डिजिटल अर्काईव्ह

कुलगुरू डी. टी. शिर्के यांची मुलाखत तंत्रज्ञान हे शिक्षणाला पूरक असू शकते; पर्याय नाही

कुलगुरू म्हणून नियमित कामे सर्वच करतात. परीक्षा घेणे, निकाल वेळेत लावणे, संशोधनाला चालना देणे, आर्थिक शिस्त राखणे, सामंजस्य करार करणे ही अपेक्षित कामे आहेतच. पण विद्यापीठ केवळ कार्यालयीन यंत्रणा नसते. ते एक सामाजिक-सांस्कृतिक केंद्र असते. कुलगुरूंनी डोळे, कान आणि मन उघडे ठेवले तर रुटीनच्या पलीकडे जाऊन अनेक परिवर्तनकारी कामे करता येतात. त्यासाठी मोठ्या निधीपेक्षा मोठी कल्पना आणि समाजाचा विश्वास महत्त्वाचा असतो.

 

कोविड-19 ही केवळ आरोग्य क्षेत्रातील आपत्ती नव्हती; ती मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना हादरा देणारी जागतिक घटना होती. उद्योग, व्यापार, प्रशासन, न्यायव्यवस्था, राजकारण या सर्वांप्रमाणे शिक्षण व्यवस्थेलाही या संकटाने अभूतपूर्व आव्हानांसमोर उभे केले. विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रासाठी हा काळ एका मोठ्या प्रयोगशाळेसारखा ठरला. वर्गखोल्या बंद झाल्या, महाविद्यालये, विद्यापीठांचे कॅम्पस ओस पडले, परीक्षा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकल्या आणि लाखो विद्यार्थी डिजिटल माध्यमांच्या आधारावर शिक्षण घेण्यास भाग पडले. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण व्यवस्थेने नेमके काय शिकले? कोविड हा तात्पुरता धक्का होता की त्याने उच्च शिक्षणाच्या रचनेत मूलभूत बदल घडवले ? या प्रश्नांचा शोध घेणे आजही तितकेच महत्त्वाचे आहे.

या विषयावर बोलताना प्रा. दिगंबर तुकाराम शिर्के यांचे अनुभव विशेष महत्त्वाचे ठरतात. कारण कोविडच्या सर्वात कठीण काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे नेतृत्व केले. संख्याशास्त्र विषयातील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, विभागप्रमुख, प्रभारी कुलसचिव, पहिले प्र-कुलगुरू आणि पुढे कुलगुरू असा त्यांचा प्रवास आहे. जवळपास चार दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासक अशा विविध भूमिकांमध्ये काम केले. त्यामुळे विद्यापीठाच्या यंत्रणेची नस त्यांना परिचित आहे. 7 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांनी कुलगुरुपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाला नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनात 3.52 सीजीपीए गुणांसह 'A++' दर्जा प्राप्त झाला. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठाला श्रेणी-1 विद्यापीठ म्हणून मान्यता दिली. कोविड काळातील ऑनलाइन शिक्षण, परीक्षा, प्रशासकीय निर्णय आणि त्यानंतर लगेच आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली.

आज ते वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नव्या प्रकारच्या विद्यापीठ उभारणीच्या प्रक्रियेत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे ज्या वारणानगरच्या महाविद्यालयात त्यांनी पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले, त्याच शैक्षणिक परिसरात कुलगुरू म्हणून परत येण्याचा विलक्षण योग त्यांच्या वाट्याला आला आहे.

या संवादात कोविडमुळे निर्माण झालेली डिजिटल संस्कृती, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा, विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता, ड्रॉपआऊटचे प्रश्न, शिक्षकांची भूमिका, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), विद्यापीठांचे सामाजिक उत्तरदायित्व आणि भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा यांवर प्रा. शिर्के यांनी सविस्तरपणे भाष्य केले आहे. त्याचबरोबर कुलगुरूपदावर असताना त्यांनी राबविलेल्या काही आगळ्यावेगळ्या उपक्रमांमधून नेतृत्वाचे मानवी आणि सामाजिक पैलूही उलगडून येतात.

प्रश्न - कुलगुरूपदापर्यंतचा तुमचा प्रवास पाहता, तुम्हाला घडवणारा निर्णायक टप्पा कोणता होता ?

- माझा प्रवास अत्यंत साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील वठार तर्फ वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून माझे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे पेठ-वडगाव येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मला सुरुवातीला अभियंता व्हायचे होते. त्यासाठी तांत्रिक शिक्षण घेतले; पण अपेक्षित यश मिळाले नाही. त्या अपयशाने माझ्या आयुष्याला वेगळे वळण दिले. वारणानगर येथे बी. एस्सी. करत असताना संख्याशास्त्र विषयाची गोडी लागली. पुढे विवेकानंद महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेताना हा विषय माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. बारावीमध्ये अपयश आल्यामुळे घरच्यांची निराशा झाली होती; पण त्याच अपयशाने मला आत्मपरीक्षणाची संधी दिली. माझ्या आयुष्यातील निर्णायक टप्पा म्हणजे शिक्षक आणि संशोधन क्षेत्राची निवड. सीएसआयआर-जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संशोधनाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.

प्रश्न - संशोधक, शिक्षक आणि प्रशासक या तिन्ही भूमिकांपैकी तुमची खरी ओळख कोणती ?

उत्तर - माझी पहिली आणि शेवटची ओळख शिक्षक हीच आहे. संशोधन, प्रशासन, कुलगुरूपद या भूमिका नंतर आल्या. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्यांच्या विचारविश्वात सहभागी होण्याची संधी मिळते. माझ्यावर प्रभाव टाकणारे शिक्षक इतके प्रभावी होते की परीक्षेच्या वेळी मला वहीपेक्षा फळा आठवायचा. त्यांनी कसे शिकवले, एखादी संकल्पना कशी समजावली, हा अनुभव कायम स्मरणात राहिला.

आजही कुलगुरूपदावर काम करताना मी शिक्षकाची भूमिका विसरत नाही. कारण प्रशासनाला मानवी चेहरा देणारे मूल्य शिक्षकाकडूनच येते.

प्रश्न- शिक्षक म्हणून घडताना कोणत्या व्यक्तींचा प्रभाव तुमच्यावर पडला ?

- विद्यार्थिदशेत लाभलेले शिक्षक हा माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे. श्री.ता.पी. पाटील, प्रा.के. एस. शेवडे, प्रा. राजहंस, प्रा. प्रसाद, प्रा. रत्तीहल्ली, प्रा. धांद्रा, प्रा.एस.आर. कुलकर्णी यांच्यासारख्या शिक्षकांनी केवळ विषय शिकवला नाही, तर विचार करण्याची पद्धत दिली.

प्रशासनात काम करताना माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांचा प्रभाव मोठा राहिला. पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि संस्थेच्या हिताला प्राधान्य देणे ही मूल्ये त्यांच्याकडून शिकायला मिळाली.

प्रश्न - अकादमिक क्षेत्रात रमणाऱ्या व्यक्तीचा प्रशासक होण्याचा प्रवास कसा घडला ?

- मुळात मला प्रशासनात फारसा रस नव्हता. मी संशोधन आणि अध्यापनात समाधानी होतो. पण काही जबाबदाऱ्या अनपेक्षितपणे मिळत गेल्या. 'कमवा आणि शिका' वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथे विद्यार्थ्यांचे प्रश्न, आर्थिक बाबी, दस्तऐवजीकरण, नियम यांचा परिचय झाला. पुढे प्रभारी कुलसचिव म्हणून काम करताना विद्यापीठाच्या प्रशासनाचा संपूर्ण चेहरा समजला. माझ्या मते, चांगला प्रशासक होण्यासाठी प्रथम चांगला शिक्षक असणे आवश्यक आहे. कारण प्रशासन म्हणजे केवळ फाईल्स नव्हे; ते माणसांशी व्यवहार करण्याचे कौशल्य आहे.

प्रश्न - कोविडपूर्व आणि कोविडनंतरचा काळ पाहता, नेतृत्वाबद्दलची तुमची समज कशी बदलली ? अशा संकटात व्यवस्थेपेक्षा माणसं अधिक महत्त्वाची ठरतात का ? 

- कोविडसारखा प्रसंग आपल्या पिढीने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. त्यामुळे त्याचे कोणतेही पूर्वप्रशिक्षण नव्हते. प्रत्यक्षात कोविड हाताळणे म्हणजे एक प्रकारचे आपत्ती व्यवस्थापनच होते. अशा वेळी नेतृत्वाची खरी परीक्षा होते. नेहमीच्या परिस्थितीत प्रशासकीय कौशल्य पुरेसे असते; पण संकटाच्या काळात माणसांवर विश्वास ठेवण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते. कोविडच्या काळात कुलगुरू म्हणून माझ्या लक्षात आलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, कोणताही प्रमुख एकटा काही करू शकत नाही.

अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकार मंडळांचे सदस्य आणि शासन या सर्वांची साथ मिळाली तरच व्यवस्थेला दिशा देता येते. त्यामुळे नेतृत्वाचा अर्थ आदेश देणे नसून, सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे हा आहे, ही जाणीव अधिक दृढ झाली. त्या काळात आम्ही कोणताही निर्णय घाईघाईने घेतला नाही. शासनाचे निर्देश, स्थानिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे हित यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित घटकांचा कानोसा घेतला. त्यामुळे निर्णयांना व्यापक स्वीकार मिळाला. आज मागे वळून पाहताना असे वाटते की, कोविडने नेतृत्वाला अधिक मानवी बनवले. प्रशासनाची चौकट आवश्यक असतेच; पण संकटाच्या काळात माणसं, त्यांचा विश्वास आणि त्यांची मानसिक तयारी यांनाच सर्वाधिक महत्त्व असते.

प्रश्न - कोविड काळात कुलगुरू म्हणून तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान कोणते होते? काही निर्णय योग्य असूनही लोकप्रिय ठरले नाहीत का ?

- मी 7 ऑक्टोबर 2020 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुजू झालो. त्या वेळी कोविडची परिस्थिती गंभीर होती. विद्यापीठातील अनेक सहकारी बाधित झाले होते. काहींचे दुर्दैवी निधनही झाले होते. अशा परिस्थितीत विद्यापीठाचे शैक्षणिक चक्र थांबू न देणे हेच सर्वात मोठे आव्हान होते. अध्यापन, परीक्षा आणि निकाल या तीन गोष्टी सुरू ठेवणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही आमची प्राथमिकता होती. परीक्षा कशा घ्यायच्या, निकाल वेळेत कसे द्यायचे, पुढील सत्र कसे सुरू करायचे, हा मोठा पेच होता. विशेष म्हणजे त्या काळात कठोर आणि अप्रिय निर्णय घेण्याची वेळ फारशी आली नाही. कारण परीक्षा आणि इतर बाबींविषयी शासनाकडून मार्गदर्शक सूचना येत होत्या. सर्व कुलगुरूंच्या बैठका होत होत्या. सामूहिक चर्चेतून मार्ग निघत होता. मात्र कोविड संपल्यानंतर काही वेगळीच आव्हाने समोर आली. अनेकांना ऑनलाइन पद्धतीची सवय झाली होती. काहींना पुन्हा नियमित कार्यालयीन कामकाजात परतणे कठीण जात होते. काही कर्मचाऱ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संसर्ग होईल अशी भीती होती. त्या वेळी सक्ती करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारला. विश्वास निर्माण केला. नियम समजावून सांगितले. नेतृत्व म्हणजे केवळ आदेश नव्हे, तर लोकांच्या भीती आणि शंकाही समजून घेणे असते, हे त्या काळात प्रकर्षाने जाणवले.

प्रश्न- कोविडपूर्व आणि कोविडोत्तर काळ अशा दोन कालखंडांमध्ये विभागल्या गेलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे आपण केवळ 'स्थित्यंतर' म्हणून पाहता की 'मूलभूत संरचनात्मक बदल' म्हणून ?

- माझ्या मते कोविड हा केवळ तात्पुरता व्यत्यय नव्हता. त्याने शिक्षणव्यवस्थेला काही मूलभूत प्रश्न विचारायला भाग पाडले. तंत्रज्ञानाचा वापर हा त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल आहे. कोविडपूर्व काळात ऑनलाइन बैठक, ऑनलाइन अध्यापन किंवा डिजिटल प्रशासन या गोष्टी मर्यादित स्वरूपात होत्या. कोविडनंतर त्या मुख्य प्रवाहात आल्या. तथापि, शिक्षणाची मूलभूत रचना पूर्णपणे बदलली असे मला वाटत नाही. विद्यापीठ, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रत्यक्ष वर्ग ही शिक्षणाची मूलभूत चौकट आजही कायम आहे. बदल झाला तो कार्यपद्धतीत. कोविडने आपल्याला अनिश्चिततेत काम करायला शिकवले. संकट आल्यावर घाबरून न जाता त्याला सामोरे जाण्याची मानसिकता दिली. ही त्याची सर्वात मोठी शिकवण आहे.

प्रश्न -'संकट ही संधी असते' असे म्हटले जाते. उच्च शिक्षणाच्या बाबतीत कोविडनंतर आपण ही संधी साधली की केवळ तात्पुरती मलमपट्टी केली ?

- माझ्या मते केवळ मलमपट्टी केली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कोविडच्या काळात ऑनलाइन वर्ग, डिजिटल परीक्षा, ऑनलाइन परिषद, ई-कंटेंट निर्मिती अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. त्या फक्त त्या काळापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. आजही त्यांचा वापर सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाचे उदाहरण घ्यायचे तर, कोविड संपल्यानंतर अतिशय कमी कालावधीत विद्यापीठाची संपूर्ण शैक्षणिक घडी पूर्ववत झाली. 2022 नंतर सर्व परीक्षा वेळेत झाल्या, निकाल वेळेत लागले, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण झाले आणि पदवीप्रदान समारंभही नियमित सुरू झाले. याचा अर्थ असा की, कोविडने विद्यापीठांचे नियोजन मोडून टाकले नाही; उलट अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवले.

प्रश्न - ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य बनताना गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्या तडजोडी कराव्या लागल्या ?

- हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या परिणामकारकतेने प्रत्यक्ष वर्गात अध्यापन होते, त्या पातळीचे अध्यापन ऑनलाइन माध्यमातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील थेट संवाद, चेहऱ्यावरील भाव, प्रश्नोत्तरे, वर्गातील वातावरण याला पर्याय नाही. स्क्रीनवर तासन्तास लक्ष केंद्रित ठेवणे कठीण असते. आज 'रील्स'च्या युगात विद्यार्थ्यांचा एकाग्रतेचा कालावधी कमी झालेला दिसतो. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाच्या काही मर्यादा आहेत. मात्र त्या काळात दुसरा पर्यायही नव्हता. शिक्षण पूर्णपणे बंद ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रश्न - परीक्षा आणि मूल्यमापनाच्या पद्धतींनी कोविडमधून काय शिकले पाहिजे ?

-कोविड काळातील परीक्षा हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. काही जण त्या काळातील पदव्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करतात. पण त्या काळातील परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. त्यात काही त्रुटी होत्या, हे नाकारता येणार नाही. गुणवत्तेवर काही प्रमाणात परिणाम झाला असेल. परंतु पर्याय काय होता? परीक्षा न घेता सर्वांना पुढे पाठवणे शक्य नव्हते. माझ्या मते, परीक्षा प्रणालीने कोविडमधून दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत - तंत्रज्ञानाचा वापर आणि मूल्यमापनाच्या पद्धती अधिक बहुआयामी करणे. केवळ लेखी परीक्षेवर अवलंबून न राहता सतत मूल्यमापन, प्रकल्प, सादरीकरणे आणि कौशल्याधारित चाचण्या यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल.

प्रश्न - हायब्रिड शिक्षण ही तात्पुरती व्यवस्था आहे की भविष्यातील शिक्षणाचा स्थायी भाग ?

- हायब्रिड शिक्षण ही आता वास्तवता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानेही त्याला मान्यता दिली आहे. काही प्रमाणात ऑनलाइन आणि उर्वरित प्रत्यक्ष अध्यापन अशी मिश्र पद्धत भविष्यात कायम राहील. परंतु याचा अर्थ पारंपरिक वर्ग कालबाह्य झाले असा अजिबात नाही. आजही गंभीरपणे शिकणारे विद्यार्थी वर्गात येतात.

