागाल तर पुण्यसंचय होऊन तुम्ही मृत्यूनंतर स्वर्गात जाल. अनाचार केल्यास पापसंचय होईल व तुम्ही मृत्यूनंतर पाताळात जाल.
आत्मा हे चैतन्याचे रूप आहे. आत्मा शाश्वत आहे. मानवाच्या मृत्यूनंतर वस्त्रे बदलावी त्याप्रमाणे चैतन्यस्वरूप आत्मा दुसऱ्या मानवी शरीरात जातो.
सर्व भूतांचे मंगल होवो, कल्याण होवो, सर्व जण सुखी होवोत ही हिंदू धर्माची सनातन प्रार्थना आहे.
प्रमादक्षम मानवी मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्मकांडे महत्त्वाची आहेत.
आपली दृष्टी विशाल होवो, वैश्विक होवो हा हिंदू धर्माचा संकल्प आहे.

वाराणसी हे गंगेप्रमाणे वाहते, प्रवाही शहर आहे. वाराणसीच्या रस्त्यावरून जाताना काळच आपल्याबरोबर चालतो आहे, प्राचीन इतिहास आपला पाठलाग करत आहे आणि पुरातन दंतकथा आपल्या कानांत हळू आवाजात गुणगुणते आहे असा भास, आभास होतो.

वाराणसी हा अनुभव आहे! वाराणसी ही एक संकल्पना आहे ! वाराणसी हे भारतीय संस्कृतीच्या चित्रलिपीतले उद्‌गारचिन्ह आहे !

 

देश-विदेशांतील प्रवासवर्णन करणारे लेख दत्ता नायक यांनी मागील पाच-सहा वर्षे साधनासाठी लिहिले. त्यांचा संग्रह असलेले पुस्तक 'इकेबाना' या नावाने साधना प्रकाशनाकडून आले आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 58 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी