डिजिटल अर्काईव्ह

इंडिया इंडोनेशिया मित्र सेलमान्या

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, विद्यापीठात कम्युनिकेशन सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडिया फिल्म क्लब हा उपक्रम सुरू केला. त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी गौरी शिंदे दिग्दर्शित श्रीदेवीचा 'इंग्लिश विंग्लिश' हा सिनेमा दाखवला. तो बहासा इंडोनेशिया भाषेत डब केलेला असल्यामुळे मुलांना त्याचा चांगला आस्वाद घेता आला. यात एखादी स्त्री स्वयंशोध घेऊन, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून सक्षम होण्याकडे कशी वाटचाल करते हे दाखवले आहे. याला या तरुण मुला-मुलींनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रश्न विचारले. त्यातील अनेक प्रश्न अतिशय टोकदार, वास्तवाला भिडणारे होते.

भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर इंडोनेशियामध्ये पर्यटनासाठी जात असतात. इंडोनेशिया म्हटलं की प्रामुख्याने सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ती दोन ठळक नावं : एक म्हणजे जकार्ता, हे त्या देशाच्या राजधानीचं सर्वात मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आणि दुसरं ठिकाण म्हणजे बाली. बाली आणि जकार्ता सोडलं तर काही जणांना योग्यकर्ता (ज्याला जोगज्या असंही म्हणतात) ते माहीत असतं, कारण ते शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. आपल्या सगळ्यांना शालेय भूगोलामुळे इंडोनेशिया म्हणजे जावा, सुमात्रा आणि बोर्निओ (कालिमांतान) या द्वीपसमूहांनी बनलेला देश आहे, रामायणाविषयीचे नृत्यनाट्य कार्यक्रम तिथे करतात, सांस्कृतिकदृष्ट्या आपण आणि हा देश जवळचे आहोत, अशी जुजबी माहिती असते, जी मलाही होती. पण अजिबात माहिती नसलेल्या मेदान या इंडोनेशियामधल्या शहरात जाऊन शिकवण्याची चांगली संधी मला मिळाली.

इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटावर 'मेदान' नावाचं त्या देशातलं चौथ्या क्रमांकाचं मोठं शहर आहे. ही इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रांताची राजधानी आहे. तिथे उत्तर सुमात्रा विद्यापीठ (Universitas Sumatera Utara-USU) आहे. भारत आणि इंडोनेशियन सरकार यांच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राला पुढावा देण्यासाठीचा सामंजस्य करार (MOU) करण्यात आला होता. त्याचा भाग म्हणून परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (Indian Council for Cultural Relations-ICCR) (इंडिया स्टडीज-राज्यशास्त्र) स्थापन करण्यात आली आहे. 2025 मध्ये मला या उत्तर सुमात्रा विद्यापीठामध्ये आयसीसीआर चेअर प्रोफेसर म्हणून शिकवण्याची संधी मिळाली.

इंडोनेशिया या देशात उच्च शिक्षण क्षेत्राची वाढ मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 2010 मध्ये 50 लाख विद्यार्थी संख्या असलेल्या या देशामध्ये आज 90 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंडोनेशियामध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने दोन प्रवाह आढळतात : एक, राष्ट्रीय शिक्षण आणि दुसरं, धार्मिक शिक्षण. राष्ट्रीय शिक्षणामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खाजगी उच्च शिक्षण संस्थांचा अंतर्भाव होतो, त्यांच्यावर उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची देखरेख असते. तर धार्मिक मंत्रालयाच्या अखत्यारीत धार्मिक शिक्षण संस्थांचा समावेश होतो. विद्यापीठ, इतर उच्च शिक्षण संस्था, शाळा, पॉलिटेक्निक आणि अकादमी अशा उतरंडीमधून शिक्षण व्यवस्था राबविली जाते.

मेदान शहरातील या शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली. आज ते एक नामांकित विद्यापीठ झालेले आहे. अद्ययावत पायाभूत सेवा सुविधा, दर्जेदार प्राध्यापक यांमुळे हे दक्षिण आशियातील एक महत्त्वाचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. हे विद्यापीठ ब्रिक्स आणि आसियानच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या विद्यापीठात सतरा विद्याशाखा असून 176 अभ्यासक्रम राबवले जातात. 2025-26 मध्ये इथे 42,687 विद्यार्थी पदवी-पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि 952 प्राध्यापक शिकवत आहेत. संशोधन क्षेत्रात भक्कम पाय रोवून, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्यासाठीची तयारी असलेले विद्यापीठ, म्हणून त्याकडे बघितले जाते.

विद्यापीठाचा परिसर छान आणि मोठा होता. निसर्गाने अक्षरशः उदार हस्ताने इथे रंगांची आणि फुलांची उधळण केली आहे. या लोकांची सौंदर्यदृष्टीही वाखाणण्यासारखी आहे. विद्यापीठाचं आवार विचारपूर्ण पद्धतीने, सौंदर्य खुलवेल असे नटवलेले आहे. सगळ्या बागा, ट्रॅफिक आयलँड, मधल्या मधल्या मोकळ्या जागा यात त्यांची सौंदर्यदृष्टी दिसते. त्यामुळे विद्यापीठात प्रसन्न वातावरण असायचं. भरपूर पावसामुळे डोळ्याला सुखावणारा निसर्ग इथे बघायला मिळाला.

शैक्षणिक जबाबदारी

मला सोशल सायन्सेस फॅकल्टीमधील लोकप्रशासन विभागामध्ये एका शैक्षणिक वर्षातील दोन सत्रे पदवी आणि पदव्युत्तर वर्गांना शिकवण्याची संधी मिळाली. पहिल्याच दिवशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुलं इंग्रजी भाषेत सहजपणे बोलत नाहीत हे लक्षात आलं. इंग्लिशला बिचकून असल्यामुळे ते सुरुवातीला प्रश्न विचारायला घाबरले, पण नंतर अनुवाद करणाऱ्या अॅपचा वापर करून माझ्याशी संवाद साधू लागले. भारताविषयी विलक्षण उत्सुकता असल्यामुळे त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आणि मग भाषेच्या अडचणीपलीकडे जाऊन त्यांनी मला स्वीकारलं आहे, असा आश्वासक सूर मला पहिल्याच भेटीत गवसला.

लोकप्रशासन विभागामध्ये एथिक्स अँड अकाउंटॅबिलिटी, पब्लिक पॉलिसी फॉर्म्युलेशन, पब्लिक पॉलिसी इव्हॅल्युएशन हे कोर्स मला शिकवायला दिले. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नोकरी करत असल्यामुळे ऑफिस टाइम नंतर त्यांची ऑनलाईन लेक्चर घ्यायला मी सुरुवात केली. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की, नुसत्या इंग्लिश स्लाइड्स आणि नोट्स देऊन या विद्यार्थ्यांना फारसा बोध होणार नाहीये. त्यांचे शिक्षक बहासा इंडोनेशिया या भाषेतून विषय समजावून सांगतात, तसं काहीतरी करावं लागणार होतं. त्या दृष्टीने प्रत्येक पॉवर पॉईंट स्लाईडवर निम्म्या भागात इंग्लिश आणि निम्मा भाग बहासा भाषेत असं केल्यामुळे माझा विलक्षण वेळ गेला. पण मला त्यांची भाषा येत नसूनही तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना शिकवू शकणार होते, याचं समाधान होतं.

पदवी अभ्यासक्रमाच्या वर्गांमध्ये 80 ते 90 अशी विद्यार्थी संख्या होती, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मात्र जास्तीत जास्त दहा एवढीच विद्यार्थी संख्या आढळून आली. लोकप्रशासनाचा कोर्स असल्यामुळे जवळजवळ सगळेच विद्यार्थी शासकीय कर्मचारी होते. (माझं पुण्यातलं कॉलेज आणि त्या विद्यापीठाच्या वर्गांमध्ये मला जाणवलेला मोठा फरक म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती) तिथे अनुपस्थितीचा प्रश्न किंवा समस्याच भेडसावत नव्हती. शिवाय, मला शिकवताना खूप मजा आली, कारण विद्यार्थी खरोखर चौकस होते. त्यांना सगळ्या समाजाविषयी खूप प्रश्न पडले होते आणि ते मोकळेपणाने विचारायचे. स्वतःबाबतच्या अनेक गोष्टी शेअर करायचे.

तिथे अभ्यासक्रम अतिशय आनंदाने शिकवला जातो, सर्व सेशन इंटरॅक्टिव्ह असतात. परीक्षेवर कमी भर दिला जातो. त्यांची परीक्षा पद्धती आपल्यापेक्षा सोपी आणि कमी ताण देणारी आहे. परीक्षेवर भर कमी असल्यामुळे बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर कसा असतो हे सरसकट ठरवता येणार नाही, पण शिक्षण ताणरहित आणि आनंददायी होऊ शकतं हे मी बघितलं. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सातत्याने मोकळा संवाद जाणवला. वर्गात शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हसायचे, मजा करायचे. तरीही शिकवणं आणि शिकणं चालू असायचं. हा सुखकारक अनुभव होता.

तिथल्या समाजात धार्मिकतेचा पगडा आहे. लोक खाजगी जीवनामध्ये धार्मिक असण्याला महत्त्व देतात. त्यामुळे चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. मातृभाषेतूनच सर्व प्रकारचे शिक्षण घेतात. ख्रिश्चन समुदायामध्ये इंग्लिशच्या कौशल्याचा अभाव
आढळला, तो त्या मानाने मुस्लीम समाजात कमी दिसून आला.

इंडोनेशियाचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. हे लोक इंग्रजीचा आधार घेत नाहीत, इंग्रजीमध्ये शिकत शिकवत नाहीत. यांना आपण ग्लोबल होतोय का नाही याची काही चिंताच नाही. कारण सर्व व्यवहार त्यांच्याच भाषेत चालतात. कुठल्याही युरोपियन भाषेचा आधार नसला तरी ते संशोधनातही पुढे आहेत आणि आर्थिक दृष्टीनेही. याचा मेळ कसा घालायचा?

सार्वजनिक व्याख्याने

तिथल्या वास्तव्यामध्ये आयसीसीआर चेअर म्हणून मला सार्वजनिक व्याख्याने (पब्लिक लेक्चर) द्यायची होती. विद्यापीठाच्या इंग्लिश विभागाने 'भाषेचे नियोजन : समतोल साधण्याची गरज' (Language Planning: Need to strikea balance) या विषयावर माझं लेक्चर ठेवलं होतं. मी भाषेच्या नियोजनाच्या सैद्धान्तिक, ऐतिहासिक आणि व्यावहारिक अशा बहुविध आयामांचा संदर्भ घेतला. त्याचबरोबर भारतातील वसाहतवादी धोरण, स्वातंत्र्य लढा, राष्ट्रीय इच्छा-आकांक्षा, भाषेवर आधारित राज्यांची पुनर्रचना, शैक्षणिक धोरण आणि भाषा सक्तीच्या विरोधात तळागाळातून होणारा प्रतिकार, हिंदी सक्तीचं राजकारण या सगळ्यांचा परामर्श घेतला. तसंच भारताच्या राज्यघटनेतील महत्त्वाची कलमं/अनुच्छेद, भाषिक बहुविधतेसाठी केलेले प्रयत्न, सर्व भाषिक अल्पसंख्याक आणि स्थानिक समुदायांना बहुभाषिक समाजामध्ये मिळणारी वागणूक, भारत आणि इंडोनेशिया अशी तुलनात्मक मांडणी केली.

सारी मुटियारा विद्यापीठातील (खाजगी विद्यापीठ) कायदेविषयक विभागातर्फे सार्वजनिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे From Text to Transformation: Journey of Constitutional Law in India या विषयावर लेक्चर दिलं. आपण भारतात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो, त्याचाच संदर्भ या व्याख्यानाला होता. या भाषणादरम्यान मी भारताच्या संविधानाचे तत्त्वज्ञान, सरनाम्यातून मिळणारी मूल्यं, कायद्याचे राज्य, संवैधानिक नैतिकता, संवैधानिक कायद्यातील शासनाची संरचना आणि अधिकार, राज्यसंस्था आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंध, नागरिकांना मिळालेले मूलभूत अधिकार आणि त्यांचा अर्थ लावण्यात होत गेलेले बदल, मूलभूत संरचना अशा पैलूंवर बोलले.

उत्तर सुमात्रा विद्यापीठाच्या संज्ञापन विभागातील आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या फूड डिप्लोमासीवर आधारित (Gastrodiplomacy: Understanding Cultural Communication Through Culinary) ग्रुप डिस्कशनच्या उद्घाटनप्रसंगी 'भारताची खाद्य रणनीती' या विषयावर मला बोलायचं होतं. भारतीय संस्कृतीमध्ये खाद्यपदार्थांचं एक वेगळं स्थान आहे. आपण कूटनीतीसाठी/रणनीतीसाठी भारतीय खाद्यपदार्थांचा अतिशय सशक्तपणे वापर केलेला आहे. दक्षिणेतल्या मसालेदार सांबारापासून उत्तरेतल्या अतिशय सुवासिक अशा बिर्याणीपर्यंत भारतीय खाद्यपदार्थांनी विविध भागांतील, देशांतील नागरिकांना कसं जवळ आणलं, त्यांच्या मधले नातेसंबंध कसे दृढ केले आणि भारतीय खाद्यपदार्थांचा दरवळ हा भारतीय सीमा ओलांडून कसा सगळीकडे पोहोचला आहे, हे सांगता आलं.

मेदान मधल्या भारतीय कॉन्सुलेटने 'शाश्वत भविष्यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रात भारत आणि इंडोनेशियातील भागीदारी' अर्थात सीमापार भागीदारी, या विषयावर यंदाच्या जानेवारी महिन्यात एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यात मी महाराष्ट्रातील शैक्षणिक संधी, पारंपरिक शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, भारतातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा सगळा पट उलगडून दाखवला. आणि इंडोनेशियातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत, कोणत्या प्रकारची सार्वजनिक आणि खाजगी विद्यापीठं आहेत, महाराष्ट्र सरकार तर्फे कौशल्य आणि इंटर्नशिपवर कसा भर दिला जातो, अशा काही गोष्टी मांडल्या. भारतात येऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना, शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत, त्याची एकत्रित माहिती विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा श्रोत्यांसमोर मांडली. उत्तर सुमात्रा विद्यापीठातील डॉ. असीमा सियाहान यांनी 'शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण' आणि मेथॉडिस्ट विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. एरनीथा यांनी 'खाजगी विद्यापीठांचा उच्च शिक्षणातला सहभाग' या विषयावर व्याख्याने दिली. चर्चासत्रानंतर उपस्थितांना कॉन्सुलेटने आयोजित केलेल्या भारतीय मेजवानीचा आस्वाद घेता आला. खास त्याकरता जकार्ताहून भारतीय शेफ बोलावला होता, त्यामुळे कॉन्सुलेटची ही भोजन रणनीती यशस्वी ठरली.

शैक्षणिक कार्यक्रमात सहभागाची संधी

नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात सामाजिक शास्त्र विभागाचा 45 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. विद्यापीठाच्या कुलपतींच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यांच्याशी संवाद साधता आला. त्याचबरोबर इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम होते. या विद्यापीठाचे कुलपती राज्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी विभागातर्फे आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. विद्यापीठातील इतर काही पदाधिकारी, पत्रकार, राजकारणी यांच्याशी या निमित्ताने संवाद साधता आला.

लोकप्रशासन विभागातील पदव्युत्तर विभागाच्या सेक्रेटरी डॉ. असीमा सीयाहान यांच्याबरोबर मी जास्त काळ काम केलं आणि एक चांगली मैत्रीण मला मिळाली. त्यांचं संशोधन प्रामुख्याने शाश्वत विकास विषयक क्षेत्रातील असून, महिलांच्या नेतृत्वाबाबतही त्यांचं संशोधन चालू आहे. आम्ही आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेसाठी नॉर्थ सुमात्रा प्रांतातील महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिव आल्या होत्या. त्यांनी शासकीय योजना आणि शासकीय प्रयत्नांचा आढावा घेतला. तर भारतातील शाश्वत विकास या विषयावर काम करणाऱ्या ज्येष्ठ संशोधिका डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी 'शाश्वत विकास आणि महिलांचे योगदान, ग्रामीण आणि शहरी भागात ऊर्जा व्यवस्थापन आणि अन्न व्यवस्थापन कसं करता येईल,' या विषयावर व्याख्यान दिले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये 2023 मधील ग्रीन नोबेल पुरस्कार विजेत्या इंडोनेशियन कार्यकर्त्या डेलीमा सीलालाही यांनी, मानव आणि निसर्गातल्या ढासळत्या नातेसंबंधाची अतिशय चांगली मांडणी केली. महिला नेतृत्वाला अधिक वाव देता येईल, त्यातून वन जंगल, जमीन, पाणी आणि शाश्वत विकास यांची खऱ्या अर्थानं दखल घेता येईल, असा विचार मांडला. तर भारतातील रंगसूत्र या कारागिरांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर सुरू केलेल्या एका मोठ्या ब्रँडच्या संस्थापिका सुमिता घोष यांचं बिझनेस मॉडेल संदर्भात व्याख्यान झालं. पितृसत्ताक समाज, स्त्रियांचं शोषण, दारिद्र्य, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विषम अॅक्सेस या सगळ्या आव्हानांचा परामर्श या सगळ्या विचारमंथनातून केला गेला. सुमिता घोष आणि डॉ. कर्वे या दोघी या चर्चासत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या चर्चासत्राकरता उपस्थित होते, त्यामुळे निश्चितच एक चांगला उपक्रम करता आला.

या विद्यापीठाचा आणि एकूणच शिक्षकांचा संशोधनावर खूप भर दिसून आला. आपण केलेले संशोधन बाजारात येण्यापूर्वी, त्याचा व्यावसायिक उपयोग होण्यापूर्वी, काही फोकस्ड ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून इतर समविचारी संशोधकांपर्यंत पोहोचवण्याची एक चांगली पद्धत इथे सातत्याने बघायला मिळाली. त्यातल्या अशा दोन फोकस्ड ग्रुप डिस्कशनला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. उपलब्ध वनस्पतींच्या माध्यमातून इको प्रिंटिंग करून तयार कपडे किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये याचा कसा उपयोग करता येईल, आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर कसा करता येईल या विषयावर फॉरेस्ट विभागाने आयोजित केलेल्या फोकस्ड ग्रुप डिस्कशनमध्ये मी सहभागी झाले.

भारतीय संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम

मी मेदानमध्ये गेल्यावर कॉन्सुल जनरल रवी शंकर गोयल यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्याची आणि विद्यापीठ आणि कॉन्सुलेटचे संयुक्त कार्यक्रम असतील तर त्यासाठीचा समन्वय करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. म्हणून विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये भारत बुक कॉर्नर सुरू करण्यासाठी कॉन्सुलेटच्या ग्रंथालयात जाऊन मी पुस्तकं निवडली. भारताच्या कॉन्सुलेटचे ग्रंथालय अतिशय सुसज्ज आहे. विलक्षण महत्त्वाची पुस्तकं तिथे बघायला मिळाली. अक्षरशः ग्रंथ खजिना म्हणायला हरकत नाही. भारताचे परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताच्या संस्कृतीचे अनेकविध पैलू, खाद्य संस्कृती, वस्त्र-प्रावरण, वेगवेगळ्या प्रदेशातल्या चालीरिती, योग, बुद्धाच्या जातक कथांपासून तत्त्वज्ञानापर्यंत, भारताची वास्तुकला, शिल्पकला, म्हणू त्या प्रत्येक विषयावरचे पुस्तक तिथे उपलब्ध होते. रामायण, महाभारत, गीतेवर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना समजतील अशी वेगवेगळी पुस्तके होती. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेगवेगळी चरित्रं होती. यातील काही पुस्तकं विद्यापीठाच्या ग्रंथालयाला देणगी म्हणून देण्यात आली आणि भारत बुक कॉर्नर सुरू झाला.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, विद्यापीठात कम्युनिकेशन सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडिया फिल्म क्लब हा उपक्रम सुरू केला. त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी गौरी शिंदे दिग्दर्शित श्रीदेवीचा 'इंग्लिश विंग्लिश' हा सिनेमा दाखवला. तो बहासा इंडोनेशिया भाषेत डब केलेला असल्यामुळे मुलांना त्याचा चांगला आस्वाद घेता आला. यात एखादी स्त्री स्वयंशोध घेऊन, इंग्रजी भाषेच्या माध्यमातून सक्षम होण्याकडे कशी वाटचाल करते हे दाखवले आहे. याला या तरुण मुला-मुलींनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रश्न विचारले. त्यातील अनेक प्रश्न अतिशय टोकदार, वास्तवाला भिडणारे होते. स्टोरी टेलिंग/गोष्टीरूपाने माणसं किती जोडली जातात, त्यांच्यातले बंध किती घट्ट होत जातात, हे एका छोट्याशा फिल्म क्लबच्या माध्यमातून जाणवलं.

'डोलू' नावाची (कन्नड) प्रादेशिक फिल्म त्या क्लबमध्ये ऑक्टोबरचा भाग म्हणून आम्ही दाखवली. तरुण पिढीच्या उपजीविकेच्या संघर्षातून ग्रामीण भागामध्ये एखादी कला टिकून राहणं किती अवघड आहे, त्याचा प्रत्यय हा प्रादेशिक चित्रपट देतो. रुढीपरंपरांचं जोखड आणि आधुनिकता यांच्या प्रवासाबद्दलही काही निरीक्षणं नोंदवतो. या प्रादेशिक चित्रपटाला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. हा चित्रपट त्या विभागाने परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून घेतला.

सत्राच्या शेवटी जानेवारी महिन्यात आम्ही 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा हिंदी सिनेमा मुलांना दाखवला. अर्थातच मैत्री आणि आपल्या इच्छेनुसार जगणं, अशा प्रकारचा रोड ट्रीप मूव्ही म्हणून याच्याकडे बघितलं जातं. याला अर्थातच विद्यापीठातल्या सगळ्या तरुणाईने जल्लोषात स्वीकारलं आणि चित्रपट बघताना धमाल केली. फिल्म क्लब हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून या चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक अनुभव रंजक पद्धतीने देता येतो, याचं प्रात्यक्षिकही करता आलं. भाषा परकीय असली तरी दृश्य अनुभव वरचढ ठरतो याचाही प्रत्यय आला.

भारताविषयीचे महोत्सव

भारताचं आयएनएस सरयू हे हिंद महासागरात सामरी गस्त घालणारं जहाज 21 जूनला योग दिवसानिमित्त मेदानजवळच्या बेलावान या बंदरात आलं होतं. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जहाजांवरचे कमांडिंग ऑफिसर, तरुण अधिकारी, डॉक्टर, आचारी, इतर कर्मचारी, अग्नीवीर म्हणून रुजू झालेली मुलं आणि मुली, इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन्स ऑफिसर, भारताच्या जकार्तामधील दूतावासातील संरक्षणविषयक अधिकारी आणि इंडोनेशियन नौदलाचे मोठे अधिकारी अशा वेगवेगळ्या लोकांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी, (एनडीए), पुणे इथपासून ते रामायण, महाभारत, भारतीय आणि इंडोनेशियन बहासा भाषेतले समान असणारे शब्द, भारतीय नौदलाच्या यशस्वी झालेल्या मोहिमा, जहाजावरचं आयुष्य अशा अनेक विषयांवर गप्पा मारल्या.

भारतातील औद्योगिक प्रतिनिधी मंडळाची भेट (बिझनेस डेलिगेशन)

2025 च्या जुलै महिन्यात भारतातून विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांचे प्रतिनिधी मंडळ मेदानला आले होते. या डेलिगेशनच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करून सुमात्रा बेटावरच्या आचे, बैंगकुलू, उत्तर सुमात्रा, सीमांके अशा वेगवेगळ्या भागांतल्या गुंतवणुकीला चालना देणाऱ्या शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची सादरीकरणं आणि त्यांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक असा भरगच्च कार्यक्रम कॉन्सुलेटने आयोजित केला होता.

स्वातंत्र्य दिवस : भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, तर इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिन हा 17 ऑगस्ट रोजी असतो. माझी आई आणि बहीण त्याच वेळी मेदान मध्ये आलेल्या असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर दोन्ही देशांचे स्वातंत्र्य दिन साजरे करता आले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त कॉन्सुलेटने आयोजित केलेल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला विद्यापीठातले माझे अध्यापक सहकारी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनाही येता आले, भारतीय कार्यक्रम काय पद्धतीने होतात हे बघता आले आणि त्यामध्ये सहभागीही होता आले.

इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित विद्यापीठातील कार्यक्रमात एन.सी.सी.च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एन.सी.सी. कॅडेटने झेंडा कुलपतींना नेऊन दिला आणि त्यानंतर ध्वजारोहण झालं. त्यांच्या राष्ट्रगीतानंतर विद्यापीठातील कुलपती आणि काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी त्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. 'विविधतेतून एकता' हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे, तर 'भिन्नेका तुंगल इका' म्हणजे 'विविधतेतून एकता' हेच इंडोनेशियाचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे. इंडोनेशियामध्येही वेगवेगळ्या बेटांवरच्या आदिवासी आणि इतर समुदायांमुळे तिथेही खाण्या-पिण्यात, वेशभूषेमध्ये आणि वैचारिक परंपरांमध्ये खूप वैविध्य आढळते. 2025 चा स्वातंत्र्य दिन हा 'विविधतेतून एकता' या तत्त्वावरच आधारित होता. सर्वांनी आपले एथनिक / वांशिक कपडे परिधान करायचे होते. त्यामुळे सगळ्या विद्यापीठभर त्या दिवशी रंगीबेरंगी आणि उत्साहाचं वातावरण भरून राहिलं होतं.

2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कॉन्सुलेटने (peace march) पदयात्रा आयोजित केली होती. महात्मा गांधी इथे येऊन गेलेले असल्यामुळे रस्त्याला त्यांचं नाव दिलं आहे जालान गांधी. जालान म्हणजे रस्ता. त्या रस्त्यावर कॉन्सुलेटच्या गाडीतून गांधीजींची भजनं लावली होती आणि आम्ही पंचवीस एक भारतीय शांतता फेरी (पीस मार्च) मध्ये सहभागी झालो होतो. गांधी जालान हा मोठा रस्ता होता, प्रत्येक चौकात अनेक लोकं कुतूहलाने बघायला येत होते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबून बघत होते. सारी मुटियारा या खाजगी विद्यापीठात तत्कालीन भारतीय राजदूतांच्या हस्ते 2019 मध्ये गांधींचा पुतळा बसवला आहे. तिथे आयोजित कार्यक्रमातही मला सहभागी होता आलं.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मला मेदानमध्ये साजरा करायला मिळाला. सकाळी कॉन्सुलेटमध्ये झेंडावंदनाला मी विद्यापीठातले काही सहकारी आणि विद्यार्थी यांच्याबरोबर गेले होते तर संध्याकाळच्या नॅशनल डे कार्यक्रमासाठी कॉन्सुलेट ने माझ्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली होती. या कार्यक्रमाला मेदान मधील वेगवेगळ्या खाजगी आणि सार्वजनिक विद्यापीठांचे प्रतिनिधी, शासकीय संस्थांचे अधिकारी आणि अनेक भारतीय लोक उपस्थित होते.

भारतीय सिनेमा : सॉफ्ट पॉवर

भारताच्या मेदान मधील कॉन्सुलेटने फिल्म सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यामध्ये मी 'विक्रम' आणि अमिताभ बच्चनचा 'गुड बाय' असे दोन सिनेमे लागोपाठ बघू शकले. त्यानिमित्ताने इबु रंगिनी (रिटायर्ड टीव्ही जर्नलिस्ट) यांच्याबरोबर संवाद साधता आला. फिल्म स्टडीजमध्ये काम करणारे डॉ. डॅनियल यांच्याशीही या निमित्ताने परिचय झाला. डॉ. डॅनिअल भारतीय सिनेमाचे शौकीन आणि अभ्यासक आहेत. 'शोले' सिनेमाला पन्नास वर्षे झाल्याबद्दल ते या चित्रपटातील फोटो छापलेला शर्ट घालून, त्याचे चाहते असल्याचे लोकांपर्यंत पोहोचवत होते. वेगवेगळ्या फिल्म सप्ताहांचे मेदानमध्ये आयोजन करून त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख करून देण्यात मोलाचं सहकार्य केलं होतं. अर्थातच त्यांची ही आवड बॉलीवूडपुरती मर्यादित नसून तमिळ, तेलगू, बंगाली, मल्याळम चित्रपट हेही त्यांच्या अभ्यासाचा विषय होते. भारतीय चित्रपटसृष्टीकडे सॉफ्ट पॉवर म्हणून बघितलं जातं, त्याचा प्रत्यय मला तिथे आला. जाऊ तिथे मेदानी लोकांना उत्सुकता असायची ती शाहरूख खान आणि काजोल या जोडीची. या दोघांचे सगळे सिनेमे त्यांनी बघितलेले असायचे. अतिशयोक्ती वाटेल, पण विद्यापीठांमध्ये तर प्रत्येकाने शाहरुख खानचे काही सिनेमे तीनतीनदा बघितले होते असं मला सांगितलं गेलं. हिंदी चित्रपट गीतांची तिथे खरोखरच क्रेझ आहे. टॅक्सीतून जाताना मी भारतातून आली आहे असं कळलं की, मला हिंदी गाणी ऐकवली जायची.

मेदानमधला भारतीय समुदाय

मेदानमध्ये दहा हजारांच्या आसपास भारतीय लोक राहतात. इंडोनेशियातील भारतीय समुदायाची ही सर्वात मोठी संख्या मानली जाते. येथील बहुतांश भारतीय तमिळ वंशाचे आहेत. याशिवाय काही प्रमाणात शीख (पंजाबी) आणि बंगाली लोकांचाही समावेश आहे. डच वसाहतवाद्यांनी मेदानमधील तंबाखू आणि रबराच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकात मजूर म्हणून भारतीयांना तिथे नेले होते. सुरुवातीला मजूर म्हणून गेलेले हे लोक नंतर तिथेच स्थायिक झाले आणि त्यांनी व्यापार, शेती व किरकोळ व्यवसायांमध्ये प्रगती केली. डच राजवट संपल्यानंतर अनेक भारतीय परत गेले, काही तामिळ लोक मेदानमध्येच राहिले आणि त्यांनी नंतर व्यापार व इतर व्यवसायांमध्ये स्वतःला प्रस्थापित केले.

मेदानमधील 'कॅम्पुंग मद्रास' हा परिसर भारतीय संस्कृती आणि खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्या भागाला लिटिल इंडियाही म्हणतात. तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील भारतीय तरुण-तरुणींना भारताविषयी फार माहिती नाही. त्यांच्या दृष्टीने भारत म्हणजे, सिनेमातून दिसणारा. भारताला भेट देणारी कुटुंबं फार कमी आहेत. मेदानमधील अनिवासी भारतीयांच्या संघटनेमुळे बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके मराठी असे विविध राज्यांतले, प्रांतांतले भारतीय लोक मला भेटले.

भारतीय तमिळ ख्रिश्चन समूहाने मेदानमधील अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून येणाऱ्या आणि पारंपरिक बाजारपेठेत भाजी विकणाऱ्या महिलांना तांदूळ, तेल, वाचनासाठीचे डोळ्याचे चष्मे आणि इतर काही उपयोगी वस्तू यांचं वाटप करून ख्रिसमसचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी बोलावलं होतं. 24 डिसेंबरला ख्रिसमस ईव्हच्या कार्यक्रमात चर्चमध्ये जाऊन आले. मराठीप्रमाणे बहासा भाषेतही ख्रिसमसला नाताळ म्हणतात आणि हिंदीप्रमाणे चर्चला गिरिजा (घर) म्हणतात.

एक अनुभव तर फारच विलक्षण होता. मेदानमध्ये तुरुंगातील महिला कैद्यांचा वेगळा विभाग आहे आणि त्यामध्ये एक चर्च आहे तिथे दर रविवारी कोणी ना कोणी वक्ते जाऊन त्या मुलींशी संवाद साधतात. त्यांना येशूची शिकवण याविषयी काही गोष्टी सांगतात. त्याही कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. गंमत म्हणजे या सगळ्या महिला कैदी आहेत असं सांगूनही खरं वाटलं नसतं, कारण त्या टापटीप कपडे आणि पूर्ण मेकअपमध्ये हजर होत्या. त्याविषयी विचारल्यावर कळलं की, तिथे येणाऱ्या महिला कैद्यांना परिपूर्ण रितीने ब्युटी पार्लर चालवता येईल अशा स्वरूपाचं पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं आणि तिथे ते सगळं वापरण्याची मोकळीकही मिळते. त्यांनी येशू ख्रिस्ताची भक्तीपर गाणी म्हटली. महिला कैद्यांचा वाद्यवृंदही होता.

प्रामुख्याने 80 टक्के महिला कैदी या अमली पदार्थांची विक्री करताना पकडल्या गेलेल्या होत्या. हलाखीच्या निम्न आर्थिक स्तरांमधून येणाऱ्या या महिलांना इतर कोणतेही उपजीविकेचे साधन नसताना त्या सर्वात सोप्या आणि तरीही अतिशय धोकादायक अशा मार्गाकडे वळतात आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. त्यांना परत योग्य मार्गावर आणण्यासाठी ख्रिश्चन धार्मिक समूह मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासाठी काम करतो आहे. खासगी माध्यमातून निधी उभारून हे काम चालू आहे. पण तरीही इंडोनेशियातही तुरुंगातून सुटलेल्या महिला कैद्यांचं आयुष्य परत रुळावर येणं खूप अवघड आहे.

2025 मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांत विशेषतः सुमात्रा बेटावर वादळी वारे आणि भरपूर पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात लोकं बेघर झाली आणि मेदान शहरात खूप पाणी पसरलं. माझे गेस्ट हाऊसही तीन दिवस पाण्याने वेढलेले होते. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य हाती घेतलं. मेदानमधल्या सार्वजनिक कार्यक्रमांना त्या दुःखाची किनार होती. उत्तर सुमात्रा विद्यापीठामध्ये नाताळच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळेस निर्वासितांना नाताळच्या भेटवस्तू आणि काही मदत करावी असा निर्णय घेतल्यामुळे, मी सामाजिक शास्त्र शाखेचे अध्यापक आणि काही विद्यार्थी यांच्यासोबत निर्वासितांच्या कॅम्पमध्ये पोहोचले. संयुक्त राष्ट्रांनी ओळखपत्र दिलेले अनेक निर्वासित हे अफगाणिस्तान, सोमालिया, इथिओपिया, नायजेरिया अशा वेगवेगळ्या देशांतून आलेले होते. ही निर्वासित कुटुंबं एका शाळेच्या मैदानावर राहत होती. पाकिस्तानमध्ये एम.फिल. केलेली एक तरुण निर्वासित महिला या खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी मला भेटली. तिचं लग्न अफगाणिस्तानमधील कुटुंबात झाल्यामुळे ती अफगाणिस्तानातून अमेरिकेला जात असताना त्यांनी इंडोनेशियाचा आश्रय घेतला होता. (त्या सगळ्यांच्या डोळ्यात एक ना एक दिवस अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जाता येईल अशी आशा होती.) या पाकिस्तानी महिलेच्या डोळ्यात शिक्षणाची आणि शिकवण्याची स्वप्नं दिसत होती, जी तिने बोलून दाखवली. तिथल्या वेगवेगळ्या वयोगटांच्या कुटुंबाबरोबर आम्ही संवाद साधू शकलो.

