डिजिटल अर्काईव्ह

युसूफसाब जे अनुभवत होते त्यावर दिलीपकुमार गुजराण करत होते. अभिनयाचे बारकावे रुपेरी पडद्यावर सूक्ष्मपणे नि मनस्वीपणे रेखाटत होते. दुसरं, भारतीय संस्कृतीचं मर्म युसूफसाबना कळलं होतं. राज कपूर आणि देव आनंद यांच्याबाबतीतही हे खरं आहे. भारत जो काय आहे नि जसा काय आहे तो या तिघांनी समजून घेतला होता. आम पब्लिकशी प्रामाणिक राहून तिघांनी आपापल्या शैलीत सिनेमे केले. जीवनाच्या दुःखात्म सत्याची त्यांना कल्पना होती. दुःख जगताना आत्मप्रतिष्ठा जपली पाहिजे हे त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. खरं तर हेच त्या काळातल्या हिंदी सिनेमाचं सूत्र होतं.

दिलीपकुमार हिंदी सिनेमात कसे आले ? 

यासाठी बारीकसं प्रास्ताविक करावं लागेल.

हिंदी सिनेमाचं आपल्याला धडपणे काही कळत नाही. युरोप-अमेरिकेत सगळं लिहून ठेवण्याची पद्धत आहे. सिनेमा मोठा असो वा लहान तिथं तपशीलवार नोंद ठेवली जाते. 'टेन कमांडमेंट्स', 'गॉन वुइथ द विंड', 'सिटिजन केन', 'गॉडफादर', 'शिंडलर्स लिस्ट' या चित्रपटांचं व्यवस्थित दस्तऐवजीकरण केलं जातं. आपल्याकडे तशी पद्धत नाही. सिनेमा झाला की सगळं संपलं. 'रात गई, बात गई' हे सिनेसृष्टीचं लाडकं सुभाषित. 'कागज के फूल'चा शेवटचा सीन आठवा.

जावेद अख्तर नेहमी एक आठवण सांगतात. आपल्या संघर्षाच्या काळात ते रात्री मेहबूब स्टुडियोच्या एका अंधाऱ्या खोलीत झोपायचे. खोली कसली कबाडखाना होता तो. सगळ्या जुन्यापुराण्या वस्तू नि भंगार खच्चून भरलेलं. मीनाकुमारीच्या 'पाकिजा'चा अख्खा कपडेपट तिथं धूळ खात पडला होता. साहिबजानच्या ('पाकिजा'ची नायिका) तलम, भरजरी वस्त्रांना कॅरमच्या सोंगट्यांएवढी मोठी भोकं पडली होती. तिचे दागिने काळेठिक्कर झाले होते.

जावेदसाब आपल्यापुरती वीतभर जागा साफसूफ करायचे नि धरणीला पाठ टेकवायचे. 'पाकिजा' रात्रभर गुणगुणत असायचीः 'चलो दिलदार चलो, चांद के पार चलो...'

तर दिलीकुमार सिनेमात कसे आले ?

वडिलांचा फळांचा व्यापार होता. ते 'बॉम्बे टॉकीज' कंपनीला माल पुरवायचे. एकदा फळांच्या करंड्या घेऊन पोरसवदा युसूफ 'बॉम्बे टॉकीज'ला गेला. बावीस-तेवीस वय होतं, पण दिसायचा लहान.

मालाडला 'बॉम्बे टॉकीज'चा ऐसपैस स्टुडियो होता. बाहेर आवारात युसूफ येरझारा घालत होता. देविकाराणींनी त्याला पाहिलं. देविकाराणींविषयी थोडं सांगितलं पाहिजे.

देविकाराणी या विख्यात अभिनेत्री आणि 'बॉम्बे टॉकीज'च्या मालकीण. फार भारी प्रकरण. सिनेमा निर्मिती आणि इतर बारीकसारीक तांत्रिक गोष्टी शिकायला बाई लंडनला गेल्या. तिथं त्यांना हिमांशु रॉय भेटले. दोघं प्रेमात पडले नि जर्मनीला गेले. तिथल्या सुप्रसिद्ध उफा स्टुडियोत शिकले. नंतर मुंबईला आले नि मालाडला 'बॉम्बे टॉकीज' स्टुडियो सुरू केला. स्टुडियो सुसज्ज नि अद्ययावत.

'द फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा' अशी देविकाराणींची ओळख. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या पहिल्या मानकरी. शांतारामबापू, 'न्यू थिएटर्स'चे बीरेंद्रनाथ सरकार यांना फाळके बहुमान नंतर मिळाला. देविकाराणी एक नंबर.

'तू कोण, कुठला' वगैरे चौकशी करून देविकाराणींनी युसूफला सिनेमात भूमिका देऊ केली.

ही झाली एक गोष्ट.

दुसरी : की युसूफ सरवरखान एकदा चर्चगेट स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होते. तिथं त्यांना डॉ. मसानी भेटले. डॉ. मसानी हे विख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि खान कुटुंबाचे मित्र. डॉ. मसानी देविकाराणींना भेटायला मालाडला चालले होते. युसूफला म्हणाले, "चल माझ्याबरोबर मालाडला. जमलं तर तुला सिनेमात छोटीशी भूमिका मिळवून देतो. तुझी चेहरेपट्टी चांगली आहे."

युसूफ म्हणाला, "सिनेमात काम नको. स्टुडियो पाहायला मिळेल. चला."

देविकाराणींनी युसूफला 'सिनेमात काम करशील काय?' असं विचारलं. युसूफ 'नाही' म्हणाला. जरा चाचरतच. देविकाराणींचा आब-रुबाब पाहून तो नर्वस झाला होता.

"नाही का म्हणतोएस ?"
"वडलांचा फळांचा व्यापार आहे. तेच काम करीन म्हणतो."
"तुला फळांतलं काही कळतं का?"
"नाही मॅडम, पण आस्ते आस्ते शिकतोय."
"अभिनयही शिकून घे" देविकाराणींचा स्वर आग्रही होता.

त्यांनी युसूफला महिना साडेबाराशे देऊ केले. तो काळ पाहता फार मोठी रक्कम. डॉ. मसानींनी खुणेनं 'होय म्हण' असं सुचवलं. साडेबाराशे हा वर्षाचा पगार असं युसूफला वाटलं. महिन्याचा म्हटल्यावर त्याचे डोळे विस्फारले. चंद्रमुखीला पाहून देवदासचं असंच झालं होतं.

'ज्वार भाटा' हा युसूफचा पहिला चित्रपट. रातोरात 'युसूफखान सरवरखान'चा 'दिलीपकुमार' झाला. नवं नाव त्याला अजिबात आवडलं नाही. देविकाराणींनी त्याला मनवलं. 'युसूफ, देशभर मान्य होईल असं एक नाव घे. सुटसुटीत, सोपी नावं लोकांच्या लक्षात राहतात.'

सिनेमावाले नावं ठेवण्यात तरबेज. वसंतकुमार शिवशंकर पदुकोणचा गुरूदत्त होतो. युधिष्ठिर सहानीचा बलराज साहनी नि सृष्टीनाथ कपूरचा राज कपूर झाला की, सिनेरसिकांना धन्य, धन्य वाटतं. 'बॉम्बे टॉकीज' नं मागे कुमुदचंद्र गांगुलीला अशोककुमार केलं होतंच की.

दिवसभर अभिनेता म्हणून वावरल्यानंतर दिलीपकुमार रात्री घरी परतायचे नि जगावर दार लोटून युसूफखान सरवरखानाला कवेत घ्यायचे. जत्रेत किंवा भूकंपात हरवलेले दोन भाऊ हा हिंदी सिनेमाचा बिनतोड यशस्वी फॉर्म्युला. दिलीपकुमार हे त्याचं जितंजागतं उदाहरण.

या नामांतराला उपकथानकाचं शेपूट आहे.

काहींचं म्हणणं असं की, 'दिलीपकुमार' हे नाव देविकाराणींनी नक्की केलं. विख्यात हिंदी लेखक भगवतीचरण वर्मांनी तीन नावं सुचवली होती जहांगीर, वासुदेव आणि दिलीपकुमार. देविकाराणींना तिसरं नाव आवडलं. भगवतीबाबू तेव्हा 'बॉम्बे टॉकीज'चे लेखक होते.

समजा की, देविकाबाई युसूफ भेट झालीच नसती तर? किंवा युसूफच्या वडिलांनी सिनेमाचा प्रस्ताव फेटाळून लावला असता तर? किंवा युसूफखाननं दिलीपकुमार होण्यास ठाम नकार दिला असता तर ?

मी हा प्रश्न एकदा थेट युसूफसाबनाच विचारला. फोनवर. ते म्हणाले, 'असा विचार मला कधी सुचला नाही.'

एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं युसूफसाबनी मान्य केलं होतं. संस्था मोठी, संस्थेचे अध्यक्ष नामांकित. ते युसूफसाबचे जवळचे मित्र. मला म्हणाले, 'बरोबर सकाळी अकरा वाजता फोन कर. वार्ताहरी बाजाचे प्रश्न विचारू नकोस. त्यांच्या मूडप्रमाणे बोल. ते नाजूक प्रकरण आहे काचसामान आहे. तू फोन करणारेस हे मी युसूफसाबना सांगितलंय.'

कार्यक्रमाचं निवेदन मी करणार होतो. तेव्हा पूर्वतयारीचं माझ्याकडे लागलं होतं. खरं सांगतो. पलीकडून 'हॅलो' आला नि माझ्या बरगड्या वितळू लागल्या.

युसूफसाब छान बोलत होते. कार्यक्रमाचा तपशील विचारला. मी सगळी माहिती दिली. माझं उर्दू थोडं बरं आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं. ते मला माझ्याविषयी विचारू लागले. मूड छान होता.

"लिटरेचर में दिलचस्पी रखते हो?"
मी 'जी, हुजूर' म्हणालो.

इथं एक सांगितलं पाहिजे की, हिंदी-उर्दू मंडळींशी बोलताना अधूनमधून 'जी, हुजूर' असं म्हणावं लागतं. खास करून सिनेमातल्या बुजुर्ग कलावंत, लेखकांशी बोलताना. माझ्या मराठी मित्रांना ही 'जी हुजुरी' वाटते. तसं नाहीये ते. समोरच्याला मान देण्याची ही उत्तरेची रीत आहे. याचा अर्थ गुलामी नव्हे. कमरेत वाकून 'जी, हुजूर' असा सतत जप करणारे सरदार कधी बांका प्रसंग आला की, बादशाहविरुद्ध तलवार उपसायचे.

मग 'जी, हुजूर'चं नाटक कशाला? छान प्रश्न. पण मग 'सर, यू आर वियरिंग ए नाइस शर्ट' असं बॉसला का म्हणायचं ? असो.

तर युसूफसाब.

"देविकाराणींची नि तुमची भेट झालीच नसती तर...?"
युसूफसाब म्हणाले, "खैर... ऐसा तो मैंने कभी सोचा नहीं..." मग एक मोठा पॉज. "यह ख्याल कभी जेहन में आयाही नही."
पुन्हा पॉज.
मग म्हणाले, "तू विचारतोएस तर सांगतो. मला देविकाराणी भेटल्याच नसत्या तर... लिओनार्दो दा विंचीला अॅण्ड्रिया वेरोक्कियो भेटला नसता तर?"
थोर चित्रकार नि शिल्पकार वेरोक्कियोनं 14 वर्षांच्या लिओनार्दोचे कलागुण हेरले नि त्याला शिकवलं. युसूफसाहेबांचं वाचन चौफेर होतं. भव्य, अभिजात गोष्टींचं आकर्षण होतं. लिओनार्दो विंची, मिर्झा गालिब, टागोर, बिमल रॉय, शरदबाबू, चाणक्य...

युसूफसाबचं कुटुंब मोठं. बरीच भावंडं. सगळ्यांत गुणी होता अयूब. त्याला उर्दू-इंग्रजी साहित्याचं जबरदस्त वेड होतं. पुस्तकं वाचायचा. अयूबमुळे युसूफसाबना वाचनाची सवय जडली. बलराज साहनींनी आपल्या आत्मचरित्रात ('मेरी फिल्मी आत्मकथा') अयूबविषयी लिहिलंय. अयूब अकाली गेला. युसूफसाबनी आपल्या पुतण्याचं नाव (नासीरखानचा मुलगा) अयूब ठेवलं.

बॅक टू युसूफसाब.
"एक लक्षात घे की, देविकाराणी भेटल्या नसत्या तर मी दिलीपकुमार झालो नसतो. वक्त कहो, खुदा कहो..."

एका सिनेमावाल्याला हा प्रसंग मी सांगितला. तो वैतागला. 'अहो, हे सगळं ठीक आहे हो; पण युसूफसाहेबांनी त्या अब्दुल रशीद कारदारची काय दैना उडवली. कारदारचा 'दिल दिया दर्द लिया' आठ वर्ष रखडला. युसूफसाहेब सारखे स्क्रिप्टमध्ये फेरबदल सुचवायचे. शूटिंगला यायचेच नाहीत. कारदारमियां वैतागले. 'दिल दिया दर्द लिया'नंतर त्यांनी कारदार प्रॉडक्शन्सला टाळं लावलं.'

माणूस आपल्या छातीत बरंच काही शिजवत असतो. कलावंत-लेखकांच्या बाबतीत हे जास्तच. तीव्र संवेदनशीलतेमुळे, उत्कटतेमुळे. अर्ध्यापेक्षा जास्त शेक्सपियर तोंडपाठ ही मार्लन ब्रँडोची एक बाजू. नि सेटवर तो निर्मात्यांचा आणि सह-कलावंतांचा पुष्कळ मानसिक छळ करायचा ही एक बाजू. या दोन वेगळ्या गोष्टी नसतात. सगळं एकरकमी असतं. एकदम रटमटत असतं.

श्रेष्ठ, अभिजात साहित्य वाचलं की, माणसाला आपोआप उच्च नैतिक दर्जा येतोच असं नाही. मात्र, श्रेष्ठ नैतिक मूल्यं अशी काहीतरी एक भानगड आहे हे लक्षात येतं. अन् तो कैंचीत सापडतो. रोजचा जगण्याचा रगाडा एकीकडे, दुसरीकडे श्रेष्ठ मूल्यांची भुणभुण. सगळं नकोसं वाटू लागतं. 'ऐ मेरे दिल कहीं और चल...'

युसूफसाब जे अनुभवत होते त्यावर दिलीपकुमार गुजराण करत होते. अभिनयाचे बारकावे रुपेरी पडद्यावर सूक्ष्मपणे नि मनस्वीपणे रेखाटत होते. दुसरं, भारतीय संस्कृतीचं मर्म युसूफसाबना कळलं होतं. राज कपूर आणि देव आनंद यांच्याबाबतीतही हे खरं आहे.

भारत जो काय आहे नि जसा काय आहे तो या तिघांनी समजून घेतला होता. आम पब्लिकशी प्रामाणिक राहून तिघांनी आपापल्या शैलीत सिनेमे केले. जीवनाच्या दुःखात्म सत्याची त्यांना कल्पना होती. दुःख जगताना आत्मप्रतिष्ठा जपली पाहिजे हे त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. खरं तर हेच त्या काळातल्या हिंदी सिनेमाचं सूत्र होतं.

सॉरी... फोन सुरू आहे. युसूफसाब बोलताहेत : "तुझे आवडते शायर कोण?" युसूफसाब विचारतात.
"मीर तकी मीर, मिर्झा गालिब, मोमिन... मला साहिर, मजरूह नि कैफीसाबदेखील आवडतात." "साहिर, मजरूह चांगलेच आहेत, पण साम्यवादाकडे फार झुकलेले होते", युसूफसाब म्हणतात.
"तुम्हांला साम्यवाद पटत नाही?" मला पटकन् जिया सरहदीचा 'फूटपाथ' आठवला. डाव्या विचारसरणीकडे झुकलेला. युसूफसाब हिरो होते. 'शाम-ए-गम की कसम....
"तसं नाही... राजकीय विचारसरणीसाठी काव्याला वेठीस धरू नये. तुम्हाला साम्यवादाचा प्रचार करायचा तर लेख लिहा, भाषणं द्या. शायरीला हात लावू नका... मला इंग्रजीत रॉबर्ट ब्राऊनिंग आवडतो."

एक पॉज.

युसूफसाब कार्यक्रमासंबंधी विचारतात. संयोजक मित्राची तारीफ करतात.
"हुजूर, क्या आप को एक शेर सुनावे की जुर्रत (धाडस) कर सकता हूं?" मी भीत भीत विचारतो.
"सुनाओ. देखें तुम्हारी taste क्या है."

मी शेर ऐकवतोः

गुलिस्तां में कलियां तरसती रहीं 
समंदर पे पानी बरसता रहा 

(बागेतल्या कळ्या पाण्यासाठी तडफडत होत्या पाऊस अख्खा समुद्रावर पडत होता)

युसूफसाहेब पलीकडून 'बहोत खूबसूरत... बहोत नफीस' म्हणतात.

पुन्हा एक पॉज.

'सुनो' असं म्हणतात नि आपल्या आवडीचा एक शेर ऐकवतातः

खुद अपने ही अंदर से उभरता है वह मौसम 
जो रंग बिछा देता है तितली के परों पर

(वसंत ऋतू, वसंत ऋतू आपण म्हणतो तो खरंतर आपल्या आत, आपल्या मनातच बहरलेला असतो /नि तोच फुलपाखरांच्या पंखांवर रंग अंथरतो.)

युसूफसाब कार्यक्रमाला आले, छान बोलले. त्यांच्या पत्नी सायरा बानू आल्या होत्या. युसूफसाहेब माइकवर बोलत होते. एवढ्यात सायरा बानूंनी काहीतरी खरडून चिठ्ठी माझ्याकडे दिली. मी कार्यक्रमाचं निवेदन करत होतो. युसूफसाहेबांनी चिठ्ठी वाचली. नि हसले.
सायराबाईंनी एकच शब्द लिहिला होता KISS -Keep it short, stupid. वेड्या, थोडक्यात आटप.
मध्यंतरात दिलीपसाहेबांनी हे आम्हाला सांगितलं. पंधरा-वीस मिनिटं रंगपटात बसून गप्पा मारत होते. आपल्या संयोजक मित्राशी हास्यविनोद करत होते.
निरोप घेताना माझ्याकडे वळून म्हणाले, "तुम्हारे तलफ्फुज की (उच्चारण) सेहत (तब्येत) बहोत अच्छी है."
त्या दिवशी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात मला नोबेल पुरस्कार मिळाला. जगाला हे ठाऊक नाहीए.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी