टागोरांच्या दोन महिन्यांच्या चीनच्या दौऱ्यादरम्यान छन तुशिऊ यांनी टागोरांवर टीका करणारे तब्बल अकरा लेख लिहिले. 'शिळ आन' या टोपण नावाखाली लिहिलेले काही लेख तर फक्त 100 शब्दांचे होते आणि अतिशय हलक्या पातळीवर जाऊन लिहिलेले होते. 28 मे राजी लिहिलेल्या 'टागोरांचा मूर्खपणा' या लेखात तो लिहितो, 'पौर्वात्य संस्कृतीचे गुणगान गाणारा हा कवी आपल्या तरुणांच्या विचारसरणीवर चुकीचा परिणाम टाकेल या भीतीने आम्ही टागोरांचा विरोध करतो. बीजिंगमध्ये आल्यापासून ते एकही धड वाक्य बोललेले नाहीत. उलट, छिंग राजवटीचा पदच्युत सम्राट, बौद्ध भिक्षु, भिक्षुणी, ऑपेरातले नट-नट्या अशा भलत्यासलत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. हा काय मूर्खपणा चालवला आहे?'
'शेतकऱ्यांच्या चळवळीला भक्कम पाठिंबा देणाऱ्या आणि 'एकला चलो रे'चा नारा कणखरपणे देणाऱ्या टागोरांचे चीनमध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र, केवळ पौर्वात्य संस्कृतीची भलामण करणाऱ्या, कवितांच्या कल्पनारम्य जगात आमच्या तरुणांना गुंगवणाऱ्या टागोरांचे आम्ही मुळीच स्वागत करत नाही.'
- माओ तुन, 'टागोरांकडून आमची अपेक्षा'
12 एप्रिल 1924
1923 मध्ये चीनच्या चियांगश्युएश म्हणजेच युनिव्हर्सिटीज लेक्चर असोसिएशनकडून रवींद्रनाथ टागोरांना चीनमध्ये व्याख्यानमाला देण्यासाठी आमंत्रित केले गेले. युनिव्हर्सिटीज लेक्चर असोसिएशन ही संस्था लियांग छिछाव (Liang Qichao) यांनी त्साय युआनपेई, लिन चांगमिन, चांग युआनचि आणि चीनमधील इतर नामवंत बुद्धिजीवींना सोबत घेऊन सप्टेंबर 1920 मध्ये स्थापन केली. आधुनिक विचारसरणीतील श्रेष्ठ आणि मोलाचे विचार चीनमधील लोकांपर्यंत पोहोचवणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. यासाठी संस्थेकडून दरवर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांना चीनमध्ये आमंत्रित करून देशभर व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येत असे. रवींद्रनाथ टागोरांच्या आधी या संस्थेने जॉन ड्यूई (John Dewey), बाँड रसेल (Bertrand Russell) आणि हान्स ड्रिश (Hans Driesch) या दिग्गज विचारवंतांना चीनमध्ये व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले होते.
चीनभेटीचे आमंत्रण मिळाल्याचा टागोरांना अतिशय आनंद झाला. भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींमधले मैत्रीचे अनुबंध पुनरुज्जीवित करण्याची ही चांगली संधी आहे, असा त्यांना विश्वास वाटला. मात्र, त्यासोबतच चीनला खरोखरच भारतातून आलेला पाहुणा हवा आहे का, अशी शंका तसेच चिनी लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतील अशी काळजीही त्यांना वाटली. टागोरांच्या चीन दौऱ्याचे नियोजन करण्यात टागोरांचे सेक्रेटरी एल. के. एल्म्हर्स्ट आणि टागोरांच्या चीनच्या दौऱ्यादरम्यान दुभाषाची जबाबदारी सांभाळणाऱ्या श्यू चिळमो (Xu Zhimo) या तरुण चिनी कवीची महत्त्वाची भूमिका होती. 1923च्या जुलैमध्ये टागोरांना लिहिलेल्या पत्रात 'मी आपल्या चीनभेटीची आतुरतेने आणि उत्साहाने वाट पाहत आहे', असे त्याने नमूद केले. चीनच्या दौऱ्यासाठी लिहिलेल्या इंग्रजी भाषणांचा मसुदा चिनी भाषेत भाषांतरित करण्यासाठी अगोदर पाठवण्याची विनंतीही त्या वेळी त्याने टागोरांना केली. मात्र, 62 वर्षीय टागोरांची तब्येत ढासळल्याने ऑक्टोबर 1923चा पूर्वनियोजित चीनदौरा एप्रिल 1924 पर्यंत पुढे ढकलण्यात आला. डिसेंबर 1923 मध्ये लिहिलेल्या पत्रात श्यू चिळमोने टागोरांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांच्या स्वागतासाठी चीनमध्ये करण्यात येत असलेल्या तयारीविषयीही लिहिले. 'जवळपास सर्व वृत्तपत्रे आणि मासिकांमध्ये तुमच्यावर लेख छापून आले आहेत. तुमचे इंग्रजीमधील सर्व साहित्य चिनी भाषेत अनुवादित झालेले असून काही पुस्तकांच्या तर एकाहून अधिक आवृत्त्या उपलब्ध आहेत. तुमच्याबद्दल आमच्या तरुणाईला जितकी उत्सुकता वाटते तितकी आतापर्यंत इतर कोणत्याही पौर्वात्य अथवा पश्चिमात्य लेखकाबद्दल वाटलेली नाही'. श्यू चिळमो याची पत्रे वाचून टागोरांच्या मनातली काळजी मिटून त्याचे रूपांतर अधिक उत्साहात झाले असणार याबद्दल शंका नाही.
12 एप्रिल 1924 रोजी कलकत्यावरून हाँगकाँगमार्गे चीनला निघलेले जहाज शांघाय बंदराला टेकले तेव्हा टागोरांच्या स्वागताला श्यू चिळमो, चांग च्युनमाय, चंग चनतुओ, इ. चिनी अभ्यासक, त्याचबरोबर चीनमध्ये स्थायिक झालेले काही भारतीय आणि जपानी लोक, असे सुमारे तीसहून अधिक लोक उपस्थित होते. टागोरांचे फुलांचे हार घालून मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने स्वागत करण्यात आले. टागोरांच्या सोबतीला एल. के. एल्म्हर्स्ट, कालिदास नाग, क्षितिमोहन सेन, नंदलाल बोस इ. शिष्टमंडळ होते. 12 एप्रिल ते 29 मे या पन्नास दिवसांच्या चीनदौऱ्यात टागोरांनी शांघाय, हांगचौ, नानचिंग, चिनान, थिएनचिन, बीजिंग, थाययुआन, बुछांग इ. शहरांना भेटी दिल्या. शांघायमधील शीख समुदाय, जपानी समुदाय, अँग्लो-अमेरिकन असोसिएशन, बुद्धिस्ट असोसिएशन, विविध प्रांतांच्या शिक्षणसंस्था, साउथईस्ट विद्यापीठ, छिंगह्वा विद्यापीठ, सम्राट फुयी, चित्रकार आणि कवी याओ ह्वा, पेकिंग ऑपेरा नट मेई लानफांग अशा अनेकांच्या भेटी घेतल्या. तिथे त्यांनी जवळपास तीसहून अधिक लहानमोठी भाषणे केली. इंग्रजी भाषा समजणारे फार कमी लोक असल्याने त्यांची भाषणे चिनी भाषेत अनुवादित करून ऐकवण्यात येत असत. टागोरांची भाषणे ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने श्रोते उपस्थित राहत होते. काही वेळा तर सभागृहात प्रचंड गर्दी झाल्याने त्यांना मैदानात जाऊन भाषण करावे लागले. टागोरांची चीनमधील अफाट लोकप्रियता यासाठी कारणीभूत होती. टागोरांचा 63 वा वाढदिवसदेखील चीनदौऱ्यादरम्यान साजरा करण्यात आला. लियांग छिछाव यांनी वाढदिवसाची भेट म्हणून टागोरांना 'चू चनतान' हे चिनी नाव देऊ केले.
चीनमध्ये टागोरांबद्दलच्या प्रेमाची लाट उसळण्यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण होते त्यांचे नोबेल पारितोषिक. 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' या कवितासंग्रहाला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळणारे रवींद्रनाथ पहिले आशियायी ठरल्याने अवघ्या जगाचे या घटनेकडे लक्ष वेधले केले. त्याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 'तोंगफांग चाचिळ' म्हणजेच 'द ईस्टर्न मिसलनी' या शांघायमधील मासिकात टागोरांवरती चिनी भाषेत पहिला लेख छापून आला. टागोरांच्या तत्त्वज्ञानाची, सुख-दुःख-प्रेम-जीवनविषयक विचारांची तोंडओळख करून देणारा लेख प्राचीन चिनी साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक छिएन चिळशिऊ (Qian Zhixiu) यांनी लिहिला होता. 1915 मध्ये सप्टेंबर महिन्यात नुकत्याच सुरू झालेल्या 'छिंगनिएन चाचिळ' म्हणजेच 'La Jeuness' या मासिकात टागोरांच्या 'गीतांजली'मधील निवडक चार इंग्रजी कवितांचा (अनुक्रमे 1, 2, 25 आणि 36) क्लासिकल चायनीजमध्ये केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. लक्षणीय बाब म्हणजे टागोरांच्या कवितांचा हा पहिलावहिला चिनी अनुवाद चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक छन तुशिऊ (Chen Duxiu) यांनी केला होता. 'La Jeuness' या मासिकाला नंतर चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र बनवण्यात आले. अनुवादाच्या जोडीने टागोरांची थोडक्यात ओळख करून देताना छन म्हणतात, 'भारतातील आधुनिक कवी टागोर यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना युरोपमध्ये मोठी कीर्ती लाभली आहे. पूर्वेकडील आध्यात्मिक संस्कृतीचा पुरस्कार करणारे विचारवंत टागोर भारतीय तरुणांचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कवितांमध्ये धार्मिक व तात्त्विक आदर्शाची समृद्ध अभिव्यक्ती दिसून येते' छन यांच्या टिपेमध्ये नोबेलच्या साहित्य पुरस्काराची शांतता पुरस्काराशी गफलत केलेली दिसून येते.
टागोरांच्या अगदी सुरुवातीच्या चिनी चाहत्यांमध्ये कुओ मोरुओ (Guo Moruo) यांचे नाव प्रामुख्याने समोर येते. जपानमध्ये उच्च शिक्षण घेत असताना टागोरांच्या इंग्रजी कविता कुओ मोरुओ यांच्या वाचनात आल्या आणि त्या कवितांच्या सौंदर्याने ते झपाटून गेले. टागोरांची लेखनशैली त्यांना इतकी भावली की, त्याच शैलीत त्यांनी स्वतः अनेक कविता रचल्या. त्यांच्याप्रमाणेच विसाव्या शतकातील आघाडीच्या चिनी लेखिका आणि कवयित्री पिंग शिन (Bing Xin) यांनी टागोरांच्या 'स्ट्रे बर्ड्स' या काव्यसंग्रहाने प्रभावित होऊन टागोरांच्या शैलीत 'अ मेझ ऑफ स्टार्स' आणि 'स्प्रिंग वॉटर' हे दोन चिनी कवितासंग्रह लिहिले. टागोरांचे कवितासंग्रह आणि इतर साहित्य चिनी भाषेत अनुवादित करण्यात कुओ मोरुओ, पिंग शिनसोबतच चंग चनतुओ (Zheng Zhenduo) आणि वू यान (Wu Yan) इ. लेखक आघाडीवर होते. त्यामुळे चीनमध्ये टागोरांचा मोठा वाचकवर्ग आणि चाहतावर्ग तयार झाला.
चीनमधील कवी, लेखक, राजकारणी सारेच टागोरांच्या चीनदौऱ्यावर पूर्ण लक्ष देऊन होते. टागोर चीनमध्ये येण्यापूर्वी, चीनमध्ये असताना आणि भारतात परत गेल्यावर अशा संपूर्ण कालावधीत अनेक चिनी अभ्यासकांनी वर्तनपत्रांमध्ये, मासिकांमध्ये टागोर यांच्या भेटीबद्दल मत व्यक्त करणारे लेख लिहिले. काही लेखांनी टागोरांचे हर्षभराने स्वागत केले, काहींनी जरा शंकेचा आणि निषेधाचा सूर व्यक्त केला, तर काहींनी अगदी प्रखर टीकादेखील केली.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, टागोर 1 ऑक्टोबर 1923 रोजी चीनमध्ये दाखल होणार होते. त्या पार्श्वभूमीवर अनेकांनी टागोरांचे जीवन, साहित्य याची ओळख करून देणारे लेख लिहिण्यास सुरुवात केली. 'टागोरांचे स्वागत आहे' या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात टागोरांच्या साहित्याचे आघाडीचे अनुवादक चंग चनतुओ यांनी टागोरांच्या चीनभेटीबद्दल आनंद व्यक्त केला. ते लिहितात, 'टागोरांचे लवकरच चीनमध्ये आगमन होणार आहे. हे मासिक वाचकांच्या हाती पडेल तेव्हा कदाचित टागोरांनी चीनच्या भूमीवर पाय ठेवले असतील. प्रवासाने थकलेले साध्या भारतीय पोशाखातले टागोर बोटीतून उतरतील तेव्हा आम्ही प्रेमभराने दोन्ही हात पसरून धावत जाऊन त्यांचे स्वागत करू. टागोर जेव्हा त्यांच्या धीरगंभीर आवाजात भाषण
करतील तेव्हा आम्ही मन लावून ऐकू आणि टाळ्यांचा कडकडाट करू. काळ्याकुट्ट अंधाऱ्या खोलीत अचानक प्रकाशाची तिरीप यावी त्याप्रमाणे टागोर आमच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येत आहेत. भौतिकतेच्या पाशात अडकलेल्या काटेरी दुनियेत त्यांनी कवितांचा अद्भुत स्वर्ग उभारला आहे. असा हा थोर मानवतेचा पुजारी आणि शांतीचा दूत आपल्याकडे येतो आहे. त्यांच्याप्रति आमच्या मनात असलेला आदर, प्रेम आणि सदिच्छा आम्ही कशा व्यक्त करू ! त्यांचे कितीही जल्लोषाने स्वागत केले तरी ते अपुरेच आहे'. टागोरांच्या साहित्याने विशेषतः त्यांच्या कवितांनी प्रचंड भारावून गेलेल्या चिनी लेखकाची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. जगातील युद्धखोरीविरुद्ध ठाम भाष्य करणाऱ्या टागोरांकडे हलाखीत जगणाऱ्या चिनी जनतेचा तारणहार म्हणून ते मोठ्या आशेने बघत आहेत.
टागोरांशी नियमित पत्रव्यवहार करणारा तरुण चिनी कवी श्यू चिळमो 10 सप्टेंबर 1923 रोजी लिहिलेल्या लेखात म्हणतो, 'टागोरांचे नाव चीनमधील सर्वांना केवळ ठाऊक आहे इतकेच नाही, तर ते अतिशय आदराने घेतले जाते. जर कोणत्याही दहा-बारा वर्षांच्या मुलाला कोणाच्या इंग्रजी कविता वाचायला आवडतात असे असे विचारले तर तो लगेचच टागोरांचे नाव घेईल'. श्यू चिळमो टागोरांना आपला मार्गदर्शक आणि आदर्श मानतो. चीनमधील तरुणांच्या मनाला दिलासा देण्याचे आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देण्याचे काम टागोर करतील असा विश्वास तो लेखात व्यक्त करतो. टागोरांबद्दल आणि ब्रिटिश राजवटीखालील भारताबद्दल फारसे चांगले मत नसणाऱ्यांना उद्देशून तो लिहितो, 'अनेक जण भारताला एक 'पराभूत देश' म्हणून हलक्या दर्जाचे समजतात. परंतु, भारतानेच खऱ्या अर्थाने आपल्याला आत्ममुक्ती आणि आत्मतेज या संकल्पना शिकवल्या आहेत. गांधी आणि टागोर या दोन व्यक्ती भारताच्या झळाळत्या आत्मतेजाचे प्रतीक आहेत'. लेखाच्या शेवटी टागोरांच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करताना तो म्हणतो, 'टागोरांचे मित्र एल्म्हर्स्ट यांनी मला कळवले की, टागोरांची प्रकृती खालावली आहे. टागोर चीनला येतील तेव्हा आपण सर्व त्यांची नीट काळजी घेऊ या. काही भाषणे रद्द करावी लागली तरी चालेल. भाषणे करताना त्यांची दमणूक होऊ नये, संवाद साधताना त्यांना त्रास होऊ नये अशी काळजी घेऊ या. इतके वय झाले असूनही, टागोर इतक्या उत्साहाने आपल्या भेटीस येत आहेत. त्यांना इथे घरच्यासारखे वाटावे यासाठी आपण सारे प्रयत्न करू या'. टागोरांबद्दल इतकी आपुलकी बाळगणारा श्यू चिळमो संपूर्ण चीनदौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबतीने फिरला. 1924च्या चीनभेटीमध्ये 27 वर्षीय श्यू चिळमो आणि 63 वर्षीय टागोर यांच्यात स्नेहाचे आणि मैत्रीचे अनोखे नाते जुळले आणि पुढे कायम राहिले.
चंग चनतुओ आणि श्यू चिळमोंसारखे अनेक कवी/लेखक टागोरांच्या स्वागतासाठी इतके आसुसलेले असताना, कुओ मोरुओ ह्या लेखकाने मात्र सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी आणि बाहेरील देशातील विद्वानांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आयोजित केलेल्या अशा व्याख्यानमालिकांच्या उपयोगितेवर शंका उठवली. तो लिहितो, 'ड्युई गेले, रसेल आले, रसेल गेले, ड्रिश आले, या विद्वानांनी नेमके काय मागे ठेवले? भाषणांचे काही कागद?' टागोरांच्या आगामी चीनभेटीबद्दल तो लिहितो, 'आपण टागोरांना नेमके कशासाठी बोलावले आहे? ते पूर्वेचे कवी आहेत म्हणून त्यांना प्रेमाने आमंत्रण धाडले आहे की, ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत, त्यांना ब्रिटिशांकडून 'सर' ही पदवी मिळाली आहे म्हणून त्यांचे आदरातिथ्य करणार आहोत? (टागोरांनी 'सर' पदवी परत केली हे कुओ मोरुओ विसरला असावा.) टागोरांच्या तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास कोणी केला आहे का? त्यांचे विचार आपल्या समस्यांवर तोडगा काढायला कसे मदत करतील याचा अभ्यास कोणी केला आहे का? असे झाले नसेल तर कर्जबाजारी चीनने स्वखर्चाने अशा जागतिक कीर्तीच्या विद्वानांना व्याख्यानमालांसाठी बोलावणे म्हणजे केवळ अशा व्यक्तींचे नाहक दैवतीकरण करणे आणि आपल्या कीर्तीचा खोटा बडेजाव करणे आहे'. टागोरांना बोलवण्यामागे लियांग छिछाव गटाचा काही छुपा राजकीय हेतू तर नाही ना, अशी शंकाही तो लेखाच्या शेवटी व्यक्त करतो. 'टागोर जर स्वयंप्रेरणेने चीनमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पण, जर त्यांना बोलावणाऱ्या संस्थेचा त्यामागे आणखी काही हेतू असेल आणि ते टागोरांना आपल्या हातातील बाहुले बनवण्याच्या मागावर असतील तर मात्र आपण सावध राहायला हवे.
सुरुवातीच्या काळात टागोरांच्या साहित्याची चिनी वाचकांना ओळख करून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे आधुनिक चिनी साहित्यिक माओ तून (Mao Dun) यांनी 12 एप्रिल रोजी टागोरांचे चीनमध्ये आगमन झाले त्या रात्री 'टागोरांकडून आमच्या अपेक्षा' नावाचा लेख लिहिला. ते लिहितात, 'टागोरांचा आम्हाला अतिशय आदर वाटतो. दुर्बलांसाठी आणि शोषितांसाठी आवाज उठवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देणाऱ्या आणि भारतीय तरुणांना साम्राज्यवादी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या देशप्रेमी टागोरांचा आम्हाला अतिशय आदर वाटतो. म्हणूनच आम्ही टागोरांचे स्वागत करतो. मात्र, केवळ पौर्वात्य संस्कृतीची भलामण करणाऱ्या आणि कवितांच्या कल्पनारम्य जगात आमच्या तरुणांना गुंगवणाऱ्या टागोरांचे चीनमध्ये मुळीच स्वागत नाही. बाहेरील देशांकडून थोपवला गेलेला साम्राज्यवाद आणि देशांतर्गत लष्करशहांची (warlords) युद्धखोरी आणि दडपशाही यांच्या कचाट्यात आजचा चीन सापडलेला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सशस्त्र क्रांतीवाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच तुम्ही आमच्या तरुणांना पौर्वात्य संस्कृतीच्या पोकळ बाता सांगून, त्यांना कवितांच्या कल्पनारम्य जगात रममाण राहायला शिकवू नका. कवीच्या शब्दांत किती ताकद असते हे आम्ही जाणतो. म्हणूनच टागोरांकडून आमच्या दोन अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा ही की, तुम्ही आमच्या तरुणांना कल्पनाविश्वातून बाहेर काढून सद्यःस्थितीचे भान द्या, 'एकला चलो रे'चा नारा देऊन लढण्याचे बळ द्या. दुसरे म्हणजे पश्चिमेच्या साम्राज्यवादाचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाचे बळ फुंका'. लेखाच्या शेवटी माओ तून यांनी टागोरांच्या 'एकला चलो रे' या बंगाली कवितेचा चिनी स्वैर अनुवाद लिहिला.
दुर्दैवाने, माओ तून यांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षांची पूर्तता झाली नाही. 16 मे रोजी छापून आलेल्या लेखात ते लिहितात, 'टागोरांच्या शांघाय, हांगचौ, नानचिंग, चिनान आणि बीजिंगमधील भाषणांनी माझी घोर निराशा झाली आहे. शांघायला एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत टागोर म्हणतात, 'मी इथे पौर्वात्य संस्कृतीची महती गाण्यासाठी आलो आहे'. भाषणांमध्ये ते आपल्याला पुन्हा पुन्हा आवाहन करतात की, आपण आपली मौल्यवान संस्कृती सोडून पश्चिमेच्या वाईट आणि कुरूप संस्कृतीचे अनुकरण करू नये. हे सांगताना ते पश्चिमात्य संस्कृतीने बनवलेल्या कारखान्यांनी चीनमधील सुंदर शेते आणि कुरणे कशी उद्ध्वस्त केली आहेत याचे उदाहरण देतात. शांघायमधील भाषणात त्यांनी व्यासपीठावर पश्चिमात्य संस्कृतीचा धिक्कार करणारी अतिशय भावुक कवितादेखील केली. पण, पौर्वात्य संस्कृती म्हणजे नेमके काय हे माझ्यासारख्या चीनमधल्या पौर्वात्य माणसाला अजूनही अजिबात कळलेले नाही. सुंदर शेते आणि कुरणे म्हणजे पौर्वात्य संस्कृती का? पौर्वात्य संस्कृतीची नेमकी व्याख्या मला चीनमधल्या कोणत्याही पुस्तकात सापडलेली नाही. टागोर किमान आपल्या भाषणांमध्ये त्याबद्दल स्पष्टपणे सांगतील अशी अपेक्षा होती; पण हाती केवळ निराशाच आली आहे. शारीरिक आणि बौद्धिक बळाच्या जोरावर पश्चिमात्यांनी पूर्वेला गुलाम बनवले आहे असे टागोर म्हणतात. भारतीय आणि चिनी माणसांपेक्षा पश्चिमेतील माणसे अधिक बलदंड आणि बुद्धिवान आहेत असे मला अजिबात वाटत नाही. टागोरांची भाषणे म्हणजे अतिशय तर्कहीन अशा पोकळ बाता आहेत'.
टागोरांच्या 'गीतांजली' मधील काही कवितांचे चिनी अनुवाद करून चिनी वाचकांना टागोरांच्या साहित्याची सर्वप्रथम ओळख करून देणारे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक छन तुशिऊ यांनीदेखील टागोरांच्या भाषणांवर कडवी टीका केली. 25 एप्रिल रोजी लिहिलेल्या लेखात शांघाय आणि हांगचौ येथील टागोरांच्या भाषणाबद्दल ते म्हणतात, 'टागोरांची या दोन ठिकाणांची भाषणे वरवर साधी सोपी वाटली तरी त्यातून दोन मोठे गैरसमज ते पसरवत आहेत. पहिला गैरसमज म्हणजे 'वैज्ञानिक आणि भौतिक प्रगती मुळातच वाईट असून आपण तिला नाकारले पाहिजे आणि पूर्वेच्या आध्यात्मिक शक्तीचा पुरस्कार केला पाहिजे'. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीचा पश्चिमेच्या काही राष्ट्रांनी केलेला गैरवापर विज्ञान आणि भौतिकवादाला वाईट ठरवू शकत नाही. ज्यांच्याकडे अन्न, वस्त्र या किमान गरजांची ददात आहे त्यांना तुम्ही आध्यात्मिक शक्तीचे कसले डोस पाजता आहात ? राजदरबारातले उन्मत्त सम्राट आणि सरदार, पावले करकचून बांधून ठेवलेल्या स्त्रिया, राजदरबारात नोकरी करण्यासाठी अर्थहीन स्तुतिपर कवने पुन्हा पुन्हा गाणारे भाट बनवणाऱ्या अशा कोणत्या पारंपरिक पौर्वात्य संस्कृतीचे तुम्ही गोडवे गात आहात? बॉम्बचा स्फोट लोकांचा संहार करू शकतो तसाच तो खडकाळ डोंगरात रस्ताही तयार करू शकतो. रेल्वेगाड्या सैन्याची ने-आण करू शकतात तसेच त्या दुष्काळी भागातील लोकांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी धान्याचा पुरवठाही करू शकतात. चीनमध्ये वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीचा अभाव असल्यानेच आज त्याच्या दुर्बलतेचा पश्चिमेकडील देश फायदा घेऊ शकत आहेत. पूर्वेकडील लोकांच्या शोषणासाठी इथली समाजव्यवस्था आणि संपत्तीचे असमान वितरण कारणीभूत आहे. दुसरा गैरसमज म्हणजे 'माणसांमधले आपापसांतले प्रेमच या जगाला वाचवू शकते'. कन्फ्यूशिअस हजारो वर्षांपासून प्रेमाचा संदेश देतो आहे, येशू हजारो वर्षांपासून प्रेमाचा संदेश देतो आहे, मग तरीही आज जगात माणसे का मारली जात आहेत? जगातील युद्धांसाठी युरोप आणि अमेरिकेतील भांडवलशाही व साम्राज्यवाद कारणीभूत आहे. टागोरांचा प्रेमाचा संदेश युरोप आणि अमेरिकेला भांडवलशाही आणि साम्राज्यवादाचा त्याग करून कमजोर देशांचे शोषण करण्यासापासून थांबवू शकतो का? व्यावहारिक दृष्टीकोनाचा अभाव असलेला हा संदेश अतिशय पोकळ आणि टाकाऊ आहे'.
छन तुशिऊच्या मते, टागोर करत असलेला जागतिक शांतीचा प्रचार म्हणजे चिनी तरुणांना साम्राज्यवादाविरोधात शरणागती पत्करायला सांगण्यासारखे होते. टागोरांच्या दोन महिन्यांच्या चीनच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी टागोरांवर टीका करणारे तब्बल अकरा लेख लिहिले. 'शिळ आन' या टोपण नावाखाली लिहिलेले काही लेख तर फक्त 100 शब्दांचे होते आणि अतिशय हलक्या पातळीवर जाऊन लिहिलेले होते. 28 मे राजी लिहिलेल्या 'टागोरांचा मूर्खपणा' या लेखात ते लिहितात, 'पौर्वात्य संस्कृतीचे गुणगान गाणारा हा कवी आपल्या तरुणांच्या विचारसरणीवर चुकीचा परिणाम टाकेल या भीतीने आम्ही टागोरांचा विरोध करतो. बीजिंगमध्ये आल्यापासून ते एकही धड वाक्य बोललेले नाहीत. उलट, छिंग राजवटीचा पदच्युत सम्राट, बौद्ध भिक्षु, भिक्षुणी, ऑपेरातले नट-नट्या अशा भलत्यासलत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. हा काय मूर्खपणा चालवला आहे?' टागोरांचे मागास आणि रूढीवादी विचार आपल्याला शंभर वर्षे मागे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. टागोरांच्या भाषणासाठी जमलेल्या सात हजार विद्यार्थ्यांच्या जमावामध्ये 'या म्हाताऱ्याला घरी परत पाठवा', असे लिहिलेली पत्रके वाटण्यामध्येही छन तुशिऊ यांचाच हात होता.
यापैकी एक पत्रक नेमके टागोरांच्या हाती लागले. चिनी भाषेतल्या त्या पत्रकाचे त्यांनी श्यू चिळमो याला इंग्रजीत भाषांतर करायला सांगितले. टागोरांवर छन तुशिऊ आणि त्यांच्या वर्तुळाकडून होणाऱ्या टीकेची श्यू चिळमोला पूर्ण कल्पना होती. टागोरांच्या हातातले ते पत्रक पाहून त्याला अतिशय लाज वाटली. त्याने त्याचे भाषांतर करण्यापासून कशीबशी सुटका करून घेतली. मात्र, एका जपानी सहकाऱ्याच्या मदतीने टागोरांनी त्याचा इंग्रजी अनुवाद करून घेतलाच. पत्रकात लिहिलेल्या मजकुराचा सारांश नंतर कलकत्त्याच्या 'बंगाली' या मासिकातही प्रकाशित केला गेला :
1. प्राचीन पौर्वात्य संस्कृतीचा जाच आम्ही भरपूर सोसला आहे. स्त्री-पुरुष असमानता, सम्राटाचे दैवतीकरण, सामान्य जनतेचे शोषण, सरंजामशाही, सामाजिक उतरंड, परंपरांचे अंधानुकरण आणि बरेच काही. टागोर असल्या बुरसटलेल्या आणि मागास संस्कृतीचा पुरस्कार करत आहेत म्हणून आम्ही त्यांना विरोध केलाच पाहिजे.
2. आम्ही जेव्हा आधुनिक संस्कृतीने केलेल्या प्रगतीकडे बघतो तेव्हा आम्हाला अतिशय शरम वाटते. पूर्णपणे मानवी श्रमांवर आधारलेली शेती, यंत्रांच्या साहाय्याशिवाय हाताने केलेले उत्पादन, निकृष्ट दर्जाची वाहने, मागास मुद्रणव्यवस्था, खराब रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव हे सारे आम्हाला बदलायचे आहे. आम्हाला आमच्या संस्कृतीचे आधुनिकीकरण करून प्रगती करायची आहे, म्हणून आम्ही टागोरांचा विरोध करतो.
3. पूर्वेकडील तथाकथित आध्यात्मिक संस्कृती प्रत्यक्षात अंतर्गत यादवी युद्धे, स्वार्थी आक्रमणे, ढोंगीपणा, फसवणूक, लूटमार, दुष्ट राजसत्ता आणि स्त्रियांचे पाय बांधणे यांसारख्या अमानवी प्रथांनी भरलेली आहे. आमच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या या संस्कृतीचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो.
4. आज परकीय आक्रमणे आणि देशातील ठिकठिकाणच्या सशस्त्र शिपायांच्या जाचाखाली सामान्य चिनी माणसाचे आयुष्य धोक्यात आले आहे. अशा वेळी टागोर आम्हाला राष्ट्रवाद आणि राजकारण सोडून आध्यात्मिक सांत्वन देण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्यःस्थितीकडे काना डोळा करून आध्यात्मिक मार्गात रमणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे आहे. अशा गोष्टींचा पुरस्कार करून आमच्या देशाचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या टागोरांना आम्ही विरोध केलाच पाहिजे.
5. ताओवाद आणि बौद्ध धर्माचा पुरस्कार करणाऱ्या 'थोंग शान स्पिरिच्युअल सोसायटी' सारख्या संघटनांप्रति टागोर सहानुभूती दाखवतात. टागोर भाषणांमध्ये पुन्हा पुन्हा सांगत असलेल्या 'स्वर्ग', 'देव', 'आत्मा' वगैरे संकल्पना खरोखरच मानवाची दुःखातून मुक्तता करत असतील तर जग सुधारण्यासाठी मानवी प्रयत्नांची गरज काय ? अन्यायाविरोधात शोषितांनी उभारलेल्या संघर्षाला अडथळे निर्माण करणाऱ्या टागोरांचा आम्ही विरोध करतो.
टागोरांचा नेमका कोणत्या कारणांसाठी विरोध केला जात होता हे अधिक खोलात जाऊन समजून घेण्यासाठी चीनमधील राजकीय आणि वैचारिक पार्श्वभूमीबद्दल थोडे जाणून घेतले पाहिजे. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाल्यावर व्हर्सायच्या करारावर सह्या करण्यात आल्या. ह्या करारानुसार, जर्मनांच्या ताब्यात असलेला चीनमधील शानतोंग नावाचा प्रदेश चीनला परत न मिळता मित्रराष्ट्रांकडून तो परस्पर जपानकडे सोपवण्यात आला. ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी 4 मे 1919 रोजी बीजिंगमध्ये विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली आणि साम्राज्यवादाविरुद्धच्या क्रांतीची ठिणगी पेटली. या चळवळीला 'मे फोर्थ मूव्हमेंट' असं म्हणतात. मे फोर्थ मूव्हमेंटच्या आधी चीनमध्ये 'न्यू कल्चर मूव्हमेंट' देखील सुरू झाली होती. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमध्ये त्या चळवळीनेही अधिक जोर धरला. न्यू कल्चर मूव्हमेंटच्या छन तुशिऊ, हु शिळ, लि ताचाव, लू श्यून इ. आघाडीच्या तरुण नेत्यांनी चिनी समाजाच्या तत्कालीन अवस्थेसाठी चीनमधील जुन्या संस्कृती आणि परंपरांना जबाबदार धरले. कन्फ्यूशिअसच्या तत्त्वज्ञानाला 'मागास' घोषित करून त्यावर बहिष्कार टाकण्यात आला. डबघाईला आलेल्या देशाचे विज्ञान आणि आधुनिकीकरणानेच रक्षण होऊ शकते अशी त्यांची खात्री पटली. तरुणाईत मार्क्सवादाचे क्रांतिकारी वारे वाहू लागले.
'मे फोर्थ मूव्हमेंट' आणि 'न्यू कल्चर मूव्हमेंट' नंतर चीनने आपल्या प्रगतीसाठी पश्चिमेचे अनुकरण करावे की नाही, असा मोठा वाद चीनच्या वैचारिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाला. 1924 मध्ये टागोर चीनभेटीस आले त्या वेळी या वादामुळे चिनी अभ्यासकांमध्ये प्रचंड फूट पडली होती. लियांग छिछाव, लियांग शूमिंग आणि तु याछवान यांच्या गटाने पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यास विरोध केला. त्याऐवजी त्यांनी चीनमधील पारंपरिक संस्कृतीचा आणि मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांनी नवे आणि जुने, पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाचा आग्रह धरला. याउलट छन तुशिऊ, हु शिळ, लि ताचाव यांच्या नेतृत्वाखालील गटाने पूर्वेकडील सरंजामशाही संस्कृतीचा त्याग करून पाश्चिमात्य संस्कृतीकडून शिकण्याचे आणि भौतिक सुविधांचा विकास करून प्रगती साधण्याचे समर्थन केले. रशियातील ऑक्टोबर क्रांतीने प्रभावित झालेल्या या नेत्यांना चीनमध्येही अशाच प्रकारची क्रांती घडवून आणायची होती.
चिनी अभ्यासकांमध्ये पौर्वात्य आणि पश्चिमात्य संस्कृतींबद्दल जसे तीव्र मतभेद दिसून येत होते तसेच 'समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान वापरावे की तत्त्वज्ञान' हा वादही मोठ्या प्रमाणात सुरू होता. या वादात तीन प्रमुख विचारप्रवाह दिसून येतात. पहिला होता लियांग छिछाव आणि चांग च्युनमाय यांच्या नेतृत्वाखालील तत्त्वज्ञानवादी गट. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीचे विचार स्वतंत्र असतात. त्यामुळे विज्ञान केवळ भौतिक जीवनाचे मार्गदर्शन करू शकते; पण आध्यात्मिक जीवनाचे मार्गदर्शन करण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. चीनची आध्यात्मिक संस्कृती पाश्चिमात्य भौतिक संस्कृतीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असे त्यांचे मत होते. हु शिळ आणि तिंग वनच्यांग यांच्या नेतृत्वाखालील विज्ञानवादी गटाच्या मते, भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे एकमेकांपासून वेगळे नसून ते दोन्ही एकसंध आहे आणि दोन्हींची प्रगती विज्ञानानेच साधली जाऊ शकते. छन तुशिऊ आणि छ्यू छिऊपाय या मार्क्सवादी नेत्यांच्या तिसऱ्या गटाने तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक जीवन या संकल्पनांनाच पूर्णपणे नाकारले आणि विज्ञानाचा अधिक कडवा पुरस्कार केला. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीनेच चीनचा उत्कर्ष होऊ शकतो असे त्यांचे ठाम मत होते.
1924 मध्ये चीनचा दौरा करणारे टागोर नकळत या वादात ओढले गेले. टागोरांना बीजिंग येथील युनिव्हर्सिटीज लेक्चर असोसिएशनकडून चीनमध्ये व्याख्याने देण्यासाठी येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नाकारून पौर्वात्य संस्कृतीतील मूल्यांचे महत्त्व सांगणारे आणि भौतिकता आणि विज्ञानापेक्षा आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला अधिक महत्त्व देणारे लियांग छिछाव या असोसिएशनचे अध्यक्ष होते. टागोरांच्या चीनभेटीचा सर्वांत उत्साहाने प्रचार करणाऱ्या 'छन पाव' म्हणजे 'द मॉर्निंग पोस्ट' या चिनी वृत्तपत्राचे संस्थापकही लियांग छिछाव होते. म्हणूनच लियांग यांची विचारसरणी आणि राजकीय भूमिकेचे समर्थन करण्यासाठी त्यांनी टागोरांना चीनला बोलावले आहे असा समज लियांग यांचे कट्टर विरोधक असलेल्या छन तुशिऊसारख्या कम्युनिस्ट नेत्यांनी करून घेतला. आपल्या राजकीय शत्रूने बोलावलेल्या या पाहुण्याला ठाम विरोध केलाच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. टागोरांची चीनभेट या घटनेच्या खऱ्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले.
चीनमधील तरुण क्रांतिकारी नेत्यांचा जुन्या परंपरांना असलेला विरोध, त्यांना पश्चिमात्यांच्या प्रगतीचे असलेले आकर्षण आणि टागोरांची 'पाश्चिमात्यांच्या भौतिक संस्कृतीपेक्षा पूर्वेची आध्यात्मिक संस्कृती अधिक श्रेष्ठ आहे', ही भूमिका टागोरांवर टीका होण्यामागचे प्रमुख कारण होते असे म्हणता येईल. छन तुशिऊ वगैरेंनी आरोप केला त्याप्रमाणे पौर्वात्य संस्कृतीतील असमानतेचा पुरस्कार करणाऱ्या मागास परंपरा आणि जाचक रूढींचे टागोर कधीच समर्थन करत नव्हते. यावर भाष्य करताना टागोर आपल्या भाषणात म्हणतात, 'तुम्हा सर्वांच्या मते, मी कालबाह्य झालो असल्याने निरुपयोगी आहे. तर आमच्या लोकांसाठी मी अति आधुनिक असल्याने अप्रिय आहे. ह्यांपैकी काय खरे आहे हे मला ठाऊक नाही'. मुळात विरोधकांकडून टीकेचे लक्ष्य बनलेली 'पौर्वात्य संस्कृतीचा पुरस्कार' ही भूमिका टागोरांनी चीनमधील भाषणांमध्ये नेमकी कशासाठी मांडली हेदेखील जाणून घेतले पाहिजे.
अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन त्याच्यामागची पार्श्वभूमी आपल्या 'टागोर आणि चीन' या लेखात मांडतात. नोंद घ्यावी अशी विशेष बाब म्हणजे डॉ. अमर्त्य सेन यांचे आजोबा क्षितिमोहन सेन हे या चीनदौऱ्यात टागोरांसोबत होते. टागोरांनी चीनमध्ये पौर्वात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारी भाषणे का केली याची दोन कारणे डॉ. अमर्त्य सेन देतात. पहिले जागतिक महायुद्ध प्रचंड विनाशकारी ठरले होते. महायुद्धाचे विध्वंसक परिणाम पाहून टागोर अत्यंत व्यथित झाले. पश्चिमेकडील प्रगतीची वाटचाल माणसाला विनाशाकडे घेऊन जात आहे असे त्यांचे मत झाले. पाश्चिमात्य आक्रमकतेला पर्याय म्हणून ते पौर्वात्य आध्यात्मिक तत्त्वज्ञानाकडे बघू लागले. हव्यास, जीवघेणी स्पर्धा आणि युद्धखोर पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणारे पूर्वेकडील पारंपरिक तत्त्वज्ञान अधिक श्रेष्ठ आहे असे ते म्हणू लागले. हे झाले पहिले कारण. दुसरे कारण म्हणजे 1913चे नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर टागोरांना जगभरातील अनेक देशांकडून व्याख्यानांची आमंत्रणे येऊ लागली. इंग्लड, जर्मनी, इटली, जपान येथील दौऱ्यांदरम्यान केलेल्या भाषणांमध्ये टागोरांनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींबद्दलची त्यांची मते मांडली. टागोरांच्या भाषणांना या देशांमधून भरभरून दाद मिळाली. त्यामुळे टागोरांची ही मते अधिकच दृढ झाली. युद्धे थांबण्यासाठी, मानवतेचे रक्षण करण्यासाठी पौर्वात्य संस्कृतीच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे, असा त्यांचा ठाम विश्वास झाला. चीनमध्ये त्याच विचारांचा प्रचार करणाऱ्या भाषणांवर मात्र तेथील काही अभ्यासकांकडून कडाडून टीका करण्यात आली. भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींमध्ये मैत्रीचे अनुबंध पुनरुज्जीवित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या टागोरांवर टीकेचा भडिमार होणे ही डॉ. अमर्त्य सेन यांना अतिशय दुर्दैवाची बाब वाटली. चीनच्या दौऱ्यावरून परतल्यावर 'टॉक्स इन चायना' या भाषणांच्या संग्रहाशिवाय टागोरांनी चीनभेटीचे वर्णन करणारे इतर काहीही लिहिणे टाळले. 'टॉक्स इन चायना' या इंग्रजी पुस्तकाचा चिनी अनुवादही फार उशिरा म्हणजे अगदी 2015 मध्ये झाला. या सर्व कारणांमुळे 'टागोरांचा चीनदौरा ही एक शोकांतिका होती', असे मत डॉ. अमर्त्य सेन आपल्या लेखात व्यक्त करतात.
भारतातील 'चायना स्टडीज' क्षेत्रातले डॉ. थान चुंग हे अतिशय महत्त्वाचे अभ्यासक आहेत. थान चुंग यांना 2010 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार, तर चिनी सरकारकडून चीन-भारत मैत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. टागोरांना चीनमध्ये झालेल्या विरोधाबद्दल ते म्हणतात, 'टागोरांच्या चीनच्या भेटीदरम्यान चिनी अभ्यासकांनी दिलेल्या स्वागत करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया फारच वरवरच्या होत्या. त्यांपैकी कोणालाच टागोरांच्या कार्याची आणि विचारांची सखोल जाण नव्हती. टागोरांचे विचार कधीच एका ठरावीक साच्यात अडकून राहिले नाहीत. त्यांनी आपले विचार विविध धर्म, परंपरा आणि संस्कृतींमध्ये मुक्तपणे प्रवाहित होऊ दिले. टागोर हे केवळ महान साहित्यिक, कवी, निबंधकार, कादंबरीकार, नाटककार नव्हते; तर ते एक संत, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजकार्यकर्तेही होते. ते एक चित्रकार आणि गायक होते, तसेच त्यांनी दोन हजारांहून अधिक गीतेही रचली. भारत व बांगलादेश या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतांचे ते रचनाकार आहेत. जगात असे दुसरे उदाहरण शोधून सापडणार नाही'.
'टागोरांचा चीनदौरा एक शोकांतिका होती' या अमर्त्य सेन यांच्या मताशी ते सहमत नाहीत. ते म्हणतात, 'भारत आणि चीन या दोन महान संस्कृतींमधील बंधुभाव पुन्हा प्रस्थापित करून जागतिक आंतरराष्ट्रीय संबंधांना नवी दिशा देण्याची आशा बाळगून टागोरांनी चीनचा दौरा केला. त्या काळातील काही चिनी बुद्धिजीवींनी त्याच्याबद्दल दाखवलेली उदासीनता, अनादर, टीका, उपहास याचे टागोरांना दुःख झाले. परंतु, चीनदौऱ्यावरून परत आल्यावरही त्यांनी भारत आणि चीन संबंध सुधारण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी करत असलेले प्रयत्न थांबवले नाहीत'.
डॉ. थान चुंग यांचे म्हणणे अगदी खरे आहे. 1927 मध्ये सिंगापूर येथे भेट झालेल्या थान युनशान (थान चुंग यांचे वडील) यांना टागोरांनी शांतिनिकेतनमध्ये येऊन चिनी भाषा शिकवण्याचे आवाहन केले. 1933 मध्ये चीनमध्ये 'चायना इंडिया कल्चरल सोसायटी' स्थापन झाली तेव्हादेखील त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. 1937 मध्ये टागोरांनी डॉ. थान युनशान यांच्या सोबतीने विश्वभारतीमध्ये 'चीना भवन'ची स्थापना केली. चिनी भाषेचा अभ्यास करणारे भारतातील हे पहिले केंद्र आहे. भारत आणि चीन या दोन प्राचीन संस्कृतींनी एकत्र येऊन जगाचे नेतृत्व केले पाहिजे ही संकल्पना मांडणारे टागोर हे सर्वांत पहिल्या भारतीय विद्वानांपैकी एक होते. टागोरांच्या चीनदौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक वाद निर्माण झाले होते. काही अर्थाने वादग्रस्त ठरली असली तरी भारत आणि चीन यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी संवादाचा मार्ग खुला करणारी ही चीनभेट ऐतिहासिकदृष्ट्या नक्कीच महत्त्वाची आहे.
12 एप्रिल ते 29 में 1924 हे दोन महिने रवींद्रनाथ टागोर यांनी चीनचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली, त्यातील प्रमुख आठ भाषणांचे पुस्तक Talks in China या शीर्षकाखाली 1925 मध्ये प्रकाशित झाले. त्याला शंभर वर्षे झाली, त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आता (प्रथमच) येत आहे. तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी टागोरांच्या चीन भेटीचे औचित्य सांगणारा एक दीर्घ लेख चिनी भाषेत लिहिला होता, त्याचा मराठी अनुवादही या पुस्तकात समाविष्ट केला आहे. हे सर्व अनुवाद सानिया कर्णिक या युवतीने केले आहेत. शिवाय, टागोरांचे एका बाजूला प्रचंड स्वागत आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड टीका असा तो दौरा होता. त्या वादसंवादांचा नेमका परामर्श घेणारा विस्तृत लेखही सानियाने या पुस्तकासाठी लिहिला आहे. हे दीडशे पानांचे पुस्तक 29 मे 2026 रोजी रोजी साधना प्रकाशनाकडून येत आहे. त्या पुस्तकातील वादसंवादावरील लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या