माझी भटकुली

इंडोनेशियामध्ये प्रत्येक व्यक्तीमागे एक मांजर असेल, एवढी मांजरं मी मेदानमध्ये पाहिली. आईच्या शेपटीशी खेळणाऱ्या छोट्या छोट्या पिल्लांपासून गुरुकावणाऱ्या बोक्यांपर्यंत असंख्य रंगांची, असंख्य पॅटर्न असलेली ही मांजरं माझ्या एकटेपणावरचा चांगला उपाय होता. नानाविध रंगांची असंख्य देशी मांजरं मी मेदानच्या विद्यापीठामध्ये बघितली. त्यातली काही मांजरं तर खाण्याच्या भुकेपेक्षा प्रेमाची भुकेली होती. खायला दिलं तरी पाठीवरून हात फिरवल्याशिवाय खायची नाहीत. मांजरं अतिरेकी संख्येने असल्यामुळे कदाचित, मांजरांच्या आरोग्याची, खाण्या-पिण्याची, सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी म्हातारी, गलितगात्र मांजरं बघताना सारखं वाईट वाटायचं की, इथे मांजरांच्या जिवाला काही किंमतच नाही. विलक्षण भुकेली, कुपोषित, इन-ब्रीडिंग झाल्यामुळे आजारी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या भांडणं-मारामाऱ्यांतून होणाऱ्या जखमा, अपघात या सगळ्यांमुळे मांजरं मरताना बघितली, तेव्हा भटकुल्या मांजरांबद्दल मला फार वाईट वाटलं. त्यांनी दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करावं, असंही वाटलं. म्हणून मी येताना विद्यापीठातील नेतृत्वाला एक पत्रही देऊन आले. संस्थात्मक सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून या मांजरांकरता, त्यांची संख्या आटोक्यात आणण्याकरता, पुनरुत्पादनावर नियंत्रण करण्याकरता काही प्रयत्न करता आले, तर विद्यापीठाच्या आवारातील मांजरांना न्याय मिळेल, असा एक अल्प प्रयत्न करून आले खरी. बघू या या भटकुल्यांना कोणी गंभीरपणे घेतं का?

मेदानमधील सामान्य माणसाचे जीवन

एकूणच मेदानमध्ये साक्षरता जास्त आहे आणि शिक्षणाचा तुलनात्मक स्तरही वरचा आहे. सामान्य लोकांना इंग्रजी भाषा येत नसली तरी त्यांची भाषा बहासा इंडोनेशिया ही रोमन लिपीत लिहिली जाते, ती त्यांना अवगत आहे. मोबाइलच्या मदतीने ते बहासा इंडोनेशियाचा अनुवाद इंग्रजीत करू शकतात.

आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊसमध्ये जपानी भाषा शिकवणाऱ्या युमीसाननिशीमुरा या प्राध्यापिकेबरोबर राहायची संधी मला मिळाली. त्या जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे जायकातर्फे विद्यापीठात शिकवण्यासाठी आलेल्या स्वयंसेवक होत्या. आम्ही दोघींनी चार महिने एक गेस्ट हाऊस शेअर केलं, तेव्हा जपानी प्राध्यापिकेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे लक्षात आलं की, जपानला जाण्यासाठी या देशातली खूप मुलं उत्सुक आहेत. त्यांना ऑस्ट्रेलिया आणि जपान हे विकसित देश जास्त जवळचे वाटतात. कारण तिथे स्वाभाविकच विकासाच्या, प्रगतीच्या संधी आहेत. अनेक विद्यार्थी जपानमध्ये जाऊन इंटर्नशिप करण्यासाठी तयारी करत होते, तर काही जपानी भाषेच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक होते.

येथील जीवनमानाचा स्तर आणि सार्वजनिक सुरक्षितता यांचा दर्जा चांगला आहे. सकाळच्या वेळेत विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि कॅबचालक असे विद्यापीठात असणारे-काम करणारे आणि कामानिमित्त विद्यापीठात येणारे हर त-हेचे लोक जेवण बाहेरून मागवून म्हणजे विकतचं खायचे. त्याबद्दल मला आश्चर्य वाटायचं की, सर्वांना रोज बाहेर खाणे परवडते कसे ? पण एक गोष्ट खरी की, इंडोनेशिया देशात - जकार्ता, ज्योगज्या, बाली किंवा मेदानला -सगळीकडे Street Food प्रसिद्ध आहे ते चविष्ट खाद्यपदार्थ, त्यांमधील वैविध्य आणि त्याबाबतची (हायजिन) स्वच्छता पाळण्याकरता.

इथे प्रामुख्याने महिला अतिशय उद्यमशील आहेत. महिलांचं रोजगारातलं प्रमाण भारतापेक्षा जास्त आहेच, पण स्वतःहून व्यवसाय सुरू करणं, छोट्या स्तरावर व्यावसायिक होणं याबाबतीतही स्त्रिया पुढे आहेत. मी असंख्य महिलांना सायकल रिक्षा स्वतः चालवताना आणि सायकल रिक्षाला जोडलेल्या टेम्पोमधून खाद्यपदार्थांची ने-आण करून, ठरावीक ठिकाणी स्वतःचा स्टॉल मांडून विक्री करताना बघितलं.

मेदानमध्ये एकदाही रस्त्यावरून चालणारी माणसे मला दिसली नाहीत, कारण विलक्षण ऊन, उष्णता आणि दमटपणा. फूटपाथ हे माणसांसाठी असतात, पादचाऱ्यांसाठी वेगळा सिग्नल असतो, अशा काही कल्पना इथे दिसल्याच नाहीत. कारण सगळे जण आपापल्या वाहनांवरूनच जातात. काही इलेक्ट्रिक बसेस आणि आपल्याकडे पूर्वी मेटॅडोर नावाचं जे वाहन असायचं तशाच छोट्या मेटॅडोरमधून सगळी प्रवासी वाहतूक होताना दिसली. सायकल रिक्षा आहेत, पण सार्वजनिक वाहतूक सेवा तितकीशी विकसित नाही. मोठ्या प्रमाणावर 'ग्रॅब' आणि 'गोजेक' च्या अॅपआधारित चारचाकी आणि दुचाकी टॅक्सींचा वापर होतो आणि स्वतःच्या स्वयंचलित चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरच भर दिला जातो. मोठ्या प्रमाणावर महिला चारचाकी गाड्या चालवताना दिसल्या. पेट्रोल स्वस्त असल्यामुळे खासगी वाहनांवर भर आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना असंही कळलं की, मेदानमध्ये घरात चारचाकी गाडी नसेल तर ते स्टेटसला शोभून दिसत नाही, म्हणून काही झालं तरी सामान्य माणूस चारचाकी विकत घेतोच. त्यामुळे घराघरात गाड्या दिसतातच आणि त्याचाच परिणाम म्हणून सकाळ आणि संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम होतात.

इथल्या उष्ण आणि दमट हवेमुळे लोक रस्त्यावर चालत नाहीत. पण संध्याकाळी विद्यापीठाचा परिसर व्यायामासाठी उत्सुक असलेल्या तरुण, मध्यवयीन आणि वयस्कर स्त्री-पुरुषांनी गजबजून गेलेला असायचा. हे हौशी लोक यायचे त्यांच्या गाड्यांतून. विद्यापीठातील पंचशील नावाच्या मोठ्या मंडपात सगळे जण गाड्या लावायचे, मग विद्यापीठाच्या आवारात फिरायचे, आणि परत आपल्या गाडीने घरी जायचे. त्यामुळे त्यांचा व्यायाम हा विद्यापीठातल्या हवेशीर, भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांमधून व्हायचा आणि एसी गाड्यांमधून प्रवास करून प्रदूषण वाढवायला हातभार लावायचे. प्रवास करताना जाणवलेली बाब म्हणजे सार्वजनिक स्तरावर दिसणारी स्वच्छता. रेल्वे ट्रॅक्सच्या दुतर्फा आपल्या इथे दिसतात तशीच घरं, माणसं. पण फरक म्हणजे अतिशय स्वच्छ रेल्वे ट्रॅक्स. असं असलं तरी कचरा वर्गीकरणाविषयी सार्वत्रिक उदासीनता दिसली.

मेदानमधल्या वास्तव्यात मी असंख्य वेळा 'कॅबमधून' आले गेले. प्रत्येक वेळी त्यातल्या चालकांनी 'मी कुठून आले, कोण आहे, आम्ही इंग्लिश नाही बोलू शकत, पण मला कळतं,' असं म्हणून खूप प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आणि मला संवाद साधता आला. सगळे चालक अतिशय जागरूक आहेत. त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीविषयी vocal आहेत. सप्टेंबर महिन्यात इंडोनेशियाभर सगळीकडे विद्यार्थी आणि ओजोल म्हणजे या कॅबचालकांनी खूप मोठं आंदोलन केलं. कारण होतं, राष्ट्राध्यक्षांनी संसदेच्या सर्व सभासदांचा घरभत्ता वाढवला होता. समाजात आर्थिक ओढग्रस्तता चालू असताना आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जायला लागल्या होत्या. त्यामुळे इंडोनेशियातील तरुणाई, सामान्य माणसं, विशेषतः कॅब चालक रस्त्यावर उतरले. त्यात एका कॅबचालकाचा मृत्यू झाला. त्यातून असंतोष वाढत गेला आणि जकार्तात घडलेल्या घटनेचे लोण इंडोनेशियाभर पसरले. तिथला तरुण त्याच्या हक्कांविषयी, लोकशाहीविषयी किती जागरूक आहे हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि अनुभवलं. त्यांना देशाची आर्थिक सामाजिक परिस्थिती नीट माहिती आहे. उपजीविकेच्या संधी आक्रसत चालल्या आहेत, याबद्दल त्यांना काळजी आहे आणि दुसरी दुखरी बाजू म्हणजे, त्यांना मोठ्या प्रमाणावर शासकीय नोकरी मिळावी अशी आशा आहे किंवा ते त्याच्या मागे धावत आहेत.

शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयीकरण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर खूप भर दिलेला आहे; जेणेकरून भारताला उच्च शिक्षणाच्या जागतिक नकाशावर वेगळं स्थान मिळेल आणि त्यातून आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर सहकार्य करता येईल. यूजीसीच्या निर्देशांनुसार नव्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्यांचं भविष्य घडवायचं असेल, तर उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचं महत्त्व ओळखायला हवं. अमर्त्य सेन यांच्या क्षमता दृष्टीकोनानुसार शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयीकरण म्हणजे, केवळ शिक्षक / प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा एका जागेहून दुसऱ्या जागेला प्रवास, एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात जाणं एवढा मर्यादित नाही. मानवी क्षमतांचा विस्तार करणे आणि सगळ्यांकडून मिळून काहीतरी विकासात्मक सहज्ञाननिर्मिती (Co-production of knowledge) घडणं अपेक्षित आहे. शिक्षण हे मानवी क्षमता वाढवण्याचे सर्वात प्रभावी साधन असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आणि संशोधक एकत्र येतात, तेव्हा केवळ माहितीची देवाणघेवाण होत नाही, तर नवीन ज्ञानाची 'सह-निर्मिती' होते. हे सहकार्य सामाजिक न्याय आणि जागतिक समस्या सोडवण्यासाठी आवश्यक आहे. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण हे विकसनशील देशांमधील उपेक्षित घटकांना जागतिक प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. मेदानमधील वास्तव्यात मला हे जाणवलं की, ही संधी म्हणजे भविष्यातील शैक्षणिक आणि संशोधनातील सहकार्यासाठी दीर्घ मुदतीसाठी केलेली वैयक्तिक स्तरावरची गुंतवणूक आहे. मला पुढे जाऊन संयुक्त संशोधन प्रकल्पासाठी एका विकसनशील तरीही आपल्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम देशातील प्राध्यापकांबरोबर काम करता येणार आहे. 'इंडिया इंडोनेशिया मित्र सेलमान्या' म्हणजे 'भारत इंडोनेशिया कायमस्वरूपी भागीदार / मित्र' हा इंडोनेशियामधील दूतावासाचा दृष्टीकोन आहे. नऊ महिन्यांत निर्माण झालेले असे ऋणानुबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास आहे.


लेखिका सध्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवत आहेत. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील मेदान शहरात उत्तर सुमात्रा विद्यापीठात मे 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत, लोकप्रशासन विभागात, आयसीसीआर चेअर प्रोफेसर म्हणून शिकवायची संधी त्यांना मिळाली. त्या अनुभवावर आधारित हा लेख आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गौरी कोपर्डेकर,  पुणे ( 1 लेख )

मॉडर्न महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय शिकवतात.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके