आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणात मला कोणतेही अदृश्य अडथळे वाटत नाहीत. आमच्याकडे UIT च्या एक वर्षापूर्वी विद्यार्थिनी रुजू झाल्या आहेत. ज्या मुलींना धड मराठी बोलता येत नव्हते, त्या आज उत्तम इंग्रजी बोलतात. त्या एक महिना इंडस्ट्रीमध्ये इन्टर्नशिप करून आल्या, बॉयलर कसा चालवायचा हे शिकल्या, अजून त्यांचे लॅब वर्क पूर्ण झालेले नाही. तिसऱ्या वर्षात हे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामधील कर्टीन विद्यापीठात शिकायला जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर, घनदाट जंगले, निबिड अरण्य, कोया व माडिया संस्कृतीच्या समृद्ध वारशाने नटलेला परंतु ऐतिहासिक काळापासून विकासाच्या प्रवाहात मागे पडलेला आणि नक्षलग्रस्तांच्या सावटाखाली वावरणारा प्रदेश म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर. भौगोलिक विलगता आणि दहशतीच्या छायेत पिचलेल्या या भूमीमध्ये आदिवासी समाजासाठी शिक्षणाची ज्योत तेजाळणे हे आव्हानात्मक कार्य. अशा या दुर्गम भागात वाड्या-तांड्यापर्यंत उच्च शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी 27 सप्टेंबर 2011 रोजी स्थापन झालेले 'गोंडवाना विद्यापीठ' हे या मातीतील आदिवासी जनजीवनाचा श्वास ठरले आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या आदिवासी व दुर्गम भौगोलिक सीमांमध्ये पसरलेले आहे. गडचिरोली येथील मुख्य विद्यापीठ परिसर निसर्गाच्या सान्निध्यात आणि आधुनिक सुविधांनी युक्त असा आहे. या संपूर्ण कार्यक्षेत्रांतर्गत 175 संलग्न महाविद्यालये कार्यरत असून, 76 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांत शिक्षण घेत आहेत. विद्यापीठात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे आणि अभियांत्रिकी अशा विविध शाखांतर्गत 12 हून अधिक पदव्युत्तर शिक्षण विभाग (PGTD) व अभ्यास केंद्रात 1100 हून अधिक विद्यार्थी आहेत. याशिवाय, 40 प्राध्यापक, 150 पेक्षा अधिक अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
एक काळ असा होता की, या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नागपूर किंवा अमरावती विद्यापीठावर अवलंबून राहावे लागत असे. आर्थिक गरिबी आणि दळणवळणाचा अभाव यामुळे येथील बहुतांश तरुण शिक्षणापासून दूर राहत. ही पोकळी भरून काढण्यासाठी व उपेक्षितांच्या दारात उच्च शिक्षण पोहोचवण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
इतर विद्यापीठांपेक्षा गोंडवाना विद्यापीठ अत्यंत अनोखे आहे. हे केवळ पारंपरिक पदव्या देणारे केंद्र नाही, तर येथील परिसर निसर्गाच्या कुशीत वसलेला असून, आधुनिक तंत्रज्ञान आणि आदिवासी लोकसंस्कृतीचा अप्रतिम संगम इथे पाहायला मिळतो. वनसंपदा, खनिज संपत्ती आणि स्थानिक आदिवासी कला-संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून शिक्षण देणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे. 'विद्यापीठ आपल्या गावात' या संकल्पनेतून खेडोपाड्यातून शिक्षणापासून दुरावलेल्या ड्रॉप-आउट मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम या विद्यापीठाने केले आहे.
प्रा.डॉ. प्रशांत बोकारे हे डिसेंबर 2021 पासून कुलगुरूपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ उच्च व तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी या विद्यापीठाच्या विकासासाठी लावली आहे. आयआयटी गुवाहाटी येथून ट्रॅफिक इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. आणि आयआयएम रायपूरमधून डेटा अॅनालिटिक्स व मशिन लर्निंगचे उच्च शिक्षण घेतलेले प्रा. बोकारे केवळ कक्षात बसणारे प्रशासक नसून, जंगलाच्या पायथ्याशी जाऊन प्रत्यक्ष समस्या समजून घेणारे आणि तशी पावले उचलणारे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या नावावर एकूण 41 शोधनिबंध (ज्यात 21 स्कॅपस इंडेक्स समाविष्ट आहेत) नोंदवले गेले आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण 5 पेटंट्स (भारतीय 1, ऑस्ट्रेलियन 1 आणि दक्षिण आफ्रिकन 3) आहेत. गावकऱ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे, आदिवासी भागासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवणे हे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील युवकांच्या हाताला काम, डोक्यात ज्ञान आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न देणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाची आंतरिक परिस्थिती नेमकी काय आहे? उच्च शिक्षणासमोर नक्षलग्रस्त भागात कोणकोणते डोंगर उभे आहेत आणि या सर्व मर्यादांवर मात करून शक्यतांचे नवे क्षितिज कसे उजळत आहे? याचा सखोल मागोवा घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला आहे.
प्रश्न : विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि आता कुलगुरू असा तुमचा प्रवास कसा घडला? या प्रवासातील कोणते टप्पे तुम्हाला सर्वाधिक घडवून गेले?
- माझा प्रवास अतिशय रंजक आणि समृद्ध राहिला आहे. माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. वयाच्या 11-12 व्या वर्षापासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली. वर्ध्यात वडिलांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या अत्यंत समृद्ध ग्रंथालयाशी ओळख झाली आणि कोणत्या वयात काय वाचावे, हे जाणीवपूर्वक शिकायला मिळाले. विनोबा भावे, 'किशोर' मासिक यांपासून 'Freedom at Midnight', 'माझी जन्मठेप', 'सांगत्ये ऐका' अशी अनेक पुस्तके मी वाचली. प्र.ग. सहस्रबुद्धे यांचे 'जीवनमूल्य' हे पुस्तक माझ्यात खोलवर रुजले. दहावीनंतर वडील आणि आम्ही एकत्र पुस्तक वाचायचो, त्यावर चर्चा, वादविवाद, मतभेद व्हायचे. विद्यार्थिदशेत असताना या पुस्तकांचा जो अमीट ठसा उमटला, तो आजतागायत कायम आहे. प्र.ग. सहस्रबुद्धे, श्री. म. माटे यांचे निबंध वाचले, श्रीधर केतकर यांचे चरित्र वाचले. तुमचा DNA एकदा तयार झाला की, मग तो बदलत नाही.
पुढे सिव्हिलचा डिप्लोमा पूर्ण करून सांगलीच्या वालचंद महाविद्यालयात पोहोचलो. तिथे प्रा.म.द. हातकणंगलेकर, प्रा. दिलीप परदेशी यांच्यामुळे साहित्य आणि प्रा. देशमुख यांच्यामुळे अर्थशास्त्राची गोडी लागली. वालचंद कॉलेज हे खऱ्या अर्थाने घडवणारे होते; जिथे वर्गखोलीबाहेर विद्यार्थी घडले. तिथे अनेक क्लब (फोटोग्राफी, आर्ट, ट्रेकिंग, डिबेट क्लब) होते, आणि टिळक सभागृहातील वर्षभराच्या कार्यक्रमांच्या नोंदवहीमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळाला आणि वर्तणूक व संवाद कौशल्य मिळत गेले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर इतर संधीही होत्या, जसे की, वालचंद कॉलेजच्या खाजगी व्यवस्थापनामार्फत (अजित गुलाबचंद) हिंदुस्थान बांधकाम प्रकल्पावर काम करण्याची मोठी संधी होती. परंतु, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे वर्ध्याच्या आसपास नोकरी करणे गरजेचे होते. मी वर्ध्याच्या बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल प्रा.व्ही.आर. देशपांडे यांना भेटलो. त्यांनी 'काय करतो?' असे विचारल्यावर मी 'बी.ई. चा निकाल लागायचा आहे, डिस्टिंक्शन मिळेल असे वाटते', असे सांगितले. तेव्हा हातात निकाल नसतानाही त्यांनी वालचंद कॉलेजमधील त्यांचे मित्र व डीन पी.ए. कुलकर्णी यांना फोन करून माझी माहिती घेतली आणि मला तिथे जॉईन करून घेतले. त्यातून माझ्या कुटुंबाच्या गरजा भागल्या, जबाबदाऱ्या पार पाडता आल्या आणि जाणीव झाली की, 'शिकवणे हाच आपला मूळ पिंड आहे, तेच आपण केले पाहिजे.' म्हणून मी याच क्षेत्रात रमलो.
मी 1987 पासून 2013 पर्यंत वर्ध्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षक होतो. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मी उत्तम शिक्षक होतो, मॅनेजमेंटसोबत माझे चांगले संबंध होते, स्थानिक होतो, घर होते. पण ज्या वेळी महाविद्यालयाचा प्राचार्य निवडण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यापेक्षा सहा वर्षांनी ज्युनिअर असलेल्या एका व्यक्तीला प्राचार्य केले गेले. मी बाहेरगावी गेलो होतो, परत आल्यावर ट्रस्टींना विचारले की, 'असे का केले ?' त्यावर ते म्हणाले, 'आमच्यावर काही कंपलशन आहे.' 'ठीक आहे' म्हणून मी त्याच दिवशी राजीनामा दिला. माझ्याकडे दुसरी कोणतीही नोकरी नव्हती. त्याच वेळी छत्तीसगडकडून बोलावणे आले, मी गेलो. प्रारंभी भिलाईच्या संस्थेत प्राचार्य होतो, मग जिंदाल विद्यापीठात Dean झालो. तेव्हा मला प्राचार्य केले असते किंवा विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता तर मी नक्कीच छत्तीसगडला गेलो नसतो.
प्रश्न : वर्गात विद्यार्थ्यांसमोर उभे राहणारे 'बोकारे सर' आणि आज विद्यापीठाचे नेतृत्व करणारे 'कुलगुरू बोकारे' यांच्यातील सर्वात मोठा वैचारिक बदल कोणता आहे ?
- हाडाच्या शिक्षकाने चांगला प्रशासक झाले पाहिजे. म्हणूनच, 'शिक्षक-प्रशासक' हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यात समतोल साधावा लागतो, ज्याला 'fire under daily' म्हणतो, तो असावा लागतो. मुळात वाचनातून माझ्यावर चांगले संस्कार झाले, त्यामुळे मनापासून आणि झोकून देऊन काम करण्याची माझी वृत्ती होती आणि अन्यायाबद्दल चीड होती. कारण विद्यार्थी असताना माझ्यावर अनेक अन्याय झाले होते. त्यामुळे अधिकाराच्या पदावर आल्यावर असे अन्याय कोणावरही होऊ नयेत, ते कमी व्हावेत, यासाठीची संधी हाती येते. शिक्षक असताना होणाऱ्या अन्यायाकडे मूकप्रेक्षक म्हणून पाहावे लागते, पण हातात सूत्रे आली की निर्णय घेण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे शिक्षक ते कुलगुरू हा प्रवास एकमेकांना पूरक आहे.
काल-परवा काही विद्यार्थी माझ्याकडे आले आणि म्हणाले, "40 गुणांचा नियम असताना आम्हाला 50 गुणांचा नियम सांगितला जातो आणि 50 गुण असतील तरच पास व्हाल, असे सांगितले जाते, त्यामुळे आम्ही विद्यापीठात चकरा मारतोय." गेल्या 10 वर्षांपासून 40 गुणांचा नियम असताना तो कधी बदलला याबाबत मी तत्काळ माहिती घेतली, कागदपत्रे तपासली. तेव्हा लक्षात आले की, 40 गुणांचाच नियम कायम आहे. मी तत्काळ निकाल बदलण्याचा निर्णय घेतला आणि 24 तासांच्या आत सुधारित निकाल लावला, ज्यामुळे विद्यार्थी खूप खूश झाले. सत्ता राबवणे त्यासाठी आवश्यक आहे. ज्यांच्यामुळे आपल्या हातात सत्ता आली आहे, त्यांच्या जीवनात कोणता उल्लेखनीय बदल घडवून आणता येईल, हा विचार करूनच सत्तेचा वापर केला पाहिजे.
प्रश्न : विदर्भातील शिक्षणसंस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला आदिवासीबहुल भागातील विद्यापीठाची धुरा सांभाळण्याची संधी मिळते, तेव्हा 'संस्थात्मक जबाबदारी' आणि 'social commitment' यांचा समतोल कसा साधावा लागतो ?
- कुलगुरू पदाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या करून पाहण्याची गरज नाही. शेवटी, आदिवासीबहुल भाग असला तरी तिथे माणसेच आहेत. इतर ठिकाणच्या माणसांपेक्षा ती माणसे अधिक साधी आणि सोपी, भोळी असतात. विद्यापीठ येण्यासाठी त्यांना 2011 पर्यंत वाट पाहावी लागली; किती मोठा काळ लोटला हा! अखेर 2011 मध्ये इथे विद्यापीठाची स्थापना झाली आणि आता कुठे या भागातील लोकांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे पुढील 50 वर्षांत हा परिसर देशातील इतर भागांपेक्षा नक्कीच पुढे असेल, कारण आता शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून इथल्या माणसांच्या प्रतिभेला योग्य वाव मिळत आहे. म्हणूनच, या पदाकडे मी केवळ प्रशासकीय जबाबदारी म्हणून न बघता, Essential Tools for Development (विकासाचे आवश्यक साधन) म्हणून पाहतो. विद्यापीठ चालवणे म्हणजे केवळ प्रशासकीय काम नाही; तर ती सामाजिक जबाबदारी आहे. येथे विद्यार्थ्यांच्या समस्या शहरी विद्यापीठांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. अनेक विद्यार्थी पहिल्या पिढीतील शिकणारे आहेत. आर्थिक मर्यादा, भाषेतील अडथळे आणि सामाजिक परिस्थिती या सर्वांचा त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. म्हणूनच येथे धोरण आखताना केवळ विद्यापीठाचा विचार न करता; स्थानिक समाज, आदिवासी संस्कृती, स्थानिक अर्थव्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या वास्तवाचा विचार करावा लागतो. सामाजिक बांधिलकी नसलेले प्रशासन या भागात यशस्वी होऊ शकत नाही.
प्रश्न : तुमच्या आयुष्यातील अशी कोणती घटना किंवा अनुभव आहे, ज्यामुळे तुम्हाला शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, याची जाणीव झाली ?
-असा प्रसंग नक्कीच घडला. डॉ. देवेंद्रकुमार गुप्ता हे वर्धा येथील ग्रामोपयोगी केंद्राचे संचालक होते आणि मी वर्ध्याच्या कॉलेजला विज्ञान विषयाचा शिक्षक होतो. विशेष म्हणजे, मी या केंद्राला भेटायला गेलो असता, ते मला आजी आणि रसुलाबाद या जंगलातील वस्त्यांमध्ये घेऊन गेले. तिथे मला विचारले, "तुम्ही यांच्यासाठी काय करू शकता?" मी इंजिनिअर असल्यामुळे त्यांच्याशी डिझाईनवर चर्चा केली. ते मला प्रत्यक्षात जागेवर घेऊन गेले आणि म्हणाले की, "हे घर आपण इथे बांधू शकतो का?" डिझाईनची 'Unity for Purpose' ही संकल्पना आणि तत्त्व असायला हवे, हे मला तिथे शिकायला मिळाले. मी त्यांना पुन्हा नवीन डिझाईन करून दिले, जे त्यांना खूप आवडले. त्या परिसराने मला शिकवले की, पुस्तकात शिकलेले आणि जमिनीवरचे वास्तव वेगळे असते; We have Larger Purpose of Life. त्या वेळी लक्षात आले की, पदवी माणसाला ज्ञान देईल किंवा नाही, पण शिकायचे कसे हे नक्कीच शिकवते. समाजात बदल घडवून आणण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करता येतो, हे मी तिथून शिकलो, पुढे गडचिरोलीत आल्यावर ते प्रत्यक्षात सिद्ध झाले.
प्रश्न : गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदाकडे तुम्ही प्रशासकीय जबाबदारी म्हणून पाहता की सामाजिक परिवर्तनाचे मिशन म्हणून ?
- मी या पदाकडे प्रशासकीय जबाबदारी आणि सामाजिक परिवर्तन यांचे सुंदर मिश्रण म्हणून पाहतो. प्रशासकीय चौकटीत राहूनच सामाजिक न्यायाचे प्रश्न सोडवता येतात. विद्यापीठाची सूत्रे हाती घेतल्यावर केवळ फाईल्स मंजुरीचे काम म्हणजे कुलगुरूपद नव्हे; तर या भागातील वंचित घटकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश कसा पोहोचवता येईल, हे मुख्य ध्येय असते. गोंडवाना विद्यापीठाने इथल्या आदिवासी बांधवांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हे एक साधन बनवले आहे.
प्रश्न : आदिवासी भागातील उच्च शिक्षणाचा प्रश्न हा मुख्यतः शिक्षणाचा आहे की सामाजिक न्यायाचा?
- आदिवासी भागातील उच्च शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नसून तो मुख्यत्वे सामाजिक न्यायाचा आणि समान संधीचा आहे. घटनेत संधीची समानता आश्वस्त केली आहे, परंतु त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. उदाहरणार्थ, गडचिरोली जिल्ह्यातील 52 टक्के शाळांमध्ये गणित आणि विज्ञानाचे शिक्षकच नाहीत, तरीही तिथले विद्यार्थी दहावी पास होतात आणि पुढे जेईई (JEE) किंवा नीट (NEET) च्या परीक्षेला बसतात. कागदोपत्री त्यांना नागपूर-मुंबईच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देण्याची समान संधी मिळाली असली, तरी ज्या मुलाने दहावीपर्यंत गणित आणि विज्ञान व्यवस्थित शिकलेच नाही, तो नागपूर, पुणे, मुंबई किंवा दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत कशी स्पर्धा करणार? जोपर्यंत भामरागड किंवा आदिवासी भागातील शाळांमध्ये गणित-विज्ञानाचा चांगला शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत संधीची समानता ही केवळ कागदावरच राहते. नागपूर किंवा दिल्लीत बसून आदिवासीबहुल भागाचा विचार करणे प्रॅक्टिकली शक्य नाही, आणि हा खरा प्रश्न नागरी लोकांच्या दृष्टीकोनाचा व मानसिकतेचा आहे.
भामरागडला चांगली शाळा किंवा हेड्री, किंवा गुंडेनुर सारख्या भागात (जिथे आजही खाटेवरून एखाद्या स्त्रीला प्रसूतीसाठी न्यावे लागते आणि चांगले हॉस्पिटल उभे राहिलेले नाही), अशा मूलभूत सुविधा का निर्माण करत नाहीत? हा प्रश्न केवळ शिक्षणाचा नसून सामाजिक न्यायाचा आणि विचार करण्याच्या पद्धतीचा आहे. आजवरची धोरणे ही सहसा ज्यांचे पोट भरलेले असते त्यांच्याकडून तयार केली जातात. हा विचार धोरणकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी आणि समाजातील धुरीणांनी केला पाहिजे. कोणतीही आंदोलने असोत, पण त्यात आपला 'हेड्री' चा बांधव कुठे आहे? इथल्या समस्यांना कुठल्या आंदोलनांनी हातात घेतले आहे? याचे कारण त्यांना हे वास्तव दिसत नाही, त्यामुळेच धोरण ठरवताना हा खरा परिप्रेक्ष्य (Perspective) बदलण्याची आणि आदिवासी विकासाकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहण्याची आज मोठी गरज आहे.
प्रश्न : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे ? भाषा, आर्थिक परिस्थिती, भौगोलिक अंतर, कौटुंबिक पार्श्वभूमी की आत्मविश्वासाचा अभाव ?
- यांपैकी कोणताच मूळ अडथळा नाही. आदिवासींना जगणे कधीच अडचणीचे वाटले नाही. त्यांना विद्यापीठाच्या 'एकल' प्रकल्पाच्या माध्यमातून जगण्याचे कौशल्य, पेसा अॅक्ट (Pesa Act), वन कायदा, फॉरेस्ट जैवविविधता कायदा, मिनिमम गॅरेंटेड प्राईस आणि मनरेगाचे नियोजन करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. ते मराठी शिकले, आमचे लोक गोंडी शिकले आणि या प्रक्रियेतून पुढे आले, त्यामुळे भाषेचा किंवा इतर बाबींचा कोणताही मोठा प्रश्न निर्माण झाला नाही. आमच्या 'एकल' प्रकल्पांतर्गत इकडून तिकडून माणसे गोळा करून 183 जणांना सहयोगी शिक्षक केले, त्यांना जीवन शिक्षण मिळाले, आणि त्याचा परिपाक म्हणून 169 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. व्यसनमुक्तीसाठी अकरा महिने आमचे विद्यार्थी खेड्यात राहतात. त्यांना दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंड देऊन खेड्यातच कामाची संधी दिली गेली. त्यांना आपल्या नागरी जीवनाची किंवा आधुनिक सुखसुविधांची कोणतीही गरज भासत नाही, तरीही ते पिढ्यान्पिढ्या आनंदाने जगतच आहेत ना! त्यांच्याकडे उपजत शहाणपण, समज आणि माहितीचे संकलन करून त्याचे ज्ञानात व शहाणपणात रूपांतर करण्याचे कौशल्य असते. त्यामुळे खरी अडचण आदिवासींची नसून आपली मानसिकता बदलण्याची आहे.
प्रश्न : विद्यापीठाच्या आकडेवारीत दिसणारे यश आणि दुर्गम गावांतील वास्तव यामध्ये किती अंतर आहे ?
- खूप मोठे अंतर आहे. आजही विद्यापीठ ज्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे, तिथे प्रत्यक्षात पोहोचलेले नाही. गुंडेनुर, हेड्री, एटापल्ली यांसारख्या भागांतील विद्यार्थ्यांचे अस्तित्व काय, असा मोठा प्रश्न आहे. आपण तिथे केवळ कागदावर पोहोचलो आहोत आणि एवढेच विद्यार्थी पटलावर दाखवून पदवीला शिकवण देत आहोत, पण विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे आणि त्यांचे जीवन आमूलाग्र बदलवणारे शिक्षण आम्हाला अजून देता आलेले नाही.
प्रश्न : पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली पारंपरिक विद्यापीठ व्यवस्था कितपत अनुकूल आहे ?
- अशा विद्यार्थ्यांसाठी आपली पारंपरिक विद्यापीठ व्यवस्था फारशी अनुकूल नाही. कारण ती बाहेरून लादलेली आहे. तिथली मूल्ये आणि इथले वास्तव यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कुटुंबात कधीही कोणी शिकलेले नसते, तेव्हा त्या मुलाला विद्यापीठाच्या वातावरणात जुळवून घेताना प्रचंड मानसिक संघर्ष करावा लागतो. अशा वेळी गोंडवाना विद्यापीठासारख्या संस्थांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार देणे गरजेचे असते, जे आम्ही 'एकल' आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून करत आहोत.
प्रश्न : विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेश व टिकावाचे चित्र काय आहे? 'सायलेंट ड्रॉपआऊट' मागील प्रमुख कारणे कोणती आहेत ?
- यामागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी चांगले शिक्षण उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी अशी व्यवस्था दिसते की, मी कुलगुरू असून अत्यंत जबाबदारीने बोलतोय, प्राचार्य आठवड्यातून दोन दिवस येतात आणि शिक्षकही आठवड्यातून दोन दिवसच येतात. पण यावर नियंत्रण करायचे म्हटले तर जे सुरू आहे ते बंद होण्याची शक्यता निर्माण होते, कारण तेथील इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसे नाही. ते नाही म्हणून कुलगुरूंना कॉलेज बंद करण्याचे अधिकार आहेत, पण कॉलेज बंद केले तर काय ? त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना किंवा उत्तर नाही. शहरी भागात एखादे कॉलेज बंद केले तर दुसरे पर्याय उपलब्ध असतात, पण दुर्गम भागात कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. दुर्गम भागातील विद्यार्थी जर त्या कॉलेजमध्ये गेले नाहीत तर काय करतील? यापूर्वी अशी स्थिती होती की, हातात बंदूक घ्यायची. पण ते टाळण्यासाठी हे शैक्षणिक संस्थान सुरू ठेवणे आणि अधिक चांगल्या प्रकारे चालवणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रश्न : चांगले शिक्षक आणण्यासाठी काही प्रयत्न ?
- महाविद्यालयांत चांगले शिक्षक आणणे हे विद्यापीठाच्या हातात नसते, कारण महाविद्यालयांना विद्यापीठाची संलग्नता असली तरी त्यांचे व्यवस्थापन खाजगी असते. खाजगी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या हितसंबंधांमुळे विद्यापीठ त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. कागदोपत्री रंगवल्या गेलेल्या गोष्टी एकदम करेक्ट असतात, त्यामुळे जोपर्यंत विद्यापीठाचे कॉलेज तिथे होत नाही, तोपर्यंत परिस्थिती कठीण वाटते. विद्यापीठातील विविध विभागांच्या शिक्षकांचे सांगायचे तर, आज मी पूर्णपणे समाधानी नसलो तरी हळूहळू आमचे शिक्षक सामाजिक जाणिवेने काम करायला लागले आहेत. आज 52 पैकी 25 पेक्षा अधिक शिक्षक समाजापर्यंत पोहोचून, सामाजिक क्षेत्रात व विद्यार्थ्यांमध्ये रोजगार कसा देता येईल, याविषयी काम करत आहेत. हा बदल गेल्या दोन-तीन वर्षांतील आहे आणि पुढील पाच वर्षांत सर्व शिक्षक या प्रेरणेने काम करतील अशी मला अपेक्षा आहे.
प्रश्न : इतर राज्यांतील शिक्षक आता बहुतेक विद्यापीठांमध्ये दिसत नाहीत, स्थानिक जास्त असतात, याचे काय कारण ?
- यामागे 'सामाजिक दबाव' हे प्रमुख कारण आहे. आम्ही अलीकडेच 30 शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या, त्यामध्ये काही स्थानिक उमेदवार नक्कीच होते. मात्र, जे आमच्याकडे तासिका तत्त्वावर (CHB) आधीपासून शिकवत होते, त्यांचा असा दबाव होता की, आम्हालाच घेतले पाहिजे. त्यातील काहींची निवड न झाल्यामुळे ते आता उच्च न्यायालयात गेले आहेत आणि ते प्रकरण सध्या प्रलंबित आहे. अशा प्रकारचा दबाव कुलगुरूंनी कसा सहन करायचा? कुलगुरूंवर मोर्चे, आंदोलने या माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असतो. नियमाप्रमाणे आणि प्रक्रियेनुसार केलेली प्राध्यापकांची नियुक्ती समाजाने का समजून घेऊ नये? 30 पदांसाठी 1700 जणांचे अर्ज आले होते, साहजिकच उर्वरित 1670 लोकांना संधी मिळणार नव्हती. मग या नाराज लोकांनी विद्यापीठाच्या विरोधात जाणे योग्य आहे का? समाज फक्त दोष दिग्दर्शनाचे काम करतो. चूक दाखवून देण्याचीही एक पद्धत असते. या सगळ्यामुळे शेवटी नुकसान समाजाचेच होते.
माहिती अधिकारात (RTI) दररोज 20-25 अर्ज येतात आणि हे सगळे RTI कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देण्यासाठीच असतात. ज्यांचा काहीही संबंध नसतो, असे त्रयस्थ पक्ष अर्ज करतात आणि कंत्राट कोणाला दिले? असे विचारतात. इथे यंत्रणा आहे, ऑडिटर आहे, सरकारी वचक आहे आणि कायदे आहेत, असे असतानाही संबंध नसणाऱ्यांनी माहिती विचारू नये, आणि विचारली तरी त्याला हरकत नाही. पण त्यानंतर जे प्रकार होतात, ते कोणताही संवेदनशील कुलगुरू सहन करू शकत नाही. इतका दबाव का सहन करायचा? आम्हाला वैयक्तिक आयुष्य नाही का? असा विचार सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक कुलगुरू करत असेल.
प्रश्न : आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणाच्या वाटचालीत आजही कोणते अदृश्य अडथळे उभे आहेत ?
- आदिवासी मुलींच्या उच्च शिक्षणात मला कोणतेही अदृश्य अडथळे वाटत नाहीत. आमच्याकडे UIT च्या एक वर्षापूर्वी विद्यार्थिनी रुजू झाल्या आहेत. ज्या मुलींना धड मराठी बोलता येत नव्हते, त्या आज उत्तम इंग्रजी बोलतात. त्या एक महिना इंडस्ट्रीमध्ये इन्टर्नशिप करून आल्या, बॉयलर कसा चालवायचा हे शिकल्या, अजून त्यांचे लॅब वर्क पूर्ण झालेले नाही. तिसऱ्या वर्षात हे विद्यार्थी ऑस्ट्रेलियामधील कर्टीन विद्यापीठात शिकायला जाणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाने या विद्यापीठाशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार खनिज आणि धातूशास्त्र क्षेत्रातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, तसेच मायनिंग आणि तंत्रज्ञान शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम व पदवी/प्रमाणपत्र कार्यक्रमांसाठी झाला आहे. या मुलींमध्ये मोठे स्थित्यंतर घडून येण्याचे एकमेव कारण म्हणजे योग्य शिक्षण. हा बदल घडविणे हे विद्यापीठाचे काम आहे.
प्रश्न : गोंडवाना विद्यापीठाला महाराष्ट्रातील आदिवासी उच्च शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या मॉडेलची वैशिष्ट्ये कोणती ?
-गोंडवाना विद्यापीठाचे मॉडेल हे पूर्णपणे वेगळे आहे. आमच्याकडे एसटीआरसी (STRC) मॉडेल आहे, ज्या अंतर्गत स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी यशस्वी वापर केला जातो. बांबू डिझाईन, वनीकरण, स्थानिक हस्तकला, आणि औषधी वनस्पतींचा वापर करून स्थानिक तरुणांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय 'एकल' प्रकल्प, 'सेवाकर्मी' उपक्रम (ज्यामध्ये प्रशासकीय पारदर्शकतेसाठी विद्यापीठाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे), आणि 'ट्रायबटेक' (Tribetech) यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून आम्ही स्टार्टअप व उद्योजकतेला चालना देत आहोत.
प्रश्न : गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश कितपत साध्य झाला आहे, असे तुम्हाला वाटते?
- स्थापनेपासूनचा आढावा घेतला, तर आम्ही अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणाशी जोडले गेले आहेत. पदव्युत्तर विभागातील शिक्षण निःशुल्क केल्यामुळे प्रवेश संख्या 300 वरून थेट 1090 वर गेली आहे. मात्र, अजूनही बऱ्याच वाटा चोखाळायच्या आहेत. जोपर्यंत प्रत्येक दुर्गम पाड्यावरील मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचत नाही, तोपर्यंत आमचे ध्येय पूर्ण झालेले नाही, असे मी मानतो.
प्रश्न : नक्षलप्रभावित भागातील विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि शहरी विद्यार्थ्यांच्या आकांक्षांमध्ये तुम्हाला कोणता मूलभूत फरक जाणवतो?
- इथल्या विद्यार्थ्यांच्या आकांक्षा खूप मर्यादित असतात; जेव्हा सीआयआयआयटी (CIIIT) च्या माध्यमातून मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आणि टाटा टेक्नॉलॉजीने पुढे येऊन प्रत्येक मुलाला 25 हजार रुपयांची नोकरी देण्याची तयारी दर्शवली, तेव्हा इथली मुले बाहेर जायला तयार झाली नाहीत. याचे कारण म्हणजे इथले लोक आपल्या मातीशी आणि प्रदेशाशी समरस झालेले असतात, त्यांना आपल्या मूळ प्रदेशातच राहणे आणि जगणे पसंत असते. याउलट, शहरी भागातील विद्यार्थ्यांचा विचार केला, तर त्यांना नागपूर, मुंबई, किंवा थेट न्यूयॉर्कसारख्या महानगरांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे असते आणि करिअर करायचे असते.
प्रश्न : या भागातील युवक नक्षलवादाकडे विचारसरणीमुळे वळतात की संधींच्या अभावामुळे?
- आता नक्षली विचार संपत आला आहे, परंतु यापूर्वी जे तरुण नक्षलवादाकडे वळाले, ते वैचारिक प्रवाहापेक्षा मुख्यत्वे संधीच्या अभावामुळे आणि व्यवस्थागत अन्याय-अडचणींमुळे. हा दुर्गम भाग विकसित झालेला नसल्यामुळे इथल्या आदिवासी लोकांवर विविध प्रकारचा अन्याय झाला. या अन्यायाविरुद्ध त्या वेळी वाचा फुटली नाही आणि हक्कांची दाद मिळण्याचे कोणतेही साधन किंवा मार्ग उपलब्ध नव्हते. त्यामुळे घुसमट होऊन हे तरुण नकळत नक्षलवादाकडे वळाले. ही प्रवृत्ती पूर्वसंचलित किंवा पक्की विचारसरणी म्हणून स्वीकारलेली नव्हती, तर त्या-त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीची, आणि संधी व न्याय न मिळाल्याची प्रतिक्रिया होती. विद्यापीठाने या अनुषंगाने शोध घेणारा काही रिसर्च अथवा प्रकल्प अद्याप केलेला नाही.
प्रश्न : नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र उच्च शिक्षण धोरणाची गरज आहे का ?
- नक्षलग्रस्त व आदिवासी भागांसाठी संपूर्ण देशात लागू असलेले एकसाची शैक्षणिक धोरण आणि 'युरोपियन मानसिकतेचे' अकॅडमिक कॅलेंडर अत्यंत अयोग्य आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात शेतीचा रोपणीचा काळ असल्याने या भागातील विद्यार्थी शिक्षणाऐवजी शेतीच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांना सक्तीने वर्गखोलीत आणणे चुकीचे ठरते. तसेच, पावसाळ्यातील शेतीची कामे आणि 40 ते 45 अंश कडक उन्हाळ्याचा विचार न करता लादलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान व हाल होतात. यावर उपाय म्हणून, स्थानिक हवामान, भौगोलिक परिस्थिती व गरजेनुसार शैक्षणिक सत्र आणि परीक्षांचे नियोजन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्या-त्या विद्यापीठांना मिळायलाच हवे, तरच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण पोहोचू शकेल.
प्रश्न : सुरक्षा, दुर्गमता, इंटरनेटचा अभाव आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यांचा उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर नेमका काय परिणाम होतो ?
- दुर्गमतेमुळे चांगल्या दर्जाचे प्राध्यापक त्या भागात दीर्घकाळ टिकत नाहीत. इंटरनेट आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे आधुनिक शिक्षण प्रवाहात हे विद्यार्थी मागे पडण्याची शक्यता निर्माण होते. असे असले तरी, आम्ही आव्हानांवर मात करून 'विद्यापीठ आपल्या गावात' सारखे उपक्रम राबवून, संध्याकाळच्या महाविद्यालयांद्वारे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवत आहोत.
प्रश्न : शिक्षण ही नक्षलवाद विरोधातील सर्वात प्रभावी आणि दीर्घकालीन सामाजिक रणनीती ठरू शकते का?
- नक्षलवादाच्या विरोधातील सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणजे प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे योग्य शिक्षण होय. ते केवळ कागदोपत्री पदवी देणारे नसून मूल्ये रुजवणारे, कष्टाची लाज वाटू न देणारे आणि अनुभवजन्य असायला हवे; तरच ते अशा सामाजिक समस्यांवर मात करून जीवन समृद्ध करू शकते.
प्रश्न : आदिवासी भाषा, लोकपरंपरा आणि स्थानिक ज्ञान यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणात स्थान देताना सर्वात मोठ्या अडचणी कोणत्या येतात ?
-काही मर्यादा आणि अडचणी येतात. भाषेच्या संवर्धनाबाबत विद्यापीठाला पाहिजे तसे विशेष काम अजून करता आलेले नाही. गोंडी भाषेबाबत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार होता, परंतु मला वैयक्तिकरीत्या त्यासाठी हवा तसा वेळ देता आला नाही. तथापि, वनौषधी, खनिज संपत्तीच्या संवर्धनाबाबत विद्यापीठाने बरेच महत्त्वपूर्ण काम केले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी भागातील गौण खनिजे आणि कम्युनिटी फॉरेस्टच्या संदर्भात 20 ते 25 टक्के दर वाढवून मिळण्यात यश आले आहे, ज्यामुळे ग्रामसभांमध्ये मोठ्या प्रमाणावर धनसंचय झाला आहे. वनौषधींच्या बाबतीतही स्थानिक ज्ञानकोषाचा अभ्यास करून वैद्यकीय व वनौषधी क्षेत्रात बरेच काम झाले आहे.
प्रश्न : आदिवासी समाज हा अनेकदा संशोधनाचा विषय राहिला आहे; पण तो संशोधनाचा भागीदार कसा होऊ शकतो ?
- आदिवासी समाज हा केवळ 'संशोधनाचा विषय' नसून तो 'ज्ञान आणि अनुभवाचा स्रोत' आहे. आमच्या 'एकल' प्रकल्पाद्वारे ग्रामसभांना सहभागी करून घेऊन आम्ही त्यांनाच त्यांच्या संसाधनांचे मालक आणि संशोधनाचे भागीदार बनवले आहे. 538 ग्रामसभांचे प्रशिक्षण यातून पूर्ण झाले आहे. विद्यापीठ तिथे केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावते, निर्णय आदिवासी समाज स्वतः घेतो.
प्रश्न : पारंपरिक ज्ञान, वनोपज व्यवस्थापन, लोकवैद्यक आणि नैसर्गिक कौशल्यांना औपचारिक शिक्षण व्यवस्थेत स्थान देण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत ?
- अभ्यासक्रमात स्थानिक गरजा लक्षात घेऊन बदल करणे अत्यंत गरजेचे असते, आणि हे मुख्यत्वे शिक्षकांचे काम असते. गडचिरोलीसारख्या भागात वैदूंकडे असणारे पारंपरिक वैद्यकीय ज्ञान अभ्यासक्रमाशी जोडून घेता आले पाहिजे. काही बदल झाले आहेत, मात्र आम्ही अजून पूर्णपणे समाधानी नाही आहोत, कारण हवे तेवढे यश अद्याप मिळालेले नाही. तरीही, आम्ही विद्यापीठात 'वैद्य चिकित्सालय' सुरू केले असून, वैदूंचे पारंपरिक ज्ञान 'ओपन इलेक्टिव्ह' क्रेडिट कोर्सच्या माध्यमातून अभ्यासक्रमात आणले आहे. जेणेकरून विद्यार्थी हे ज्ञान शिकून भविष्यात स्वतः वैदूगिरी किंवा पारंपरिक वैद्यकीय सेवा गावाकडे करू शकतील.
पुस्तकी ज्ञानापेक्षा स्थानिक उद्योग, बांबू क्राफ्ट, आणि शेती आधारित तंत्रज्ञानाला अभ्यासक्रमात स्थान देणे आवश्यक आहे. आम्ही 'गोंडवाना क्राफ्ट' उपक्रमाद्वारे पारंपरिक संस्कृतीचे जतन करत, आदिवासी महिला व तरुणांना शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच ट्रायसफ (TRICEF) या इनक्युबेशन प्लॅटफॉर्मद्वारे 54 हून अधिक इनक्युबेशन करार झाले असून, 310 हून अधिक नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्यात आली आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने आम्ही CIIIT (Center for Invention, Innovation, Incubation and Training) केंद्र सुरू केले आहे, जिथे विद्यार्थ्यांना 'Industry 4.0' च्या आधुनिक तंत्रज्ञानाचे (जसे की, रोबोटिक्स, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग) थेट औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय स्पर्धा परीक्षांसाठी 18 महिन्यांचा MPSC पूर्व व मुख्य परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे मोफत चालवला जातो.
प्रश्न : आदिवासीबहुल क्षेत्रातील शिक्षकांना सांस्कृतिक संवेदनशीलता विकसित करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज आहे का ?
- नक्कीच ! शिक्षकांमध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठीच आम्ही 'ट्रायबल प्राईड जर्नी' हा विशेष प्रवास उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे 'आनंदवन', 'लोकबिरादरी प्रकल्प', 'सर्च' आणि 'मेंढा (लेखा)' यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना भेटी देऊन, तिथल्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याची माहिती शिक्षक घेतात. शिक्षकांमध्ये सांस्कृतिक संवेदनशीलता व सामाजिक नेतृत्वाचे गुण विकसित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
प्रश्न : ज्या भागात रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत, तिथे केवळ पदवी देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न्याय करता येईल का?
- अजिबात नाही! केवळ कागदाची पदवी हातात देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न्याय होत नाही. म्हणूनच आम्ही गोंडवाना विद्यापीठात पदवीसोबतच कौशल्य विकासावर भर दिला आहे. विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून रोजगाराची क्षमता असणारे नऊपेक्षा जास्त कौशल्य अभ्यासक्रम चालवले जातात.
प्रश्न : खनिजसंपत्तीने समृद्ध असलेल्या या पट्ट्यात खाणतंत्रज्ञान, पर्यावरण व्यवस्थापन आणि स्थानिक उद्योगांशी संबंधित अभ्यासक्रम किती उपयुक्त ठरू शकतात ?
-उद्योग क्षेत्राकडून विद्यापीठाला अत्यंत चांगला आणि उत्साही प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे चेअरमन हे 'लॉइड्स' (Lloyds) चे एम.डी. आहेत, ज्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत झाला आहे. विद्यापीठ आणि उद्योग यांच्यात अनेक विषयांवर 'एमओयू' (MoU) झाले असून जिल्हा प्रशासनासोबतही उत्तम कोलॅबरेशन पाहायला मिळते. वनखाते, खनिज विभाग आणि विविध उद्योग यांच्या संदर्भात विद्यापीठाचे संबंध सलोख्याचे असून, हे सर्व घटक एकात्मिकरीत्या प्रभावीपणे काम करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक येत आहे, त्यापैकी 5 हजार कोटींची गुंतवणूक होऊन प्रकल्प सुरू झाले आहेत आणि 32 हजार कोटींची गुंतवणूक 2029 पर्यंत पूर्ण होईल. यावरून या भागात आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण येऊ घातले आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर आणि यांच्याच मदतीने आम्ही 'युआयटी' (UIT) सुरू केली, ज्यामुळे भविष्यात इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.
प्रश्न : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) राबवताना आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यापीठांसमोर कोणती विशेष आव्हाने उभी राहतात ?
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणातील घटलेला टक्का (GER) व वाढते स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही 'विद्यापीठ आपल्या गावात' हा उपक्रम 27 मार्च 2023 रोजी सुरू केला आहे. संध्याकाळच्या महाविद्यालयांद्वारे बहुविद्याशाखीय तीन वर्षांची पदवी आणि कौशल्यप्रधान शिक्षण दिले जाते. सध्या काही ग्रामपंचायतींमधील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. दुर्गम भागात डिजिटल सुविधा व पायाभूत सुविधा उभारणे हेच NEP राबवताना सर्वात मोठे आव्हान आहे. प्रादेशिक भाषेत AI टूल्स उपलब्ध करून दिली, तर ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील प्रगतीसाठी एक मोठी संधी ठरू शकते.
प्रश्न : महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील उच्च शिक्षणासाठी कोणते तीन धोरणात्मक बदल तातडीने करणे आवश्यक आहे ?
1) शैक्षणिक कॅलेंडरमध्ये लवचीकता काश्मीर ते कन्याकुमारी एकच कॅलेंडर न ठेवता, स्थानिक शेतीच्या हंगामावर व हवामानावर आधारित लवचीक शैक्षणिक सत्र असावे.
2) विशेष अनुदान व पायाभूत सुविधा दुर्गम भागातील महाविद्यालयांना विशेष आर्थिक पॅकेज व अत्याधुनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावे.
3) स्थानिक उद्योगाधारित धोरण स्थानिक खनिज संपत्ती आणि वनोपजावर आधारित अभ्यासक्रमांना शासनस्तरावर मान्यता व प्राधान्य दिले जावे.
प्रश्न : 2035 मध्ये गोंडवाना विद्यापीठाची ओळख 'पदवी देणारे विद्यापीठ' म्हणून नव्हे, तर 'आदिवासी विकासाचे जागतिक ज्ञानकेंद्र' म्हणून व्हावी, यासाठी आज कोणती पावले उचलणे अत्यावश्यक आहे ?
1) स्थानिक संशोधन व पेटंट निर्मिती बाहेरून तंत्रज्ञान आयात करण्याऐवजी इथल्या आदिवासी संस्कृती, वनौषधी आणि खनिजांवर आधारित स्वतःचे तंत्रज्ञान व पेटंट विकसित करणे.
2) ग्लोबल कोलॅबरेशन जागतिक संस्थांसोबत झालेले करार अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे.
प्रश्न : असे एखादे शल्य जे कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत ठरवलेले होते, मात्र पूर्ण करता आले नाही?
- विद्यार्थ्यावर 'नापास' असा शिक्का मारणारी आणि केवळ कागदी पेपर लिहिण्याची ब्रिटिशकालीन पारंपरिक परीक्षा पद्धत बदलून, प्रत्यक्ष कौशल्य व अनुभवावर आधारित लवचीक मूल्यांकन पद्धत (अॅसेसमेंट सिस्टीम) मला माझ्या कारकिर्दीत आणायची होती. मात्र, या नावीन्यपूर्ण संकल्पनेला कडाडून विरोध झाल्याने ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, हेच माझ्या मनातील सर्वात मोठे शल्य आहे.
संवादक : डॉ. सुनील पाटील
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या