संशोधन, प्रयोगशाळा, चर्चा आणि बौद्धिक वातावरणासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची गरज कायम राहणार आहे. तंत्रज्ञान हे शिक्षणाला पूरक असू शकते; पर्याय नाही. त्यामुळे भविष्यातील शिक्षण हे 'ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन' असे न राहता 'ऑनलाइन + ऑफलाइन' असे असेल.

प्रश्न - डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाचे लोकशाहीकरण झाले की नवीन 'डिजिटल दरी' निर्माण झाली ?

- डिजिटल शिक्षणामुळे दरी वाढली असे मला वाटत नाही. उलट शिक्षणाचा प्रवेश (Access) मोठ्या प्रमाणावर वाढला. कोविडपूर्व काळात अनेक शैक्षणिक साधने, संदर्भग्रंथ, व्याख्याने किंवा तज्ज्ञांशी संवाद यांचा लाभ मर्यादित विद्यार्थ्यांनाच मिळत असे. आज मोबाईलच्या माध्यमातून जगातील कोणतीही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते. आपण दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारले आहे. बँकिंगपासून प्रवासाच्या तिकिटांपर्यंत सर्व काही मोबाईलवर आले आहे. शिक्षण त्याला अपवाद कसे राहील? होय, सुरुवातीच्या काळात काही विद्यार्थ्यांकडे साधने नव्हती, इंटरनेटची अडचण होती. परंतु आज परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. ग्रामीण भागातही स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ज्ञानाच्या दारापर्यंत पोहोचण्याची संधी आता पूर्वीपेक्षा अधिक उपलब्ध झाली आहे. खरा प्रश्न साधनांचा नाही; तर त्या साधनांचा उपयोग करण्याच्या वृत्तीचा आहे. ज्ञानभांडार आपल्या हातात आले आहे, पण त्याचा किती उपयोग आपण करतो, हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे.

प्रश्न - ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस (OER), व्हर्चुअल रिअॅलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षणात कोणते बदल घडत आहेत ?

- शिक्षणामध्ये दृश्य अनुभवाला खूप महत्त्व असते. एखादी संकल्पना फक्त सांगितली तर ती विद्यार्थ्यांच्या लक्षात राहीलच असे नाही; पण ती प्रत्यक्ष दाखवली तर तिचा परिणाम अधिक खोलवर होतो. याच कारणामुळे AR आणि VR तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. शिवाजी विद्यापीठातील एका प्राध्यापकाने AR-VR आधारित प्रकल्प विकसित केला होता. एका उद्योग समूहाने त्यासाठी आर्थिक साहाय्य दिले. कारण विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होऊ शकतो. भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र यांसारख्या क्षेत्रांत आभासी प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक अनुभव देऊ शकतात. अर्थात, यासाठी सक्षम पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक आणि आर्थिक गुंतवणूक आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा लाभघ्यायचा असेल तर संस्थादेखील तितक्याच सक्षम असल्या पाहिजेत.

प्रश्न - कोविडनंतरचा विद्यार्थी अधिक आत्मनिर्भर झाला आहे की अधिक असुरक्षित ?

- या प्रश्नाचे उत्तर एकांगी देता येणार नाही. एका बाजूला विद्यार्थी अधिक आत्मनिर्भर झाला आहे. माहिती शोधणे, ऑनलाइन साधनांचा वापर करणे, स्वतंत्रपणे शिकणे या गोष्टींमध्ये त्याने प्रगती केली आहे. पण दुसऱ्या बाजूला मानसिक असुरक्षितताही वाढलेली दिसते. कोविडच्या काळात सामाजिक संवाद कमी झाला. दीर्घकाळ घरात राहावे लागले. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य गमावले. आर्थिक अडचणी अनुभवल्या. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर झाला. त्यामुळे आज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे केवळ वैयक्तिक प्रश्न म्हणून पाहता येणार नाही. तो शैक्षणिक प्रश्नदेखील बनला आहे. विद्यार्थी वर्गात आहे म्हणून तो शिकतो आहेच असे नाही. त्याची मानसिक तयारी, आत्मविश्वास आणि भविष्यातील दिशा या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

प्रश्न - विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि विद्यापीठांची क्षमता यांच्यातील दरी वाढते आहे का ?

- विद्यार्थ्यांच्या अपेक्षा वाढणे हे स्वाभाविक आहे. आजच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा, रोजगाराभिमुख शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि उत्तम करिअर संधी अपेक्षित आहेत. पण या अपेक्षांची पूर्तता करताना विद्यापीठांवर आर्थिक, प्रशासकीय आणि संरचनात्मक मर्यादा असतात. त्यामुळे ही दरी काही प्रमाणात दिसते. मात्र ती कमी करण्यासाठी विद्यापीठांनी सातत्याने बदल स्वीकारले पाहिजेत. विद्यार्थ्यांशी संवाद वाढवला पाहिजे. अभ्यासक्रम अद्ययावत केले पाहिजेत. विद्यार्थ्यांना काय हवे आहे आणि आपण काय देतो आहोत याचा सातत्याने आढावा घेणे आवश्यक आहे.

प्रश्न -कोविडनंतर 'ड्रॉपआउट' आणि 'स्टुडंट एंगेजमेंट' ही मोठी समस्या बनली आहे का ?

- मी याबाबत थोडे वेगळे मत मांडेन. विद्यार्थी वर्गात येत नाही यासाठी शंभर टक्के विद्यार्थी जबाबदार आहेत असे मला वाटत नाही. त्यात व्यवस्थेचाही मोठा वाटा आहे. ते का येत नाहीत, हा प्रश्न आपण किती गांभीर्याने विचारतो ? विद्यार्थी वर्गात येण्यासाठी वर्गात काहीतरी आकर्षक, उपयुक्त आणि भविष्यात उपयोगी पडणारे असले पाहिजे. शिक्षक, महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचीही जबाबदारी तितकीच आहे. आज अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या संख्येने जात आहेत. म्हणजे त्यांच्यात शिकण्याची इच्छा नाही असे नाही. त्यांना त्यांचे भविष्य घडवणारे शिक्षण हवे आहे. आपल्या अभ्यासक्रमात त्या अपेक्षांचे प्रतिबिंब पडले पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रश्न - कोविडनंतर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत कोणते मोठे बदल झालेले दिसतात ?

- कोविडनंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात काही बदल प्रकर्षाने जाणवतात. एकाग्रतेचा कालावधी कमी झाला आहे. सतत मोबाईल, सोशल मीडिया, शॉर्ट व्हिडिओ या गोष्टींच्या संपर्कात राहिल्यामुळे दीर्घकाळ एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्वरित परिणामांची अपेक्षा. पूर्वी एखादी गोष्ट शिकण्यासाठी संयम ठेवला जायचा. आता तत्काळ माहिती मिळते. त्यामुळे प्रतीक्षा करण्याची सवय कमी होत आहे. या बदलांचा विचार करून अध्यापन पद्धतीतही बदल करावे लागतील. फक्त व्याख्यान देऊन शिक्षण होणार नाही. संवाद, सहभाग, प्रकल्पाधारित शिक्षण आणि अनुभवाधारित शिक्षण यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल.

प्रश्न - कोविडनंतर शिक्षकाची भूमिका 'माहिती देणाऱ्या' व्यक्तीकडून 'फॅसिलिटेटर'कडे गेली आहे का?

- निश्चितपणे. पूर्वी शिक्षक म्हणजे माहितीचा प्रमुख स्रोत होता. आज माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. विद्यार्थी मोबाईलवर काही सेकंदांत माहिती मिळवू शकतो. म्हणूनच शिक्षकाची भूमिका बदलली आहे. आता शिक्षकाने माहिती सांगण्यापेक्षा विद्यार्थ्याला विचार करायला, योग्य प्रश्न विचारायला शिकवले पाहिजे. ज्ञानाचा वापर कसा करायचा हे समजावून सांगितले पाहिजे. दुर्दैवाने उच्च शिक्षणात हा बदल अजून पूर्णपणे स्वीकारला गेला आहे असे वाटत नाही. शिक्षकांनी स्वतःला रोल मॉडेल म्हणून विकसित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली तर उपस्थिती, सहभाग आणि गुणवत्तेचे अनेक प्रश्न आपोआप सुटू शकतात.

प्रश्न - कोविड काळात शिक्षकांनी दाखवलेल्या लवचीकतेची पुरेशी दखल घेतली गेली का?

- माझ्या मते शिक्षकांचे योगदान अधिक अधोरेखित व्हायला हवे होते. अनेक शिक्षकांनी कोणतेही पूर्वप्रशिक्षण नसताना ऑनलाइन अध्यापन सुरू केले. नवीन तंत्रज्ञान शिकले. साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क ठेवला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. समुपदेशन केले. या सर्व गोष्टींची नोंद इतिहासात राहिली पाहिजे.

प्रश्न - शिक्षक-विद्यार्थी नात्यात कोविडनंतर कोणते कायमस्वरूपी बदल झाले ?

- शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी संवाद मुख्यतः वर्गापुरता मर्यादित असे. आता तो ई-मेल, व्हॉट्सअॅप, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, ऑनलाइन प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांतून होतो. विद्यार्थी अधिक प्रश्न विचारतात. अधिक माहितीची अपेक्षा करतात. शिक्षकांना सतत अद्ययावत राहावे लागते. पण याचबरोबर एक धोकादेखील आहे. मानवी संवाद कमी होऊ नये. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वास, प्रेरणा आणि प्रत्यक्ष संवाद याला पर्याय नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग नातेसंबंध अधिक सक्षम करण्यासाठी व्हायला हवा; त्याची जागा घेण्यासाठी नव्हे.

प्रश्न - कोविड काळात निर्माण झालेल्या डिजिटल सुविधा आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) राबवताना कितपत उपयुक्त ठरत आहेत ?

- कोविड काळात उभ्या राहिलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांचा सर्वाधिक फायदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत होत आहे. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC), मल्टिपल एन्ट्री-एक्झिट, डिजिटल क्रेडिट ट्रान्सफर, स्वयं (SWAYAM) यांसारख्या संकल्पना कोविडपूर्व काळात अंमलात आणणे अधिक अवघड झाले असते. कोविडमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन या तिन्ही स्तरांवर डिजिटल प्रणाली स्वीकारण्याची मानसिक तयारी झाली. त्यामुळे NEP च्या अनेक तरतुदी राबवणे सोपे झाले. शिवाजी विद्यापीठाने ABC अंमलबजावणीत देशात उल्लेखनीय काम केले. 'स्वयं' मधील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. पदव्युत्तर स्तरावर एका अभ्यासक्रमासाठी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. हा बदल कोविडनंतरच्या डिजिटल स्वीकारामुळेच शक्य झाला.

प्रश्न - ChatGPT, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जनरेटिव्ह टेक्नॉलॉजीमुळे मूल्यमापनासमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. आपण त्याकडे कसे पाहता ?

- प्रत्येक नवीन तंत्रज्ञानाबाबत सुरुवातीला भीती व्यक्त केली जाते. कॅल्क्युलेटर आला तेव्हा 'गणित संपेल' असे म्हटले गेले. संगणक आला तेव्हा 'मानवी विचारशक्ती कमी होईल' असे सांगितले गेले. पण तसे घडले नाही.

प्रश्न - एआयकडेही त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे.

- होय, विद्यार्थी असाइनमेंट किंवा प्रकल्प तयार करण्यासाठी एआयचा वापर करतात. त्यामुळे मूल्यमापनाच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान निर्माण झाले आहे. परंतु एआय हे साधन आहे, पर्याय नाही. नावीन्यपूर्ण संशोधन, सर्जनशील विचार, नवे सिद्धान्त, नवे प्रश्न आणि त्यांची उत्तरे निर्माण करण्याची क्षमता अजूनही मानवी बुद्धीकडेच आहे. एआय उपलब्ध माहितीचे संकलन करू शकते; पण मूलभूत संशोधनाची प्रेरणा देऊ शकत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांना एआयपासून दूर ठेवण्याऐवजी त्याचा योग्य वापर शिकवला पाहिजे. भविष्यातील शिक्षणव्यवस्थेला 'AI Literacy' ही संकल्पना स्वीकारावी लागेल.

प्रश्न - शिवाजी विद्यापीठात एआय संदर्भात कोणते प्रयत्न करण्यात आले ?

- आम्ही विद्यापीठात स्वतंत्र AI सेंटर स्थापन केले. भविष्यात प्रत्येक शाखेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव पडणार आहे, हे आम्ही लक्षात घेतले होते. आज वैद्यकीय शिक्षण, कृषी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, पत्रकारिता, समाजशास्त्र अशा सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढतो आहे. त्यामुळे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये एआयचे मूलभूत ज्ञान समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न होता. तंत्रज्ञानाच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन चालत नाही. त्याला समजून घेत, मानवी मूल्यांसह त्याचा स्वीकार करावा लागतो.

प्रश्न - क्लस्टर विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालये हा कोविडनंतरचा अपरिहार्य मार्ग आहे का ?

- मी त्याला अपरिहार्यता म्हणणार नाही; पण तो एक महत्त्वाचा पर्याय आहे. अनेकदा असा समज केला जातो की, आर्थिक अडचणींमुळेच स्वायत्तता किंवा क्लस्टर विद्यापीठांचा विचार केला जातो. प्रत्यक्षात तसे नाही. स्वायत्ततेचा अर्थ स्वतःची शैक्षणिक दिशा ठरविण्याची क्षमता. अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्याचे स्वातंत्र्य. उद्योग, संशोधन आणि स्थानिक गरजांनुसार शिक्षणाची पुनर्रचना करण्याची संधी. ज्या संस्थांमध्ये क्षमता आणि इच्छाशक्ती आहे, त्यांनी स्वायत्ततेकडे सकारात्मक संधी म्हणून पाहिले पाहिजे. मात्र सार्वजनिक विद्यापीठांची भूमिका त्यामुळे संपणार नाही. विद्यार्थ्यांना परवडणारे, सर्वसमावेशक शिक्षण देण्याची जबाबदारी सार्वजनिक विद्यापीठांवर कायम राहणार आहे.

प्रश्न - सार्वजनिक विद्यापीठे आणि नव्या क्लस्टर विद्यापीठांसमोरची आव्हाने वेगवेगळी आहेत का ?

- निश्चितच. सार्वजनिक विद्यापीठांचा व्याप प्रचंड असतो. शेकडो महाविद्यालये, लाखो विद्यार्थी, हजारो शिक्षक आणि मोठी प्रशासकीय यंत्रणा असते. क्लस्टर विद्यापीठांचे स्वरूप तुलनेने लहान असते. त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान असू शकते. नव्या प्रयोगांसाठी अधिक लवचीकता असते. मात्र त्यांच्यासमोरही स्वतंत्र आव्हाने आहेत. पायाभूत सुविधा उभारणे, शैक्षणिक संस्कृती निर्माण करणे, संशोधन वातावरण विकसित करणे आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही मोठी जबाबदारी असते.

प्रश्न - रोजगार, कौशल्ये आणि पदवी यांच्यातील संबंध कोविडनंतर बदलले आहेत का ?

- कोविड हा एक अपघात होता. त्याने काही काळासाठी शिक्षण आणि रोजगार क्षेत्रावर परिणाम केला. पण त्यामुळे संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त झाली असे म्हणता येणार नाही. रोजगार, कौशल्ये आणि पदवी यांचा संबंध आजही कायम आहे. मात्र उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा बदलत आहेत. आता केवळ पदवी पुरेशी नाही. समस्या सोडविण्याची क्षमता, संवादकौशल्य, टीमवर्क, डिजिटल कौशल्ये आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे कौशल्याधारित शिक्षणाला अधिक महत्त्व मिळत आहे. ही सकारात्मक बाब आहे.

प्रश्न - समाजाला विद्यापीठांकडून आता अधिक अपेक्षा आहेत का ?

- होय. आणि त्या वाढणे स्वाभाविक आहे. आज समाजाला केवळ पदवीधर नको आहेत. त्यांना जबाबदार नागरिक, संशोधक, उद्योजक, नवोन्मेषक आणि रोजगारनिर्माते हवे आहेत. विद्यापीठांनी समाजापासून वेगळे राहून चालणार नाही. संशोधन, कौशल्य विकास, उद्योग सहकार्य, स्थानिक प्रश्नांची उकल आणि सामाजिक नेतृत्व या सर्व क्षेत्रांत विद्यापीठांनी योगदान दिले पाहिजे.

प्रश्न - कोविडनंतर संशोधनाची दिशा बदलली का ?

- कोविडमुळे संशोधनाचे महत्त्व समाजाला अधिक स्पष्टपणे समजले. लस निर्मिती, औषध संशोधन, डेटा विश्लेषण, सार्वजनिक आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांकडे समाजाचे लक्ष वेधले गेले. विद्यापीठांनी केवळ पदवी देणाऱ्या संस्था न राहता ज्ञाननिर्मितीची केंद्रे बनले पाहिजेत. संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे.

प्रश्न - कोविडनंतरचे उच्च शिक्षण पूर्ववत होईल की पूर्णपणे नव्याने घडेल ?

- माझ्या मते दोन्ही गोष्टी घडतील. शिक्षणाची मूलभूत मूल्ये, शिक्षक-विद्यार्थी संबंध, ज्ञाननिर्मिती आणि विद्यापीठांची सामाजिक भूमिका कायम राहील. पण काम करण्याच्या पद्धती बदलतील. डिजिटल साधनांचा वापर वाढेल. हायब्रिड शिक्षण वाढेल. लवचीक अभ्यासक्रम येतील. विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला अधिक महत्त्व मिळेल. म्हणजेच मूळ पाया कायम राहील; पण त्यावर उभी राहणारी इमारत अधिक आधुनिक असेल.

प्रश्न - कोविडने उच्च शिक्षणाला जखम दिली की दिशा दिली ?

- कोविडने जखमाही दिल्या आणि दिशादेखील दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मानसिक ताण वाढला. काही काळ गुणवत्तेवर परिणाम झाला. अनेक कुटुंबांनी अपरिमित हानी सोसली. पण त्याचबरोबर कोविडने आपल्याला संकटातही शिक्षण थांबू नये हे शिकवले. तंत्रज्ञानाचा स्वीकार शिकवला. व्यवस्थेला अधिक लवचीक आणि सक्षम बनवले. माझ्या मते कोविडची सर्वात मोठी शिकवण म्हणजे, 'परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाची प्रक्रिया थांबता कामा नये.'

प्रश्न - कुलगुरू म्हणून नव्हे तर शिक्षक म्हणून कोविडकडे पाहताना तुमचा अंतिम निष्कर्ष काय आहे?

- मी शिक्षक म्हणून एकच गोष्ट सांगू इच्छितो, कोविडने आपल्याला शिक्षणातील मानवी संवादाचे महत्त्व नव्याने जाणवून दिले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सुविधा आवश्यक आहेत. पण शिक्षक, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील मानवी नाते त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नसून, ते मूल्ये, संवेदनशीलता, संवाद आणि अनुभव यांतून निर्माण होते. कोविड संपला. व्यवस्था पुन्हा उभी राहिली. महाविद्यालये, विद्यापीठे पुन्हा गजबजली. पण त्या काळाने दिलेली शिकवण विसरता कामा नये. कारण भविष्यातील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद त्या अनुभवातूनच मिळणार आहे.

प्रश्न - परीक्षा, निकाल, संशोधन, निधी उभारणी ही कुलगुरूंची नियमित कामे असतात. मात्र आपल्या कार्यकाळात आपण काही वेगळे आणि दीर्घकालीन परिणाम करणारे उपक्रम राबविले. त्यामागील विचार काय होता ?

- कुलगुरू म्हणून नियमित कामे सर्वच करतात. परीक्षा घेणे, निकाल वेळेत लावणे, संशोधनाला चालना देणे, आर्थिक शिस्त राखणे, सामंजस्य करार करणे ही अपेक्षित कामे आहेतच. पण विद्यापीठ केवळ कार्यालयीन यंत्रणा नसते. ते एक सामाजिक-सांस्कृतिक केंद्र असते. कुलगुरूंनी डोळे, कान आणि मन उघडे ठेवले तर रुटीनच्या पलीकडे जाऊन अनेक परिवर्तनकारी कामे करता येतात. त्यासाठी मोठ्या निधीपेक्षा मोठी कल्पना आणि समाजाचा विश्वास महत्त्वाचा असतो.

प्रश्न - विद्यार्थिनींसाठी उभारलेली अभ्यासिका हा अशाच प्रकारचा उपक्रम होता का ?

- होय. एका विद्यार्थिनीने मॉर्निंग वॉक दरम्यान मला थांबवले आणि तिची अडचण सांगितली. वसतिगृहात गर्दी असल्यामुळे अभ्यास होत नव्हता. विद्यापीठाच्या अभ्यासिकेत गेल्यास वेळेची मर्यादा होती. त्या एका संवादातून विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात स्वतंत्र अभ्यासिकेची कल्पना सुचली. योगायोगाने विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. पणदूरकर यांना त्यांच्या मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ काहीतरी करायचे होते. त्यांनी उदारपणे निधी दिला. विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि आज तीनशे विद्यार्थिनींची क्षमता असलेली आधुनिक अभ्यासिका उभी राहिली. माझ्यासाठी हे केवळ बांधकाम नव्हते; तर एका विद्यार्थिनीच्या समस्येचे कायमस्वरूपी उत्तर होते.

प्रश्न - संशोधक विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याची कल्पना कशी सुचली ?

- संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. निवृत्त साहाय्यक कुलसचिव पंडित मारूलकर यांच्या मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ निधी उपलब्ध झाला. त्यातून संशोधक विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचा एक मजला उभारण्यात आला. उर्वरित काम विद्यापीठाने पूर्ण केले. अशा प्रकारे समाजाच्या सहभागातून शैक्षणिक पायाभूत सुविधा उभ्या राहू शकतात, हा विश्वास अधिक दृढ झाला.

प्रश्न - 'लोकस्मृती वसतिगृह' ही संकल्पना कशी आकाराला आली ?

- समाजाला विद्यापीठाशी भावनिक नाते जोडून घेण्याची संधी दिली तर तो मोठ्या प्रमाणावर सहभागी होतो, असा माझा अनुभव आहे. माजी विद्यार्थी, उद्योग समूह, शिक्षक आणि सामान्य नागरिक यांच्या योगदानातून सव्वा कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला. त्यातून विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले. लोकवर्गणीतून उभे राहिलेले हे वसतिगृह म्हणजे समाज आणि विद्यापीठ यांच्यातील परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे.

प्रश्न - विद्यापीठात कुस्ती संकुल उभारण्यामागची भूमिका काय होती?

- राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, त्यांनी शिक्षणाइतकेच क्रीडेलाही महत्त्व दिले. एका कार्यक्रमात 'विद्यापीठाने तालमी दत्तक घ्याव्यात' अशी सूचना झाली होती. प्रशासनिकदृष्ट्या ते शक्य नव्हते. पण त्यातून विद्यापीठात स्वतंत्र कुस्ती संकुल उभारण्याची कल्पना पुढे आली. योगायोगाने 2024 हे राजर्षी शाहू महाराजांचे 150 वे जयंती वर्ष होते. आज हे संकुल विद्यार्थी आणि खेळाडूंना उपलब्ध आहे. शिक्षण आणि क्रीडा यांचा संगम घडविण्याचा हा प्रयत्न होता.

प्रश्न - क्रीडा क्षेत्रासाठी बी.ए. (स्पोर्ट्स) अभ्यासक्रम सुरू करण्यामागील भूमिका काय होती ?

- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे क्रेडिट प्रणालीला महत्त्व आले. अनेक विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमुळे नियमित वर्गांना उपस्थित राहू शकत नव्हते. याचा विचार करून बी.ए. (स्पोर्ट्स) हा अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कारकिर्दीला शैक्षणिक मान्यता देण्याचा हा प्रयत्न होता.

प्रश्न - सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेले निर्णयही विशेष मानले जातात...

- होय. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि भाषिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रमांमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. शुल्कही माफक ठेवले. उच्च शिक्षणामध्ये सामाजिक न्यायाची अंमलबजावणी अशा ठोस निर्णयांतूनच होते.

प्रश्न -विद्यापीठ गीत, शाहू संग्रहालय आणि स्वातंत्र्यसैनिकांचा दस्तऐवज यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांकडे आपण कसे पाहता ?

- विद्यापीठ म्हणजे केवळ पदवी देणारी संस्था नाही; ती समाजाच्या स्मृती जपणारी संस्थाही आहे. साठ वर्षांनंतर विद्यापीठाला अधिकृत गीत मिळाले. शाहू महाराजांवरील व्याख्यानमाला, संग्रहालय, स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करून केलेले दस्तऐवजीकरण, साहित्यिक सतीश काळसेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार आणि ग्रंथसंपदा हे सर्व उपक्रम विद्यापीठाला सांस्कृतिक अधिष्ठान देणारे होते. ज्ञाननिर्मितीबरोबरच सांस्कृतिक स्मृतींचे संवर्धन करणे हीदेखील विद्यापीठाची जबाबदारी आहे.

प्रश्न - या सर्व कामांकडे पाहताना तुम्हाला सर्वाधिक समाधान कोणत्या गोष्टीचे वाटते ?

- माझे सर्वात मोठे समाधान म्हणजे ही कामे व्यक्ती म्हणून मी केली नाहीत; ती विद्यापीठ परिवाराने केली. एक कल्पना मांडली की, समाज, माजी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, अधिकार मंडळे, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा प्रतिसाद मिळत गेला. प्र-कुलगुरू प्रा.पी.एस. पाटील यांचेही उत्तम सहकार्य मिळाले. आम्हा दोघांचे विचार आणि निर्णय एकसंघ राहिले. म्हणूनच मला नेहमी वाटते की, कुलगुरूचे काम म्हणजे केवळ प्रशासन चालवणे नव्हे, तर लोकांच्या चांगुलपणाला दिशा देणे. ती दिशा मिळाली तर विद्यापीठे केवळ शिक्षणसंस्था राहत नाहीत, तर समाजपरिवर्तनाची केंद्रे बनतात.

प्रश्न - शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, प्र-कुलगुरू आणि कुलगुरू असा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केल्यानंतर आज आपण वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आहात. या नव्या जबाबदारीकडे आपण कसे पाहता ?

- ज्या वारणा महाविद्यालयात मी विद्यार्थी म्हणून बी. एस्सी. चे शिक्षण घेतले, त्याच परिसरात आज कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील विलक्षण योग आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या प्रस्थापित सार्वजनिक विद्यापीठात काम करण्याची आव्हाने वेगळी होती; तर वारणा विद्यापीठात शून्यातून संस्था उभी करण्याचे आव्हान आहे. मी या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू आहे. त्यामुळे केवळ परीक्षा आणि पदवीपुरते विद्यापीठ मर्यादित न ठेवता संशोधन, नवोपक्रम, उद्योग-सहभाग आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.

संवादक : सुनील पाटील


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके