साध्यासाठी कष्ट करणारे लोक बरेच असतील. पण निदान काही अपवाद लोक फक्त त्या कष्टावर श्रद्धा ठेवतात. अखेरीला मिळणारे साध्य त्यांना मोलाचे वाटत नाही. Road is better than the inn. प्रवास महत्त्वाचा, मुक्काम दुय्यम. मला शिक्षक म्हणून एका अर्थाने हा अनुभव होता. मी मुलांना वारंवार समजावून सांगितले की पुष्कळ मार्क हे साध्य ठेवू नका. कॉपी करून मार्क मिळवाल तर मुलाखतीमध्ये उघडे पडाल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टी शिकवताना आम्ही मुलांना ठासून सांगतो की कार्यशाळेसाठी तयारी करा, वाचन करा, खटपट करा. बहुतांश फायदा त्यातच. प्रत्यक्ष कार्यशाळेत इतरांचे बघा. त्यात काही थोडे शिकाल. पण त्यासाठीसुद्धा आधी भरपूर गृहपाठ करायला हवा.
सुमारे 30 वर्षापूर्वी संख्याशास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीत एकदम वाढ झाली. तेव्हा मी पुणे विद्यापीठात संख्याशास्त्र विभागप्रमुख होतो. एक दिवस चक्क नोव्हार्टिस नामक औषध कंपनीचा फोन आला की, आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो.
साहजिकच आम्ही सर्व व्यवस्था केली. अधिकारी मंडळी पोचली. प्रथम छोटेखानी लेखी परीक्षा झाली. मग मुलाखती. मी त्यांच्या प्रतिनिधीला विनंती केली की, मला त्या मुलाखतीमध्ये बसू द्यावे. त्यांनी ती मान्य केली.
मुलाखती पूर्ण झाल्या. काही विद्यार्थी पास झाले. नोकरीसाठी निवडले गेले. काही नापास झाले. मीपण नापास झालो.
हे काय भलतेच ? शिक्षक का नापास ?
कारण व्यवहारी जगात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याला जरूर ते प्रशिक्षण आम्ही दिलेच नव्हते. केवळ गणितावर भर दिला. सॉफ्ट स्किल्स असे म्हणतात त्याचे काय ? तेथे सगळा अंधार ! हे बदलायलाच हवे.
मग मी काय केले? परीक्षा, अभ्यासक्रम यांना बगल दिली. वादावादी टाळली. सर्व पातळ्यांवर स्पर्धा सुरू केल्या. दिलेल्या विषयावर पाच मिनिटे वर्गासमोर बोलणे. आधी ठरलेल्या प्रश्नावरील गट-चर्चेमध्ये भाग घेणे. लुटुपुटीच्या मुलाखतीला तोंड देणे.
आपल्या आवडीच्या छंदाचे प्रदर्शन करणे. आपल्या विषयाचा इतिहास परिचित करून घेणे. त्या विषयातील दिग्गजांची चरित्रे वाचणे. आपल्या विषयातील उत्तमोत्तम शिक्षणसंस्था, संशोधनसंस्था कोणत्या देशांत, कोणत्या शहरांत आहेत हे जाणून घेणे. त्यांची स्थाने जगाच्या नकाशामध्ये बघणे. एक ना दोन.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. पुणे विद्यापीठाच्या कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या अंतिम फेरीच्या स्पर्धा विद्यापीठात घेतल्या. त्या बघण्यासाठी पालकांना बोलावले. ते आनंदाने सामील झाले.
विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर्क करणे सक्तीचे केले.
शिक्षकांना धास्ती होती की दर वर्षी इतक्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट विषय काय द्यायचे? पण विद्यार्थ्यांनी कल्पकतेने अभिनव विषय शोधले. त्यातल्या दोघांचा उल्लेख करतो.
नाशिकच्या एका विद्यार्थिनीने प्रश्न उपस्थित केला. 'हॉस्टेलमध्ये मुलांना जेवण आवडत नाही. काय कारण असेल ? भाज्या नावडत्या असतात का? कोण जाणे. पण कोणती भाजी करायची हे कसे ठरते? प्रस्ताव-बाजारातील सर्वांत स्वस्त भाजी घेतली जात असणार. हे खरे आहे का? तपास करणे. हे प्रॉजेक्ट.'
पुण्यातील एका विद्यार्थ्याने विषय मांडला की, 'स्त्री-पुरुष समतेच्या या दिवसांमध्ये विद्यार्थ्याची सौंदर्यप्रसाधनकडे बघण्याची दृष्टी विद्यार्थिनीपेक्षा वेगळी आहे का? हे शोधणे.'
अशा प्रोजेक्टनी परीक्षकांनासुद्धा चकित केले.
मग वर्षात एकदा चार दिवसांचे शिबिर सुरू केले. त्यात प्रत्येक महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी निसर्ग सानिध्यात तंबूत राहत. नाना प्रकारचे विचार ऐकत. स्वतःचे विचार सांगत. वगैरे. ही शिबिरेसुद्धा फार विद्यार्थिप्रिय झाली. त्यातील दोन उपक्रमांबद्दल सांगतो.
एक होता इंग्रजी संभाषण. आमच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना, आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याची सवय नाही. सगळी घबराट. आंतरराष्ट्रीय बाजारात काम करायचे तर इंग्रजीविना कसे जमणार ?
मी पुणे विद्यापीठ इंग्रजी विभाग प्रमुख श्रीधर गोखले यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटले आमच्या मुलांना जरा व्यावहारिक इंग्रजी शिकवाल का ?
गृहस्थ फारच भन्नाट निघाला. म्हणे एक तासात मुलांना एकदम प्रवीण करून टाकीन.
खरे वाटेना. पण म्हटले, काय बिघडेल? फार तर एक तास पाण्यात जाईल. करून पाहू.
विद्यार्थ्यांसमोर गोखले उभे राहिले. आणि म्हणाले. तासाभरात इंग्रजी भाषेची ओळख कशी करून देणार? अशक्य आहे.
मी चाट पडलो. आता पुढे काय होणार ?
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवणे तरी शक्य आहे का? तेसुद्धा जमणार नाही. इंग्रजीचे व्याकरण? तेही विसरा.
मग हा माणूस करणार तरी काय?
तुम्ही विचारणार तासाभरातच काय करणार आहे हा माणूस? तुमच्या मनातला इंग्रजी भाषेबद्दलचा बागुलबुवा पिटाळून लावणार, आणि 'मला इंग्रजी बोलता येईल' असा विश्वास तुमच्या मनात जागा करणार.
अरे वा. हे छानच आहे. पण होणार कसे ?
आपल्या वाट्याच्या एक तासात वर्गातील प्रत्येक जण पुढे येऊन मी सांगतो ती दोन वाक्ये इंग्रजीत बोलणार.
पहिले वाक्य स्वतःचे नाव सांगणे. याचे दोन प्रकार.
'I am so and so'. हे किंवा 'My name is so and so'.
मी बरेचदा ऐकतो तो तिसरा प्रकार मात्र योग्य नाही. हे वाक्य आपले नाव घालून बोलू शकाल का?
सर्वांनी माना डोलावल्या.
दुसरे वाक्य स्वतःची काही खासीयत सांगणे. काहीही. मी रात्री 12 वाजता झोपतो. मी दिवसा 12 वाजता उठतो. मी गायक आहे. हवे ते सांगा. विचार करून ठेवा. जमेल का?
सगळे म्हणाले, हो.
चला, कोण पहिला ?
आणि बघता बघता सगळा वर्ग इंग्रजी बोलण्याच्या कसरतीत उत्साहाने सामील झाला. काहींनी स्वतःच्या ओळखीत कल्पकता दाखवली.
एक मुलगी म्हणाली. मी सुंदर आहे. (सगळेजण चमकले) निदान माझ्या पालकांना तसे वाटले. म्हणून त्यांनी माझे नाव शुभांगी असे ठेवले.
आम्ही टाळ्यांचा कडकडाट केला.
शिबिरानंतर मला फोन आले. विशेषतः ग्रामीण महाविद्यालयांतून. त्यानी दोन मुद्दे सांगितले. एक मुद्दा हा की, तुमच्या शिबिरातून मुले भारावून येतात. परत आल्यावर एक-दोन आठवडे बोलण्यात दुसरा विषय नसतो. पुढचा मुद्दा म्हणजे मुले चाचपडत, इंग्रजी बोलू लागली आहेत.
दुसऱ्या बाबीचे श्रेय श्रीधर गोखले यांना. पण भारावून जाणे कशामुळे?
असे दिसते की, तरुण मने मूल्यविचार ऐकण्यास उत्सुक असतात. तत्त्वज्ञान म्हणून नव्हे. उदाहरणांतून.
आमच्या शिबिरामध्ये संख्याशास्त्राशी दूरचाही संबंध नसलेले लोक येऊन बोलत. साधना दधीच यांनी स्त्री-पुरुष समतेवर व्याख्यान दिले. बोलत्या व्हा, मिळून साऱ्याजणी अशा उपक्रमांची माहिती दिली. विलास चाफेकर यांनी त्यांच्या वंचित विकास संस्थेची ओळख करून दिली. कुणा अज्ञात कीर्तनकाराने पर्यावरण संरक्षण या विषयावर कीर्तन केले.
संख्याशास्त्र विषयावर व्याख्याने नव्हतीच असे नाही. पण वेगळ्या प्रकारची.
जंगलात अमुक जातीची झाडे किती प्रमाणात आहेत याचा अंदाज कसा बांधावा? हे तंत्र विद्या प्रयाग यांनी सप्रयोग दाखवले.
चित्रा लेले यांनी विमा आणि औषध निर्मिती क्षेत्रात संख्याशास्त्राचे गाभ्याचे स्थान समजावले.
त्यांचा या विषयातील अधिकार मोठा. कारण फायझर या बड्या औषध कंपनीसाठी मुंबईला जोगेश्वरी भागात त्यांनी पहिले संख्याशास्त्रीय विश्लेषण केंद्र सुरू केले. ते भरभराटले. भारतात हे काम करून घेण्यामध्ये खूप फायदा आहे हा विचार फार्मा क्षेत्रात सर्वत्र पसरला. फायझरचे लगेच अनुकरण करणारी कंपनी नोवार्टिस. त्या कंपनीने सुरुवातीला आमच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. पुढील दशकात अनेक कंपन्यांनी भारतात मुंबई, पुणे, हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली अशा ठिकाणी विश्लेषण केंद्रे उघडली.
संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मागणी वाढली. मग सोम्यागोम्या मंडळीनी संख्याशास्त्राचे वर्ग काढले. असो.
तीच गोष्ट विमा कंपन्यांची. त्या क्षेत्रात नव्याने आलेल्या खासगी कंपन्यांची अपेक्षा अशी की, संख्याशास्त्र विद्यार्थी विमा क्षेत्रातील अनेक परीक्षा पास करून मगच नोकरी मागतील. पण त्यासाठी आम्ही विश्वविद्यालयीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणतीच मदत केली नाही. आम्हाला ते क्षेत्रच नवे आणि परके. चित्रा लेले यांनी फार्मसी आणि विमा या क्षेत्रात लागणाऱ्या संख्याशास्त्राचे वर्ग चालविण्याची तयारी दाखवली. खुदा देता है तो छप्पर फाडके. आठवड्याचे पाच दिवस त्या मुंबईला जोगेश्वरीचे केंद्र चालवीत. शनिवारी पुण्याला येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवत. मुलांचे कल्याण झाले.
विभाग प्रमुख म्हणून मला चिंता वाटे की, या बाईंचा पसारा वाढेल. मग त्या शिकवू शकणार नाहीत. मग काय ? भीत भीत मी माझ्या दोन सहकारी शिक्षिकांना विनंती केली. लेले यांच्या वर्गात बसून शिकून घ्या. त्या गेल्यावर तुम्ही शिकवा.
शरयू परांजपे यांनी क्लिनिकल ट्रायल्स हा विषय घेतला. शैला देशमुख यांनी विमा हा पर्याय उचलला. चक्र चालू राहिले. परांजपे नंतर फार्मा क्षेत्रात गेल्या. देशमुखबाईंनी विमा गणितावर पुस्तके लिहीली.
तात्पर्य काय, तर विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण देण्यासाठी अशी काही व्यवस्था करावी लागते. आणि सॉफ्ट स्किलसाठी आमची शिबिरे. त्यातूनही मी बरेच शिकलो.
आम्हाला वाटे की, पदव्युत्तर शिक्षणाला आलेली मुले ही भाजकी मडकी. त्यांच्यावर नवे संस्कार करणे कठीण.
एकदम चूक.
माणसाला व्यवहाराबरोबरच मूल्यविचारांची, आदर्शवादाची भूक सुद्धा असावी. सर्वसंग परित्यागाला कोणी तयार नसतो. पण एक चाक स्वार्थ, दुसरे चाक परमार्थ असा गाडा मिळाला तर हवा असतो. त्या दोनमध्ये द्वैत असेल, पण द्वेष नाही.
संत सावता माळी सांगतात,
आपुल्या कर्मी व्हावे रत,
मोक्ष मिळे हातो हात ।।
आम्ही सर्वजण नॉलेज बिझनेसमध्ये आहोत. बघा, आपण ज्ञान आणि व्यवहार यांचा किती सहज समास करतो. विषयावर प्रेम कराल, ज्ञानमार्गी व्हाल, हे मला खरोखर कळले पाहिजे असा आग्रह धराल तर आपोआप तुम्ही मुलाखतीत उठून दिसाल. अवघड ते ऑप्शनला टाका. परीक्षेला इम्पॉर्टन्ट ते रट्टा मारून पाठ करा. अशी भूमिका असली तर मुलाखतीत तुमचा पोकळपणा पाच मिनिटांत उघडा पडतो.
एक ओवी पॅराक्रेज करून सांगतो. पाणी वहात आहे. वाटेत खड्डा येतो. तो आधी भरून टाकायचा. मग पुन्हा सरितेचा सागराकडे प्रवास सुरू.
असे वागणे हवे.
अभ्यास करताय? मित्राला अडचण आली तर ती सोडवा. तुमची समज अधिक पक्की होईल.
माझा आग्रह असा की, माणसाने बहुआयामी असले पाहिजे. तंत्रज्ञ मंडळींना वाङ्गय, धर्म, इतिहास या विषयांत गोडी हवी. म्हणून शिबिरात प्रत्येकाला आवडती कविता सांगण्याची कामगिरी दिली. त्या कविता मी ऐकल्या आणि थक्क झालो.
एका विद्यार्थ्याने वाचून दाखवली कुसुमाग्रजांची कविता 'कणा.' ऐकताना मी अंतर्मुख झालो.
'मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून, नुसते लढ म्हणा.'
मी तंद्रीतून जागा झालो. डोळे पाझरू लागले. आतून कढ येऊ लागले.
वसंतराव देशपांडे यांच्या गाण्यातील ओळी थोड्या बदलून मनात अंकुरल्या.
दाटून कंठ आला, स्फुरले मनात गाणे.
अति थोर भाग्य माझे. हे शिष्य किति शहाणे ॥
असे साथी मिळाले तर कोणत्याही आव्हानाशी लढता येईल.
या समाधीतून जागा होतो न होतो तोच पुढचा विद्यार्थी तात्यासाहेब शिरवाडकरांचीच आणखी एक कविता म्हणू लागला.
समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा?
कोठून फुलापरि वा मकरंद मिळावा.।
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा.
तव आंतर अग्नि क्षणभर तरी फुलवावा ॥
सर्वांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
ती शेवटची ओळ माझ्या मनावर जणू चरा पाडून गेली.
वाटले आपणही समिधाच आहोत की काय? खरे तर आपण सुद्धा तोच प्रयत्न करीत असतो. एका काठीवर दुसरी घासून ठिणगी पाडणे ही आपली खटपट. हाताला फोड येतात. मन निराश होते. आणि नाद सोडणार तोच धूर दिसतो.
एवढे धडपडून मिळवलेला तो अग्नि. पण क्षणभरच टिकतो. असे का? या ठिणगीला क्षणभंगुरता का असावी ?
मग जाणवले की तो एक परमोच्च बिंदू असतो.
असे बिंदू, असे क्षण असतात तरी कोठे? हा प्रश्न जरी पडला तरी नजर बदलते.
इंग्रजीमध्ये म्हणतात. If you hold a hammer, the world looks full of nails.
क्षण एक पुरे प्रेमाचा. वर्षाव पडो मरणांचा. या प्रेमिकाला तो एक क्षण पुरेसा असतो.
एक नखाएवढा पतंग होता. त्याला पणतीची ज्योत आवडली. हलके हलके तो तिच्याजवळ गेला. एका क्षणी तो लुप्त झाला. ज्योत बनून गेला.
ज्योतीशी जवळिकीचा फक्त एक क्षण.
अंतिम ज्ञानाचें असेच असावे. एका क्षणी तुम्ही स्वतःला विसरून परतत्त्वाशी एकरूप होता.
'मी राधिका, मी प्रेमिका' ही देखील सांगते' श्याम क्षण जगले मी.'
पुणे विद्यापीठात भाषाशास्त्राचे एक अतिशय प्रतिभावंत शिक्षक होते. अशोक केळकर. त्यांचे एक छोटेखानी पुस्तक आहे. शीर्षक जरा चमत्कारिक. लेखकाप्रमाणेच. वाचल्यावर पान उलटू की नको असे वाटावे. 'भेदविलोपन एक आकलन.' पण सुरवातीचे 'नको नको' वाटणे बाजूला सारून ते वाचू लागलात तर एक उच्च कोटीचा बौद्धिक, आध्यात्मिक आनंद पदरात पडेल. अवश्य वाचा.
भेद कशामधला ? मी आणि भोवतालचे जग यातला. या भेदाचा लोप होतो म्हणजे काय? मी आणि बाह्य जग यांच्यामधले अंतर विरघळते. शारीर अर्थाने नव्हे तर जाणीव/नेणीव या पातळीवर. विलोपनाचे दोन प्रकार. आत्मविलोपी - स्वतःला विसरून जाणे. आणि जगद्विलोपी - जगाला विसरणे.
गायक, वादक कलेत बुडतात. भान हरपते. स्वतःला विसरतात. संगीतमय होऊन जातात. हा आत्मविलोपी अनुभव.
रतिक्रीडेमध्ये शरीरसुखाच्या परमोच्च बिंदूला जगाचा विसर पडतो. फक्त ते शरीर उरते.
हा जगद्विलोपी अनुभव. आपल्या मध्ययुगीन संताना आत्मविलोपी अनुभवाची ओढ वाटे.
भेटीलागी जीवा, लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस, वाट तुझी ॥
तुम्ही म्हणाल, तुकाराम महाराजांचे ठीक आहे. आम्ही सामान्य माणसे. आम्हाला कुठली एवढी झेप?
असे का म्हणता ? ज्ञानोबा सांगून गेले. राजहंसाची चाल कशी डौलदार. पण म्हणून बदकाने चालूच नाही की काय ?
माता लेकराला जीवनरस पाजते. न्हाऊ-माखू घालते. तेव्हा जगद्विलोपी अनुभव घेते. या अनुभवाची थोरवी मोठी. माऊलीच्या अस्तित्वाची कृतकृत्यता. म्हणून तर सुधीर मोघे यांना मोह होतो ते रूपक वापरण्याचा.
माऊली सांज अंधार पान्हा.
विश्व सारे जणू होय कान्हा॥
अनिल अवचट हा एक अवलिया मनुष्य. त्याचे किती तरी छंद. प्रत्येक छंदात तो गुंगून जात असणार. 'बासरीचा नाद' या लेखात त्याने जगाला विसरून गेल्याचा अनुभव शब्दरूप केला आहे.
पुणे विद्यापीठात मी रिसर्च स्टुडंट होतो तेव्हाची गोष्ट. माझा भिडे नावाचा एक मित्र होता. ऑरगॅनिक केमिस्ट्री हा त्याचा विषय. संशोधन कशावर ? नैसर्गिक द्रव्याची प्रयोगशाळेत निर्मिती करणे. हे कृत्रिम [सिंथेटिक] द्रव्य तयार झाले की ते नैसर्गिक पदार्थाची हुबेहूब नक्कल आहे का याची चाचपणी. एका कुपीत अस्सल तर दुसऱ्या कुपीत नक्कल घातलेले. दोन्ही कुप्या चाचणी यंत्रात प्रविष्ट. प्रत्येकीला एक सुई जोडलेली. दोन सुयांच्या खालून एक धावणारा कागद. प्रत्येक सुई आपापल्या द्रावणाच्या स्वभावानुसार वर-खाली होणारी. असे दोन ग्राफ. ईसीजी सारखे. दोन्ही सुया जर एकाच तालावर नाचल्या तर नक्कल ही अस्सलसारखी आहे असे ठरेल. एरवी नाही. दोन्ही ग्राफ मिळतेजुळते असले तर अभ्यास यशस्वी. भिडे सांगे, मी डोळ्यांत सगळा जीव आणून बघतो आहे. अरे पहिली सुई वर गेली. दुसरी जाते की नाही? हेच पुन्हा पुन्हा बघायचे. कागदाचा आणि ग्राफचा प्रवास सुरू. ग्राफ निरीक्षण करण्यातच त्या तरुण शास्त्रज्ञाची सगळी चित्तवृत्ती गुंगून गेली. हा तर जगद्विलोपी अनुभव. ग्राफ संपेपर्यंत दोन्ही सुया एकमेकीच्या पावलावर पाऊल टाकून राहिल्या की जिंकली. भिडे जिंकला.
गंमत अशी की, परीक्षण संपले, आपण जिंकलो, हे दिसले तो क्षण भन्नाट. पण लगेचच जग पुन्हा पूर्ववत पहिल्यासारखे रूटीन दिसू, फिरू लागले. पाय जमिनीवर टेकले.
या क्षणभरच टिकणाऱ्या आंतर अग्निला आपण ठिणगी म्हणतो. त्या क्षणापर्यंतचा प्रवास मोलाचा. आणि तो क्षणही मोलाचा. त्याची आठवण ठेवणे म्हणजेच त्याचे जतन.
तो वारंवार भेटत नाही. [याला खुद्द तात्यासाहेब शिरवाडकर अपवाद असावेत. विशाखा वाचली की वाटते, परमेश्वराने त्यांच्या घरी अशा क्षणांचा जणू रतीब घातला आहे.]
काहींची इच्छा असते की, कष्ट टाळून, उडी मारून एकदम त्या क्षणापर्यंत जावे. लॉटरी फुटल्यासारखे. पण ते खरे नाही.
भक्ती वाचून मुक्तीची
मज जडली रे व्याधी
विठ्ठला, मीच खरा अपराधी ।।
जर लॉटरी फुटली, घाम गाळल्याशिवायच अप्राप्य गोष्ट प्राप्त झाली तर काय होते? हपापाचा माल गपापा. श्रेय मिळेल. फायदा मिळेल. पण ते सगळे सांभाळता येत नाही.
झटपट श्रीमंत होण्याची इच्छा माणसाचे भले करत नाही. आमच्या मुळशीतल्या शेतकऱ्यांची गोष्ट बघा. पुणे शहर अफाट वाढले. आजूबाजूच्या खेड्यातील जमिनींना सोन्याचा भाव आला. यातून सुख, शांती प्राप्त झाले का? शंका आहे. गुळाची ढेप दिसल्यावर मुंगळे गोळा झाले. गुन्हेगारी वाढली. खंडणीखोर टोळ्या वाढल्या. ज्याना ढीगभर पैसा मिळाला त्यांना त्याचे काय करावे हे कळत नव्हते. मग पैसे उडवले. महागड्या गाड्या घेतल्या. नको ते मित्र, नातेवाईक जवळ आले. व्यसने केली. अखेर मोटारीत डिझेल भरायलासुद्धा पैसा उरला नाही. मोटारीवर शेणाच्या गोवऱ्या थापून सुकवणे एवढेच हाती राहिले. मुळशी पॅटर्न हा सिनेमा आवर्जून पहा.
आमच्या मास्तरकीच्या धंद्यामध्ये. खोटी पुस्तके छापणे, खोटी पीएच.डी. डिग्री मिळवणे असे प्रकार आहेत. अशी डिग्री मिळवणाऱ्यांना आपल्या कामाबद्दल एक व्याख्यानसुद्धा देता येत नाही. कुणी तो प्रबंध पाहून त्याचा पोकळपणा उघड करू नये म्हणून त्याच्या सर्व प्रती हरवून टाकल्या जातात. असो.
साध्यासाठी कष्ट करणारे लोक बरेच असतील. पण निदान काही अपवाद लोक फक्त त्या कष्टावर श्रद्धा ठेवतात. अखेरीला मिळणारे साध्य त्यांना मोलाचे वाटत नाही. Road is better than the inn. प्रवास महत्त्वाचा, मुक्काम दुय्यम.
मला शिक्षक म्हणून एका अर्थाने हा अनुभव होता. मी मुलांना वारंवार समजावून सांगितले की पुष्कळ मार्क हे साध्य ठेवू नका. कॉपी करून मार्क मिळवाल तर मुलाखतीमध्ये उघडे पडाल. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टी शिकवताना आम्ही मुलांना ठासून सांगतो की कार्यशाळेसाठी तयारी करा, वाचन करा, खटपट करा. बहुतांश फायदा त्यातच. प्रत्यक्ष कार्यशाळेत इतरांचे बघा. त्यात काही थोडे शिकाल. पण त्यासाठीसुद्धा आधी भरपूर गृहपाठ करायला हवा.
पण अध्यात्मिक मंडळीनासुद्धा [निदान काही] असे वाटत असेल ही कल्पनाच नव्हती. साधना आणि ध्यान हे इतके महत्त्वाचे वाटते की साधनेचा 'नको दर्शनाने भंग' असे कुण्या कवीने म्हटले आहे.
टाळ मृदूंगाच्या संगे
आज रंगला अभंग
साधकाच्या समाधीचा
वारकऱ्याच्या भक्तीचा
नको दर्शनाने भंग।।
एका बाबतीत मात्र मी हार मानली. माझा दृष्टीकोन व्यावहारिक संख्याशास्त्राचा. आमचा विषय कोणाच्या उपयोगी पडतो? शेती, आरोग्य आणि औषध शास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये. मग त्यांची तोंडओळख नको का? माझे नशीब असे की मी पदवी अभ्यास मुंबई विद्यापीठात केला. त्यावेळी संख्याशास्त्र शिकणाऱ्याला अर्थशास्त्र शिकणे सक्तीचे होते. त्या अभ्यासाचा मला आयुष्यभर उपयोग झाला.
पुण्यात शिक्षक म्हणून स्थायिक झाल्यावर मी खूप प्रयत्न केला की, इथल्या स्टॅटिस्टिक्स बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र, सामाजिक अभ्यास हे विषय घेता यावेत.
कोणत्याही कॉलेजने ऐकले नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय सक्तीचे. असे का? तर ते वेळापत्रकाच्या दृष्टीने सोयीचे असते म्हणे. अरे पण समाजाच्या गरजेचे काय ?
माझे एक ज्येष्ठ सहकारी डॉ. निंबा ठाकरे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानी नियम करून टाकला. संख्याशास्त्र विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र, समाजअभ्यास, जीवशास्त्र हे विषय घेण्यास मोकळीक असावी.
मी खूष.
काहीही उपयोग झाला नाही. कोणत्याही महाविद्यालयात अशी व्यवस्था झाली नाही.
आता देशाचे नवे शिक्षण धोरण आवर्जून सांगते की सगळ्याच विद्यार्थ्यांनी काही अंशी इतर विषय शिकावे.
बघू काय होते ते ?
एकीकडे जगदुरू होण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे मुलांना बुरसटलेल्या व्यवस्थेत अडकून ठेवायचे हे कधी सोडणार ?
त्या क्षणाची वाट पाहतो.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या